काळीजमाया

ललित

काळीजमाया

लेखक - सन्जोप राव

माणसांमाणसांमधली नाती निवडण्याचे माफकच स्वातंत्र्य आपल्याला असते. रक्ताच्या नात्यांचे सोडा, ती नाती तर सटवाईच आपल्या कपाळावर गोंदून जात असते. पण त्या नात्यांशी नाळ जुळेलच असे नाही, किंबहुना बऱ्याच वेळा ती जुळत नाहीच. जिथे आतडे गुंतते त्या नात्यांना तर नावाचीही लेबले लावता येत नाहीत. तसे बघायला गेले तर सगळे काही तोडून जाताना हात गच्च हातात घेऊन डोळ्यांत पाणी आणणाऱ्या पिशव्या विठोबाचे आणि जॅकचे काय नाते आहे? खरे तर काहीच नाही. ‘It was good to be alive with you around’ इतकेच. बस्स! पण हे कुणीही पिशव्या विठोबा किती जॅकना म्हणू शकेल? विशाल आणि विक्राळ सागरातले असंख्य थेंब. त्यातले काही थोडा काळ एकमेकांना चिकटून राहतात. मग त्यातल्या कुणा एकाची वाफ होऊन जाते. तो अचानकच निघून जातो. विक्राळ सागराचे हेलकावणे सुरुच राहते. इतर थेंब त्या जाणाऱ्या थेंबाला निरोपाच्या शेवटच्या क्षणी काय म्हणत असतील? Farewell, my friend. I am sure wherever you are, you will create a small, sun-filled garden around you. And a small bird will come, and sing, not specially for you, but only for you....हे, की आणखी काही? अथांग सागर, त्याचे सतत हेलकावणे, असंख्य थेंब, येणे-जाणे, जाणे-येणे....समजत नाही, समजत नाही.....

