Skip to main content

बलात्कार

एक काळ होता - जेव्हा सुंदर स्त्रीला "विधुमुखी" म्हटले जायचे, तो काळ उलटला. कविंच्या हृदयाला प्रेयसी ही "माहताब", "शशीमुखी" वाटायची. तिचे प्रेमात तेजाळणे या वेड्या कविंना नभोदीपाची, चंद्राची आठवण करुन द्यायचे. चंद्रावर कलंक आहे डाग आहे जो तुझ्या मुखावर नाही असे काव्य रचले जायचे.
.
तो काळ होता जेव्हा चंद्र हा लहान मुलांचा "मामा" होता.
"चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !" गाणे प्रत्येक मराठी लहान मुलाने एके काळी ऐकलेले-गायलेले असायचे.
.
मग एकदा माणूसच चंद्रावरती उतरला, आणि सगळ्या जगाला कळले, अरे चंद्र काही तेजस्वी नभोदीपच नाही तर रखरखीत, खडकाळ भूभाग असलेला ग्रह आहे. Too much unnecessary information? निदान कविंकरता तरी होय.
.
एक काळ होता जेव्हा भावभावना या मनुष्याला कोड्यात टाकत असत. Pleasantly intrigue करत असत. आनंद-दु:ख-व्याकुळता-शोक-आर्तता-कडवटपणा-रुसवा किती किती रंगांच्या मोहक इंद्रधनु छटांच्या भावना, unending intrigue करत असत. या भावनांच्या आवेगात कवि, लेखक उत्तमोत्तम रचना लिहून टाकत. वाल्मिकींनी म्हणे क्रौंच पक्ष्यांच्या जोडीचा वियोग पाहीला आणि त्या दु:खातून, रामायणासारखा महाग्रंथ निर्माण झाला. रामचंद्र-सीतेच्या कहाणीत त्यांना या क्रौंच वियोगाचे साधर्म्य आढळले.
.
मग शोध लागला, अरे या सर्व भावभावना elevated mood - abysmal depression या सर्वाचे विच्छेदन करता येते. या electrochemical घटना आहेत. अगदी गोळ्या-औषधांनी काबूत रहाणार्‍या.
.
परत Too much unnecessary information? निदान कविं-लेखकांकरता तरी होय. सायन्स ला "फुलपाखराचे पंख" डिसेक्ट करण्याचा हा परवाना कोणी दिला? एक थंड, व्यावहारीक, शास्त्रिय चिरफाड. Accurate measurement आणि cold logic (तर्काने) काढलेले निष्कर्ष. आम्ही कविमनाच्या लोकांनी ही परवनगी कधीच दिली नव्हती. हा बलात्कार आहे. रांगड्या, रगेल, रुक्ष, माजोरी सायन्सने हळूवार, कोमल, अलवार काव्यवृत्तीवर केलेला बलात्कार. आम्ही याचा निषेध करतो.

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

उपाशी बोका Fri, 23/10/2015 - 07:36

In reply to by उपाशी बोका

The aim of science is to make difficult things understandable in a simpler way; the aim of poetry is to state simple things in an incomprehensible way. The two are incompatible. - Paul Dirac

The aim of science is to make difficult things understandable in a simpler way या पहिल्या भागाशी सहमत आहे, दुसर्‍याशी तितका नाही. कवितेत सोप्या गोष्टी या क्लिष्टपणे सांगितल्या जातात (नेहमीच नाही), हे बर्‍यापैकी मान्य केले तरी तो कवितेचा मूळ उद्देश (aim) नसतो, असे वाटते.

धनंजय Fri, 23/10/2015 - 19:55

In reply to by उपाशी बोका

रसेलच्या मते :
विज्ञान विवक्षित घटना/वस्तूंचे निरीक्षण करून सर्वसामान्य नियम/कायदे बनवते.
कला सर्वसामान्य नियम/कायदे गृहीत धरून एक विवक्षित घटना/वस्तू बनवते.

