Image of Reality and Reality of Image - उदयन वाजपेयी

संकल्पना

Image of Reality and Reality of Image

- उदयन वाजपेयी

नादरूप, रझा फाउंडेशन आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांनी आयोजित केलेल्या रोहिणी भाटे व्याख्यानमालेत, १८ ऑगस्टला उदयन वाजपेयी यांनी केलेलं भाषण.

आजचा आपला विषय आहे ‘Image of Reality’ किंवा ‘Creative Reality of Image’. आपल्या देशातले एक मोठे चित्रकार आणि विचारवंत जगदीश स्वामिनाथन यांनी हा शब्दप्रयोग केला होता. याचा ऐतिहासिक संदर्भ असा की तेव्हा चित्रकलेत हुबेहूब चित्रं काढण्याची पद्धत जोमात होती. त्याच आधारावर चित्रकलेची समीक्षा होत होती. चित्र किती खऱ्यासारखं आहे, हुबेहूब आहे, हे बघितलं जात असे. त्याला वास्तववाद (realism) म्हणतात. वास्तव‌वाद हे एका शैलीचं नाव आहे, या गोष्टीचा विसर पडला होता. वास्तववाद म्हणजे सत्याचं चित्रण करण्याची एक शैली आहे , पण सत्याचं चित्रण म्हणजे वास्तववाद नव्हे. आपण वास्तववाद म्हणतो, तेव्हा त्यात वास्तवासंदर्भात एक विचार असतो; आणि तो विचार चित्रित करण्यालाच आपण सत्य समजून बसतो.

जगदीश स्वामिनाथन
(सिटीबँकेच्या संस्थळावरून)

वास्तववाद किंवा इंग्रजांनी पुढे भारतात येऊन ज्याला stylization म्हटलं, त्यांत अस्तित्वमूलक किंवा ontologically काही फरक नाही. जे वास्तव आहे, त्याला प्रत्यक्षात जसं दिसतंय तसं उतरवण्याचा प्रयत्न करणं अशी पद्धत भारतात प्रचलित नव्हती. आपल्याकडे वस्तुनिष्ठ वास्तव चित्रित करण्याची प्रथा नाही. आपल्यासाठी जे आंतरिक वास्तव आहे, ते व्यक्त करण्यासाठी आपण बाहेर उपलब्ध असलेल्या सामग्रीची मदत घेतो. त्याला नाट्यशास्त्रात अनुभाव म्हणतात. अनुभाव म्हणजे काय, तर आपल्या मनात जे भाव आहेत ते व्यक्त करण्यासाठी आपण काही फर्निचर, मटेरियल, सामान वापरतो ते. हे सिनेमात होईल, कवितेत होईल, किंवा नाटकातही दिसेल. त्या पदार्थाला अनुभाव म्हणतात. भावाचं जो अनुगमन करतो तो अनुभाव. म्हणजे भावानुरूप सामग्री. मोठे कलाकार कोण, तर जी सामग्री त्यांनी वापरली आहे, ती त्यांना अभिप्रेत भावाच्या खूप जवळची आहे. त्यांच्या कलेला आपण श्रेष्ठ मानतो. आपली वास्तविकता सापेक्ष आहे, कारण वास्तव आपल्या अंतर्मनात असतं; व्यक्तिनिष्ठ असतं.

ह्याउलट, वस्तुनिष्ठ, म्हणजे ज्या वस्तू अस्तित्वात आहेत त्या. समजा, इथे एक बाटली ठेवली आहे. जर तुम्हाला स्वतःला बाटलीच्या जागी उभं राहायचं असेल तर त्या वस्तूला आक्षेप असेल. सापेक्षतेमध्ये असे आक्षेप (objection) नसतात. त्यात समावेशकता असते. सामावून घेण्याची अनंत क्षमता असते. त्याचे असंख्य प्रकार असतात. त्यालाच स्वभाव म्हणतात. आणि सगळ्यांचे स्वभाव निरनिराळे असतात. भारतीय पारंपरिक दृष्टीमध्ये, हा स्वभाव व्यक्त करण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्या बाहेरच्या असतात खऱ्या, पण त्या यथार्थ म्हणून घेत नाहीत. यथार्थवाद मात्र तसा असतो.