लेबले लावून चिकटवलेली, हळदकुंकू वाहून घरी आणलेली नाती तरी राहतील, का जुन्या चपलेचा अंगठा उसवून तुटून जावा तशी फिसकटून जातील ते कुणी सांगावे? सण्ण्याचा सख्खा भाऊ बाबू. पण लग्न होऊन सण्ण्याच्या घरी आलेली गौरी छातीचे खोके झालेल्या, तांबरलेल्या डोळ्यांच्या गांजेकस बाबूच्या घरी राजरोसपणे राहायला आली ते तिला काय कमी पडले म्हणून? आणि जे कमी पडले ते तरी तिला बाबूच्या घरी मिळाले का? तिच्या उफाड्याच्या, कदाचित उपाशी शरीराची हाक तरी गांजाने शरीराचे अणि मनाचे गाठोडे झालेल्या बाबूच्या कानावर गेली असेल का? आता या प्रश्नांची उत्तरे कुठल्या दिक्काला जाऊन बसली आहेत कुणास ठाऊक! पण सण्ण्याच्या नावाने नवरा म्हणून पावलीइतके कुंकू लावणारी गौरी चवचाल वेसवेसारखी, त्याच्या सख्ख्या भावाबरोबर, आपल्या दिराबरोबर राहिली आणि एक दिवस मरून गेली हे माणसांमाणसांमधले कुठले समीकरण म्हणायचे? आणि त्यात सण्ण्याचा काय दोष? त्याने गौरीच्या डोक्यावर पदर घातला हा? तिच्यावर मनापासून प्रेम केले हा? जी कथा सण्ण्याची, तीच गोविंदाचार्याचीही. त्याची बायको तर कुरूप, खेडवळ अगदी आकारहीन. पण तिच्यावरसुद्धा प्रेम करणाऱ्या गोविंदाचार्याला सोडून ती राजरोस दादू गवळ्याचा हात धरून फिरू लागली ते गोविंदाचार्याचा कुठला फासा चुकीचा पडला म्हणून? मानवी नात्यांचे हे असलेच काही तिरपांगडे असते. घोटभर पाण्याची अपेक्षा असते माणसाची, पण तितकीही ती नियती नावाची अदृष्य चेटकीण पुरी होऊ देत नाही. श्रीपाद तसे बघायला गेले तर लक्ष्मीचा सावत्र मुलगा. त्याच्यावर जीव लावावा असा काही लक्ष्मीचा नवस नाही. पण लक्ष्मी मुळातच सुपाएवढ्या काळजाची आहे. आपल्या दोन सख्ख्या मुलांबरोबर श्रीपादच्याही टाळूवर आपल्या मायेची सावली पडावी एवढीच तिची भाबडी आशा आहे. पण तसले कुठले व्हायला? तिचा प्रेमाचा हात श्रीपादने कायम क्रूरपणाने झिडकारला आणि हातातली कसलीतरी काठी एका जुन्या चाकूने खरवडत तो निर्विकारपणे बसून राहिला. त्याचे एकवेळ सोडा, तो तर येऊन जाऊन सावत्रच मुलगा. पण लक्ष्मीने ज्याच्याशी दुसरेपणावर लग्न केले तो केसूभट; नाहीतर करेव्वानेही ज्याच्याशी दुसरेपणावर लग्न केले तो तिरक्या, यांच्याबरोबरच्या या नात्यांमधून या बायकांच्या हाताला शेवटी काय लागले? ही तर बावनकशी नवरा-बायकोची नाती ना? पण या नात्यांचेही लपवता न येणारे कोड होऊन बसावे आणि तशा कुजक्या नात्यांना या सरळ मनाच्या बायकांनी त्यांच्या शरीराचे खत पडेपर्यंत सांभाळायला लागावे असे त्यांच्या हातून काय पाप घडले असावे? शांताक्कांच्या अजाण, कोवळ्या देहावर समाजातले आदर्श म्हणून प्रसिद्ध असलेल्या दादासाहेबांनी आसुसून झेप घेतली आणि नाईलाजाने दिनूमामाच्या बंदुकीला घाबरून त्यांच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोत घातली हे खरे, पण नंतर त्यांचे मन आणि शरीर गुंतले ते रूपाने खूपच उजव्या असलेल्या शांताक्कांच्या सख्ख्या धाकट्या बहिणीमध्ये - जान्हवीमध्ये! म्हणजे लग्नाआधी जबरदस्तीने सवाष्ण झालेल्या शांताक्का नंतर आयुष्यभर सौभाग्यवती असून कुमारीच राहिल्या की! हे नवरा बायकोचे कसले कुरूप नाते म्हणायचे? आणि पुन्हा, यात शांताक्कांचा काय दोष? पण जो आहे तो सगळा दोष दादासाहेबांचाच आहे का? मग तसे असले तर "पण माझं ऐकणार कोण?" या आबाजींच्या तोंडी असलेल्या पालुपदाचे शब्द दादासाहेबांच्या अर्धपुतळ्यावरून येतात असे का वाटते? समजत नाही, समजत नाही.....

