जंटलमन्स गेम ३ - इंडेक्स फिंगर!

क्रिकेट हा खेळ जसा बॅट्समन, बॉलर्स आणि फिल्डर्सचा आहे तितकाच, कदाचित किंचीतसा जास्तं असा अंपायर्सचा आहे. अंपायरच्या वर केलेल्या किंवा न केलेल्या बोटामुळे अनेक मॅचचे रिझल्ट्स पूर्णपणे बदलू शकतात! आजच्या डीआरएस च्या जमान्यात तंत्रज्ञान इतक्या उच्चकोटीला गेलेलं असतानाही अंपायर्सविना क्रिकेटच्या खेळाची कल्पना करणं निव्वळ अशक्यंच आहे. अर्थात आता तंत्रज्ञानामुळे अनेकदा अंपायरची अगदी मोहरीच्या दाण्याइतकी क्षुल्लकशी चूकही भोपळ्याएवढी मोठी करुन त्याच्या पदरात घातली जात असली तरी अखेर अंपायर हा देखील माणूसच आहे आणि कधीतरी तो देखील चुकू शकतो हे मात्रं सोईस्कररित्या विसरलं जातं.

१८७७ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट पासून ते आजतागायत खेळाडूंच्या बरोबरीने अंपायर्सची कामगिरी तेवढीच उल्लेखनीय राहिलेली आहे. बॅट्समन, बॉलर्स आणि खेळाडूंप्रमाणे अंपायर्सच्या नावावरही अनेक रेकॉर्ड्स आहेत. पॅट्रीक मॅक्शेन आणि जॉर्ज कोल्टहार्ड हे आधी अंपायर्स म्हणून टेस्टमध्ये आले आणि नंतर बॅट्समन म्हणून खेळले! अवघ्या २२ वर्षांचा मॅक्शेन हा सर्वात तरूण अंपायर होता! त्यांच्याही वरताण म्हणजे टॉम गॅरेट! मेलबोर्नच्या ज्या टेस्टमध्ये गॅरेट बॉलर म्हणून खेळत होता, त्याच टेस्टच्या एका इनिंगमध्ये त्याला अंपायर म्हणून उभं राहवं लागलं होतं!

टेस्ट क्रिकेटमध्ये आजतागायत अंपायरींग केलेल्या ४८० अंपायर्स कडे एक दृष्टीक्षेप टाकला तरी त्यात कितीतरी मोठी नावं दिसतात! यात १८७७ च्या पहिल्या टेस्टमध्ये अंपायरींग करणार्‍या कर्टीस रीड आणि रिचर्ड टेरी पासून ते पहिल्या महायुद्धात एक हात गमावल्यानंतर नकली हात बसवून घेऊन अंपायरींग करणारा आणि एक उत्कृष्ट अंपायर म्हणून गाजलेला फ्रँक चेस्टर, पहिल्यावहिल्या टेस्टमध्ये क्रिकेटच्या इतिहासातलं पहिलं टेस्ट शतक झळकावणारा चार्ल्स बॅनरमॅन, आपल्या अचूक निर्णयांसाठी जगभरातील क्रिकेटर्सच्या आदरास पात्रं ठरलेला हॅरॉल्ड 'डिकी' बर्ड, 'नेल्सन' नंबर्स वर एक पाय उचलून जागच्या जागी उडी मारणारा ढेरपोट्या डेव्हीड शेपर्ड, त्याचा भारतीय भाऊबंद शोभावा असा स्वरुप किशन, भारताचा गाजलेला ऑफस्पिनर वेंकटराघवन, वादग्रस्तं डॅरील हेअर, 'जोकर' बिली बाऊडेन, अचूक निर्णयांसाठी प्रसिद्ध सायमन टोफेल आणि आलिम दर, श्रीलंकेचा भूतपूर्व ऑफस्पिनर कुमार धर्मसेना, 'स्लो डेथ' रुडी कुर्ट्झन, डॅरील हार्पर, आजच्या घडीचा सर्वोत्कृष्ट अंपायर रिचर्ड कॅटलबरो आणि सर्वात जास्त टेस्टमध्ये अंपायरींग केलेला (आणि अनेकदा भारताच्या कुंडलीत पापग्रह बनून आलेला) स्टीव्ह बकनरही आहे!

अंपायर्सचं मुख्य काम म्हणजे अचूक निकाल देणं आणि मैदानावरील खेळावर आणि एकंदर परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं! स्लेजिंग किंवा स्टीव वॉच्या शब्दात सांगायचं तर मेंटल डिसइंटीग्रेशन हे खेळाचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्यामधून उद्भवू शकणार्‍या वाद-विवादांमुळे अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण होते. अशा वेळेला खमक्या अंपायर असेल तर तो त्या परिस्थितीवर सहजपणे काबू मिळवू शकतो. अर्थात अंपायरचीही पर्वा न करणार्‍या अनेक 'महान' खेळाडूंची परंपरा पार डॉ. डब्ल्यू जी ग्रेसपासून ते डग्लस जार्डीन, इयन चॅपल, जावेद मियांदाद, रिकी पाँटींग अशी चालत आलेली आहे तो भाग वेगळा! परंतु निष्पक्षपाती आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता असलेला खमका अंपायर असेल तर अनेक वात्रट खेळाडूही मैदानावर सुतासारखे सरळ असतात हे देखील खरं!

१९५४-५५ मध्ये भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेला होता. दोन्ही देशांच्या, विशेषतः पाकिस्तानच्या दृष्टीने या दौर्‍याचं महत्व अनन्यसाधारण असंच होतं. १९४७ साली फाळणीनंतर भारत प्रथमच पाकिस्तानच्या दौर्‍यावर येत असल्याने दौर्‍याला दूरगामी राजकीय परिमाण होतं. पाकिस्तानने १९५२ च्या भारताच्या दौर्‍यावर टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं असलं तरी भारताच्या तुलनेत पाकिस्तानी क्रिकेट तसं बाल्यावस्थेतच होतं.

विनू मंकडच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय संघात स्वतः मंकड, पंकज रॉय, पॉली उम्रीगर, माधव मंत्री, विजय मांजरेकर, नरेन ताम्हाणे, दत्तू फडकर, सुभाष गुप्ते, गुलाम अहमद असे अनेक रथी-महारथी खेळाडू होते. तुलनेने पाकिस्तानचा संघ तसा नवखाच होता. भारताकडून पूर्वी इंग्लंडविरुद्ध टेस्टमॅचमध्ये खेळलेला अब्दुल हफीज कारदार पाकिस्तानचा कॅप्टन होता. कारदारच्या पाकिस्तानी संघात हनीफ मोहम्मद, वझीर मोहम्मद, फझल मेहमूद आणि स्वतः कारदार यांच्या तुलनेत इतर सर्वजण तसे अननुभवीच होते.

(अब्दुल हफीज कारदार हा भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसाठी टेस्ट क्रिकेट खेळलेल्या तीन खेळाडूंपैकी एक. उरलेले दोघे म्हणजे गुल मोहम्मद आणि अमीर इलाही).

पहिली टेस्ट मॅच झाली ती तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील - आताच्या बांग्लादेशातील ढाक्क्याला!
पाकिस्तानच्या भूमिवर झालेल्या या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये अंपायर्स होते दाऊद खान आणि इद्रीस बेग!

दाऊद खान हा फाळणीपूर्वी सिंधच्या संघातून रणजी ट्रॉफी खेळलेला होता. फाळणीनंतर सुरवातीची तीन वर्षे पाकिस्तानात सिंधच्या संघातून खेळल्यावर तो अंपायरींगकडे वळला. इद्रीस बेगने दहा वर्षात दिल्लीसाठी ७ रणजी मॅचेस खेळल्या होत्या. (दिल्लीने या काळात केवळ ११ मॅचेस खेळल्या होत्या)! ग्वाल्हेरविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने शतक ठोकलं होतं! फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये जाण्यापूर्वी रणजी ट्रॉफीच्या दोन मॅचेसमध्ये तो अंपायर म्हणून उभा राहिला होता.

सुभाष गुप्ते एव्हाना जगातील सर्वोत्कृष्ट लेगब्रेक-गुगली बॉलर म्हणून प्रसिद्धीस आला होता. बापू नाडकर्णीइतका नसला तरी गुप्ते बर्‍यापैकी कंजूस बॉलर म्हणून ओळखला जात असे. गुप्तेची आणखीन एक खासियत होती ती म्हणजे कितीही मोठा बॉलिंग स्पेल टाकला तरी तो कधीही नो-बॉल टाकत नसे.

परंतु ढाक्याच्या टेस्टमध्ये कारदारला टाकलेला एक गुगली त्याला साफ चकवून गेला असतानाच गुप्ते आणि जवळपास उभ्या असलेल्या फिल्डर्सच्या कानावर अंपायरचा आवाज आला,

"नो बॉल!"

खुद्द गुप्तेच काय पण विकेटकीपर नरेन ताम्हाणे, स्लीपमध्ये असलेले माधव मंत्री, शॉर्टलेगला असलेला विजय मांजरेकर सगळेच वेड्यासारखे अंपायरकडे पाहत राहिले!

इद्रीस बेग!

"सुभाषला नो बॉल देणारा एकमेव अंपायर म्हणून विस्डेनच्या रेकॉर्ड बुकमध्ये तुझ्या नावाची नक्कीच नोंद होईल!" धक्क्यातून सर्वात आधी सावरलेल्या माधव मंत्रीनी स्लीपमधून बेगला सुनावलं!

माधव मंत्रीनी आपला जाहीर पंचनामा केल्याचा परिणाम इद्रीस बेगवर निश्चीतच झाला असावा!
संपूर्ण दौर्‍यात पुन्हा बेगने गुप्तेला एकदाही नो बॉल दिला नाही!

ढाक्का, बहावलपूर, लाहोर आणि पेशावर इथल्या चारही टेस्टमॅचेस कमालीच्या रटाळ झाल्या होत्या. दोन्ही संघांना एकमेकाविरुद्धचा पराभव पचनी पडणं अशक्यं असल्यामुळे विजयासाठी धोका पत्करण्याऐवजी मॅच ड्रॉ करण्यालाच दोन्ही संघांचं प्राधान्यं होतं. दोन्ही संघाच्या बॅट्समननी कासवापेक्षाही स्लो बॅटींग करुन आपली भूमिका चोख बजावली होती. भारताकडे अनेक रथी-महारथी बॉलर्स असूनही पाकिस्तानच्या २० विकेट्स घेणं भारतीय बॉलर्सना जमलं नव्हतं!

यात सिंहाचा वाटा होता तो अर्थातच इद्रीस बेगचा!

पाकिस्तानच्या एकाही बॅट्समनला एलबीडब्ल्यू देणं 'देशभक्तं' बेगच्या तत्वात बसत नव्हतं!
भारतीय बॅट्समनच्या पॅडला बॉल लागताक्षणी बोट वर करण्यास मात्रं तो आतूर होता!
त्याच्या दृष्टीने एकच प्रॉब्लेम होता!
भारतीय बॅट्समन बॉल पॅडवर लागण्यापूर्वीच बॅटने खेळत होते!

पहिल्या चार टेस्ट मिळून पाकिस्तानला केवळ दोनच एलबीड्ब्ल्यूच्या विकेट्स मिळाल्या होत्या!
मात्रं पेशावरच्या टेस्टमध्ये भारताच्या पहिल्या इनिंग्जमध्ये पंकज रॉय, नरेन ताम्हाणे, विजय मांजरेकर आणि शतक झळकावणारा पॉली उम्रीगर यांना रनआऊट करण्यात इद्रीसचा फार मोठा 'हात' होता.

पहिल्या चारही टेस्ट्स ड्रॉ झाल्यामुळे पाकिस्तानचा कॅप्टन कारदार बराच अस्वस्थ झाला होता. १९५२ सालच्या पाकिस्तानच्या पहिल्या सिरीजमध्ये भारताने पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला होता. त्याची परतफेड करण्यासाठी ही सिरीज जिंकणं हा कारदारच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा प्रश्न होता! त्यासाठी काय वाटेल ते करण्याची त्याची तयारी होती.

या दौर्‍यात भारताचा मॅनेजर होता हरफनमौला ऑलराऊंडर लाला अमरनाथ!

कारदार आणि लाला यांची चांगल्यापैकी मैत्री होती. १९४६ मध्ये नवाब पतौडी (सिनीयर) च्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धच्या सिरीजमध्ये दोघं भारतीय संघातून एकत्रं खेळले होते. पाकिस्तानच्या पहिल्या टेस्ट सिरीजमध्ये लालाच भारताचा कॅप्टन होता. पाचव्या आणि शेवटच्या टेस्टसाठी भारतीय संघ कराचीला पोहोचल्यावर कराचीचाच रहिवासी असलेल्या कारदारने टेस्टच्या आदल्या दिवशी आपल्या जुन्या मित्राला चहाचं आमंत्रण दिलं.

कारदारच्या घरी पोहोचल्यावर त्याने लालाचं मनापासून स्वागत केलं. चहा घेता-घेता दोघं आपल्या जुन्या दिवसांच्या आठवणी काढून गप्पा मारत होते. दोघं आपल्या गप्पांत मग्नं असतानाच पुढचं दार वाजलं. कारदारने दार उघडल्यावर दारातल्या व्यक्तीने कारदारला अभिवादन केलं आणि विचारलं,

"कप्तान, उद्याच्या सामन्यासाठी काही खास सूचना?"

