Skip to main content

शब्दांचे अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, भाषांतर वगैरे - भाग ६

व्यवस्थापकः
आधीचा धागा लांबल्यामुळे पुढील धागा काढला आहे.
या आधीचे धागे: भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५

----

"यातच/ हीच खरी गोम आहे" याचा मूळ अर्थ काय आहे? ही फ्रेज नेमकी कोणकोणत्या संदर्भात वापरता येते, आणि थोडी स्लँग आहे का? "And that is the heart of the matter" असाच त्याचा अनुवाद करावा की संदर्भाप्रमाणे गोपनीयतेचा, कटकारस्थानाचा अर्थ त्यात येऊ शकतो?

बॅटमॅन Tue, 04/08/2015 - 17:30

क्रक्स ऑफ द मॅटर, टिपिकली इन द काँटेक्स्ट ऑफ सम ट्विस्ट व्हिच इजंट अपॅरंट, उदा.

दोन वर्षांनी फ्लॅटचे भाव वाढले तरी विकून फायदा होत नाही यातच खरी गोम आहे.

"हीच त्यातली मख्खी आहे" हाही वाक्प्रचार क्वचित वाचनात आलेला आहे.

अनु राव Tue, 04/08/2015 - 18:24

In reply to by बॅटमॅन

बाकी ठीक आहे, पण ह्या वाक्याचा अर्थ लागला नाही

दोन वर्षांनी फ्लॅटचे भाव वाढले तरी विकून फायदा होत नाही यातच खरी गोम आहे.

आडकित्ता Wed, 05/08/2015 - 09:55

In reply to by बॅटमॅन

"हीच त्यातली मख्खी आहे" हाही वाक्प्रचार क्वचित वाचनात आलेला आहे.

हे त्यातली "मेख" आहे, हा तो शब्द आहे. मक्खी अथवा माशी या अर्थी तो नक्कीच नाही. ब्याटोबा, तुमच्यासारख्या भाषाअभ्यासकाकडून अशी ऐकणचूक अपेक्षित नव्हती. :)

बॅटमॅन Wed, 05/08/2015 - 12:15

In reply to by आडकित्ता

ऐकण्यात चूक नाही आडकित्ताजी, मक्खी आणि मेख यांच्यातला फरक का मला माहिती नाही? मक्खी हाही शब्द वाचनात आलाय पण मेखेच्या तुलनेत फ्रीक्वेन्सी नगण्य आहे इतकेच. :)

आडकित्ता Wed, 05/08/2015 - 20:08

In reply to by बॅटमॅन

लिहिणार्‍याने गडबड केली असाच अर्थ होतो मग. कारण तुपात पडलेली नसेल, तर अशा संदर्भातली मख्खी निरर्थकच वाटते.

धनंजय Wed, 05/08/2015 - 00:28

"गोम" म्हणजे सुरवंटासारखा (केसाळ खूप पाय असलेला, पण सुरवंटासारखा मऊ नसतो) जिवाणू (अजूनही या अर्थाने शब्द वापरतात.)
व्युत्पत्ती : मोल्सवर्थच्या वर्णनानुसार घोड्याच्या अंगावरती उलट्या दिशेने वाढणार्‍या क्वेसांची रेघ असली (ती गोमेसारखी दिसते), तर ती घोड्यातली त्रुटी असते, अशुभचिन्ह असते. (हे चिन्ह असले तर घोडा विकत न घेण्याकडे निर्णय झुकावा.)
तर लाक्षणिक/औपमिक अर्थ : सहज न लक्षात येणारी पण महत्त्वाची वाईट बाब.

("त्यातली गोम अशी" असा वाक्प्रचार वापरला, तर प्रचलित उपयोगही कुठल्या वाईट तपशिलाबाबतच असतो, चांगल्या तपशिलाबाबत नव्हे.)

मेघना भुस्कुटे Wed, 05/08/2015 - 10:23

In reply to by धनंजय

आता 'मेख'चीपण व्युत्पत्ती सांगा. म्हणजे 'गोम' वाईट अर्थानं वापरतात, तसा 'मेख' चांगल्या अर्थानं वापरता येईल का, याचा सोक्षमोक्ष लागून जाईल. (बादवे, सोक्ष बोले तो?)

गवि Wed, 05/08/2015 - 11:19

In reply to by मेघना भुस्कुटे

मेख म्हणजेच पाचर, खुंटी आणि तत्सम लाकडी आकार. चाकात घातली की खीळ.

जनरली अशा आकाराच्या वस्तू अर्धवट कापलेले/ तोडलेले परत जुळू नये म्हणून त्यात खोचून ठेवतात. चाकाची खीळ (आस किंवा मधला पिव्हॉट नव्हे.. तर चाक बाहेर निखळू नये म्हणून अडवणूक म्हणून लावलेली खिट्टी) , असे एकूण अडवणूक करणारी बारीकशी रचना.

तेव्हा वरुन सर्व स्मूथ दिसले तरी अमुक एक गोष्ट त्यात अशी आहे की तिच्यामुळे ऑब्व्हियस अपेक्षित असे ते घडू दिले जाणार नाहीये (उदा चाक निसटणे).

अशी जी तुलनेत छोटीशी पण मोक्याच्या ठिकाणी ठेवलेली परिणामकारक गोष्ट म्हणजे मेख.

गवि Wed, 05/08/2015 - 11:21

In reply to by मेघना भुस्कुटे

मेख हा वाईटच असेल असे नव्हे. लाकडातली पाचर वाईट अर्थाने (देशाला स्वातंत्र्य दिले, पण विभाजनाची मेख मारुन ठेवली, ज्यायोगे एकत्र येऊ नये)

एखाद्या सवलतीच्या / कायद्याच्या स्वरुपाचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून अट घालून ठेवणे (जो माझ्या मतिमंद मुलाला सांभाळेल त्यालाच माझी इस्टेट मिळेल) अशी मेख कदाचित चांगल्या उद्देशानेही असू शकते.

गवि Wed, 05/08/2015 - 11:24

In reply to by गवि

खीळ घालणे ही रचना अनेकदा प्रगतीचा वेगच थांबवणे अशा अर्थानेही वापरली जाते. माझ्या मते ते चूक आहे. बेताल किंवा वाहवत जाणे (चाक निखळणे) हा भाग टळावा आणि इष्ट दिशेत गती चालू रहावी म्हणून नियंत्रण लावणे अशा अर्थाने तो वापरला गेला पाहिजे.

गवि Wed, 05/08/2015 - 11:32

In reply to by Nile

एकूण "लिमिटिंग फॅक्टर", "मर्यादा", "सरळसोट तर्काने वाटेल असा परिणाम घडू न देता त्यावर नियंत्रण आणणारा छुपा लहान घटक" असा अर्थ आहे. वापर कोणत्याही अँगलने केला जाऊ शकतो.