---
(उदाहरणे माझी, रसेलची आठवत नाहीत) :
१. विज्ञान अमुक-अमुक अशा कित्येक विवक्षित निरिक्षणांतून निष्कर्ष काढते की "इतकी-इतकी इजा सोसूनही माता-जनावर पिलाला वाचवते." मात्र कला "मातृत्याग असतो" हे गृहीत धरून एखाद्या विवक्षित मातृत्यागाबाबत कविता/कथा/कादंबरी बनवते.
२. तारेच्या लांबीचे १:२ गुणोत्तर असलेल्या ध्वनि-घटना ऐकून-निरीक्षून विज्ञान नियम शोधून काढते की "१:२ अशा गुणोत्तराच्या तारांचा षड्ज-तारषड्ज-भाव जुळून येतो". एखादा कलाकार एखादी धुन वाद्यावर वाजवताना अन्य सुर वाजवत-वाजवत उत्सूकता ताणून मग एका विवक्षित ठिकाणी तार-षड्ज वाजवायची घटना घडवतो.

अस्वल Thu, 22/10/2015 - 22:52

कवी लोकांनी नेहेमीच अप्राप्य आणि अवाक्याबाहेरच्या गोष्टींबद्दल बोलायचं असतं.
पूर्वी जेव्हा गावाबाहेर जाणंच धोक्याचं होतं, त्या जमान्यात कवी लोक चंद्राबद्दल बोलायचे.
आता माणूस बिन्धास जगभर फिरतो, मग कवी लोकांनी त्यांची "क्षितीजं विस्तारायला" नकोत का?

चंद्राऐवजी -> देवयानी दीर्घीका घ्या, अश्वमुखी तेजोमेघ घ्या किंवा गेला बाजार एखादा सुपरनोव्हा तरी.
जवळपास २०० वर्षं तरी पुरेल.
----
तसंच फुलापक्ष्यांचं आणि प्राण्यांचंसुद्धा. आजूबाजूला दिसणार्‍या सामान्य पशुपक्ष्यांबद्दल लिहिणं जुनं झालं, वैज्ञानिकांनी त्याची चिरफाड केली म्हणता?
मग Deep sea angler बद्दल लिहा, किंवा नष्ट झालेल्या डोडोला आपल्या कवितांसाठी वापरा-
कवी लोकांनीसुद्धा नवनव्या गोष्टींच्या मागे लागलं पाहिजे, काय?

कवी->वैज्ञानिक->कवी->वैज्ञानिक अशी पकडापकडी चालू रहायला पाहिजे.
------------
कोमल, कवीमनाचे लोकहो, आता ^^ वरच्या ह्या सगळ्या गदारोळाला कवितेत उतरवून दाखवा बरं.

~एक धोपटमार्गी सामान्य जीव

.शुचि. Thu, 22/10/2015 - 22:55

In reply to by अस्वल

वरच्या ह्या सगळ्या गदारोळाला कवितेत उतरवून दाखवा बरं.

हे अवघड काम, फक्त धनंजय हे करु शकतील.

धनंजय Fri, 23/10/2015 - 00:39

In reply to by .शुचि.

कोमल, कवीमनाचे लोकहो, आता ^^ वरच्या ह्या सगळ्या गदारोळाला कवितेत उतरवून दाखवा बरं.

पाचच्या पाच उपमा घ्यायच्या म्हणजे फारच ओढाताण होते. तरी मागताच, तर घ्या आपले.

---------------------------------------

अश्वमुखी तेजोमेघाच्या
प्रभावळीसम दग्ध कुंतले
चकचकतात तुझ्या पाठीच्या
मावळतीच्या तेजामध्ये.