मुख्य दरवाजाकडे पाठ करुन सोफ्यावर बसलेल्या लालाच्या कानावर हे शब्द पडताच कुतूहलाने त्याने मागे वळून पाहिलं. दारातल्या व्यक्तीला पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.

इद्रीस बेग!
कराची टेस्टमध्ये नेमणूक करण्यात आलेल्या दोन अंपायर्सपैकी एक अंपायर!

"कसल्या खास सूचना हव्या आहेत तुला?" लालाने कारदारकडे रोखून पाहत इद्रीसला प्रश्न केला!

कारदारच्या घरी लालाला पाहून इद्रीस इतका हादरला की त्याने मागे वळून धूम ठोकली! कारदारच्या चेहर्‍यावरचा रंग साफ उडाला होता! हे सगळं इतक्या अनपेक्षीतपणे झालं होतं की काय बोलावं हे त्याला कळेना! भारताला काहीही करुन पराभूत करण्याचा कारदारचा डाव चाणाक्षं लालाच्या ध्यानात आला!! अवाक् झालेल्या कारदारचा निरोप घेऊन लाला ताबडतोब तिथून बाहेर पडला.

आपल्या हॉटेलवर परत येताच लालाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांना बोलावून हा सगळा प्रकार त्यांच्या कानी घातला! तोपर्यंत ही सगळी भानगड त्यांच्या कानापर्यंत पोहोचली होतीच! खवळलेल्या लालाने दुसर्‍या दिवशी बेगने अंपायर म्हणून मैदानात उतरण्यास सक्तं विरोध दर्शवला. बेगच्या जागी दुसरा अंपायर न आल्यास भारत पाचव्या टेस्टमध्ये खेळणार नाही असं त्याने ठणकावलं!

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांनी सुरवातीला हा सगळा प्रकार गैरसमजातून झाला असावा अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कारदारच्या घरी आलेला माणूस इद्रीस बेग नव्हताच असाही एका अधिकार्‍याने पवित्रा घेतला, परंतु फटकळ आणि स्पष्टवक्त्या लालासमोर त्यांची डाळ शिजू शकली नाही. पाकिस्तानी अधिकार्‍यांनी एव्हाना दुसर्‍या अंपायरची शोधाशोध सुरु केलीच होती, पण त्यावेळी कराचीत फर्स्टक्लास क्रिकेटच्या दर्जाचा एकही अंपायर नव्हता!

मध्यरात्रीपर्यंत ही चर्चा अशीच सुरू होती. सकाळपर्यंत दुसरा अंपायर न मिळाल्यास टेस्ट रद्द करावी लागते की काय अशी पाकिस्तानी अधिकार्‍यांना भिती वाटत होती. यातून मार्ग काढण्याची चर्चा सुरु असताना एक अधिकारी म्हणाला,

"आमच्याकडे इथे एक फर्स्टक्लास अंपायर आहे खरा, पण तो कदाचित तुम्हाला चालणार नाही!"
"कोण?" लालाने प्रश्न केला.
"मसूद सलाउद्दीन! आमच्या सिलेक्टर्सपैकी एक!"
"चालेल!" क्षणाचाही विचार न करता लाला उत्तरला, "इद्रीस बेग सोडून आम्हाला कोणीही चालेल!"

पाकिस्तानी अधिकार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला! मसूद सलाउद्दीनला ही सगळी भानगड कळल्यावर अंपायर म्हणून उभं राहण्यास त्याने ताबडतोब होकार दिला!

एका सिलेक्टरने अंपायर म्हणून टेस्टमध्ये उभं राहण्याची ही टेस्ट क्रिकेटमधली एकमेव घटना!

याच टेस्टच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये सुभाष गुप्तेच्या बॉलवर नरेन ताम्हाणेनी कारदारला स्टंप केलं! कारदार आऊट असल्याचा योग्य निर्णय दिला होता मसूद सलाउद्दीनने!

पाकिस्तानी कॉमेंटेटर आणि लेखक ओमर कुरेशी म्हणतो,
"इद्रीस बेगने कारदार स्टंप असल्याचा निर्णय कधीच दिला नसता!"

बेगविषयी कुरेशी म्हणतो,
"इद्रीस बेग अत्यंत नाटकी अंपायर होता. प्रेक्षकांपैकी कोणी हुल्लडबाजी करुन मॅचमध्ये व्यत्यय आणला तर तो अत्यंत नाटकीपणे त्यांना गप्प करत असे! स्वतःचं अपार महत्वं प्रत्येक गोष्टीवर ठसवण्याचा त्याला छंद होता!"
पाकिस्तानच्या सामान्य प्रेक्षकांना कराची टेस्टमधून इद्रीसच्या लीलांची कल्पना असल्यामुळे कराची टेस्टमधून त्याची गच्छन्ती झाल्याबद्दल मुळीच आश्चर्य वाटलं नव्हतं! भारतावर मात करण्यासाठी कॅप्टन कारदारचं गुप्तं अस्त्रं म्हणजे इद्रीस बेगच असल्याची बहुतेकांची पक्की खात्री होती! त्यातूनच कारदारला एका विचित्रं प्रसंगाला सामोरं जावं लागलं.

पेशावरच्या टेस्टमध्ये शतकवीर पॉली उम्रीगर आणि विजय मांजरेकर यांनी पाकिस्तानी बॉलर्सचा घाम काढला होता. दिवसाचा खेळ संपल्यावर कारदार जुना मित्रं असलेल्या कुरेशीच्या घरी आला होता. क्रिकेटमधलं ओ की ठो कळत नसलेल्या पण रेडीओवर कॉमेंट्री ऐकणार्‍या कुरेशीच्या आवाजावरुन मॅचमधल्या पाकिस्तानच्या स्थितीचा अंदाज लावणार्‍या कुरेशीच्या म्हातार्‍या आईने कारदारची हजेरी घेत त्याला खडसावून विचारलं,

"आज इद्रीस बेग इतका खराब का खेळला?"

कारदारचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला होता!

अर्थात इद्रीस बेगच्या लीला इथेच संपल्या नाहीत!

१९५५-५६ मध्ये डोनाल्ड कारच्या नेतृत्वाखाली खेळणारा एमसीसीचा संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर आला होता. या संघातील खेळाडूंच्या नावाची यादी पाहून कारदारने नाक मुरडलं होतं. त्याच्या मते हा इंग्लंडचा संघ नसून एमसीसीचा दुय्यम संघ होता! अर्थात या दौर्‍यात एकही अधिकृत टेस्ट नसल्याने आणि पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेमुळे प्रमुख इंग्लिश खेळाडूंनी पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला असल्याने कारच्या संघात तुलनेने सगळ्या नवीन खेळाडूंचा भरणा होता, त्यामुळे एका अर्थी कारदारचं हे मत योग्यंच होतं.

लाहोरला झालेली पहिली अनऑफिशिलट टेस्ट ड्रॉ झाली. एमसीसीला २०४ मध्ये गुंडाळल्यावर हनिफ मोहम्मदच्या साडेअकरा तासातील १४२ रन्सच्या जोरावर पाकिस्तानने ३६३ ची मजल मारली. दुसर्‍या इनिंग्जमध्ये पीटर रिचर्ड्सन (१०३), मॉरीस टॉमकीन (८५) आणि बॅरींग्टन (५२) यांच्यामुळे पाकिस्तानला ड्रॉवर समाधान मानावं लागलं.

मॅच संपल्यावर इद्रीस बेगने कारदारच्या समोर आपला जोडीदार शुजाउद्दीनला दमात घेतलं.

"आपले बॅट्समन एलबीडब्ल्यू कसे झाले?" बेगने घुश्शातच प्रश्न केला.
"ते आऊट होते, म्हणून मी आऊट दिले!" शुजाउद्दीन शांतपणे म्हणाला, "तुझ्यासारखा मी आऊट असलेल्या बॅट्समनला नॉटआऊट देणार नाही! मग भले तो पाकिस्तानचा असो वा एमसीसीचा!"

शुजाउद्दीनच्या या उत्तरावर बेग चांगलाच खवळला! कारदारने त्याला कसंबसं शांत केलं!

ढाक्क्याच्या दुसर्‍या अनऑफीशियल टेस्टमध्ये एमसीसीला १७२ मध्ये गुंडाळल्यावर पाकिस्तानने २८७ ची मजल मारली ती मुख्यतः वझीर महंमद(८६) आणि कारदार (७६) यांच्या १३४ रन्सच्या पार्टनरशीप मुळे! अर्थात यात इद्रीसचा वाटा होताच! टोनी लॉकच्या बॉलवर कारदारविरुद्धची तीन जोरदार अपील त्याने फेटाळून लावली होती! दुसरा अंपायर असलेल्या मोबेदने कारदारला ७६ वर एलबीडब्ल्यू दिल्यावर बेगची नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती! दुसर्‍या इनिंग्जमध्ये फझल मेहमूद आणि खान मोहम्मदपुढे रिचर्डसन (५९) वगळता कोणीच काही करु न शकल्याने एमसीसीची इनिंग १०५ मध्ये आटपली. पाकिस्तानने इनिंग्ज आणि १० रन्सनी ही मॅच जिंकली!

एमसीसी आणि पाकिस्तानच्या खेळाडूंची आणि अंपायर्सचीही एकाच हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. मॅचच्या दुसर्‍या दिवशी रात्रीचं जेवण आटपून आपल्या रुमवर निघालेल्या इद्रीस बेगला इंग्लिश खेळाडूंपैकी एका रुममधून खिदळण्याचे आवाज आले. बेगने आत दृष्टीक्षेप टाकला तेव्हा एक मजेदार दृष्यं त्याला पाहण्यास मिळालं. केन बॅरींग्टनच्या हातात पाण्याने भरलेली बादली होती आणि त्याने ती भूतपूर्व इंग्लिश विकेटकीपर जॉर्ज डकवर्थच्या डोक्यावर उपडी केली! डकवर्थ नखशिखांत ओलाचिंब झाला होता! हा प्रकार पाहून बेगला हसू आवरेना! त्याच्या हसण्याचा आवाज येताच डोनाल्ड कार खेळकर आवाजात ओरडला,

“We’ll get you too, before the end of the tour.”
“You’ll never get me.” बेग उत्तरला!

बेगच्या 'देशभक्तं' अंपायरींगचा कळस झाला तो पेशावरच्या तिसर्‍या अनधिकृत टेस्टमध्ये!

डोनाल्ड कारने टॉस जिंकून बॅटींग घेतली, परंतु एमसीसीला १८८ पर्यंतच मजल मारता आली! कॅप्टन कारदारने ६ विकेट्स घेतल्या! यात इद्रीस बेगने दिलेल्या चार एलबीडब्ल्यूंचा समावेश होता!

या सामन्यात खेळलेला पाकिस्तानी स्पिनर शुजाउद्दीन बट म्हणतो,
"इंग्लिश खेळाडूंचा बेगवरचा संताप योग्यच होता! विशेषतः पेशावरच्या या मॅचमध्ये इद्रीसने दिलेले अनेक निर्णय म्हणजे सरळसरळ बॅट्समनला ढापण्याचा प्रकार होता! एमसीसीची परिस्थिती जरा सुधारते आहे असं वाटलं की इद्रीस एखाद्या बॅट्समनला एलबीडब्ल्यू देई! बॅरींग्टन, सटक्लीफ आणि स्वेटमन एलबीडब्ल्यू नाहीत हे एखादा शाळकरी पोरगाही सांगू शकला असता!"

एमसीसीला १८८ मध्ये गुंडाळल्याचा पाकिस्तानचा आनंद फार काळ टिकला नाही! टोनी लॉकने ५ तर टिटमस - मॉस यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत पाकिस्तानला १५२ मध्ये गुंडाळलं! दुसर्‍या इनिंग्जमध्ये कारदारने पुन्हा ५ विकेट्स काढल्या! अर्थात त्यातला एक एलबीडब्ल्यू बेगने दिला होताच, परंतु विकेटकिपर इम्तियाज अहमदच्या ग्लोव्हजवरुन बॉल पुन्हा स्टंपवर आदळल्यानंतरही बेगने केन बॅरींग्टनला बिनदिक्कतपणे बोल्ड म्हणून आऊट दिलं! बॅरींग्टन इतका भडकला होता की ड्रेसिंग रुममध्ये परतल्यावर त्याने आपली बॅट जोरात फेकून दिली!

पाकिस्तानला चौथ्या इनिंगमध्ये दीडशे रन्सचं लक्ष्यं होतं. अर्थात एका बाजूने इद्रीस बेग असताना कारदारला काळजी करण्याचं काहीच कारण नव्हतं! तिसरा दिवस संपायला आलेला असताना पाकिस्तानच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये वकार हसन आणि इमियाज अहमदविरुद्धची टोनी लॉकची ३ एलबीडब्ल्यू अपिल्स बेगने नाकारली! टोनी लॉकचा अक्षरशः तीळपापड झाला होता! तिसर्‍या दिवसाअखेरीस पाकिस्तानला मॅच जिंकण्यासाठी केवळ १८ रन्स हव्या होत्या! ८ विकेट्स हाती असल्याने पाकिस्तान ही मॅच जिंकणार यात कोणालाच शंका नव्हती! शिवाय इद्रीस बेग होताच!

