मेंदूचे आरोग्य आणि विवेक
दिनांक १० ऑगस्ट २०२४च्या म०टा०च्या मैफल पुरवणीत डॉ० तेजस्विनी कुलकर्णी यांचा "नात्यांमध्ये भावनांचे नियमन" असा लेख प्रसिद्ध झाला आहे. लेख उत्तमच आहे. पण भावनिक नियमनाचा लेखिकेने मानवी नात्यांपुरताच विचार केला आहे (कदाचित लेखाच्या मर्यांदामुळे असेल). पण भावनिक नियंत्रणाचा समाजाच्या स्वास्थ्याशी निकटचा संबंध आहे. या लेखाशिवाय अलिकडेच मेंदूच्या आरोग्याविषयी आणखी दोन पुस्तके वाचनात आली - त्यात Preserving Brain Health in Toxic Age हे पुस्तक लिहिणारे अर्नोल्ड आयझर हे ड्रेक्झेल विद्यापीठात एमिरेटस प्रोफेसर व पेन्सिल्वानिया विद्यापीठात सन्मान्य संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पुस्तकात मेंदूच्या आरोग्याची हानी करणार्या जीवनशैली, वातावरण संबंधीत संशोधनाचा संपूर्ण पट उलगडला आहे. दूसरे पुस्तक A Toxic Brain – revelations from a health journey हे सान्द्रा स्ट्रॉस यांनी जडधातू आणि जैविकविषांमुळे आपल्या पतीला झालेल्या दूर्धर आजाराची संघर्ष कथा आहे.
वास्तविक सध्या आपल्या आजुबाजूला बघितलं, तर आधुनिक शहरी मनुष्य भावनिक नियंत्रण हरवून बसल्याचे दिसते. हे विधान अनेकांना खटकेल, पण ते मी पूर्ण जबाबदारीने केले आहे. हे चिंताजनक आहे. वास्तविक माझा हा लेख खरं तर एखाद्या चेताविज्ञानाच्या अभ्यासकाने लिहायला हवा. पण व्यावसायिक व्यस्ततेमुळे त्यांना हे जमत नसेल. पण मला नक्की खात्री आहे की बहुसंख्य मस्तिष्क/चेता विज्ञानाचे अभ्यासक माझ्याशी सहमत होतील.
हृदयाचे आरोग्य बिघडले तर अकाली मृत्युचा धोका बळावतो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याकडे गंभीरपणे बघितले जाते, मात्र दूर्दैवाने तसे मेंदूच्या आरोग्याक॒डे गंभीरपणे न बघता "हे असेच चालायचे म्हणून दूर्लक्ष केले जाते". कोणतीही दूर्लक्ष केलेली समस्या स्नो-बॉल इफेक्टमुळे हळुहळु उग्र बनते आणि अंतिमत: हाताबाहेर जाते. हरवलेल्या भावनिक नियंत्रणाचे सध्या असेच काही झाले आहे.
क्षुल्लक कारणाने राग अनावर झाल्याने टोकाचे पाऊल उचलणे (खून आणि आत्महत्या), भरधाव गाडी चालवून निरपराध पादचार्यांचा बळी घेणे, सेल्फीच्या हव्यासापायी जीव गमावणे या बातम्यांशिवाय सध्या आपल्या आयुष्यातील एकही दिवस जात नाही. हा लेख लिहीत असताना कलकत्त्यामध्ये एका डॉ० तरूणीचा बलात्कार करून खून केल्याची बातमी फेसबुकवर झळकायला लागली होती.
वर दिलेल्या घटनांच्या मुळाशी असलेल्या कार्यकारणभावाचा आपण टप्प्याटप्प्याने जर विचार केला तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात यायला मदत होते -
०क्षुल्लक कारणाने राग - भावनिक नियंत्रणाचा अभाव - अविचाराने कृती
०भरधाव गाडी चालवून निरपराध पादचार्यांचा बळी घेणे - परिणामांचा विचार न करता बेपर्वाईने वागणे - अविचाराने कृती
०सेल्फीच्या हव्यासापायी जीव गमावणे - सारासार विचार न करता स्वत:चा आणि जीव धोक्यात घालणे - अविचाराने कृती
वर दिलेल्या प्रातिनिधिक उदाहरणांचा लसावि काढला तर असे लक्षात येते की परिणामांचा विचार न करता, स्वत:ला आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी ’अविचाराने’ केलेली कृती यात समान आहे. अविचाराने केल्या जाणार्या कृतींचा/वर्तनाचा पट कमी-अधिक तीव्रतेनेनुसार खुप मोठा आहे. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, वाहतूकीचे नियम धूडकावणे, लाच मागणे-किंवा देणे किंवा एकंदरच कायद्याचा अनादर, असे अविचारी वर्तन जेव्हा मोठ्या संख्येने माणसे करू लागतात तेव्हा ते गंभीर रूप धारण करते, कारण अशा लोकांमुळे समाजाचे स्वास्थ्य हरवते.
माणसे अविचारी वर्तन का करतात? असा प्रश्न आता जर तुम्हाला पडला असेल तर माझा हा लेख लिहीण्याचा उद्देश निम्मातरी पूर्ण झाला असे मी म्हणेन. बहुसंख्य लोकांची अशी धारणा असते की माणसाला विचार करायची क्षमता शिक्षणाने प्राप्त होते. पण हे अर्धसत्य आहे. अविचारी वर्तनाचे उर्वरित सत्य शोधण्यासाठी जीवशास्त्राची मदत घेणे आवश्यक ठरते. ज्याप्रमाणे आडात नसेल तर पोहर्यात येत नाही, त्याचप्रमाणे निसर्गाने बहाल केलेल्या मेंदू या अवयवाचा व्यवस्थित विकास झालेला नसेल, तर शिक्षणाचा योग्य तो परिणाम होत नाही.
