"पॅरीस कॅन वेट" हल्काफुल्का पण देखणा चित्रपट

बऱ्याच दिवसांनी एखादा निवांत आणि सुंदर चित्रपट पहायला मिळाला आणि लिखाणासाठी हात सरसावला.
"पॅरीस कॅन वेट" हि खरं तर दूरदेशी घडणाऱ्या परिकथेसारखी कथा.
भारतात राहणाऱ्या आणि चित्रपटात दाखवलेल्या जीवनशैलीपेक्षा खूप वेगळं, साधंसुधं जीवन जगणाऱ्या माझ्यासारख्याला हि कथा हा चित्रपट आवडावा यामागचं कारण काय असावं बरं?

या प्रश्नाचं उत्तर शोधणं हा खरा हेतू या चित्रपटाचं परीक्षण करण्यामागं आहे.

चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा हि नेहमीचीच यशस्वी नवरा आणि त्याला साथ देणारी पत्नी, कामातल्या व्यस्ततेमुळे येणारे त्यांच्या नात्यातले दुरावे अशी कथा आहे का काय असं वाटलं. पण सुरुवातीची दहा पंधरा मिनिटे हि दिग्दर्शकाने फक्त पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी मोठ्या खुबीने वापरली आहेत. मायकेल लॉकवूड (अॅलेक बाल्डविन) हा यशस्वी चित्रपट निर्माता आणि त्याची पत्नी अँने (डियाम लेन) हे फ्रांस मध्ये कुठल्याशा हॉटेलात आहेत. सुट्टीवर असूनही कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांना फार विश्रांती घेता येत नाही आणि ते पुढच्या प्रवासाला निघतात. पण अँनेचा कान दुखू लागतो, आणि विमानप्रवास टाळण्याचा सल्ला तिला दिला जातो. मग ती मायकेल सोबत न जाता त्याचा फ्रेंच सहकारी जॅक (अरनॉड वियार्ड) बरोबर त्याच्या कारमधून पॅरिसला जाण्याचे ठरवते. मायकेल त्याची कामे आटोपून नंतर तिथे येऊन तिला भेटणार असतो. अँने आणि जॅकच्या या सहप्रवासानेच हा चित्रपट व्यापून टाकला आहे.

जॅक हा पक्का फ्रेंच असून जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणे हा त्याचा स्थायी स्वभाव आहे, आणि खाण्यावरती त्याचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे अर्थातच सरळ मार्गाने सुसाट कार चालवत अँनेला पॅरिसला पोचवण्याऐवजी तो तिला मार्गातली प्रेक्षणीय स्थळे आणि प्रसिद्ध हॉटेल्स मधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ यांची रेलचेल घडवतो. सुरवातीला या आडमार्गाचा त्रागा करणारी अँने हळूहळू आला क्षण आनंदात जगू लागते आणि स्वतःच्या चिंता बाजूला ठेवून जेवणाचा, पेयाचा आणि पर्यायाने जीवनाचा आस्वाद घेऊ लागते. जॅक सोबत अनपेक्षित आणि अकल्पितपणे घडलेल्या या प्रवासातून अँनेला नव्याने झालेली "कधी कधी अंतिम मुक्कामापेक्षा प्रवास जास्त आनंद देतो" ही जाणिव याची कथा म्हणजे "पॅरिस कॅन वेट". म्हणूनच चित्रपटाचं नाव अतिशय समर्पक आहे. या संकल्पनेवर आधी जरी चित्रपट येऊन गेले असले तरी, अत्यंत देखणं चित्रीकरण, कलाकारांचा सहज अभिनय या जमेच्या बाजूंमुळे चित्रपट ताजातवाना आणि नवीन वाटत राहतो.
संवादांविषयी थोडंसंच, जॅक हा मूळचा फ्रेंच असल्यामुळे तो फार जड इंग्रजी बोलत नाही आणि त्यामुळे चित्रपट थोडा जड होतोय असं वाटत असतानाच जॅकचे हलकेफुलके संवाद मदतीला धावून येतात.

प्रवासादरम्यान दाखवलेला फ्रान्सचा देखणेपणा, आलिशान हॉटेल मध्ये उंची वाईन आणि शेफ्सनि बनवलेले आकर्षक खाद्यपदार्थ, त्यांचा आस्वाद घेत अँने आणि जॅकने मारलेल्या गप्पा, दोघांनी त्यांच्याआयुष्यातल्या नाट्यमय क्षणांची केलेली उजळणी, अँनेचा फोटोग्राफीचा छंद या सगळ्यांचं मिळून चितारलेलं कोलाज म्हणजे हा चित्रपट आहे.

डियाम लेनने अँनेच्या भावविश्वातील गुंतागुंत चपखलपणे अभिनीत केली आहे. तर अरनॉड वियार्डने
मनमौजी, समस्यांचा बाऊ न करणारा, कायम आनंदी राहणारा आणि आयुष्य सोप्या तत्वांनी जगणारा जॅक आपल्या सहजाभिनयाने अजूनच सोपा केला आहे.

आता शेवटी, चित्रपटाच्या शेवटाबद्दल थोडंसं, (घाबरू नका, कुठलंच गुपित फोडणार नाही मी). चित्रपटाच्या शेवटी अँनेला तिच्या भावी आयुष्यातली अशीच चोखाळता येण्याजोगीशी एक आडवाट धूसरशी दाखवून, दिग्दर्शकानं मोठ्या खुबीने शेवट केला आहे.

आता परत माझ्याकडं वळतो, माझ्या आयुष्याचं, जीवनशैलीचं वास्तव विसरायला लावून या चित्रपटानं मला रंगीबेरंगी दुनियेत नेलंच आणि शिवाय रोजची वहिवाट सोडून आजूबाजूच्या, काहीशा कमी धुंडाळलेल्या वाटांवर पाऊल टाकायला प्रेरित पण केलं (जसं कि हा लेखनप्रपंच), आणि म्हणूनच हा चित्रपट मला आवडला असेल असं वाटतं. बाकी, माझ्यासारख्या सामान्याने चित्रपट परीक्षणाचा प्रयत्न करू धजणे हे जसं दिग्दर्शकाचं यश, तसं हे परीक्षण वाचून कुणाला चित्रपट पहावासा वाटला तर... कॉमेंट्समधे कळवा

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गोड दिसतो चित्रपट.
मा.श्री. प्रवीण दवणेमजकुरांचा सदर चित्रपटाच्या निर्मितीशी काही संबंध असल्याचे ऐकिवात आले आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Liberalism is a mental disorder

जरूर पाहा.
मा.श्री. प्रवीण दवणेमजकुरांचा सदर चित्रपटाच्या निर्मितीशी काही संबंध असल्याचे ऐकिवात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा चित्रपट पाहायला आवडेल. मला कार ड्राइविंग येत नाही आणि जास्ती कुणाच्या ओळखी नाहीत तरी पाहीन. रोमन हॅालडि पाहिला होता .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी रोमन हॉलिडे नाही पहिला, watchlist मध्ये जोडतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिनेमा बघण्याची उत्सुकता वाढली आहे.

तुमचा चित्रपट समीक्षांचा एखादा ब्लॉग वगैरे आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद अमित. चित्रपट समीक्षांचा ब्लॉग अजुन तरी नाही, पुढे कधी सुरु केला तर लिन्क इथे प्रकशित करेनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0