आतां आमोद सुनांस जाले

अंदाजे सात आठ वर्षांपूर्वी घरच्यांबरोबर आंध्रात फिरायला गेलो होतो. तेंव्हा काळहस्तीश्वर मंदिरात जाण्याचा योग आला होता. तिथून परत आलो आणि एकदा मॅजेस्टिक मध्ये पुस्तकं चाळत असताना "श्री वेंकटेश्वर आणि श्री काळहस्तीश्वर" अश्या नावाचे पुस्तक दिसले. लेखक होते रा चिं ढेरे. तेंव्हा पेपरात त्यांच्या "श्री विठ्ठल एक महासमन्वय" या पुस्तकाची जाहिरात येत होती. कुतूहल होते म्हणून दोन्ही पुस्तके घेतली आणि घरी आलो. वेळ मिळाला तसे विठ्ठलाचे पुस्तक वाचायला काढले. पण मन काही रमेना. मग वेंकटेश्वराचे पुस्तक काढले. तिथेही माझा लेखकाशी सूर जुळेना. म्हणून मग पुस्तके बाजूला ठेवली.

माझं असं कधी कधी होतं की पुस्तकाशी माझी नाळ जुळत नाही. मग मी पुस्तकाला आणि स्वतःला त्रास देत नाही. बहुतेक त्या पुस्तकाची माझ्या आयुष्यात वेळ आलेली नाही असे म्हणून ते बाजूला ठेवतो. यथावकाश ते पुस्तक मला बोलावतेच. अश्या प्रकारे पुस्तकाने साद घातलेली असली की ते अगदी कडकडून भेटते. त्यातले विचार अगदी सहज समजतात आणि त्यावर मनातल्या मनात संवाद देखील छानपैकी सुरू होतो असा माझा अनुभव आहे. त्या अनुभवाला स्मरून मी ढेरे सरांची पुस्तके शेल्फवर ठेवून दिली.

मागच्या महिन्यात निर्गुणी भजनांची सिरीज लिहिताना गोरक्षनाथांचा उल्लेख केला होता. त्यावर एका वाचकाशी साद प्रतिसाद करत असताना त्या वाचकाने रा चिं ढेरेंचे "नाथ संप्रदायाचा इतिहास" हे पुस्तक वाचा असा सल्ला दिला होता. आणि मग शेल्फवरील ढेरे सरांची पुस्तके साद घालू लागली. म्हटलं, "आनंदा, वेळ झाली बहुतेक या पुस्तकांची". पण चाल ढकल करत होतो. तेव्हढ्यात ढेरे सर इहलोक सोडून गेल्याची बातमी आली. एक दोन मित्रांनी सरांच्या सर्व ग्रंथसंपदेचे फोटो फेसबुकवर टाकले. त्यात नाथ संप्रदायाचा इतिहास दिसले. आणि मग मात्र मी मॅजेस्टिक मधे गेलो. तिथून ढेरे सरांची सगळी पुस्तकं घेतली. पण वाचायला सुरवात केली ती नाथ संप्रदायाच्या इतिहासाकडून.

मला माझे मडके कच्चे आहे ते माहिती आहे. त्यामुळे मनात थोडी धाकधूक होती. अजून या पुस्तकाची माझ्या आयुष्यात वेळ आली की नाही? त्यातले विचार समजण्याइतका मी तयार झालो की नाही? असे प्रश्न मनात होते. कदाचित निर्गुणी भजनांवर लिहीत असताना वाचनाला आणि विचाराला दिशा मिळाली असेल त्यामुळे पुस्तक माझ्याशी बोलू लागले. आणि ते काय बोलत आहे ते मला समजू लागले. ढेरे सरांचा प्रचंड व्यासंग आणि विचार मांडण्याची अनाग्रही पद्धत जाणवत होती. एका ज्ञानतपस्व्याच्या जवळ आपण बसलो आहोत असा अनुभव होत होता.

