भैराळं - उत्तरार्ध

************************

पूर्वार्ध

************************

पक्ष्यांचा एक थवा कुठूनतरी येऊन भैरुबाच्या तळ्यावर उतरला आणि कलकलाट करू लागला तेव्हा राधेची तंद्री भंगली.

गुडघ्यांभोवती मारलेली मिठी सोडवत ती जमिनीचा आधार घेऊन उठली आणि तिने आजूबाजूला पाहिलं. संध्याकाळ होत चालली होती. तळ्याकडे एरवी बायकांची रीघ लागलेली असे. पण एवढ्या उशीरा तिथे चिटपाखरूही नव्हतं. इतका वेळ तळ्याकडे रेंगाळत बसल्याबद्दल तिला थोडं वावगं वाटलं, पण वेळेत घरी जायला तिच्या घरी होतं कोण? दूरदेशात लढाईवर गेलेला हैबत तीन वर्षे झाली तरी परतला नव्हता. रिकाम्याच घरात जायचं तर आता गेलं काय अन् मग गेलं काय!

गावातल्या लोकांनी सगळं उमजून घेतलं होतं. युद्ध संपून इतके दिवस होऊनसुद्धा हैबत परतला नाही, यावरून काय झालं असेल ते समज, असं तिला आडून लोक सुचवीत. सरकारात तिने चौकशी केली पण 'हैबत युद्धात गायब झाला', यापलिकडे काही बातमी मिळाली नाही. पण तिने आशा सोडली नव्हती. आज ना उद्या तो परत येईल या आशेवर ती आला दिवस काढत होती.

सावल्या लांबत चालल्या तेव्हा घागर उचलून घेत ती घरच्या दिशेला वळली आणि अवचित समोर आलेल्या पाटलाच्या सुभान्याला पाहून दचकली. तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. आजूबाजूला कुणी नाही असं बघून गुलूगुलू हसत सुभान्या तिला आडवा आला.

'ह्यॅं ह्यॅं! हिकडं कुठं या येळेला म्हने?' चेहर्‍यावर मानभावी हासू आणत त्याने विचारलं.

तिने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मान खाली घालून ती त्याला वळसा घेऊन जाऊ लागली.

'अगं हिकडं बग की! म्या काय म्हणतूय?' एक हात लांब करून तिचा दंड धरत सुभान्याने निलाजरेपणाने विचारलं. तिने हात सोडून घ्यायचा प्रयत्न केला तसा त्याने तिचा दंड आणखीच आवळला.

'सोडा मला, पाटील!' तिने कळवळून त्याला विनवलं. पण तो बधला नाही. आजूबाजूला कुणी मदतीला येणारं दिसतंय का, हे बघायला तिने मान फिरवली. पण आसमंतात शुकशुकाट होता. तिला पुढच्या संकटाची जाणीव झाली.

'अगं, थांब की जरा दोन मिन्टं. किती दिवस आमीबी विनवन्या करत र्‍हायचं, आं?'

'सोडा म्हनते ना, पाटील. मी त्यातली न्हाय. नवरा जिता हाय माझा.' ती आवाजात जमेल तेवढा धीटपणा आणत म्हणाली. तो खुनशीपणे हसला.

'कोन, हैब्या? तो कसला आता येतोय परत? अगं, जपान्या म्हंजे इंग्रजाला भारी पडत होता. तेच्यावर बॉम्ब टाकला नसता तर आत्ता इंग्रजाला घालवून येत व्हता आपल्या मुलखावर राज्य कराया! लाखानं मानसं मेली त्या जंगात! हैब्याबी मुडदा होऊन पडला असंल कुठंतरी गोळी खाऊन!' तो निर्दयपणे म्हणाला. तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वहायला लागलं. सुभान्यावर त्याचा काहीएक परिणाम झाला नाही. मुर्दाडपणे तिच्याकडे बघून त्याने दात विचकले. एक पाऊल पुढे टाकून तो तिच्या जवळ आला आणि तिला आवळून घेत 'आमी काय वाईट हाय व्हय?' म्हणत त्याने तिच्या तोंडाजवळ आपलं तोंड आणलं. हातातली घागर खाली टाकत तिने त्वेषाने त्याच्या तोंडात एक भडकावून दिली तशी त्याची तिच्यावरची पकड सुटली. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव झराझरा पालटले.

एका बाईने आपल्याला थोबाडलं याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.

