Skip to main content

बागकामप्रेमी ऐसीकर २०१५: धागा ७

काल बागेतली भेंडी आणि वांगी घालून पीत्झा केला. मस्त झाला होता. ताज्या, हलकेच भाजलेल्या भाज्या खूपच रुचकर!

pizza

पिडा, अदिति, सानिया व रुचीचा बागकाम सीझन बर्‍यापैकी संपत आला असेल. (पिडा, बटाटे पेरले का?)
तर या धाग्यासाठी स्पेशल प्रश्न - बागेत उगवलेल्या भाज्या-फळांना तुम्ही कुठल्या पदार्थांमधे वापरले? भाज्या, चटण्या, जॅम, वाळवणी, कॅनिंग - फोटो आणि पाकृ दोन्ही द्या!

बॅटमॅन Mon, 07/09/2015 - 20:13

भाज्या खपवायला हा मार्ग लैच कारीगर आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/09/2015 - 21:07

आमच्याकडे उन्हाळ्यामुळे सध्या पानं वगळता सगळं गपगार आहे. दर आठवड्याला पातेलंभर, साधारण या फोटोत आहे त्याच्या दीडपट बेझिल येतोय तेवढंच. दर पंधरवड्याला कोणालातरी तो द्यायचा, आणि उरलेल्याचा पेस्तो करून फ्रीज करायचा असा कार्यक्रम आता सुरू केलाय.
बेझिल

अळूची दर आठवड्याला भाजी करता येईल इतपत अळू नियमित मिळतोय.

या आठवड्यात तापमान पुन्हा ३२ से च्या खाली येईल. तेव्हा पुन्हा टोमॅटो आणि मिरच्या धरतील अशी आशा आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात पालक, लेट्यूस, बीट, मटार आणि फ्लावर पेरणार आहे. त्यासाठी वाफा बनवला आहे, त्यात अंगणातलं तण उपटून खाली पसरून दिलंय. वरून माती आणि स्टारबक्समधली वापरलेली कॉफीपूड पसरून दिल्येत. एकीकडे कंपोस्टही भट्टीत टाकलंय, पण ते बहुतेक थंडीनंतरच वापरायला तयार होईल. गेल्या वर्षीचं कंपोस्ट त्या वाफ्याच्या दाढेखालीही येणार नाही एवढंसं होतं. पण दर आठवड्याला फार तर चार लिटर कचरा होतो.

वाफ्याला पाणी घालण्यासाठी काही अर्ध-आटुकमाटुक सोय करता येत्ये का यावर 'संशोधन' सुरू आहे. सध्या 'गळके' पाईप आणण्याकडे कल आहे.

मे महिनाभर बदाबदा पाऊस कोसळल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट कोरडेच गेले. ऑगस्टात एक दिवस किंचित पाऊस झाला तेवढाच. त्यामुळे समोरचं गवत पिवळंधम्मक झालंय. घरातलं भाज्या, फळं धुतलेलं, भांडी विसळलेलं बिनसाबणाचं पाणी जमा करून गवतात ओतून द्यायला सुरुवात केली आहे. दाराजवळच्या गवताच्या रंगात किंचित फरक जाणवायला लागलाय. माझ्या हातांचा आकारही थोडा निश्चित दिसायला लागलाय.

रोचना Tue, 08/09/2015 - 11:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमचे हवामान थोडे आमच्यासारखेच आहे! मला ३० से. तापमानाचा कंटाळा आलाय. पाऊस खूप पडला, पण मेला उकाडा कमी होत नाहीय.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/09/2015 - 00:26

In reply to by रोचना

आमच्याकडे आता साधारण नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत हवा चांगली होत जाईल. पुढे थंडी फार व्हायला लागते, म्हणजे आमच्या मानानी. कनेडीयन थंडी आमच्याकडे फ्रीजरमध्येही नसते. पण साधारण डिसेंबर ते फेब्रुवारी बागकाम करण्यासाठी फार बरी हवा नसते. यावर्षी पालक, बीट, मटार वगैरे लावणार आहे. इथे उंदरांनी पुन्हा हल्ला केला नाही तर ही झाडं किती थंडी सहन करतात ते समजेल.

आज थोडे ढग आहेत. उद्या थंडीची पहिली लाट येणार आहे, थोडा पाऊसही पडण्याची शक्यता आहे. मी कधीची वाट बघत बसल्ये. ३६-३८ से चा आणि बाहेर दिसणाऱ्या भगभगीत पिवळ्या रंगाचा खूप कंटाळा आलाय. (मराठवाड्यात काय होत असेल याची कल्पनाही करवत नाही.) उद्या ३२ पर्यंतच(!) तापमान वाढणारे तेव्हा उद्या दह्याच्या डब्यांमध्ये बिया पेरून रोपं वाढवायचा बेत आहे.

रुची Wed, 09/09/2015 - 00:53

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी सहज पाहिलं तर तुमच्याकडे डिसेंबरमधेही कमाल-किमान तापमान १४-४ अंश असे दिसतंय त्यामुळे अगदी नोव्हेंबरमधे गाजर-बीट-चार्ड-पालक वगैरे लावलेस तर डिसेंबरमधेही बागकाम करता येईल कारण या तापमानात काही कोल्ड-हार्डी भाज्या चांगल्या येतात. अगदी मेथीही चांगली येईल फक्त सुरवातीला रुजेपर्यंत तापमान थोडे जास्त असले की झाले.

रोचना Fri, 11/09/2015 - 11:24

In reply to by रुची

कॉलिफ्लॉवर आणि बीट कधी लावावे? इथे सध्या हीटवेव सारखी हवा आहे - गेले दोन-तीन दिवस तर ३६-३७ से. तापमान होते. काल पावसामुळे थोडं कमी आहे, तरी ३०च्या आसपासच. बहुदा पुढच्या महिन्यात २५-२६ होईल, आणि नोव्हेंबर च्या अखेरपर्यंत २० च्या आसपास. मग डिसेंबर-जानेवारी २०-१५ असते, मधेच एक आठवडा १०च्या खाली दिवसा गेलं तरच, नाहीतर १२-१५ दिवसा कमाल तापमान असतं.

मला पेरणी करून ट्रान्सप्लांट कधी करावं कळत नाहीय. ऑक्टोबर मधे कोंब तयार करून एका महिन्यानंतर (नोव्हेंबरच्या मध्यात कधीतरी) मोठ्या कुंडीत हलवले तर चालेल का?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/09/2015 - 16:00

In reply to by रोचना

तुमच्याकडे फ्रिजींग होण्याची भीती नाही. माझं इंटरनेट ज्ञान - ८० फॅ च्या खाली तापमान आल्यावर.

रुची Fri, 11/09/2015 - 20:09

In reply to by रोचना

मला कॉलीफ्लॉवरचा काही अनुभव नाही पण बीट्स थंड हवेत चांगले येतात. पेरणी करून ट्रान्सप्लांट करण्याऐवजी थेट जमीनीतच का पेरत नाही? मी आतापर्यंत नेहमी तसेच केलेले पाहिले आहे. ऑक्टोबर अखेरीला किंवा नोव्हेंबरमधेच लावले तरी चांगले येतील. आमच्याकडे जमीन थॉ झाली आणि रात्रीचे तापमान पाच अंशाच्या वर गेले की बीट्स जमीनीत पेरता येतात, ते उगवून यायला आठवडाभर लागतो आणि साधारण दोन महिन्यांत तयार होतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/09/2015 - 20:19

In reply to by रुची

बीटाच्या एका बीमधून तीनेक रोपं येतात. ते लांब लांब करावं लागतंच ना. (गेल्या वर्षी मी पेरले होते. उंदरांचा हल्ला झाला आणि काहीच वाढलं नाही.)

रुची Fri, 11/09/2015 - 20:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बीटाच्या एका बीमधून तीनेक रोपं येतात. ते लांब लांब करावं लागतंच ना.

नाही गं, जास्तीचे ते नंतर उपटून टाकायचे. ते वेगवेगळे करत बसले तर जगण्याची शक्यता कमीच. काही बिया मोनोजर्म्स असतात, त्यातून एकच रोप उगवते. सगळ्या प्रकारची रोपे नीट ट्रन्सप्लांट होत नाहीत विशेषतः जमीनीखाली येणार्या भाज्या (बीट्स, गाजरे वगैरे). माझ्या शेजारच्या वाफ्यात बागकाम करणारी बाई तिची गाजरे 'थिन' करत होती तर मी तिला म्हटले की मी माझ्या वफ्यात ट्रन्सप्लांट करून पहाते. अतिशय हलक्या हाताने काढून तातडीने काळजीपूर्वक ट्रान्सप्लांट करूनही बारापैकी फक्त एक गाजर वाचले. यावर्षी थिनिंग करायची विसरले तर गड्डे एकदम छोटेछोटे आले.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/09/2015 - 20:50

In reply to by रुची

आता हे वाचून माझा प्लॅन थोडा बदलते.

काही बिया थेट वाफ्यात घालेन. काही बिया रिकामं अंडं किंवा टॉयलेट रोलचा अर्धा रिकामा खोका यांत पेरून, तीन रोपं वेगळी करून बघते. त्यातून काय उगवतं ते नंतर समजेलच.

पिवळा डांबिस Sun, 13/09/2015 - 09:39

In reply to by रोचना

कॉलिफ्लॉवर विंटरमध्ये चांगले येतात. पूर्वी लावून पाहिल्याचा अनुभव आहे...
फक्त ते बांधायचे कसे हे त्यावेळेस माहिती नसल्याने ते गच्च न होता पसरले!!! :)
आणि बीट?
ईऽऽऽऽ!!!!!!!!!
:)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 13/09/2015 - 21:50

In reply to by पिवळा डांबिस

बीटाच्या पानांची पीठ पेरलेली भाजी छान लागते. (बाप रे, अशा अर्थाचं वाक्य मी पिडांकाकांना लिहेन असं कधी स्वप्नात वाटलं नव्हतं. बागकाम ने निकम्मा कर दिया ...)

