अर्थ काय बेंबीचा

संकल्पना

अर्थ काय बेंबीचा

- मुग्धा कर्णिक

आपसांत मैत्र असलेली दोन माणसं भेटली की ज्या गप्पा निघतात त्यात अनेकदा इतर आवडीच्या विषयांसोबतच बोलताबोलता एक विषय बहुधा निघतो. तो म्हणजे नातेवाईक. बालपणीच्या आठवणी, आताचे संमिश्र अनुभव, अपेक्षा आणि अपेक्षाभंग, दुःखाची साथ, आनंदाचे भागीदार असे नात्यामधले सारे कंगोरे काही आपल्या मनात केव्हाही जागे असतात.

जगातलं सारं श्रेष्ठ साहित्य नात्यांमधल्या किंवा नातेवाईकांच्या गर्दीच्या ऊहापोहात एकतरी धागा गुंतवलेलं आहेच. शेक्सपिअर असो वा व्यास-वाल्मिकी, गाब्रिएल मार्खेज असो वा श्याम मनोहर.

अख्खा मनोरंजन-उद्योग नाती या विषयाच्या पायावर उभा राहिलेला आहे. मग वरच्या डोलाऱ्यात इतर विषय आपले 'आम्ही पण आहोत बरं का' असे असतात. त्यातही पुन्हा विषय काहीही असला तरीही नात्यांमधले बारकावे टिपणं काही सुटणार नाही.

प्रत्येकाचे विविध नात्यांचे अनुभव अनेक असतात. त्यातले बारकावे टिपणारी उदाहरणं घेऊनच तर वर म्हटल्याप्रमाणे मनोरंजन-कंदन सुरू आहे. विविध भाषांतील प्राचीन साहित्यापासून ते अगदी आधुनिक लेखनातही नात्यांतले भलेबुरे कंगोरे सांगितले गेले आहेत, सांगितले जात आहेत आणि राहातील.

सहजपणे आपण अनेकदा म्हणतो, 'नातेवाईक म्हणजे तापच असतो बाबा; दूर रहावं हे बरं...' पण हे म्हणताना 'ते नातेवाईक' म्हणजे काही विशिष्ट व्यक्तीच असतात. आणि त्या व्यक्ती त्यांच्या इतर विशिष्ट नात्यांमध्ये ताप नसतात तर आपल्या त्यांच्याशी असलेल्या नात्यांच्या संदर्भात त्या ताप असतात हे कधीकधी बोलणाऱ्यांना सुचतही नाही इतके कटू अनुभव घेऊन झालेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ, मी एक आई म्हणून भली चांगली, श्रेष्ठ, प्रेमळ, कष्टाळू असेन. पण मी एक बायको, वहिनी, नणंद, सून, सासू, काकी, मामी, मावशी, आत्या, वगैरे म्हणून तशी असेनही किंवा नसेनही. आणि नातेवाईक म्हणजे ताप असतात हे म्हणताना आपणही कुणाचेतरी नातेवाईक आहोत आणि त्यांना आपला ताप वाटू शकतो हेही लक्षात यायला हवं प्रत्येकाच्या. बादशहासारखं 'सगळ्या जावयांना सुळी द्या', म्हटल्यासारखं 'सगळ्या नातेवाईकांना टीकेच्या सुळी द्या' म्हणून चालत नाही. तो सोन्याचा सूळ आपल्यासाठीही असू शकतो.

ही सरसकट गोड किंवा कडू न वाटणारी नाती आपल्यापुरती सुरू होतात, प्रथम आपल्याला जन्म देणाऱ्या आईवडिलांपासून - बेंबीच्या जोडणीपासून. रक्ताची नाती असं सरसकट म्हटलं जातं ती नाती. दोघांच्या समागमातून जन्मलेली मुलं... आणि मग त्या मुलांना आणखी कुणाशी तरी समागम करायचा असतो म्हणून निर्माण झालेली नवी नाती - पुन्हा जन्म. पुनरपि जननम् पुनरपि समागम. विसाव्या शतकाच्या सुरुवाती-सुरुवातीपर्यंत विवाह म्हणजे शरीरसंबंध करण्याचे योजले आहे इतकाच मर्यादित होता. पत्रिकेवर छापत नसले तरीही अजूनही अनेक कुटुंबातून विवाहसंबंधाचा अर्थ तेवढाच मर्यादित असतो. प्रेम, व्यक्तिमत्त्वाच्या विकासाकरता आयुष्याची सोबत, या दूरदूरच्या गोष्टी. पैसा, सामाजिक स्थान, जात-धर्म-भाषा असल्याच मोजपट्ट्या लावून नाती ठरवली जातात आणि प्रेमाची नाती वेळप्रसंगी पायदळी तुडवली जातात.