त्या रात्री इंग्लिश आणि पाकिस्तानी खेळाडूंसाठी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आतापर्यंतचा सिरीजचा आणि विशेषतः अंपायरींगचा एकूण रागरंग पाहून अ‍ॅलन वॉटकीनने एक मार्मिक शेरा मारला.

"We should play the next test in the Khyber Pass with rifles rather than bats and balls!"

बेगविरुद्ध इंग्लिश खेळाडूंच्या मनात असलेला राग आता इतक्या पराकोटीला पोहोचला होता की त्याला 'धडा' शिकवण्याचा काहीजणांनी निर्णय घेतला!

सुमारे सहा ते सात इंग्लिश खेळाडू पार्टीतून सटकले आणि त्यांनी सर्व्हिसेस हॉटेल गाठलं. या हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेला बेग आपल्या रुममध्ये आराम करत होता. आपल्या रुममध्ये इंग्लिश खेळाडूंना पाहून चकीत झालेल्या बेगला सावरण्यास वेळ मिळण्यापूर्वी इंग्लिश खेळाडूंनी त्याची गठडी वळली आणि टांग्यात घालून आपण राहत असलेल्या डीन्स हॉटेलमध्ये ते त्याला घेऊन आले!

हॉटेलमध्ये आणल्यावर इंग्लिश खेळाडूंपैकी काहींनी त्याला बाथरुममध्ये नेऊन बाथटबमध्ये शब्दश: पाण्यात बुडवून काढला! बाथटबमधून बाहेर काढल्यावरही त्याच्या अंगावर बादल्या भरभरुन पाणी ओतण्यास त्यांनी कमी केलं नाही! इतकंच नव्हे तर एक-दोन इंग्लिश खेळाडूंनी त्याच्या हाता-पायावर फटकावूनही काढलं असावं असं मानण्यास वाव आहे! सुमारे अर्धा-पाऊण तास त्यांचा धुमाकूळ सुरु होता!

अद्यापही पार्टीत असलेल्या कारदारला ही बातमी कळताच त्याचा पारा शीगेला पोहोचला! डोनाल्ड कारच्या रुममध्ये जाऊन धुमसत तो गरजला,

"Pack your bags and get out from here! The tour is over!"

कारला आपल्या सहकार्‍यांच्या पराक्रमाची काहीच कल्पना नव्हती! तो पार गोंधळून गेला होता!
दरम्यान हॉटेलच्या रुममध्ये बेगचा पत्ता लागला तेव्हा त्याच्या सर्वांगातून पाणी निथळत होतं!

ही बातमी सगळ्यांना कळताच एकच गोंधळ झाला! पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रातोरात एमसीसी ला केबल पाठवून या प्रकरणाची रीतसर तक्रार केली! दरम्यान पेशावरच्या लोकांनी राग अनावर होऊन इंग्लिश खेळाडूंना काही करु नये म्हणून पाकिस्तानी लष्कराच्या तुकड्या शहरात तैनात करण्यात आल्या!

दुसर्‍या दिवशी सकाळी बेग पत्रकारांना सामोरा आला तो एक हात गळ्यात लटकावूनच!

"सहा-सात इंग्लिश खेळाडूंनी माझ्या हॉटेलच्या रुममधून टांग्यात घालून त्यांच्या हॉटेलमध्ये नेलं आणि पाण्यात भिजवून काढलं! त्यातले बहुतेक सर्वजण दारूच्या नशेत होते! माझ्या अंगावर त्यांनी दारुही ओतली असावी! एक दोघांनी मला मारहाणही केली!" आपल्या गळ्यात लटकावलेल्या हाताकडे निर्देश करत बेग म्हणाला!

अर्थात बेग कितपत खरं बोलतो आहे याची बर्‍याच जणांना शंका आली होती! विशेषतः मारहाणीबद्दल! कारण बराच वेळ एक हात गळ्यात लटकावून कंटाळल्यावर त्याने तो हात काढून दुसरा हात लटकावला होता!

ओमर कुरेशी म्हणतो,
"या सगळ्या प्रकरणात आपल्याला मिळत असलेल्या फुकटच्या प्रसिद्धीचा त्याला मनातून आनंदच होत असावा! सहसा टाईम सारख्या मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान कोणा अंपायरला मिळत नाही! या निमित्ताने इद्रीसला तो मिळाला!"

एमसीसीचा अध्यक्ष असलेल्या लॉर्ड अलेक्झांडर ऑफ ट्युनिस याने पाकिस्तान गव्हर्नर जनरलला फोन लावून दिलगीरी व्यक्त केली. दोन्ही देशांतील संबंध सुरळीत राहवे म्हणून दौरा रद्द करण्याचीही आपली तयारी असल्याचं त्याने गव्हर्नर जनरलपाशी बोलून दाखवलं. गव्हर्नर जनरलने त्याला दौरा रद्द न करण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांचही तसंच मत पडल्यामुळे दौरा पुढे सुरु राहिला!

एमसीसीचा मॅनेजर असलेल्या डग्लस हॉवर्डने अत्यंत कौशल्याने ही परिस्थिती हाताळली! कॅप्टन डोनाल्ड कारचा वास्तवीक या सगळ्या प्रकरणाशी काहीच संबंध नव्हता! परंतु हॉवर्डच्या सांगण्यावरुन त्याने आपल्या सहकार्‍यांच्या कृत्याची जबाबदारी स्वीकारुन बेगला बिनशर्त माफीनामा लिहून दिला! कारच्या या कृतीमुळे तंग वातावरण निवळण्यास बर्‍याच प्रमाणात मदत झाली!

ओमर कुरेशीच्या मते,
"इंग्लिश खेळाडूंचा हेतू हा केवळ इद्रीसची गंमत करण्याचाच असावा, परंतु तो हातात सापडल्यावर एक-दोघांचा राग उफाळून आला असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! अर्थात या सगळ्याला इद्रीसची वादग्रस्तं अंपायरींग हे मुख्यं कारण होतं!"

कराचीच्या चौथ्या अनधिकृत टेस्टमध्ये अंपायर म्हणून पुन्हा इद्रीस बेगच उभा राहिला!

पाकिस्तानला १७८ मध्ये गुंडाळणार्‍या एमसीसीला आपल्या पहिल्या इनिंग्जमध्ये १८४ पर्यंतच मजल मारता आली! फजल मेहमूदच्या बॉलवर इम्तियाज अहमदने जिम पार्क्सचा कॅच घेतल्याचं आणि डोनाल्ड कार एलबीडब्ल्यू असल्याचं अपिल उचलून धरत बेगने आपली 'चुणूक' दाखवलीच! अर्थात पाकिस्तानची दुसरी इनिंग्ज १३० मध्ये आटपल्याने एमसीसीला विजयासाठी केवळ १२६ रन्स हव्या होत्या! परंतु त्या १२६ रन्स गाठेपर्यंत एमसीसीच्या ८ विकेट्स गेल्या होत्या! अर्थात ब्रायन क्लोज, पार्क्स आणि फ्रेड टिटमसला एलबीडब्ल्यू देऊन इद्रीसने आपला वाटा उचलला होताच! परंतु शेवटी स्वेटमन आणि लॉकने प्रत्येक बॉल बॅटने खेळण्याचं तंत्रं अंमलात आणल्याने बेगचाही नाईलाज झाला!

इद्रीस बेगच्या अंपायरींगचा इतका गवगवा झाला होता की आणखीन एका माणसाला त्याची दखल घ्यावी लागली!

इस्कंदर मिर्झा!
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष!

कराचीची मॅच संपल्यावर कारदार आणि डग्लस हॉवर्डला इस्कंदर मिर्झांनी बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडून सगळा प्रकार समजून घेतला. डग्लस हॉवर्डने इद्रीस बेगच्या अजब आणि पक्षपाती निर्णयांची जंत्रीच मिर्झांपुढे ठेवली! कारदारने उलट इंग्लिश खेळाडूंनाच दोष दिला! बेगचं समर्थन करताना एमसीसीच्या खेळाडूंनी अंपायरच्या निर्णयाविरुद्ध नाराजी प्रगट करणं हे खिलाडूवृत्तीला धरुन नाही असं कारदारने प्रतिपादन केलं! दोघांचंही म्हणणं ऐकून घेतल्यावर इस्कंदर मिर्झा म्हणाले,

"I have to say that I form the view that Idris Begh, as an umpire, is a cheat!”
“But he is the best we’ve got!” कारदार त्या परिस्थितीतही उद्गारला!
"The best umpire? Or the best cheat?” मिर्झांनी मार्मिक प्रश्न केला!

इंग्लंडला परतल्यावर एमसीसीने डोनाल्ड कारला शिस्तपालन समितीपुढे बोलावून त्याची हजेरी घेतली, पण त्याच्यावर कोणतीही कारवाई मात्रं केली नाही!

इद्रीस बेगला 'किडनॅप' करणारे इंग्लिश खेळाडू कोण होते हे बरीच वर्ष गुलदस्त्यातच राहीलं! बर्‍याच वर्षांनी फ्रेड टिटमसने याचा खुलासा केला! टिटमसच्या सांगण्यानुसार तो स्वत:, केन बॅरींग्टन, जिम पार्क्स, ब्रायन क्लोज, बिली सटक्लीफ आणि अ‍ॅलन मॉस यांनी बेगची उचलबांगडी करुन त्याला 'धुवून' काढला होता! इद्रीससाठी एक खास टायही बनवण्यात आल्याचंही टिटमसने स्पष्टं केलं! या टायवर एका बोटाचं चित्रं आणि त्याखाली बेगच्या नावाची आद्याक्षरं - IB लिहीण्यात आली होती!

पुढे १९७० मध्ये डोनाल्ड कार अनेक टेस्ट क्रिकेटर्सचा समावेश असलेला संघ घेऊन पाकिस्तानमध्ये चॅरीटी मॅचेस खेळण्यास गेला होता. यापैकी एका मॅचच्या वेळेस इद्रीस बेगशी गाठ पडल्यावर बेगने त्याची गळाभेट घेतली! दोघं ड्रेसिंगरुममधून बाहेर पडत असतानाच दोन इंग्लिश खेळाडू पाण्याने भरलेली बादली घेऊन समोर आले!

“Would this help?” बेगकडे पाहून मिष्कीलपणे त्यांनी विचारलं!
डोनाल्ड कारच्या हसण्यात खुद्द बेगही सामील झाला होता!

पाकिस्तानी अंपायर्स चिकीखाऊ म्हणून सार्थपणे बदनाम झालेले असले तरी ऑस्ट्रेलियन अंपायर्सही फारसे मागे नव्हते!

१९७०-७१ मध्ये रे इलिंगवर्थच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात अ‍ॅशेस सिरीज खेळण्यासाठी आला होता. इलिंगवर्थच्या या संघात जॉन एड्रीच, जेफ बॉयकॉट, कॉलिन कौड्री, कीथ फ्लेचर, ब्रायन लकहर्स्ट हे बॅट्समन, अ‍ॅलन नॉट सारखा विकेटकीपर, जॉन स्नो सारखा खतरनाक फास्ट बॉलर आणि त्याच्या जोडीला पीटर लिव्हर, अ‍ॅलन वॉर्ड, डेरेक 'डेडली' अंडरवूड यांचा समावेश होता. उत्कृष्ट ऑलराऊंडर इलिंगवर्थच्या जोडीला बेसिल डॉलिव्हिएराही होता त्याशिवाय दोन तरूण फास्ट बॉलर्स होते... केन शटलवर्थ आणि बॉब विलीस!

इंग्लंडच्या तोडीसतोड ऑस्ट्रेलियाचा संघ होता. बिल लॉरीच्या ऑस्ट्रेलियन संघात स्वतः लॉरी, कीथ स्टॅकपॉल, इयन चॅपल, डग वॉल्टर्स, इयन रेडपाथ यांच्यासारखे उत्कृष्ट बॅट्समन, ग्रॅहेम मॅकेंझीसारखा फास्ट बॉलर होता! त्याच्या जोडीला टेरी जेनर (शेन वॉर्नचा गुरु!), जॉनी ग्लीसनसारखे स्पिनर्स होते. इतर बॉलर्स अननुभवीच असले तरी या सिरीजमध्ये पदार्पण करणारे काही खेळाडू पुढे ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि जागतिक क्रिकेटमध्ये कितीतरी वर्ष गाजले! ग्रेग चॅपल, रॉडनी मार्श आणि डेनिस लिली!

मात्रं हे सगळे रथी-महारथी असूनही ही सिरीज गाजवली ती तिघा ऑस्ट्रेलियन अंपायर्सनी!
टॉम ब्रूक्स, मॅक ओकोनेल आणि खासकरुन लू रोवन!

लू रोवन हा क्वीन्सलँडच्या ड्रग स्क्वाडमधला डिटेक्टीव्ह सार्जंट होता. पोलिस अधिकारी असलेला रोवन आपल्या कामाबाबत आणि विशेषतः अधिकारवाणीने खेळाडूंना ठणकावण्याबाबत कमालीचा दक्षं होता! खेळाडूंची इतकीशीही आगळीक किंवा खेळकरपणा त्याला खपत नसे!