पिवळा डांबिस Mon, 14/09/2015 - 09:53

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पाने रुचती कुणाला,
आक्रंदतात कोणी..
मज बीट ही रुतावे,
हा दैवयोग आहे!!!!
:)

ते मातकट बीट कसं खाववतं लोकांना ते देव जाणे!!!!
:)
---------------------------------------------------------------
अवांतरः पिवळा डांबिस कुठे रहातो याची उत्सुकता असल्यास या बुधवारी सिमी व्हॅलीतल्या रीगन लायब्ररीत होणार्‍या रिपब्लिकन डिबेटच्या अनुशंगाने त्या ठिकाणाचे सीएनएनवर दाखवले जाणारे शॉटस पहा. माझ्या घरापासून २-३च मैलांवर ते ठिकाण आहे आणि तिथल्या डोंगरांमध्ये मी रहातो!!!
आजच एका टीव्ही कॉमेंटेटरची अतिशय समर्पक कॉमेंट ऐकली,
'इफ द रिपब्लिकन्स वॉन्ट टू कन्व्हिन्स द रेस्ट ऑफ द कन्ट्री दॅट द युएस इज इन डीप डंप, देन दे चोझ अ रॉन्ग लोकेशन!!!" :)
सो ट्रू! आपला नंदन साक्ष आहे!!!

नंदन Thu, 17/09/2015 - 13:52

In reply to by पिवळा डांबिस

'इफ द रिपब्लिकन्स वॉन्ट टू कन्व्हिन्स द रेस्ट ऑफ द कन्ट्री दॅट द युएस इज इन डीप डंप, देन दे चोझ अ रॉन्ग लोकेशन!!!" (स्माईल)

+१
नक्कीच ऑफ'बीट' जागा आहे ;)

सानिया Mon, 07/09/2015 - 21:27

माझ्याकडचा बागकामाचा मोसम संपत आलाय हे खरंच. गंमत म्हणजे माझ्याकडे भेंडीचं एकच रोप जगलं, ते अचानक वाढायला लागलंय जोमाने. त्याला चक्क चार भेंड्याही आल्यात!

मी माझ्या भाज्या ताज्या पदार्थांमध्येच वापरल्या. लोणचे-मुरांबे वगैरेंना माझा पास.

पिवळा डांबिस Tue, 08/09/2015 - 09:38

वांगी घातलेला पिझ्झा पूर्वी खाल्ला आहे, पण भेंडी? पिझ्झ्याचा घास गिळतांना बुळबुळीत लागत नाही का?
बाकी यामुळे बॉस्टनमध्ये एके ठिकाणी मिळणार्‍या वांगी, ब्रोकोलीचे तुरे आणि आस्पारागसचे शेंडे घातलेल्या पिझ्झ्याची आठवण आली. मस्त असायचा (कदाचित अजूनही असेल) तो पिझ्झा!

पिडा, अदिति, सानिया व रुचीचा बागकाम सीझन बर्‍यापैकी संपत आला असेल. (पिडा, बटाटे पेरले का?)

शीजन कसला संपतुया?
वांगी आणि टामाटू उतरवले आणि आता त्यांचा शीजन संपला आसं म्हनतूय तो वांग्याच्या त्या रोपांनी पुन्हा फुलं द्यायला सुरवात केलीया, आनि टामाटूच्या डोळ्यातल्या कोंबांनीही नवीन टामाटू धरायला सुरवात केलीये! मिरची नुकतीच उतरवलीये तर अजून नवीन फुलं यायला झालीयेत!
बटाटे पेरले, त्यांची ल्हान रोपं नुकतीच डोकं वर काढून बघत्यात जरा!
हवायन पेरू भरलाय फळांनी. पॅशनफ्रूटला फळं धराया लागलीत, आनि रुचीच्या त्या मायर लिंबाला हिरवी लिंबं लागल्यात. जानेवारीमंदी तयार होत्याल ती!
आता मोहरी आणि मेथी पेरायला घेनार. यावर्षी रूचीबाईंकडनं प्रेरना घिउन थोडकी लसूनबी लावायला इचार हाये!!
आमची बारमाही शेती हो, आमाला कसली उसंत? आमचं काय त्या कॅनेडियन शेतकर्‍यांसारकं सुखाचं आयुक्ष थोडंच हाये? ते आता आक्टूबरात कांबळं घेऊन गुरफटून झोपत्याल ते थेट पुढल्या एप्रिलपर्यंत!!!
नशीबवान लोकं!!!
:)

रोचना Tue, 08/09/2015 - 11:13

In reply to by पिवळा डांबिस

पीत्झा अगदी पातळ क्रस्टचा होता, त्यामुळे भाजून तयार व्हायला पंधरा-वीस मिनिटंच लागतात. म्हणून आधी वांग्याचे आणि भेंडीचे आधी बारीक काप करून घेतले, आणि कणिक भिजत असताना त्यांना ऑलिव तेल लावून, लसणाच्या तुकड्यांबरोबर वीस एक मिनिटं ओव्हन मधे भाजून घेतले. मग टोमॅटो सॉस वगैरे लावून पुन्हा बेसवर सजवून पीत्झा एकत्र भाजायला ठेवला. त्यामुळे बुळबुळित अजिबात लागला नाही. उलट चांगला कुरकुरीत होता :-)

या निमित्ताने आमच्या कार्ट्यांनी कुरकुर न करता वांगं आणि भेंडी एकत्र खाल्ली हेच आश्चर्य.
भाजण्या ऐवजी भेंडी थोडी तेलात परतून घेतली तरी चालेल असे वाटते.

मला टोमॅटो आणि मिर्च्यांचे कोंब तयार करायचे आहेत. वांगी तयार आहेत, आणि यंदा पहिल्यांदा फ्लावर आणि बीट चा प्रयोग करणार आहे.

ऋषिकेश Tue, 08/09/2015 - 10:00

आमच्या टोमॅटोंनी उष्म्याने मान टाकलीये. चारापैकी तीन रोपं गेली :(
एक्च तग धरून आहे.

कोथिंबीर, कडीपत्ता वगैरे गोष्टी वगळल्या तर इतर कुंड्यातली बाग गेलीच ए ऑलमोस्ट!

पिवळा डांबिस Tue, 08/09/2015 - 10:05

In reply to by ऋषिकेश

म्ह्णजे समदा विदर्भच झाला म्हणायचा!! :(
अरे पण आत्ता तुमच्याकडे पावसाळा सुरू आहे ना? मग उष्म्याने मान टाकली म्हणजे?

ऋषिकेश Wed, 09/09/2015 - 09:19

In reply to by पिवळा डांबिस

नावाला पावसाळा आहे. दिड महिना पावसाचा टिपुस नव्हता.
माती सतत ओली होती पण हवेतले बाष्प कुठून आणायचे? :(

@रोचना: आणखी खाद्य कमी पडले का ते माहिती नाही. झाडे वितभर वाढल्यावर अचानक सुकत गेली, गळपटली :(

रुची Tue, 08/09/2015 - 10:23

आमचे बागकाम आता खरोखरच संपल्यात जमा आहे. मोठे टोमॅटो झाडावर पिकण्याची आशा जवळजवळ संपली आहे, परवा अचानक उत्तरेकडून थंड वारे आले त्याबरोबर संततधार पाऊस, दिवसाचे कमाल तापमान सहा अंश आणि रात्री थोडा बर्फही पडला. बर्फ लगेच वितळूनही गेला आणि ताडपत्री लावलेली असल्याने झाडे तशी बचावली पण आता बागकाम संपले असल्याचा तो संकेत होता. नाही म्हणायला केल, बीट, गाजरे वगैरे थंडीला सरावलेल्या गोष्टी आहेत तशा आणि मोठ्या झाडांची पाने अजून पिवळी पडली नाहीयत त्यामुळे अजून थोडे दिवस थोडे बागकाम आहे आणि नंतरच्या आवराआवरीचे कामही मोठे असते. शिवाय पुढच्या दोन आठवड्याचे तापमान सध्याच्या अंदाजाप्रमाणे ठीक दिसतेय. बटाटे अजून उकरले नाहीत, जमीन थोडी सुकली की मग उकरू.
कम्युनिटी गार्डनचा हार्वेस्ट फेस्टीवल दोन आठवड्यांत आहे, तिथे थोडे पैसे गोळा करण्यासाठी आज तिथल्या झाडांच्या पेयर्सचे थोडे 'स्पाइस्ड पेअर बटर' बनवले. मी पॅचवर लवलेले सात-आठ लसणाचे गड्डे मस्त सणसणीत छोट्या सफर्चंदाच्या आकाराचे आले, त्याचे थोडे लोणचे बनवणार आहे.
बरेच पिकल्स, जॅम्स, चटण्या बनविल्या यावर्षी, नंतर सविस्तर लिहेन त्याबद्दल.
पिडां, लिंबे पार्सल करणार ना? :-) बारा महिने बागकाम ....नशिबवान आहात.

पिवळा डांबिस Wed, 09/09/2015 - 09:39

मिरच्यांचा पहिला बार!
DSC_0670

हिरव्या मिरच्या शक्य तितक्या संपवतोय.
पण त्यांचा पिकण्याचा रेट आमच्या संपवण्याच्या रेटपेक्षा कितीतरी जास्त आहे. :)
अजून झाडांवर बर्‍याच हिरव्या मिरच्या आहेत, आणि आता भर म्हणून नवीन फुलं येताहेत...
(अजून तरी हगरड लागलेली नाही!!)
:)

बॅटमॅन Wed, 09/09/2015 - 13:47

In reply to by अनुप ढेरे

अगदी असेच म्हणतो. एकदम लहानपणी वापरलेल्या ते हिरवे टोपण लावलेल्या स्केचपेनांची आठवण झाली. लय उच्च रंग आहे मिर्च्यांचा.

