सरस्वती - एक चिंतन
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/1/12/Saraswati.jpg
.
मिनेपोलिसचे एक मंदीर आहे. ज्यात सर्वच अमेरिकन देवळांप्रमाणे महावीर ते दत्त ते मारुती ते नवग्रह व अधे मध्ये येणाऱ्या अन्य सर्व देवॆदेवतांचॆ रेलचेल आहे. सर्व भक्तांना खूष ठेवावं लागतं शेवटी. ते एक जाउ दे. पण या देवळातील सरस्वती अतिशय सुमुखी आहे, तेजस्वी व प्रेमळ मुद्रा यांमुळे मला ती विलोभनीय वाटते. त्या देवळात अन्य कोणाही देवतेचे दर्शन घेण्याआधी मी सरस्वतीचे दर्शन घेते. आणि शेवटी परत तिच्या समोर बसून तिचे रुपडे न्याहाळते. मग घरच्यांनी घाइघाइ केली की निघावेच लागते.पण तिचे रुप साठवून मन काही भरत नाही.
.
सरस्वती-लक्ष्मी-पार्वती या तीनही देवता त्यांच्या आपापल्या परीने १००% श्रेष्ठ चा आहेत. अन्य देवता गायत्री, ललीता, शाकंभरी देवी वगैरे सुद्धा. पण मला वैयक्तिक तुलना करायची झाली तर, लक्ष्मीबद्दल, तिच्यामागे लागलेल्या लोभी भक्तगणांमुळे ममत्व नाही. तर पार्वतीची अर्थात शक्ती उपासना एकदमच वेगळा प्रांत वाटतो. मात्र सरस्वती अतिशय आवडते. पांढर्या शुभ्र कमळात , धूतवस्त्रे ल्यालेली व हाती वीणा, पुस्तक, कमंडलु व शुभ्र स्फ़टीकांची अक्षमाळ घेतलेली सरस्वती अतिशय सात्विक व पूर्ण चंद्रासम तेजाळलेली अशी aesthetically pleasing वाटली नाही तरच नवल.
.
कार्तिकस्वामी ही शब्दाची देवता आहे. शब्द-ब्रह्म-समुद्र असे वर्णन "प्रज्ञा-विवर्धन" स्तोत्रात येते तर गणपती ही बुद्धीची देवता आहे. शुक्र या ग्रहाकडे व सरस्वती कडे "कवित्व शक्ती" येते. पैकी सरस्वतीच्या अखत्यारीत वाणी देखील येते. माझा अनुभव तरी असा आहे की जेव्हा मनात विचार येतो तेव्हा तो "प्रतिमा" रुपात पहिल्यांदा येतो व मागोमाग त्वरीत शब्द येतात. पण पहिल्यांदा प्रतिमाच येते. उदा- पुण्याची पर्वती. पहिल्यांदा डोळ्यासमोर पर्वती येते व मग nano सेकंदात शब्द "पर्वती" हा येतो आणि मग बरोबरच अनेक प्रतिमाच प्रतिमा - मित्रमंडळ चौक, आपले सकाळचे लक्ष्मीनारायण ते मित्रमंडळ ते पर्वती रपेट घेणे अशा अनेक प्रतिमा स्फुरण पावतात. पक्ष्यांचे, प्राण्यांचेही काही संकेत असतात, बोली असते. परंतु ते अतिशय मर्यादित असतात. पण त्यांनाही मेंदूत ही प्रतिमा पहिल्यांदा येत असावी बहुतेक, माणसात अन अन्य प्राण्यात हाच फरक असावा की प्रतिमेपश्चात शब्दांचे स्फुरण होते. आणि हे जे स्फुरण होते , मेंदूत जे हे जे electrodes लावून मोजता येते ते म्हणजे सरस्वतीचे कार्यक्षेत्र असावे
.
मला जर २ सर्वात मोठ्ठ्या भीती विचारल्या तर मी सांगेन - दृष्टी जाणे व स्तोत्रे वाचण्यास मुकणे, अन दुसरी alzaimer . दोन्हींचे भीतीं चे नाते स्मृती-शब्द यांचेशी आहे. सांगायचा मुद्दा हा की सरस्वती अतिशय लाडकी देवी आहे. रामरक्षेतील एक ओळ सर्वात जास्त आवडते आणि ती आहे - "आरुह्यकविताशाखां वंदे वाल्मिकी कोकीलम" अर्थात कवितारुपी फ़ांदीवर ती (डौलाने) विराजमान झालेल्या वाल्मिकी नामक कोकीळेस माझा प्रणाम असो. एरवी मी म्हटले असते की सरस्वतीच्या वरदहस्ताखेरीज इतकी गोड कल्पना सुचलीच नसती. पण साक्षात शंकरांनी हे स्तोत्र , पहाटे बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाउन त्यांना सांगितले असल्याने, शंकरांवरती, सरस्वतीचा वरदहस्त असावा असले विधान मला करायचे नाही.