मेंदूची उत्पत्ती
पृथ्वीवर विकसित झालेल्या जीवसृष्टीमध्ये मेंदूच्या विकासाचा इतिहास तपासला तर मेंदूची निर्मिती खुप नंतर झालेली दिसतो. सुरुवातीला जन्माला आलेले विषाणू, एकपेशीय जीव यामध्ये मेंदू दिसत नाही. पण जसजसे बहुपेशीय जीव विकसित पावू लागले तसतसे त्यांच्या अंतर्गत यंत्रणेमध्ये सुसूत्रता राहावी यासाठी प्रथम चेतासंस्था (Nervous system) विकसित पावली. अनेक कृमींमध्ये फक्त मेंदूरहित चेतासंस्था असते (उदा० स्टारफिश, जेलीफिश, समुद्र स्पंज, राउंड्वर्म, चपटे कृमी , हैड्रा इ०). जसजसे गुंतागुंतीच्या रचना आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांचे जीव विकास पावले, तसे त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकाश, ध्वनि, स्पर्श, तापमान इ० संवेदनांना प्रतिसाद देण्याची गरज आणि क्षमता निर्माण झाली आणि संवेदनानुसार योग्य तो निर्णय घेऊन प्रतिसाद देणे, अंतर्गत यंत्रणा चालू किंवा बंद करणारी व्यवस्था म्हणून अत्यंत गुंतागुंतीचा मेंदू हा अवयव निर्माण झाला. मेंदूची उत्क्रांती वेगवेगळ्या जीवांच्या पर्यावरणातील आह्वानानुसार होत राहीली. मग मेंदूच्या मागील भागात प्रकाशरूपी संवेदनाना प्रतिसाद देणार्या चेतापेशींचा समूह विकसित होऊन पार्श्वपिण्ड (Occipital lobe) ची निर्मिती झाली. या प्रमाणेच ध्वनी आणि स्पर्श या संवेदनाना ग्रहण करणार्या (शंखपिण्ड) Temporal lobe) आणि भित्तीपिण्ड (parietal lobe) ची निर्मिती झाली.
मेंदूच्या या खण्डांचे कार्यगत विभाजन (functional differentiation) बंदिस्त कप्प्यांमध्ये झालेले नाही आणि तसे श्रेयस्कर पण नव्हते. प्रत्येक खण्डाची काही मुख्ये कार्ये आहेत आणि काही पूरक किंवा उपकार्ये आहेत. उदा० शंखपिण्डाचे (टेंपोरल लोब) कार्य फक्त ध्वनी या संवेदने पुरते सिमित नसते, तर भाषा,भावना आणि काही प्रमाणात दृष्य संवेदनांचे पण या खण्डात विश्लेषण होते...
मेंदूतील या सर्व भागांची रचना विशिष्ट संवेदनाना अनुलक्षून असली तरी या सर्व भागांमध्ये सुसूत्रता ठेवणे, एखादे उद्दीष्ट गाठण्यासाठी आवश्यक असणारे भविष्याचे नियोजन करणे, आणि तसेच एखाद्या कृतीच्या भावी परिणामांचे मूल्यमापन करणे, किंवा धोक्याचे/जोखमीचे विश्लेषण करणे, मानसिक अथवा शारीरिक आवेगावर नियंत्रण ठेवणे, नैतिक/अनैतिक, धोकादायक/सुरक्षित अशी वर्गवारी करणे, त्याप्रमाणे निर्णय घेऊन इतर संबंधित भागांना आदेश देणार्या भागाचा विकास होत गेला. बहुतेक सर्व जलचर, भूचर आणि पक्ष्यांमध्ये काही ना काही प्रमाणात ही सर्व कार्ये जीवसृष्टीतील अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक असतात. पण काहीशी दूर्दैवाची गोष्ट अशी की ज्याला विवेकाचे स्थान म्हणता येईल अशा मेंदूतील महत्त्वाच्या भागाचा विकास मेंदूच्या आकाराच्या प्रमाणात झाला. त्याचे नाव उपाग्रखण्ड (Prefrontal lobe)!
उपाग्रखण्ड हा भाग चेतापेशींच्या अत्यंत दाट जाळ्याने उर्वरित सर्व मेंदूशी, उदा० (बाह्यक (cortex), उपबाह्यक (subcortex), मस्तिष्कदण्ड (brain stem)) इत्यादिंशी जोडला गेलेला असतो. उपाग्रखण्डाचा वरचा भाग हा लक्ष, ज्ञान आणि कृती नियंत्रित करतो. मेंदूच्या या भागाचे अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आपल्या मनुष्यत्वाशी निगडित असलेल्या नियोजन प्रक्रियेत महत्त्वाचे काम चालते. व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार, निर्णय प्रक्रिया, सार्वजनिक आयुष्यातील संयम या सर्वांवर विकसित उपाग्रखण्डाचे नियंत्रण असते. वेगळ्या तऱ्हेने सांगायचे झाले तर आपली ध्येये आणि विचार, कृती यांच्यामध्ये सुसंवाद ठेवण्याचे कार्य (ज्याला आपण विवेक म्हणतो) उपाग्रखण्ड करतो.