ग्यानबाची मेख हा ज्ञानेश्वरांच्या ओवीच्या (चुभूदेघे) रचनेतल्या डीटेलिंगचा भाग आहे. या रचनेचे बारीक बारीक नियम अत्यंत कडकपणे पाळले गेले असल्यासच त्याला मान्यता मिळणे या अर्थी तो मेख शब्द आहे. एरवी फ्री फ्लो काव्य घडलं असतं पण इथे त्यावर कंट्रोल आला आहे, अशा अर्थाने.

राही Wed, 05/08/2015 - 12:17

In reply to by मेघना भुस्कुटे

शब्दरत्नाकरमध्ये मेख (फा-म्हणजे फारसी) = खुंटी असा अर्थ आहे. आणि 'न सुटणारे कोडे' असाही. त्यासाठी 'तुकाराम बोवाची मेख' ह्या वाक्प्रचाराचे उदाहरण आहे. मेढ म्हणजे दुबेळके असलेले लाकूड, आधारस्तंभ असा अर्थ आहे. विश्वनाथ खइरेंच्या एका लेखात मेख हा शब्द मेध(यज्ञपशु, आहुति, बळी) वरून आला आहे असे म्हटले आहे. उदा अश्वमेध. पुढे असे लिहिले आहे की यज्ञयागात मेधासाठी एक बळकट लाकूड अथवा खुंट पुरत असत. त्याला पशू बांधून मग त्याची हत्या होई. पुढे पुढे ह्या खुंटालाच मेध, मेढ, मेख म्हणू लागले. प्रत्येक शुभ कार्यात मंडप उभारताना ही मेख किंवा मेढ पुरणे/ मारणे हा मुहूर्तमेढविधी आजही आहे आणि तो प्राचीन यज्ञप्रथेचा आणि पशुबलीचा अवशेष आहे. पुढे 'मेख'चा अर्थ सारतत्त्व, कोडे, पाचर, अडथळा असा बदलत गेला. ग्यानबाची मेख म्हणजे ज्ञानेश्वरांचा खरा उपदेश, किंवा सार, जे आधारस्तंभ असून बळकटपणे आत पुरलेले आहे, लेचेपेचे तकलादू नाही आणि कोणाला सहसा उमगत नाही.
पण शब्दरत्नाकरात फारसी मूळ म्हटले आहे ते कोणते हे मोल्स्वर्थबाबाला नक्की ठाऊक असेल. किंवा जुनी फारसी आणि जुने संस्कृत एकमेकांना खूप जवळचे असल्याने दोन्हीकडे समान मुळे सापडण्याची शक्यता असतेच.

रोचना Wed, 05/08/2015 - 10:50

In reply to by धनंजय

मला गोम = centipede माहित होतं, आणि मोल्सवर्थही पाहिलं, पण त्याचा crux of the matter शी कसा संबंध जोडला गेलां हे कळलं नाही.
असो. पाचगणीत लहानपणी खूप गोम (गोमा?) दिसायच्या. कानात गेल्या तर बहिरं करतात, त्यांच्या जवळ जाऊ नका असे सगळे सांगत. अजूनही एक दिसली की कानात काहीतरी वळवळल्याचा भास होतो.

नंदन Wed, 05/08/2015 - 01:00

अनौपचारिक अनुवादात हॅम्लेटच्या स्वगतातले 'Ay, there's the rub' वापरता येऊ शकेल.
(To die — to sleep. To sleep — perchance to dream: ay, there’s the rub!)

ह्या 'रब'विषयी थोडी अधिक माहिती:
The origin is the ancient game of bowls (which Americans may know as lawn bowling; nothing to do with tenpin bowling). A rub is some fault in the surface of the green that stops a bowl or diverts it from its intended direction. The term is recorded first a few years before Shakespeare’s time and is still in use. It appears, too, in golf, in the expression rub of the green, which refers to an accident that stops a ball in play — hitting an obstacle or a bystander perhaps — and for which no relief is allowed under the rules.

It later became a broader term for an abstract impediment or hindrance.

धनंजय यांनी वर म्हटल्याप्रमाणे (" सहज न लक्षात येणारी पण महत्त्वाची वाईट बाब.") मराठीतली 'गोम'ही साधारण याच अर्थाच्या जवळ जाते, असं वाटतं. [पहा: , ]

अनुप ढेरे Wed, 05/08/2015 - 11:06

In reply to by नंदन

रब ऑफ द ग्रीन ही संज्ञा ब्याड लक म्हणून ऐकली नाही कधी. क्रिकेट कॉमेंटरीमध्ये किंवा वार्तांकनामध्ये रब ऑफ द ग्रीन हे चांगल्या लकसाठी वापरलेले पाहिले आहेत. India got rub of the green when both Kohli and Dhoni were dropped by the slip fielders. अस काहिसं.

.शुचि. Wed, 05/08/2015 - 01:54

काल वाचनात आले की गिनीपिग्स हे "skittish" असतात अर्थात नवख्या लोकांबरोबर सरावायला वेळ घेतात, पहील्या पहील्यांदा बिथरतात.

skittish ला मराठी शब्द काय असेल?

धनंजय Wed, 05/08/2015 - 20:30

In reply to by .शुचि.

मोल्सवर्थ म्हणे "बिचक्या".

(किंवा "अलूल" हा शब्द अधिक योग्य वाततो, पण तो आता अप्रचलित म्हणून सोडला पाहिजे. मोल्सवर्थमध्येच दिलेल्या "बुजरा/बुजणे" शब्दामध्ये घाबरून बिथरण्याचा भाव कमी असतो, आणि तो भाव "बिचकणे" मध्ये अधिक असतो, असे मला वाटते. म्हणून तीन्ही पर्यायांतला "बिचक्या" निवडला.)

नंदन Wed, 05/08/2015 - 14:59

थोडं अवांतर होईल, पण या चर्चेवरून 'एम्बॉडिड लँग्वेज प्रोसेसिंग' ही संज्ञा आठवली. नित्याच्या परिचयातल्या वस्तू, क्रिया आणि भाषेत रूळलेले शब्द, वाक्प्रचार यांचा संबंध दर्शवणारी. पूर्ण दुवाच वाचनीय आहे; पण त्यातला काही महत्त्वाचा भागः

The way in which a person’s body and their surroundings interacts also allows for specific brain functions to develop and in the future to be able to act. This means that not only does the mind influence the body’s movements, but the body also influences the abilities of the mind.

In order to create movement of the body, a person usually thinks (or the brain subconsciously functions) about the movement it would like to accomplish. Embodied language processing asserts that there can also be an opposite influence. This means that moving your body in a certain way will impact how you comprehend, as well as process, language – whether it is an individual word or a complete phrase or sentence. Embodied language processing suggests that the brain resources that are used for perception, action, and emotion are also used during language comprehension.