पालथी मूठ तोंडावर फिरवून तो तांबारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागला. ती एकेक पाऊल मागे टाकत जाऊ लागली. ते पाहून तो तिच्या अंगावर धावून गेला. सर्रकन मागे वळून ती तळ्याच्या दिशेने धावत सुटली. आपण कुठे जात आहोत याचं भान तिला नव्हतं. एखादया रानटी जनावरापासून सावज वाट फुटेल तिथे पळत सुटावं तशी ती त्याच्याकडे पाठ करून धावली आणि तळ्यात घुसली. तिला भैरूबाच्या बेटाच्या दिशेने पळताना बघून तो खदाखदा हसला. जानार कु्ठं आता? आली की तावडीत! सावकाश चारीबाजूला नजर टाकत त्याने कानोसा घेतला आणि धोतराचा काचा मारून पाण्यात पाय टाकला.

कष्टाने पाण्यातून एकेक पाऊल पुढे ढकलत राधा भैरूबाच्या बेटावर येऊन पोहोचली आणि धापा टाकत बेटाच्या मध्यावर असलेल्या भैरूबाच्या मूर्तीवर जाऊन कोसळली. जमिनीत अर्धवट पुरल्या अवस्थेतला, शेंदराने माखलेला तो गोल गरगरीत पाषाण तिच्याकडे निर्विकारपणे बघत होता. शेवटचा आधार म्हणून तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि थरथर कापत ती मागे वळून पहात कानोसा घेऊ लागली. पाण्यात पडणार्‍या पावलांचा थबाक थबाक आवाज जवळ येत गेला आणि अस्वलासारखा डुलत डुलत सुभान्या बेटावर उगवला. किळसवाणं हसत तो जवळ आला आणि त्याने तिचा हात धरला.

एकीकडे भैरूबाची करूणा भाकत राधेने सुभान्याला लाथा झाडल्या, गयावया केली, आर्जवे केली पण दोहोंपैकी एकही पाषाण द्रवला नाही. आजूबाजूच्या झाडांनी माना खाली घातल्या. पाखरांची चिरचिर बंद पडली. रातकिडे किरकिरायचे थांबले. बेटावरच्या शिळांनी जमिनीत तोंड खुपसलं.

कपडे ठीकठाक करत सुभान्या बेटाबाहेर पडत होता. मागे झालेल्या आवाजाने त्याने चमकून मागे पाहिलं. भैरूबाच्या मूर्तीवर राधा खाडखाड डोकं आपटून घेत होती. तिचं रक्ताळलेलं कपाळ पाहून सुभान्याही शहारला. पण तिच्या जवळ जायची त्याची हिंमत झाली नाही. हळूहळू भैरूबा रक्ताने लालेलाल होऊन गेला आणि राधा निश्चेष्ट पडली. ते दृष्य पाहून सुभान्या चरकला. हे असं होईल असं त्याला वाटलं नव्हतं. त्याची ही पहिली वेळ नव्हती. त्याचं सावज बनलेल्या आणखीही अभागिनी गावात तोंड मिटून वावरत होत्या. दहापाच तालिमबाज पोरं बाळगून असलेल्या आणि खांद्यावर बंदूक वागवणार्‍या पाटलाच्या पोरापुढं बोलायची गावात कोणाची टाप नव्हती. पण आता हे असं झालं म्हणजे गावात पोलिसचं झेंगट येणार. चौकशा होणार. थोडावेळ त्याने डोकं खाजवलं. पलिकडच्या बाजूला तळ्याला चांगली खोली आहे हे त्याला आठवलं. एक बर्‍यापैकी अवजड धोंडा शोधून त्याने तो राधाच्याच लुगड्याने तिच्या पोटाला करकचून बांधला आणि तिला उचलून घेऊन तो पाण्यात शिरला. नाकापर्यंत पाणी आलं तेव्हा श्वास रोखून घेऊन तो पाण्यात घुसला आणि जमेल तेवढा पुढे गेला. गुदमरायला लागल्यावर त्याने तिचं मढं खाली सोडून दिलं आणि पाण्याबाहेर येऊन एक मोठ्ठा श्वास घेतला. पाण्यात दोन चार हात मारून तो बेटावर परतला. भैरूबाकडे एक नजर टाकून तीरासारखा तळ्याबाहेर पडला आणि झपाझप पाय टाकत वाड्यावर निघून गेला.

रंडकी राधा गायब झाल्याची बातमी गावात हळूहळू पसरली. चार दिवस गावात चर्चा रंगल्या. तर्क-कुतर्क रचले गेले. कुणी काय, तर कुणी काय वदंता उठवल्या. राधा कुणाचा तरी हात धरून गेली काय, मुंबईला मजूरी करायला निघून गेली काय, नाना अफवा उठल्या. तिच्या शीलाबद्दल नसत्या कंड्या पिकल्या.