मानेवर कोड असलेल्या मेधाला फसवून कंटाळवाण्या रूपवान लिलूशी लग्न करणाऱ्या माधवला मेधाच्या आईने निरोप घेण्याआधी सगळेच गुपित उघडे करून सांगितले आणि मग माधवचे सगळे अस्तित्वच शरमेने बुळबुळीत होऊन बसले. पण आपले मन कधी जिच्यावर जडले होते ती मेधा आणि आज आपल्या नावाने कुंकू लावणारी लिलू यातले कुणाचे कोण याचा त्याला तरी उलगडा झाला आहे का? बरे तर बरे, एखादी तरारलेली वेल उपटून टाकावी तसे लिलूने अरविंदाच्या आयुष्याचे केलेले वाटोळे माधवला माहीतीच नाही. नाहीतर अशा कुस्करत जाणाऱ्या नात्यांचा शोध घेत घेत त्याला किती मागे जावे लागले असते? आणि कशासाठी? वासनेने आंधळा होऊन राधेच्या छातीवर आपली बोटे फिरवणारा बाबाजी लक्षुमीचा नवरा, पण हिवाळ्यात कौलारू छतातून टपटप खाली पडणाऱ्या केसाळ सुरवंटांना बाहेर फेकून द्यावे तसे त्या नात्याला लक्षुमीने झिडकारून टाकले आहे खरे, पण तिच्या मनात देखील दोन महिन्यांपूर्वी तिच्या कमरेला तिच्या इच्छेने, नव्हे, तिच्या आग्रहाने डॉक्टरांनी घातलेल्या विळख्याची ठसठस आहे. अशी ही एकात एक, एकात एक अडकलेली नात्यांची साखळी सोडवत बसायची झाली तर त्याला किती जन्म घ्यावे लागतील? जन्माला येताना माणसाच्या डोळ्यांचा जो आकार असतो तो मरेपर्यंत तसाच राहातो. पण प्रत्येकाला दुसऱ्याच्या डोळ्यांत वेगळे प्रतिबिंब दिसते. त्या अर्थाने प्रत्येकाला दिसणारे डोळे वेगळेच. म्हणजे माणूस तोच, डोळे तेच, पण प्रत्येकाला दिसते ते भलतेच. आपल्या भावावर - माधववर, अगदी मनापासून जीव असलेली, त्याच्यासाठी मुसळधार पावसात छत्री घेऊन त्याला शाळेतून आणायला जाणारी, त्याच्यासाठी अबोली-मोगऱ्याची फुले घातलेली बशी ठेवून त्याची खोली सजवणारी आणि त्याचे एखाद्या चांगल्या, गुणी मुलीशी लग्न होऊन त्याचे आयुष्य सुखाने जावे एवढीच इच्छा बाळगणारी साध्या मनाची रुक्मिणी. पण तिच्या सख्ख्या आईबरोबरचे तिचे संबंध किती काटेरी, विषारी आणि पिळ्यापिळ्याचे आहेत! बरे, आईचीही माधववर तेवढीच माया आहे. आपले दुखरे गुडघे हाताने दाबत तिने माधवसाठी तेल-तिखट लावलेले पोहे केले, कपभर चहा केला, पण तो माधवने घेतल्याचे बघण्याचे समाधान तिच्या नशिबी नाही. माधवचे काय, त्याची तर ती सख्खी आई आणि सख्खी बहीण. त्यात तो कसे डावे-उजवे करणार? आता हा मानवी नातेसंबंधांचा समद्विभुज त्रिकोण कसा सोडवायचा? पेरवाच्या बागेत उन्हे उतरत असताना ताडमाड वाढलेल्या पण डोक्याला आतून किंचित तडा गेलेल्या दामूच्या दंडात नखे रुतवताना यौवन उतू जात असलेल्या कमळीला त्याच्याकडून फक्त काय आपल्या शरीराची तहानच शमवायची आहे? आणि तसे असते तर त्यासाठी तिला वाट्टेल तितके लडदू मिळाले असते की. मग आपले गुलाबाच्या कळीसारखे शरीर दामूच्याच हवाली करावे आणि समाधानाने डोळे मिटून घ्यावे असे कमळीला दामूत काय दिसले, ते तिचे तिलाच ठाऊक. एकीकडे हे असले मळक्या सदऱ्याच्या ओच्यात पारिजातकाचा सडा पडावा तसले दामूचे नशीब म्हणायचे आणि निशिगंधाची फुले हातावर ठेवून खालच्या मानेने ’मी तुमच्या आयुष्यात येऊ शकेन का?’ असे विचारणाऱ्या रेखाला नकार देण्याची तडजोड दत्तूला करावी लागते हे त्याचे नशीब म्हणायचे. आणि हे असे का हे कदाचित कुणालाच सांगता येणार नाही! समजत नाही, समजत नाही.....