.
उत्तम लेखकांचे अनंत प्रकार आहेत. पैकी एक आहे, ज्यात लेखक संपूर्ण वर्णनात्मक बैठक तयार करतो व अलगद आपल्याला ज्या मुद्द्या वर आणायचे त्याच्या मनात पहिल्यापासून असते त्या मुद्द्यावर आणून पोचवतो. हे म्हणजे अक्षरक्ष: झाडीझुंडपातून, पठार मैदानातून, भुलवून भुलवून , खुणावत , एखाद्या रम्य तळ्यापाशी किंवा वनराजी ने नटलेल्या दरीपर्यंत, घळी पर्यंत वाचकास घेउन जाउन अतिशय उत्कट सुंदर दृश्याचा नजारा घडविणे असे असते. लेखकांच्या लेखना मध्ये ही जी आकर्षणशक्ती असते तो सरस्वतीचा वरदहस्त असे म्हणता येईल का?
.
ऐसी वर तर अनेक कवी, लेखक आहेत. माझ्यासारखाच त्यांनाही अनुभव असेल, एखादी गोष्ट, ललित , कविता सुचत असते तेव्हा पहिल्यांदा घालमेल होते, आभाळ भरून आल्यासारखं होतं, हृदयातून फुटून एखादा झरा बाहेर येईल असे वाटते, आत्मिक Orgasm येइल असे काहीतरी वाटते . अन मग आपण कागद-पेन घेउन बसतो. ते विचार कागदावर उतरवल्यावर हायसे वाटते, हलके वाटते. अर्थात मी असे म्हणत नाही की इतके उत्कट आणि तीव्र वाटल्यामुळे कलाकृती खास, उत्तम बनते. मला फक्त मी अनुभवलेली प्रोसेस इथे सांगायची आहे. आणि या अशा inspiration ची देवी सरस्वती असावी. म्हणजे तिने कालीदासाकडे, आदी शंकराचार्यांकडे तर प्रेमळ कटाक्षच टाकला असावा की ते इतकं नवरसमय काव्य प्रसवू शकले. सामान्य लेखकांकडे देवी कसला कटाक्ष टाकतेय पण तरीही तिची कृपाच १००% असणारच त्याशिवाय सुचणारच नाही. परत अतिसुमार लेखनाच्या बढाया मारायच्या नाहीत तर मेंदू,हृदय यांनी अनुभवलेली प्रोसेस सांगायची आहे.
.
वाग्वाणी, वाड्मयी ,वागीशवल्लभा, वेदजननी, विधीप्रिया, विद्या, बुद्धिरूपा, अविद्याज्ञानसंहर्त्री, जाड्यविध्वंसनकरी अशा नाना नामांनी ओळखल्या जाणाऱ्या सरस्वती देवीस माझा नमस्कार असो, असे बोलून या चिंतनाचा शेवट करते.
ललित लेखनाचा प्रकार
छान लेख
सुंदर लेख
वाग्वाणी, वाड्मयी ,वागीशवल्लभा, वेदजननी, विधीप्रिया, विद्या, बुद्धिरूपा, अविद्याज्ञानसंहर्त्री, जाड्यविध्वंसनकरी अशा नाना नामांनी ओळखल्या जाणाऱ्या सरस्वती देवीस माझा नमस्कार असो, असे बोलून या चिंतनाचा शेवट करते. 
यातली अनेक नावे माहीत नव्हती
आशाजींच हे सुंदर गाण पुन्हा आठवलं.
जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी 
ज्योत्स्नेपरि कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे नित वर्षू दे अमुच्या शिरी 
वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलावय अंगुली
संगीत जन्मा ये नवे, जडता मतीची भंगली
उन्मेष कल्पतरुवरी, बहरून आल्या मंजिरी 
गीतकार : शांता शेळके,
गायक : आशा भोसले,
संगीतकार : श्रीधर फडके,
हा श्लोक येथे का नाही?
सरस्वतीवरच्या ह्या लेखामध्ये पुढील प्रख्यात श्लोक कसा नाही?
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता|
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना|
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता।
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाडयापहा॥
"कुन्द आणि चन्द्रकिरणांच्या थेंबांनी गुंफलेल्या हाराप्रमाणे गौर, शुभ्र वस्त्र ल्यालेली, हातामध्ये वीणा धारण करणारी, शुभ्र कमलाच्या आसनावर बसलेली, ब्रह्मा, विष्णु, महेशादि देवांनी सदा प्रार्थिलेली आणि बुद्धीचा मंदपणा दूर करणारी ती सरस्वती देवी माझे रक्षण करो."