चार दिवस खमंग चर्चा करून गाव ते प्रकरण पाठी टाकू पहात होता, तेवढ्यात एक दिवस दोनचार पोरं बोंबा मारत गावात आली. रक्ताने माखलेला भैरूबा त्यांनी पाहिला होता. त्याच्या जवळच फुटलेल्या बांगड्या आणि तुटून विखरलेल्या मंगळसूत्राचे मणी त्यांना दिसले होते. गावात पुन्हा कल्लोळ उठला. चर्चा-कुजबुजींना पुन्हा उधाण आलं. राधेच्या गायब होण्याशी त्याचा संबंध गावाला सहज जोडता आला. कुणी म्हणालं, राधाची चाल वाईट म्हणून भैरूबानंच तिला मारलं.

'भाएरगावचा कोनतरी यायचा तिच्याकडं. दोघांना बेटावर जाताना म्यां पाहिलंय, दोनदा!' सुभान्या चारचौघांपाशी जाऊन बोलला. 'भैरूबानंच खाल्ली असनार तिला. बरंच झालं तिच्यायला! मराठ्याच्या जातीला बाट लावत होती रांड!' त्या अडाणी गावात तेही लोकांनी खरं मानलं. दहाबारा दिवस ते प्रकरण गाजलं आणि कालांतराने विरत गेलं.

गावातल्या बायकांमध्ये मात्र अलिकडे कुजबूज वाढते आहे.

भैरूबाच्या तळ्यावर आताशा कुणी बाई एकटी जात नाही. गेलीच तर काहीबाही दिसल्याच्या कहाण्या घेऊन परतते आणि दुसर्‍या दिवसापासून पलिकडे पाचपट अंतरावर असलेल्या नदीवर जाऊ लागते. कुणी बायका आपल्याला तळ्यावर राधा हाका मारत होती म्हणून सांगतात. तर काही लोक भैरूबाला तळ्याभोवती फिरताना पाहिल्याचं छातीठोकपणे सांगतात. हळूहळू एकेक करत सर्व बायांनी नदीकडे मोर्चा वळवला आहे.

उनवारे खात भैरूबा आता बेटावर एकटाच पडला आहे. त्याचं देवत्व संपलं आहे. त्याला कधीमधी होणारी फुलं, नाणी, भंडार्‍याची कमाई सुटली आहे. रक्ताने माखलेल्या दगडाच्या पाया पडावंसं कुणाला वाटत नाही. त्याच्या समोर धुळीत विखरून पडलेले मंगळसूत्राचे मणी अजून तसेच पडले आहेत. फक्त काळेच.

भैरूबाच्या तळ्याकडे आता कोणी फिरकत नाही.

**************************

'.........!!!'

कौशलच्या तोंडून एक अस्फुट शिवी बाहेर पडली.

'काय झालं?' मोहिनीने कानातले इयरफोन काढत त्याच्याकडे पाहिलं.

'इंजिन ओव्हरहीट होतोय साला!' रेड झोनच्याही वर जाऊन पोहोचलेल्या काट्याकडे पहात कौशलने मूठ खाडकन स्टिअरिंगवर आपटली.

त्याला एवढं संतापायचं कारणही तसंच होतं. कुठल्या अभद्र मुहूर्तावर निघालो असा विचार करायला लावण्यासारखाच आत्तापर्यंतचा प्रवास झाला होता. मुंबईतून बाहेर पडतानाच लागलेलं तुफान ट्रॅफिक, त्यानंतरचा तो घाटातला जॅम, करता-करता फार्महाऊसवर पोहोचायला बरीच रात्र होणार असं त्याला वाटायला लागलं. 'ये रोडसे शॉर्टकट हैं' म्हणून आधीच्या कुठल्यातरी ट्रिपमध्ये कुणीतरी सांगितलेलं आठवलं म्हणून फारसा विचार न करता त्याने गाडी या अपरिचित रस्त्यावर घातली होती. बराच वेळ पुढे आल्यावर आता मागे फिरायचं की पुढे जात रहायचं या द्वंद्वात तो बराच पुढे निघून आला होता आणि आपण पुरते हरवल्याची त्याला जाणीव होऊ लागली होती, आणि तेवढ्यातच हे नवीन प्रकरण.

गाडी रस्त्याकडेला घेऊन त्याने बॉनेट खोललं.

'काय झालं' मोहिनी त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली होती.

त्याचा चेहरा चिंताक्रांत झाला होता.

'रेडिएटरके पाईपमें लीक है शायद. सब फ्लुईड खलास हो गया!'

'बापरे! मग आता?'

तो इकडे-तिकडे पहात विचार करू लागला. एका बाजूला दूरवर गाव दिसत होता. गावात जाऊन मदत मागावी का, असा त्याने विचार केला. अस्ताला चाललेल्या सूर्याकडे त्याने पाहिलं. गाववाले मदत करतील की चार लोक गोळा होऊन फुकटच्या चौकशा करत बसतील याचा त्याने विचार केला. आपली ट्रिप हा सगळा चोरीचा मामला असल्याची आठवण त्याला झाली. कपाळावर एक आठी आणून, हनुवटी खाजवत इकडे-तिकडे पहात असताना रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला त्याची नजर गेली आणि लांबवर चमकणारं तळं त्याच्या नजरेला आलं.