१९७०-७१ च्या अ‍ॅशेस सिरीजपूर्वी रोवनची एमसीसी आणि इंग्लंडच्या अनेक खेळाडूंशी गाठ पडली होती. तत्कालीन इंग्लंडमधील खेळाडूंच्या प्रोफेशनल - अमॅच्युअर्स (व्यावसायिक - हौशी) अशा विभागणीबद्दल त्याची स्वतःची काही खास मतं होती! गबी अ‍ॅलन, बिली ग्रिफीथ, माईक स्मिथ, कॉलिन कौड्री यांच्यासारख्या अमॅच्युअर खेळाडूंच्या हातीच एमसीसीची धुरा राहवी आणि संघाचं कॅप्टनपद राहवं असं त्याचं ठाम मत होतं! अमॅच्युअर कॅप्टन्सच रे इलिंगवर्थ आणि जॉन स्नो सारख्या त्रासदायक प्रोफेशनल खेळाडूंना काबूत ठेवू शकतात असा त्याचा सिद्धांत होता!

पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावर कॅप्टन बिल लॉरी आणि कीथ स्टॅकपॉल ओपनिंगला आले. वास्तविक स्टॅकपॉल हा मिडल ऑर्डर बॅट्समन, पण शॉर्टपीच बॉलिंगचा मुकाबल करु शकणारा सर्वोत्कृष्ट बॅट्समन असल्याने लॉरीने त्याला सलामीला आणलं होतं. जॉन स्नोच्या बाऊंसरवर हूक मारणार्‍या लॉरीचा अ‍ॅलन नॉटने कॅच घेतल्यावर इयन चॅपल आणि स्टॅकपॉल सावधपणे खेळत असतानाच....

बेसिल डॉलिव्हिएराचा एक बॉल स्टॅकपॉलने लेगसाईडला वळवला आणि चॅपलला रनसाठी कॉल दिला. रन काढण्यासाठी सदैव तयार असलेल्या चॅपलने स्टॅकपॉलला अपेक्षीत प्रतिसाद दिला, परंतु मिडविकेटला असलेल्या बॉयकॉटने कमालीच्या चपळपणे फिल्ड केलेल्या बॉलचा डायरेक्ट थ्रो नॉनस्ट्रायकर एंडच्या स्टंप्सवर अचूक बसला! इंग्लिश खेळाडूंनी अर्थातच रनआऊटसाठी जोरदार अपील केलं. स्टॅकपॉल आऊट असल्याची त्यांना पक्की खात्री झाली होती! परंतु...

"नॉट आऊट!" अंपायर लू रोवन थंडपणे उत्तरला!

इंग्लिश खेळाडू रोवनच्या या निर्णयाने हवालदिल झाले!
दिवसाचा खेळ संपला तेव्हा कीथ स्टॅकपॉल १७५ रन्स काढून नॉटआऊट होता!
त्याच्या जोडीला होता डग वॉल्टर्स!

टी टाईमनंतर बाऊंड्रीवर फिल्डींग करणार्‍या जॉन एड्रीचला एका प्रेक्षकाने सुनावलं,
"You're following in your cousin's footsteps you know. I was sitting here 25 years ago and he spent all day chasing the ball along the same piece of grass. He didn't stop much either!"

(२५ वर्षांपूर्वीच्या ज्या टेस्टचा त्या प्रेक्षकाने उल्लेख केला होता, त्या मॅचमध्ये एड्रीचचा चुलतभाऊ विल्यम 'बिल' एड्रीच खेळत होता. पहिल्या दिवशी ४६/२ अशा परिस्थितीतून दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाने ३०८/२ अशी मजल मारली होती ती लिंडसे हॅसेट (८१*) आणि डॉन ब्रॅडमन (१६२*) यांच्या पार्टनरशीपमुळे!)

वैतागलेल्या जॉन स्नोने डव वॉल्टर्सला लागोपाठ तीन शॉर्टपीच बॉल टाकले. अंपायर रोवनने तडक त्याला बॅट्समनला घाबरवणारी बॉलिंग (इंटीमिडेटरी) न करण्याची ताकीद दिली! स्नो अधिकच वैतागला! त्याच्या मते हे बॉल शॉर्ट ऑफ गुडलेंग्थ असल्याने बॅट्समनच्या कमरेपासून ते छातीपर्यंतच्या भागातच (रिबकेज) उसळत होते, त्यामुळे यांना बंपर म्हणणं त्याच्या मते चुकीचं होतं! अर्थात स्नोचं हे मत पूर्णपणे चुकीचं नव्हतं. बंपर हा डोक्यापर्यंत उसळणारा चेंडू म्हणून ओळखला जात होता, परंतु आपल्या अधिकाराबाबत ठाम असलेल्या अंपायर रोवनला हे पटणं शक्यंच नव्हतं!

दुसर्‍या दिवशीच्या झाडून सर्व ऑस्ट्रेलियन पेपर्समध्ये स्टॅकपॉल रनआऊट असल्याचं स्पष्टपणे दाखवणारा फोटो छापून आला! फोटोखाली कॅप्शन होतं,

"one of the worst in cricket history!"

एवढा ढळढळीत पुरावा समोर असूनही आपला निर्णय चुकीचा आहे हे मान्य करण्यास रोवनने स्पष्टं नकार दिला!

स्टॅकपॉलने २०७ रन्स फटकावल्या! तो १८ वर रनआऊट झाला असता तर कदाचित मॅचचा निकाल वेगळा लागू शकला असता! निदान रे इलिंगवर्थला तरी तसंच वाटत होतं!

दुसरी टेस्ट होती वेस्टर्न ऑस्ट्रेलियात पर्थला!
पर्थच्या वॅका ग्राऊंडवरची ही पहिलीच टेस्ट होती!

बिल लॉरीने टॉस जिंकल्यावर सर्वांच्या अपेक्षेला धक्का देत फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला! इंग्लंडला बॅटींग करावी लागणार असल्याचं कळल्यावर रे इलिंगवर्थने पीचवर रोलर फिरवण्याची मागणी केली. इलिंगवर्थची ही मागणी योग्यच होती, परंतु....

अंपायर रोवनने या मागणीला नकार दिला!

आपली चूक ध्यानात आल्यावर लंचमध्ये रोवनने दिलगीरी व्यक्तं केली असली तरी इलिंगवर्थचं त्याच्याबद्दलचं मत फारसं बदलण्याची शक्यता नव्हती!

पहिल्या इनिंग्जमध्ये इंग्लंडने ३९७ रन्स काढल्यावर ऑस्ट्रेलियाच्या इनिंग्जमध्ये पीटर लिव्हर आणि केन शटलवर्थ दोघांचीही एलबीडब्ल्यूची जोरदार अपील्स रोवनने नाकारली! वैतागलेल्या शटलवर्थने अंपायर रोवनच्या एंडने बॉलिंग करण्यास नकार दिला! जॉन स्नोने लॉरी आणि स्टॅकपॉल दोघांनाही ८ रन्समध्ये गुंडाळलं! इयन रेडपाथ (१७१) आणि पहिल्याच टेस्टमध्ये खेळणारा ग्रेग चॅपल (१०८) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने ४४० पर्यंत मजल मारली. इंग्लंड्च्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये बॉयकॉट आणि एड्रीच आरामात खेळत असताना ९८/१ वरुन अचानक इंग्लंडची १०१/४ अशी घसरगुंडी उडाली!

मात्रं यात जॉनी ग्लीसन इतकाच अंपायर रोवनचा 'हात' होता!
कीथ फ्लेचरला लेगस्टंपच्या बाहेर पॅडला बॉल लागूनही त्याने एलबीडब्ल्यू दिलं होतं!

ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये स्नो आणि रोवन यांच्यात वादाची पुन्हा ठिणगी पडली!

शॉर्टपीच बॉल हुक करण्याच्या नादात स्नोने स्टॅकपॉल आणि इयन चॅपलला हुकच्या ट्रॅपमध्ये अडकवलं! चॅपल बाद झाल्यावर आलेल्या डग वॉल्टर्सवरही स्नोने शॉर्टपीचचा मारा केल्यावर पुन्हा अंपायर रोवनने त्याला हा प्रकार थांबवण्याची ताकीद दिली!

स्नो आणि रोवन यांची चांगलीच बोलाचाली झाली! रिबकेजपर्यंत उसळलेला बॉल बंपर नसल्याच्या आपल्या मतावर स्नो ठाम होता. रोवनची ताकीद धुडकावून लावत त्याने शॉर्टपीच बॉलिंग सुरुच ठेवली!

स्नो जुमानत नसल्याचं पाहून रोवनमधला 'पोलिस' जागा झाला असावा!
त्याने पुन्हा एकदा स्नोला वॉर्निंग दिली!
अर्थात स्नोवर त्याचा काडीचाही परिणाम झाला नाही!
डग वॉल्टर्सला टाकलेला त्याचा पुढचा बॉलही शॉर्टपीचच होता!

अंपायर रोवनने इलिंगवर्थला बोलावून स्नोला शॉर्टपीच बॉलिंग बंद करण्याविषयी सांगण्यास फर्मावलं! इतकंच करुन रोवन थांबला नाही तर दुसरा अंपायर टॉम ब्रूक्सला स्नोला ऑफिशियल वॉर्निंग दिल्याची त्याने खूण केली!

आता मात्रं इलिंगवर्थचंही माथं भडकलं! त्याच्या मते हा सरळसरळ पक्षपातीपणा होता. इंग्लंडच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये बंपरचा मनमुराद वापर करणार्‍या अ‍ॅलन थॉमसनला रोवन एका शब्दाने काही बोलला नव्हता!

स्नो आणि इलिंगवर्थ यांनी काही क्षण आपसात चर्चा केली. दुसरी ऑफिशियल वॉर्निंग मिळाल्यास स्नोला बॉलिंग करता येणार नाही याची दोघांनाही कल्पना होती, परंतु असाही त्याच्या बॉलिंगने काही फरक पडत नव्हता कारण मॅच ड्रॉ होणार हे नक्की होतं. ही स्नोची अखेरचीच ओव्हर असणार आहे असं इलिंगवर्थने त्याला स्पष्टं केलं!

ओव्हरचा शेवटचा बॉल हा खराखुरा बंपर होता!

डग वॉल्टर्सच्या डोक्यावरुन तुफान वेगाने गेलेला बॉल नॉट पकडत असतानाच स्नो वळून अंपायर रोवनला म्हणाला,
"Now, that's a fucking bouncer for you!"

मेलबर्नच्या तिसर्‍या टेस्टमध्ये रे इलिंगवर्थने टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय घेतला, परंतु मॅच सुरू होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली! पुढचे तीन दिवस सतत पाऊस पडल्याने अखेर ही मॅच रद्द करावी लागली! मेलबर्नच्या ग्राऊंड्समननी मॅच खेळण्यास ग्राऊंड उत्तम आहे असं दडपून सांगितल्यावर भूतपूर्व ऑस्ट्रेलियन कॅप्टन इयन जॉन्सनने अंपायर रोवन आणि ब्रूक्स यांच्यावर दडपण आणून खेळ सुरु करण्याचा प्रयत्न करुन पाहिला, पण रोवन बधला नाही! त्याच्या या ठाम निर्णयाबद्द्ल इलिंगवर्थ आणि स्नो सकट सर्वांनी त्याचं कौतुक केलं होतं!

एमसीसी आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांमध्ये चर्चा झाल्यावर याच मॅचच्या पाचव्या दिवशी प्रत्येकी ४० ओव्हर्सची एक मॅच खेळवण्यात आली.

.... आणि वन डे क्रिकेटचा जन्म झाला!

अंपायर रोवन आणि ब्रूक्स वनडेत अंपायरींग करणारे पहिले अंपायर म्हणून क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाले!

वन डे बरोबरच मूळ कार्यक्रमात बदल करुन सिडनीच्या मैदानात सातवी टेस्ट खेळवण्यासही इंग्लंडचा मॅनेजर डेव्हीड क्लार्कने एमसीसी आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला राजी केलं होतं! मात्रं या सगळ्या हालचालींत इलिंगवर्थचं मत विचारात घेण्याची क्लार्कला आवश्यकता भासली नाही! इलिंगवर्थ आणि इतरांना सातव्या टेस्टची बातमी कळली ती ड्रेसिंगरुममध्ये त्यांचे आभार मानण्यासाठी आलेल्या डॉन ब्रॅडमनकडून! या घटनेनंतर इलिंगवर्थने डेव्हीड क्लार्कला दूर सारून संपूर्ण दौर्याची सूत्रं स्वतःच्या हाती घेतली!

सिडनीच्या चौथ्या टेस्टमध्ये जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रेकॉर्ड ४१६ रन्स करण्याचं इलिंगवर्थने आव्हान दिलं होतं!

स्नोच्या तुफानी बॉलिंगपुढे ऑस्ट्रेलियाची अवस्था २१/४ अशी झाली! चौथ्या दिवसा अखेरीस लॉरी आणि स्टॅकपॉल नॉटआऊट होते! ऑस्ट्रेलियाच्या उरल्यासुरल्या आशा या दोघांवरच अवलंबून होत्या!

पाचव्या दिवशी सकाळी तिसर्‍याच ओव्हरमध्ये स्नोचा आऊटस्विंगर स्टॅकपॉलच्या बॅटला लागून नॉटच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला! इंग्लिश खेळाडूंनी जोरदार अपील केलं. आपण आऊट असल्याची कल्पना असल्याने स्टॅकपॉलने वळून ड्रेसिंगरुमच्या दिशेने पाऊल उचललंही! तोच...

"नॉट आऊट!" अंपायर रोवनचे शब्दं स्टॅकपॉल, स्नो आणि इतरांच्या कानात शिरले!