स्त्रीपुरुषांनी एकत्र येणं, मुलं जन्माला येणं, घालणं, त्यांची गरज वाटणं, आणि मग ती झाल्यानंतर त्यांचं लालनपालन करणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. सृष्टीतले पेशीविभाजनाने वाढणारे जीव सोडले, बीजधारणेपुरता संबंध असलेल्या वनस्पती सोडल्या तर अखिल सजीवसृष्टी हे करतच असते. यातले अपवाद सांगत बसण्याची ही जागा नव्हे; हा सर्वसाधारण नियम आहे. मग लालनपालनाबरोबर मानवी समाज संस्कृतीच्या ज्या टप्प्यावर आहे त्यानुसार मुलांच्या बौध्दिक गरजा पुरवणे, नसलेल्या गरजाही लाड म्हणून पुरवणे, स्वतःच्या सामाजिक स्थानानुसार, रूढीप्रथांनुसार त्यांना घडवणे, वगैरे गोष्टी केवळ माणसंच आपल्या बछड्यांसाठी करतात.

ती गरजही मुळात आईबापांचीच असते. प्रेम-वात्सल्य या भावना खऱ्याच आहेत. गोंधळ सुरू होतो तेव्हा, जेव्हा या परस्परप्रेमात किंवा वात्सल्यात जन्मदात्यांच्याच अपेक्षांची 'दम'दार गुंफण होऊ लागते. या नात्याच्या मूळ सुरुवातीला - प्रेमाला - अनेकदा याच गुंफणीमुळे काळवंडताना पाहातो आपण. पालक म्हणून मुलांसाठी जे केलं जातं त्यापोटीही आईवडील मुलांकडून अपेक्षा ठेवत असतातच. आणि आपल्या मनाविरुध्द वागणाऱ्या मुलांना 'तुमच्यासाठी एवढं केलं, तेवढं केलं', वगैरे बकवास करत त्यांना मानसिक त्रास देतात. जणू काही 'मेहरबान हो, आता कृपा करून एकमेकांपाशी झोपा आणि आम्हाला जन्माला घाला', असा अर्जच केलेला असतो पोटी आलेल्या मुलांनी.

मुलांशी असलेलं नातं अनेक आईवडील फार सुंदर रीतीने जपताना, जोपासताना पाहातो आपण. पण अनेकदा माती कालवतानाही पाहायला मिळते. शिक्षण घेताना, आयुष्याच्या, उपजीविकेच्या वाटा ठरवताना आपल्या दंडेलीमुळे मुलांना कोमेजून टाकणारे पालक हा एक फार मोठा आणि स्वतंत्रच विषय आहे. अनेक आईबापांना प्रत्येक निर्णयात कुठल्यातरी नातेवाईकाच्या शब्दाची कुबडी लागते. तो नातेवाईक किती थोर, किती खुजा यावर पोरांची आयुष्य भिरभिरतात.

नातेवाईक आणि नात्यांमुळे व्यक्तीच्या आयुष्यात पडणारे घोळ यासंबंधाने बोलताना फक्त जवळचे नातेवाईक नव्हे तर आईवडील-मुले हे नातेसंबंधही ऐरणीवर घेतले पाहिजेत तरच सत्यान्वेषण होईल.

एक लग्न होतं आणि आपापली मुले प्यार असलेल्या दोन आईवडिलांच्या जोड्या एकत्र येतात आणि त्यातल्या प्रत्येकाचे 'अग्दीजव्वळचे' नातेवाईक एकमेकांशी 'जोडले' जातात, असं अगदी गोजरेपणाने म्हटलं जातं. प्रत्यक्षात त्यातल्या नव्वद टक्क्यांचे उरलेल्या नव्वद टक्क्यांशी जुळत नसेल. 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज'मधल्या बिल्बो बॅगिन्सचं निरोपाचं भाषण मला इथे अगदी सहजच आठवलं; बिल्बोने बोलावलेल्या १४४ नातेवाईकांना तो सांगतो-

"तुमच्यापैकी निम्म्याहून अधिक लोकांना मी जितकं ओळखायला हवं तितकं ओळखत नाही... आणि तुमच्यापैकी निम्म्याहून जरा कमी लोक जितके आवडण्यासारखे आहात त्याच्या निम्म्यानेही मला आवडत नाहीत."

ज्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला त्यांच्या आपापल्या घरचा वेलविस्तार किती आहे यावर आपण आपलं नातेवाईकी लटांबराचं नशीब काढतो - एक के उपर एक नहीं - पचास-साठ - कितने भी - फ्री. आईकडचे वेगळे, वडलांकडचे वेगळे. ते आजीआजोबा, हे आजीआजोबा, तिथले बाप्ये, इथले बाप्ये, तिथल्या बाया, इथल्या बाया. काही मायमाउल्या, काही भवान्या. काही देवमाणसं, काही महाखत्रूड काडीबहाद्दर. त्यांची पोरंबाळं. काही आपल्या घरी येऊन सुट्ट्या घालवणारी, काहींच्या घरी आपण सुट्ट्या घालवत असतो. बाळपणाचे सुट्ट्यांतले खेळ, धमाल, मस्ती, भांडणं - ही या नातेवाईक गँगबरोबरच. तिकडे फक्त प्रौढांचीही कायकाय नाटकं सुरू असतात; एकत्र येण्याच्या निमित्तासरशी. तो असंच का बोलला, ती असंच कां म्हणाली. कढ काढणं, गळ्यात पडून रडणं, हसूनहसून डोळ्यांत पाणी येणं, या भावनाप्रधान नाट्यासोबत मत्सर, दुस्वास, लावालाव्या यांची नाटकंही रंगतात.