पिवळा डांबिस Sun, 13/09/2015 - 09:47

In reply to by बॅटमॅन

थॅन्क्यू अनुप आणि बॅट्या!
आजच काकी म्हणत होती की ह्या अशा मिरच्या पाहिल्या असत्या तर तुझी (म्हणजे माझी) आई सगळ्या गावभर सांगत सुटली असती
की, "माझ्या लेकाने ह्या मिरच्या उगवल्यात म्हणून!!"
जाणारी माणसं जातात, आठवणी फक्त मागे उरतात!!!
:(

http://www.misalpav.com/node/3893

पिवळा डांबिस Wed, 16/09/2015 - 23:12

In reply to by पिवळा डांबिस

परवा रात्री आमच्या इथं भरपूर पाऊस पडला.
रात्री दोन वाजता पावसाच्या आवाजाने जागा झालो आणि दचकून आठवलं की या मिरच्या परसात वाळत ठेवल्या होत्या त्या तशाच आहेत!
धडपडत ऊठलो आणि भिजत मागल्या दारी गेलो तर त्या ट्रे मध्ये पाणी साठलं होतं आणि बेट्या मिरच्या त्यात मस्त पोहत होत्या.
त्यांना आत आणलं आणि एक मोठा टॉवेल पसरवून घोळून घोळून कोरड्या करायचा प्रयत्न केला. उरलेली रात्र त्यातच गेली...
आता घरातच वाळवतोय, या वीकेन्डला पुन्हा बाहेर सुकवीन.
पण तोवर त्यांच्यावर बुरशी वगैरे नाही धरली म्हणजे मिळवली! :(

पावसाला शिव्या देण्यात अर्थ नाही कारण आमच्या इथे गेले चार वर्षे दुष्काळ आहे!
पडतोयस तर भरपूर पड बाबा!!!

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 17/09/2015 - 00:27

In reply to by पिवळा डांबिस

बुरशी येऊ नये म्हणून थोडा वेळ अव्हनमध्ये वाळवून बघा हवं तर. अव्हनमध्ये दिवा लावला तरी बऱ्यापैकी उष्णता मिळते.

---

मी पेरलेले मुळा, बीट, लेट्यूस, मटार, पालक उगवून आले आहेत. येत्या शनिवारी त्यांची रवानगी वाफ्यात करेन. शिवाय गाजर आणि ब्रॉकलीच्या बिया आणल्या आहेत. त्या सगळ्याच शनिवारी मुहूर्त.

रोचना Thu, 17/09/2015 - 16:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हेच म्हणणार होते. फक्त पाइलट लाइट लावून २४ तास ठेवल्या तरी चालेल असे वाटते.

घनु Thu, 17/09/2015 - 16:25

In reply to by पिवळा डांबिस

अरेरे, लाल मिरच्यांबद्दल ऐकून वाईट वाटलं. नजरच लागली दुसरं काय :( ...त्या मिरच्या पुर्ण वाळल्या की त्यांची मीठ-'मिरची' ने दृष्ट काढा.

पिवळा डांबिस Fri, 18/09/2015 - 22:31

In reply to by पिवळा डांबिस

आली नाही बुरशी,
वाचली माझी मिरची,
करीन तिला खर्ची
आता मटणात गं!!

मटणात गं, मावशे मटणात गं!
ह्याच्या मिरचीची जागा आता मटणांत गं!!!
-शाहीर डांबिस पिवळे
:)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 20/09/2015 - 04:29

तापमान कमी झाल्याचं झाडांना आवडायला लागल्याचं दिसतंय. मागे जी मिरचीची झाडं फोड आल्यामुळे मरगळली होती, त्यांच्यापैकी एकाला ही मिरची आलेली आज अचानक दिसली.
मिरची

इतर दोन मिरच्यांनाही मिळून चार अर्भक मिरच्या लागलेल्या दिसत आहेत. पहिल्याच मिरच्या.
मिरची आणि फूल

वांग्याला मध्ये मुंग्या लागल्या होत्या. शेकडो मुंग्या. इथे बऱ्याच मुंग्या बरेच ठिकाणी दिसतात. मुंग्यांचं औषध कुंडीत टाकलं आणि त्या मेल्या. पण तेव्हापासून पानं अशी झाली आहेत. चांगली पानं स्पर्श केल्यास गुबगुबीत लागतात, ते तसं काही लागत नाहीये. अर्थातच फुलं कमी आणि फळ नाहीच. पण हे काय आहे हे समजत नाहीये. पाणी वापरून चोळून धुतलं तरी हे निघत नाहीये.
वांगं रोग

आता मला झेपणार नाही एवढं बाझिल येतंय. आज संध्याकाळी एका अमेरिकन कुटुंबात जेवायला जायचंय. तिथे बरोबर भोपळ्याचा पाय (टुणूक टुणूक), त्यांना भारतीय पदार्थांची तोंडओळख म्हणून थोडं पुरण आणि पिशवीभर बाझिल नेण्याचा विचार आहे.

शिवाय, तापमान उतरायला लागल्यावर वाफ्यात बीट, लेट्यूस, मटार, पालक आणि ब्रॉकली लावले आहेत. त्यांना पाणी घालायला धडका, गळका पाईप आणि टायमर व्हॉल्व्ह अशी योजनाही केली आहे.
व्हॉल्व्ह

या कुंडीत रोपटी दिसत नसली तरी आहेत.
गळका नळ

रोचना Mon, 21/09/2015 - 12:30

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लाल मुंग्या की काळ्या मुंग्या? आधी कुंड्यांभवती तिखट-हळद किंवा बोरिक पावडर घालून पाहिली का?

पानांवर बुरशी सारखी आहे, का किड्यांची अंडी आहेत? का पानांचाच तसा रंग बदललाय? नीट दिसत नाहीय. मुंग्यांच्या औषधामुळे एकूण झाडच अशक्त झाले असावे. थोडं कंपोस्ट टी दे. कंपोस्ट मधून खालूण निघणारा रस, नाहीतर वर्मीकंपोस्ट असलं तर त्याला श्रीखंडाच्या चक्क्यासारखा गोळा बांधून गुळाचा तुकडा घातलेल्या पाण्यात अर्धा बुडवून ठेव. दिवसातून दोनदा गोळ्याला पाण्यात फिरव (फॉर एरेशन). दोन दिवसांनी थोडे पाणी अधिक घालून ते फवारा म्हणून, आणि मुळाला पाणी म्हणून दे. प्रकृती कदाचित सुधारेल.

सोबत ३जी स्प्रे तयार कर - २५ ग्राम लसूण आणि आल्याची पेस्ट, आणि छटाकभर हिरव्या मिरच्या एकत्र पेस्ट करून १०० मि.लि. गोडंतेलात दोन आठवडे भिजवून ठेव. फवारा मारताना एक-दोन चमचे हे तेल थोडे भांड्यांच्या साबणात आणि लिटरभर कोमट पाण्यात मिसळून घे. हा स्प्रे मला नीम-तेलापेक्षाही चांगला वाटतो.

मिर्च्यांची फुलं सुरेख आहेत! मी जानेवारीत लावलेल्या मिर्चीला परवा पहिलं फूल आल, परवा!!! चार-पाच रोपं उपटून टाकली, हेच एक ठेवलं होतं. इतकं अशक्त दिसतंय, तरी एक फूल आलं, आता फळ धरतंय का बघायचंय.

आणि या आठवड्यात दोडकीच दोडकी! थोडं हाताने परागण केल्याने यश आले, पण पंचगव्याचे खत दिल्याने बरीच सुधारणा झाली. सध्या घरी पंचगव्य तयार करायचा प्रयोग चालू आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 25/10/2015 - 22:31

In reply to by रोचना

याबद्दल आणखी पुढे -

तपकिरी मुंग्या होत्या, पण चावायच्याही. इथे ऑस्टीनमध्ये या मुंग्यांचा उपद्रव फारच होतो. तिखट, हळद, दालचिनी वापरून काहीच फरक दिसला नाही म्हणून ते औषध वापरलं होतं.

शेवटी कंटाळून ही वांग्याची झाडं काढून टाकली. त्याला नियमितपणे पाणी घालणं सुरू होतंच. २५ दिवसांनंतर खोडाला पुन्हा पानं फुटून तीन कळ्याही दिसत आहेत. वांगी मिळतात का बघूया.

भोपळी मिरचीही बऱ्यापैकी मिळत्ये खायला.

रुची Mon, 21/09/2015 - 22:26

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे थंडी पडायला लागल्याने मी वांग्याचे एक रोप घरात आणले त्याच्यावरही अशीच पांढरी भुकटी दिसतेय आणि ग्रीनफ्लाईज आहेत पण मुंग्या दिसत नाहीयत. या मुंग्याच आहेत की ग्रीन फ्लाईजची अंडी? मिरची छान दिसतेय, ढबू मिरची की तिखट?

चिमणराव Sun, 20/09/2015 - 12:38

चाइनिज डिशेस गिह्राइकांस फार आवडतात.
"आम्हालाही आवडतात."-हॅाटेल मालक.
"???"
" मेलेल्या कोंबड्यापण जीवंत होतात त्यात."
"????"
"टेंपोतून शहरांत कोंबड्या आणताना काही मरतात त्या कोणी घेत नाही.चाइनिजवाले घेतात. आंबट चिंबट सॅास-मसाल्यात काही कळत नाही."