घरात दिवा लावायला एक मुलगी असावी असेक प्रत्येक बापाला वाटते. बापूच्या घरात तशी शैलू आहेही. तिच्या कानवल्याएवढ्या अशक्त शरीराला तो मायेने जवळ घेतो ’डुमरी गं बाई, ढमाबाई!’ म्हणून तिच्या पोटाला गुदगुल्या करतो आणि तिच्या उराची धडधड त्याला जाणवते हे प्रेमाचे ओले नाते एकीकडे आणि विठी जोगतिणीच्या धुंद प्रेमातून जन्माला आलेल्या अमाशीचे बेडकासारखे फुटून, चिरडून मरून जाण्याचे स्वत:च्या डोळ्यांनी बघायला लागण्याचे नशीब भाळी असलेल्या सखारामाचे आपल्या लेकीबरोबरचे हतबल नाते एकीकडे. आई-वडलांकडे ज्यांचे बोट धरून उभे राहायला शिकावे असे मायाळू झाड म्हणून बघत असावे आणि त्याच झाडाच्या काटेरी फांदीने अंगावर रक्त उमटावे हे असले नाते कुणी जन्माला घातले असावे? आणि का? सरड्यासारखे पाय घेऊन जन्माला आली हा काय काशीचा दोष आहे का? पण त्यासाठी तिला तिच्या सख्ख्या जन्मदात्या बापाकडून मिळाले काय? तर आयुष्यभर तुच्छता, अपमान आणि हिडीस-फिडीस. आणि तो बाप मेला तरी तिचे आयुष्य तसेच खरकटे राहिले! काशीचे तसे तर सदूभाऊ आणि सीताबाईचे अगदी उरफाटे. सदाभाऊने केले काय? तर आयुष्यभर घरगुती गिऱ्हाइकांना खमंग, झणझणीत मसाला भजी, चरचरीत उसळ आणि जाड, कापडाच्या पट्टीसारखा चहा दिला आणि आपले गावठी हॉटेल फारसा पैसा न मिळवता पण अगदी स्वच्छ टोपीने चालवले. पण त्याच्या मुलाच्या धंद्याच्या नवीन गणितात त्याला कुठेच जागा नाही. मग शेवटी आयुष्याचे गुंडगुळे होऊन नाईलाजाने गावाकडे परत चाललेला सदाभाऊ आणि त्याच्याबरोबर थंडीने काकडत उभी असलेली आणि कधीच फारसे न बोलणारी सीताबाई यांचे त्यांच्या मुलाबरोबरचे हे असले कसले वांझोटे नाते म्हणायचे? प्रेमाच्या नावाखाली प्रतारणा यात काही नवीन असे नाही, पण इतर वेळी लहान मुलांचे लाड करणारा दादूभट, वकिलाच्या पोराच्या गळ्यातली सोन्याची साखळी लुबाडण्यासाठी देवळात, देवासमोर त्याच्या गळ्यात झाऱ्याचं टोक खुपसतो तेव्हा माणसांमाणसांमधल्या नात्यांना काही अर्थ आहे का नाही असले प्रश्नचिन्ह मनात उभे राहाते. तहानलेल्याला पाणी मिळू नये अशीच जर नियतीची योजना असली तर आई-वडलांच्या पोटात चार घास पडावेत, भावांच्या डोक्यावर टोपी यावी म्हणून वयाचे कोवळेपण विसरून आपल्या आयुष्याची राख करणारी सुम्मी शेवटी यातले काहीही करू शकत नाही आणि सासुरवासाने निमूटपणाने मरून जाते हा नियतीचा न्यायच म्हणायचा की. अशी अगम्य नाती समजून घ्यायची, सहन करायची म्हणजे 'कारट्या, तू बी. ए. हो अगर होऊ नको, पण आतून बाहेरून अगदी दगड हो, अगदी घट्ट, डोंगरी दगड हो बघ!' हेच करून बघायला हवे. ते करणे ज्याला जमले, तो जिंकला. त्याला मरण नाही. त्याला राधीने सांगितलेली गाय वासराची गोष्ट ऐकताना, त्यातला वासराचा निरोप घेताना गाय म्हणते ते ’अरे आता यापुढं मी तुझ्याजवळ असणार नाही. तुला एकटंच राहायला शिकलं पाहिजे. चरायला जाताना तू सगळ्यांबरोबर जा. येताना त्यांच्याबरोबर ये. रानात अवेळी भटकू नकोस. संभाळून राहा, व सुखाने मोठा होऊन आनंदानं राहा. मी तर जाते’ हे ऐकताना आपले डोळे कोरडेठक्क ठेवता येतील. येतीलच. माणसांमाणसांमधल्या नात्यांचा खरा अर्थ त्यालाच समजला असे म्हणायचे काय? म्हणजे मुळातच निरर्थक असलेल्या गोष्टीचा अर्थ आपल्याला आणि फक्त आपल्यालाच समजला म्हणून छाती बडवायला ज्याला जमले त्यालाच पहिले बक्षीस असाच इथला न्याय आहे काय? समजत नाही, समजत नाही.....