स्टॅकपॉलने विशादाने हसत पुन्हा खेळण्यास सुरवात केली!
खवळलेल्या स्नोने पुढचे तीन बॉल ओळीने शॉर्टपीच टाकले!
ताबडतोब रोवनने स्नोला ताकीद दिली!
अर्थात स्नोवर त्याचा कवडीचाही परिणाम झाला नाही!
उलट स्टॅकपॉलला नॉटआऊट दिल्यामुळे भडकलेल्या स्नोने शॉर्टपीचचा मारा आरंभला!

अनुभवी ग्रॅहॅम मॅकेंझीने ४७ बॉल खेळून काढले. मॅकेंझी सावधपणे खेळत असतानाच....

स्नोचा किंचीत शॉर्टपीच बॉल अपेक्षेपेक्षा बराच उसळला आणि मॅकेंझीच्या चेहर्‍यावर आदळला!

मॅकेंझी जखमी झाल्यामुळे बाहेर जात असतानाच सिडनीच्या प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करण्यास सुरवात केली, परंतु जमाव काबूत आणण्यास पोलिसांना यश आल्यामुळे अनावस्था प्रसंग ओढवला नाही!

बिल लॉरी (६०*) आणि स्टॅकपॉल (३०) यांच्याव्यतिरिक्त कोणीच स्नोसमोर उभं राहू शकलं नाही! ७ विकेट्स घेत त्याने ११६ रन्समध्ये ऑस्ट्रेलियाचा फडशा पाडला! इंग्लंडने सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतली!

मेलबर्नच्या पाचव्या टेस्टमध्ये पहिल्याच इनिंगमध्ये इंग्लंडला पुन्हा एकदा अंपायरच्या चुकीचा झटका बसला!

स्नोच्या पहिल्याच ओव्हरचा शेवटच्या बॉलवर नॉटने स्टॅकपॉलचा कॅच घेतला!
परंतु अंपायर मॅक्स ओकोनेलने नॉटने कॅच घेण्यापूर्वीच 'ओव्हर' म्हणून स्क्वेअरलेगच्या दिशेने कूच केलं होतं! इंग्लिश खेळाडूंनी अपिल केल्यावर ओकोनेलला आपली चूक ध्यानात आली, पण एकदा 'ओव्हर' पूर्ण झाल्याचं जाहीर केल्यावर स्टॅकपॉलला आऊट देणं शक्यंच नव्हतं!

या प्रकारामुळे स्नो वैतागला असला तरी त्याने ओकोनेलला मात्रं दोष दिला नाही. तो म्हणतो,
"That was his first over in Tests as umpire. I could quite understand his actions which illustrate the pressure umpires are also under in a test!'

इंग्लंडच्या इनिंग्जमध्ये अ‍ॅलन थॉमसनने सुरवातीपासूनच शॉर्टपीच बॉलचं सत्रं आरंभलं होतं. थॉमसनच्या शॉर्टपीच बॉल्समुळे लकहर्स्टच्या दोन्ही हाताची बोटं सडकून निघाली होती. डाव्या हाताची तीन बोटं प्लास्टरमध्ये असूनही लकहर्स्टने १०९ रन्स फटकावल्या!

रे इलिंगवर्थ खेळायला येताच अ‍ॅलन थॉमसनने त्याला एका ओव्हरमध्ये सहा बंपर्स टाकले! दरवेळी बंपर खेळून झाल्यावर इलिंगवर्थ अंपायर रोवनकडे रोखून पाहत होता, परंतु रोवनने एका थॉमसनला उद्देशून चकार शब्दही काढला नव्हता! स्नो बॅटींगला आल्यावर तर थॉमसनने त्याला शॉर्टपीच सोडून कोणताही बॉल टाकला नव्हता! ४७ मिनीटांत १ रन केल्यावर इयन चॅपलने अखेर स्नोला बोल्ड केलं!

इंग्लंडची इनिंग्ज ३९३ मध्ये संपुष्टात आल्यावर खेळायला आलेल्या लॉरीला स्नोने तुफान वेगात दोन शॉर्टपीच बॉल टाकल्याबरोबर रोवनने त्याला ताकीद दिली!

भडकलेल्या स्नो आणि इलिंगवर्थची रोवनशी चांगलीच बाचाबाची झाली! दोघांनीही रोवनवर पक्षपातीपणाचा उघड आरोप केला. बंपर्सचा मनमुराद वापर करणार्‍या थॉमसनवर कोणताही आक्षेप न घेणार्‍या रोवनने केवळ शॉर्टपीच बॉल टाकण्यावरुन स्नोला ताकीद देणं दोघांनाही मानवणारं नव्हतंच!

अ‍ॅडलेडच्या सहाव्या टेस्टमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावर बॉयकॉट (५८) आणि एड्रीच (१३०) यांनी १०७ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप रचली. बॉयकॉट सिरीजमधलं दुसरं शतक झळकावणार असं वाटत असतानाच....

ऑफस्पिनर अ‍ॅश्ली मॅलेटचा बॉल कव्हर्समध्ये खेळल्यावर एड्रीचने बॉयकॉटला रनसाठी कॉल दिला. बॉयकॉटने तत्परतेने एड्रीचला प्रतिसाद दिला खरा, परंतु तो क्रीजमध्ये पोहोचण्यापूर्वीच कव्हर्समधून इयन चॅपलचा डायरेक्ट थ्रो अचूक स्टंप्सवर लागला! अंपायर ओकोनेलने बॉयकॉट रनआऊट असल्याचा निर्णय दिला, परंतु बॉयकॉटला मात्रं ते मान्यं नव्हतं! त्याने भर मैदानावर अंपायरशी हुज्जत घालण्यास सुरवात केली! एका क्षणी तर चिडून त्याने आपली बॅटही मैदानावर फेकून दिली!

चॅपलचा थ्रो स्टंपवर लागला तेव्हा बॉयकॉटने क्रीजमध्ये बॅट टेकवलेली नसल्यामुळे तो आऊट होता. बॉयकॉटला मात्रं ते पचनी पडत नव्हतं! खासकरुन नेमक्या अशाच परिस्थितीत पहिल्या टेस्टमध्ये स्वतः बॉयकॉटचा थ्रो स्टंपवर लागलेला असताना बॅट हवेत असूनही स्टॅकपॉलला नॉटआऊट देण्यात आलं होतं! त्यामुळे अंपायरचा निर्णय बॉयकॉटच्या जास्तंच जिव्हारी लागला होता!

बॉयकॉटच्या या वर्तणुकीबद्द्ला त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. आऊट असल्याचं फोटोवरुन स्पष्टं दिसत असूनही आपल्या वर्तणूकीबद्दल माफी मागण्यास त्याने साफ नकार दिला! आपल्याला चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याचं त्याचं ठाम मत होतं! मात्रं नंतर अंपायर ओकोनेलची भेट घेऊन त्याने दिलगीरी व्यक्त केली.

दुसर्‍या इनिंग्जमध्ये लोकांच्या हुल्लडबाजीला जराही भीक न घालता बॉयकॉट ११९ रन्स काढून नॉटआऊट राहिला! जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर ४७० रन्सचं लक्ष्यं ठेवल्यावर बिल लॉरीने त्याची 'जोक' अशी संभावना केली!

डॉन ब्रॅडमनच्या सिलेक्शन कमिटीने लॉरीच्या जागी कॅप्टन म्हणून इयन चॅपलची नेमणूक केली! आपल्या गच्छन्तीची बातमी लॉरीला कळली ती रेडीओवर बातम्या ऐकताना! याच टेस्टमध्ये २२ वर्षांच्या एका फास्ट बॉलरने पदार्पण केलं! इंग्लंडच्या पहिल्या इनिंग्जमध्ये त्याने ८४ रन्समध्ये ५ विकेट्स काढल्या!

डेनिस कीथ लिली!

लू रोवन आणि स्नो - इलिंगवर्थ यांच्यातील वाद कळसाला पोहोचला तो सिडनीच्या सातव्या टेस्टमध्ये!

सिडनीच्या मैदानावर इयन चॅपलने टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची इनिंग्ज १८४ वर आटपली, परंतु ऑस्ट्रेलियाचा हा आनंद क्षणभंगूरच ठरला. पीटर लीव्हरच्या बॉलवर नॉटने केन इस्टवूडचा कॅच घेतल्यावर स्नोने स्टॅकपॉलची दांडी उडवल्याने ऑस्ट्रेलियाची अवस्था १३/२ अशी झाली!

दुसर्‍या दिवशी सकाळी स्नो आणि रोवन यांचा पुन्हा खटका उडाला!

इयन रेडपाथ आणि डग वॉल्टर्स खेळत असताना स्नोने रेडपाथला दोन शॉर्टपीच बॉल टाकल्याबरोबर अंपायर रोवनने त्याला ताकीद दिली!

उत्तरादाखल स्नोने टाकलेला पुढचा बॉल रेडपाथच्या डोक्यावरुन पार झाला!
“That’s a real bouncer.” स्नो अंपायर रोवनला म्हणाला!

इलिंगवर्थने पुन्हा एकदा शॉर्टपीच बॉल आणि बंपर यातील फरक अंपायर रोवनच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्नं केला.

"The shortpitched Snowy is bowling is not really a bouncer!" इलिंगवर्थ म्हणाला.
“Someone’s bowling them from this end and it’s not me.” रोवन थंडपणे उत्तरला!

स्नोच्या मते शॉर्टपीच बॉलची बंपर्स म्हणून संभावना करत रोवन ऑस्ट्रेलियन बॅट्समनच्या शॉर्टपीच बॉल खेळण्याच्या टेक्नीकमधले दोष झाकण्याचा प्रयत्न करत होता!

"The Australian batsmen were simply not good enough to face chest high balls, and Rowan was confusing their technical shortcomings with intimidatory bowling. Some umpires cannot seem to distinguish between a cricket ball bouncer and a dance hall variety!"

रेडपाथ आणि वॉल्टर्स यांनी ८१ रन्सची पार्टनरशीप करुन ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज सावरत असतानाच रोवनने पुन्हा एकदा इंग्लंडला आपला 'हात' दाखवला!

डेरेक अंडरवूडचा टॉपस्पीनर लेगला खेळण्याच्या नादात वॉल्टर्सच्या बॅट आणि पॅडला लागून ऑफसाईडला घरंगळला. चाणाक्षं अ‍ॅलन नॉटने चपळाईने बॉल उचलून स्टंपवर फेकला. दरम्यान बॉल नेमका कुठे आहे याची कल्पना नसलेला वॉल्टर्स क्रीज गाठण्यासाठी मागे फिरला. वॉल्टर्सची बॅट क्रीजमध्ये टेकण्यापूर्वी हवेत असतानाच नॉटचा थ्रो स्टंपवर लागला होता! नॉट आणि इतर इंग्लिश खेळाडूंनी स्क्वेअरलेग अंपायरकडे स्टंपिंगसाठी जोरदार अपील केलं.

"नॉट आऊट!" अंपायर रोवन थंडपणे म्हणाला.

रोवनच्या मेहेरबानीमुळे ४१ वर खेळत असलेला वॉल्टर्स वाचला होता!
परंतु आणखीन १ रन काढल्यावर अंडरवूडने पुन्हा वॉल्टर्सला चकवलं!
यावेळी मात्रं वॉल्टर्स स्टंप असल्याचा निर्णय दिला!
अंपायर टॉम ब्रूक्सने!

चॅपल आणि टेरी जेनरने ऑस्ट्रेलियाला १९५ पर्यंत नेल्यावर इलिंगवर्थने बॉल हाती ठेवला जॉन स्नोच्या!

स्नोचा पहिलाच शॉर्टपीच बॉल जेनरने कसाबसा खेळला आणि एक रन काढली! ग्रेग चॅपलने पुढचे दोन बॉल खेळून काढल्यावर चौथ्या बॉलवर एक रन काढली आणि पुन्हा जेनर नामक बळीचा बकरा स्नो समोर आणला! स्नोचा पाचवा बॉल तुफान वेगात उसळला होता, केवळ वेळेवर जेनरने आपलं डोकं बाजूला घेतलं होतं! सहावा बॉलही शॉर्टपीचच होता, जेनरने तो पीचवर बसकण मारुन 'डक' केला होता!

पुढचा बॉल टाकण्यापूर्वी इलिंगवर्थने फिल्डींग बदलण्याचा निर्णय घेतला. मिडऑफला असलेला बॉब विलिस मिडऑनला आला! डेरेक अंडरवूड लाँगलेगला, जॉन हँपशायर बॅकवर्ड शॉर्टलेग आणि स्वतः कॅप्टन इलिंगवर्थ फॉरवर्ड शॉर्टलेग!

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेल्या जिम स्वँटनच्या तोंडून ही फिल्डींग पाहून उस्फूर्तपणे उद्गार बाहेर पडला,
"बॉडीलाईन!"

जॉन स्नोचा सातवा बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथवरुन उसळला...
आणि
डोळे झाकून 'डक' करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टेरी जेनरच्या डोक्याच्या डाव्या बाजूला आदळला!
जेनर डोक्यावर हात धरुन पीचवर कोसळला!

पीटर लिव्हर आणि रे इलिंगवर्थ यांनी सर्वात आधी जेनरकडे धाव घेतली!
तो डोकं धरुन सुन्नपणे बसला होता!
खवळलेल्या प्रेक्षकांनी इंग्लिश खेळाडूंच्या नावाने शिव्याशाप देण्यास सुरवात केली!
त्यांचा रोख अर्थातच इलिंगवर्थ आणि स्नो यांच्यावर होता!