उपाग्रखण्डाचे सर्वात ठळकपणे चालणारे कार्य म्हणजे अधिकारी कार्य. परस्पर विरोधी विचार किंवा कृती जाणणे, चांगले किंवा वाईट यांच्यातील फरक, साधर्म्य आणि वैधर्म्य यातला फरक, एखाद्या निर्णयाचे किंवा चालू कृतीचे भविष्यातले निष्पन्न, ध्येयाच्या दिशेने प्रवास इ० सर्वांवर उपाग्रखण्डाचा प्रभाव असतो. उपाग्रखण्ड नियमांचे (वि० सामाजिक) ज्ञान ग्रहण करतो. उपाग्रखण्डाचा पुढचा भाग (along the rostral-caudal axis) अमूर्त (abstract) पातळीवरील नियमांच्या ज्ञानाचे ग्रहण करतो. योग्य रीतीने काम करणारा उपाग्रखण्ड वास्तवाचे भान देतो आणि अपराधीपणा किंवा पश्चात्तापाची भावना पण देतो. स्वप्नात सृजनशीलता जरी जागी असली आणि काही वेळा ती लाभकारी असली तरी त्यात तर्कसंगती नसते. म्हणून स्वप्नात जे काही वेळा वाटते किंवा दिसते, ते दिवसा जागेपणी प्रत्यक्ष शक्य नसते. झोपेत उपाग्रपिंड फारसा कार्य करत नसल्याने स्वप्नांमध्ये पश्चात्तापाची भावना नसते. यामुळे कायदे मोडून धोकादायक वर्तन करताना पश्चात्तापाची भावना नसणे हे उपाग्रखण्डाचे कार्य बिघडल्याचे लक्षण मानावे लागते. जे अट्टल गुन्हेगारांमध्ये सर्रास दिसते.
उपाग्रखण्ड आणि उपाग्रबाह्यक (उपाग्रखण्डाचे बाहेरील चेतापेशींचे आवरण) यांच्या विलक्षण विकासामुळे मानवाला विवेकाची देणगी मिळाली, माणूस विचारक्षम बनला आ्णि संपूर्ण जीवसृष्टीत एक वेगळे स्थान प्राप्त झाले. ही विचारक्षमता इतर जीवांमध्ये नसते का? तर नक्कीच असते, फक्त ती पर्यावरणातील आह्वाने आणि उपाग्रखण्ड आणि उपाग्रबाह्यक यांच्या एकूण आकारावर आणि विकासावर अवलंबून असते. म्ह० ज्या प्रजातींमध्ये मेंदूचा आकार लहान असतो, तिथे "उपाग्रखण्ड आणि उपाग्रबाह्यक" पण फारसे विकसित होत नाहीत. साहजिक त्यांची कार्ये पण मर्यादित प्रमाणात दिसून येतात.
अविकसित उपाग्रखण्ड, सामाजिक स्वास्थ्य आणि गुन्हेगारी
उपाग्रखण्ड आपल्या वर्तनात आणि जगाशी संवाद साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जेव्हा हा भाग पूर्णपणे विकसित होतो, तेव्हा व्यक्ती चांगले निर्णय घ्यायची क्षमता आणि आत्मनियंत्रण हे गुण धारण करतात. आवेगावर नियंत्रण ठेवायचे काम फक्त व्यवस्थित विकसित झालेला उपाग्रखण्ड करतो. तारूण्यावस्थेत संप्रेरकांच्या प्रभावामुळे, मद्यसेवनाने तसेच अमली पदार्थांच्या सेवनाने उपाग्रखण्ड निष्प्रभ होतो. त्यामुळेच माणसामधला अविकसित आणि कार्यभ्रष्ट (dysfunctional) उपाग्रखण्ड हा सामाजिक अस्वास्थ्य आणि गुन्हेगारीचे जीवशास्त्रीयदृष्ट्या मूलभूत कारण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
अलिकडील ताज्या संशोधानानुसार, उपाग्रखण्ड आणि उपाग्रबाह्यक यांचा विकास पूर्ण पंचविशीनंतरही चालू राहतो. या टप्प्यानंतर हा विकास पूर्ण होणे हे त्या व्यक्तीला मिळणार्या स्थैर्यावर अवलंबून असते. ज्याना घंटाकृती आलेखाचा नियम (बेल कर्व्ह) नियम माहित आहे त्यांनाच हे पटेल की जसजसे लोकसंख्येच्या ताणाने, पर्यावरणातील असमतोलाने जगणे अवघड बनेल तसे विवेकी आचरण हे अपवाद बनेल. कायद्याची अंमलबजावणी कडक नसेल तर ही समस्या आणखीनच गंभीर बनते. कटु आहे पण सत्य आहे...
त्यामुळे व्यक्ती १८ व्या वर्षी सज्ञान बनते अशी सामाजिक धारणा असली तरी विवेकी बनतेच असे नाही. वर लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या आणि इतर अनेक गुन्ह्यांमध्ये जिथे बेपर्वा/आत्मघातकी वर्तन ठळकपणे दिसून येते, तिथे अविकसित उपाग्रखण्ड हे प्रमुख जीवशास्त्रीय कारण सांगता येते. यावर जगभरच्या सन्मान्य विद्यापीठात भरपूर संशोधन झालेले आहे.
उपाग्रखण्डाच्या विकासावर प्रभाव टाकणारे घटक
आजुबाजुचे वातावरण (वि० गुन्हेगारी), लहान वयात संगोपनाचा अभाव, भावनिक आघात करणारे प्रसंग, रोजच्या जीवन संघर्षामुळे जगण्याचा ताण (विशेषत: विश्रांतीचा अभाव आणि कॉर्टीसॉल सारख्या संप्रेरकांची दीर्घकाल वाढलेली पातळी), समाजमाध्यमांवरील अतिवावराने येणारा ताण, कुपोषण, हवा, पाणी आणि अन्नातून होणारा जैविक-विषांचा हल्ला, मेंदूचे आणि परिणामी उपाग्रखण्डाचे कार्य/आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरतात. स्वमग्नता, अल्झायमर, स्ट्रोक, अपस्मार, कंपवात, दुर्मनस्कता (स्किझोफ्रेनिया) इ० अनेक मानसिक विकारांचे प्राबल्य वाढते. याची किंमत बाधित व्यक्तीचे कुटुंब, समाज आणि राष्ट्र या सर्वानाच मोजावी लागते. अलिकडेच वाचलेल्या एका वृत्तानुसार शिसे या धातूमुळे होणार्या विषबाधेमुळे मुलांचा बुद्ध्यंक कमी होऊन मतीमंदत्व येऊ शकते.