'तू बस गाडीत बेबी. मी त्या तालाबमधून पानी आनून भरतो रेडिएटरमधे. अभी के लिये पानी से काम चलायेंगे.' एक सुस्कारा सोडून त्याने म्हटलं.

डिकीमध्ये काही वेळ खुडबूड करून तो ब्लॅक लेबलची एक बाटली घेऊन आला आणि ती उघडून त्याने बदाबदा मातीत ओतून टाकली.

'मैं अभी आता हूं.'

'मी पण येते तुझ्याबरोबर.'

'कशाला? ते बघ किती लांब आहे!'

'असू दे. मला इथे एकटीला भीती वाटते.'

'ओक्के' म्हणत त्याने तिला जवळ ओढलं आणि हलकेच शीळ घालत तिच्या केसांशी खेळत तो निघाला.

आभाळ काळवंडत होतं. पृथ्वीचा निरोप घ्यायची तयारी दिवसाने सुरू केली होती. सावल्यांमध्ये लपू पाहणारी पायवाट शोधत शोधत ते तळ्याकडे निघाले.

गर्द झाडीपलिकडून वाळलेल्या गवतावर चालत येणार्‍या पावलांचा आवाज जवळ जवळ येऊ लागला आणि भैराळं सावध झालं. या असल्या वेळी कुणी आपल्या दिशेला यायची त्याला सवय नव्हती. सूर्यास्ताच्या चाहुलीने मिटत चाललेले त्याचे डोळे किलकिले झाले आणि कुतूहलाने त्या आवाजाच्या दिशेने उंचावून पाहू लागले. पावलांचा आवाज जवळ येऊन पोहोचला. दोन आकृत्या झाडीतून बाहेर पडल्या आणि तळ्याकाठी येऊन उभ्या राहिल्या.

ग्लानीतून जागं होऊन भैराळं डोळे विस्फारून पाहू लागलं. त्याच्या काठावर एक स्त्री येऊन उभी राहिली आहे याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्या स्त्रीने पाण्यात पाऊल टाकलं तेव्हा भैराळं शहारलं. पाण्यावर चमचमणारे त्याचे डोळे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तिच्या पावलांना स्पर्श करून पाहण्यासाठी त्याच्या लाटा सरसर पुढे धावल्या. स्त्रीच्या पायांचा स्पर्श याआधी आपल्याला केव्हा झाला होता हे आठवण्याचा त्याने प्रयत्न केला, आणि खूप पूर्वीच्या कुठल्यातरी अप्रिय आठवणी आपल्या मनात परतून येऊ लागल्या आहेत असं त्याला वाटलं...

कौशलने बाटली पाण्याने भरून घेतली आणि रेडिएटर पूर्ण भरायला किती फेर्‍या माराव्या लागतील याचा विचार करत तो निघून गेला.

मोहिनी पाण्यात येऊन उभी राहिली. खाली वाकून तिने दिवसभराच्या प्रवासाने काळवंडलेला आपला चेहरा खळाखळा धुवून काढला. पाण्यावर उठलेल्या लाटा निवळायची वाट बघत आपला चेहरा पाहून घेण्यासाठी ती थांबली. पाण्यात नाचणारे सावल्यांचे तुकडे एकमेकांना चिकटत, पुन्हा वेगळे होत बराच वेळ नाचले आणि हळूहळू हेलकावे खात खात एकेक एकेक करत गोळा झाले. पाण्यात दिसणार्‍या त्या चेहर्‍याकडे तिने पाहिलं आणि भारून गेल्यासारखी ती पहात राहिली. काळ्यासावळ्या चेहर्‍याची, बसकं नाक, गोंदलेली हनुवटी आणि काळेभोर डोळे असलेली, कपाळावर चिरी असलेली आणि डोक्यावरून पदर घेतलेली कुणी स्त्री पाण्यातून कुतूहलाने तिच्याकडे पहात होती. तिने अभावितपणे त्या चेहर्‍याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तिच्या बोटांच्या स्पर्शाने पाण्यावर उठलेली वर्तुळं त्या चेहर्‍याला पुसून टाकून विरत गेली. आपण जागेपणी स्वप्न पहात आहोत असं तिला वाटून गेलं.