डोह तुझे काळोखे डोळे
खोल त्यांत जी ठिणगी दिसते
गळ आहे तो! सावज भोळे
अँगलराचे बंदी होते

होता स्पर्श तुझा थोडाही
बुद्धी सारासार विचारी
दिपली तारास्फोटाने, ही
मर्यादित अन् मिणमिणणारी

नि देवयानी जणू दीर्घिका
व्यूह बने माथ्याचा भोवरा
बोटे माझी अशी कशी का
त्यांच्यामध्ये गुंगवणारा

नामशेष जणु डोडो झाले
मनो-भूवरीचे निग्रह जे
किती काळ होते तगलेले --
याच क्षणी तू पूर्ण पाहिजे!

---------------------------------------

मेघना भुस्कुटे Fri, 23/10/2015 - 07:21

In reply to by धनंजय

अस्वल एक वायझेड, धनंजय साहेब सात. असले वायझेड चाळे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा वाचन वाढवा. या निरर्थक टपाचा (TP: संस्कृताइज्ड रूप) निषेध.

राजेश घासकडवी Fri, 23/10/2015 - 00:53

अनवीव्हिंग द रेनबो हे रिचर्ड डॉकिन्सचं पुस्तक वाचावं अशी सूचना करतो. या पुस्तकात याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

His starting point is John Keats' well-known, light-hearted accusation that Isaac Newton destroyed the poetry of the rainbow by 'reducing it to the prismatic colours.'

आपल्याला माहीत असलेल्या जगात माहीत असलेली आश्चर्यं ही अगदीच मोजकी आणि साधीसुधी आहेत. आपल्याला एक अज्ञाताने मोहून जाण्याची आस असते. या कुतुहलापोटी आपल्याला इंद्रधनुष्यात काव्य दिसतं. पण ते कसं तयार होतं हे समजण्यातून ज्या इतर गोष्टी समजतात त्यातून आपल्याला तितकंच काव्यमय सत्य दिसतं. प्रकाशाच्या अपवर्तनाचा अभ्यास झाला त्यातूनच दुर्बिणींचा शोध लागला. त्यातूनच आपलं विश्व हे सतत मोठं होत राहिलेलं आहे, आणि एके काळी 'सृष्टी के पहले कुछ भी नही था' काळ नाही, की अवकाशही नाही या अद्भूत सत्याची जाणीव झाली. लहानपणी इंद्रधनुष्याचा आनंद घेतल्यानंतर मोठेपणी या काव्यमय सत्यात गुंतून जाणं आवडणार नाही का?

व्यक्तिशः मला अजूनही इंद्रधनुष्य दिसल्यावर वातावरणातला कुंदपणा, पाऊस, आणि सोनेरी प्रकाश यांनी एका वेगळ्याच, खास विश्वात जायला होतं. ज्ञान आणि काव्य स्वतंत्र ठेवणं तितकंही कठीण नाही.

.शुचि. Fri, 23/10/2015 - 01:13

In reply to by राजेश घासकडवी

राघा अतिशय मार्मिक प्रतिसाद आहे. आज हे पुस्तक ग्रंथालयात शोधते.

ज्ञान आणि काव्य स्वतंत्र ठेवणं तितकंही कठीण नाही.

अतिशय बरोबर आहे हे.
.
एक संस्कृत सुभाषित शोधत होते काहीतरी अशा अर्थाचे की अरे शरीर म्हणजे - कफ, मेद, अस्थि, मलमूत्र यांचे आगर आहे आणि अशावेळी स्त्रीप्रति विषयवासना का ठेवतोस? अशाच प्रकारचं काहीतरी "मोहापासून" वाचवण्याकरता अतिरेकी वर्णन करण्याचे ते सुभाषित आहे.
मनात विचार येतो - Really? Are you reducing this beautiful existence to mere phlegm, urine & those kind of things?
किती तो अट्टाहास तथाकथित मोहावर विजय मिळवण्याचा. हे सर्व घटक माहीत असूनही स्वतःवर व दुसर्‍यावर प्रेम नाही करता येत? विकृतीची किंवा निदान severe cognitive limitation ची केस म्हणेन मी.
.
राघांचा प्रतिसाद नेहमीप्रमाणेच बावनकशी - त्याची ही पोच.