आपल्या आईवडिलांमुळे आपल्या भोवती जे काही नातेवाईकांचं गण-गोणतं भरलं जातं, त्यांतले निवडकच आपल्याला आवडत असतात. आणि अनेकजण अजिबात आवडत नसतात. पण अमकीअमका मावशी आहे, मामा आहे, आत्या आहे, काका आहे, सोयरे आहेत - केवळ एवढ्याच अपघाती नात्यांमुळे त्यांना सहन करणं भाग पडतं, असे होतंच. आणि 'काय करणार... काही पद्धती पाळाव्या लागतात' या जबरी भुक्कड युक्तिवादाखाली आपण मान सारत रहातो. कापा... चिरा... आवळा... व्यक्तित्वाची पार मुस्कटदाबी करून टाका.

नातेवाईक आणि नातेसंबंध जोडण्या-जपण्याची प्रचंड हौस एकंदरीतच आपल्या सभोवार दिसतेच. पण नाती जपण्याच्या आवश्यकतेपेक्षाही देखावा जपण्याची आवश्यकता अधिक दृढावत आहे. केवळ एकावर एक-दोन नव्हे, कितीही फ्री असे ढीगभर नातेवाईक एक विवाहसंबंध जुळून आल्यावर तयार होतात. त्यातल्या अगदी न आवडणाऱ्या माणसांशीही केवळ जवळच्या नात्यातले आहेत म्हणून संबंध ठेवायचेच, त्यांची ऊठबस करायची, आदरसत्कार करायचा असला आग्रह बाळगला तर आपल्याकडच्या उपलब्ध वेळाची वाटच लागते. देखावा जपून हाती काही लागत नाहीच.

'पाया पड हं यांच्या. ही तुझ्या नवऱ्याची सर्वात मोठी मावशी, ही सर्वात धाकटी, ही दोन नंबरची. ही तीन नंबरची. हा आला मामा- सर्वात मोठा मामा. ही मोठी मामी. ही धाकटी मामी आणि तो मागून येतोय तो धाकटा भाऊ माझा...' मधे पायांच्या समोर तीनतीनदा जोडलेले हात आपटले की मग पुढे सुरू. ते पलीकडे, सगळी चुलतेमंडळी बसलीत. 'त्यांना नीट नमस्कार कर हां उगाच त्यावरून पॉलिटिक्स नको.' की समजून चुकायचं की नवऱ्याच्या नातेवाईकांचं आणि आपलं पॉलिटिक्स झालंच सुरू. त्यासाठी लग्नातले नमस्कार, ही चावी लागायची बाकी असते. (पण तरीही पॉलिटिक्ससकट नाती सांभाळायचीच असतात.)

माझ्या ओळखीच्या एका सुनेने लग्नात सासरकडच्या चुलतघरातल्या लोकांना एकदाच वाकून घाऊक नमस्कार केला म्हणून तिच्याशी पुढे दोन वर्ष अबोला धरलेला त्या लोकांनी. (कित्ती छ्छान!)

मागल्या पिढीतले आईवडील तर साक्षात नाती जपण्याच्या सोऱ्यातून पाडलेले असायचे. मग आम्ही पहात असू, एखादी आई ज्यांना मागे नावे ठेवते ते सगळे - नणंद, वहिनी, जाऊ, सासू, मेव्हणा - समोर आल्यावर ती कशी अदबीने बोलते, ऊठबस करते. वडीलही आपल्या साडवाशी, सासऱ्याशी, वहिनीशी नीटच बोलत खोटंखोटं... तोच कित्ता सगळ्यांनी गिरवायचा असतो बिनतक्रार; त्यालाच म्हणतात संस्कार.

यात पैसा, साधनसंपत्ती यांचा अपव्यय होतो, नैतिक खोटारडेपणा अंगवळणी पडतो, आणि सर्वात मोठा अपव्यय होतो वेळेचा.

एका गावात आमचं काही काम चाललं होतं. गावकरी एकत्र यायला हवे होते. तर आज अमक्या आळीत लग्न आहे, उद्या तमक्या भावकीतल्या लोकांना बाराव्याला जायचं आहे, परवा ती चारपाच घरं यायची नाहीत कारण 'तिकडं बारसं आहे...' एक ज्येष्ठ गाववाले म्हणाले, 'अहो ताई काय सांगू, आमच्याकडं वर्षाचे सहा म्हयने नातेवाईकांच्यातली हळद, लग्न, पाचपरतवणे, मयत, दहावे, बारावे, वर्षश्राध्द, बारशी नि पूजा याला हाजरी लावण्यातच जातात. न जाऊन चालतोय काय? वाईट ठरवतात लगेच.'

जुन्या घडीमध्ये हे सारं चालून जात होतं. शिक्षणाच्या संधी मर्यादित होत्या, उत्पादकतेला मर्यादा होत्याच. त्यामुळे वेळ वाया जातोय, असं कुणाला वाटण्याचा प्रश्नच नव्हता. नात्यांची अशी घट्टघट्ट होत गेलेली वीण संरक्षक छत्रासारखीही वाटत असेल पूर्वी. पण आता त्याचे संदर्भ संपत चालले आहेत.