'एव्हरीथिंग इज ऑल राईट नाऊ, बेब!' मागून आवाज उमटला. तिने दचकून मागे पाहिलं. तिच्यामागे कौशल उभा होता. त्याच्या चेहर्‍यावरचा ताण उतरला होता. त्याने गाडी चालू करून पाहिली होती. टेंपरेचर गेज खालीच येऊन थांबलेला पाहून तो निश्चिंत झाला होता. रेडिएटरमधून टपटप ठिबकणारं पाणी च्युईंग गम लावून बंद करण्याच्या आपल्या हुशारीवर तो बेहद खुश झाला होता. आता इथून मागे फिरून परत मूळ रस्त्याला लागायचं असं त्याने ठरवलं होतं. फारतर अर्धा तास. त्यानंतरचा रस्ता ओळखीचा होता. काही काळजी नव्हती. उशीर झाला तर झाला.

मनावरचं ओझं उतरल्यावर आता कुठे त्याला आजूबाजूला पहायला वेळ मिळाला.

'काय बघतेस एवढं पान्यात घूर-घूरके?'

आपल्याला दिसलेलं दृश्य त्याला सांगावं की नाही याचा तिने विचार केला.

'काही नाही.' असं म्हणून तिने रस्त्याच्या दिशेने पाहिलं. तिच्या मनातले विचार ओळखून तो लगेच म्हणाला 'काही प्रॉब्लेम नाही आता गाडीला. चल, ज्याऊया वापस?'

'थांब ना थोडावेळ. इथे छान वाटतंय.' असं म्हणून तिने जमिनीवर बसकण मारली. तो तिच्याशेजारी येऊन बसला. बराच वेळ ते दोघे काही न बोलता बसले होते. ती समोरच्या बेटाकडे शून्यपणे बघत होती. कौशल इकडे तिकडे बघत बसला. त्याने उगाचच एकदोन दगड उचलून पाण्यात फेकले. मग चाळा म्हणून त्याने तिच्या केसांतून बोटं फिरवायला सुरूवात केली. तिच्या गोर्‍या मानेकडे त्याने पाहिलं. हळूहळू त्याची बोटं तिच्या मानेवरून पाठीकडे सरकू लागली. तिने हसून त्याचा हात झटकून टाकला. काहीवेळ तो गप्प बसला आणि त्याचा हात चिवटपणे पुन्हा तिच्या दिशेने सरकला. तिने पुन्हा त्याचा हात झटकला, पण तिच्या तोंडून एक दीर्घ उसासा बाहेर पडलाच. त्याने तिच्याकडे पाहिलं, मग मागे वळून रस्त्याकडे पाहिलं, मग समोरच्या बेटाकडे पाहिलं. अचानक त्याच्या मनात एक विचार उमटून गेला. त्याने पुन्हा आजूबाजूला निरखून बघून घेतलं.

'वहांपे जाके देखेंगे, क्या हैं?'

'..........'

'मोहिनी...?'

'उं..., काय!?...'

'त्या बेटावर ज्याऊया का?' त्याने वाजवीपेक्षा जास्त निरागसपणा आवाजात आणत बेटाकडे निर्देश करत म्हटलं.

'का?'

'असंच!'

'आत्ता!!?...'

'हूं.'

'पण काळोख होतोय ना?' तिने आश्चर्याने विचारलं.

'मग?'

तिने त्याच्या चेहर्‍याकडे पाहिलं. तो चेहरा शक्य तेवढा निरागस सरळ ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या चेहर्‍यापलिकडचे भाव तिला सहज वाचता आले.

'काही नको, उशीर होतोय. चल.' असं म्हणत ती घाईघाईने उठू लागली. त्याने तिचा हात धरून तिला खाली ओढलं.

'चल ना!' त्याने आर्जवी आवाजात म्हटलं. मात्र त्याच्या डोळ्यातली चमक त्याला लपवता आली नाही. तीही शहारली. तिच्या अंगावर रोमांच उठले. काय हरकत आहे? इट्स सो थ्रिलिंग! नाहीतरी आपण थोडीच देवदर्शनाला आलोय इथे!?... आणि त्याच्याबरोबर असताना तिला कसलीच भीतीही वाटत नव्हती.

'अरे पण पाणी किती खोल आहे!'

'ज्यादा खोल नाही दिसतो आहे पानी. कम ऑन!!...'

'बरं जाऊन येऊ. पण थोडा वेळच हं!' नाईलाज झाल्यासारख्या सुरात तिने म्हटलं. पडत्या फळाची आज्ञा घेऊन तो उठला आणि तिला जवळजवळ ओढतच नेऊ लागला.

त्या दोघांना बेटाच्या दिशेने जाताना पाहून भैराळं शहारलं. खूप खूप पूर्वी बुजून गेलेली कसलीशी काळी आठवण त्याच्या मनात जागी होत होती. सूर्य डोंगराआड बुडू लागला होता. अंधुक होत चाललेले भैराळ्याचे डोळे बेटाच्या दिशेने निघालेल्या त्या दोघांकडे टक लावून पहात होते. अखेर सूर्यबिंब क्षितिजाखाली गेलं आणि येऊ घातलेल्या दुःस्वप्नाची चाहूल लागून भैराळ्याने कष्टाने डोळे मिटले.