वाचता वाचता पान ३१ वर आलो. त्यात पिण्ड ब्रह्माण्ड या विषयावरचा गोरक्षनाथांचा सिद्धांत या मुद्द्यावर बोलताना ढेरे सरांनी ज्ञानोबा माउलींच्या अमृतानुभवातील नवव्या प्रकरणातील आत्मरतिचे वर्णन करणारी रचना दिली आहे. त्या रचनेचे पहिले वाक्य वाचले आणि एकदम ज्ञानतपस्वी ढेरे सर प्रेमळ अनुभवी मित्रासारखे झाल्यासारखे वाटले. ढेरे सरांनी दिलेली माऊलींची ती पूर्ण रचना आधी देतो आणि मग त्यामुळे माझ्या एका जुन्या कोड्याची उकल कशी झाली ते सांगतो.

आतां आमोद सुनांस जाले । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठिले । लोचनेंसी ।।
आपलेंनि समीरपणे । वेल्हावती विंजणे ।
कीं माथेंचि चांफेपणें । बहकताती ।।
जिव्हा लोधली रासे । कमळ सूर्यपणे विकासे ।
चकोरचि जैसे । चंद्रमा जालें ।।
फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची जाली नर ।
जाले आपुलें शेजार । निद्राळुची ।।
चूतांकुर जाले कोकीळ । आंगचि जाले मलयनिळ ।
रस जाले सकळ । रसनावंत ।।
तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता ।
हे सारले अद्वैता । अफुटामाजी ।।

यातलं "आमोद सुनांस जाले" वाचलं आणि शाळेपासून पडलेलं कोडं सुटेल असं वाटू लागलं. पुलंचा माझे खाद्यजीवन म्हणून फार प्रसिद्ध लेख आहे त्यात एका ठिकाणी पुलं म्हणतात, " जो भात खदखदू लागला म्हणजे प्रियकराचे प्रेयसीवरचे लक्ष उडून आमोद सुनांस होते, त्याला काय पोषक अन्न या वैद्यकीय कोषात कोंबायचे?" हे वाक्य जेंव्हापासून वाचलंय तेंव्हापासून जीव अडकलाय. कारण आमोद सुनांस येणे याचा काही संदर्भ मिळत नव्हता. बरं आपल्या पद्धतीने अर्थ लावायचा प्रयत्न करावा तर आमोद म्हणजे आनंद. मग आनंद सुनांस येणे म्हणजे काय ते कधीच कळले नव्हते. आणि इथे नाथसंप्रदायाचा इतिहास वाचताना ढेरे सरांनी माझ्यासाठी अगदी अनपेक्षितपणे पूर्ण रचना दिली होती. आता पुलंच्या वाक्याचा संदर्भ मिळाला होता. पण अजूनही आनंद सुनांस येणे याचे कोडे सुटत नव्हते. आणि पुलंनी हे वाक्य भात शिजण्याशी कसे जोडले ते काही लक्षात येईना. तसाच झोपलो.

सकाळी, संदर्भ मिळाला आहे या आनंदात उठलो. पण अर्थ लागायचा बाकी आहे ते आठवले. मग माझ्यातला आळशी माणूस जागा झाला. ढेरे सरांच्या पुस्तकातील आणि पुलंच्या हसवणूक या पुस्तकातील त्या पानांचा फोटो घेतला आणि दोन मित्रांना पाठवला. एक माझ्या सारखा पुलंप्रेमी तर दुसरा जुन्या मराठी भाषेचा जाणकार. म्हटलं काय अर्थ लागतो का ते सांगा. भाषापटू मित्राने अजून माझा मेसेज बघितला नसावा तर पुलं प्रेमीने लगेच सांगितले की, 'बाबा रे, मला पण याचा अर्थ अजून लागला नाही."