याशिवाय एक धक्कादायक गोष्ट सान्द्रा स्ट्रॉस या बाईंच्या उल्लेख केलेल्या पुस्तकात आहे - इतर अवयवांप्रमाणे मेंदूतही चयापचयामुळे पेशीमळाची (Cellular waste products) निर्मिती होत असते. या पेशीमळाचा निचरा करणारी यंत्रणा झोपेत सक्रिय होते. ही यंत्रणा २५% लोकसंख्येत जनुकीय दोषांमुळे विकसित होत नाही. त्यामुळे मेंदूच्या आरोग्याची समस्या आणखी गंभीर बनते. स्मार्टफोनच्या अतिवापराने झोप नाहीशी झाल्यामुळे मेंदूतील विषद्रव्यांचा निचरा न होणे इ० अनेक कारणांमुळे उपाग्रखण्डाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
हवामानबदल आणि उपाग्रखण्ड
प्रसिद्ध टेड व्याख्यानमालेत नुकताच म्ह० १५ ऑगस्ट रोजी एका नव्या व्याख्यानाचा व्हिडीओ युट्युबवर प्रसृत केला गेला. या व्याख्यानात वर्तवलेले हवामानबदलाचे ताजे भाकीत अतिशय चिंताजनक आहे. २०२३ पासून घसरगुंडीचा वेग एकदम वाढला आहे आणि पृथ्वीची सहनशीलता, स्वत:ला दुरुस्त करायची क्षमता संपली आहे, असा सूर वेगवेगळी संख्याशास्त्रीय मॉडेल्स आळवत आहेत.
देशात यावर्षी झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील चित्राचा अंदाज बांधणे फार अवघड वाटायला नको.
जागतिक हवामानबद्लामुळे मेंदूच्या रचनेत आणि कार्यात दोन्हीमध्ये बदल होत आहेत, हे आधुनिक चेताविज्ञान आता मान्य करते. पण भारतावर याचा काय परिणाम होईल याचा अंदाज बांधायचा असेल तर विषुववृत्ताजवळील देशांचा अभ्यास करावा. यासाठी फार कष्ट घ्यायची पण आवश्यकता नाही.
समजा जागतिक तापमानात १ अंश सेल्सिअस ची जर वाढ झाली तर भारतातील मोठ्या लोकसंख्येला सुखाची आणि हक्काची झोप मिळणे अवघड बनेल. उकाडा, पूर, वादळे यांना तोंड देताना नागरिकांमध्ये मन:शांति टिकून राहणे अवघड आहे. उदा० मन:स्वास्थ्य हरवल्याने चिडचिडेपणा वाढला की ’क्षीणा: जना: निष्करूणा भवन्ति’ या उक्ती प्रमाणे माणसे पटकन विवेक हरवतात. त्याचा मोठा परिणाम माणसांच्या वर्तनावर, निर्णयशक्तीवर, उत्पादकतेवर, तसेच राजकीय आणि सामाजिक स्थैर्यावर होतो. अशा मोठ्या समस्या हाताळायला जे धाडसी निर्णय घ्यावे लागतात ते लोकशाही राज्यव्यवस्थेत अवघड बनते. या शिवाय आनंदाच्या जागतिक क्रमवारीत भारताचा नंबर बराच खाली आहे, जो नागरिकांच्या सर्वसाधारण मानसिक आरोग्याचा निदर्शक आहे.
याचे भान कुणाला आहे का? सध्या मला तरी तसे अजिबात दिसत नाही...
संदर्भ -
१.https://www.americanbrainfoundation.org/the-effects-of-climate-change-on...
२. https://www.ucl.ac.uk/news/2024/may/climate-change-likely-aggravate-brai...
३. https://www.who.int/news/item/14-03-2024-over-1-in-3-people-affected-by-...
४. https://www.msn.com/en-in/health/health-news/how-lead-poisoning-is-threa...
प्रतिक्रिया
(No subject)
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
वरील लेख लिहून झाल्यानंतर आज
वरील लेख लिहून झाल्यानंतर आज अचानक माझ्या लेखातील काही भारतीयांच्या मेंदूच्या आरोग्याविषयी दाव्यांना पुष्टी देणारा संशोधन अहवाल नेचर मध्ये सापडला. पुरेशी झोप आणि मेंदूचे अधिकारी कार्य यांचा घनिष्ठ संबंध आहे.
https://www.nature.com/articles/s42003-022-03123-3#Fig1
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
मी इतकेच बोलू शकतो
एकपेशीय प्राणी ते बहुपेशीय प्राणी .ह्यांच्या मेंदू ची उत्क्रांती
( सजीवांची उत्क्रांती असा उल्लेख आता च्या युगात कोणी केला की डार्विन sir ना स्वर्गात पण घाम फुटतो माझ्या नावावर हे काहीपण ज्ञान जनतेला देणार तर नाहीत ना ) अबब केवढा मोठा विषय आहे.
मेंदू विकसित होण्यास जबाबदार घटक .
अबब हा तर खूप मोठ्या विषय आहे.
मानवी मेंदू,मानवी मेंदू चे भाग ,प्रत्येक भागाचे कार्य,माणसाचे वर्तन, त्याला जबाबदार घटक .
इतक्या सर्व सर्व विषयाचा एकत्र अभ्यास करण्याला १५० ते २०० iq असलेलेली लोक पण धजावणार नाहीत.