हाइटेक पाणी फवारे मस्तच.

रुची Mon, 21/09/2015 - 22:21

काल सगळ्या वाफ्यांतले मिळून तब्बल बारा किलो बटाटे उकरले! त्यात यूकॉन गोल्ड, यलो फिंगर्लिंग, रेड फिंगर्लिंग आणि चीफ्टन अशा वेगवेगळ्या जातींचे बटाटे आहेत. एकूणात पंधरावीस रोपे होती त्याचे यावर्षी सगळ्यात आलेले भरगोस पीक, आनंदी आनंद! सध्या वाळवत ठेवलेत, नंतर फोटो इथेच डकवेन.

नंदन Tue, 22/09/2015 - 09:24

In reply to by रुची

काल सगळ्या वाफ्यांतले मिळून तब्बल बारा किलो बटाटे उकरले!

'आयरिश स्ट्यू'ची बेगमी? ;)

अवांतर - शीर्षकातली हिनीची कविता येथे.

रुची Tue, 22/09/2015 - 09:37

In reply to by नंदन

आठवण दिल्याबद्दल थँक्यू.
स्ट्यूसाठी आता थोड्या बकर्या पाळल्या की झाले. घरचे बटाटे, घरचा पाव आणि घरची बकरी :-)!

रुची Tue, 22/09/2015 - 09:47

In reply to by रुची

वाळत असलेले बटाटे,
067

इतरांना देण्याइतक्या भाज्या बागेत पिकवता येतील असे कधी वाटले नव्हते पण बाहेरगावी गेल्यावर बागेला पाणी देणार्या शेजार्याला ही बास्केट देताना आनंद वाटला.

063

आणि हा तो लसणाचा भलामोठ्ठा गड्डा! चिमण्या हातात आहे म्हणून जरा जास्तीच मोठा दिसतोय पण तरी तीन-साडेतीन इंच व्यासाचा होता.
039

वेदश्री Tue, 27/10/2015 - 20:08

In reply to by रुची

लसूण आणि बटाटे लावण्यासाठी प्रेरणा मिळाली या फोटोंमधून. लसणाची पाकळी पण मोठी असेलसे दिसतेय. लै म्हणजे लैच भारी!

ऋषिकेश Tue, 22/09/2015 - 09:07

गेल्या विकांताला चवळी पेरलेली आज त्यातून कोंब फुटले.
बियांच्या द्वीदलातून मिटलेली पाने डोकावताहेत (द्वीदलेही झडलेली नाहित अजून). ते बघून मुलगी इतकी प्रचंड खूश झालीये. तिच्यासाठी "काय हा चमत्कार!" छाप प्रसंग आहे आणि घरातील प्रत्येकाला हाताला धरून नेऊन "ते बघ कॅटरपीलरसारखं बीला पंख येताहेत" म्हणून सांगत सुटलीये! =))

पिवळा डांबिस Tue, 22/09/2015 - 11:06

In reply to by ऋषिकेश

आणि घरातील प्रत्येकाला हाताला धरून नेऊन "ते बघ कॅटरपीलरसारखं बीला पंख येताहेत" म्हणून सांगत सुटलीये!

ऋषी, फोटो काढून ठेव, ट्रस्ट मी!
उद्या ती नवर्‍याच्या घरी जायला निघेल ना, तेंव्हा म्हणशील की पिडांकाकांचं सजेशन बरोबर होतं म्हणून!!!

पिवळा डांबिस Thu, 01/10/2015 - 23:34

बटाट्याची रोपं वाढत असतांना थोडा शेंडा वर ठेऊन बाकीचं रोप मातीने झाकायचं असं कळल्यामुळे तसं करत आहे.
पण किती उंचीपर्यंत माती घालत रहायची?
सध्या मातीची पातळी मुळापासून १-१.५ फूट उंच झाली आहे....
बटाटा पेशालिष्टांनी कृपया मार्गदर्शन करावे...

रुची Fri, 02/10/2015 - 01:00

In reply to by पिवळा डांबिस

पातळी मुळांपासून कितीही उंच करत गेलात तरी चालेल. जसे-जसे खोडावर माती घालत जाऊ तसे तसे त्याला मुळे फुटून अधिकाधिक बटाटे येत रहातील अशी कल्पना आहे. झाड सुकायला लागले की मग थांबायला हरकत नाही. इथे पाहिलंत तर कल्पना येईल. नुकतेच बारा किलो बटाटे काढल्याने 'बटाटा पेशालिष्ट' म्हणून कॉलर ताठ करून घेते :-)
..आणि हो, फोटो कुठे आहे?

पिवळा डांबिस Fri, 02/10/2015 - 23:57

In reply to by रुची

आता माती आणणे आले. मल्च माझ्या बागेतच भरपूर तयार होतो तेंव्हा त्याची चिंता नाही.

नुकतेच बारा किलो बटाटे काढल्याने 'बटाटा पेशालिष्ट' म्हणून कॉलर ताठ करून घेते

ऑफकोर्स, ऑफकोर्स!
तुम्ही मान्यता देऊन आमच्या किताबाचीच शान वाढवलीत याबद्दल बागकामप्रमी ऐसीकरांतर्फे मी तुमचे आभार मानतो!
:)

..आणि हो, फोटो कुठे आहे?

अजून ते ल्हान आहेत हो!! अडीच-तीन फुटांच्या वर गेले की फोटो टाकतो...

वेदश्री Tue, 27/10/2015 - 19:56

In reply to by पिवळा डांबिस

आता माती आणणे आले. मल्च माझ्या बागेतच भरपूर तयार होतो तेंव्हा त्याची चिंता नाही.

मल्च भरपूर असेल तर त्यापासून गांङूळखत किंवा कंपोस्टखत नाही का करत तुम्ही? अगदी पोषक माती तयार होते. माती आणण्याबद्दल म्हणालात म्हणून विचारतेय. अर्थात तुमच्याकडच्या तापमानात हे खतांचं प्रकरण कितपत शक्य होईल ह्याची मला कल्पना नाही पण सहज मनात आलं म्हणून विचारतेय.

चिमणराव Sat, 03/10/2015 - 06:07

बटाटे येतात म्हणजे १५ ते २५ डिग्र सें तापमान तीन चार महिने मिळतंय बहुतेक.केशराचे कंद लावून पहा प्रयोग म्हणून.केशरसम्राट व्हा.

adam Sun, 11/10/2015 - 20:04

माझं माळीकामातलं कौशल्य शून्य. त्यामुळे तुम्हा लोकांइतकं टेरेस गार्डनिंग वगैरे जन्मात केलेलं नाही. पण सध्या तुमची मदत लागणारे असं दिसतं.
.
.
आमच्या टेरेसमध्ये पूर्वी फार कबुतरं यायची; आम्ही नियमित हाकलत असू(फार लाडावले तर कबुतरं थेट घरात घुसतात,नि वैताग आणतात. हीच काय ती तक्रार, ते गपगुमान बाहेर बसले तर आमची काहिच तक्रार नाही.) मागच्या काही दिवसात काही दिवसात का कोण जाणे कबुतरं येणं (सुदैवानं) कमी झालय.
त्याचवेळी पूर्वीपेक्षा जरा जास्तच चिमण्या येउन बसतात. आणि चिमणी इतक्याच बारकुशा आकाराचा अजून एक काळा पक्षीही अधून मधून दिसतो.
कधी मधी कावळा येउन बसतो. एखाद दोन वेळेसच लांबसडक पिसार्‍याचा एक कावळ्याइतक्याच आकारमानाचा पक्षीही दोन घटका बसून गेला. (बहुतेक भारद्वाज असावा, असा अंदाज, दूरुनच पाहिला.)
.
.
एरव्ही पार्किंगमध्ये किम्वा खालच्या मजल्यांवर चिमणी नावाचा हा जो पक्षी दिसायचा तो आता वरती टेरसजवळही दिसतो; खूपदा पार वेगळ्या दिशेला -- स्वयंपाकघराच्या खिडकीतूनही दिसतो.
.
.
टेरेसमध्ये एखादा कोनाडा बांधून ठेवला, तर ह्या चिमण्या त्यात घरोबा करुन मस्त घरटं बांधतील का, असा विचार डोक्यात आला.
किंवा जर कुठे चिमणीचं घरटंच मिळालं तयार, तेच आणून व्यवस्थित ठेवलं तर ?
माझ्या एका मित्राला त्याच्या एका ग्रामीण विद्यार्थ्यानं कुठून त्यांच्या इथे चिमणीनं बनवलेलं घरटं आणून दिलं.
त्या विद्यार्थ्याकडची चिमणी ते घरटं सोडून गेली होती; तर त्यानं आपल्या शिक्षकाला सहज म्हणून ते दिलं.
माझ्या मित्रानं त्याच्या अंगणात ते आपलं असच ठेवलं होतं, आणि त्यात खरोखर काही दिवसांनी येउन चिमण्या रहायला लागल्या.
म्हणजे त्या चिमण्यांना त्यांचा नैसर्गिक आवास आयता तयार मिळाला, म्हणून त्या येउन राहिल्या.
.
.
तर माझ्या डोक्यात कल्पना असलेली कल्पना --
असं नैसर्गिक घरटं कुठून मिळेल का, जे स्वतः चिमणी सोडून गेली असेल; किंवा चिमणीच्या नैसर्गिक घरट्यासारखच बनवण्याचं कौशल्य कुणा व्यक्तीकडे असेल; तर त्याच्याकडून ते खरेदी करता येइल का ?
नसेल तर इतर काय पर्याय आहेत ?
.
.
मी काही नर्सरीमध्ये जाउन चौकशी करुन आलो. तिथे चिमण्यांची घरं म्हणून काही मानवी कौलारु घराच्या आकाराचे लाकडी खोके होते.
bird nestbox असं गूगलमध्ये शोधल्यावर जे दिसेल, अगदि तस्सेच हे खोके होते.
नमुना/उदाहरण म्हणून ह्या लिंका पाहता याव्यात :-

https://www.google.co.in/search?q=bird+nest+box&biw=1366&bih=667&tbm=is…
.
.
http://www.google.co.in/imgres?imgurl=http://shopping.rspb.org.uk/media…
.
.
ह्या घरट्यांत चिमण्या येण्याची शक्यता असते का ?
कारण त्यातली छिद्रं/एण्ट्रन्स हा भलताच लहान वाटला. त्यात चिमण्य मावतील ?
त्या छिद्रांचा आकार म्हणजे टेबल टेनिसच्या चेंडूच्या व्यासाइतका वाटला.
.
.
कुणी हे वापरुन पाहिलेत का ?
किंवा ह्याला अजून काही पर्याय आहेत का ?
चिमण्या त्यात यायचे चान्सेस किती असतात ?