Language comprehension involves three processes that overlap. First, words and phrases are associated with certain objects in the environment or perceived symbols (पहा: गोम, मेख). Secondly, a person must determine how they can interact with the objects; these are called affordances (बदलत्या काळाप्रमाणे, गोम/मेखेचे निसटलेले कृति-संदर्भ)...And finally, a person must look at the different parts of the sentence to determine how the affordances combine in order to accomplish a goal. (वाक्प्रचार/वाक्यांत उपयोग)

Actions can also influence a person's reaction time even when it does not make sense with the actual meaning of the sentence. A study conducted asked participants to perform a list of actions. They were then asked to make judgments if a sentence was logical or not. Participants were faster to respond that a sentence was logical if they had performed that action previously.

बहुभाषक व्यक्तींच्या बाबतीत हेच मॉडेल एकाहून अधिक भाषांना लागू पडतं, पण त्यामागची निश्चित साखळी/मॅपिंग कसं असेल, यावर एकमत झालेलं दिसत नाही: (दुवा)

Research shows that embodiment is present in native language processing, and if embodiment occurs in first language processing, then embodiment might also occur in second language processing.How second language is embodied compared to first language is still a topic of debate. Currently, there are no known theories or models that address the presence or absence of embodiment in second language processing, but there are bilingual processing models that can lead to multiple hypotheses of embodiment effects in second language learning.

मयुरा Thu, 06/08/2015 - 03:17

काही मराठी आणि हिंदीत्/उर्दुत असेलेले समान मजेशीर शब्द व काही प्रश्नः

शरम- बेशरम -हिंदीतही वापरतात
लगाम्-बेलगाम- हिंदी, मराठी दोन्हीही( असं मला वाटतं)
छुट- बेछुट- मराठी नक्की, हिंदीत कल्पना नाही
शक्-बेशक का बेलाशक? का दोन्हीही बरोबर आहेत?

रंग-बेरंग- मराठीत नक्की, हिंदीची कल्पना नाही.
रंग -बिरंगी असतं पण बेरंग हिंदीत ऐकला नाही.

बेमुवर्तखोर- हा क्वचित कधीतरी वाचलेला शब्द आहे पण अर्थ आजही माहिती नाही.

अजुन काही आठवत असल्यास नक्की सांगा.

राही Thu, 06/08/2015 - 11:27

In reply to by मयुरा

तसे तर खूपच आहेत. मोठी यादी होईल. तत्समही आहेत आणि तद्भवही. ज़मीन, आसमाँ, (अस्मान), वतन, मुल्क(मुलुख), ज़ुल्फ (झुलपे), दुनिया, अजीब (अजब), गुनाह(गुन्हा), दुश्मन(दुष्मन), मौसम, बहार (बहार, बहर), साल, खरीप, रब्बी, खुश्क(खुश्की), खुश, नादान, बेदरकार, नर्म(नरम), गर्म(गरम), संगेमरमर(संगमरवर), आबला-अबलख इ.
नक्की कोणते शब्द हवेत? लगाम-बेलगाम, शरम-बेशरम सारखी विरुद्धार्थी जोडी हवी आहे काय?

राही Thu, 06/08/2015 - 23:03

In reply to by अनु राव

बेअक्कल,(बेअक्ल) बेदम, बेकार, बेघर, बेचारा(बिचारा), बेचिराग, बेजार, बेजोड, बेडर, बेताल, बेदम, बेदरकार, बेधडक, बेधुंद, बेफाम, बेफाट, बेफिकीर, बेरात्री, बेलाग, बेशुद्ध, बेसुमार,(बेशुमार) बेसूर, बेहद्द, बेहोश इ.

राही Thu, 06/08/2015 - 23:16

In reply to by राही

यातले बेडर, बेधडक, बेधुंद, बेफाट, बेलाग, बेशुद्ध किंवा बेसुध हे शब्द हिंदी/उर्दूत आहेत की कसे हे माहीत नाही.
बेजबाबदार, बेदरकार, बेदखल हे शब्द मराठीत अलीकडे कमी वापरले जाऊ लागले आहेत.

बॅटमॅन Sun, 09/08/2015 - 15:07

In reply to by मेघना भुस्कुटे

फुलाची व्युत्पत्ती पाहिली पाहिजे, पण फारसीत फुलासाठी गुल असा शब्द आहे. त्याचा अपभ्रंश फूल असा होणे अंमळ ऑड वाटते.

बाकी संस्कृत आणि देशी अशा दोन क्याटेगरीज करण्याचे कारण? दोन्ही पूर्ण वेगळ्या आहेत असे वाटत नाही.

धनंजय Mon, 10/08/2015 - 04:14

In reply to by बॅटमॅन

ज्या प्राकृत-वा-पुढील शब्दांच्या संस्कृतात व्युत्पत्ती सापडत नाहीत त्यांना "देश्य" म्हणतात वाटते. कदाचित बिगर-संस्कृतोद्भव आदिवासी भाषा वा द्रविड भाषांतून आलेले शब्द असावेत. (मराठीतले "पोट", "डोके" शब्दही त्यांच्यापैकी आहेत ना?)

बॅटमॅन Thu, 06/08/2015 - 18:09

In reply to by मयुरा

एक दुरुस्ती- ते बेमुवर्त नसून बेमुर्वत पाहिजे. मूळ शब्द बहुधा मुरव्वत असा आहे. हा शब्द भीडमुर्वत या दुसर्‍या शब्दातही येतो. मराठी अर्थ - मान, मर्यादा, वगैरे. मूळ अरबी/फारसी अर्थ पाहिला पाहिजे.

.शुचि. Thu, 06/08/2015 - 21:39

In reply to by बॅटमॅन

बेमुवर्त नसून बेमुर्वत पाहिजे

+१
____
मयुरा यांना उद्देश्युन नाही तर सहजच सांगतेय एका संस्थळावरती स्त्रोत का स्रोत वरुन चर्चा रंगली होती अन बरेच लोक स्रोतकडे कलले होते. तेजायला इतका वीट आला. स्रोत काय स्रोत???? :(

गवि Fri, 07/08/2015 - 10:17

In reply to by नितिन थत्ते

मी फार फार पूर्वी, पुस्तकं वाचायला लहानपणी सुरुवात केली तेव्हा (आठवा: एकेक रुपयाची परचुरे किंवा तत्सम प्रकाशनाची शापित राजपुत्र, सोनेरी मासा टाईपची पातळपुस्तकं).. सुरुवातीला काही काळ छापील "हृदय" हा शब्द ह द्य ("ह हरिणातला" आणि "द ला य जोडलेला") असा मनातल्या मनात वाचत असे. त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेच्या सुरुवातीला कुठेकुठे आलेला "हुतात्मा" हा शब्द "हुत्तामा" अशा उच्चाराने मनात साठवला होता. कारण कोण जाणे.