मग थोड्या वेळाने त्याचा पुन्हा मेसेज आला. 'ते आमोद सुनांस "जाले" आहे. सगळे त्याला "आले" म्हणतात. म्हणून मला कळत नव्हते. आता जर तो शब्द "जाले" आहे हे नक्की झालंय तर बहुतेक त्याचा अर्थ "श्रोत्यांस आनंद झाला " असा असणार". मला थोडे पटले आणि थोडे नाही. तेव्हढ्यात अजून एका जाणकार मित्राचा फोन आला. त्याला म्हटलं फोटो पाठवतो. अर्थ सांग. त्याला हे पण सांगितलं की एका मित्राने श्रोत्यांस आनंद झाला असा अर्थ सांगितला आहे. फोटो पाठवले आणि लेक्चरला गेलो. मग दिवसभर आयकर कायदा आणि त्याच्यातील कलमे शिकवताना विषय विसरलो. रात्री जाणकार मित्राचा फोन आला. तो म्हणाला श्रोत्यांचा संबंधच नाही. कारण अमृतानुभव म्हणजे श्रोत्यांशी साधलेलया संवादाचे वर्णन नसून ज्ञानेश्वरांना आलेल्या अमृततुल्य अनुभवांचे वर्णन आहे. हे मला पटले. पण तो ही "सुनांस जाले" या शब्दांचा अर्थ देऊ शकला नाही.

आता माझी अवस्था स्टेशन जवळ आलेले आहे, फलाट दिसू लागलेले आहेत, आपण आपले सामान सुमान घेऊन पॅसेंजर ट्रेनच्या छोट्याश्या दरवाजाजवळ उभे आहोत, पण गाडी स्टेशन बाहेर सिग्नलला थांबल्यावर होते तशी झाली होती. मग आठवण झाली ती संध्याताई सोमण यांची. फेसबुकवर अनेक ठिकाणी कमेंट करताना त्यांच्याकडील जुन्या ग्रंथांचे फोटो टाकतात ते आठवले. मग त्यांना फेसबुकरच फोटो पाठवले. आणि म्हटलं "आमोद म्हणजे आनंद हे कळले आहे पण ते सुनांस आले चा अर्थ सांगू शकाल का?" पण मग लक्षात आलं की मी त्यांचा मित्र नाही आहे. स्पॅम टाळण्यासाठी झुक्या बाबा मित्र नसलेल्या लोकांचे मेसेज लगेच दाखवत नाही तर त्याला मेसेज रिक्वेस्ट म्हणून पाठवतो. आणि या रिक्वेस्ट बऱ्याचदा उघडल्या जात नाहीत हे माझ्या स्वानुभवावरून मला माहीत होते. मग संध्याताईंना मित्र विनंती पाठवली. आता त्या कधी ऑनलाईन येतील? कधी मित्रविनंती स्वीकारतील? कधी माझा मेसेज बघतील? आणि कधी उत्तर देतील? या प्रश्नांच्या आवर्तात सापडून शेवटी मी आळस सोडला आणि गुगल वर "आमोद सुनांस जाले" असे शोधायला सुरवात केली.

तर तिथे मराठी साहित्य ब्लॉगस्पॉट इन या संकेतस्थळावर, दि बा मोकाशी यांच्या "आता आमोद सुनांसि आले" या कथेचे रसग्रहण सापडले. त्यात ब्लॉग लेखकाने एका परिच्छेदात माझ्या शंकेचं निरसन केलेलं होतं. तो परिच्छेद असा आहे,

"कथेविषयी लिहिण्याआधी थोडेफार शीर्षकाविषयी सांगणे आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वरांची 'आता आमोद सुनासि आले। श्रुतीशी श्रवण निघाले' ही अमृतानुभवातल्या 'ज्ञान-अज्ञान भेद कथन' या प्रकरणातील ही ओवी ज्ञाता आणि ज्ञेय (जाणणारा आणि जे जाणायचे ती गोष्ट) यांच्यातील अद्वैत दर्शविते. आमोद म्हणजे सुगंध, सुनास म्हणजे नाक - हे एक उदाहरण. या कथेतही वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या गोष्टींतले द्वैत - अद्वैत लेखक दाखवून देतो"