.शुचि. Sun, 11/10/2015 - 20:12

In reply to by adam

टेरेसमध्ये एखादा कोनाडा बांधून ठेवला, तर ह्या चिमण्या त्यात घरोबा करुन मस्त घरटं बांधतील का, असा विचार डोक्यात आला.

:) केवढी गोड कल्पना आहे
.
अरे तो व्यास कमी असला ना तरी चिमण्या अंग बारीक करुन व्यवस्थित ये जा करतील असा कयास.
.
पण त्या घरटं करायला बिचकतील हाच माझा तरी कयास आहे. शिवाय ते घरटं दोघांनी काट्क्या गोळा करुन बांधणं हाच मुळी त्यांच्या कोर्ट्शिप चा भाग असेल तर त्या रेडीमेड घरटं घेणार नाहीत असे वाटते.

पिवळा डांबिस Thu, 15/10/2015 - 01:42

In reply to by adam

माळ्यांनो , घरट्याचं काय करु ?

मनोबा, हे म्हणजे बस ड्रायव्हरला विमान कसं उडवू असं विचारण्यापैकी आहे!!! :)

आमच्याकडे असं डेसिग्नेटेड घरटं वगैरे काही नाही बाबा. झाडं आहेत त्यावर पक्षी घरटी करतात, दरवर्षी अंडी घालून पिलं वाढवतात.
झाडांवरच्या काही फळांवर टोचे मारतात पण ते चालायचंच!!

चिमण्या त्यात यायचे चान्सेस किती असतात ?

तरूण वयात असतात थोडेफार.
नंतर मग हळूहळू कमी होतात! त्या चिमण्याही म्हातार्‍या होत जातात ना!!
कळेल तुला!!
;)

चिमणराव Mon, 12/10/2015 - 03:43

मी चिमण्यांच्या घरट्यांवर बरेच प्रयोग केले आहेत.एके वर्षी पाच खिडक्यांवर पाच घरटी होती आणि जिन्यात दोन.
warning: शेवटी ती सर्व काढावी लागली कारण पहाटे सकाळी साडेपाचपासून असह्य चिवचिवाट करतात.सुरक्षित घरट्याच्या जागेसाठी नवीन जोडपी येऊन भांडतात आणि त्यांना हुसकावण्यासाठी चिवचिवाट.मैना साळुंक्या कावळे येऊन घरटं फोडता येईल का याची चाचपणी करतात तेव्हा कलकलाट होते

कबुतरं फार उच्छाद मांडतात .बाल्कनीत एक जोडी येऊन फिशटँकात आंघोळ करायची,कुंडीतल्या झाडात अंडी घालायची. दुसय्रा जोड्या जागेसाठी भांडायच्या.आता माशाचं जाळं लावल्यापासून मुक्ती आहे.

चिमणराव Tue, 13/10/2015 - 08:05

बाल्कनीत ऊन मिळेल अशा सर्व जागा झाडांच्या कु़ंड्यांनी भरून टाकल्या परंतू
दरवाजा उघडतो ती जागा वापरता येत नव्हती.तेवढी उन्हाची जागा वाया जाते त्याचे काय करावे याचा विचार करताना शेतांमध्ये कुंपणासारखेच दिसणारे बाभळीच्या काटेरी फांद्यांचे फाटक आठवले.आणि तसे एक लाकडी फाटक बनवले. दहा कुंड्या राहिल्या त्यावर.खाली चाके लावली आहेत.

१)

२)

पिवळा डांबिस Thu, 15/10/2015 - 01:31

In reply to by चिमणराव

आयडिया छानच आहे. पण त्या खालच्या दोन खणातल्या पाच कुंड्यांमध्ये एकाच प्रकारची वनस्पती लावलीये का?
असेल तर ती कुठली बुवा?

वेदश्री Sat, 24/10/2015 - 07:47

हा माझा या साईटवरचा पहिलाच प्रतिसाद आहे आणि तोही माझ्या अत्यंत आवडीच्या विषयाच्या धाग्यावर.

आमच्याकडे भरपूर जागा, पाण्याचं दुर्भिक्ष्य आणि भरपूर ऊन असल्याने आम्ही वृक्ष प्रकारातल्या फळफुलाच्या रोपांनाच बागेतल्या जमिनीत लावले आहे. त्यांना पहिली ३-४ वर्षे नियमित पाणी टाकले तर पुढे पाण्याच्या दुर्भिक्षामुळे कमी पाणी टाकले गेले तरी चालते.

सद्ध्या आमच्या बागेत पेरूला १५-२० फुले आली आहेत. एक छोटेसे सीताफळ आले आहे. लिंबं तर भरपूर आणि मोठाली आहेत. राय आवळ्यांचा बहर संपत आलाय आणि त्याची आता पानगळ सुरू झाली आहे. कडीपत्ता आता छाटावा लागेल पण इत्तक्या कडीपत्त्याचे करायचे काय हा प्रश्नच झाला आहे. पांढरे,लाल,पिवळे,गुलाबी अशी जास्वंदाची फुले भरपूर निघतात पण थोड्याच दिवसांत पाटीभर फुले निघायला लागतील.स्वस्तिक(म्हणजेच चांदणीपाट), तगर आणि पांढरा, पिवळा चाफा पण फुले देत असतात. चिकूच्या झाडाला फुले येतात, छोटे-छोटे चिकूही येतात पण ते मोठे का होत नाहीत हा पेच अजून सुटलेला नाही. बेलाचे रोप आता ५ वर्षाचे झाले आहे तरीही त्याची इतर झाडांच्या मानाने वाढ खूपच हळू होते आहे. पारिजातकाचे झाड बाहेर अंगणात फुलांचे सडे टाकायला लागले आहे. अंजीर, मोठे आवळे, कवठ, जांभूळ, निळी तगर आणि अनंताचे झाड अजून खूपच छोटे आहे कारण ते याच पावसाळ्यात लावलेत. कमळं आहेत दोन रंगांची.. पांढरा आणि पिवळा. कमळाच्या टँक्समध्ये मौली मास्यांच्या फोजा आहेत. मास्यांची मौज म्हणजे सुरूवातीला आम्ही फक्त २ जोड्या आणल्या होत्या पांढर्‍या स्वच्छ रंगाच्या आणि त्यांच्यापासून आता पांढरीच नाही तर करडी, काळी, कब्री, सोनेरी झाक असलेली अशी सतराशे साठ रंगांची प्रजा गुण्यागोविंदाने नांदते आहे. :) फोटो टाकायला खूप आवडेल पण इथे कसे टाकायचे ते कळले की टाकेनच (बाकी माझी फोटोग्राफी कामचलाऊ स्वरूपाची आहे.).

वेदश्री Sat, 24/10/2015 - 07:49

In reply to by वेदश्री

एक प्रतिसाद टाकला नाही तर तब्बल एक अख्खं पुण्य माझ्या पदरात पडलं! अगदीच उच्च!!!

रुची Sat, 24/10/2015 - 21:03

In reply to by वेदश्री

ऐसीवर स्वागत! :-)
बागेचे वर्णन वाटून मस्तं मस्तं वाटलं, आता फोटो हवेतच. स्वतःच्या बागेत पिकवलेल्या गोष्टींचं काय करायचं ही किती आनंददायी समस्या असते नाही? लिंबाचे लोणचे, खारवलेली लिंबे, लेमन कर्ड, कडिलिंबाची चटणी, शेजार्यांना भेटी...किती किती पर्याय आहेत!
इथे फोटो कसे चढवावेत हा धागा वाचलात का?

तुम्ही इतरत्र फोटो असे लावता ते सांगा म्हणजे त्याप्रमाणे सांगता येईल. तुम्ही फ्लिकर वापरत असाल तर मी मदत करू शकेन.

वेदश्री Tue, 27/10/2015 - 20:03

In reply to by रुची

धन्यवाद रुची. इथे इतकी उत्साही बागकामप्रेमी मंडळी पाहून घबाड मिळाल्यासारखा आनंद झाला मला.

फोटोंचे म्हणायचे तर मी वनड्राईव्ह वापरते आणि त्यातल्या फोटोंचे अपलोडबद्दल काही वाकडे दिसते त्यामुळे इथे ते दिसतील असे नाही करता येतेय पण गार्डन फोल्डरच्या लिंकवर क्लिक करून फोटो बघता येऊ शकतील आत्तापुरते.

आजवरच्या बागकामावरच्या धाग्यांमधल्या प्रतिसादांवर जर मला काही लिहायचे वा विचारायचे असेल तर ते कसे करता येईल हे कोणी सांगू शकेल का?

