Skip to main content

पालकत्व!

उन्हाळी-दिवाळीच्या सुट्टीत, शाळकरी ५वी ते ८-९वीतील सगळ्या भावंडांनी कुणा एका घरी एकत्र जमायचे, मज्जा करायची व नंतर पुढले घर गाठायचे त्या दिवसांतील ही गोष्ट! आमच्या शेजारी रहाणारे काही काका बिड्या फुंकत असत. संभाजी छाप असं त्यातील एक नाव व गुलाबी कागद गुंडाळलेली बिड्यांची पुडी - विमकोची काडेपेटी अशी जोडी आठवते. त्यांचा वास आजही नाकात भरलेला आहे.
तर, माझे चार भाऊ आमच्या घरी रहायला आले होते. एकदा काय झालं, जेवणाची वेळ झाली म्हणून सगळ्या भावांना हाका मारत होते. तेव्हा जोरात, दुमजली चाळीच्या सर्व खोल्यांतून आवाज ऐकू जाईल इतपत जोरात, हाका मारून बोलावण्याची पध्दतच होती. मीही चौघांच्या नावाने जोरजोरात हाका मारल्या, तर एकाचाही ‘आलो-आलो’चा प्रतिसाद नाही. गेले तरी कुठे सगळे? थोड्या वेळापूर्वी तर एकत्र काहीबाही करत होतो. मग मला काय वाटलं कुणास ठाऊक, मी नळातून शिडीवरून चढून वरच्या टाकीच्या गच्चीत गेले. गंजलेली टाकी, दुसर्‍या मजल्यावर पाणी येताना मारामार, तर तिचा काय उपयोग होता? ती आपली होती तिथेच! तिच्या वळचणीला हालचाल दिसली म्हणून थोडी पुढे गेले तर काय? धक्काच बसला... डोळे विस्फारून काही क्षण हे नक्की काय चाललंय ते समजण्यात गेले.
मधोमध मेणबत्ती ठेवून, आजूबाजूला विझलेल्या काड्या पडलेल्या, आणि आमचे बंधुराज बिडी शिलगावून धूर काढत बसलेले. बाप रे बाऽऽऽप....
‘अरे, काय करताय काय?’
‘ए, गप्प बस हं! याद राख मामा-मामीला यातलं काय सांगितलंस तर, आमच्याशी गाठ आहे!’
‘जेवायला चला लवकर, आई बोलावतेय.’
‘आलो आम्ही, जा तू पुढे. पण लक्षात आहे ना....’
काय बिशाद होती ‘नाही’ म्हणण्याची? मुकाट्याने खाली आले. मागोमाग ती चौकडीही आली. गुपचूप जेवणं पार पडली. मला कुठलं रहावत होतं? त्यांच्या नकळत आईला सांगितलंच! मग मी तिला एक गंमत दाखवली. तेव्हाच्या चाळीच्या बाहेरच्या खोल्यांना लाकडी उंबरठा असे व जमिनीलगतचा भाग आणि उंबरठा ह्यात फट असे. त्या फटीत काही बिड्या खुपसून ठेवलेल्या होत्या. ती ठीक म्हणाली.
दुपारी चहाच्या वेळेला आईने चौघांनाही बोलावून समोर उभे केले, मी बाजूला, आपण जणू त्या गावचेच नाही अशी रेंगाळलेले! आई त्यांना म्हणाली,
‘त्या शेजार्‍यांच्या उष्ट्या-माष्ट्या, गच्ची-गॅलरीत फेकलेल्या बिड्या कशाला ओढायच्या? त्यापेक्षा आपण आपल्या स्वच्छ आणून वापराव्यात. मी असं करते, आत्ताच नानांना (आत्याचे यजमान, एल.आय.सी.त चर्चगेटला येत व अधून-मधून गिरगावात आमच्या घरी चक्कर टाकत, क्वचित सिगरट ओढत.) फोन करून विचारते की कोणत्या जास्त चांगल्या असतात ते! तुम्ही त्या गल्लीतल्या पानवाल्याच्या गादीवरून घेऊन या. नकोच नाहीतर! त्यांनाच आणायला सांगते, कारण तुम्ही लहान आहात, तुम्हांला देणार नाहीत किंवा मग यांना (आप्पा, माझे वडील) आणायला सांगते, संध्याकाळी घरी येताना!’
चिडीचूप्प शांतता...
‘मामी-काकू, आम्ही चुकलो. पुन्हा असं करणार नाही. पण नाना-आप्पामामा कोणालाही नको सांगूस.’
‘नक्की ना?
‘होय मामी, पुन्हा असं नक्की नाही करणार.’
तो विषय तिथेच संपला, कायमचा!
आजतागायत पुन्हा कुणीही त्या वाटेला गेलेलं नाही.....

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes