आइशमन इन जेरुसलेम : सामान्यांचा दुष्टपणा


एडॉल्फ आइशमन/आईशमन (जर्मन) एस.एस.चा सदस्य होता. त्याचं काम होतं, ज्यू आणि समलैंगिक, जिप्सी लोकांच्या 'प्रवासा'ची तजवीज करायची. हा प्रवास म्हणजे त्यांच्या राहत्या शहर/गावांतून परदेशात हकालपट्टी किंवा कोणत्याशा यातनातळाकडे रवानगी. यातनातळात नक्की काय होत असे, ह्याच्याशी त्याच्या कामाचा संबंध नव्हता.

हाना आरण्ड्ट ही तत्त्वज्ञ जेरुसलेमला आइशमनच्या खटल्यासाठी गेली होती. तो खटला, भरवण्यामागची इस्रायली सरकारची भूमिका, न्यायाधीश, दोन्ही बाजूंचे वकील आणि स्वतः आइश्मन ह्यांच्याबद्दल ती तपशिलवार लिहिते.

ज्या प्रकारे खटल्याचं कामकाज चाललं त्याबद्दल ती बरेच आक्षेप नोंदवते. ह्याशिवाय आइशमन, ज्यूअरीतले (jewry मूळ लेखनातून उचललेला शब्द) नाझीकालीन उच्चपदस्थ, धार्मिक आणि नाझी अधिकाऱ्यांचे संबंध ह्याबद्दल ती जे लिहिते ते तेव्हा फारच स्फोटक होतं.

मुळात आइशमनवर इस्रायलमध्ये खटला चालवणं योग्य आहे का, ह्याची चिकित्सा तिनं केली. तिच्या मते, आइशमन जर्मन नागरिक असल्यामुळे त्याच्यावर जर्मनीत खटला चालवला गेला पाहिजे होता. डेव्हिड बेन गुरीयननं (तत्कालीन इस्रायली पंतप्रधान) ज्या कारणांसाठी जाहीर खटला चालवला होता (खटला एका नाट्यगृहात चालवला गेला), त्यात फार काही अर्थ नव्हता; सांगितलेल्या कारणांबद्दल बोलायचं तर इस्रायली तरुण पिढी त्या खटल्याचं कामकाज बघायला फारशी आलेली नव्हतीच; आणि परदेशी पत्रकारांचा उत्साहही काही काळानंतर ओसरला. ज्यू लोकांना किती दुःखं, वेदना झाल्या ह्यानुसार आइशमनच्या गुन्ह्याचं मूल्यमापन करू नये, त्याचं वर्तन किती ग्राह्याग्राह्य होतं आणि झाल्या प्रकारात त्याची जबाबदारी किती होती, ह्यावरून त्याचा निवाडा व्हावा अशी अपेक्षा होती. तिथलं वातावरण आणि क्वचित न्यायाधीशांचे प्रतिसादही भावनोत्कट असल्याच्या नोंदी ती करते. मात्र तीनही न्यायाधीश निःपक्षपाती असण्याबद्दल तिला खात्री होती. तरीही अशा प्रकारे ह्या प्रकारावर टीका करण्यामुळे ज्यू समाज, हानाचे मैत्रही दुखावले गेले. ती स्वतः ज्यू असूनही!

सुरुवातीला श्रीमंत ज्यू लोकांना पैसे देऊन जीव वाचवण्याची सोय होती. त्यात त्यांना पद्धतशीरपणे लुटण्यात आलंच, पण निदान जीव वाचला. परदेशगमनाची कागदपत्रं तयार करण्याची जर्मन यंत्रणा अतिशय किचकट, वेळखाऊ आणि म्हणून निरुपयोगी ठरत होती. जर्मनी judenrein (ज्यूरहित) करण्यात त्यामुळे अडथळे येत होती. आइशमनने सुरुवातीला, आपल्याकडे असते 'एक खिडकी योजना', तशी पद्धत सुरू केली. दिवसाच्या आणि ऑफिसाच्या सुरुवातीला काही कागदपत्रं आणि स्वतःची मालमत्ता घेऊन शिरलेले ज्यू, दिवसाच्या शेवटी बाहेर येताना परदेशगमनाची परवानगी आणि कंगाल होऊन बाहेर येत. एका दिवसात अशी कामं उरकणं, ही आइशमनची 'कर्तबगारी' होती.