जेव्हा स्वामीनाथन चित्रकार म्हणून कार्यरत होते, तेव्हा ते लोकांशी या गोष्टीसाठी झगडत होते : चित्रकला आपल्या अंतरमनाची, स्वभावाची अभिव्यक्ती आहे. त्या काळात वास्तववादाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी म्हटलं होतं की, वास्तवाच्या प्रतिमेपेक्षा अधिक महत्त्वाची असते ती प्रतिमेची वास्तवता; ती नक्की काय आहे?

मी त्यावर विचार केला. स्वामीजी माझे गुरू आहेत. गुरूचे विचार पुढे नेले पाहिजेत. त्याशिवाय गुरूदक्षिणा कशी देणार? आपल्याला सगळ्यांना माहितच असेल, की मात्यापित्यांचं ऋण असतं, तसंच देवाचं म्हणजेच निसर्गाचं, आणि गुरूंचंही ऋण असतं. ही ऋणं कधीच फेडता येत नाहीत, पण ती फेडण्याचे प्रयत्न आयुष्यभर केले जातात. मी तसा आधुनिक इसम आहे, पण ऋणांचा हा विचार मला खूप सुंदर वाटतो. या विचारामुळे आपण नेहमीच कृतज्ञ असतो. आपण कितीही मिळवलं तरीही अहंकारी बनत नाही. विचारांचा विस्तार करतो तेव्हा वाटतं की आपल्यामागे कोणीतरी आहेत. म्हणजे असं मानून चाला की माझ्या पाठीमागे माझे गुरू आहेत.

मी या विचाराचे असे खंड केले आहेत : सर्वप्रथम मी image of reality म्हणजे वास्तवाची प्रतिमा म्हणजे काय आहे, याबद्दल बोलेन. त्यानंतर reality of image म्हणजे प्रतिमेतली वास्तविकता याकडे येईन. वास्तवाची प्रतिमा हा विषय मी शिकवतो. म्हणजे मी physiology शिकवतो; psychology नाही. तर वास्तव दिसतं कसं, ऐकू कसं येतं हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात येईल, की ज्याबद्दल आपल्याला सगळं-सगळं माहीत असेल अशी ही साधीसोपी गोष्ट नाही. असं आहे, की यात दोन प्रकारचे सिद्धांत आहेत; एक तर आधुनिक सिद्धांत (पाश्चिमात्य सिद्धांतांना आधुनिक म्हणण्याची पद्धत आहे) आणि दुसरा पारंपरिक सिद्धांत, तो अद्वैत वेदान्तामध्ये आहे. त्यानुसार, आपल्याला दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी अविद्येच्या आवरणाखाली झाकलेल्या आहेत. अविद्या म्हणजे ‘ज्यात विद्या नाही ते’ असा एक अर्थ, आणि ‘जे विद्यमान नाही ते’ असा दुसरा अर्थ. आपल्या डोळ्यांतून, कानांतून एक वृत्ती निघते, ती ज्या वस्तूकडे जाते तिचा आकार ग्रहण करते. आता आपली वृत्ती असं जेव्हा करते तेव्हा त्या वस्तूवर जे अविद्येचं आवरण असतं ते ती भंग करते. मग आपली वृत्ती जो आकार घेते, त्यानुसार ती वस्तू आपल्याला ग्रहण होते. आपण त्या रूपाचा अनुभव घेतो. हा अद्वैत वेदान्तामधला सिद्धांत.

युरोपीय दृष्टीनुसार वृत्ती आपल्याकडून निपजत नाही. उलट, प्रकाशाचे किरण डोळ्यांत जातात. ते किरण एखाद्या वस्तूमधून निघतात. आणि आपल्या नेत्रपटलावर (रेटिनावर) पडतात तेव्हा ती वस्तुप्रतिमा भंगते. डोळ्यातले रॉड्स आणि कोन्स हे करतात. कोन्स रंग ग्रहण करतात, तर रॉड्स कमी प्रकाशात दिसणाऱ्या वस्तू ग्रहण करतात. कानात असंच होतं. एखादा आवाज आपल्या कानात जातो तेव्हा तो मोडून जातो. त्या फ्रीक्वेन्सीज भंग पावतात. आपण वस्तूंचं आकलन करून घेतो तेव्हा आपल्या डोळ्यांत, कानांत वस्तूंचं disintegration होतं. हे भंगणं फार मोठं आहे. हे भंगलेलं वास्तव आपल्या नर्व्हज आणि न्यूरॉन्समधून मेंदूपर्यंत जातं. मेंदूमध्ये वास्तव भंगलेलं असतं. वेगवेगळे न्यूरॉन्स त्याचे वेगवेगळे भाग ग्रहण करतात.

