डुबकियां सिंधू में गोताखोर लगाता है
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती
सोहनलाल द्विवेदी यांची ही एक कविता होती शाळेत असताना - कोशिश करने वालों की हार नहीं होती. त्या कवितेतल्या या वरच्या कडव्यातून गोताखोर हा शब्द पहिल्यांदा आयुष्यात आला. त्या वेळी गोताखोर म्हणजे काय याचा मराठी अर्थ बघितला, तेव्हा गोताखोर म्हणजे पाणबुड्या असं समजलं. आमच्या गावाला विहिरीत घागरी, बादल्या बुडाल्या की त्या काढण्यासाठी खूप दम असलेला एक पट्टीचा पोहणारा पाण्याच्या तळाशी जाऊन त्या घागरी आणि बादल्या वर काढायचा. त्याला आमच्याकडे पाणबुड्या म्हणायचे. त्यामुळे गोताखोर म्हणजे समुद्राच्या तळाशी बुडी मारून मोती काढणारा पाणबुड्या असं समीकरण त्या वेळी डोक्यात फिट बसलं. पण त्या वेळी त्या समुद्राच्या अंतरंगात, सागरतळाशी असलेले समुद्री जीवांचं व प्रवाळांचं विश्व आणि त्यातलं नाट्य हे किती मती गुंग करणारं आहे, याची काहीच कल्पना नव्हती. पण पुढे सुदैवाने त्या नितांतसुंदर आणि अद्भुत विश्वाची, नुसती पुस्तकी ओळख न होता, त्या विश्वाची अद्भुत सफरही घडणार होती, ह्याची त्या वेळी काहीच कल्पना नव्हती. त्या अद्भुत सफरीची ही गाथा...
२०१३ला मॉरिशसला भेट देण्याचा योग आला होता. त्या टूरमध्ये तिथल्या एका प्रवाळ बेटावर जाण्यासाठी आयलंड हॉपिंग टूर होती. त्या प्रवाळ बेटावर समुद्राच्या उथळ भागात, ऑक्सिजनचा सप्लाय असलेलं एक शिरस्त्राण डोक्यावर चढवून बोटीच्याखाली पाण्यात बुडी मारून तिथले रंगीत मासे बघण्याची संधी मिळाली. त्या वेळी तिथे फक्त रंगीत मासे बघण्यासारखे होते, आणखी दुसरं काही नव्हतं. आम्ही जिथे होतो, तिथून बरंच पलीकडे खोलवर बरंच काही होतं, पण तिकडचं नीट दिसत नव्हतं. आणि अचानक, पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर असलेले आणि काळे रबरी पोषाख घातलेले पाणबुडे दिसले आणि सोहनलाल द्विवेदींच्या कवितेला गोताखोर आयुष्यात प्रथम आणि प्रत्यक्ष बघितला. मी जिथे मासे बघत होतो, तिथलंच समुद्राखालचं विश्व इतकं भन्नाट होतं की ते गोताखोर जिथे बुड्या मारत होते, तिथलं विश्व किती भन्नाट असेल ह्याची कल्पना करूनच उत्कंठा वाढली आणि लगेच पाणबुड्या बनून तिथे जाण्याचं मनाशी ठरवलं आणि पाणबुड्या व्हायचं हे बीज तिथे डोक्यात रोवलं गेलं!
पुढे कामाच्या निमित्ताने मलेशियाला स्थलांतरित झालो आणि एका सुट्टीत लंकावि ह्या बेटावर फिरायला जाण्याचा योग आला. पांढऱ्या वाळूचे नितांत सुंदर किनारे असलेलं एक भन्नाट बेट. तीन दिवसांचा मुक्काम होता त्या बेटावर आणि लोकल टूर गाइड घेतला होता साइटसीइंगच्या मार्गदर्शनासाठी. त्या टूर गाइडने, मुख्य बेटापासून जवळच एक पुलाउ पायर नावाचं प्रवाळ बेट आहे आणि त्या बेटावरचं मरीन पार्क स्नॉर्कलिंग साइट म्हणून प्रख्यात आहे, तिथली ट्रीप बुक करू का? असं विचारलं. गूगलबाबाला साकडं घालून स्नॉर्कलिंग म्हणजे काय याचा शोध घेतला, तर तो एक मिनी-पाणबुड्या असलेला प्रकार आहे असं कळलं. स्नॉर्कलिंग मास्क लावून समुद्रात तोंड खुपसून आणि लाइफ जॅकेट घालून पाण्यावर तरंगायचं. त्या मास्कला एक पाइप असतो, त्यातून हवा आत येते आणि तोंडाने श्वास घेत तोंड पाण्यात बुडवून समुद्राखालचे रंगीबिरंगी विश्व बघायचं, हे म्हणजे स्नॉर्कलिंग. मॉरिशसच्या अनुभवानंतर समुद्राखालचे जग अधिक विस्तृतपणे बघण्याची इच्छा तर तेव्हाच झाली होती, पण ती पाणबुड्या होऊन बघण्याची होती.