धार्मिक उच्चपदस्थ ज्यू लोकांकडे आपापल्या भागातल्या ज्यू लोकांचे नाव-पत्ते, संपत्ती अशी माहिती असे. ही माहिती त्यांनी बिनबोभाटपणे नाझींना दिली. त्यामुळे ठरावीक भागातले ज्यू गोळा करून सुरुवातीला परदेशात आणि पुढे यातनातळांत पाठवण्यासाठी गोळा करणं अतिशय सोयीचं झालं. ह्या माहितीअभावी नाझींना बरंच काम करावं लागलं असतं, गोंधळ माजला असता आणि त्याचा फायदा ज्यू लोकांना झाला असता, असंही हानाने लिहिलं.

तिचं सगळ्यात वादग्रस्त ठरलेलं विधान म्हणजे banality of evil - सामान्यबुद्धी (मनुष्या)ने केलेला दुष्टपणा. आइशमन हा कोणी राक्षस, क्रूरकर्मा होता असं म्हणायला तिने नकार दिला. तिच्या मते, तो सामान्य वकुबाचा इसम होता. आपल्या वरिष्ठांना खूष करण्यासाठी, नोकरीत पदोन्नतीसाठी त्यानं बऱ्याच गोष्टी करून दाखवल्या. तो ज्यूद्वेष्टा नव्हता; त्यानं त्याला जमेल तसा ज्यू लोकांना मदत करण्याचा प्रयत्नही केला होता. सामान्य लोकांनी केलेल्या गुन्ह्यांमुळे प्रचंड हानी होते. राक्षस, क्रूरकर्मे किती असणार, पण सामान्य वकुबाचे लोक नोकरी, पदोन्नती, धर्म अशा गोष्टींसाठी, सारासार विचार बाजूला टाकून दुष्टपणे वागतात; तेव्हा ते प्रचंड भयकारक असतं.

ज्यू लोकांची हकालपट्टी कायदेशीर ठरावी ह्यासाठी हिटलरने कायदे सोयीनुसार बदलले. सुरुवातीला ज्यू लोकांचा मतदानाचा हक्क काढून घेतला गेला. त्यापुढे सरकारी नोकऱ्यांमधून त्यांना बाद केलं गेलं. त्यापुढे, ज्यू लोक देशाबाहेर पडल्यास त्यांचे जर्मन पासपोर्ट रद्द होतील असा कायदा पारित झाला. ज्यू लोकांना दु्य्यम दर्जाचे नागरिक ठरवलं गेलं. नंतर ज्यू लोकांना, 'स्वतंत्र ज्यू राष्ट्रासाठी स्थलांतरित केलं जात आहे', असं सांगून जर्मनीच्या बाहेर काढलं. सुुरुवातीला ह्या ज्यू लोकांना इतर देशांमध्ये हाकललं. दुसरं महायुद्ध सुरू झाल्यावर, जसजशी नाझी जर्मनी इतर भूभाग गिळंकृत करत गेली तसा 'ज्यू लोकांचा प्रश्न' मोठाच व्हायला लागला; कारण जिंकलेल्या भूभागातही ज्यू लोक होते. सुरुवातीला अनेक जर्मन ज्यू पोलंड आणि जर्मनीच्या पूर्वला हाकलून दिले जात होते. पोलंड जर्मनीच्या अधिपत्याखाली आल्यावर ज्यूंची रवानगी यातनातळांमध्येच व्हायला लागली. यातनातळांमध्ये पोहोचलेले बहुतेकसे ज्यू जिवंतपणीच काय, मृत्युनंतरही तिथून बाहेर आले नाहीत.

हे लेख १९६३ साली 'न्यू यॉर्कर'मध्ये पाच भागांत प्रकाशित झाले होते. तेच थोडे वाढवून पुस्तकरूपात प्रकाशित झाले आहेत. हे लेख 'न्यू यॉर्कर'च्या संस्थळावर आहेत. (तळटिपांमध्ये लेखांचे दुवे आहेत.) त्यावरून हानावर तऱ्हेतऱ्हेची टीका झाली. टीकेचं स्वरूप पाहता तेव्हाच्या टीकाकारांनाही अर्धवट वाचून, अर्धवट समज करून आरडाओरडा करण्याची सवय होती हे लक्षात येतं. उदाहरणार्थ, ह्या लेखांच्या अध्येमध्ये जाहिराती छापलेल्या आहेत. 'न्यू यॉर्कर'मध्ये छापलेल्या दुसऱ्या लेखाच्या एका पानाचा दुवा. त्यावरून तिच्यावर टीका झाली. तिनं ज्यू धर्मोच्चपदस्थांवर टीका केली ह्याबद्दल तिलाही ज्यूद्वेष्टी ठरवलं गेलं; पण तिचे आक्षेप खोडून काढले गेले नाहीत. (ट्रोलिंग ह्या शब्दाचा तेव्हा उगम झाला नव्हता, पण तिला ट्रोलधाडीचा सामना करावा लागला.)