हे भंगलेलं वास्तव पुन्हा जोडलं जाण्याबद्दलचा कोणताही सिद्धांत विश्वासार्ह नाही. विज्ञानात म्हणतात की गणितीय पद्धतीनं ते एकत्र होतात. पण असं कसं होऊ शकेल? हिरव्या रंगाला वास्तवाशी पुन्हा जोडणारी एक वक्ररेखा कशी असू शकेल? गणितात हे शक्य नाही. याचा अर्थ, दुसरी काही पद्धत आहे, ज्यात ही जोडणी होते. मला वाटतं, आणि हा माझा विचार अजूनही बाल्यावस्थेत आहे, ही जोड गणिती पद्धतीनं होत नाही तर भाषिक पद्धतीनं होते. केवळ दोन पद्धतींमध्येच भंगलेलं सत्य जोडता येतं; गणितीय किंवा भाषिक. गणितीय पद्धतीनं याची व्याख्या करता येत नाही. दुसरी पद्धत अशी की आपला मेंदू सातत्यानं वेगवेगळ्या न्यूरॉन्सकडून आलेल्या वास्तवाच्या वेगवेगळ्या भागांना शब्दांसारखं एकत्र करून त्यातून जणू वाक्यं बनवत राहतो. वाक्य जुळलं की मग जसा वाक्याचा अर्थ कळतो, तसं वाक्यासारख्या रूपात आपण वास्तव पाहत असतो. त्याचा अनुभव घेत असतो. म्हणजे जे reintegration होतं, भंगलेल्या वास्तवाची जी जोडणी/जुळणी होत असते, ती भाषिक स्तराप्रमाणे होते. ज्याला आपण खरोखरचं व‌ास्तव म्हणतो, तीच आपली कल्पना असते. म्हणजे ज्याला आपण पक्कं वास्तव म्हणतो, तेच स्वतः कितपत वास्तव असतं?

म्हणूनच ‘वास्तव काही ठोस गोष्ट आहे जी आपण आहे तशीच धारण करतो’ हा वास्तववादाचा दावा काही खरा नाही. दुसरं असं की सातत्यानं मेंदूत आपले न्यूरॉन्स वाक्यं बनवत असतात. त्यामुळे खूप पूर्वी लोक जेव्हा म्हणायचे, की एखाद्याला पशूंची भाषा समजते, याला काही पुरावा आहे; पण त्या कल्पनेचा विकास करावा लागेल. पण मी हे म्हणायचा प्रयत्न करत आहे : आपण ज्याला प्रतिमा म्हणतो आणि ज्याला वास्तव म्हणतो, त्या दोन विपरीत गोष्टी नाहीत. आपण ज्याला वास्तव म्हणतोय ते आधीच एक प्रतिमा आहे, ते सातत्यानं आणि मुळातच आपली निर्मिती आहे. त्यामुळे आपण एकाच वास्तवासमोर असूनही ते पुन्हा जोडताना वेगवेगळी वाक्यं बनवतो. आपला वास्तवाचा अनुभव वेगवेगळा असतो. वास्तव एकाच प्रकारे ग्रहण करतील, अशा कोणीही दोन व्यक्ती एकाच परिसरातदेखील सापडणार नाहीत. असं होऊ शकत नाही.