म्हणजे शेवटी काय? आपल्याला कुणीच नाही, आपले कुणीच नाही आणि अश्वत्थ वृक्षाच्या प्रत्येक क्षणाला गळून पडणाऱ्या हजारो पानांप्रमाणे आपले असणे काय किंवा नसणे काय ही एक केवळ निरर्थक अटळ प्रक्रिया आहे हेच खरे. मग या वृक्षाच्या खाली पडणाऱ्या पानांचा खाली पडता पडता एकमेकांना होणारा ओझरता स्पर्श हीच मानवी नातेसंबंधांची व्याख्या आहे काय? आणि तसे असले तर मी, माझे असा लसलसाट तरी कशासाठी? प्रेमाचे सोडा, ते काय प्रत्येकाच्या नशिबात येतेच असे नाही, पण किमान आपला द्वेष करणारे, आपल्यावर सूड उगवण्याची वाट बघत बसणारेही कुणी नाही या भावनेने रडणाऱ्या सीताक्काला, ‘बाई! ही तुझीच नव्हे, तर प्रत्येकाची कथा आहे’ हे साक्षात मृत्यूनेच समजावून सांगावे काय? जी व्यथा सीताक्काची, तीच आयोनाची. त्याचा तरणाताठा मुलगा गेला, पण त्याबद्दल अनुकंपा राहू द्या, त्याचे बोलणे देखील ऐकून घ्यायला त्याला कुणी नाही. शेवटी तो आपल्या घोड्याला जवळ घेतो. घोडा मध्येच वाकडी मान करतो व आयोनाचा हात हुंगतो. इतका वेळ त्या मुठीएवढ्या जागी दडपून ठेवलेल्या भावना एकदम उचंबळतात. सारे बांध त्यांच्यापुढे पार वाहून जातात व त्या अमर्याद पसरतात. घोड्याच्या तोंडावरून हात फिरवीत हलक्या आवाजात आयोना त्याला अगदी पहिल्यापासून सारी हकीकत सांगू लागतो. माणसाला अपेक्षित त्या मानवी नात्यांतून माया मिळाली नाही की माणसाचे मन असे झाडाझुडपांतून, पक्षीप्राण्यांतून प्रेम हुडकत हिंडत असते की काय कुणास ठाऊक! पण तिथेही सगळे फासे पाहिजे तसे थोडेच पडतात? करेव्वाला लळा लावणाऱ्या कुत्र्यालाही शेवटी म्युनिसिपालटीच्या लोकांनी विष घातले आणि ते पोट फुगवून पाय झाडत आडवे झाले, संतापाने अंगावर सपासप मारलेले वळ तसेच अंगावर घेऊन आपुलकीने अंगाला अंग घासू लागणाऱ्या कृष्णा गाईच्या डोळ्यांतून शेवटी झरझर पाणी वाहू लागले आणि दारातून तिला लोकांनी उचलून बाहेर नेले तेव्हा तिची शिंगे चौकटीला खटखट बडवली, दोनचार चिमूट दाणे, थोडे पाणी, आणि कोथिंबीर एवढ्याच अपेक्षेवर उत्साहाने गरगर फिरणारा पक्षी शेवटी निष्प्राण होऊन हातावर आडवा झाला. मी-मी, माझे-माझे करणाऱ्यांचेही सगळेच शेवटी फुसकुली होऊन गेले. मग सगळे आयुष्य कोरून काढले तर ध्यानात येते ते एकच - माणसाचे खरे नाते फक्त स्वत:शीच असते. प्रत्येक माणसाला सर्वात प्रिय वाटणारी व्यक्ती म्हणजे तो स्वत:च! हे पचायला जड असले तरी हेच मानवी जीवनाचे अंतिम सत्य आहे. Hell is other people. अर्थहीन नाती सांभाळत बसण्यापेक्षा या सत्याचा स्वीकार करणे जास्त बरे. एवढे करायला तरी प्रत्येकाला जमेल? जमेल? समजत नाही, समजत नाही.....