क्लुप्ती असाच उच्चार असलेला शब्द क + लृ प्ती असा का लिहितात हेही कळलं नाही.

घाटावरचे भट Fri, 07/08/2015 - 10:20

In reply to by गवि

>>क्लुप्ती असाच उच्चार असलेला शब्द क + लृ प्ती असा का लिहितात हेही कळलं नाही.

हां राव, लक्षातच आलं नाही कधी.... गंमतच्चे!!!

राही Fri, 07/08/2015 - 11:19

In reply to by घाटावरचे भट

मला वाटते तो उच्चार क्लुप्ति असा नसावा. 'ऋ' च्या उच्चारात जसे आपण जीभ टाळ्याला लावल्यासारखे करून अर्ध्या 'र्'चा उच्चार करतो, तसेच साधारण लृ चे असावे. पूर्ण 'उ'कार नसावा.
म्हणजे मला वाटते उर्दू/फारसी/अरबी मधल्या अक्ल्, वस्ल्, नस्ल्, शक्ल् सारखे.
लृ हा स्वर आहे, त्याला दुसरा स्वर जोडला तर वेगळा संधी होईल. म्हणजे वृद्धि वगैरे जे काय ते होऊन. भ्रातृ+उक्त याचा संधि भ्रातरुक्त होतो का? किंवा मातृ+इच्छा याचा मातरिच्छा? अर्थात चूभूदेघे आणि जाखुअ म्हणजे जाणकारांकडून खुलासा अपेक्षित.

राही Fri, 07/08/2015 - 11:04

In reply to by नितिन थत्ते

स्रोत हा शब्द स्+रो+त असा लिहिता आला असता तर गोंधळ झाला नसता. सावरकरी र्‍ हा 'स'ला जोडला असता 'स'ची आडवी रेघ आणि 'र्‍'ची आडवी रेघ मिळून अशाच दोन रेघा असलेल्या 'त्र' चा भास होतो. त्यामुळे बहुतेक हा 'त्र' उच्चारात शिरला असावा. कित्येक लोक 'सहस्रबुद्धे'चे इंग्लिश स्पेलिंगही sahastrabuddhe असे करताना दिसतात. इतर कुठल्याही व्यंजनाशी 'र्‍' चे जोडाक्षर झाले असता ही समस्या येत नाही म्हणजे मध्ये 'त्' शिरत नाही.

घाटावरचे भट Fri, 07/08/2015 - 11:19

In reply to by राही

सध्याच्या मराठीची एकूण दिव्य परिस्थिती पाहता 'स्-रोत' चा नक्की 'सरोत' आणि 'सहस्-रबुद्धे' चा 'सहसरबुद्धे -> ससरबुद्धे (किंवा अगदीच वाईट म्हणजे सासरबुद्धे)' झाला असता.

बॅटमॅन Fri, 07/08/2015 - 13:10

In reply to by घाटावरचे भट

ग्वाल्हेर शहरात एक सहस्रबाहू मंदिर म्हणून आहे, त्याला सास बहू मंदिर अशा नावाने लोकल्स ओळखतात त्याची आठवण झाली.

नंदन Fri, 07/08/2015 - 15:18

In reply to by राही

इतर कुठल्याही व्यंजनाशी 'र्‍' चे जोडाक्षर झाले असता ही समस्या येत नाही म्हणजे मध्ये 'त्' शिरत नाही.

निराळ्या संदर्भात त-र-तमभाव!

ग्वाल्हेर शहरात एक सहस्रबाहू मंदिर म्हणून आहे, त्याला सास बहू मंदिर अशा नावाने लोकल्स ओळखतात त्याची आठवण झाली.

अनेकता में 'एकता' ;)

धनंजय Fri, 07/08/2015 - 22:52

In reply to by .शुचि.

आता प्रचलनामुळे स्र/स्त्र वैकल्पिक रूपे मानता यावीत. अर्थात थोडे सर्वेक्षण हवे. सभ्य समाजात बर्‍यापैकी टक्केवारी (५०% पेक्षा पुष्कळ कमी असली तरी चालेल, पण अगदीच १% नको) "स्त्र" उच्चार/लेखन करत असेल, तर मराठीत हे वैकल्पिक रूप मानता येईल.

आदूबाळ Fri, 07/08/2015 - 15:55

या धाग्यावरून भयंकर अवांतरः

काही शब्दांची चित्रं आपल्या डोक्यात साठवलेली असतात. बहुदा ही शब्दचित्रं लहानपणीच बनून डोक्यात फिट बसत असावीत. आपण जी पूर्वग्रहांची ओझी वाहतो त्यात नकळत्या वयात ठसलेल्या शब्दचित्रांचा मोठा वाटा असावा.

उदा०

"दुकान" म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर लहानपणचा किराणा दुकानदार जवारमल बुधमल धूत खर्रर्रर्रर्रर्र आवाज करत शटर वर गुंडाळताना दिसतो. (माझ्या शाळेची आणि त्याची दुकान उघडण्याची वेळ एकच होती.)

बाबाच्या एका मित्राची फॅक्टरी बघायला गेलो होतो. आमच्या घरात ही व्यक्ती "इंजिनियर आहे तो...!" अशा आदरयुक्त दबदब्याने फ्यामस होती. (आत्या, बाबा, काका वगैरे कोणीच इंजि० होऊ शकलं नाही.) तिथे बॉयलर सूट घातलेला, कळकट्ट झालेला आणि गुटखा चावत शॉपफ्लोरवर शिव्या घालत हिंडणारा तो मित्र दिसला, आणि इंजिनियर लोकांचं चित्र घट्ट बसून गेलं!

बॅटमॅन Fri, 07/08/2015 - 16:14

In reply to by आदूबाळ

अतिशय सहमत.

मग ते १ ते ९ यांपैकी प्रत्येक आकडा विशिष्ट रंगात समोर येणे असो
किंवा 'तोंड बंद करणे' यातले 'तोंड' नेहमी 'तोण्ड' असेच लिहिले जाते असे वाटणे
किंवा अजून काहीही....

बॅटमॅन Sat, 08/08/2015 - 02:06

In reply to by त्रिशंकू

रोचक!

अलीकडे खूप कमी झालंय, अगोदर असं व्हायचं. पण त्याचं कारण सोपं आहे. घरी भागवताचे खंड होते त्यांपैकी प्रत्येक खंड क्रमांकाचा आकडा ज्या रंगात होता तोच रंग मनात ठसला, बाकी काही नाही. १ = ग्रे, २ = पिवळा, ३ = केशरी, ४ = हिरवा, ५ = तपकिरी, ६ = लाल, ७ = पिवळसर ब्राऊनिश, ८ = निळा, ९ = काळा. पुढचे नंबर्स आठवत नाहीत.