तरीही सर्वांना धरून रहाण्याचा आटापिटा करणाऱ्या आमच्या पिढीतल्या आणि आमच्या आदल्या पिढीतल्याही लोकांमुळे नवीन पोरांचा वेळ वाया जातो अनेकदा. लहानपणी एकत्र खेळणारी आतेमामेचुलतमावस भावंडं मोठी झाल्यावर ठरवेनात का की त्यांना कुणाशी संबंध जपायचेत नि कुणाशी तोडायचेत. 'बरं दिसत नाही'च्या मोघम धमकीखाली का वावरावं त्यांनी? आणि का आपला वेळ फुका दवडावा? कुणाला मनापासून जायचं असेल तर ठीक आहे. जुलमाची नातीगोती जपणे अयोग्य आहे. नाती नकोशी वाटली आणि त्यासंबंधातले उत्सव वायफळ वाटले, टाळावेसे वाटले तर खुशाल टाळावेत पोरांनी.

ज्यांच्याबद्दल तुच्छता वाटते त्यांच्यावर प्रेम करण्याची सक्ती? हा प्रश्न 'अॅटलस श्रग्ड'चा उपनायक हॅन्क रीअर्डनलाच पडतो असं नाही. कोणत्याही कार्यक्षम, बुध्दिमान व्यक्तीला तो पडू शकतो. आणि आपलं पोर जरा वेगळं आहे हे ओळखून त्याला त्याचा वेळ राखून ठेवण्याची मुभा असलीच पाहिजे. नातेवाईकांना धरून असणे हा जसा अवगुण नाही तसाच तो फार मोठा सद्‌गुणही मानला जाता कामा नये.

माझ्या परिचयात एक मुलगा होता. एक दिवस रडवेला होऊन तो आला. त्याला नुकतीच नवी नोकरी दूरच्या शहरात लागली होती. आणि त्याची आजी, म्हणजे आईची आई, त्याला सांगत होती की आईला तू बरोबर ने. कारण ती नवऱ्याबरोबर राहून दुःखी होती. तिला एक मित्रही होता. ते पोर मला म्हणालं, "मावशी मला आईला नाही न्यायचंय माझ्याबरोबर. पण आजी खूप प्रेशर टाकतेय. काय करू... तिला नेलं बरोबर तर तिचा तो मित्रही चकरा मारणार. नकोय ते सगळं झेंगट मला. लहानपणी सहन केलंय पुरेसं. आता माझं मला जगायचंय..." पण- नाही म्हणायची हिंमत नाही होत.

मी ती हिंमत दिली. अर्ज केला नव्हतास जन्माला घालायला, एवढंच वेगवेगळ्या प्रकारे सांगावं लागलं. तुझं तू जगणं महत्त्वाचं आहे, एवढंच समजावून सांगावं लागलं.

हे पांग फेडणे, म्हातारपणाची काठी होणे प्रकरण मुलांना उगीच जायबंदी करून ठेवत असतं. खरोखरच्या प्रेमाच्या पायावर नाती उभी असली तर मुलं मोठी झाल्यावर आईबापांच्या अडचणीच्या काळात प्रेमाचा आधार होतातच. त्यांना ना परंपरेचा आधार लागत ना भावनिक पीळ भरण्याची गरज पडत.

थोडं कठोर वाटेल पण अनेक आईबाप आम्ही तुमच्यासाठी कायकाय केलं याचा जो गोलमाल हिशेब मांडत असतात त्यांच्यासाठी हे सांगणं आवश्यक आहे. मुलं झाली की टाकून द्यायची नसली तर वाढवणं क्रमप्राप्तच असतं. वयाच्या जास्तीत जास्त पंचविसाव्या वर्षापर्यंत पालकांनी मुलांना पोसलं असं धरून चालू. लग्नाचेबिग्नाचे खर्च करण्यात पोरांबरोबर स्वतःची हौस आणि सामाजिक, नात्यागोत्यातल्यांपुढे प्रतिष्ठा जपणे हेही असतेच. त्यामुळे ते बिल पोरांवर नको फाडायला. नंतर कितीतरी वर्षं जगत राहाणाऱ्या पालकांचे सगळे खर्च, सेवा मुलं आपतः करत असतातच की. त्यांनी हिशेब मांडला तर! पण पालककेंद्री आदरव्यवस्थेत मुलांना आदर कमी आणि पालकांना अधिक असं आपल्या ओझेवाहू संस्कृतीत झालेलं आहेच. त्यात काय, आईवडिलांचं करायलाच पाहिजे... मोठ्यांचं ऐकायलाच पाहिजे... काय समजतात ही मुलं स्वतःला!

मुलांना स्वतःला समजू देण्याची मुभा असायलाच हवी.

अनेकदा 'लोक काय म्हणतील' या भावनेतून अटीतटीने खर्च करून आईबापांच्या जगण्याचा अर्थ निघून गेलेला असूनही मुलं त्यांना जगवत हॉस्पिटलांत ठेवतात. यातही ओझं झालेल्या नात्याचाच भाग जास्त असतो. सारं घर त्या क्लेशाभोवती फिरतं. मानसिक तोल ढासळलेल्या वृद्ध आईवडलांना योग्य उपचार आणि वातावरण मिळेल अशा ठिकाणी, वृद्धाश्रमात ठेवणारी मुलं ही नातेवाईकांत मोठाच चघळण्याचा विषय ठरतात.