टूर गाईडाला विचारलं, "डाइव्हिंग करता येईल का?"
त्यावर त्याने विचारलं, "तू सर्टिफाइड डाइव्हर आहेस का?"
मग कळलं की असं कोणीही उठून डाइव्हिंग करू शकत नाही त्यासाठी प्रॉपर प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि सर्टिफिकेट असेल तरच डाइव्हिंग करता येतं. 'दुधाची तहान ताकावर' या न्यायाने मग स्नॉर्कलिंग करू या असं ठरलं, कारण ते करण्यासाठी कुठल्या प्रशिक्षणाची गरज नव्हती, कोणीही लाइफ जॅकेट घालून आरामात स्नॉर्कलिंग करू शकतो!
तिथला स्नॉर्कलिंगचा अनुभव निव्वळ अवर्णनीय होता. इथे नुसते रंगीबेरंगी मासेच नाही, तर समुद्राखालच्या रंगीबेरंगी प्रवाळ वसाहतीही वैविध्यपूर्ण होत्या. भान हरपून टाकणारा आणि मन उचंबळून टाकणारा अनुभव होता एकदम. आम्ही जिथे स्नॉर्कलिंग करत होतो, त्या भागाची खोली साधारण दहा ते पंधरा फूट इतकी होती. सूर्यप्रकाश स्वच्छ आणि भरपूर असल्यामुळे पारदर्शक पाण्यातून प्रवाळ वसाहतींनी परिपूर्ण असलेला समुद्रतळ नितांतसुंदर दिसत होता. ह्या वेळी स्नॉर्कलिंगचा आनंद सहकुटुंब घेत असल्याने तो आनंद द्विगुणित होत होता. आणखी जास्त खोलवर भागामध्ये मोठे मासे आणि प्रवाळ वसाहतींची संख्या आणि दाटी खूपच जास्त होती. जिथे स्नॉर्कलिंग करत होतो, तिथून फक्त अंदाज येत होता, पण दूर असल्याने जास्त स्पष्ट दिसत नव्हतं. जरा रोखून बघण्याचा प्रयत्न केला, पण जास्त काही दिसू शकलं नाही. पण अचानक, पुन्हा एकदा गोताखोर दिसला, तेच पाठीवर सिलेंडर आणि आणि काळा रबरी पोशाख. त्यांना ते खोलवरच (शंभर फुटांपर्यंत खोल) समुद्रतळाचं विश्व जवळून अनुभवता येत होतं. तो अनुभव किती आणि कसा भन्नाट असेल हा विचार मनात आला आणि सर्टिफाइड डाइव्हर व्हायची बांधलेली खूणगाठ पुन्हा परत घट्ट झाली.
त्या लंकावि दौऱ्यावरून परत आल्यानंतर ऑफिसमध्ये बसलो असताना ऑफिसातील एक सह-कर्मचारी मधू माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, "काय रे इतका टॅन का झाला आहेस?" तिला सांगितलं की मी नुकताच लंकाविला समुद्रकिनाऱ्यावर मस्त हुंदडून आलोय तीन-चार दिवस. त्यामुळे जरा त्वचा टॅन झाली आहे.
त्यावर ती हसून म्हणाली, "अरे, मीसुद्धा आताच रदांग आयलंडला जाऊन आले. तीन दिवसाची डाइव्हिंग ट्रीप होती."
ते ऐकून माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. मी एकदम खुशीत येऊन तिला विचारलं, "तुला डाइव्हिंग येतं?"