पाण्यावरून हलकेच हात फिरवत मोहिनी कौशलचा हात धरून चालली होती. मघाशी पाण्यात पाहिलेला चेहरा तिला आठवला. तो चेहरा परत दिसतो का ते ती शोधू लागली. छातीपर्यंत पाणी आलं तेव्हा मात्र तिला विचित्र वाटू लागलं. आपण आता तोल जाऊन पडणार असं तिला वाटलं. ते तळं आपल्याला आत ओढून घ्यायला पहातंय असं तिला अचानकच वाटू लागलं. पाण्यातून बाहेर पडून तिने बेटावर पाय टाकला खरा, पण आपल्या अंगाला पाण्याबरोबर आणखीही काही चिकटून वर आलं आहे असं तिला वाटत होतं.

बेटाच्या मध्यावर जाऊन ते पोहोचले. काळोख झाला होता. आकाशात चांदण्या लुकलुकू लागल्या होत्या. झाडं पुतळ्यांसारखी निश्चल उभी होती. हवा थंडगार होती. 'किती शांत वाटतंय ना इथे!' तिचं वाक्यही पूर्ण होऊ न देता कौशलने तिला सर्रकन ओढून मिठीत घेतलं. 'एऽ, काय करतोयंस, सोडऽ!' असं कृतककोपाने म्हणत तिने त्याला ढकलायचा क्षीण प्रयत्न केला. त्याकडे लक्षही न देता त्याने तिला धुळीत खेचलं.

तिने एक निःश्वास सोडला. आपल्या छातीवरचं कौशलचं मस्तक ती कुरवाळू लागली. आभाळात दिसणार्‍या चंद्राकडे तिची नजर गेली. अचानकच सर्व बाजूंनी काळे ढग चंद्राच्या दिशेने गोळा होऊन येत आहेत असं तिला वाटलं. तिच्या डोळ्यांसमोर काळोखी पसरू लागली. आपण काय करतो आहोत, कुठे आहोत, आपलं नाव काय हेही तिला हळूहळू आठवेनासं होत होतं. घेरी येत असल्यासारखं वाटून तिने डोळे मिटून घेतले आणि आपल्या दिशेने कोणी एक काळा, धिप्पाड, आकडेबाज मिशा असलेला ओंगळवाणा पुरुष पावलं टाकत येतो आहे असा तिला भास झाला. तिने किंकाळी फोडण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या तोंडून काहीच आवाज फुटेना. भयानक स्वप्न पडत असावं आणि झोपेतून जागं होता येऊ नये, अशी तिची अवस्था होत होती. तिचं शरीर थरथर कापू लागलं. तिची छाती जोरजोरात धडधडू लागली. आपल्या अंगावरून कुणा पुरूषाचे हात फिरताहेत याची तिला जाणीव होत होती. ते हात झटकून टाकायचा तिने प्रयत्न केला. पण तिचं शरीर तिला साथ देत नव्हतं. बंद पापण्यांआड ती घळाघळा रडत होती. 'नगाऽऽऽ वोऽऽऽऽऽऽ पाटील, सोडाऽऽऽ, सोडा मलाऽऽऽऽ!!' तिने ओरडण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या ओठांपर्यंत पोहोचला तो केवळ एक अस्फुट हुंकार. ती कण्हते आहे असं कौशलला वाटून गेलं. पण ती आवेगाने हुंकारते आहे असंच त्याला वाटलं. विचार करण्याच्या अवस्थेत तो नव्हता. सुखाच्या सागरात त्याने मनसोक्त डुंबून घेतलं आणि श्रांतक्लांत होऊन तो बाजूला झाला...

**************************

धुळीत पडून राहिलेल्या त्या दोघांकडे मख्खपणे पहात उभी असलेली आजूबाजूची झाडं अचानकच दचकली. तिचे डोळे टक्ककन उघडले होते. शून्यात पहाणारे ते डोळे हळूहळू आजूबाजूला वळले आणि सगळा आसमंत निरखू लागले. आपल्याकडे ते डोळे रोखून पाहताना पाहून सर्व झाडं अंग चोरून उभी राहिली.