हाना आरण्ड्टबद्दल ह्याच नावाचा चित्रपट मार्गरित व्हॉन त्रोता हिनं बनवला आहे. त्या चित्रपटाची मराठीत समीक्षा इथे वाचता येईल. चित्रपटात हानाची मानवी बाजू दाखवण्याचा प्रयत्न उत्तमरीत्या केलेला आहे. पण तर्काला भावना नसतात; हानाच्या लेखनात हे दिसून येतं. लेखनाची सुरुवात काहीशा कोरड्या विनोदाने होते - उदा: हिब्रूचं इंग्लिश, फ्रेंच, जर्मन भाषांतरं किती चांगली-वाईट आहेत ह्यावर टिप्पणी - पण लवकरच विनोदाचा भाग संपतो आणि हानाच्या धीरोदात्त बुद्धीमत्तेचं दर्शन लेखनात ठायीठायी होत राहतं. ज्यू लोकांना ठार मारण्याचं वर्णन, ज्यात तिचे अनेक सोबती, नातेवाईक बळी पडले - अंतिम उपाय Final Solution - असं करणाऱ्या नाझी अधिकाऱ्यांबद्दल करतानाही ती तर्काची कास सोडत नाही.

भावनाशून्य कोडगे आणि धीरोदात्त बुद्धीमान लोक ह्यांच्यातला फरक करणं सोपं नाही; लोक भावना भडकून घ्यायला टपलेले असतात का काय, असाही संशय अधूनमधून येतो. नीरक्षीर विवेकाबद्दल कितीही आदराने लोक बोलले तरीही स्वतःबद्दल, स्वतःच्या समाजाबद्दल असा नीरक्षीर विवेक दाखवून विधानं केल्यास ती पचवणं बहुतेकांना जमत नाही. ह्या लेखांमुळे हानाचे बरेच मैत्र तिच्यापासून दुखावले. काही वर्षांनी ह्या लेखनाबद्दल हाना म्हणाली की banality of evil - सामान्यांचा दुष्टपणा ही शब्दरचना करायला नको होती; कदाचित लेखनातली कोरडी तार्किकता कमी असती तर बरं झालं असतं. तरीही banality of evil ह्याच शब्दप्रयोगासाठी हानाचा गौरव तत्त्वज्ञानाभ्यासकांकडून झाला.

---

पुढचे दोन परिच्छेद म्हणजे हानाच्या दृष्टीने आइशमनचा निवाडा कसा असायला हवा होता, ह्याचं भाषांतर आहे.प्र

"तुम्ही हे मान्य करत आहात की युद्धकाळात ज्यू लोकांविरोधात केलेले गुन्हे नोंदल्या गेलेल्या इतिहासातले सगळ्यात भीषण गुन्हे आहेत; तुम्ही तुमचा त्यांतला सहभागही मान्य करता. पण तुम्ही म्हणता की तुम्ही ज्यूंचा तिरस्कार या मूळ हेतूपायी कृती केली नाहीत. तुम्ही जे वर्तन केलंत त्यापेक्षा निराळं वर्तन (असा हेतू असता) तरीही केलं नसतं आणि असं वागणं हा अपराध आहे असं तुम्हाला वाटलं नाही. ह्यावर विश्वास ठेवणं अगदी अशक्य नाही, पण कठीण आहे; ह्या प्रकरणातले तुमचे हेतू आणि अंतर्याम ह्याबद्दल तुमच्या विरोधात प्रचंड पुरावे नसले तरी काही पुरावे उपलब्ध आहेत, ह्यातून हे निःसंशय सिद्ध होत आहे. तुम्ही हे सुद्धा म्हणता की 'अंतिम उपाया'ची (Final Solution - ज्यूंना जीवानिशी मारणे) अंमलबजावरणी करण्यातला तुमचा सहभाग हा योगायोगानेच घडला; आणि इतर कोणीही तुमच्या जागी हे काम करणं शक्य होतं; म्हणजे सर्व (ख्रिश्चन) जर्मन अपराधी असण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्याचा अर्थ असा की, जेव्हा सगळेच किंवा बहुतांश लोक अपराधी असतात तेव्हा कोणीच अपराधी नसतं. हा निष्कर्ष खरोखरच अगदी सामान्य आहे, पण आम्ही तो निष्कर्ष मान्य करत नाही. तुम्हाला आमचा निर्णय समजला नसेल तर बायबलमधल्या, सॉडम आणि गोमोराह, ह्या दोन शेजारी नगरांच्या गोष्टीची आम्ही तुम्हाला आठवण करून देतो. स्वर्गीय आगीमुळे ही दोन्ही शहरं जळून खाक झाली कारण दोन्ही नगरांमधले लोक अपराधी होते. कर्मधर्मसंयोगाने, ह्याचा 'सामुदायिक अपराध' ह्या नवीन रूढीशी काहीही संबंध नाही. ही रूढी म्हणजे लोकांच्या नावावर चालवलेल्या गोष्टींशी, गुन्ह्यांशी लोकांचा संबंध नसतो; त्यातून त्या लोकांचा फायदा होत नाही तरीही त्यांना त्यासाठी हे लोक अपराधी असतात, त्यांना अपराधी वाटलं पाहिजे. थोडक्यात, कायद्यासमोर अपराध आणि निरपराधीपणा ह्या गोष्टी वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात, आणि अगदी आठ कोटी (ख्रिश्चन) जर्मनांनीसुद्धा तुम्ही केलेली कृत्यं केली असती, तरीही ही सबब पुरेशी ठरत नाही.