राही Thu, 13/08/2015 - 13:53

काल 'वेडात दौडलो' हे माधव कुलकर्णी यांचे आत्मकथन हातात आले. पुस्तक ठीकठाक आहे पण त्यात काही जुने शब्द आणि काही खर्‍या-खोट्या किंवदंती सापडल्या. त्यापैकी फक्त शब्दांशी संबंधित गोष्टी इथे मांडत आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत रुकवा हे नाणे चलनात होते.(नंतरही असेल.) रुकवा म्हणजे जुने दोन पैसे म्हणजेच अर्धा आणा. चवल्या-पावल्या तर आपल्याला माहीतच आहेत. पावली म्हणजे पाव रुपया किंवा चार आणे हे सर्वसाधारणपणे ठाऊक असते. पण चवली म्हणजे दोन आणे हे माहीत नसते. कारण हिंदीतल्या चवन्नीशी चवलीचा संबंध जोडला जातो. पण चवली म्हणजे दोन आणेच. पूर्वी तमाशात चवली-पावली असा दौलतजादा व्हायचा. 'ह्या चवलीचं म्हननं काय' ही फर्माईशीची पेटंट पुकारणी असे. यावरून गिरणगावातल्या रंगभूमीवर ह्याच नावाचे एक नाटकही आले होते.
बदाम बी च्या एका प्रकाराला मामरा म्हणतात हे मला माहीत नव्हते. (पुढे अर्थात काजू-बदाम सहा-सात रु किलो - म्हणजे शेराने विकल्याची आठवणही आहेच.) पायली म्हणजे चार शेरांचे माप म्हटले आहे, पण मी तीन शेरांची पायली असेही ऐकले आहे. हे माप वाळूच्या घड्याळाच्या आकाराचे असे. पाचावर धारण बसणे म्हणजे एक रुपयाला पाच पायल्या धान्य, इतकी महागाई होणे. धारण म्हणजे धान्यभाव, निरख. आणि निरख म्हणजे बाजारभाव.
चिमणसाळ, कमोद ह्या नाशिक जिल्ह्यातल्या तांदुळाच्या खास जाती आणि कोळपी, जिरेसाळ ह्या भरपूर खपाच्या आणि स्वस्त अश्या आम जाती होत्या. आता त्या खास जाती लुप्त झाल्या याबद्दल हळहळही व्यक्त केली आहे. शिवाय गावठी भुईमुगाच्या भाजक्या गरमगरम शेंगांचीही हळहळती आणि हुळहुळती आठवणही आहे.
हे सर्व नक्की कुठल्या धाग्यात लिहायचे याविषयी संभ्रम होता म्हणून शेवटी इथेच लिहिले. पण जर याचा वेगळा धागा करायचा किंवा लिखाण दुसर्‍या ठिकाणी हलवायचे तर तसे करावे.

प्रसन्ना१६११ Thu, 13/08/2015 - 14:09

In reply to by राही

पायली फार जुनी नाही. मराठवाड्यातील अनेक खेड्यांतून धान्य मोजण्यासाठी वापरले जायचे-अगदी अलीकडे देखील. साधारणतः पांच किलो धान्य= १ पायली= २ आधल्या= ४ शेर असा हिशोब होता. त्याखाली क्रमशः 'आठवा' आणि 'चिपटं' ही युनिटस होती. पायलीच्या वर 'शेर', 'खंडी' आणि 'मण' होते. माझ्या घरी ही सगळी मापं होती- जुन्या काळापासून चालत आलेली. काळ्या गुळगुळीत मापांवर उर्दूतून कांहीतरी लिहिलेला पितळी बिल्ला असायचा. (निजामाच्या वजने- मापे प्रमाणीकरण विभागाचा शिक्का असेल बहुधा)

प्रसन्ना१६११ Thu, 13/08/2015 - 14:17

In reply to by बॅटमॅन

बघतो गावाकडे आहे का.
दुरुस्ती- 'शेर' पायलीच्या वर नव्हे तर खालचे युनिट आहे. वर एकदा चुकून पायलीच्या वर असे मी लिहिले आहे.

प्रसन्ना१६११ Thu, 13/08/2015 - 14:45

In reply to by राही

माझ्याच प्रतिसादात दुरुस्त करणार होतो, तेव्हढ्यात बॅट्मनचा प्रतिसाद आल्याने एडीट करता आले नाही. आणि प्रत्यक्ष मापं पायलीपर्यंतचीच होती. त्यापुढे पायलीनेच मोजायचे. १६ पायल्यांचा १ मण आणि २० मणांची एक खंडी असे आत्ताच आईने कन्फर्म केले.

राही Fri, 14/08/2015 - 16:51

In reply to by नितिन थत्ते

मला वाटते आपल्याकडे चाळीस शेरांचा मण हा काही भागात होता. पण बंगाली मण हे बरेच मोठे माप होते. पूर्वी मापात स्टॅन्डर्डाय्ज़ेशन नव्हते असे वाटते, जसे ते चलनातही नव्हते. प्रत्येक राजेरजवाड्यांची वेगळी चलने असत. ब्रिटिश आल्यानंतर भारतात समान चलन झाले असावे. (अरे बापरे. आता मी देशद्रोही नक्कीच. नाही, पण एक पळवाट आहे. हे त्यांनी त्यांच्या सोयीसाठी केले असे नोंदूनच ठेवावे झाले. पुढचे संभाव्य आक्षेप : मग? खरेच आहे ते! मी : काही का असेना, आपल्याला त्याचा लाभच झाला ना? आक्षेप : समान चलन आणायला ब्रिटिशच कशाला हवे होते? ब्रिटिश गेल्यानंतर समान चलन आलेच असते ना? वगैरे)

राही Thu, 13/08/2015 - 14:39

In reply to by प्रसन्ना१६११

दोन पौंडांचा एक वजनी शेर होई आणि एक पौंड किंवा रत्तल म्हणजे ४४० ग्रॅम्स. म्हणजे ८८० ग्रॅम्समध्ये एक शेर बसेल. म्हणजे एका किलोत साधारण एक शेर अधिक अदपावशेर बसेल. पायली म्हणजे चार शेर असेल तर एक पायली म्हणजे साधारणपणे साडेतीन किलोच्या जवळपास होईल.
कुडव नावाचेही एक माप होते. तीन पायल्या म्हणजे एक कुडव असे.
पण धान्याची मापे ही 'मापी' असत, 'वजनी' नसत. पण पुन्हा, शेर हा मापी आणि वजनी, दोन्ही असे. मणही तसाच.
खंडी हे मणापेक्षा मोठे माप ना? भरा असेही एक नाव ऐकले आहे. भरा हा खंडीपेक्षा मोठा.