सगळा घोटाळा आमोद म्हणजे आनंद या समजुतीमुळे झालेला होता. आमोद म्हणजे आनंद असा जरी अर्थ असला तरी आमोद या शब्दाला अजूनही अर्थ असू शकतात ही शक्यताच मी विचारात घेतली नव्हती. त्यामुळे पुढे सुनांस आले किंवा जाले चा अर्थ लागत नव्हता. आता जेंव्हा आमोद म्हणजे सुवास असा अर्थ घेतला तेंव्हा सुनांस म्हणजे नाक हा अर्थ लागला. आणि मग सुनता है गुरु ग्यानी या निर्गुणी भजनात कबीर कुंडलिनी साधकाच्या अवस्थेचे वर्णन करत आहेत हा मला लागलेला अर्थ आणि त्याच अवस्थेचे माउलींनी आमोद सुनांस जाले असे केलेले वर्णन एकदम जुळून आले. जेंव्हा साधकाची कुंडलिनी जागृत होते, तेंव्हा त्याला जो अनिर्वचनीय आनंद होतो त्या अमृतानुभवाचे वर्णन करताना माउली म्हणतात.

सुवासच नाक होतो आणि स्वतःला भोगू शकतो. ध्वनीच कान होतो आणि स्वतःला ऐकू शकतो. आरसा डोळे आणि दृष्टी एकरूप होतात. माथा स्वतः चाफयाप्रमाणे सुगंधीत होतो. जीभ स्वतःच चव बनते, चकोर स्वतःच चांदणे आणि चंद्र बनतो, फुले स्वतःच भ्रमर बनतात, तरुणी स्वतःच नर बनून स्वतःचे स्त्रीत्व उपभोगू शकते. थोडक्यात सगळे रस आणि त्या रसांचे रसपान करणारे एकरूप होतात. त्यांचे अद्वैत होते. ज्याला भोगायचे आहे आणि जे भोगायचे आहे ते हे दोन्ही एकरूप होतात. ज्याला जाणायचे आहे आणि जे जाणायचे आहे ते एकरूप होतात. आणि हा अमृतानुभव असतो. असा या रचनेचा अर्थ आहे.

आता माझी गाडी फलाटाला लागली होती. मन शांत झाले होते. मी शाळेत असल्यापासून पुलंनी घातलेले कोडे पण सुटले होते. भात शिजताना जो सुगंध दरवळतो त्यामुळे जणू तो वासच नाक होतो. वासाचे आणि नाकाचे वेगळे अस्तित्व उरत नाही. त्या दोघांचे अद्वैत होते. खरा खवैय्या प्रियकर मग तो सुवास उपभोगतो आणि त्यात इतका एकरूप होतो की तो आपल्या प्रेयसीला देखील विसरतो.

आणि मला जाणवले की; माउली, कबीर, नाथ संप्रदाय, आणि पुलं यांना सगळ्यांना एका माळेत गुंफून ढेरे सरांनी आंतरजालाने मला एका मोठ्या रोलर कोस्टर राईडचा अनुभव दिलेला होता. तो माझ्यासाठी अतिशय रोमहर्षक होता. मला वाटले संपली राईड. म्हणून खूष होऊन फेसबुकवर आलो. तर संध्याताईंनी मित्र विनंती स्वीकारली होती. मग त्यांना हा अर्थ सांगून तो बरोबर आहे का अशी विचारणा केली. तर त्यांनी दुजोरा देताना त्यांच्याकडील एका पुस्तकाचा फोटो पाठवला. पुस्तकाचे नाव होते "अनुभवामृतातील प्रतिमासृष्टी" लेखिका "सई देशपांडे" फोटोत दिसणारे पण वाचले. आपल्याला लागलेला अर्थ बरोबर आहे याचा आनंद झाला. आणि अजून एक गंमत दिसली. एका देशपांडेंनी आपल्या पुस्तकात घातलेले कोडे शेवटी दुसऱ्या देशपांडेंनी लिहिलेल्या पुस्तकाच्या दुजोऱ्याने खात्रीलायक सुटले.