ती हळूहळू उठून बसली आणि तिने आजूबाजूला पाहिलं. वर्षानुवर्षांच्या गाढ झोपेतून अचानक जागं झाल्यासारखं तिला वाटलं. आपण इथे कसे आलो, आपलं नाव काय आहे हे आठवण्याचा तिने पुन्हा प्रयत्न करून पाहिला. पण तिला काही आठवलं नाही. आपल्याला कुणीतरी इथे आणून उपभोगून टाकलं एवढंच तिला आठवलं. आपल्या अनावृत्त शरीराकडे तिची नजर गेली आणि ती शरमली. तिने आजूबाजूला पाहिलं. आजूबाजूची झाडं आपल्याकडे तिरस्काराने पाहताहेत असं तिला वाटलं. त्या प्रत्येक झाडाचं प्रत्येक पान आपल्या शरीराकडे बघून घेत आहे असं तिला वाटलं. आपल्या शरीराखालचा धुळीचा कण न् कण आपल्या शरीराला हात लावून पाहतो आहे असं तिला वाटलं आणि शरमेने ती चूर चूर झाली. तिने वळून पाहिलं आणि आपल्या शेजारी डोळे मिटून पडलेला कुणी अनोळखी पुरुष तिला दिसला. दचकून ती उठून उभी राहिली. त्या पुरुषाचा उघडा-वाघडा देह पाहून तिला किळस आली. आपली ही अवस्था करणारा हाच! त्या पुरुषाकडे तिने डोळ्यांत आग आणून पाहिलं. संतापाची एक शिरशिरी तिच्या अंगातून गेली. थरथरत ती एक एक पाऊल टाकत त्याच्यापासून दूर मागे मागे जाऊ लागली. साताठ पावलं ती मागे सरली आणि धूळ खात पडलेल्या भैरूबाला अडखळली. तिने दचकून खाली पाहिलं. धुळीच्या थरांखाली गेलेला भैरूबा निर्जीवपणे मातीत पडला होता. तिने मागे वळून त्या पुरुषाकडे एक जळजळीत नजर टाकली. सत्तर वर्षं तिच्या मनात साचून राहिलेला संताप भसाभसा बाहेर येऊन सांडला. 'भैरूबाला पाप्याचं रगत भेटलं पायजे' ती स्वतःशीच म्हणाली. तिरीमिरीत येऊन तिने आपली सर्व शक्ती एकवटून भैरूबाला उचललं. दोन्ही हातांनी त्याला डोक्यावर उंच उचलून ती एक एक पाऊल टाकत त्या पुरुषाच्या दिशेने चालू लागली.

'जिंदगीभर याद रहनेवाला हैं ये ट्रिप!' कौशलच्या मनात विचार चालला होता. डोळे मिटल्या अवस्थेतच त्याच्या चेहर्‍यावर एक स्मितरेषा उमटून गेली. तेवढ्यात आपल्या शेजारी कोणीतरी येऊन उभं राहिल्याची त्याला चाहूल लागली आणि त्याने डोळे किलकिले केले.

ढगासारखी कोसळून येत असलेली शिळा त्याच्या डोळ्यांनी पाहिली.

काडकन कवटी फुटत असतानाचा आवाज त्याच्या कानांनी क्षणभरच ऐकला.

मिनिटभर थडथडा उडून त्याचं शरीर आचके देत देत हळू हळू शांत झालं.

लटपटत पावलं टाकत ती मागे गेली. गर्रकन वळून ती धावत सुटली आणि बेटाबाहेर येऊन वाळूत मटकन खाली बसली. बाहेरच्या काळोखात शून्य नजरेने पहात ती बराच वेळ बसून राहिली. हळूहळू तिला हुंदके येऊ लागले. हुंदक्यांचा जोर वाढतच चालला. अखेर तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि कान किटून टाकणार्‍या आवाजात टाहो फोडला...

**************************

काळोखात बुडून गेलेला गाव अचानक शहारला. आपल्याला भास होतो आहे अशी समजूत करून घेण्याचा त्याने प्रयत्न केला. पण काळीज हादरवणारा तो आवाज भैराळ्याच्या दिशेने येतच राहिला आहे.

'कुनी बाई रडतीय का वं भैराळ्यावर?' घरोघरच्या बाया आपल्या नवर्‍यांपाशी कुजबुजल्या.

'गप् बस!' भेदरलेले त्यांचे नवरे त्यांच्यावर डाफरले. 'दार लावलंय का नीट?'

भैराळ्यावरून येणारा विलाप ऐकत सारा गाव रात्रभर थरथर कापत जागत राहिला.
***

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

दुरुस्त आये.
एकदम ग्रिपिंग स्टोरी. शॉल्लिड!! शेवटपर्यंत छान बेअरिंग ठेवलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर्णन वगैरे मस्तच जमलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छानच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक चांगली कथा वाचली. फार फापटपसारा ना करता मस्त लिहिली आहेत, बुकमार्क्ड Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"माझी चाहूल लागताच पक्षी घाबरुन आकाशात उडाला...
मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले:
... क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे धाव घेतात..."

बाबौ!
लय भारी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारीच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

वर्णन मस्तच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिकीमध्ये काही वेळ खुडबूड करून तो ब्लॅक लेबलची एक बाटली घेऊन आला आणि ती उघडून त्याने बदाबदा मातीत ओतून टाकली.
व्हॉट अ वेस्ट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हाहाहा!