(इंटरनेटच बंद होतं म्हणून हे सगळं लिहायचं राहून गेलं इतके दिवस.. :( )

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 27/10/2015 - 21:01

In reply to by वेदश्री

हा तुझा पहिला फोटो.
रायावळे

वनड्राईव्हवरचा फोटो उघडला, डाव्या वरच्या कोपऱ्यातलं तिसरं बटण View Original हे बटण दाबून जी यूआरेल मिळाली ती इथे वापरली.

आजवरच्या बागकामावरच्या धाग्यांमधल्या प्रतिसादांवर जर मला काही लिहायचे वा विचारायचे असेल तर ते कसे करता येईल हे कोणी सांगू शकेल का?

जुन्या धाग्यांवरच प्रतिसादातून प्रश्न विचारता येतील किंवा नवीन धाग्यात नवीन प्रतिसादात प्रश्न विचारले तर ते वर राहील. किंवा सरळ नवाच धागा सुरू केलास तरी चालेल.

पिवळा डांबिस Tue, 27/10/2015 - 21:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे, हे रायआवळे ना?
माझ्या एका मावशीच्या परसात जोगेश्वरीला रायआवळ्याचं झाड होतं. लहानपणी त्याचे किती आवळे खाल्ले असतील याची गणती नाही!!!
नाईस! एखाद्या जुन्या मित्राला बर्‍याच वर्षांनी बघावं तसं फोटो बघितल्यावर वाटलं!!!

चिमणराव Sat, 24/10/2015 - 21:38

पिडां ,प्रतिसाद वाचलाच नव्हता.अगदी साधं झाड आहे.कमी ऊन चालतंय असं उद्या स्पष्ट फोटो टाकतो.रंगाचे डबे आणि त्याचेच झाकण खाली पाणी वाहू नये म्हणून वापरले आहेत .काही निरूपयोगी लाकडे यातून हा दरवाजा मीच केला आहे.खालच्या चाइना कुंड्यांतही तेच डबे आहेत परंतू या कुंड्यांना वजन फार आहे.

वेदश्री यांच्या फोटोंच्या प्रतिक्षेत.

&ltimg src="इथे डाइरेक्ट लिंक पेस्ट करा" width="550"/&gt

चिमणराव Sat, 24/10/2015 - 21:44

&lt. आणि &gt येथे >>>असले कंस वापरून template बनवा आणि इथे लिंकपेस्ट करा या जागी लिंक टाका फोटो येतो
फोटो शेअरिंग साइट
postimg dot org वापरा आणि आलेल्या फोटोखालची दुसरी direct link कॅापी करा.

चिमणराव Sun, 25/10/2015 - 07:39

हे ते झाड. फार काळजी घ्यावी लागत नाही आणि बागेच्या कडेला लावल्यास लगेच व्यापून टाकते.

वरच्या भागात आता छोटे लाल इक्झोरा ठेवले आहेत.

वेदश्री Tue, 27/10/2015 - 20:01

In reply to by चिमणराव

हिरव्या बॅकग्राऊंडवर लाल-पांढर्‍या चांदण्या काय सुरेख दिसतायत.. झक्कास!

ताटलीत माती, मातीत लाल पिशवी/पोतं.. ही अशी मांडणी करण्यामागे काही विशेष हेतू आहे का?

चिमणराव Thu, 29/10/2015 - 13:19

In reply to by वेदश्री

ते संपूर्ण प्रकरण रिसाइल प्रयोग आहे.ताटली: जुन्या अक्रीलिक डिश.पिशवी/पोतं : नॅानकॅाटन कापडाची पिशवीतून पाण्याचा निचरा होतो.मातीच्या कुंडीसारखे फु्टण्याची भीती नाही जड नाही.जास्तीचे पाणी खाली आल्यावर ते लोकरीच्या जुन्या तुकड्यांत शोषून धरले जाते आणि दिवसभरात वापरले जाते.हे सर्व एका लाकडी ( वाया गेलेल्या ) दरवाजासारख्या फ्रेमवर आहे जो बाल्कनीच्या दरवाजापुढे येतो आणि फाटकासारखा फिरवून ऊन मिळेल असा ठेवता येतो.

वेदश्री Fri, 30/10/2015 - 08:42

In reply to by चिमणराव

रिसायकल प्रोजेक्ट खूपच छान झाला आहे तुमचा. बाकी ती पिशवी सततच्या पाण्यामुळे सडू नये यासाठीही तुम्ही काही केलेय का? लोकरीचे तुकडे त्या लाल पिशवीच्या आत टाकलेले आहेत बहुतेक म्हणून दिसत नसावेत. फाटकासारख्या दरवाजाची एकूण कल्पनाच खूप सुरेख आहे. खूपच आवडली.

इथल्या धाग्यांवर बघून बघून मलाही आता बटाटे, लसूण, टोमॅटो वगैरे लावायची सुरसुरी आली आहे. त्यासाठी माळ्यावरून तुटलेली बास्केट, तुटलेलं रॅक आणि जुना खराब झालेला गार्डनहोज काढून घेतला आहे. आता गार्डनहोजपासून कुंड्या बनवणे चालू आहे. आतापर्यंतची प्रगती -

चिमणराव Fri, 30/10/2015 - 18:06

In reply to by वेदश्री

नाही कुजत कारण पॅालिएस्टरचे जुने पडदे वापरले आहेत.
बाकी प्लास्टीकचे डबे ,बाटल्या फारच झोपडपट्टी दिसतात आणि उन लागले की चुरा होतो.रंगाचे डबे जे मी वापरले आहेत ते त्या चायना कुंडीत ठेवतो.अथवा मनीप्लांट असल्याने कडक उन्हात नसतात.

पिवळा डांबिस Mon, 26/10/2015 - 22:21

बटाट्यांवर माती टाकून टाकून कंटेनर भरले. आता अजून माती टाकणं शक्य नाही.
आता रूचीच्या आशीर्वादाने काय येतील ते बटाटे येतील...
बाकी, पेअरच्या झाडावर काही शेवटचे पेअर शिल्लक आहेत. तीच गोष्ट सफरचदांची.
हवायन पेरूने यंदा बंपर बार दिला. कंटाळा येईपर्यंत खाल्ले.
पॅशनफ्रूटला अजूनही नवीन फुलं फळं येताहेत.
माय्रर लेमन हिरवे आहेत, ते नेहमी जानेवारी-फेब्रुवारीच्या सुमाराला पिकतात.
टोमॅटो, वांग्यांना बहुदा शेवटची फळं लागलेली आहेत. अजून काही नवीन येतीलसं वाटत नाही. आता ही मोठी झाली की उतरवणार...
मिरच्या मात्र अजूनही नवीन येताहेत. माझी मिरचीची झाडं पेरेनियल होणार की काय अशी काळजी वाटतेय!! :)

वेदश्री Tue, 27/10/2015 - 19:46

In reply to by पिवळा डांबिस

पिडां, फोटो टाका ना प्लीज.

बटाट्यांसाठी कोणते कंटेनर वापरलेत तुम्ही? रुचीने टाकलेले बटाट्यांचे फोटो पाहून मला कधी एकदा लावेन असे झाले आहे. किती लावलेत तुम्ही? म्हणजे एका बटाट्याचे दोन भाग करून तेवढेच की ४-५ बटाट्यांचे दोन भाग करून तसे लावलेत?

पेरूंसाठी खास अशी काही काळजी घेता का तुम्ही? घेत असाल तर सांगाल का?

मिरचीची झाडं?!!! कोणत्या प्रकारची मिरची आहे ही नक्की? कौनसी चक्कीकी मिट्टी खिलाई मिरचीको हमेभी बताओ प्लीज. :)

पिवळा डांबिस Tue, 27/10/2015 - 21:45

In reply to by वेदश्री

अरे देवा! ह्या सात धाग्यांवर अनेक फोटो आहेत की माझ्या बागेचे!
(ए अदिती, त्या आधीच्या धाग्यांच्या लिंका इथे दे ना! मग हिला सर्वांचेच फोटो बघता येतील)

बटाट्यांसाठी कोणते कंटेनर वापरलेत तुम्ही? रुचीने टाकलेले बटाट्यांचे फोटो पाहून मला कधी एकदा लावेन असे झाले आहे. किती लावलेत तुम्ही? म्हणजे एका बटाट्याचे दोन भाग करून तेवढेच की ४-५ बटाट्यांचे दोन भाग करून तसे लावलेत?

ते शीक्रेट आहे. बटाटे उपसायला घेतले की फोटो टाकीन. :) पण उष्णता धरून न ठेवणारे असे कुठलेही कंटेनर चालावेत. मी चार कंटेनर वापरलेत. एका कंटेनरमध्ये एकच बटाटा अख्खा लावला. पण त्याला अनेक कोंब आल्याने प्रत्येकातून ३-४ झाडं आली आहेत.
बाकी बटाट्याविषयी अधिक माहिती रूचीला विचार. ते ऐसी अक्षरेवरचं 'बटाटारत्न' आहे!! ;)

पेरूंसाठी खास अशी काही काळजी घेता का तुम्ही? घेत असाल तर सांगाल का?

काही नाही, फक्त वर्षातून दोनदा खत देतो.

मिरचीची झाडं?!!! कोणत्या प्रकारची मिरची आहे ही नक्की? कौनसी चक्कीकी मिट्टी खिलाई मिरचीको हमेभी बताओ प्लीज.

माझ्या एका चिनी मित्राने ही थाय मिरची म्हणून मला दिली होती. पण ही लवंगी मिरचीसारखी छोटी नसून ~२-३ इंच लांब आहे. पण विलक्षण तिखट आहे. आणि स्पेशल मिट्टी वगैरे काही लाड केले नाहीत.