म्हणजेच, वास्तव कशाला म्हणायचं आणि आपण ते कुठवर म्हणू शकतो, ह्यातच गोंधळ आहे. आता आपण पुढे जाऊ आणि प्रतिमेच्या वास्तवाकडे वळू. माझा हे सांगण्याचा प्रयत्न आहे की वास्तव हीच एक कल्पना आहे. जेव्हा आपण प्रतिमेच्या वास्तविकतेबद्दल बोलतो तेव्हा हा वाक्‌प्रयोगच अडचणीत येतो. पण सध्यापुरतं त्याला अडचणीत न आणता त्याच्या रूढ अर्थानं आपण त्याकडे थोडा वेळ बघूया. एक तर, भारतात एक विशेष गोष्ट आहे की आपण प्रतिमांना वास्तवापेक्षा अधिक वास्तविक मानतो. उदाहरणार्थ, विभाव हा शब्द तुम्हाला माहीत असेलच. नाट्यशास्त्रात रसनिष्पत्तीसाठी विभाव महत्त्वाचा समजला जातो. विभावाची परिभाषा काय आहे? विभाव काय आहे? ही एक खास प्रकारची गोष्ट आहे, म्हणजे विशेष प्रकारचा भाव, विशेष प्रकारचं अस्तित्व आहे. जेव्हा एखादी गोष्ट किंवा पात्र नसतानाही ते असतं, तेव्हा असतो तो विभाव. म्हणजे कृष्ण, राम, अॅना करेनिना हे सगळे लोक झालेले नसूनही आहेत. ते आपल्या रोजच्या आयुष्याचा हिस्सा आहेत. आपल्याकडे विभावालाच भाव समजण्याची प्रवृत्ती आहे. म्हणजे, जो राम झालेला नसूनही आहे, तो विभाव आहे. तरीही आपण आपले त्यांची जन्मभूमी निश्चित करण्याच्या प्रयत्नात असतो. रामाची जन्मभूमी निश्चित होताच, म्हणजे त्या क्षणीच, विभाव भावात परिवर्तित होईल. मग त्यामागे संस्कृतीची जी कल्पना आहे, ती संपून जाईल. जोवर आपण एक मूलतत्त्व समजून घेत आहोत तोवर ही कल्पना जिवंत राहील. ही सारी पात्रं आहेत ती आहेत, पण त्यांच्या असण्याचं स्वरूप काय आहे? हे सगळे झालेले नसूनही आहेत. भारतात हे मानण्याची मोठी परंपरा आहे. आपली विभाव-पात्रं आहेत, तशीच विभाव-नगरंही आहेत. अयोध्या बघून थोडंच कोणी रामायण गायलं असेल! अयोध्या, वृंदावन वगैरे आधी रामायणात, कृष्णकाव्यात आली आणि नंतर या नगरी पृथ्वीवर आल्या. असल्या गोष्टी करण्यात आपण एकदम तरबेज आहोत. आपण या कल्पनांना प्रत्यक्षात आणतो; आणि वर असं काही भासवतो की या नगरी तर पूर्वीपासूनच इथे होत्या. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे! यात मोठा विनय आहे. कारण असं करून आपण म्हणतोय की हे मनुष्यांचं सृजन नाही, उलट मनुष्य यांचं सृजन आहे! म्हणजे हे कसं आहे, की कवी थोडाच कविता लिहितो, उलट कविताच कवी लिहिते; नर्तिका नृत्य नाही करत, नृत्यच तिला नर्तिका बनवतं. उलटच योग्य आहे. तसंच वृंदावन, अयोध्या आणि इतर बऱ्याच नगरींचं. जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही की आपल्या ह्या संस्कृतीच्या कल्पना किंवा प्रतिमा ग्रहण करण्याच्या पद्धती काय आहेत, तोपर्यंत आपण विभावाकडे भाव म्हणूनच बघत राहू. आणि अशा रीतीनं आपण आपल्या संस्कृतीचा हळूहळू विनाश करत राहू.

हा विभाव आहे आणि हा भाव नाही आहे, हा आपला विवेक हळूहळू संपत चालला आहे. प्रत्यक्ष अस्तित्वातली विभावाची पायरी भावाच्या पायरीपेक्षा अजिबात खालची नाही. सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवं. ग्रीक संस्कृतीमध्ये हे असतं : तिथे मिथकं वेगळी असतात आणि इतिहास वेगळा असतो. तिथे कल्पनेला मिथकाचा दर्जा मिळतो, आणि सत्याला इतिहासाचा दर्जा मिळतो. त्यांना फॅक्ट्सचं वेड आहे! आता मात्र तिथले समाजशास्त्रज्ञही म्हणू लागले आहेत, की फॅक्ट्ससुद्धा उत्पादित केल्या जातात. त्यामुळे आता परिस्थिती थोडी बदलली आहे, ही एक वेगळीच गोष्ट आहे!