माझ्याकडे येणारा एक इस्त्रीवाला मुलगा होता. त्याची आई नव्वद वर्षांची झाली. गावी होती. जवळपास कोमाटोज्. म्हणजे डोळे टक्क उघडे, श्वासोच्छ्वास सुरू, बाकी काहीही शुद्ध नाही. गावचा भाऊ आणि नातेवाईक म्हणाले, "तू शहरात आहेस, कमावतोस. आईला इस्पितळात ने, चांगल्या डॉक्टरला दाखव." आणलं तिला इथे. महिनाभर इथून तिथे नाचला. क्षमता नव्हती तरी सत्तर हजार खर्च केले. मग कर्ज काढायची वेळ आली तेव्हा मला म्हणाला, "काय करू ताई. नातेवाईकांनी मला पार येडं करून टाकलंय. सारखं म्हणतात, "आईवर खर्च नाय करायचा तर कुणावर करायचा." कुठून आणू पैसा. आणि तिच्यात पैशाचाही फरक पडत नाहीये." त्याला सांगितलं, "उगीच अपराधी वाटू घेणं सोड. तिला घरी आण. जमेल तेवढी शुश्रुषा कर. आणि जाऊ दे तिला शांतपणे..." म्हटला, "असं कुणीच सांगत नाही हो, ताई. मला म्हणतील, "पैसा प्यारा आहे तुला." तोंड दाखवायला जागा राहाणार नाही." त्याला म्हटलं, "फार जास्त बडबड लावली तर तूच तोंड बघू नकोस." तो पोर कितीतरी वेळ विचारात बुडालेला. त्याला लहान बाळ होतं. म्हटलं, नाहक कर्ज करून बाळात कर्जातच वाढवणार आहेस का? चौथ्या दिवशी त्याने येऊन सांगितलं. आईला घरी आणलंय. आठ दिवसात आई घरीच वारली. नातेवाईक काहीबाही बोललेच त्याला नंतर. पण त्याला बळ मिळालेलं. विचार पडतो, किती नातेवाईक योग्य सल्ला देतात आणि किती बुडवायचेच सल्ले देतात?

एक कुटुंब पाहिलं आहे. त्यातल्या माताश्रींची एक लग्न न झालेली, नोकरीतून निवृत्त होऊन घरी बसलेली बहीण बेशिस्त वागल्यामुळे मधुमेह विकोपाला जाऊन बुद्धी गमावून बसलेली. गलिच्छपणाला सुमार नव्हता. धड होती तेव्हाही इतर कुटुंबाला प्रेम लावण्याचा विषय कधी तिच्या मनाला शिवलाही नाही. पण या माताश्रींना मात्र माझीबहीणमाझीबहीण या पलिकडे काही सुचत नव्हतं. मुलगी, मुलगा, सून, जावई, नवरा सर्वांनी मिळून त्या बेकार बहिणीसाठी वेळ द्यावा ही तिची सतत अपेक्षा असे. कुटुंबातले सर्व प्रश्न दुय्यम ठरू लागले. पाच वर्षं त्या सर्वांनी माताश्रींसाठी हा सारा वैताग वैतागतच सोसला. म्हाताऱ्या माणसाचं एवढं करवत नाही तुम्हाला, माझं तरी काय कसं करणार आहात अशी फोडणी चर्रकन पडत असे मधूनमधून काळजावर. कशासाठी केलं हे त्या बाईंनी!

अपेक्षा हा नात्यांमधला सर्वात मोठा वैताग ठरतो. अमक्याने काहीतरी आमच्यासाठी करावं, ही अपेक्षा करण्याचा भाग एकीकडे, आणि मग ती अपेक्षा पूर्ण केल्यावर ती करणाराची कृतज्ञतेची अपेक्षा असते, ती एकीकडे. मुळातली अपेक्षा पूर्ण करणं वा न करणं आणि मग कृतज्ञतेची अपेक्षा पूर्ण करणं वा न करणं यांतूनच बऱ्याचशा नातेसंबंधांतली वीण घट्ट होत जाते किंवा उसवत जाते. यातून आईवडील आणि मुलंही सुटत नाहीत. तर जरा पलीकडच्या नात्यातल्यांचं काय सांगावं?

व्यक्तिमत्त्वावर, आवडीनिवडींवर टीकाटिप्पणी करणे हा नातेवाईकचमूचा फार आवडता रवंथ असतो. रवंथाचे गोळे कितीवेळा घशात काढतील नि कितीवेळा चावत बसतील! त्यात वेळ कसा चटकन् निघून जातो. एखाद्या मुलामुलीचं व्यक्तिमत्त्व जरा वेगळं, जरा टोकेरी असलं, वेगळ्या प्रकारची हुषारी असली किंवा स्वभान असलं की लगोलग तिचा-त्याचा स्वभाव यावर दळणं निघतात.