पीटर लिव्हर आणि बॉब विलीस - दोघांनी जेनरला उभं राहण्यास मदत केली. ऑस्ट्रेलियन मसाजिस्ट आणि लिव्हर यांच्या सहाय्याने जेनर अडखळत चालत जेनर ड्रेसिंगरुममध्ये परतला. जेनरची जागा घेण्यासाठी डेनिस लिली क्रीजवर येऊन पोहोचला होता. जेनर मैदानातून बाहेर पडल्यावर प्रक्षुब्ध जमाव पूर्वपदावर येत असतानाच...

इतका वेळ शांत असलेल्या रोवनने स्नोला एका बाजूला घेतलं!
"This is the game of cricket. It has to be played fairly! Stop bowling bouncers!" रोवनने स्नोला सुनावलं!

अंपायरच्या या बोलण्याला स्नोने ठणकावून आक्षेप घेतला!
"That was not a bouncer! It was short pitched ball! For heaven's sake, Understand the difference!"

किमान दोन-तीन वेळा रोवनने खिलाडूवृत्तीला धरुन बॉलिंग करण्याचा स्नोला उपदेश केला! इतकंच नाही आपला सहकारी अंपायर टॉम ब्रूक्सच्या दिशेने एक बोट वर करुन त्याने स्नोला पहिली ऑफिशियल वॉर्निंग दिल्याचंही सूचित केलं!

अंपायर टॉम ब्रूकला मात्रं या भानगडीत पडण्याची मुळीच इच्छा नव्हती! अंपायर होण्यापूर्वी ब्रूक स्वतः एक फास्ट बॉलर होता! त्यामुळे शॉर्टपीच आणि बंपर यातला स्नो आणि इलिंगवर्थला अभिप्रेत असलेला फरक त्याला नेमका ठाऊक होता! एक-दोन वेळेस त्याने रोवनला समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु आपण सिनीयर अंपायर आहोत ही जाणिव असलेल्या रोवनने पोलिसी खाक्या दाखवत त्याला उडवून लावलं होतं!

स्नो म्हणतो,
"Umpire Brooke was a much likeable bloke. Being a fast bowler himself, he understood fast bowler's efforts and was not unduly harsh on bouncers unlike Lou Rowan."

एव्हाना भडकलेला इलिंगवर्थही स्नो आणि रोवन यांच्या वादावादीत सामिल झाला होता! अत्यंत तप्त सुरात तिघांचा संवाद सुरु होता. एकमेकांच्या दिशेने बोटं रोखून धमकावणीच्या सुरात तिघंही कमालीच्या आक्रमकपणे भांडत होते! जेनर मैदानाबाहेर गेल्यावर शांत झालेला जमाव या प्रकारामुळे हळूहळू पुन्हा प्रक्षुब्ध होऊ लागला होता!

जॉन स्नोच्या मते याला अंपायर रोवनच कारणीभूत होता. जेनरवर मैदानात उपचार सुरु असताना आणि नंतर लीव्हरच्या मदतीने तो मैदानातून बाहेर जाताना रोवनने इलिंगवर्थ आणि स्नो यांच्याशी चर्चा केली असती तर शांत झालेले प्रेक्षक पुन्हा चिडले नसते. इंग्लिश खेळाडूंविरुद्ध प्रेक्षकांना भडकवण्याच्या हेतूनेच रोवनने जेनर बाहेर जाईपर्यंत एक शब्दंही काढला नव्हता!

ओव्हर संपल्यावर आपली कॅप घेऊन स्नो फाईनलेग बाऊंड्रीवरच्या आपल्या जागी - पॅडींग्टन हिलच्या खाली फिल्डींगला आला. एव्हाना प्रक्षुब्ध झालेल्या ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी स्नोला उद्देशून शिव्या घालण्यास सुरवात केली होतीच! स्नोने कोणतीही प्रतिक्रीया व्यक्तं केली नाही! अंपायर रोवनच्या मते मात्रं स्नोनेच मुद्दाम प्रेक्षकांना शिव्या देण्यास सुरवात केली होती!

अचानक प्रेक्षकांपैकी कोणीतरी बियरचा कॅन स्नोच्या दिशेने भिरकावला!
पाठोपाठ अनेक कॅन्सचा पाऊस पडला!

दरम्यान बाऊंड्रीवर परतलेल्या स्नोचा एका ऑस्ट्रेलियन प्रेक्षकाने शर्ट पकडून ओढला!

स्नो म्हणतो,
"As I was wandering down I saw three English guys in the second row of the bleachers, nodded to them, and then I saw this figure beetling around the footpath with his head down! Suddenly there was a hand on my shoulder, and then the cans started! The three English guys got him by the neck and pulled him off. He was taking a sickie apparently; he had come down with his mates from Newcastle, and he was drunk!"

एव्हाना हा सगळा प्रकार पाहत असलेल्या इलिंगवर्थने एक अभूतपूर्व निर्णय घेतला!
आपल्या सगळ्या खेळाडूंना घेऊन मैदान सोडून ड्रेसिंगरुममध्ये परतण्याचा!

पॅडींग्टन हिलवरुन बियरच्या कॅन्सचा पाऊस पडण्यास सुरवात झाली होती! स्नो कॅन्स फेकणार्‍या प्रेक्षकांच्या आवाक्याबाहेर गेला आणि वळून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करु लागला तोच बॉब विलीसने त्याला गाठलं.

"Ray is taking us off!" विलीस स्नोला म्हणाला!

स्नोला कल्पना नसली तरी लाँगऑफला असलेल्या डेरेक अंडरवूडच्या दिशेनेही कॅन्स फेकण्यात आले होते! सुदैवाने अंडरवूडला एकही कॅन लागला नसला, तरी साईट स्क्रीन ऑपरेटरच्या डोक्यात कॅन बसल्यामुळे त्याला हॉस्पीटलमध्ये न्यावं लागलं!

इलिंगवर्थने आपल्या टीममधील खेळाडूंना घेऊन मैदानातून बाहेर पडून ड्रेसिंगरुम गाठली!

इलिंगवर्थच्या या पवित्र्यामुळे कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेला नील हार्वे आणि रिची बेनॉ, गबी अ‍ॅलन आणि डॉन ब्रॅडमनही अवाक् झाले होते! अंपायर रोवनलाही हा अनपेक्षीत धक्का होता!

"Come back on the field, or we will have to forefit the match to Australia!" रोवनने इलिंगवर्थला संदेश पाठवला!

"We will come back, once the ground is cleared of cans and fit to play!" इलिंगवर्थने ठणकावलं!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा सेक्रेटरी अ‍ॅलन बार्न्स मैदानावर हजर होता. त्याला पाहताच इलिंगवर्थ म्हणाला,
"Please anounce this over the public address system Mr. Barnes! If this happens again, I would lead my team off again! My players physical safety is most important to me and I would not allow the crowd to determine my field placings!"

तब्बल सात मिनीटांनी शांतता प्रस्थापित झाल्यावर इलिंगवर्थ आपल्या सहकार्‍यांसह मैदानावर परतला!
ग्रेग चॅपल आणि डेनिस लिली अद्याप मैदानावरच होते!
अंपायर रोवन आणि ब्रूकही!

इलिंगवर्थच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली. इलिंगवर्थच्या करीयरमधली ही सर्वात भयानक घोड्चूक आहे अशा शब्दांत बिल ओ रेली, जॅक फिंगल्टन, डेनिस कॉम्प्टन यांनी त्याची संभावना केली!

ऑस्ट्रेलियन कॅप्टन इयन चॅपल म्हणाला,
"Illingworth’s reaction had been rather hasty and unjustified! Although had I been the captain in a similar overseas situation, I might have done the same."

भूतपूर्व ऑस्ट्रेलियन कॅप्टन रिची बेनॉने इलिंगवर्थच्या निर्णयाचं समर्थन केलं.
"I would have done exactly as Illingworth had done." बेनॉ म्हणाला.

दुसर्‍या दिवशी वार्‍याच्या बदललेल्या दिशेचा फायदा घेण्यासाठी इलिंगवर्थने स्नोला अंपायर ब्रूकच्या एंडने बॉलिंगला आणलं. रोवनने मात्रं इलिंगवर्थने मुद्दाम स्नोला दुसर्या एंडने बॉलिंगला आणल्याचा आरोप केला!

डेनिस लिली आऊट झाल्यावर टाळ्यांच्या गजरात टेरी जेनर पुन्हा बॅटींगला आला! ग्रेग चॅपलच्या साथीने त्याने ऑस्ट्रेलियाला ८० रन्सचा लीड मिळवून दिला! इंग्लंडने दुसर्‍या इनिंगमध्ये ३०२ रन्स काढल्यावर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी २२३ रन्सची आवश्यकता होती! पहिल्याच ओव्हरमध्ये यॉर्करवर केन इस्टवूडची दांडी उडवून स्नोने ऑस्ट्रेलियाला हादरवलं! परंतु ऑस्ट्रेलियाच्या सुदैवाने स्नो केवळ दोनच ओव्हर्स टाकू शकला!

पीटर लिव्हरच्या शॉर्टपीच बॉलवर स्टॅकपॉलने मारलेला हुक टॉपएज लागल्यामुळे फाईनलेगच्या दिशेला आला! कॅच घेण्याचा आकांती प्रयत्न करणार्‍या स्नोच्या हातातून बॉल सुटून बाऊंड्रीपलीकडच्या गटारात गेला, पण या भानगडीत स्नोच्या उजव्या हाताच्या बोटांना लाकडी कुंपणात अडकून जबर दुखापत झाली! इतकी, की तो बॉलिंग टाकण्यास असमर्थ बनला होता!

इंग्लंडचा मुख्य बॉलर अशा रितीने निकामी ठरल्यावर ऑस्ट्रेलियाला हायसं वाटलं! ०-१ अशा पिछाडीवरुन सिरीज बरोबरीत सोडवण्याची आशा निर्माण झाली होती!

इयन चॅपल हुकच्या नादात आऊट झाल्यावर स्टॅकपॉलने आक्रमक पवित्रा घेत प्रत्येक बॉल फटकावण्याचं धोरण अवलंबलं! त्याच्या १३ रन्स झालेल्या असताना लिव्हरला कट करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि नॉटने त्याचा कॅच घेतला. इंग्लिश खेळाडूंनी जोरदार अपिल केलं पण...

"नॉट आऊट!" अंपायर रोवन!

लिव्हर वेड्यासारखा रोवनकडे पाहत राहिला!
इलिंगवर्थ आणि नॉटला काय बोलावं कळेना!

"It was really unbelievable! Everyone including spectators could hear the nick, except umpire Rowan!" पुढे त्याबद्दल बोलताना इलिंगवर्थ म्हणाला!

स्टॅकपॉल पुन्हा एकदा वाचला होता! मात्रं तो ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देवू शकला नाही! ऑस्ट्रेलियाला १६० रन्समध्ये गुंडाळून इंग्लंडने मॅच आणि २-० अशी सिरीज जिंकली!

हीच अंपायर लू रोवनची शेवटची टेस्ट ठरली!

रिटायर झाल्यावर रोवनने The Umpire’s Story या नावाने आपलं आत्मचरित्रं प्रसिद्धं केलं. यात त्याने इलिंगवर्थ आणि स्नो यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता! प्रत्यक्ष फोटोचा पुरावा असूनही प्रेक्षकांपैकी कोणीही स्नोचा शर्ट पकडलाच नव्हता असा त्याने दावा केला!

Cricket Rebel या आपल्या आत्मचरित्रात जॉन स्नोने रोवनबरोबर झालेल्या चकमकींचं तपशीलवार वर्णन केलं आहे. स्नो म्हणतो,

"I have never come across another umpire so full of his own importance, so stubborn, lacking in humour, unreasonable and utterly unable to distinguish between a delivery short of a length which rise around the height of the rib cage and a genuine bouncer which goes through head high'[6] and believed that chest high balls were not intimidatory!"

इंग्लिश खेळाडूंच्या मनात असलेला रोवनविषयीचा राग अनाठायी नव्हता! सात टेस्ट्सच्या या संपूर्ण सिरीजमध्ये एकाही ऑस्ट्रेलियन बॅट्समनला एलबीडब्ल्यू देण्यात आलं नाही! ५ इंग्लिश बॅट्समन मात्रं एलबीड्ब्ल्यू देण्यात आले होते! कीथ स्टॅकपॉलवर त्याने वेळोवेळी खास मेहेरनजर दाखवली होती!

१९७८ मध्ये सुनिल गावस्करचा भारतीय संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेला होता. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांमुळे दोन्ही देशांत असलेल्या राजकीय वैमनस्याच्या पार्श्वभूमीवर १७ वर्षांनंतर आखण्यात आलेल्या या दौर्‍याचं महत्वं निव्वळ अनन्यसाधारण असंच होतं. कोणत्याही अप्रिय घटनेविना हा दौरा पार पडणं हे दोन्ही देशांच्या दृष्टीने महत्वांचं होतं!

फैसलाबादच्या पहिल्या टेस्टमध्ये पाकिस्तानच्या पहिल्या इनिंग्जमधल्या ५०३ रन्सना भारताने ४६२ चं जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. रेस्ट डे नंतर चौथ्या दिवशी माजिद खान आणि सादिक महंमद बॅटींग करत होते. पहिल्याच टेस्टमध्ये खेळणारा कपिल देव जोशात बॉलिंग करत होता. कपिलच्या जोडीला दुसर्‍या एंडला बॉलिंग करत होता मोहिंदर अमरनाथ!