माणसांमाणसांमधल्या नातेसंबंधांचा हाच अर्थ असेल तर त्या संबंधांना काहीच अर्थ नाही हेच खरे. जन्म घेणे हे माणसाच्या हातात नाही. जगणे ही बहुतेकांसाठी अटळ, कदाचित कंटाळवाणी अपरिहार्य प्रक्रिया आहे, मृत्यू हा बाकी मानवी जीवनाला अर्थ देणारा उत्कर्षबिंदू आहे. अपरिहार्य, अटळ आणि कदाचित म्हणूनच अतिशय आकर्षक असलेले माणसाचे मृत्यूशी असलेले नाते. दानय्याच्या आयुष्याची एक लालभडक न संपणारी वेदनाच करणाऱ्या रुकमीपासून त्याची सुटका करणाऱ्या केशरनागासारखा आकर्षक मृत्यू. वडाच्या झाडावरून उडी मारून पोरांना विमान दाखवताना मान मोडून घेणाऱ्या बळवंतमास्तराची काय, म्हातारीचा हात धरून कपिलतीर्थातील हिरव्या पाण्यात उतरणाऱ्या लक्ष्मीची काय, मुखवट्याखाली डोसके चिरडून घेणाऱ्या यमनीची काय, सूर्याच्या मूक आमंत्रणाला प्रतिसाद देऊन आणखी एक पायरी उतरणाऱ्या रमाची काय, सोन्याचा खजिना शोधताना शेवटी स्मशानातच लाकडासारखे थंडगार होऊन पडलेल्या भैरूची काय आणि हातातली काकणे किणकिणवत गोल अंधारात उडी मारणाऱ्या कावेरीची काय…सगळ्यांची कथा तीच. ज्यांचे आयुष्य म्हणजे एक न संपणारी वेदनाच झाली होती अशा असंख्य अनामिक, बिनचेहऱ्याच्या लोकांची जगण्याच्या कचाट्यातून सुटका करणारा तो करुणासागर मृत्यू. तो आहे म्हणून तर सगळ्या जगण्याला काहीतरी टिंबभर अर्थ आहे. त्या पूर्णविरामाचे सगळ्या निरर्थक आयुष्याला सौभाग्य आहे. तोच सगळ्यांच्या आयुष्याचा सूर्य आहे. कुणी गोपुरे बांधली असतील, कुणी वाडाभर सोने गोळा केले असेल, कुणी कोसभर जमिनीवर आपले नाव लावले असेल. पण सीमा ओलांडून पलीकडे जाताना सगळ्यांचे हात रिकामेच. तिथेतरी किमान एक रांग असावी. लहान दिंडी उघडणाऱ्या द्वारपालांच्या वागण्यात थोडी नम्रता असावी. रिकाम्या हातांनी येणाऱ्या लोकांचे हात रिते नाहीत हे तरी त्यांना कळावे. मानवी नात्यांचा अर्थ ज्यांना सापडला नाही अशांनाही स्वच्छ निरंजन मनाने निरोप मिळावा. मिळेल?

ते देखील समजत नाही.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

उत्तम आढावा घेतलाय,माणसामाणसांमधील नाती हा जीएंच्या बहुतांश कथांचा गाभा असून ते कितीजणांना व्यवस्थित समजतं हा प्रश्न आहेच? प्रत्येक कथा नजरेसमोर आली, कृष्णा गायीबद्दल वाचल्यावर ती कथा आठवून बेळगावीच्या अंगणात गेल्यासारखं वाटलं. मला हे इतकं आवडलंय की काय बोलू आणि किती बोलू तेच समजत नाही... आणि हेच खरं शेवटी समजत नाही, समजत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

सहमत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आवडले. पुन्हा लिहायला लागलास हे चांगले झाले रे !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकेक कथा वाचतानाच जी.ए. भारी पडतात. प्रत्येक कथा वाचून झाल्यावर मनांत उसळलेला भावनांचा कल्लोळ शांत व्हायला दोन दिवस लागतात. तर अशा असंख्य सकस कथांमधला कॉन्सन्ट्रेटेड एक्सट्रॅक्ट एकाच वेळेला प्यायला तर काय होईल ? तेच हा तुमचा लेख वाचून झाले. कदाचित वयाचा परिणाम असेल. एकाच वेळेला तो शंभर सुपरफास्ट बातम्यांचा ओघही हल्ली अंगावर घेववत नाही.
वाचनाच्या जुन्या खपल्या परत निघाल्या. आता अस्वस्थ झालेले मन शांत करण्यासाठी कपाट उघडून, पुन्हा एकदा जी.एं चे पारायण करणे क्रमप्राप्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

जीएंच्या वाचकांना वगळले तर इतरांना (अनेक संदर्भ ना लागल्याने) भयंकर बोअर होईल - प्रसंगी दवणीय वाटेल -असा लेख. नात्यांचंही असंच असतं म्हणा ज्याच्याशी आपले ऋणानुबंध जुळतात त्यांच्याबद्दल आपण कितीही भरभरून बोललो तरी त्या व्यक्तीला न ओळखणाऱ्या इतरांना एका मर्यादेनंतर बोअरच होतं.