आता ढेरे सरांचे पुस्तक खाली ठेववत नाही. विकत आणून ठेवलेली त्यांची सगळी पुस्तके मला बोलावत आहेत. बहुतेक त्या पुस्तकांची माझ्या आयुष्यातील वेळ सुरू झाली असावी. फक्त वाईट एकाच गोष्टीचे वाटते की हे सर्व, ढेरे सर इहलोक सोडून गेल्यावर घडले. आणि त्याच बरोबर थोडा आनंद देखील वाटतो की उशीरा का होईना पण मला त्यांच्या पुस्तकातील विचार थोडे फार समजू शकतील.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

ज्याला भोगायचे आहे आणि जे भोगायचे आहे ते हे दोन्ही एकरूप होतात. ज्याला जाणायचे आहे आणि जे जाणायचे आहे ते एकरूप होतात. आणि हा अमृतानुभव असतो. असा या रचनेचा अर्थ आहे.

फारच सुंदर.
.
तुम्हाला अशाच रोलर-कोस्टर राईडस घडोत. व आम्हाला मेजवानी मिळो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय आवडले. आमोद सुनांस झाले चा अर्थ मलाही कळला नव्हता खाद्यजीवन वाचताना. तो समजावून दिल्याबद्दलही आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आमोद...'चा अर्थ समजून घेण्यामागच्या मनोकायिक प्रवासाचा आढावा आवडला. 'अमृतानुभव'ची सोप्या मराठीतली काही रूपान्तरे उपलब्ध आहेत. विंदांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हे दोन्ही ग्रंथ सोप्या मराठीत आणले आहेत. त्यामुळे नेमकी माहिती असती तर अर्थ समजावून घेणे अवघड नव्हते. पण 'नेमकी माहिती' हाच कळीचा मुद्दा ठरतो अनेक वेळा. त्यामुळे काखेलाच कळसा असताना गावाला वळसा होतो. सदर लेखाच्या बाबतीत मात्र हा वळसा अतिशय तळमळीचा आणि म्हणून हृद्य झाला आहे. प्रत्यक्ष यशापेक्षा यशापर्यंतचा प्रवास अधिक समाधान देणारा असतो असे म्हणतात. साफल्यापेक्षा त्यामागचे कष्ट आणि धडपडच अधिक लक्ष्यात राहातात.
असो. आपणास संतसाहित्यामध्ये रुची आहे तेव्हा ढेरे यांच्या 'नाथपंथाचा इतिहास' या पुस्तकावरच न थांबता त्यांची दत्त, तुळजापुरची भवानी, लज्जागौरी, श्रीविठ्ठल यावरची आणि जमल्यास सर्वच पुस्तके वाचावी अशी शिफारस. जमल्यास ग्युन्थर झोन्थाय्मर यांचे खंडोबावरील पुस्तकही मिळवून वाचावे. विंदांची अष्टदर्शनेही अत्यंत वाचनीय आहेत. आणि हे सर्व निव्वळ भक्तिभावाने वाचण्याचे पूजापाठपोथ्यादि साहित्य नाही. इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, व्युत्पत्तिशास्त्र, पुरातत्त्व, मानववंश असा फार मोठा परीघ कवेत घेणारे हे लिखाण आहे.
अनाहूत सल्ला दिलाय, क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सविस्तर आणि नेमक्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

पण 'नेमकी माहिती' हाच कळीचा मुद्दा ठरतो अनेक वेळा. त्यामुळे काखेलाच कळसा असताना गावाला वळसा होतो.

हे अगदी पटले. तुम्ही सांगितलेली विंदांची पुस्तके अजून एक दोन मित्रांनी पण सांगितली. आता ती पण घेतो. आणि ढेरे सरांची प्रकाशित झालेली सगळी पुस्तके आणली आहेत. आता वाचन करतो आहे.

अनाहूत सल्ला दिलाय, क्षमस्व.

मी इथे येतो तेच मुळी माझ्या अज्ञानाचे भांडवल वापरून संदर्भांचा नफा कमवायला. त्यामुळे तुमचा सल्ला अनाहूत नसून अपेक्षित होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं लेख. आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हेही पहा -
http://www.manogat.com/node/6289

"आपलेंनि समीरपणे । वेल्हावती विंजणे ।"
हा हासिले-गजल शेर आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुलंच्या लेखातील त्या वाक्याचा अर्थ कळला...हे माझ्यासाठी महत्वाचं...