त्यावर ती उत्तरली, "मी असिस्टंट डाइव्हिंग टीचर आहे!"
हे म्हणजे, 'आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन!' असं होतं. तिच्याकडून लगेच पुढची माहिती मिळवली की मलेशियन सब अॅक्वा क्लब (Malayan Sub Aqua Club - MSAC) नावाच्या एका डाइव्हिंग क्लबाची ती मेंबर होती आणि तिथेच ती असिस्टंट टीचर सर्टिफिकेशनची तयारी करत होती. मी तिला म्हटलं, मला स्कुबा डाइव्हर व्हायचंय. त्यावर ती म्हणाली की दोन आठवड्यानंतर सर्टिफाइड डाइव्हरसाठीची एक नवीन बॅच चालू होणार आहे आणि जर मला इंटरेस्ट असेल तर ती माझी नोंदणी त्या क्लबमध्ये करेल. मला एकदम तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होऊन गेलं. शाळेत असताना पहिल्यांदा आयुष्यात भेटलेला गोताखोर बनण्याचे जे एक अंधुक स्वप्न मॉरिशसला बघितलं होतं ते आता साकार होताना दिसत होतं.
दुसऱ्याच दिवशी, मधूने क्लबच्या मेंबरशिपसाठी लागणारी सगळी कागदपत्रं ऑफिसमध्येच आणली. सगळे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून क्लबाचा रीतसर मेंबर झालो आणि ट्रेनिंगच्या दिवसाची वाट बघू लागलो. ट्रेनिंग दोन भागात होणार होतं. पहिला भाग होता थिअरीचा आणि दुसरा प्रॅक्टिकलचा. थिअरीमध्ये दोन दिवसाचं वर्कशॉप होतं. त्यामध्ये भौतिकशास्त्राचे, पाण्याचा दाब आणि त्याचा एकंदर शरीरावर होणारा परिणाम याचं रीतसर शास्त्रीय शिक्षण होतं. जसजसं समुद्राच्या तळाशी खोल जाऊ तसतसं पाण्याचा दाब वाढत जातो आणि त्यामुळे स्कुबा इक्विपमेंट वापरून घेतलेला श्वास आणि त्यामुळे फुप्फुसात भरला जाणारा ऑक्सिजन यांचे शरीरावर काय परिणाम आणि दुष्परिणाम होऊ शकतात याची इत्थंभूत माहिती या वर्कशॉपमध्ये देण्यात आली. त्यानंतर समुद्राच्या पाण्याखाली किती काळ राहता येतं ह्याचं गणित, कागदावर आकडेमोड करून आणि Dive Computer वापरून कसं करायचं हे शिकवलं. त्याखेरीज इतरही बरीच शास्त्रीय माहिती देण्यात आली. ते वर्कशॉप एकंदरीत फारच मनोरंजक आणि ज्ञानवर्धक होतं. क्लबची प्रेसिडेंट ट्रूडी गणेंद्र हे वर्कशॉप कंडक्ट करत होती. तिने वर्कशॉप संपताना, जे काही शिकलो त्याची एक लेखी परीक्षा घेतली जाणार आहे असं सांगून आमची विकेटच घेतली. रिव्हिजनसाठी एक आठवड्याचा कालावधी देऊन, एक आठवड्यानंतरची परीक्षेची तारीख ठरवली. जोपर्यंत लेखी परीक्षा पास होणार नाही, तोपर्यंत प्रॅक्टिकल सुरू करता येणार नव्हतं. एक आठवडाभर जोरदार रिव्हिजन करून लेखी परीक्षा पास झालो.