"सुदैवानं, आम्हाला तेवढा दूरचा विचार करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या स्वतःच्याच दाव्यानुसार, कल्पनातीत गुन्हे करणं हे मुख्य राजकीय उद्दिष्ट असणाऱ्या (राज्यकर्त्यांच्या) देशात राहणाऱ्या लोकांवर अपराधाची समान जबाबदारी वाटप ही वस्तुस्थिती नसून शक्यता होती. परिस्थितीवश, ज्या कोणत्या योगायोगांमुळे तुम्ही ह्या गुन्हेगारीच्या रस्त्याला लागला असाल; तुम्ही प्रत्यक्षात काय केलंत आणि इतरांनी तुमच्या जागी असता काय केलं असतं, ह्यांमध्ये दरी आहे. तुम्ही काय केलंत ह्याच्याशीच आमचा संबंध आहे आणि तुमचं व्यक्तिगत आयुष्य आणि तुमचे हेतू अपराधमुक्त असणं अथवा गुन्हेगारी शक्यतांनी भरलेले असणं, ह्याच्याशी आमचा संबंध नाही. तुम्ही तुमची कथा दुर्दैवी कथा म्हणून सांगता, आणि परिस्थिती माहीत असल्यामुळे आम्ही काही प्रमाणात हे मान्य करायला तयार आहोत की परिस्थिती अधिक चांगली असती तर तुमच्यावर आमच्यासमोर किंवा कोणत्याही प्रकारच्या फौजदारी न्यायालयात हजर होण्याची वेळच आली नसती. सध्यापुरतं असं गृहीत धरू की, फक्त दुर्दैवाच्या फेऱ्याने तुम्हाला जनसमुदायाची कत्तल करणाऱ्या यंत्रणेचा एक भाग बनवलं; वस्तुस्थिती तरीही हीच आहे की ही हत्याकांडं घडवून आणणाऱ्या धोरणाची तुम्ही अंमलबजावणी केलीत आणि त्यातून ह्या धोरणांना सक्रिय पाठींबा दिला. राजकारण म्हणजे बालवर्ग नव्हे; राजकारणात आज्ञाधारकता आणि पाठिंबा ही एकच गोष्ट असते. ज्यू आणि इतर अनेक देशांच्या लोकांसोबत पृथ्वी वाटून न घेण्याच्या धोरणांना तुम्ही पाठिंबा दिलात आणि ते घडवूनही आणलंत; कोणी ह्या जगात राहावं, कोणी राहू नये हे ठरवण्याचा अधिकार जणू काही तुम्ही आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होता. जगातल्या कोणत्याही वंशाच्या कोणत्याही व्यक्तीकडून तुमच्यासोबत जग वाटून घेण्याची अपेक्षा धरू नये. फक्त आणि फक्त ह्या कारणास्तव तुम्हाला मरेपर्यंत फाशी द्यावी.

१. इस्रायली पोलिसांनी आइशमनला पकडणं, जेरुसलेममध्ये त्याच्यावर खटला चालवणं, खटल्यातून त्याला फाशीची शिक्षा होईल ह्याबद्दल खात्री असूनही ह्या कारवाईबद्दल आइशमनला आक्षेप नव्हता. त्याची त्यामागची धारणा अशी होती की, त्या काळात जर्मन तरुण पिढीला हॉलोकॉस्टबद्दल अपराधभावना होती. आपल्या 'बलिदाना'मुळे, फाशीमुळे तरुण जर्मन पिढीची अपराधभावना कमी होईल असं त्याला वाटत होतं.

आकड्याशिवाय तळटीप - हानानं केलेलं विश्लेषण, पुस्तकाबद्दल केलेलं लेखन ह्याचा गोरक्षक, हिंदुत्ववादी, उन्मादी राष्ट्रवादी, मनुवादी, मनुवादाचे विरोधक ह्यांच्याशी काहीही संबंध नाही.