ते बिचारे एकादी पेशी किंवा एकदा भाग इतकाच तुकडा काढून त्या वर आयुष्भर संशोधन करत असतात .
आणि तरी तुमच्या इतक्या आविश्वासाने निष्कर्ष काढायला त्यांना पण बळ येत नाही.
पण तुम्ही इतकी मोठी व्याप्ती असणाऱ्या विषयात तुमची ठाम मत व्यक्त करण्या इतपत आत्मविश्वास आणता कोठून.
हा मला तरी प्रश्न पडतो
"मेंदू विकसित होण्यास जबाबदार
तुम्ही या विषयात थोडं जरी डोकं घातलंत तर हा विषय वाटतो तितका "अबब" नाही.
जगण्याचा संघर्ष (त्यामुळे निर्माण झालेली आह्वाने) मग तो शहरातला (सिविलाईज्ड सोसायटी) असो की जंगलातला असो, तो मेंदूच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे. यावर प्रभाव पाडणारा आणखी एक घटक म्हणजे प्रदूषण.
पोषण (अन्न) आणि आजुबाजूचं वातावरण हा संघर्ष सोपा किंवा अवघड करतात. भावनिक, बौद्धिक आणि आर्थिक गरजा पूर्ण झाल्या तर हा संघर्ष तूलनेने सोपा होतो. जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये लवकर शिकली जातात.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
इतके सोपं नाही ते
दृश्य जीवन आणि अदृश्य जीवन असे दोन प्रकार आहेत.
Darwiin sir ना अदृश्य जीवनाची काहीच कल्पसना नव्हती त्या मुळे त्यांनी उत्क्रांती विषयी जे सांगितले आहे ते पूर्ण नाही पण चुकीचं पण नाही.
अदृश्य जीवन म्हणजे सूक्ष्म जीव. जे डोळ्यांनी दिसत नाहीत.
जिवाणू, विषाणू आणि बाकी.
ह्यांचे उत्क्रांती मध्ये खूप मोठा रोल आहे.
पृथ्वी वर समान वातावरणात राहणारे अनंत जीव आहेत फक्त माणूस च का विकसित झालं ह्याचे उत्तर त्या अदृश्य जीवनाच्या उत्क्रांती वर असणाऱ्या प्रभावाचा सर्वात मोठा पुरावा आहे.
खूप गहण विषय आहे तुम्ही समजता इतका सोपा नक्कीच नाही
5 वर्षाच्या पोरांना कामसूत्र वाचायला दिले तर त्यानं खर काय आणि खोटं काय हेच समजत नाही.
कारण त्या विषयातील प्राथमिक अभ्यास, अनुभव झेरो असतो.
तसें सामान्य लोक ज्या लोकांना प्राथमिक पण कोणत्याही विज्ञान माहित नसते ती लोक वि ज्ञान विषयातील लेख वाचतात त्यांना काही hi कळत नसते.
आणि तर्कतीर्थ id सारखे चुकीचे गैरसमज करून घेतात. आणि विज्ञान विषयी लेखनचा चुकीचा अर्थ लावून भलतेच ज्ञान लोकांना देत असतात
समाजात ही पण दिसते
कुटुंब व्यवस्थेचा नाश.
लग्न व्यवस्था ही फक्त सेक्स साठी आहे असे अकलेचे तारे तोडणारे डावे आणि पुरोगामी.
स्त्री पुरुष समानता ऐवजी स्त्री स्वतंत्र अशी कल्पना मांडून स्त्री पुरुषांच्या समानतेलाच सुरुंग लावून सामाजिक स्वस्थ बिघडवणारे डावे आणि पुरोगामी
त्या मुळे उध्वस्त झालेली कुटुंब व्यवस्था.
लहान मुलांना पालकांचा सहवास न मिळणे, .
लहान मुलांना ग्रँड parent च नसणे .
ह्या मुळे आलेला त्यांना एकटेपणा.
जीवघेणी स्पर्धा ,शिक्षणाचा फालतु दबाव .
ह्या मुळे मूल एकटी पडली आणि सोशल मीडिया,च आहारी गेली.
काल्पनिक जगात जगू लागली .
म्हणून आताची पिढी जास्त हिंसक आहे .
प्रदूषण मुळे नाही.
प्रदूषण मुळे लोक हिंसक होत असती तर.
शहरात जास्त हिंसक वृत्ती दिसली असती पण ग्रामीण भागात जास्त हिंसक वृत्ती आहे.
प्रगत देशा पेक्षा गरीब आफ्रिकेत जास्त हिंसा होताना दिसते
ज्या गरीब आफ्रिकन देशात प्रदूषण खूप कमी आहे
???
असे नक्की कोणत्या डाव्याने आणि/किंवा पुरोगाम्याने म्हटले बुवा?
(किंबहुना, लग्नव्यवस्था ही सेक्सवर निर्बंध/नियंत्रण आणण्याकरिता असावी, अशी आम्हांस (एका स्वघोषित डाव्या पुरोगाम्यास) दाट (तथा जुनीच) शंका आहे.)
स्त्रीला गेला बाजार पुरुषाइतके तरी स्वातंत्र्य असल्याविना स्त्रीपुरुष समानता नक्की कशी येईल, असे आपले म्हणणे आहे?
असो चालायचेच.
भारतीय समाज व्यवस्था उध्वस्त होण्यासारखे विचार
भारतातील समाज व्यवस्था,कुटुंब व्यवस्था ,लग्न संस्था नष्ट करण्यास अनुकूल विचार .
कोणती लोक व्यक्त करतात,त्यांचे बॅकग्राऊंड काय आहे ह्या वर लक्ष ठेवले तर लगेच लक्ष्यात येईल ही लोक कोण आहेत.
भारताला कमजोर करणे ह्या ध्येयाने पछाडलेले कोण आहेत ते पण अभ्यास केल्यावर माहित पडेल
..