वीस वर्षांपूर्वी पुस्तक वाचतांना साधारण अर्थच ध्यानी आला होता...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

उपरोल्लेखित ब्लॉग बहुदा ऐसीवरचे मातबर नंदन यांचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

तुम्ही ज्ञानेश्वरीवर अजुन लिहावे ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय सुंदर लेख. मलाही या वाक्याचा अर्थ पराकाष्ठेचा आनंद असाच वाटत असे. तुमच्या आयुष्यातली राचिंच्या पुस्तकाची वेळ सुरू झाली आहे, तशीच त्या वाचनावर आधारीत तुमच्या अश्या रसाळ लेखांची वेळ आल्याचे ऐसीकरांना अनुभवायला मिळावे या सदिच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे आहे, वाचताना समजले नाही तर पुढे वाचु वाट्त नाही... मी ज्ञानेश्वरी विकत आणली,... रोज निदान एक तर ओवी वाचेन असे ठरवले... पण सुरवातीचे श्रोत्यांचे गुणगान वाचुन कंटाळले.. आणि पुन्हा बांधुन ठेवली... आता परत काढते...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्ञानेश्वरीत बराच बोअरिंग फापटपसारा आहे असे, वाचण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न करून झाल्यावर माझेही मत झाले होते. अमृतानुभव अजून वाचला नाही. पण एकुणात ज्ञानेश्वरांपेक्षा, तुकाराम ज्यास्त श्रेष्ठ वाटतो. भक्ती हा प्रकार संपूर्ण कटाप केल्यावरसुद्धा (माझ्या दृष्टीने, खरे म्हणजे तो केल्यावरच) तुकाराम फार मोठा विचारवंत होता असे वाटते. अर्थात, ज्ञानेश्वरांच्या लिखाणात काही अप्रतिम सौंदर्यस्थळे नक्कीच आहेत - पसायदान वर्ल्डक्लास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

>>>> पुस्तकाचे नाव होते "अनुभवामृतातील प्रतिमासृष्टी" लेखिका "सई देशपांडे"

हे पुस्तक कुठे मिळेल? गूगल वर पण सापडत नाहिये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भगवद्गीता सर्वसामान्यांना समजत नाही म्हणून सोपे करण्याच्या दृष्टीने जे अनेक प्रयत्न केले गेले त्यातील एक ज्ञानेश्वरी. पण आम्हाला तीही कठीणच वाटते. लोकमान्यांचे गीतारहस्यही पचायला जडच वाटते. तर अशा आमच्यासारख्या अतिसर्वसामान्यांनी काय करावे बरे ?
गाढ्या अभ्यासकांनाही जर 'आमोद सुनासी आले' हे कळायला इतके प्रयत्न करावे लागतात, तर सध्याच्या मराठी भाषेत समजेल असे पण भक्तिविरहित निरुपण कोणी करेल का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.maayboli.com/node/48140?page=1
राजीव सानेंच्या "नवपार्थहृद्गत" या गीतेवरील भाष्याच्या पुस्तकाबद्दल
(याने विषय "सोपा" होणार आहे का "अवघड" हे सांगणे मात्र अवघड आहे. "रोचक" होणार आहे हे निश्चित!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पवार हे केवळ समाजकारण आणि आणि राजकीय समाजकारण याच क्षेत्रांचे जाणते आहेत असं नाही. त्यांची विविध क्षेत्रांत मुशाफिरी असते. त्यातले कित्येक हे पवारांना पण ठाऊक असतात का असं वाटावं अशी परस्थिती त्यासंबधी आहे. उदाहरणार्थ पवारांनी 'रहस्यगीता' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून 'या'संबंधी त्या ठिकाणी साध्या सोप्या भाषेत लिहिलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

मला पण काही समजत नाही. पण कदाचित इथे काही समजू शकेल. अशी आशा!
https://www.maayboli.com/node/78907

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0