प्रॅक्टिकल सेशन्स ही स्विमिंग पुलावर होणार होती. खुद्द समुद्रात बुडी मारण्याआधी, जी काही थियरी शिकलो त्याचा सराव ऑक्सिजन सिलेंडर लावून स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये करायचा होता. डाइव्हिंग करताना खाली बुडी मारल्यानंतर समुद्रच्या पाण्यात पोहायचे नसतं, तरंगायचं असतं. ह्या तरंगायच्या पद्धतीचा (Buoyancy) सराव करायला स्विमिंग पूलमध्ये शिकवलं जातं. पाण्याच्या दाबाची काळजी घेत हळुवारपणे कसं बुडायचं, हळुवारपणे कसं वर यायचं याचं रीतसर शिक्षण ह्या प्रॅक्टिकल स्टेशन्समध्ये असतं. सहा दिवसांचे स्विमिंग पूल प्रात्यक्षिक झाल्यानंतर प्रत्यक्ष समुद्रात बुडी मारण्यासाठी घेऊन जातात. ऑक्सिजन सिलेंडरचा सप्लाय करणारी मुख्य नळी बंद झाल्यास बॅकअप नळी कशी वापरायची, खोल पाण्यात डोळ्यावरचा मास्क काढून पुन्हा कसा लावायचा, खोल पाण्यात ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर असलेलं सगळं किट उतरवून पुन्हा पाठीवर कसे चढवायचे, आपल्या डाइव्हिंग बडीच्या ऑक्सिजन सिलिंडरमधला ऑक्सिजन संपला तर त्याला अल्टरनेट सप्लाय देत कसं वर घेऊन यायचं, अशा प्रकारचे अनेक सराव करवून घेत एकदाचं प्रशिक्षण संपलं. ट्रेनिंग संपून आता मी त्या दिवसाची वाट बघत होतो, जेव्हा प्रत्यक्ष समुद्रात बुडी मारून पाणबुड्या होण्याचं स्वप्न अखेर साकार होणार होतं. ट्रेनिंग संपल्यानंतर दोन आठवड्यांनी क्लबकडून एक मेल आलं की रदांग आयलंडवर पहिल्या डाइव्हिंग ट्रिपवर जाण्यासाठी तयार व्हा. ते मेल बघताच मन उचंबळून आलं आणि एक अनामिक हुरहुर दाटून राहिली. आतुरतेने त्या दिवसाची वाट बघू लागलो...
आणि अखेर तो दिवस उजाडला. कौलालंपूरपासून उत्तरेकडे असलेल्या कौलातरंगाणू राज्यातल्या रदांग बेटावर जायचं होतं. कौलालंपूरपासून रदांग बेटावर जायच्या जेट्टीपर्यंतचा प्रवास साधारण ५७५ किलोमीटरचा होता. त्यानंतर जेट्टीपासून बेटावर जायला बोटीने ४५ मिनिटं लागणार होती. कौलालंपूरपासून ५७५ किलोमीटरचा सगळा प्रवास एक्स्प्रेस हायवेचा होता. ताशी १४० ते १५० किमी. या भन्नाट स्पीडने चार-साडेचार तासात ते अंतर कव्हर केलं. एक्स्प्रेस हायवेमुळे गाडीने स्पीड पकडला होता आणि मन त्या वेगाच्या कैकपट वेगाने रदांग बेटावर पोहोचलं होतं. जेट्टीवर पोहोचल्यानंतर या डाइव्ह ट्रीपवर येणाऱ्या सर्वांशी ओळख झाली. त्या ग्रूपमध्ये सर्व प्रकारचे अनुभवी डाइव्हर होते. मी धरून आम्ही तिघे होतो, जे पहिल्यांदा सागरतळाशी बुडी मारणार होतो. सर्वांशी ओळखीपाळखी होईपर्यंत आमची बोट जेट्टीला लागली आणि सगळे उत्साहाने बोटीत जाऊन बसले. आम्ही ज्या रदांग बेटावर चाललो होतो, ते बेट मलेशियातल्या बेस्ट डायव्हिंग साइटपैकी एक आहे. ते तसं का आहे ह्याची प्रचिती किनारा जवळ येऊ लागला तशी येऊ लागली. स्फटिकासारखं निळंशार स्वच्छ पाणी आणि प्रखर सूर्यप्रकाश यांच्यामुळे सागरतळ स्पष्ट दिसत होता. अगदी किनार्यालगतही वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मासे डोळ्यांनी स्पष्ट दिसत होते. तो स्पष्ट सागरतळ डोळ्यात साठवून ठेवून आम्ही आमच्या डाइव्ह रिसॉर्टकडे निघालो. आपापल्या अलॉट झालेल्या रूमच्या चाव्या घेऊन आम्ही रूममध्ये सामान ठेवलं आणि थोडे फ्रेश झालो, तोपर्यंत ट्रूडीची हाक आली टीम मीटिंगसाठी.