मला एक सांगा.
(तुम्ही लहान असताना)
- तुम्हाला तुमच्या पालकांचा सहवास मिळाला ना?
- तुम्हाला ग्रँड parents होते ना?
- यांपैकी कशाच्या अभावी तुम्हाला एकटेपणा आला नाही ना?
- जीवघेणी स्पर्धा, शिक्षणाचा फालतू दबाव यांना तुम्हाला (निदान आजच्या पिढ्याच्या तुलनेत) तोंड द्यावे लागले नाही ना?
- या सर्व कारणांमुळे तुम्ही एकटे पडला नाहीत ना?
उत्तम!
आता दुसरे सांगा, तरीसुद्धा आजमितीस तुम्ही इथे ‘ऐसीअक्षरे’वर सदान्कदा पडीक असताच ना?
(लक्षात घ्या; ‘ऐसीअक्षरे’ हादेखील सोशल मीडियाचाच एक प्रकार आहे. सोशल मीडियाची किंचित अगोदरची ‘जनरेशन’ असेल कदाचित, परंतु, सोशल मीडियाचाच प्रकार आहे, हे निश्चित.)
नाही, तुम्ही इथे ‘ऐसीअक्षरे’वर पडीक असण्याबद्दल मला कोणताही आक्षेप नाही. (मीदेखील असतो.) परंतु, सोशल मीडियाच्या आहारात कोणाचा समावेश होण्याची जी कारणे तुम्ही दिलीत, त्यांचा मला वाटते पुनर्विचार होण्याची गरज आहे.
पूर्वीच्या काळी लोक सोशल मीडियाच्या आहारी नसत, याचे प्रमुख (आणि कदाचित एकमेव) कारण माझ्या मते पूर्वी सोशल मीडिया हा प्रकारच अस्तित्वात नव्हता, हे आहे.
आणि, पूर्वी (सोशल मीडियाच्या अभावी) लोक सोशल मीडियाच्या आहारी नसत, याचा अर्थ ते कशाच्याच आहारी नसत, असा मुळीच नव्हे. आहारी जायला इतर गोष्टी असत. पिच्चर असत, विविध भारती असे, दूरदर्शन असे, थोड्या अगोदरच्या काळात ‘चार आणे माला’-छाप कादंबऱ्या नाहीतर ‘धनंजय-छोटू’-छाप डिटेक्टिव कथा नाहीतर ‘कॅप्टन दीप’-छाप रहस्यकथा असत. अगदीच नाही, तर शब्दकोडी असत. थोडक्यात काय, तर (१) मानवी एकटेपणा, आणि (२) कशाच्या तरी आहारी जाण्याची मानवी गरज, हे सनातन आहेत; त्यांची साधने तेवढी कालानुरूप वेगळी.
(खरे तर, माणूस कशाच्या तरी आहारी तरी का जातो? तर निव्वळ टाइमपाससाठी. ती खरे तर माणसाची आदिम गरज आहे. To kill time. नाहीतर काळ तुम्हाला खायला उठेल. आणि त्याकरिता माणूस त्या-त्या काळात जे काही उपलब्ध असेल, ते वापरेल. कधी आचार्य अत्र्यांची ‘काळ आणि कादंबरी’ नावाची कथा वाचायला मिळाली, तर अवश्य वाचा, असे सुचवू इच्छितो. थोडी जुन्या काळातली आहे, विनोदी आहे, परंतु मार्मिक आहे.)
(आणि, काळाला हरवायला नेहमी इतरांवर नाही अवलंबून राहता येत. शेवटी, आपापला उपाय प्रत्येकालाच शोधावा लागतो.)
(अतिअवांतर: आमच्या काळात आमच्या शिक्षकांची एक लोकप्रिय रड असे. मुले म्हणे सिनेमा पाहून वेगवेगळ्या हेअरस्टाइली मात्र करायला शिकतात, झालेच तर खून-मारामाऱ्यांचे सिनेमे पाहून खून-मारामाऱ्या करायला शिकतात; ‘संत ज्ञानेश्वर’ सिनेमा पाहून कोणी संत ज्ञानेश्वरांसारखे मात्र होत नाही. खरे होते म्हणा ते! परंतु, येथे तो मुद्दा नाही. आणि, या रडीमागे ‘आमच्या काळी आम्ही असे नव्हतो; नाहीतर तुमची हल्लीची पिढी!’ असाही एक (छुपा किंवा उघड) सूर असे. सांगण्याचा मतलब, ही रड प्रत्येकच पिढीत पुढच्या पिढीबद्दल असते; फक्त, रडीचा मुद्दा प्रत्येक पिढीचा वेगळा असतो, इतकेच.)
‘काळ आणि कादंबरी’ (आचार्य अत्रे) (अवांतर)
प्रस्तुत कथा या संग्रहात वाचावयास मिळेल.
संग्रह छानच आहे
पाठीवरचे वळ, पहिले कावळे संमेलन आणि काळ आणि कादंबरी वाचल्या.
परंतु यात घालवलेला वेळ कामाचा होता. आता त्या कामासाठी नवीन वेळ तयार करावा लागेल त्याचे काय?
काश मै लीना होती!
अवांतर: मी पु.ल. वाचू लागले की आजी नेहमी तुच्छतेने 'अत्रे यांच्यापेक्षा कितीतरी सरस', अशी सारखी कटकट करायची. आता ते दोघेही सारखेच वाटतात.
सार्थक!
बोले तो, आमच्या शिफारशीने कोणीतरी काहीतरी वाचले, म्हटल्यावर, प्रतिसादाचे सार्थक झले!