आमचे एक मित्र, नवज्योती सिंग, कलांमधले मोठे तत्त्वज्ञ आहेत. त्यांनी मला एक कहाणी सांगितली. ‘चित्रदर्शन’ नावाच्या ग्रंथातली. हा ग्रंथ मुळात संस्कृतमधला. इतर अनेक संस्कृत ग्रंथांप्रमाणे तिथून तो गेला तिबेटी भाषेत. आपल्याकडचा मूळ संस्कृत ग्रंथ नष्ट झाला. तिबेटीमधून तो नंतर गेला जर्मनमध्ये. आणि जर्मनमधून पुन्हा संस्कृतमध्ये अनुवादित होऊन पुन्हा आपल्याकडे आला. तर या चित्रदर्शन ग्रंथात एक सुंदर कहाणी आली आहे. विभावाला आपण जी प्रतिष्ठा दिली आहे , त्यामागचा तात्त्विक आधार काय आहे ह्याची त्यातून तुम्हाला कल्पना करता येईल. असा तात्त्विक आधार युरोपीय संस्कृतीत नाही. मात्र भारतात आहे, आपल्या पूर्वेला जपानपर्यंत गेलो किंवा पश्चिमेला इराणपर्यंत गेलो, तर तिथपर्यंतही असा आधार सापडतो. तर ती कहाणी अशी —

एक राजा होता, भयजीत. या कहाण्यांमधली नावं खास असतात. नावातही बरीच जादू असते बरं! एक फ्रेंच तत्त्वज्ञ होते, रोलाँ बार्थ. ते साहित्याच्या सिद्धांतावर संशोधन करत. त्यांनी म्हटलं, मी आजपर्यंत कादंबरी लिहू शकलेलो नाही, कारण पात्रांना नावं काय द्यायची हेच मला समजत नाही. म्हणजे, नाव ही मोठी गोष्ट असते. आधुनिक लेखक त्याला फार महत्त्व देत नाहीत. पण दस्तयेवस्की देत असे. रास्कॉलनिकॉव्हला एक विशिष्ट अर्थ आहे. तो त्याच्या जीवनपटाविषयी काही तरी सांगतो. असो. तर मुद्दा काय…

भयजीत, म्हणजे भयावर विजय मिळवलेला. पण म्हणजे नक्की काय? सगळ्या प्रकारची भयं ही कोणत्या तरी प्रकारे मृत्युच्या भयाशी जोडलेली असतात. म्हणजे भयजीतनं मृत्युच्या भयावरसुद्धा विजय मिळवला होता. त्याचं राज्य धर्मसंमत होतं, म्हणजेच नीतिमत्तेचं पालन करणारं होतं. त्यामुळे तिथे कुणाचाच अकाली मृत्यू होत नसे. एकदा एका ब्राह्मणाच्या घरी बालमृत्यू झाला. (हल्ली ब्राह्मण शब्द वापरला तर ते जातीयवादी होतं. पण, इथे ब्राह्मण म्हणजे स्व-भान असणारे लोक) या ब्राह्मणाला माहीत होतं की ह्या राज्यात असा अकाली मृत्यू होता कामा नये. तरीही तसा मृत्यू झाला. ह्याचं भान त्याला होतं, म्हणजेच तो ब्राह्मण होता.

तो राजाच्या दरबारात गेला. “बघ राजन. काही तरी चुकीचं, अनैतिक, अधार्मिक घडलं आहे. माझा पुत्र त्यामुळेच अकाली मृत्यू पावला.” शोधाशोध केली तर समजलं की काहीच चुकीचं घडलेलं नाही. गोष्टी जशा घडायला पाहिजेत तशाच घडत आहेत. म्हणजे कुणा सरकारी अधिकाऱ्यानं लाच घेतलेली नाही, वगैरे. (थोडक्यात, आपल्याकडे जे नेहमी चाललेलं असतं तसं काहीच तिथे झालेलं नव्हतं!) तर मग नक्की काय झालं? राजा शूरवीर तर होताच. तो म्हणाला, “यमलोकावर चढाई करू.” कारण असं कसं तुम्ही कुणाला तरी आमच्या इथून घेऊन गेलात?