वेदश्री Tue, 27/10/2015 - 22:04

In reply to by पिवळा डांबिस

पहिला प्रतिसाद लिहायच्या आधी बागकामावरचे इथले सगळे धागे वाचलेत मी. अर्थात त्यात तुमच्याकडच्या फळझाडांचे फोटो पाहिल्याचं आठवत नाही. परत एकदा सगळे धागे बघते त्यात आहे म्हणताय तर.

मला तुमच्याकडे लवंगी मिरची असेल असं वाटलं होतं जिचं 'झाड' होत नाही. वेगळ्या जातीची मिरची असू शकेल असं वाटलं नाही त्यामुळे गफलत झाली. :)

पिवळा डांबिस Tue, 27/10/2015 - 22:07

In reply to by वेदश्री

मला वाट्तं की धागा नंबर ५ किंवा ६ मध्ये फळझाडांचे फोटो आहेत.

मिरच्यांची झाडं म्हणजे वृक्ष झाले असं म्हणायचं नव्हतं मला, सॉरी. साधारण २-२|| फूट उंची आहे. अगदीच छोटी रोपं नाहीत इतकंच.

.शुचि. Tue, 27/10/2015 - 22:10

In reply to by पिवळा डांबिस

थाइ चिली मिळते इथे. तिखट असते. बाकी इतर त्या ढब्ब्या मिर्चांना मेदच जास्त, चव नाही की ढव नाही.

वेदश्री Wed, 28/10/2015 - 10:45

धन्यवाद गं अदिती (संहिता?). जमलं आता फोटो टाकायला. :)

रायआवळे

पांढरा चाफा

लिंबू

वालाच्या शेंगांचे वेल

सीताफळ

कडीपत्ता

कुंदा

पेरू

फुलांच्या काही सजावटी

वेदश्री Wed, 28/10/2015 - 13:45

पारिजातक - पारिजातकाला फुले यायला लागली की अक्षरशः पाटीभर निघतात रोज. त्यांचे हार करून देवाला वहावी किंवा सजावट करावी म्हटलं तर तासादोतासात कोमेजूनदेखील जातात. कितीतरी दिवस या फुलांचे करावे तरी काय हा पेच सुटत नसल्याने गोळा करून सरळ गांडूळ खतातच टाकली जात होती. एकदा कोणी सांगितले की फुलाच्या केशरी दांड्या काढून सुकवून त्यांची पूड केल्यास देवासाठी सुगंधी गंध सुरेख होते. मग काय.. काम वेळखाऊ असले तरी भरपूर आनंद देणारे ठरले. गेल्या हंगामातल्या फुलांपासून तयार झालेले सुगंधी गंध.. अगदी सुरेख होते याची गंधगोळी. :)

तुळस - तुळशीच्या सुकवलेल्या मंजिर्‍या, लिंबूरस शिंपडून सुकवून भाजलेली बडीशोप, थोडासा ओवा आणि किंचित शेंदेलोण असे सारे मिक्सरमधून फिरवून घेऊन औषधी आणि चविष्ट मुखवास तयार करतो. ही मंजिर्‍यांची पूड..

जास्वंद - जास्वंदीचे फूल आपल्या केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असते हे नेहमी वाचून माहिती होते पण ताजे फूल वापरायचा प्रयत्न केल्यावर ते अत्यंत चिकट प्रकरण असते हे कळले. त्यामुळे आता निर्माल्यातल्या वा सजावटीत कोमेजलेल्या जास्वंद फुलांची पाने आणि पुंकेसर वेगळे करून सुकवतो आणि त्यांची पूड करून ठेवतो. जसजशी लागेल तसतशी वापरतो.
सुकवण्या आधीची तयारी

तयार पूड

लिंबाचे तर जवळजवळ ज्ञात असलेले सगळे प्रकार आतापर्यंत करून झालेत. खारवलेले लिंबू, उपवासाचं लोणचं, गोड लोणचं, तिखट लोणचं, तयार सरबत. नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि शेजारीपाजारी अशा सर्वांना देऊनही चिक्कार शिल्लक राहिली तेव्हा मग ती विकावीच लागली... आतापर्यंत ५०-६० किलो सहज विकली असतील.

कडीपत्त्याचे रोप आता ६-७ वर्षाचा वृक्षच झाले आहे. त्याची कधी कटाई अशी केलीच नाही (इथे बागकामप्रेमीच्या एका धाग्यावर होता बा तो व्हिडिओ..रोप झुपकेदार व्हावे म्हणूनसाठीचा) पण कोणी कधी मागितला, कोणी पाहुणे/नातेवाईक घरी आले किंवा आम्हालाच वापरायला हवा असला तर चालूचालू फांदीच काढून घेऊन वापरला इतकेच. इथे कटाईचा व्हिडिओ पाहिल्यावर कळले की आम्ही अजाणतेपणी जी कटाई करत होतो कडीपत्त्याची ती त्या झाडासाठी चुकीची होती ते. कडीपत्त्याच्या मुळांमधून पावसाळ्यात आपसूक उगवणार्‍या रोपांची काय ती सोडली तर कोवळी लुसलुशीत पानं मुख्य झाडावर अशी दिसतच नाहीत ती कदाचित त्यामुळेच की काय असे वाटते आहे.. कटाई योग्यच केली पाहिजे आता शेंड्यांची. तो कडीपत्ता सुकवून त्याचीही पूड करून मसाल्यात/चटणीत वापरावा असे काहीसे घाटते आहे मनात.

बागेत काम करताना अंगमेहेनत झाली तरी त्याहून कैकपटीने आनंद मिळतो. सर्वात जास्त आनंद मिळतो तो बागकाम करताना घामाने डबडबले असताना वार्‍याची हलकीशी थंडगार झुळूक येते तेव्हा. मला कायम वाटते की बागेतली झाडंवेली ज्याप्रकारे आमच्यावर अलोट प्रेमाचा वर्षाव करतात त्यामानाने त्यांची आमच्याकडून कसलीच अपेक्षा नसते. कधी उन्हाळ्याच्या दिवसांत बरं नाही म्हणून पाणी टाकायला जमलं नाही.. तर इवलाली रोपंदेखील उभ्या उभ्या जळून जातील पण आमच्याकडे कसली तक्रार वा मागणी म्हणून करणार नाहीत. कधीही मन अशांत झालं तर बागेत जाऊन बसायचं बस्स.. मन अगदी निवून जातं. रायआवळ्याची पानगळ सुरू झालीय त्यामुळे बाग झाडताना आता थोडंसं झाडून होत नाही तर झाडलेल्या जागेवर किंवा कधीकधी तर माझ्या डोक्यावरच टपली मारल्यागत आवळ्याची काडी किंवा पान पडते.. दोस्त असल्यागत थट्टाच करतोय तो आवळा माझी असंच वाटतं मला. :) केवळ भरभरून देणंच माहिती असलेल्या या बागेमुळे आमच्याइतके सुखी आम्हीच असं कायम वाटतं मला.

मेघना भुस्कुटे Wed, 28/10/2015 - 14:43

In reply to by वेदश्री

फारच इंट्रेष्टिंग माहिती आणि फोटो. आणि हे फक्त या एकाच प्रतिसादाबद्दल नाही हां! अजून कोणकोणत्या विषयांत रस आहे तुम्हांला?! लिहीत राहा, इथे मनापासून स्वागत. :)

वेदश्री Wed, 28/10/2015 - 16:21

In reply to by मेघना भुस्कुटे

धन्यवाद मेघना! तुम्हाला बागेची हौस असेल तर तुम्हीही सांगा ना तुमचे अनुभव. नविन काहितरी शिकायला मिळेल.

आमची बाग आणि लायब्ररी ह्या माझ्या विशेष आवडीच्या जागा आहेत आणि त्यानंतरच्या क्रमाने कॉम्प्युटर. दोरा, लोकर, मायक्रम, मोती वगैरेंच्या विणकामात रस आहे. हे कमी पडले तर प्लार्न, जुन्या साड्यांपासून काढलेल्या पट्ट्या, बागेतले होजपाईप वगैरे घेऊन काहीबाही करायचीही हौस आहे. साफसफाई आणि टापटीपीचा सोसेल तितका उपद्व्यापही करत असते. किती सांगू आणि किती नको असे झाले आहे पण या धाग्यावर इतकेच अवांतर अती झालेय त्यामुळे आवरते घेते आता. लिहायलाही आवडतेच त्यामुळे लिहीत राहीन. :)

वेदश्री Wed, 28/10/2015 - 17:47

In reply to by मेघना भुस्कुटे

्पूर्वी मिपा आणि पुविवर एक वेदश्री होत्या. त्या तुम्हीच काय?

सीतागौरीसत्यभामा... मी 'आहे'ची 'होती' कधी झाले?!!! माझ्या माहितीतल्या कुठल्याही मराठी साईटवर 'वेदश्री' असली तर ती अजूनतरी मीच आहे. अष्टमातल्या शनीमुळे अजून 'आहे'ची 'होती' व्हायला मला अंमळ वेळ आहे. ;-)

मेघना भुस्कुटे Wed, 28/10/2015 - 17:49

In reply to by वेदश्री

वोक्के!
बादवे, मी काही बागकाम(फिगकाम!) करत नाही. मी फक्त बागकामावरचे धागे चवीचवीनं वाचते. :ड

पिवळा डांबिस Thu, 29/10/2015 - 23:18

In reply to by मेघना भुस्कुटे

'फिगकाम' असं खास करावं लागत नाही. एकदा झाड लावलं की ते आपोआप वाढतं.
आणि एके दिवशी फिग्ज येतात. :)
लई गुणी फळझाड!

पिवळा डांबिस Thu, 29/10/2015 - 23:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही अंजीराचं झाड लावलंयत का?