बॅटमॅन Thu, 13/08/2015 - 14:06

In reply to by राही

माहितीकरिता धन्यवाद! हाइंडसाईटमध्ये चवली = दोन आणे हे चवलीपावलीवरून लक्षात येतंय, पण अगोदर चाराणेच वाटायचं. धन्यवाद.

मेघना भुस्कुटे Tue, 16/02/2016 - 10:09

accessible आणि approachable या दोन शब्दांची शक्यतोवर अचूक आणि अस्सल मराठी भाषांतरं काय होतील?

चिंतातुर जंतू Tue, 16/02/2016 - 12:14

In reply to by मेघना भुस्कुटे

accessible - 'माझ्या ऑफिसमधून मला पॉर्न साइट्स accessible नाहीत' मध्ये 'पर्यंत पोहोचता / जाता येत नाही' असं काही तरी करावं लागेल. 'पंतप्रधान सर्वसामान्यांना accessible/approachable आहेत' असं म्हणताना 'पर्यंत सर्वसामान्यांना सहज जाता येतं' असं म्हणता येईल. मात्र, 'उपलब्ध' हा शब्द निर्जीव गोष्टीच्या बाबतीत पर्याय होईल तसा व्यक्तीबद्दल वापरता येईल का?

.शुचि. Tue, 16/02/2016 - 13:04

In reply to by चिंतातुर जंतू

'उपलब्ध' हा शब्द निर्जीव गोष्टीच्या बाबतीत पर्याय होईल तसा व्यक्तीबद्दल वापरता येईल का?

साध्य/प्राप्य? चपखल शब्द सापडत नाहीये. साध्य लंगडत लंगडत चालून जाइल का? लंगडा आहे हे मान्य.

अनु राव Tue, 16/02/2016 - 12:59

In reply to by ऋषिकेश

आमच्या कंपनीचा सीइओ सर्वांना अ‍ॅक्सेसिबल असतो असे म्हणले तर तो "उपभोग्य" आहे असा अर्थ काढणे बरोबर होइल का?

अप्रोचेबल म्हणजे उपलब्ध पण पटत नाही. अप्रोचेबल म्हणजे फक्त फिसिकली उपलब्ध असुन चालत नाही. हा जर शब्द एखाद्या व्यक्तीसाठी वापरला तर पूर्ण वेगळा अर्थ घेउन येतो.
उपलब्ध साठी सरळ "अ‍ॅवेलेबल" आहे ना.

गवि Tue, 16/02/2016 - 13:04

In reply to by अनु राव

अ‍ॅक्सेसिबल म्हणजे केवळ तिथवर पोचण्याचा मार्ग उपलब्ध असलेली पॅसिव्ह गोष्ट.
अप्रोचेबल म्हणजे अशा रितीने तिथवर पोचल्यास आपल्याला (लाथ न घालता) स्वागतपूर्ण रितीने संवाद करुन रिटर्नमधे कंफर्टेबल वागणूक / रिस्पॉन्स / सोल्युशन इ इ देणारी व्यक्ती.

नितिन थत्ते Tue, 16/02/2016 - 13:21

In reply to by गवि

+१

अ‍ॅक्सेसिबल मध्ये हो किंवा नाही असे दोनच पर्याय संभवतात.

अ‍ॅप्रोचेबलमध्ये क्वालिटेटिव्ह गोष्टी येतात.

राही Tue, 16/02/2016 - 18:39

In reply to by नितिन थत्ते

अ‍ॅक्सेसिबल साठी 'पोचणीय' हा तद्भव शब्द टांकसाळवणीय आहे.
'य', 'तव्य' हे दुसरे प्रत्यय लावूनही काही बनवता येईल. उदा. पोच्य, पोचितव्य.
अ‍ॅप्रोचेबल साठी सहजगम्य वगैरे बनवता आले असते पण 'गमन' टाळणीय असावे.
भाषाशुद्धि-वृद्धि-पुरस्करणार राही.

अनु राव Tue, 16/02/2016 - 13:25

In reply to by गवि

प्रश्न काय आहे गवि? मराठीत त्या दोन शब्दांना पर्यायी शब्द काय असा. तुम्ही एकतर त्याचे उत्तर देत नाही आणि एका वाक्यात ४ इंग्रजी शब्द वापरुन अर्थ सांगताय ( रिटर्नमधे कंफर्टेबल वागणूक / रिस्पॉन्स / सोल्युशन ).

आता असे मी लिहीले म्हणुन मी अप्रोचेबल नाही असे म्हणु नका.

ह.घ्या.हे.वे.सां.न. पण सांगावे लागते.

गवि Tue, 16/02/2016 - 13:32

In reply to by अनु राव

नाही म्हणजे आय मीन, मी मराठी आल्टरनेट वर्ड जाणण्याआधी ओरिजिनल इंग्लिश अर्थांमधेच क्लॅरिटी आणू पाहात होतो. पण तुमचा फीडबॅक अ‍ॅप्रिशिएबल आहे. मराठी वर्ड्ज रिमेंबर करायला डिफिकल्ट जातं ही फॅक्टच आहे इन टुडेज लाईफ.

मेघना भुस्कुटे Tue, 16/02/2016 - 13:42

In reply to by गवि

गवि, अगदी अगदी. कदाचित शब्दास प्रतिशब्द अशा प्रकारे मराठीत एकच एक शब्द नसेलच. (मागेही याच निष्कर्षाप्रत पोचलो होतो आपण. पण कधीकधी अगदी ओळखीचा शब्द आठवत नाही, म्हणून विचारून घेत होते.) सर्वांचे आभार.

गवि Tue, 16/02/2016 - 13:47

In reply to by मेघना भुस्कुटे

प्रतिशब्द नसेल, किंवा तसा शोधून मिळेलही, पण तो "अप्रोचेबल"पेक्षा जास्त कृत्रिम, किचकट भासेल.

अर्थाची तीच छटा ठेवायची असेल तर संदर्भानुसार "आश्वासक" हा शब्द वापरु शकतेस.

आडकित्ता Wed, 02/03/2016 - 22:06

In reply to by मेघना भुस्कुटे

अ‍ॅक्सेसिबल = मला अमुक वस्तूपर्यंत पोहोचून, तिचा वापर करता येतो आहे.
= व्यक्तीसाठी हा शब्द वापरणे योग्य नाही.
अ‍ॅप्रोचेबल = मला अमुक वस्तूपर्यंत पोहोचता येते आहे.
व्यक्तीसंदर्भात हा शब्द वापरता येतो. वापरणे योग्य आहे.