पण त्याचबरोबर असेही अनेक नातेवाईक पाहिले आहेत, की जरा हुषार पोर वाटलं तर त्याला शिक्षणासाठी मदत करतात, पोर जेवलंय की नाही अशी शंका जरी आली तरी घरी बोलावून जेवू घालतात. आणि त्याबद्दल कृतज्ञ राहाणारी नातेवाईक मुलं जशी असतात, तशी मदतीच्या बदल्यात आमच्याकडून एवढंकेवढं काम करून घेतलं हे सांगणारीही असतात. ज्या मावशीने शिकायला राहिलेल्या - लहानपणी अंथरुणात मुतणाऱ्या भाचीची अंथरुणं बिनतक्रार धुतली - तिच्या घरी जरा मोठी झाल्यावर भांडी घासावी लागली याचंच भांडवल करणारी मुलगीही पाहिली आहे.

मग वाटतं मदत करण्यासाठी नातीगोती बघायचीच काय गरज आहे? कुठल्याही लायक व्यक्तीला जरूर मदत करावी, उभं रहायला आधार द्यावा. नात्यासाठी एवढं केलं तर 'त्यात काय एवढं' हा गृहीत धरण्याचा प्रकारच नको. मनातलं काही उलगडून दाखवायला रक्ताचीच बहीण असावी, भाऊ असावा, आईबाप असावेत असं काहीच नाही. नवरा-बायको हे नातं नाही का, रक्ताचा काहीही संबंध नसताना एकत्र आलेली दोन माणसं एकत्र तेव्हाच आनंदात राहू शकतात जेव्हा बुद्धीच्या तारा जुळतात... तेच इतरत्रही खरं आहे.

आता दूरदूरवर जिवाची नाती जोडण्याची सोय आहे. रक्ताच्या अपघाती नात्यांची गरज तशी फारशी उरलेलीच नाही असं म्हणता येईल. आवडीनिवडी, बुद्धीची पातळी, कल, विचार, हे जुळण्यावर नाती जुळतात. आयुष्यात कितीतरी उशिराही अशी जिवाची नाती जुळणारे मित्रमैत्रिणी भेटतात. तेच महत्त्वाचे. एखादा लेखक, लेखिका तिच्या लेखनातून आपल्या बुद्धीशी बंध जोडते, प्राणाधार बनू शकते. असं असताना केवळ जन्म-समागम-जन्म-समागम यांतून निर्माण झालेल्या नात्यांपुरता मानव सीमित रहाणार नाही अशा नव्या नात्यांच्या शक्यता अमित आहेत.

कोणी नाही कोणाचा
काका मामा आणि भाचा
मग अर्थ काय बेंबीचा
विश्वचक्री?

-बा. सी. मर्ढेकर

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3.6
Your rating: None Average: 3.6 (5 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखातले बरेच मुद्दे ग्राह्य असले तरी काही बाजू विचारांत घेतल्या नाहीत. पुढच्या पिढीकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे हे चूक. वा त्यांच्यासाठी केलेल्या गोष्टींचा पाढा वाचणे हे ही अयोग्य. पण आर्थिक परिस्थितीमुळे एकत्र रहायला लागलेल्या ज्येष्ठांची कसलीच लुडबुड नसताना, त्यांच्या केवळ आस्तित्वावरुन त्यांना दूषणे देणारी व त्यांच्याशी वाईट वागणारी पुढची पिढीही मी पाहिली आहे. मरण हातात नसताना, हे असे मनःक्लेश देणारे जीवन नाईलाजाने जगणारे पालक मी बघितले आहेत.
आई-वडिलांचा अनुभव मोलाचा असतो. पण निव्वळ त्यांना जालावर वावरता येत नाही म्हणून सतत हिणवत रहाणे, त्यांच्या अनुभवाच्या सल्ल्यापेक्षा 'नेट हेच गुरु' या न्यायाने फक्त जालीय माहितीवरच जास्त विश्वास ठेवणे आणि त्यातून स्वतःचे महत्वाचे निर्णय घेणे, असली तरुण पिढीही मी जवळून पाहिली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही जंतुंची इतकी गर्दी जगात आहे का रास्त |
भरती विषाणुंचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त ||

आई-वडिलांचा अनुभव मोलाचा असतो. पण निव्वळ त्यांना जालावर वावरता येत नाही म्हणून सतत हिणवत रहाणे, त्यांच्या अनुभवाच्या सल्ल्यापेक्षा 'नेट हेच गुरु' या न्यायाने फक्त जालीय माहितीवरच जास्त विश्वास ठेवणे आणि त्यातून स्वतःचे महत्वाचे निर्णय घेणे, असली तरुण पिढीही मी जवळून पाहिली आहे.

मुद्दा समजला.

धागाकर्तीने एक बाजू मुद्दाम भर देऊन मांडलेली आहे (असा माझा समज आहे) कारण दुसरी बाजू आजही अत्यंत प्रबल आहे. वरिष्ठ नातेवाईकांच्या बाजूनेच सगळी संस्कृति skew झालेली आहे व त्याविरुद्ध बोलणे सोडाच .... विचार करणे हे सुद्धा discourage केले जाते. व म्हणून (माझ्या मते) धागाकर्तीने ह्या hierarchy** मधून उद्भवणार्‍या समस्यांची चर्चा केलेली आहे.