आता, त्यातल्या तीन कथा वाचल्याच आहात, तर त्यातलीच शेवटली ‘समुद्राची देणगी’सुद्धा वाचूनच टाका, असे सुचवू इच्छितो. (थोडी वेगळी आहे; विनोदी नाही, tragic आहे, touching आहे, tearjerkerसुद्धा म्हणता येईल कदाचित; मात्र, अत्र्यांच्या मी वाचलेल्या कथांपैकी मला सर्वात जास्त प्रभावी वाटलेली कथा. शाळकरी वयात सर्वप्रथम वाचली होती. तुम्हाला कितपत आवडेल, कोणास ठाऊक, परंतु तरीही.)
(संग्रहातल्या उर्वरित कथा (बोले तो, तुम्ही वाचलेल्या तीन अधिक ही चौथी, एवढ्या वगळून) मात्र मला तितपतच वाटल्या. असो.)
तुलना चुकीची केली आहे तुम्ही
मला एकटेपणा जाणवत नाही,मी इथे फक्त जी दुर्दशा चालू आहे ते दाखवण्यासाठी येतो.
Yamah ची rx १०० सारखी बाईक नाही असे लोक ठाम पने म्हणतात.
माझ्या कडे एक नोकिया च मोबाईल होता ब्लॅक बेरी सारखा दिसणारा त्याची स्क्रीन ज्या दर्जा ची होती तो दर्जा आज अती मॉडर्न समजणाऱ्या मोबाईल ची पण नाही.
भर दुपारी तीव्र सूर्यप्रकाशात मोबाईल वरील स्क्रीन वरील सर्व अक्षरे सोनेरी रंगात स्पष्ट दिसत असत त्या मोबाईल मध्ये.
तंत्र ज्ञान विकसित आणि दर्जा पहिल्या पेक्षा बेकार अशी अवस्था आहे.
जे माहित आहे ते उदाहरण देतो vt स्टेशन ची रचना आणि बांधकाम खूप उच्च दर्जा च आहे १५० वर्ष पूर्वी च आज पण ती इमारत मजबूत आहे पुढील शे दोनशे वर्ष पण तिला काही धोका नाही.
आज च्या आधुनिक तंत्र नी उभ्या राहिलेल्या इमारती ५० वर्षात च शेवटच्या घटका मोजतात.
न कोणता आकार न वास्तुशिल्प चे उत्तम डिझाइन.
ह्याला अधोगती च म्हणतात
खरे तर जसे नव नवीन शोध लागतील तसा दर्जा उच्च होत गेला पाहिजे.
१) कीटक नाशक, तण नाशक ह्या मधील रसायने प्रवाही आहेत .
माती मधून पिकात पीक मधून त्याच्या फळात आणि फळातून माणसाच्या शरीरात जातात .
Rogit मानवी पिढी हे त्याचे अंतिम प्रॉडक्ट आहे .
किती लोकांना ह्याची जाणीव आहे .
मुळात ही समस्या अती शिक्षित अती प्रगत लोकांना समजत नाही.
ही प्रगती आहे की अधोगती.
समस्या ची जाणीव आधुनिक मानवात कमी होत आहे म्हणजे माणूस अधोगती कडे वेगाने जात आहे.
पितळ,तांबे,ह्यांची भांडी पहिली होती त्या दर्जा ची पितळ ,तांब्याची भांडी जगात कुठेच आता उपलब्ध नाहीत.
दिनप्रतिदिन प्रत्येक गोष्टी च दर्जा खसरत चालला आहे आणि तरी ही अधोगती आहे ह्याची जाणीव च लोकांना होऊन दिली जात नाही.
आणि हे धुंदी निर्माण करण्यासाठी च सोशल मीडिया ल प्रमोट केले गेले आहे
पाहिली तरुण मुलं आहारी होती ना.
मैदानी खेळाच्या.
नियमित व्यायाम करण्याच्या .
.
मैदानी खेळ आता गायब च झाले आहेत ह्याला प्रगती नाही अधोगती म्हणतात.
मोबाईल गेम द्वारे मैदानी खेळ आताची पिढी खेळत आहे.
लहान मुलांना चांगले वळण लावणे ह्याचा हक्क .
अगदी शिक्षक पासून गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना पालकांनी देवून ठेवला होता .
नदीवर खोल पाण्यात दिसलो तर शेजारी पण मारत घरी पोचवत होते आणि त्या मध्ये काही गैर आहे असे पालकांना कधीच वाटत नव्हते.
आता बाकी मूल सोडा स्वतःच्या मुलांना पण चार चांगल्या गोष्टी सांगायची पालकांची हिंमत नाही.
समाज प्रगती करत नाही तर अधोगती कडे वेगाने जात आहे.
आजचा सुविचार
"केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा!"
-- असेच मागच्या शतकातील कुणीतरी
+
हो, तेही होते.
…
ज्या मुलांना grandparents उपलब्ध असतात, त्यांच्या बालपणात ते grandparents महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, नि सकारात्मक योगदान करू शकतात, याबद्दल खरे तर कोणताच संदेह नाही. मात्र…
…Grandparentsनी स्वतः होऊन, स्वेच्छेने, प्रेमाने असे योगदान करणे वेगळे (ते ठीकच आहे), परंतु, त्यावर अवलंबून राहणे, त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणे हे कितपत सयुक्तिक आहे?
Should grandparents be taken for granted? Should they simply be treated like a guaranteed, free-of-cost daycare option? (कधीकधी तो नाइलाज असू शकतो, हे समजण्यासारखे आहे, परंतु, किमानपक्षी, तेवढे मान्य करायला काय हरकत आहे?)
Grandparentsना आपले आयुष्य नसते काय? असू नये काय?
आजकाल काय झालंय काय?
आजकाल काय झालंय काय?