चौथ्या ओव्हरचा दुसरा बॉल टाकल्यावर अंपायरने मोहिंदरला एका बाजूला घेऊन ताकीद दिली!
"तू मुद्दामहून पीचवर धावत जातो आहेस! स्टॉप इट!"

मोहिंदर चकीत होऊन अंपायरकडे पाहत राहिला! कॅप्टन असलेल्या गावस्करला हा प्रकार कळल्यावर तो चांगलाच खवळला!

"जिमी विकेटवर धावत जात असेल तर दोन दिवसांपासून इम्रान आणि सर्फराजचं काय चाललं होतं? त्यांना कधी तू बोलला नाहीस ते?"

भडकलेल्या गावस्कर आणि अंपायरची चांगलीच बोलाचाली झाली. पुढच्या कोणत्याही टेस्टमध्ये हा अंपायर असेल तर आम्ही मॅच खेळणार नाही असंही गावस्करने ठणकावलं! दौर्‍याचं राजकीय महत्वं लक्षात घेऊन पुढे हा मामला निपटण्यात आला तरी ही गावस्कर मात्रं नाखुषच होता!

मोहिंदरला ताकीद देऊन वाद निर्माण करणारा हा अंपायर इद्रीस बेगचा खराखुरा वारसदार शोभावा असाच होता!

शकूर राणा!

१९८४ च्या न्यूझीलंड दौर्‍यात खेळकर आणि गमत्या स्वभावाच्या आणि एरवी कोणाशीही कोणत्याही प्रकारचा वाद नसलेल्या आणि कॅप्टन जेरेमी कोनी सारख्या माणसालाही भडकवण्यात कारणीभूत होता तो शकूर राणाच!

कराचीच्या टेस्टमध्ये किमान चार ते पाच वेळा जावेद मियांदाद एलबीडब्ल्यू असल्याचं स्पष्टं दिसत असूनही दरवेळी राणाने त्याला आऊट देण्यास नकार दिला होता! कोनी इतका वैतागला की आपल्या इतर सहकार्‍यांसह मैदान सोडून जाण्याची त्याने धमकी दिली!

अर्थात शकूर राणावर त्याचा काहिही परिणाम झाला नाही हा भाग वेगळा!
स्टीव्ह ब्रूकच्या बॉलवर मियांदादचा इयन स्मिथने कॅच घेतल्याचा निर्णय दुसरा अंपायर असलेल्या जावेद अख्तरने दिला!

१९८७ मध्ये माईक गॅटींगच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर आला होता. गॅटींगच्या संघात ग्रॅहेम गूच, क्रिस ब्रॉड, टिम रॉबिन्सन, बिल अ‍ॅथी, जॉन एम्बुरी, फिलीप डिफ्रीटास, ब्रूस फ्रेंच, ग्रॅहम डिली, नील फोस्टर, एडी हेमिंग्ज यांचा समावेश होता. दुसरा बोथम म्हणून बर्‍याच जणांनी नावाजलेला डेव्हिड केपल आणि उदयोन्मुख नील फेअरब्रदरही गॅटींगच्या संघात होते.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि एमसीसी यांच्यातील संबंध त्यावेळी कमालीचे ताणले गेले होते. १९८२ च्या इंग्लंड दौर्‍यात सिकंदर बख्तला चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याचा पाकिस्तानी संघाने अंपायर डेव्हीड कॉन्स्टंटवर आरोप केला होता. इंग्लिश संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर येण्यापूर्वी पाकिस्तानने इंग्लंडच्या केलेल्या दौर्‍यात अंपायर कॉन्स्टंटची नेमणूक करण्याला विरोध केला होता. अर्थात पाकिस्तानच्या या विरोधाला एमसीसीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. लॉर्ड्स आणि ओव्हलच्या टेस्ट्समध्ये कॉन्स्टंट अंपायर होता! पाकिस्तानी अधिकार्‍यांच्या आणि खेळाडूंच्या मनातही असंतोष खदखदत होता!

लाहोरच्या पहिल्या टेस्टमध्येच वादाची ठिणगी पडली!

अब्दुल कादीरच्या ९ विकेट्समुळे इंग्लंडने पहिल्या इनिंग्जमध्ये जेमतेम १७५ रन्स काढल्या. अर्थात कादीरच्या बॉलिंगपेक्षाही यात मोठा वाटा होता तो अंपायर शकील खानचा! गॅटींग, अ‍ॅथी, डिफ्रीटास आणि फोस्टर या चौघांना एलबीड्ब्ल्यू देण्याचे शकीलचे निर्णय म्हणजे अक्षरश: कहर होता! परंतु एवढ्यावरच समाधान मानेल तर तो शकील कसला?

पाकिस्तानच्या पहिल्या इनिंग्जमध्ये मुदस्सर नजरला किमान चारवेळा एलबीड्ब्ल्यू असूनही आऊट देण्यास शकीलने साफ नकार दिला होता. खुद्दं अब्दुल कादीरला विकेटकीपर ब्रूस फ्रेंचने बेल्स उडवण्यापूर्वीच स्टंप केल्याचा निर्णय देऊन तो मोकळा झाला! परंतु सर्वावर कडी करणारा निर्णय होता तो दुसर्‍या इनिंग्जमध्ये क्रिस ब्रॉडला आऊट देण्याचा!

ब्रॉडच्या बॅटपासून किमान सहा इंचावरुन गेलेल्या बॉलवर विकेटकिपर अश्रफ अलीने कॅच घेतल्याचा निर्णय शकील खानने दिला होता! ब्रॉड इतका भडकला होता की त्याने पॅव्हेलियनमध्ये परतण्यास साफ नकार दिला! केवळ ग्रॅहॅम गूचने समजावल्यावर अत्यंत नाराजीने तो मैदानातून बाहेर पडला! पाकिस्तानने इनिंग्ज आणि ८७ रन्सनी टेस्ट जिंकली!

भूतपूर्व इंग्लिश बॅट्समन टॉम ग्रेव्हनीने मार्मिक शब्दात याचं वर्णन केलं.
"Umpire Shakeel Khan was Pakistan's best performer in this match! He was the one who routed England!'

इंग्लंडचा मॅनेजर पीटर लश आणि गॅटींग यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांकडे शकील खानला हटवण्याची मागणी केली. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांनी इंग्लंडची ही मागणी मान्य केली आणि फैसलाबादच्या टेस्टसाठी दोन नवीन अंपायर्सची नेमणूक केली.

खिजर हयात आणि शकूर राणा!

पाकिस्तानचा मॅनेजर असलेला हसीब अहसान शकूर राणाची नेमणूक झाल्यावर हसत सुटला! १९६२ मध्ये इंग्लंडच्या दौर्‍यावर गेलेल्या ऑफस्पिनर अहसानवर इंग्लंडमध्येच प्रथम फेकी बॉलिंगचा (चकींग) आरोप करण्यात आला होता. पुढे या आरोपामुळेच २३ व्या वर्षी त्याची टेस्ट करीयर संपुष्टात आली होती! एमसीसी विरुद्ध कायमची अढी मनात असलेला अहसान राणाची नेमणूक झाल्यावर म्हणाला,

"England asked me not to select Shakeel. Let's see how they like Shakoor Rana."

शकूर राणाची नेमणूक झाल्यावर गॅटींग आणि लश यांनी कपाळावर हात मारला!
राणाच्या 'इतिहासा'ची त्यांना पूर्ण कल्पना होती!

गॅटींगने टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावर इंग्लंडने दिवसाअखेरीस २५७/४ अशी मजल मारली होती. क्रिस ब्रॉड १०१ रन्स काढून नॉटआऊट होता तर गॅटींगने आक्रमक ७९ रन्स फटकावल्या होत्या. इंग्लंड सुस्थितीत असल्यामुळे गॅटींग खरंतर आनंदी असायला हवा होता पण....

टी नंतर बॅटींग करायला येताना गॅटींग आणि ब्रॉड यांना एक विलक्षण गोष्टं आढळली होती!
अंपाय्रर शकूर राणाने पाकिस्तानी संघाचा अधिकृत स्वेटर चढवला होता!

हे कमी होतं म्हणूनच की काय, बॉलिंगला आलेल्या मुदस्सर नझरने आपली कॅप राणाच्या हाती देताच त्याने नेहमीप्रमाणे हातात धरण्याऐवजी ती ताबडतोब स्वतःच्या डोक्यावर ठेवली!

मैदानात असलेले गॅटींग आणि ब्रॉडच काय पण ड्रेसिंगरुम मधून हा प्रकार पाहणारे इतर इंग्लिश खेळाडूही राणाच्या या कारनाम्यामुळे भडकले होते. जॉन एम्बुरी उद्गारला,

"Why the fuck he doesn't come and play for Pakistan?"

परंतु अद्याप शकूर राणा ही काय चीज आहे याची इंग्लिश खेळाडूंना आणि विशेषतः गॅटींगला कल्पना नव्हती!

इक्बाल कासिम आणि कादीरच्या स्पिनपुढे २५१/४ वरुन इंग्लंडची इनिंग्ज २९२ मध्ये कोसळली! नील फोस्टर आणि जॉन एम्बुरी यांच्यामुळे दिवसाच्या अखेरच्या ओव्हरपर्यंत पाकिस्तानची अवस्था १०६/५ अशी झाली होती! सलिम मलिक सावधपणे खेळत होता, परंतु रमीझ राजा, मुदस्सर नझर, इजाज अहमद, शोएब महंमद आणि मुख्य म्हणजे जावेद मियांदाद आऊट झाल्याने पाकिस्तानची अवस्था खराब झाली होती! दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी आणखीन एक विकेट घेण्याचा प्रयत्नं करण्यासाठी गॅटींगने एडी हेमिंग्जला बॉलिंगला आणलं!

हेमिंग्जच्या ओव्हरमधले पहिले तीन बॉल आमिर मलिकने खेळून काढले. दिवसाचे उरलेले तीन बॉलही आमिर मलिकलाच खेळायला लावून त्याला आऊट करण्याचा प्रयत्न करण्याचा गॅटींगचा हेतू होता. परंतु त्यासाठी मलिकला एक रन घेण्यास प्रतिबंध करणं अत्यावश्यक होतं!

सलिम मलिक नॉनस्ट्रायकर एण्डला होता. गॅटींगने फिल्डींगमध्ये बदल करत असल्याची सूचना त्याला दिली आणि लाँगलेगला असलेल्या डेव्हीड केपलला स्क्वेअरलेगला येण्याची खूण केली. तो स्ट्राईकवर असलेल्या आमिर मलिकच्या दृष्टीक्षेत्रात येत नसल्याने बॉल खेळताना तो डिस्टर्ब होण्याचा धोका नव्हता! केपल पुरेसा जवळ आलेला असल्यामुळे त्याला थांबण्यासाठी खूण करण्यासाठी गॅटींगने हात वर केला! तांत्रिकदृष्ट्या फिल्डींगमधला गॅटींगने केलेला बदल पूर्णपणे क्रिकेटच्या नियमांना धरुन होता. हेमिंग्ज बॉल टाकतो न टाकतो तोच....

"Stop! Stop!"
स्क्वेअरलेग अंपायर शकूर राणा!

एव्हाना हेमिंग्जने बॉल टाकलाही होता!
बॉलिंग एंडला असलेल्या खिजर हयातने प्रसंगावधान राखून डेड बॉल दिला.

गॅटींग, सलिम मलिक, आमिर मलिक, हेमिंग्ज, खिजर हयात आणि इतर सर्वजण गोंधळून गेले होते! शकूर राणाने खेळ का थांबवावा कोणालाच कळलं नव्हतं! त्या संभ्रमावस्थेतच गॅटींगने काय झालं याची विचारणा केली.

"You're waving your hand. That's cheating." राणा ठामपणे म्हणाला!

चकीत झालेल्या गॅटींगने आपण केपलला थांबण्याची खूण केल्याचं स्पष्टं केलं! शेवटच्या ओव्हरचे केवळ तीन बॉल बाकी असल्याने राणाने स्क्वेअरलेगजवळ आपल्या जागेवर जावं अशी गॅटींगने त्याला विनंती केली. नाखुषीनेच राणा वळला खरा परंतु त्याचे जळजळीत शब्दं गॅटींगच्या कानी पडलेच!

"You are a fucking cheat."

इतरवेळी गॅटींगने राणाच्या या शेर्‍याकडे दुर्लक्षं केलं असतं, पण आधीच शकील खानच्या लाहोरच्या 'पराक्रमा'चा राग त्याच्या मनात खदखदत होता. त्यातच खुद्दं राणाने पाकिस्तानी स्वेटर आणि मुदस्सरची कॅप घालण्याची भर पडली होती आणि आता हा आरोप...

गॅटींगचं माथं भडकलं!

एखाद्या रेड्याने चाल करुन अंगावर यावं तद्वत ताडताड पावलं टाकत तो शकूर राणाच्या दिशेने चालून गेला! दोघांची चांगलीच जुंपली! जवळच असलेल्या स्टंप मायक्रोफोनमुळे दोघांनी शिव्यांची मुक्तपणे केलेली बरसात हजारो-लाखो लोकांना स्पष्टपणे ऐकू येत होती! मैदानावरील एकूण एक इंग्लिश खेळाडू, दोन्ही पाकिस्तानी बॅट्समन, अंपायर खिजर हयात आणि स्टेडीयममध्ये हजर असलेले यच्चयावत प्रेक्षक विस्मयचकीत होऊन दोघांचं भांडण पाहत होते!