दोष इतरांचा, भरभरून काळीज देणाऱ्यांचा नाही, हे मान्य. पण...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लेखन अतिशय आवडलं. एक आगळाच प्रयोग!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करेव्वाला लळा लावणाऱ्या कुत्र्यालाही शेवटी म्युनिसिपालटीच्या लोकांनी विष घातले आणि ते पोट फुगवून पाय झाडत आडवे झाले,

हे कुठल्या कथासंग्रहात आहे? वाचायला आवडेल.
कर्वेनगरला रहात असताना पिंकी नावाची एक भटक्या भूभीवर अन्य भुभ्यांनी हल्ला केला व ती मरणासन्न झाली. मी ऑफिसमधून घरी आल्यावर त्या अवस्थेत मी तिला भेटलो. त्यावेळी तिच्या डोळ्यात एक प्रेमाची झलक काही सेकंदच मला दिसली तो बदल इतक्या वेगाने होता की मी तो भाव विसरु शकत नाहि. त्यानंतर तिने कायमची मान टाकली. मग घराच्या बागेतच तिला पुरली. तो भाव , ती अंतरीची हाक शब्दातीत होती. आजही माझ्या मनावर कोरलेली आहे. काय नात होत तिच माझ? अनुत्तरीत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

घाटपांडे मला कळलं तुम्हाला काय म्हणायचे आहे ते.
http://aisiakshare.com/node/4272

घरी आलो ते मी लगबगीने घरात शिरले. पहाते तो कार्टन टेबलवर तसाच पण रघु मात्र खाली निपचित पडला होता. माझी चाहूल लागल्यावर त्याने डोके वर केले. मात्र तेवढी हालचालही त्याच्यासाठी मुष्कील होती. मी त्या पिल्लाला ओंजळीत घेतले व चमच्याने पाणी पाजले. पाणी त्याने गटागट प्याले अर्थात तो बराच वेळ तहानलेला होता. व पाणी पिऊन त्याने खरच माझ्या डोळ्यात डोळेभरुन पाहील, अगदी स्ट्रेट डोळ्यात पाहीले. अन जी मान टाकली. अक्षरक्षः ती भेट म्हणजे कुणी जीव परलोकात पोचलेला फक्त माझ्या शेवटच्या भेटीकरता घुटमळत होता. त्याचे डोळे मी पुढे विसरुच शकले नाही. यावेळेस त्यात कारुण्य नव्हते तर एक प्रकारचा समजूतदारपणा अन ओळख होती. ख-र-च होती!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय! त्या भुभीला फाटका बाहेरच जग हे एखाद्या बंदिस्त तुरुंगा सारखे वाटायचे व ती फाटकातून घरात येण्यासाठी प्रचंड धडपड करायची. मरणासन्न अवस्थेतही मी तुझी दखल अगदी पुर्वीसारखीच घेतली आहे असे संदेश देणारा तो डोळ्यातील भाव अगदी एखाद्या सेकंदापुरताच! मला आजही अस्वस्थ करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कुत्र्यांना भित्रेपणा चालत नाही किंवा ती अधिक चवताळून खोड्या काढतात, वेळप्रसंगी जीव घेतात - असा अनुभव. भीती पाहीली की त्यांना वीक्नेस कळतो व लगेच हिंस्त्र होतात.
माणसांतही काही कुत्री असतात विशेषतः जालावर जिथे ते लोक कायद्यापासून बर्‍यापैकी सेफ असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेक चिंध्या घेऊन शिवलेली
गोधडी
त्यातही पुन्हा उधारीचा माल दुसर्‍या कोणाचातरी दुसृया संदर्भातला (तसे आपण सर्वच उधारीतलेच आहोत पण तरीही.)
स्वतःचा एकही धागा नाही गुंतवलेला.
कचरा निवडलेला ओला हो मात्र ओला कचरा
डोळ्यात पाणी आलं खरचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

माणसाला अपेक्षित त्या मानवी नात्यांतून माया मिळाली नाही की माणसाचे मन असे झाडाझुडपांतून, पक्षीप्राण्यांतून प्रेम हुडकत हिंडत असते की काय कुणास ठाऊक!

बोरकरांची 'कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात' ही ओळ आठवली.

समजत नाही, समजत नाही.....

There's the respect that makes calamity of so long life...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0