मार्मिक वर मार्मिक!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
तुमच्या प्रदीर्घ
तुमच्या प्रदीर्घ प्रतिसादांबद्दल आभार. पण मला तुमचा बराच गोंधळ उडाला आहे
असे वाटते.
. तुम्हाला माझी जी ठाम विधाने वाटतात. ती अनेक वर्षांच्या वाचनातून तयार झाली आहेत किंबहूना ती माझी अशी नाहीतच...
स्त्री स्वतंत्र आहे हे बरेचसे गैरसोईचे पण जैविक पातळीवरील सत्य असे विधान आहे. निसर्गात मुळात वंश फक्त स्त्रिचा असतो, पुरुषाचा नसतो.
मानवी संततीला (इतर प्राण्यांच्या तूलनेत) संगोपनाची दीर्घकाळ आवश्यकता असते. याशिवाय संपत्ती संक्रमण (कुणाची संपत्ती कुणाला मिळणार) सुलभ व्हावे यासाठी बाप कोण हे निश्चित करणे आवश्यक ठरते (आणि बापाचे नाव लावले जाते).
अन्यथा जैविकदृष्ट्या वंश म्हणजे निसर्गात वंश हा स्त्रिचाच असतो. पुरुषाचा वंश ही मानीव कल्पना समाजाने संपत्ती संक्रमणाच्या सोईसाठी निर्माण केली आहे. कुणीतरी हूशार वकीलाने हे विज्ञान कोर्टाला समजावून सांगण्याची गरज आहे.
आपल्याला वडीलांच्या कडून जो जनुकीय वारसा मिळतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त जनुकीय वारसा आई कडून मिळतो. आपले आईमुळे अस्तित्व आपल्या जन्माच्या अगोदर पासून, खरं तर आईच्या जन्मापासून अस्तित्वात असते. शिवाय आईच्या पेशी आपल्या सर्वांच्या शरीरात निपचित पडून अनंत काळ वास्तव्य करतात. शिवाय प्रजनानासाठी अनेक प्राण्यामध्ये नराची आवश्यकता नसते. प्रयोगशाळेत बीजांडाचे फलन पण आता शूक्रजंतू शिवाय करता येते. पण बीजांडाशिवाय गर्भ राहू शकत नाही म्हणून वंश स्त्रिचा असतो.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
.
मानवी संततीला (इतर प्राण्यांच्या तूलनेत) संगोपनाची दीर्घकाळ आवश्यकता असते. याशिवाय संपत्ती संक्रमण (कुणाची संपत्ती कुणाला मिळणार) सुलभ व्हावे यासाठी बाप कोण हे निश्चित करणे आवश्यक ठरते (आणि बापाचे नाव लावले जाते).
केवळ संपत्ती कुणाला मिळणार म्हणून बाप निश्चित करणे या गृहितकात संपत्तीचे अधिकार पुरुषांकडेच असणार हेही गृहीत धरलेले आहे. बायकांना पुरुषांप्रमाणेच शिक्षण घेण्याची आणि व्यवसाय करण्याची मुभा पूर्वापार असती तर आज ज्याप्रमाणे बालसंगोपनासाठी इतरांची थोडी मदत घेऊन स्त्रिया अर्थार्जन करू शकतात तसं काही करता आलं असतं. स्त्रीच्या हातात सत्ता असती तर मनवांतही पुरुष काही क्षणांचे पती आणि अनंतकाळाचे भटके होऊ शकले असते. It would have indeed been a win-win situation.
समाजाची रचना झाली तेव्हा
समाजाची रचना झाली तेव्हा जीवशास्त्र विकसित झाले नव्हते. समाजाची रचना "अस्तित्व टिकवणे" या प्राथमिक उद्देशाने झाली. एकदा एखादी परंपरा निर्माण झाली आणि त्यात सुरक्षेची भावना निर्माण झाली की मग मनुष्यप्राणी त्या पलिकडे विचार करायला तयार होत नाही. परंपरावाद्यांच्या आडमुठेपणाचे, दुराग्रहाचे रहस्य यात दडलेले आहे.
पण एखादा समूह जेव्हा सदस्याच्या गरजा पूर्ण करत नाही तेव्हा त्या समूहाचे सदस्य कळप सोडून दूसरे कळप शोधतात किंवा नवे कळप तयार होतात. तरूण वयात टेस्टेस्टेरॉन सारख्या संप्रेरकांच्या प्रभावाखाली साहसासाठी कळप सोडला जातो असे सापोल्स्की म्हणतो.
यात भरीस भर म्हणून माणसाचा उपाग्रखण्ड अवतीभवतीच्या लोकाचाराची निरीक्षणे करून "हेच सत्य" मानून सामाजिक व्यवहाराचे/नियमांचे ज्ञान ग्रहण करतो. मोठ्या प्रमाणात स्थलांतर करून किंवा युद्धात पराभूत झाल्यामुळे नवीन आणि आपल्यापेक्षा प्रगत आणि बलाढ्य मानवी समूहाच्या संपर्कात आल्याशिवाय तो स्वत:ला बदलत नाही.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
British scientists create human embryos without sperm
https://cordis.europa.eu/article/id/24410-british-scientists-create-huma...
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
Virgin births from parthenogenesis: How females from some specie
https://theconversation.com/virgin-births-from-parthenogenesis-how-femal...
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
हसायला येत आहे
विज्ञान विषयी लेखाचे चुकीचे अर्थ लावून भलतेच निष्कर्ष काढणाऱ्या पोस्ट वर नियंत्रण ठेवा
(प्रतिसाद योग्य ठिकाणी हलविला आहे.)
.
पुणे म०टा० ने माझा हा लेख आज
पुणे म०टा० ने माझा हा लेख आज पान क्र० ७ वर प्रसिद्ध केला आहे.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
अभिनंदन
लेख प्रसिद्ध झाल्या बद्धल अभिनंदन