लेखांचे दुवे -
१. I-Eichmann in Jerusalem
२. II-Eichmann in Jerusalem
३. III-Eichmann in Jerusalem
४. IV-Eichmann in Jerusalem
५. V-Eichmann in Jerusalem

---

प्र. - प्रताधिकारसंदर्भात माहिती -
मूळ पुस्तक - Eichmann in Jerusalem
लेखिका - Hannah Arendt
प्रकाशन - Penguin Classics
पृष्ठ क्रमांक - 277 - 289

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मला ते भाषांतर कोणी कोणाला, कोणत्या संदर्भात उद्देश्युन का म्हटले आहे हे कळले नाही. जरी तू लिहीलयस की ते हाना ने न्यायनिवाडा कसा व्हायला हवा होता त्या संदर्भात लिहीलय. माझ्यासाठी ते जरा आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट जातय.
.
पण बाकी परीक्षण आवडले.
.
पिफच्या सिनेमाचा तो दुवाही आवडला. वाचनिय आहे तोही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण आवडलं. होलोकॉस्ट या घटनेबद्दल गुंतागुंतीची आणि प्रचंड प्रमाणातली माहिती आणि त्यावर बरीच भवति न भवति महायुद्धादरम्यान आणि नंतरच्या दशकांत झालेली आहे. यातलं बरंच दस्तावेजीकरणाचं काम आहे; मात्र होलोकॉस्टचा न्यायनिवाडा करताना, त्यातल्या मुख्य आणि छोट्यामोठ्या पदावरच्या व्यक्तींचा अपराध ठरवताना नि त्यांना शिक्षा देताना, त्याबद्दल भावनांच्या आहारी जाऊ न देता, त्याबद्दल विवेकाने विचार करणार्‍यांमधे हानाबाई अग्रस्थानी दिसत आहेत. मानवजातीला व्यापून उरेल इतक्या मोठ्या गुंतागुंतीच्या यंत्रातल्या सर्वात कळीच्या ठिकाणच्या व्यक्तीबद्दल "परंतु तो निव्वळ एक सामान्य कर्तृत्वाचा इसम होता" इतपत आर्ग्युमेंट त्या नृशंस हत्याकांडाच्या बळी ठरलेल्या समस्त जनतेसमोर इतक्या संवेदनशील परिस्थितीमधे करणं याकरता अपार धैर्य पाहिजे. या धैर्याकरता त्यांना दाद द्यावी तितकी थोडीच.

मात्र नात्झी यंत्रणेतल्या लोकांना शिक्षा द्यायला हवी होती किंवा कसे याबद्दलचं हानाबाईंचं नेमकं मत किमान या लेखातून मला कळलेलं नाही. ती शिक्षा नेमकी काय नि कुणी द्यायची याबद्दल त्यांनी शंका नि प्रश्न उपस्थित करणं त्यांच्या धैर्याच्या कृत्याला साजेसं आहे; पण आईशमनसारख्या माणसांचा - नि त्याच्यासारख्या काही लाख नात्झी यंत्रणेतल्या खिळ्यांचा- काही एक अपराध होता की नाही याबद्दलचं त्यांचं मत समजलं नाही.

या निमित्ताने मानवतेला काळीमा फासणार्‍या या घटनेमागच्या मास हिस्टेरीयाचं स्पष्टीकरण देणारी, त्याची विविध अंगांनी छाननी करणारी लिखाणं कुणाची याची माहिती इथले सभासद देऊ शकले तर या लेखाचा एक उद्देश साध्य होईल असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हानाच्याच शब्दांत, आइशमनला फाशी देणं योग्य होतं. पण त्याचं कारण ...

कोणी ह्या जगात राहावं, कोणी राहू नये हे ठरवण्याचा अधिकार जणू काही तुम्ही आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होता. जगातल्या कोणत्याही वंशाच्या कोणत्याही व्यक्तीकडून तुमच्यासोबत जग वाटून घेण्याची अपेक्षा धरू नये. फक्त आणि फक्त ह्या कारणास्तव तुम्हाला मरेपर्यंत फाशी द्यावी.