रिक्रिएशनल डायव्हिंगमध्ये साधारण २५ ते ३० मीटर खोल समुद्रतळापर्यंत जाता येतं - म्हणजे शंभर ते सव्वाशे फूट खोल. आम्ही नवशिके एकदम त्या रिक्रिएशनल डाइव्हला जाण्याआधी समुद्राची आणि समुद्राच्या पाण्याची ओळख व्हावी म्हणून आमच्यासाठी एक मिनी डाइव्ह प्लॅन केली होती. ट्रूडी आणि आम्ही तीन नवशिके त्या मिनी डाइव्हसाठी जाणार होतो. त्या डाइव्हमध्ये स्विमिंग पुलामध्ये शिकलेले सगळे सराव पुन्हा एकदा किनार्याजवळ समुद्राच्या उथळ भगातील पाण्यात केले आणि मुख्य डाइव्हला जाण्यासाठी आम्ही तयार झालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रूडी आणि रिसॉर्टचा लोकल गाइड यांनी सर्वांचं ब्रीफिंग केलं. त्या ब्रीफिंगमध्ये डाइव्ह करताना वापरायच्या सांकेतिक खुणा समजावून सांगण्यात आल्या. त्यानंतर आमच्या पहिल्या डाइव्हचा मार्ग समजावून सांगितला. त्या डाइव्हमध्ये कोणत्या प्रकारचे मासे, कोणत्या प्रकारचे समुद्री जीव, वनस्पती आणि कोणत्या प्रकारचे प्रवाळ बघायला मिळतील याची कल्पना देण्यात आली. वेळेचं काटेकोर पालन करत, टाकीमधला ऑक्सिजन पूर्ण डाइव्हसाठी कसा पुरून उरेल ह्यानुसार डाइव्ह मार्गाचं प्लॅनिंग केलं गेलं होतं. रिक्रिएशनल डायव्हिंग हा एकटा-दुकट्याने करण्याचा खेळ-प्रकार नाहीये. हा ग्रूपमध्ये करण्याचा आणि एकमेकांच्या परस्पर सहकार्याने करण्याचा खेळ-प्रकार आहे. मास्क, ऑक्सिजन सिलेंडर, बीसीडी (Buoyancy compensator), डाइव्ह कॉम्प्युटर आणि पायात लांबलचक फीन्स हा सगळा लवाजमा सांभाळत, वेळेचे भान आणि टाकीतल्या ऑक्सिजनचं प्रमाण यांचं गणित करत समुद्रतळाचं जादुई विश्व अनुभवायचं ही एक तारेवरची कसरत असते. त्यासाठी परस्पर सहकार्याची नितांत गरज असते डाइव्ह करताना. त्यासाठी प्रत्येक डाइव्हरला चमूतील एक डाइव्हर, बडी-डाइव्हर (भिडू) म्हणून निवडायचा असतो. आमची पहिलीच वेळ असल्याने ब्रीफिंगनंतर आम्हाला आमचा बडी-डाइव्हर सांगण्यात आला, जो ट्रूडीने ठरवला होता. आमच्या चमूबरोबर असणाऱ्या अनुभवी डाइव्हर्सचा आम्हा नवशिक्यांना प्रचंड फायदा आणि मदत होणार होती
ट्रूडीने शिट्टी वाजवली आणि आम्ही सगळे बोटीत स्थानापन्न झालो. बोटीत बसल्यानंतर माझा बडी आणि मी एकमेकांनी आमची सगळी उपकरणे व्यवस्थित आहेत आणि व्यवस्थित बांधली गेली आहेत याची चाचणी करून एकमेकांना 'ओके सिग्नल' दिला. पंधरा मिनिटांत बोट आमच्या डाइव्ह साइटला पोहोचली. ट्रूडीने सिग्नल देताच देवाचं नाव घेऊन मी पाण्यात उडी टाकली. निळ्याशार रंगाचं थंडगार पाणी अंगाला लागताच शरीर आणि मन दोन्हीही थरारून गेलं. सर्व डाइव्हर्स पाण्यात आल्यानंतर एक रिंगण करून ट्रूडीने सिग्नल दिल्यानंतर बीसीडीतली हवा सोडून देऊन आम्ही सगळे जण सागरतळाकडे जाऊ (बुडू) लागलो. पंधरा मीटरपर्यंत खोल आल्यानंतर बीसीडीमध्ये पुन्हा हवा भरून Buoyancy सांभाळत तरंगत राहायला सांगण्यात आलं. आजूबाजूला रंगीबिरंगी मासे घोळक्या-घोळक्याने फिरत होते. रंगीबेरंगी प्रवाळ वसाहती मन मोहून टाकत होत्या. पण आणखी खोल जायचं होतं, पुन्हा आणखीन खोल जाण्यास सुरू केलं. पंचवीस मीटर खोल पोहोचल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे मासे आणि वेगवेगळ्या प्रकारचे समुद्री जीव आवतीबोवती दिसू लागले.