राजेश घासकडवी Fri, 11/03/2016 - 16:56

In reply to by आडकित्ता

एखाद्या व्यक्तीसाठी अॅक्सेस मिळणं हा शब्दप्रयोग काही विशिष्ट अर्थांनी वापरला जाऊ शकतो. उदाहरणार्थ 'प्रेसिडेंटबरोबर ब्रेकफास्टसाठी लोक प्रत्येकी ७५००० डॉलर मोजायला तयार असतात कारण त्यांना प्रेसिडेंटचा अॅक्सेस हवा असतो'. यात अॅक्सेसचा अर्थ तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच प्रेसिडेंटपद हे एखादं उपकरण, सुविधा असल्याप्रमाणे येतो. 'प्रेसिडेंट एक व्यक्ती म्हणून अप्रोचेबल आहे, पण इतका बिझी असतो की अॅक्सेसिबल नाही.'

आडकित्ता Fri, 11/03/2016 - 23:15

In reply to by राजेश घासकडवी

When you are getting "Access" to president or any other office bearer AND pay money for that access, you are basically seeking to USE his office as an object. :)

So, what i am saying is right. Isnt it? But then again your response is doing exactly that. Reinforcing my view, so thanks.

अनु राव Tue, 16/02/2016 - 13:26

सदासर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा |

ही गविंची सही. एखाद्याने/एखादीने हे वाक्य ऑफिस मधल्या कलिग ला लिहुन पाठवले किंवा सहीत ठेवले तर सेक्ष्युअल हॅरेसमेंट साठी पुरावा होऊ शकतो का?

उत्तर "हो" असेल तर गवि सांभाळुन रहा.

गवि Tue, 16/02/2016 - 13:35

In reply to by अनु राव

हॅ हॅ हॅ.. ती मधे नाही का "चुकून" पडल्याची एक बातमी आली होती. तेव्हा केली होती ती स्वाक्षरी. इतक्या उषिरा कोणीतरी मर्म जाणिले.

मेघना भुस्कुटे Mon, 22/02/2016 - 12:59

हे शब्दाच्या भाषांतराशी वा अर्थाशी संबंधित नाही. शब्दाच्या अचूक लेखनाशी संबंधित आहे.
काही कारणाने एका मजकुराचं मुद्रितशोधन करत असता मला 'कोंभ' हा शब्द आला. मी सवयीने 'कोंब' हा शब्द वापरत असल्यामुळे मला तिथे अडखळायला झालं. तर कोंब बरोबर की कोंभ? (इथून पुढे शक्यतोवर अवतरणं वापरणार नाहीय, कारण त्यानं टंकनाचा वेग पारच झोपतो. माफी.)

मोल्सवर्थ म्हणतो: कोंब. कारण - कोंब या शब्दाचा अर्थ त्याने दिला आहे. कोंभ या शब्दाचीही नोंद आहे. पण कोंब पहा असं त्याच्यापुढे लिहिलेलं आहे.
दाते-कर्वे म्हणतातः कोंब. कारण - कोंब या शब्दाचा अर्थ त्यांनी दिला आहे. कोंभ या शब्दाचीही नोंद आहे. पण कोंब पहा असं त्याच्यापुढे लिहिलेलं आहे.
परिभाषा-कोश म्हणतो: कोंब. त्यात कोंभ या शब्दाची नोंदच नाही.
जालावर कोंब या शब्दाला २७००० निकाल मिळतात, तर कोंभ या शब्दाला २८००.

मी सहजासहजी कोंब बरोबर, असं म्हणून मोकळी झाले असते. पण दाते-कर्वे कोशातल्या उद्धृतानं मला दडपा बसला. साक्षात ज्ञानोबा कोंभ म्हणताहेत, तर तो चूक कसा म्हणायचा?

अशा वेळी काय निर्णय घ्यायचा असतो? बोली भाषेत किती टक्के लोक कोणता शब्द वापरतात हे तपासायची सोय आपल्याकडे आजमितीस नाही. बाकी जालीय (किंवा कोशगतही) पुरावे द्यावेत, तर "किती टक्के लोक साक्षर होते हो? त्यांनी ठरवावे का शब्दाच्या लेखनाचे आधार?" असा आरडा होणार. त्यांच्या बाजूला थेट पितामह, हे वर. मग प्रमाणलेखनासाठी आधार घ्यावेत तर कोणते घ्यावेत? प्रमाणभाषेला लेखनसंकेत असतात. बोलीला नसतात. मग बोलीत काहीही बोललं जात असेल, तरी तो प्रमाणभाषेचा आधार कसा होईल? (उच्चारी प्रश्ण असताना, आपण प्रमाणभाषेत प्रश्न नाही का लिहीत?!) असे प्रश्नच प्रश्न.

इथे या एका शब्दाचा प्रश्न तसा महत्त्वाचा नाही. पण असे निर्णय पुन्हापुन्हा घ्यायला लागतात, तेव्हा ते किती महत्त्वाचे नि किती दुर्लक्षित आहेत ते जाणवतं.

गवि Mon, 22/02/2016 - 13:17

In reply to by मेघना भुस्कुटे

प्रश्न रोचक आहे. पण लेखकाने "कोंभ" असं लिहीलेलं असताना "कोंभ" की "कोंब" हे कोशांमधून आणि लोकांच्या प्रमाणावरुन इ. निकषांवर ठरवून बदलण्याचा हक्क मुद्रितशोधकाला असतो हे नवीन समजलं आणि मुद्रितशोधनाला कोणतंही लेखन देऊ नये असं मत झालं.

ऋषिकेश Mon, 22/02/2016 - 15:03

In reply to by गवि

इ. निकषांवर ठरवून बदलण्याचा हक्क मुद्रितशोधकाला असतो हे नवीन समजलं

कैतरी घोळ होतोय.
माझ्यामते मुद्रीतशोधकाला तसे सुचवण्याचा अधिकार असतो, नव्हे ते त्याचे कामच असते. अंतिम निर्णय लेखकाचाच असतो.

गवि Mon, 22/02/2016 - 15:14

In reply to by ऋषिकेश

"बालदी भरुन पाणी वत.." असं लिहीलं तर मुद्रितशोधक "बादली भरुन पाणी ओत" असं सुचवतो?

मुद्रितशोधक हा मुद्रण जुळणी झाल्यावर काढलेल्या ट्रायल प्रिंटमधल्या मुद्रणाच्या चुका शोधतो आणि मार्क करुन सुधारतो अशी समजूत होती.

ऋषिकेश Mon, 22/02/2016 - 15:29

In reply to by गवि

"बालदी भरुन पाणी वत.." असं लिहीलं तर मुद्रितशोधक "बादली भरुन पाणी ओत" असं सुचवतो?