---

सर्वसामान्य लोक इतक्या नीच थराला जाऊन एवढे टोकाचे दुष्ट कसे बनू शकतात; याचं उत्तर हानाच्या लेखनातून मिळत नाही. तो हानाचा प्रांतच नव्हता. 'स्टॅनफर्ड प्रिझन एक्सपरिमेंट' हा चित्रपट बघताना त्याचं उत्तर सापडलं. त्याबद्दल लवकरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा लेख वाचल्यानंतर "banality of evil"ही संज्ञा कळली. त्यावर चा हान चा आक्षेप, तीव्र आक्षेपही समजला. पण मग मनात प्रश्न येतो की - सर्वसामान्यांनी वेगळं वागण्याचा पर्याय जरी दिसत असला तरी तो खरोखर असतो का? सामान्य माणूस सत्तेच्या रेट्यात चिरडला जाण्याचीच शक्यता असते असे वाटत नाही का?मारे त्या ठिकाणी ज्यु धर्मगुरुंनी अन्य ज्यु कुटुंबियांची माहीती देण्यास नकार दिला अथवा जर आइशमननेदेखील या खेळातील प्यादे बनण्याचे नाकारले तरीही त्याचा विरोध आणि वेळ पडल्यास तो स्वतः चिरडला जाण्याची शक्यता नाहीये का? तेव्हा आचारस्वातंत्र्य हा फक्त तिर्हाईताला भासणारे मृगजळ आहे . जी व्यक्ती त्या यंत्रणेचा भाग आहे तिच्यामध्ये विरोधात जाण्याची पुरेशी सक्षमता नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख चांगला जमून आला आहे. आभार!

छिद्रान्वेष:
१. 'यातनातळ' याला मराठीत छळछावणी हा शब्द प्रचलित आहे. तो असताना हा शब्द कॉइन करण्याचे काही विशेष कारण?
२. 'यातनातळांमध्ये पोहोचलेले बहुतेकसे ज्यू जिवंतपणीच काय, मृत्युनंतरही तिथून बाहेर आले नाहीत' याचा अर्थ नक्की काय?
३. बालवर्ग हा जर किंडरगार्टनचा अनुवाद असेल तर 'बालवाडी' हा शब्द अधिक नेमका ठरावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फार उत्तम लेख. हाना आरण्ट यांची सैद्धांतीक मांडणी अतिशय क्लिष्ट आणि कोणत्याही रूढ आयडीयॉलॉजीच्या साच्यात न बसणारी आहे. अनेकदा वाचून, आपले विचार पुनःपुनः तपासून पाहत वाचाव्या लागतात. ऑन ह्युमन कंडीशन हे त्यांचे magnum opus वाचावे अशी शिफारस करावीशी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

banality of evil या संज्ञेची झाक आपल्या देशातील प्रचंड प्रमाणात झालेल्या जीवितहानीसंबंधीच्या आरोपांच्या खटल्यात मोठ्या प्रमाणात दिसते. भोपाळच्या युनियन कार्बाइडच्या कारखान्यातील गॅस हत्याकांड असो, की १९८४मधील शीख लोकांची झालेली कत्तल असो, की गुजरातमधील गोध्रा जळितानंतरचे अल्पसंख्याकांचे हत्याकांड असो यातील काही अपराधी खटल्याच्या वेळी "आपले हात बांधलेले होते, वरून आदेश आले व त्याचे तंतोतंत पालन करणे आमचे कर्तव्य आहे" अशी मखलाशी दाखवून सुटका करून घेतले. अट्टल गुन्हेगार वा गुन्ह्यात सामील झालेल्या या अपराध्यांना सामान्य का म्हणावे हाही प्रश्न येथे विचारावासा वाटतो.
एखादा तथाकथित दक्ष पोलीस अधिकारी जेव्हा ('अब तक छप्पन्न') एनकौंटर करून काही जणांना गोळ्या घालून ठार मारतो तेव्हा त्याची मानसिकता banality of evil या संज्ञेला साजेशीच असते. रिव्हॉल्वरचा चाप ओढताना त्याची माणुसकी, पापभिरूवृत्ती, संस्कार, संस्कृती या गोष्टी कुठे गायब झाल्या हा प्रश्न येथे उपस्थित करता येतो. कर्तव्यपालनाच्या बुरख्याखाली लपून आपल्यातील हिंस्रपणाचे उघड उघड प्रदर्शन ते करत असतात.
हातात सत्ता असले की सर्व गुन्हे माफ ही वृत्ती बळावत असल्यामुळे सर्व सामान्यांचे हाल होत असतात, याची किंचितही कल्पना वरपासून खालपर्यंतच्या नोकरशाहीला नाही की काय असे वाटू लागते.
त्यामुळेच हाना आरण्टने वापरलेली ही संज्ञा आपल्या देशासाठीच आहे की काय असे वाटू लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आपले हात बांधलेले होते, वरून आदेश आले व त्याचे तंतोतंत पालन करणे आमचे कर्तव्य आहे"

हा "न्यूरेंबर्ग डिफेन्स" आहे.

banality of evil ची व्याप्ती न्यूरेंबर्ग डिफेन्सपेक्षा मोठी आहे असं मला वाटतं.