एक अट्टल...आपलं अस्सल रसिक प्रतिक्रिया Wink

असो. धागा खाली जाण्यापूर्वी या आणि आधीच्या धाग्यावरच्या सर्व प्रतिसादकांचे आभार मानून टाकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण आवडले. शेवट बर्‍याच आधी कळूनही, तिथपर्यन्त तुम्ही मला कसे पोहोचविणार याबाबत उत्कण्ठा होती. ती फारच उत्कृष्टरीत्या टिकवून ठेवलीत. अगदी शेवटपर्यन्त. पुढे कधी एखाद्या गावात साधे तळे जरी नजरेस पडले तरी मला तुमचे भैराळं आठवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद !

तुम्ही लिहीताना कदाचित नजरचुकीने काही राहून गेलेल्या जागा -
१. अगं हिकडं बग की! म्या काय म्हणतूय? --- ('म्हंतूय/म्हंतूया' हवे नाही ?)
२. ती समोरच्या बेटाकडे शून्यपणे बघत होती. कौशलने (?) इकडे तिकडे बघत बसला.

काही सुचलेले बदल -
१. गावातल्या बायकांमध्ये मात्र अलिकडे कुजबूज वाढते आहे.
..... हे वाक्य (अडखळायला झाले, म्हणून) गाळून बघितले तर आधीच्या आणि नन्तरच्या परिच्छेदात मला अधिक सलगता वाटली.
२. ...'एऽ, काय करतोयंस, सोडऽ!' असं कृतककोपाने म्हणत...
.....कृतककोप हा शब्द पहिल्यान्दाच वाचला. त्यामुळे नेमका अर्थ माहीत नाही. कथासन्दर्भावरून वाटले कृतककोप = लटका राग. असे असेल, तर 'कृतककोप'चा इथला वापर थोडा कालविसङ्गत वाटत नाही का ? कथेच्या या भागातला प्रसङ्ग, तो साङगण्याची भाषा आजची आहे, म्हणून थोडा रसभङ्ग होतो आहे असे वाटले.

जाता जाता - कोम्बडीला रस्त्यापलीकडे भैराळं दिसलं असल्याची एक जबरदस्त शक्यता निर्माण करून ठेवली आहेत तुम्ही !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढ्या बारकाईने कथा वाचल्याबद्दल धन्यवाद! टायपोची चूक सुधारली आहे. इतर सूचनाही विचार करण्यासारख्या आहेत.
'लटक्या रागाने' मात्र फार गोग्गोड आणि कथेच्या sombre मूडला मारक वाटतं. कृतककोप हा फारसा वापरात नसलेला (अडगळीत पडलेला) शब्द त्यामानाने जास्त योग्य वाटला. एखाद्या पात्राच्या तोंडी तो नक्कीच विसंगत वाटला असता, पण narrative मध्ये आल्यामुळे तितकासा खटकू नये, असं आपलं माझं मत. चिंतातूर जंतूंनी मागच्या भागात कालविसंगत शैलीबद्दल व्यक्त केलेल्या मताबद्दलही असंच काहीसं म्हणता येईल.
इंग्रजी शब्दांबद्दल क्षमा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या भागात सुरू केलेली कथा दुसऱ्या भागात इतक्या परिणामकारकपणे संपेल असं वाटलं नव्हतं. पण वाचून मजा आली. अजून अशाच कथा लिहीत जा ही विनंती.

मात्र एक सल्ला दिल्यावाचून रहावत नाही. सत्तर वर्षांपूर्वी घडलेली कथा पूर्णपणे आधी येते आणि नंतर तिचे आत्ता उमटणारे पडसाद येतात. हे थोडं लिनियर वाटलं. त्यापेक्षा या कथेचे तुकडे कथाभर विखरून आले असते तर अधिक झपाटणारे झाले असते. भैराळ्याच्या पाण्यावरच्या प्रतिबिंबांच्या हलणाऱ्या तुकड्यासारखे - थोडे सापडले, थोडे हरवले. त्यातूनच राधा आणि तिची कथा दिसली असती तर आवडलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक कल्पना.
पण अशा साच्यात परिणामकारकपणे लिहीण्यासाठी लेखकही सिद्धहस्त असला पाहिजे. नाहीतर गोंधळलेला वाचक त्या तुकड्यांमध्ये स्वतःच हरवून जाण्याची शक्यता आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दंडवत देवा! अतिशय उत्तम रंगली आहे. ग्रिपिंग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

कथा चांगली रंगली आहे. वर्तमान आणि भूतकाळातले ट्रानझीशन एवढ्या सहजी झाल्यासारखे वाटत नाही. राजेश घासकडवीशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा चांगली जमली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0