हे वाक्य कशात आहे त्यावर हे अवलंबून आहे. एखाद्या अधिकृत नोटिसमध्ये हे वाक्य असेल तर मुद्रितशोधक असे सुचवेलही. किंवा एखादे पात्र एखाद्या ललित लेखनात वर्‍हाडी/कोकणी बोलतोय त्याच्या तोंडी अचानक हे वेगळ्या बोलीतील वाक्य आहे तर मुद्रीतशोधक ते लेखकाला दाखवून देईलच.

साक्षेपी मुद्रितशोधक नुसते वाक्य न बघता ते ज्या परिस्थितीत/पार्श्वभूमीवर येते त्यावरून गोष्टी सुचवतो. अर्थात (इतर कोणत्याही क्षेत्रापरमाणे) असे साक्षेपी मुद्रितशोधक कमी असतात हे वृत्तपत्रांच्या भाषेवरून सहजच दिसते!

मेघना भुस्कुटे Mon, 22/02/2016 - 15:37

In reply to by गवि

गवि,

लेखनात बोली आणि ग्रांथिक असे दोन प्रकार असतात.

मी अमुक अमुक केलं. हे वाक्य निवेदकाच्या तोंडी, विनाअवतरणांचे आले, तरीही ते बोली.
मी अमुक अमुक केले. हे वाक्य ग्रांथिक.
"मी अमुक अमुक केलं." हे वाक्य सरळ, विनाविचार बोली.

निवेदकाच्या (किंवा लेखक, काहीही म्हणा) म्हणण्यात बोली किंवा ग्रांथिक - जी कुठली शैली असेल, तिच्यात सातत्य राखायचे असते. मी अमुक केलं. म्हणून त्याने मला मारले. मग मी तमुक केलं. असा गोंधळ टाळायचा असतो.
तोंडचे उद्गार (दुहेरी अवतरणांतला मजकूर) सहसा बोली शैलीत असतात. (याला एखादे पुस्तकी बोलणारे पात्र अपवाद असू शकते, याचे भान बाळगणे आवश्यक.) तिथे "मी तमुक केलं. म्हणून त्याने मला मारलं." हे बरोबर. त्यातही सातत्य हवे.

हे प्रमाणभाषेतल्या लेखनाचे झाले. जर भाषा अप्रमाण असेल, (जशी वर तुमच्या उदाहरणात आहे) तर पुन्हा वरचाच तर्क. निवेदकाच्या भाषेत सातत्य हवे, तसेच तोंडच्या उद्गारांमध्येही हवे. या दोन्ही ठिकाणी कोणता शब्दप्रयोग केला असता परिणामकारक ठरेल, हा निर्णय संपूर्णपणे लेखकाधीन असतो. पण तो निर्णय घेतल्यावर त्यात सातत्य आहे ना, हे तपासण्याचे काम मु०शो०काचे. पुन्हा एकदा - भाषा प्रमाण की अप्रमाण हे लेखकच ठरवतो. भाषा बोली की ग्रांथिक हेही लेखकच ठरवतो. पण ते ठरवल्यानंतर सातत्याने पाळले जाते आहे ना, त्यात मध्येच झालेला अपवाद नजरचुकीने झाला आहे की तो लेखकाचा सजग निर्णय आहे याकडे लक्ष्य ठेवण्याचे काम मु०शो०काचे.

आणि हे तर फक्त शब्दाच्या अचूक लेखनाबद्दल झाले. पुढे मु०शो०क जर सजग आणि तयार असेल, तर तो वाक्यरचनेच्या पातळीवरचे घोळही नजरेस आणून देऊ शकतो. क्वचित शब्दाचा अर्थानुरूप चुकलेला वापरही हेरू शकतो. अशा वेळीही तो बदल करून मोकळा होत नाही, लेखकाच्या नजरेस आणून देतो आणि सुचवण्या करतो, सूचना नव्हे. उत्तम मु०शो०कात आणि संपादकात असलेली फरकाची रेषा फारच सूक्ष्म असते.

***

उदाहरणः
"बादली भरुन पाणी वत..." असे वाक्य असेल, तर अनुभवी मु०शो०क लेखकाला असे सुचवण्याची दाट शक्यता आहे, की या भाषेत बोलणारे पात्र 'बादली' न म्हणता 'बाल्डी' म्हणेल. तर लेखकाची तसा बदल करण्याची इच्छा आहे का? की लेखक त्याच वाक्यावर ठाम राहू इच्छितो?

अरविंद कोल्हटकर Tue, 23/02/2016 - 23:00

'अद्वातद्वा' हा शब्द पुढील श्लोकामधून अपभ्रष्ट रूपात उचलला गेला आहे:

यस्य कस्य तरोर्मूलं येनकेनापि मिश्रितम्|
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति||

कोठल्यातरी झाडाचे मूल कशात तरी मिसळून कोणाला तरी दिले तर काहीहि होईल. (नियम न पाळता कसेहि वागले तर परिणाम कसा असेल ह्याचा निर्वाळा देता येणार नाही.) मोल्सवर्थने हाच अर्थ दाखविला आहे असे मी आत्ताच पाहिले.

#शुचि - व्याकरण विषयातील त्या पुस्तकाचे नाव 'अकाण्डताण्डव' असे आहे. (हे नाव हरिनाथाने आपल्या पुस्तकाला का दिले हे मला विचारू नका!) कोणातरी मराठी बोलणार्‍याला 'अर्गशा गर्गशा, मर्यादेबाहेर आरडाओरडा करणे' अशा अर्थाला हा शब्द योग्य बसतो असे वाटले आणि त्याने तो तसा वापरला. तेथून तो सार्वत्रिक वापरात आला.

'अर्गशा गर्गशा' हा शब्द अरेबिकमधून आला आहे असे वाटते. मोल्सवर्थने 'अरकशी वरकशी' आणि 'अरकस वरकस' असे अरेबिक उगमाचे शब्द दाखवून त्यांचा अर्थ 'bickering, jarring, wrangling' असा दाखविला आहे.

.शुचि. Tue, 23/02/2016 - 23:10

In reply to by अरविंद कोल्हटकर

धन्यवाद. पुन्हा प्रतिसाद वाचल्यावर मला लक्षात आले की त्या कमेंटरीला नाव दिलेले आहे. म्हणून मग माझा उ.प्र उडवला.

अरविंद कोल्हटकर Wed, 24/02/2016 - 10:08

In reply to by नितिन थत्ते

'येन केन', यस्मै कस्मै' 'यद्वा तद्वा' अशा शब्दरचनांचा अर्थ 'अनियमित, unpredictable, unregulated, unforeseeable, unfathomable' अशा प्रकारचा करता येईल. एक उदाहरणः

घटं छिन्द्यात्पटं भिन्द्यात्कुर्याद्रासभरोहणम्|
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्||

घडा फोडावा, कपडे फाडावे, गाढवावर बसावे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी माणसाने या ना त्या मार्गाने असे काही (जगावेगळे) करून दाखवावे.