खोल समुद्रातली गहन शांतता, आल्हाददायक थंडगार पाणी आणि समुद्राची हिरवट निळसर झाक या धीर-गंभीर वातावरणाचा परिणाम होऊन एक प्रकारची असीम शांतता अनुभवायला येत होती. शरीरातलं गात्र न् गात्र सैल (रिलॅक्स) झालं होतं. मनाच्या खूप खोलवर अगदी शांत-शांत वाटत होतं. सगळं एकदम संथ होऊन वेळ थांबून गेल्यासारखं वाटत होतं. इतक्यात माझं लक्ष एका माशाकडे गेलं. तो संथ लयीत त्याची शेपटी हालवत एका जागी निवांत थांबून होता. मी सगळे भान हरपून त्याच्याकडे बघत होतो. धीरगंभीर वातावरण, मनात दाटलेली असीम शांतता आणि संथपणे शेपटी हालवत निवांत असलेला तो मासा या सर्वांचा अंमल होऊन, एक भारावलेली अवस्था अनुभवली, एकदम ट्रान्समध्ये जाऊन निवांत आणि समाधिस्थ झालो होतो. हा अनुभव इतका भन्नाट आणि अलौकिक होता की तो तसा शब्दात व्यक्त करणं अशक्यच आहे. इतकी शांतता यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सिनेमात कतरीना कैफ डाइव्ह ट्रीपवरून आल्यानंतर हृतिकला म्हणते - 'डाइव्हिंग इज लाईक मेडिटेशन!'. तो सिनेमा बघितला तेव्हा ती काय म्हणतेय त्याचा नेमका अर्थ कळला नव्हता किंवा त्यामागची भावना कळली नव्हती (आणि त्या वेळी मेडिटेशन म्हणजे काय हेही ठाऊक नव्हतं). पण त्या निवांत माशाकडे बघून जी मनाची अलौकिक अवस्था झाली होती, त्या वेळी तिच्या डायलॉगचा खरा अर्थ उमगला, अगदी खोलवर पोहोचला.
त्यानंतरच्या डाइव्ह्ज वेगवेगळ्या साइटवर झाल्या. फाईंडिंग निमो हा माझा अत्यंत आवडता सिनेमा आहे. त्यात जे समुद्रातलं जादुई विश्व दाखवलं आहे, ते सगळं ह्या साइट्सवर बघायला मिळालं. वेगवेगळे रंगीबेरंगी मासे, शार्क, स्टिंग-रे, भलीमोठी समुद्री कासवं, माहित नसलले इतर अनेक समुद्री जीव, वनस्पती आणि वेगवेगळ्या आकारांच्या आणि रंगांच्या प्रवाळ वसाहती ह्या सर्वांचं एकत्रित एक अद्भुत विश्व आहे. हे अत्यंत सुंदर, मनमोहक आणि मंत्रमुग्ध करणारं आहे. हे सगळं अद्भुत विश्व प्रत्यक्ष अनुभवायलाच हवंच!
आवडलं.
आवडलं.
थरारक, रोचक, अद्भुत.
थरारक, रोचक, अद्भुत.
आधीच्या गायब झालेल्या…
आधीच्या गायब झालेल्या कॉमेंट्स परत दिसण्यासाठी धाग्यावर नवीन प्रतिसाद देणे आवश्यक आहे असे कळल्याने हा प्रतिसाद.
शेवटचे थोडे धागे वर आणायला…
शेवटचे थोडे धागे वर आणायला ही कॉमेंट टंकतोय.