आईवडिलांचा अनुभव मोलाचा असतो हे ठीक आहे. आता मुलांची समस्या ही असते की त्यांना आईवडिलांच्या अनुभवातून एक महत्वाचा फॅक्टर डिस्काऊंट करावा लागतो व तो आहे - समय. आईवडिलांचे निर्णय जे होते ते त्या आईवडिलांच्या समयास अनुसरून होते. समयामधे नेमके काय येते - तंत्रज्ञान, सामाजिक व्यवस्था वगैरे. तसेच आईवडिलांचे प्रेफरन्सेस वेगळे होते व मुलांचे वेगळे असतात. तेव्हा आईवडिलांच्या अनुभवाच्या जोडीला इतर विकल्प शोधणे व त्यानंतर मुलांनी स्वतःच स्वतःला अनुकूल वाटेल असा निर्णय घेणे हे अगदी योग्य आहे. यामागचा मुद्दा मॅच्युरिटीचा आहे. म्हंजे - मुलांच्या त्या निर्णयाचे परिणाम सर्वात जास्त कोणाला भोगावे लागणार आहेत ?? मुलांना की आईवडिलांना ? जर मुख्यत्वे मुलांना भोगावे लागणार असतील तर निर्णय मुलांनीच घ्यावा व मुलांनीच ठरवावे की निर्णयप्रक्रियेमधे आईवडिलांच्या मताला किती स्थान द्यावे ते.

--------

** hierarchy हीच चूक असते असा माझा मुद्दा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय अनुभव आल्याने असला कडवटपणा येतो असा विचार करत आहे. नात्यांचा जनुकीय पाया आणि हा लेख यांची एकत्र सांगड घालता येते का हाही विचार करत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नात्यांचा जनुकीय पाया आणि हा लेख यांची एकत्र सांगड घालता येते का ...

'नात्यांचा जनुकीय पाया' हे विज्ञान आहे. विज्ञानातून, गोष्टी कशा घडतात, कशा होत्या, हे समजतं. आज कसं वागावं, सद्यस्थितीत नैतिक काय, हे विज्ञान शिकवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाही अदिती बहुतेक, अनुपजींना म्हणायचय की आई-वडीलांतले दोष मुलांत येऊन परिस्थिती अधिक किचकट आणि दुप्पट कॉम्प्लिकेटेड होते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तरीही सर्वांना धरून रहाण्याचा आटापिटा करणाऱ्या आमच्या पिढीतल्या आणि आमच्या आदल्या पिढीतल्याही लोकांमुळे नवीन पोरांचा वेळ वाया जातो अनेकदा. लहानपणी एकत्र खेळणारी आतेमामेचुलतमावस भावंडं मोठी झाल्यावर ठरवेनात का की त्यांना कुणाशी संबंध जपायचेत नि कुणाशी तोडायचेत. 'बरं दिसत नाही'च्या मोघम धमकीखाली का वावरावं त्यांनी? आणि का आपला वेळ फुका दवडावा? कुणाला मनापासून जायचं असेल तर ठीक आहे. जुलमाची नातीगोती जपणे अयोग्य आहे. नाती नकोशी वाटली आणि त्यासंबंधातले उत्सव वायफळ वाटले, टाळावेसे वाटले तर खुशाल टाळावेत पोरांनी.

बाकी "ओझेवाहू संस्कृति" हा शब्दप्रयोग लई आवडला.

तार्रुफ़ रोग हो जाये तो उसको भूलना बेहतर
ताल्लुक बोझ बन जाये तो उसको तोड़ना अच्छा

बरं दिसत नाही, नातेवाईक काय म्हणतील ?, जनरीत पा़ळली पाहिजे - या व इतर मुद्द्यांमुळे व्यक्तीवर एक प्रकारच्या स्विचिंग कॉस्ट्स लादल्या जातात व संस्कृति ही व्यक्तीसाठी काहीशी बंदिशाला बनते. culture locks you in.

-----------

ज्यांच्याबद्दल तुच्छता वाटते त्यांच्यावर प्रेम करण्याची सक्ती? हा प्रश्न 'अॅटलस श्रग्ड'चा उपनायक हॅन्क रीअर्डनलाच पडतो असं नाही. कोणत्याही कार्यक्षम, बुध्दिमान व्यक्तीला तो पडू शकतो. आणि आपलं पोर जरा वेगळं आहे हे ओळखून त्याला त्याचा वेळ राखून ठेवण्याची मुभा असलीच पाहिजे. नातेवाईकांना धरून असणे हा जसा अवगुण नाही तसाच तो फार मोठा सद्‌गुणही मानला जाता कामा नये.

ह्म्म. 'अॅटलस श्रग्ड' वाचली पाहिजे. (आधीच आम्हाला फिक्शन बद्दल "फार उत्साह" आणि त्यात ही कादंबरी म्हंजे ठोकळा ... म्हंजे बघायलाच नको).