एकमेकांच्या दिशेने बोटं रोखून दोघं इतक्या तावातावाने भांडत होते की कोणत्याही क्षणी ते गुद्दागुद्दीवर येतील अशी जवळपास प्रत्येकाला भीती वाटली! दोघांपैकी एकजणही मागे हटण्यास तयार नव्हता!

सर्वात आधी सावरला तो बिल अ‍ॅथी!
भडकलेल्या गॅटींगच्या हाताला धरुन जवळपास ओढत त्याने गॅटींगला राणापासून दूर खेचलं!
दिवसाचा खेळ तिथेच संपला हे वेगळं सांगायला नकोच!

गॅटींग आणि शकूर राणा यांच्या भांडणाचा पूर्ण व्हिडीओ

पॅव्हेलियनमध्ये परत येताच शकूर राणाने धमकी दिली,
"गॅटींगने माझी लेखी माफी मागितली नाही तर मी उद्या मैदानात उतरणार नाही!"

पाकिस्तानी संघातील बहुतेक खेळाडूंना आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांना राणाचा राग शांत झाल्यावर तो दुसर्‍या दिवशी पुन्हा अंपायरींगला मैदानात उतरेल याची अपेक्षा होती.

दुसर्‍या दिवशी (मॅचचा तिसरा दिवस) सकाळी इंग्लिश खेळाडू नेहमीप्रमाणे स्टेडीयमवर पोहोचले. पावणेदहाच्या सुमाराला आपल्या सहकार्‍यांसह गॅटींग मैदानात उतरला, परंतु पाकिस्तानी बॅट्समन किंवा अंपायर्सचा पत्ता नव्हता!

सुमारे अर्धा तास मैदानात वाट पाहिल्यावर इंग्लिश खेळाडू ड्रेसिंगरुममध्ये परतले!

गॅटींगने लेखी माफी मागितल्याशिवाय मैदानात न उतरण्याच्या आपल्या निर्णयावर शकूर राणा ठाम होता!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी आणि इंग्लंडचा मॅनेजर पीटर लश आणि दौर्‍यावर असलेले इतर अधिकारी यांच्यात मिटींग्जचं सत्रं सुरु झालं! फैसलाबाद आणि लंडन यांच्यात जोरदार फोनाफोनी सुरु झाली!

गॅटींगने राणाला माफीनामा लिहून देण्यास साफ नकार दिला! तो म्हणाला,

"The square-leg umpire had no business getting involved in the game. I have no reason to apologise!"

एमसीसीच्या अधिकार्‍यांनी बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर गॅटींग अखेरीस तयार झाला पण एका अटीवर,

"If I am apologising to him, he inturn should do the same and apologise to me!" गॅटींगने ठणकावलं!

झालं!
राणा कोणत्याही परिस्थितीत माफी मागणं शक्यंच नव्हतं!
काहीही झालं तरी तसं करु नकोस असा राणाला सल्ला देण्यात आला होता!
सल्ला देणार होता जावेद मियांदाद!

दिवसभर या वादावर कोणताही तोडगा निघाला नाही!

संध्याकाळपर्यंत या वादात ब्रिटीश परराष्ट्रखात्यानेही उडी घेतली. ब्रिटनचा पाकिस्तानमधील राजदूत सर निकोलस बॅरींग्टनने लंड्नला कळवलं,

"It could well lead to cancellation of the rest of England's tour. Needless to say, such a move would create great deal of ill-will in Pakistan towards Britain, and could have damaging financial and legal consequences. However poor the umpiring decisions are, and however aggressively competitive their Pakistan opponents, they should just grin and bear it."

चौथा दिवस हा मॅचचा रेस्ट डे असल्याने या दिवशीही चर्चेच्या अनेक फेर्‍या सुरुच होत्या! कोणत्याही परिस्थितीत या वादावर तोडगा निघणं दोन्ही बाजूंना आवश्यंक वाटत होतं! पाकिस्तान आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे संबंध आधीच कमालीचे बिघडलेले होते. अशा परिस्थितीत दौरा रद्द झाल्यास त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती! एमसीसीच्या अधिकार्‍यांनी ताबडतोब पाकिस्तान गाठून आपल्या खेळाडूंची गाठ घेतली आणि ही सगळी परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली!

अखेर पाचव्या दिवशी सकाळी गॅटींगने एका कागदावर खरडलेला माफीनामा शकूर राणाच्या हवाली केला!

"I apologise for the bad language used during the second Test at Fisalabad."

खाली गॅटींगची सही होती!

गॅटींगने फैसलाबादचं स्पेलिंग चुकून 'फिसलाबाद' असं लिहीलं होतं तरी एकंदर प्रकार पाहता ते समर्पक होतं असंच म्हणावं लागेल!

एमसीसीच्या अधिकार्‍यांनी आणलेल्या दबावामुळे गॅटींगला माफीनामा लिहून द्यावा लागला तरी तो मनातून अत्यंत नाखूष होता! त्याच दिवशी संध्याकाळी एका पत्रंकाराशी बोलताना इंग्लंडचा कॅप्टन म्हणून आणि एकंदर खेळाडू म्हणूनही आपल्या भवितव्याची चिंता त्याच्या बोलण्यातून जाणवत होती!

खराब हवामानामुळे अखेर फैसलाबादची टेस्ट ड्रॉ झाली!

इंग्लंडच्या संघातील इतर खेळाडूंनी एमसीसीच्या नियमाच्या विरुद्ध जाऊन एक पत्रक प्रसिद्ध केलं! कॅप्टन म्हणून गॅटींगला पाठिंबा देतानाच त्याच्याकडून माफीनामा लिहून घेण्याच्या एमसीसीच्या निर्णयावरही टीका करण्यात आली होती!

इंग्लंड आणि पाकिस्तानात परस्परविरोधी प्रतिक्रीया उमटल्या.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष जनरल सफदर बट म्हणाला,
“Mike Gatting used some very filthy language to the umpires, and, let me tell you, some less filthy words are bastard and son of a b***h, and so on. No-one has the right to abuse umpires.”

इयन बोथम म्हणाला,
“You wouldn’t see those sorts of decisions given in village cricket, let alone Test cricket. The England players have my sympathy.”

टॉम ग्रेव्हनी म्हणाला,
“They have been cheating us for 37 years, and it is just getting worse and worse. The TCCB should bring England home.”

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी शकूर राणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले! कराचीच्या तिसर्‍या टेस्टमध्ये अंपायर म्हणून त्यांनी राणाची नेमणूक केलीच, परंतु इंग्लंडच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी राणाचा सहकारी म्हणून नेमणूक केली ती शकील खानची!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या पवित्र्याने खेळाडूच काय, एमसीसीचे अधिकारीही वैतागले! राणा आणि शकील अंपायर्स असतील तर दौरा सोडून परत इंग्लंडला जाण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला! इतकंच करुन एमसीसीचे अधिकारी थांबले नाहीत, तर इंग्लिश खेळाडूंवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही आणि प्रत्येकाला १००० पौंड 'हार्डशीप बोनस' म्हणून देण्यात येतील असंही एमसीसीने जाहीर केलं!

अखेर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने दोन वेगळ्या अंपायर्सची नियुक्ती केल्यामुळे कराचीची टेस्ट सुरळीतपणे पार पडली!

इंग्लंड कौंटी आणि टेस्ट बोर्डाचा अध्यक्ष रमण सुब्बा रो याच्या मते शकूर राणा तडजोड करण्यास तयार होता, पण गॅटींगने याला नकार दिला होता!

"Shakoor went along with it, but Michael did not!" रो म्हणाला.

शकूर राणाने आपल्याला मिळालेल्या प्रसिद्धीचा फार चाणाक्षपणे उपयोग करुन घेतला. अनेक वेगवेगळ्या वृत्तपत्रांना त्याने या घटनेबाबत तपशीलवार मुलाखती दिल्या! अर्थात योग्य ते पैसे आकारूनच!

एका मुलाखतीत राणा म्हणाला,

“I regret what happened. Cricket does not deserve such a thing. But Mike swore at me badly. I told him that insulting a man's honour in Pakistan would lead to horrible things. Many men have been killed for the sort of insults he threw at me. He’s lucky I didn’t beat him! I was never going to apologise ... I`d done nothing wrong!

गॅटींगबद्दल बोलताना राणा म्हणतो,

"I didn't believe Mike to be a bad person, though. He was a magnificent batsman especially against the spinners and a positive captain. I believe the England team were already uptight and felt wronged when they came to Faisalabad. Shakeel Khan had given many bad decisions against them in Lahore - seven or eight, I think, and they lost. If I had umpired that first Test the problems would not have arisen."

पुढे त्या घटनेबद्दल बोलताना गॅटींग म्हणाला,

"It wasn't a very proud moment of my career ...It's one of those things that has gone down in history. It will probably always be remembered. Lots of people said, 'You should have hit him.' Well, that would never have done. What we did was probably not the right thing anyway. But at the same time, in the heat of the moment, it made a lot of headlines around the world!"

गॅटींगने लिहून दिलेला माफीनामा झोपताना आपण आपल्या उशीखाली ठेवतो असं शकूर राणाने एका मुलाखतीत सांगितलं!

"I'm still very proud of Gatting's written apology. I keep it under my pillow and read it from time to time! One day I will sell it at auction for millions of rupees. It is an historical document!"

पुढे काही वर्षांनी लॉर्ड्सच्या पार्कींग लॉटमध्ये गॅटींग आणि शकूर राणा यांची पुन्हा गाठ पडली! राणा त्याच्याशी शेकहॅन्ड करण्याच्या इराद्याने त्याच्या दिशेने जात असतानाच...

"Oh God, not you again!" गॅटींग उद्गारला आणि कार सुरु करुन निघून गेला!

(अंपायर्सबद्दलच्या या लेखात श्री. रा. रा. स्टीव्ह बकनरजींबद्दल एकही प्रसंग का लिहीला नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल, परंतु बकनरजींच्या अपरंपार लीला पाहता त्यांच्यावर पुढेमागे स्वतंत्र लेख लिहीण्याचा मानस आहे!)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रोचक लेख. क्रिकेटचे जुने दिवस म्हणजे सुवर्णकाल अशी समजूत आहे, त्यात तथ्यही आहे. मात्र त्या काळी सर्वच छान होतं असंही नाही. लेखात ही दुसरी बाजू बघायला मिळते. सध्याच्या क्रिकेटमध्ये फारसं लक्ष नाही पण प्रत्येक कोनातून अद्ययावत कॅमेरे सर्व खेळ टिपत असल्यावर पंचांचे बहुतेक निर्णय अचूक असतात असं मानायला जागा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय रोचक लिखाण. माझी विनंती इतकीच की तुम्ही वापरत असलेले सोर्सेस - क्रिकेटच्या इतिहासावरची पुस्तकं, क्रिकेट प्लेयर्सची आत्मचरित्रे वैगेरे - जर नोंदवत लिहित गेलात तर ह्या विषयांवर अधिक वाचन करण्याची इच्छा असणाऱ्याला त्याचा खूप उपयोग होईल. बोरिया मुजुमदार आणि रामचंद्र गुहा ह्या इतिहासकारांची भारतीय क्रिकेटच्या इतिहासावरची पुस्तकं माहिती आहेत. आशिष नांदी सारख्यांचं क्रिकेट वरचं काहीसं सैद्धांतिक लिखाण परिचित आहे पण तुम्ही लिहिताय तसं रंजक मात्र माहित नाहीये. मराठीत तर अजिबातच काही नसावं. दीर्घ आणि सूत्रबद्ध लिखाणाचं छान पुस्तकं होऊ शकेल असं सुचवावसं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

अतिशय आवडला. विशेषतः अंपायरिंगविषयक नेहमीचे चावून चोथा झालेले (हेवन अ‍ॅन्ड हेल, डब्ल्यू जी ग्रेसचे, वगैरे) किस्से रिपीट न करता नवीन किस्से आणि लिंक्स दिल्याबद्दल मुद्दाम कौतुक.
या लेखमालेला हार्दिक शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॅराथॉन लेख आहे, पण काय क्लास आहे!
तुफान! अजून येऊ द्या असे लेखन.. क्रिकेटवर एकतर नॉस्टॅल्जिया कुरवाळणारे लेख असतात नाहीतर चमचमीत/गहिवरलेले किस्से.. हे वेगळंच आहे.. फ्रेश आहे.. मस्त! जियो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

युद्धस्य कथा रम्या म्हणतात ते क्रिकेटलाही लागू आहे. आपण प्रेक्षक म्हणून घडणारं नाट्य बघत असतो. पण त्या खेळाच्या नाट्यामागे खेळाडूंचं, संघांचं आणि त्या दोन राष्ट्रांचंही नाट्य चालू असतं. या लेखातून त्या आतल्या नाट्यावर पर्दाफाश केलेला आहे. अजून येऊ द्यात.

एक लहानशी सूचना - अनेक ठिकाणी एका परिच्छेदात येणारी वाक्यं विभागून अनेक परिच्छेद झालेले आहेत. त्याने या उत्तम लेखनाच्या वाचनीयतेत अडथळा येतो. ते सुधारता आलं तर पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0