माझ्या समजुतीनुसार वरचे सरस्वतीचे चित्र रविवर्म्याचे आहे. एकेकाळी बर्याचशा घरांमधून रविवर्म्याचे हे चित्र आणि रविवर्म्याचीच विष्णु, विश्वामित्र-मेनका अशी चित्रे बैठकीच्या खोलीचे आवश्यक सुशोभीकरण मानले जाई. सरस्वतीचे हे चित्र शाळांमधून दसर्याच्या पाटीपूजनाच्या प्रसंगाने हार घालून टेबलावर ठेवले जाई.
वेदकालीन लुप्त सरस्वती नदीचे विद्यादेवता सरस्वती असे रूपान्तर का आणि केव्हा झाले हा एक गूढ मुद्दा असावा.
रविवर्म्याचे तितकेच प्रसिद्ध लक्ष्मीचे चित्र पहा:

खरे आहे या श्लोकाशिवाय
खरे आहे या श्लोकाशिवाय अपूर्णच आहे हा धागा. अगत्स्यमुनींचे ते संपूर्ण स्तोत्रच रसाळ आहे.
.
बसरा च्या लहानशा मुलीप्रमाणे दिसणार्या सरस्वतीचाही उल्लेख करता आला असता. एकदम मोठ्ठ्या डोळ्यांची गोड सरस्वती आहे ती.

.
आणि मुख्य मी आदि शंकराचार्य आणि शारदाम्बा याम्चा काहीतरी संबंध आहे तो विसरले आहे. पाहून लिहीते.
- नसेलही काही संबंध. त्यांनी शारदाम्बा स्तवन लिहीले आहे एवढाचही असेल. पण शंकराचार्य व शारदाम्बा असं काहीतरी समीकरण माझ्या मनात बसले आहे.
.
एका श्लोकात वर्णन करताना सरस्वतीस "विपुलमंगलदानशीले" असे संबोधन आहे. तिथे अक्षरक्षः हृदय समरसॉल्ट घेते. ते विशेषण खूप आवडते.
.
एक १५ वर्षापूर्वी माराठीतील टिप्पणीसहीत संपूर्ण संस्कृत दुर्गा सप्तशती असलेले पुस्तक घाटकोपर (पूर्व)च्या लायब्ररीतून वाचले होते. त्यात दुर्गा आणि राक्षस यांच्यात झालेल्या संग्रामाचे अत्यंत रोचक वर्णन होते. पैकी देवीच्या शरीरातून अनेक शक्ती निघून त्या देवीस मदत करु लागल्या. मयुरारुढ कौमारी (कार्तिकस्वामीची शक्ती), गरुडारुढ वैष्णवी (विष्णु ची शक्ती), गजारुढ इंद्राणी (इंद्र...), वृषभारुढ शर्वाणी (शंकरांची ...) आणि हंसारुढ ब्रह्माणी (ब्रह्मदेवाची ...) याशिवाय काली, चंद्रघंटा वगैरे देखील शक्ती निघाल्या. पैकी एक शक्ती महारवा होती अर्थात तिच्या गर्जनेने राक्षस गर्भगळीत होऊन जात, चंद्रघंटा घंटेचा निनाद करे व राक्षसांची पळता भुइ थोडी होई वगैरे युद्धाचे खूप रसाळ वर्णन होते.
त्यात ब्रह्माणीची मोडस ऑपरंडी म्हणजे कमंडलुतील पाणी राक्षसांवर शिंपडणे व त्यांना बेशुद्ध करणे ही होती. तेव्हाच ही देवी एकदम सात्विक आणि सुसौम्या असल्याचा साक्षात्कार झाला होता :)    
कविता/लेख लिहीताना, वर्णन जरा
कविता/लेख लिहीताना, वर्णन जरा अतिरेकानेच करायचे असते. नाहीतर साहीत्याला अर्थ काय राहीला? आजही कामाचा रगाडा उपसायचा आहे हे वाक्य तर कोणीही बोलू शकेल, पण दिवस आगामी स्वप्नांच्या भाराने गर्भार झाला होता हे वाक्य ऐकायला आपण कादंबरी उघडतो.
कारने जात असतेवेळी हरीणांचा कळप आमच्या वाटेत आला हे वाक्य काय कोणीही लिहू शकते पण लेखक्/कवि ते असे लिहीतील - कोण्या आदिमकाळातील वनदेव वनदेवताच जणू हरीणांचे रुप घेऊन क्रीडा करीत होते.
 - दोन्ही कल्पना अनुक्रमे इंग्रजी कादंबरी, कवितेमध्ये वाचलेली आहेत.
.
मी काय लिहावं अशी आपली अपेक्षा होती - लेखकाला काहीतरी सुचतं , लिहावसं वाटतं, कामधाम टाकून तो लिहीत बसतो?
.
कुछ वटवट तो लाजमी बनती है.   
 
         
छान!
छान!