न्यूरेंबर्ग डिफेन्स म्हणजे "पाणी घाल असं बॉसने सांगितल्यावर मी पाणी घातलं. काय लोंबतंय ते विचारलं नाही." पर्यायाने यामध्ये (अ) "जे चाललंय ते चूक आहे, पण बॉस इज ऑल्वेज राईट"; आणि (ब) "जे चाललंय ते बरोबरच आहे" ही दोन्ही टोकं आणि मधला आख्खा स्पेक्ट्रम येतो.

banality of evil मध्ये "जे चाललंय ते चूक आहे की बरोबर" याचा सारासार विचार करण्याची क्षमता हरवलेली असते. आणि ते जास्त भयानक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अतिशय उत्तम लेख .
संपादक : धाग्यावरची अवांतर चर्चा इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुपच सुंदर लेख ! हाना आरण्ड्टबद्दल अगोदरही बरचं वाचलं होतं पण मुळातुन रिपोर्ताज प्रकारची कोरड्या भाषेतील पुस्तके वाचायचा मनापासून कंटाळा आहे. अर्थात ते मुळापासुन वाचलेच पाहिजे हे ही महत्त्वाचे आहे. मात्र कोणीतरी असं फळं सोलणे, कापणे इ. प्रक्रिया करुन तयार रस पुढे वाढला तर खुप आनंद होतो. असलं काही जास्तीत जास्त लिहित चला.

अवांतर : ज्यूं च्या किंवा कोणाच्याही हालअपेष्टा वाचल्यावर ते सुंदर आहे, आनंद वाटला असे शब्द वापरावेत की काय याबाबत मनात संभ्रम आहे.

अतिअवांतर : तळटीप नसती तरी चालली असती.

अति अतिअवांतर : मेघनाबाई कुठे आहेत हल्ली ?? बरेच दिवस त्यांचे काही लेखन वाचण्यात आले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वसामान्यांनी वेगळं वागण्याचा पर्याय जरी दिसत असला तरी तो खरोखर असतो का?

याच्या सविस्तर उत्तरासाठी मूळ लेख वाचाच, असा सोपा प्रतिसाद देता येईल. आइशमनच्या बाबतीत, वरिष्ठांना खूश करण्यासाठी, नोकरीत पदोन्नती मिळवण्यासाठी त्यानं वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या आणि 'ज्यूंचा प्रश्न' लवकरात लवकर सोडवण्याची त्याच्या परीनं व्यवस्था केली. त्याचा दावा असा होता की, एकदा यातनातळात ज्यू लोकांना पाठवल्यावर काय होत असे, यावर त्याचा काहीही ताबा नव्हता, त्यात त्याचा हस्तक्षेप होत नसे. वास्तविक, त्याने एकदा यातनातळाची सहल केली होती आणि तिथे नक्की काय चालत असे, याची त्याला कल्पनाही होती.

त्याशिवाय, आइशमनला शिक्षा ठोठावताना निवाडा कसा हवा होता याबद्दल हानानं लिहिलेलं, वरच्या लेखातून पुन्हा -
... ही हत्याकांडं घडवून आणणाऱ्या धोरणाची तुम्ही अंमलबजावणी केलीत आणि त्यातून ह्या धोरणांना सक्रिय पाठींबा दिला. राजकारण म्हणजे बालवर्ग नव्हे; राजकारणात आज्ञाधारकता आणि पाठिंबा ही एकच गोष्ट असते.

थोडक्यात, तुम्हाला काही बुद्धी आहे म्हणून तुम्हाला ठरावीक नोकरी दिली गेलेली आहे. नोकरीच्या नावाखाली मानवतेविरोधात काही अपराध केले तर त्याची जबाबदारी टाळता येत नाही; आपण बुद्धीभ्रष्ट असण्याची सबब चालत नाही. नाझी यंत्रणेचा भाग असलेल्या ज्या लोकांचे अपराध मानवतेविरोधात नव्हते, किंवा त्या गुन्ह्यांची तीव्रता आइशमनच्या गुन्ह्यांएवढी नव्हती त्यांना नैसर्गिक मरणाची संधी मिळालीही. उदाहरणार्थ, काही काळापूर्वी 'ऐसी'वरच हा दुवा मिळाला होता - Joseph Goebbels’ 105-year-old secretary: ‘No one believes me now, but I knew nothing’

'यातनातळांमध्ये पोहोचलेले बहुतेकसे ज्यू जिवंतपणीच काय, मृत्युनंतरही तिथून बाहेर आले नाहीत' याचा अर्थ नक्की काय?