अर्थात! आम्ही ह्या धाग्यांवर स्वानुभवाशिवाय कधी बोलतो का?
-संतप्त इमोजी

वेदश्री Fri, 30/10/2015 - 08:14

In reply to by .शुचि.

शुचि, ’लाहौल बिना-कुवत’ नाही ते ’लाहौल विला कुव्वत’ किंवा अगदीच वरीजनल सांगायचं झालं तर हे वाक्य पूर्ण जसे आहे तसे म्हटल्यास ’ला हौल वा ला कुव्वता इल्ला बी अल्लाह’ असे आहे ते. यातले 'विला' या शब्दाचा 'बिना' शब्दाशी काहीही संबंध नाही.

ला - नाही (नायदर सारखे)
हौल - बदल
वा - आणि
ला - नाही (नॉर सारखे)
कुव्वता - कुवत
इल्ला - पण
बी - मार्फत
अल्लाह - अल्ला!

म्हणजेच खरीखुरी प्रगती ही केवळ सकारात्मक बदलातूनच होऊ शकते आणि आध्यात्मिक प्रगती करायची तर ती करायला सर्वात जास्त बदलाची जरूर असते. असा अमुलाग्र बदल हा केवळ आपल्याच कुवतीने होणे शक्य नाही तर तो फक्त अल्लामार्फतच होऊ शकतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 29/10/2015 - 23:44

In reply to by पिवळा डांबिस

संतप्त इमोजीकाका, काही तुच्छ प्रश्न आहेत. सवडीने आणि विस्तृत उत्तरं हवी आहेत.

अंजीराचं झाड कुठून आणलंत? सुरुवातीला कुंडीत लावून चालेल का? कोणत्या काळात लावावं? ते किती मोठं होतं? आजूबाजूला किती जागा सोडावी? आमच्या हवेत - अधिकतम तापमान ~ ४० से (१०५ फॅ), नीचतम तापमान - फ्रीजिंग अधूनमधून होतं, नीट वाढेल का? झाड फार मोठं वाढू द्यायचं नसेल, साधारण २० फुटांवर पसारा वाढू द्यायचा नसेल तर शक्य आहे का? इत्यादी इत्यादी.

सध्या आहे ते एक झाड कापून नवं लावायचा विचार आहे, झाड आहे तिथेच लावायचं का थोडं सरकवायचं - म्हणजे वाफ्याला जागा जास्त होईल, असे निर्णय घ्यायचे आहेत.

(सध्या इथे उत्तरं द्या. इतर कोणी इथे लिहित नसताना या प्रतिसादाचं कलम छाटून नव्या धाग्यात डकवून देईन.)

पिवळा डांबिस Fri, 30/10/2015 - 00:01

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अंजीराचं झाड कुठून आणलंत?

होम डेपो

सुरुवातीला कुंडीत लावून चालेल का?

हो

कोणत्या काळात लावावं?

फॉल

ते किती मोठं होतं?

कुंडीत लावलं तर ८-१० फूट, जमिनीत लावलं तर वाढेल तितकं

आजूबाजूला किती जागा सोडावी?

जमिनीत लावलं तर ८ फूट रेडियस. कुंडीत लावलं तर न्/अ

आमच्या हवेत - अधिकतम तापमान ~ ४० से (१०५ फॅ), नीचतम तापमान - फ्रीजिंग अधूनमधून होतं, नीट वाढेल का?

डोन्ट नो, तुमच्या नेबरहूडा नर्सरीमध्ये विचारा

झाड फार मोठं वाढू द्यायचं नसेल, साधारण २० फुटांवर पसारा वाढू द्यायचा नसेल तर शक्य आहे का? इत्यादी इत्यादी.

कुंडी आणि छाटाणी हे दोन उपाय आहेत.

सध्या आहे ते एक झाड कापून नवं लावायचा विचार आहे, झाड आहे तिथेच लावायचं का थोडं सरकवायचं - म्हणजे वाफ्याला जागा जास्त होईल, असे निर्णय घ्यायचे आहेत.

बेस्ट लक!!

पिवळा डांबिस Thu, 29/10/2015 - 23:38

In reply to by .शुचि.

उत्तर दिलं असतं पण पुन्हा 'काय तुमच्या कालिफोर्नियाची कवतिकं' म्हणशील!!!
तेंव्हा सध्या नुसतंच अवश्य जळा!!!
=))

.शुचि. Thu, 29/10/2015 - 23:44

In reply to by पिवळा डांबिस

पण पुन्हा 'काय तुमच्या कालिफोर्नियाची कवतिकं' म्हणशील!!!

तुम्हा पीत-दृष्टीयांना जिकडे तिकडे ते दुष्काळी राज्यच दिसतय तर? ;) काय ती कॅलिफोर्निअन लोकं .... पर्फेक्ट म्हणजे अगदी थोडही उणंदुणं नाही. आता सिलिकॉन आणि टीथ व्हाइटनर आणि प्लास्टिक सर्जरी, ऑर्थोडेन्टिस्ट्रीने अजुन काय होणार म्हणा :)

पिवळा डांबिस Thu, 29/10/2015 - 23:57

In reply to by .शुचि.

तुम्हा पीत-दृष्टीयांना जिकडे तिकडे ते दुष्काळी राज्यच दिसतय तर?

आम्हाला नाही, तुम्हाला!!
बाकी काही बोलता येत नाही म्हणून ते दुष्काळाचं वारंवार काढताय ना? मत्सर तरी किती करावा माणसाने!!!
बाकी द्राक्षाच्या व्हाईन्स अजूनही हिरव्या आहेत!!!
जळा!!

काय ती कॅलिफोर्निअन लोकं .... पर्फेक्ट म्हणजे अगदी थोडही उणंदुणं नाही. आता सिलिकॉन आणि टीथ व्हाइटनर आणि प्लास्टिक सर्जरी, ऑर्थोडेन्टिस्ट्रीने अजुन काय होणार म्हणा

म्हणूनच म्हणतो, अवश्य जळा!!
:)

.शुचि. Fri, 30/10/2015 - 01:07

In reply to by पिवळा डांबिस

:)
http://previews.123rf.com/images/chudtsankov/chudtsankov1201/chudtsankov120100043/12031260-Frog-Gesturing-The-Peace-Sign-With-His-Hand-Stock-Vector-cartoon-frog.jpg
___
काय हे पिडां आम्ही लुटुपुटुच्या भांडणात विपरीत-प्रीती दाखवुन तुमच्या कॅलिफोर्नियाचं कौतुकच करतो की हो. आम्हाला काय माहीत नाही का किती ग्लॅमर आहे त्या राज्याला. युनिव्हर्सल स्टुडिओ, डिस्नेलँड, हॉलिवुडला जाणारा १०१ फ्रीवे, मुलहॉलंड ड्राइव, सनसेट बुलव्हर्ड , इतकच काय तुमच्या LA रेडिओ स्टेशनची सर दुसर्‍या रेडिओ स्टेशनला नाही, नाही अगदी न्यु यॉर्क च्याही नाही मग इतर राज्य सोडाच. आमच्या ही बेस्ट आठवणी त्याच राज्याशी निगडीत आहेत. :)
.
ओह येस आणि मालिबु बीच, सॅन डिएगो ओशन वर्ल्ड आणि दर २ पावलांवरच्या स्टारबक्स. आणि येस आकाशातल्या जाहीराती.
http://i.huffpost.com/gen/1259194/images/r-AERIAL-AD-large570.jpg

चिमणराव Fri, 30/10/2015 - 05:59

हे घ्या बाल्कनीतलं अंजीराचं झाड.पाच सहा इंचाचा शेंडा तोडून आणला एका झाडाचा.आता चार महिन्याचे रोप आहे.अंजीरं गळून पडतात.इकडची दमट हवा चालत नाही.

रोचना Mon, 23/11/2015 - 14:42

दीड दोन महिन्यांनी ऐसीवर येतेय. अनेक दिवस भटकंतीवर होते. माझा आवडता धाग बहरलेला पाहून आनंद झाला!
वेदश्रीचे स्वागत! तुमची बाग सुंदर आहे, रायावळे पाहून तोंडाला पाणी सुटलं.

मी सप्टेंबर मधे काही हिवाळ्याची रोपं लावली होती, आणि एक शेजारणीला पाणि नियमितपणे घालण्याबाबत सांगून गेले होते. परत येऊन सगळी झाडं शाबूत आहेत, चांगली वाढताहेत हे पाहून बरं वाटलं. सध्या:
तीन-चार प्रकारचे टोमॅटो (फुलं लागतायत)
वांगी (अद्याप पुष्कळ फुलं पण मेलं एकही फळ नाही, का कळतच नाही, आणि माव्याचा भयंकर उपद्रव!)
दोन कॅप्सिकम आणि दोन टोमॅटिलोची झाडं, छान वाढतायत (रुचीकडून बिया साभार!!)
चुका (थोडा हिरमुसला आहे)
मुळा (पानं मोठी, पण कंद लहान :(, बहुतेक कुंडी लहान पडली)
कोथिंबीर (जष्ट लावलीय)
बटाटे (खूपच भरभर वाढले; माती पुन्हा घालायला उशीर झाला का माहित नाही, पण वाढतायत मात्र खरं)
एकाच मोठ्या ग्रो बॅग मध्ये कणिस, फरसबी आणि भोपळा लावलाय (आदिवासी अमेरिकन लोक याला "थ्री सिस्टर्स" म्हणायचे, छान वाढतायत बहिणी)
पावटा (आत्ताच शेंगा दिसायला सुरुवात झाली आहे)
बाकी पेरू, लिंबू आणि अननसाची रोपं हळूहळू वाढतायत.

फोटो नंतर डकवते.