( ranting mode on )
तुच्छता ह्या शब्दाच्या अस्तित्वावरच लोकांना आक्षेप आहे असं मला वाटतं. ती भावनाच समूळ नष्ट केली पायजे (नव्हे अस्तित्वातच नसायला हवी) असं लोकांना वाटतं की काय कोण जाणे. सामाजिक विकासाचा (म्हंजे समानतेचा) प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कंठशोष करणार्‍या लोकांचं मत घेतलंत तर तुम्हाला हेच दिसेल की त्यांच्या मते कोणीही कोणालाही तुच्छ लेखू नये. पण त्याहीपलिकडे जाऊन वनातील उंच झाडांचे शिखर कापून टाकून छोट्या झाडांना कशी वृद्धीची संधी दिली ह्याचे बखान करण्यातच लोकांना धन्यता वाटते. पण हे करताना त्यांच्या मनातली उंच झाडांबद्दलची तुच्छता कशी काय बेमालूमपणे लपवता येते हे मला न उलगडलेलं कोडं आहे.

( ranting mode off )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही गोष्टी तशा स्वयंस्पष्ट आहेत, तरी वाचताना पुन्हा विचार करायला मिळाला.

केवळ जन्म-समागम-जन्म-समागम यांतून निर्माण झालेल्या नात्यांपुरता मानव सीमित रहाणार नाही अशा नव्या नात्यांच्या शक्यता अमित आहेत.

परंतु असा कधीच सीमित नव्हता, ना?

घर सोडून - विशेषतः गाव सोडून - जाणार्‍या सुशिक्षित वर्गीय लोकांना जन्म-समागमाच्या संदर्भावेगळी नाती घडवावी लागतात, काही गत्यंतरच नसते. येथपर्यंत सहमती नोदवतो आहे.

तरी जन्म-समागमाची नाती ही खूपच महत्त्वाची आहेत, आणि नजिकच्या भविष्यकाळासाठी असणार. हे गणित टाळता येणार नाही. याचे कारण लेखात आलेलेच आहे, परंतु कारणाची अपरिहार्यता लेखात तितकीशी अधोरेखित होत नाही आहे. मनुष्याचे मूल परतंत्र जन्माला येते, म्हणून कोणीतरी कित्येक वर्षे त्याचे संगोपन करावेच लागते. काही दत्तक आणि अनाथ बालके सोडली, तर मोठ्या बहुसंख्येने बालकांने संगोपन त्यांचे जन्मदाते मायबाप करतात. जवळीक, संप्रेरकांमुळे-किंवा-काही-उपजत-प्रेरणेने वाटणारी माया आणि (जननीच्या बाबतीत) स्तन्य दुधाची सोयीस्कर उपलब्धता, हे सगळे फायदे बघता संगोपनाच्या बाजारात बाळाचा माल मायबापच उचलण्याची संभवनीयता खूप जास्त आहे.

त्या संगोपनामुळे कित्येक वर्षे, दिवसाचे कित्येक तास ही नाती वाढण्यास जितका वाव मिळतो, तितका वाव जगातील इतर कोणाला मिळत नाही - जगातल्या ८-१० बिलियन लोकांपैकी नाते करण्यासाठी माय-बाप-मुले-भावंडे सुयोग्य लोक कित्येक असतील, पण ते आपल्याला चाचणी करण्याइतपत वेळ भेटण्याची संभवनीयता काय आहे?

काही थोडे झटपट किंवा बाजारू समागम सोडले, तर समागमापर्यंत पोचण्याकरिता लोकांना वेळेची, ओळख वाढवण्याची गुंतवणूक करावी लागते. गुंतवणूक करण्याकरिताची वेळ मनुष्यांकडे मर्यादित असते. पुन्हा जगातल्या ८-१० बिलियन लोकांपैकी नाते करण्यासाठी समागमाच्या जोडीदारांपेक्षा सुयोग्य कितीतरी लोक असतील. परंतु तितपत ओळख होण्याची संभवनीयता कुठे आहे?

या कामचलाऊ (प्रॅग्मॅटिक) परिस्थितीत फारसा फरक लवकर येणार नाही. त्यामुळे रती आणि बेंबी (संभोग आणि जन्म) हे नात्याचे प्रमुख स्रोत भविष्यात काही काळापर्यंत राहातील.

पुन्हा सहमती : नाळेची नाती असलेले लोक एकामेकांचा कित्येकदा गैरफायदा घेतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाशी सहमत. या संदर्भात Oscar Wilde ने एका शतकापूर्वी म्हटलेले वाक्य
''God gives us relatives, thank God we can choose our friends'' किती मार्मिक आहे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विज्ञान धावत येतं, ज्ञान चालत येतं पण, शहाणपण मात्र मागंच रेंगाळतं!

आणि आपल्या मनाविरुध्द वागणाऱ्या मुलांना 'तुमच्यासाठी एवढं केलं, तेवढं केलं', वगैरे बकवास करत त्यांना मानसिक त्रास देतात. जणू काही 'मेहरबान हो, आता कृपा करून एकमेकांपाशी झोपा आणि आम्हाला जन्माला घाला', असा अर्जच केलेला असतो पोटी आलेल्या मुलांनी.

इतकी टोकाची भूमिका किती जणं घेत असतील? मी स्वतः श्रावण बाळ मेंटालिटीच्या अगदी विरूद्ध आहे, तरीही हे जरा अतीच वाटलं. पुढला लेखही ह्याच बेसीसवर आधारित वाटला. वर अनुप ढेरेंनी मांडलेल्या मताशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0