युद्ध सुरू असताना शत्रूराष्ट्राचे मृत सैनिक वा नागरिक आणि इतर वेळी देहदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यावर, 'नकोश्या' लोकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या, वारसांच्या स्वाधीन केले जातात. यातनातळांमध्ये पाठवलेल्या असंख्य ज्यू लोकांना मारलं गेले - ते जिवंत बाहेर आले नाहीत आणि जे मारले गेले त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाटही त्याच परिसरांत, नातेवाईक वा वारसांच्या सल्लामसलतीशिवाय लावली गेली - ते मृत्युनंतरही तिथून बाहेर आले नाहीत.

ऑन ह्युमन कंडीशन हे त्यांचे magnum opus वाचावे अशी शिफारस करावीशी वाटते.

वाचनाच्या यादीत भर घातली आहे; आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अलीकडेच आइशमानला अर्जेंटिनामधून उचलून आणण्याच्या धाडसी कृत्याविषयी दोन पुस्तके वाचली त्यात ह्या लेखंचा उल्लेख आला होता.

नाझी कृत्यांमध्ये यन्त्रणेमधील सामान्यांचे - ज्यांचा निर्णय घेण्यामध्ये काही भाग नव्हता, निर्णयाची अंमलबजावणी करणे हे त्यांचे कर्तव्य होते - उत्तरदायित्व काय होते अशा विषयावर १९६१ च्या सुमारास Judgement at Nuremberg नावाचा उत्तम सिनेमा पाहिला होता. स्पेन्सर ट्रेसी, बर्ट लॅन्कास्टर, रिचर्ड विडमार्क, माँटगोमेरी क्लिफ्ट हे त्यातील प्रमुख नट होते. नाझी जर्मनीच्या ज्यूविरोधी कायद्यांची अमलबजावणी करणारे काही न्यायाधीश हे येथे आरोपी होते. अशा लोकांची बाजू एक न्यायाधीश आरोपी - बर्ट लॅन्कास्टर - अतिशय प्रभावी पद्धतीने मांडतो इतके ध्यानात आहे. आइशमानचा खटलाहि ह्याच सिनेमाच्या पुढेमागेच चालू होता. (आता पुनः यूट्यूबवर शोधले पण हा सिनेमा दिसला नाही. त्याच्या नावाने जे दिसते ते सर्व दिशाभूल करणारे आहे.)

आइशमान खटल्याविषयी १९६०-६२ कालात भारतातहि बरीच उत्सुकता होती असे आठवते. खटल्याची सुनावणी चालू असता 'सकाळ'मध्ये त्यावर १०-१२ ओळींची बातमी नेहमी असे. त्याला फासावर लटकावल्याची बातमीहि अशीच तेव्हा वाचली होती.

ज्यू लोकांविषयी Final Solution जेथे शिजले त्या Wansee Conference वर त्याच नावाचा सिनेमा youtube.com/watch?v=sYdIfOkpMos येथे उपलब्ध आहे. तोहि पाहण्याजोगा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्यापुरतं असं गृहीत धरू की, फक्त दुर्दैवाच्या फेऱ्याने तुम्हाला जनसमुदायाची कत्तल करणाऱ्या यंत्रणेचा एक भाग बनवलं; वस्तुस्थिती तरीही हीच आहे की ही हत्याकांडं घडवून आणणाऱ्या धोरणाची तुम्ही अंमलबजावणी केलीत आणि त्यातून ह्या धोरणांना सक्रिय पाठींबा दिला. राजकारण म्हणजे बालवर्ग नव्हे; राजकारणात आज्ञाधारकता आणि पाठिंबा ही एकच गोष्ट असते. ज्यू आणि इतर अनेक देशांच्या लोकांसोबत पृथ्वी वाटून न घेण्याच्या धोरणांना तुम्ही पाठिंबा दिलात आणि ते घडवूनही आणलंत; कोणी ह्या जगात राहावं, कोणी राहू नये हे ठरवण्याचा अधिकार जणू काही तुम्ही आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होता. जगातल्या कोणत्याही वंशाच्या कोणत्याही व्यक्तीकडून तुमच्यासोबत जग वाटून घेण्याची अपेक्षा धरू नये. फक्त आणि फक्त ह्या कारणास्तव तुम्हाला मरेपर्यंत फाशी द्यावी.

अगदी नेमके ....

कुठल्याही अपराध करणे, अपराध करण्यास सहाय्य करणे, अपराध लपविण्यास मदत करणे, अथवा अपराध्यास संरक्षण देणे हे सर्व शिक्षेस पात्र असलेले गुन्हेच आहेत. त्यामुळे वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन केले या बचावात तसा काही अर्थ उरत नाही.

मी याचा एक चित्रपट पाहिला, त्यात त्याचे चित्रण हे एक थंड रक्ताचा क्रुरकर्मा असेच केलेले आहे. त्यात तो कुठे आगतिक वगैरे वाटत नाही. हा चित्रपट सत्याच्या जवळपास नक्कीच असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||