आता यमलोकातले सैनिक नग्न असतात. गीतेत शरीराला वस्त्र म्हटलेलं आहे : वासांसि जीर्णानि यथा विहाय। ‘नग्न’ शब्द तिथून आलाय. म्हणजे ज्यांना शरीर नसतं ते लोक. त्यांच्याशी भयजीताने युद्ध केलं. परलोकातल्या यमाच्या सैन्याला हरवलं. आता परलोक म्हणजे तो कुठे असतो? तो तर आपल्या स्मृतीत असतो; म्हणजेच परलोक आपण सर्व आपल्या खांद्यावर, आपल्या डोक्यात घेऊन फिरतो. तर अशा परलोकात नग्नांची सेना आणि त्यावर भयजीतनं विजय मिळवणं; ह्यातून आपोआप तुम्हाला अनेक अर्थ लागत जातात. तर आता हरल्यानंतर यमराज म्हणाला, “आमची काही चूक नाही. आम्ही तर हुकुमाचे ताबेदार. आम्हाला त्या मुलाचे प्राण घ्यायला ब्रह्मानं सांगितलं होतं. तुम्ही ब्रह्माशी काय ते बोला; आमच्या सेनेला त्रास नका देऊ. आम्हाला का हरवता?”

तर राजा गेला ब्रह्माकडे. त्यानं चित्रगुप्ताला विचारलं. तो म्हणाला, “चूक झाली महाराजा. याला आणायला नको होतं, पण आम्ही आणलं.” तर भयजीत म्हणाला, “ठीक आहे, झालं ते झालं. आता ती चूक सुधारा.” तर ब्रह्मदेव म्हणाला, “असं नाही ना होऊ शकत. ज्या शरीरात तो मुलगा आतापर्यंत होता, तेच शरीर आम्ही नाही परत देऊ शकत. तुम्ही असं करा. त्या मुलाचं सुंदर चित्र बनवा. अगदी हुबेहूब त्या मुलासारखंच. मी त्यात प्राण फुंकेन.”

म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? हा चित्रकलेचा अर्थ आहे. हे वास्तवाचं अनुकरण नाही; हे वास्तवाला समांतर आहे. म्हणजे चित्रकला. म्हणून या परंपरेत विभावाला भाव मानतात. आता हे वास्तव-चित्रकला आणखी खोलात जाऊन बघाल तर समजेल की कलामात्र म्हणजे काय असतं. परलोकात हे जे नग्न लोक असतात त्यांना शरीरं देण्याचं काम फक्त कला करते. मी कविता लिहितेवेळी हे करतो : माझ्या आई-वडिलांना शरीर नाही, त्यांना मी शरीर देतो; राम-कृष्णांना शरीर नाही, त्यांना मी शरीर देतो. चित्रकला किंवा कलामात्र म्हणजे मृत व्यक्तींचं गर्भसाधन आहे. चित्रकला गवंडी किंवा सुतार आहे, असं ऋत्विक घटक म्हणत असत. ज्यांच्याकडे शरीर नाही, त्यांना शरीर देण्याचं हे काम आहे. म्हणजे परलोकातून आपल्या लोकात हे येऊ शकतात. परलोकातून इथे का आणावं? कारण हे जे नग्न आहेत, ते फक्त व्यक्ती नाहीत, ही मूल्यंसुद्धा आहेत. They are not only absent bodies of deads, they are also values.

तर आता हे जे मूल्य कलेत आणायचं आहे ते कसं आणणार? नृत्यात तुम्ही ज्यांचा अभिनय करता — राधा, कृष्ण, सत्यभामा, वगैरे —त्यांना शरीर देता. आपलं शरीर नर्तकी कृष्णाला काही काळासाठी भाडेतत्त्वावर देते. ती आपल्या शरीरातून अदृश्य होते; शरीरापासून काही काळ दूर उभी राहते. तेवढ्या वेळासाठी त्या शरीरात कृष्ण वसतो. (कृष्ण हा नावापुरता वापरला, कथकमध्ये कृष्ण खूपदा असतो म्हणून. त्याजागी इतर कोणीही कल्पून घ्या.) आपल्या परंपरेत (म्हणजे पौर्वात्त्य, कारण ही फक्त भारतातच आहे असं नाही) यात विभावाला भावाचा दर्जा मिळतो. कारण आपल्या कलेत बघण्याची जी अस्तित्वगत नजर आहे, जी तत्त्वविचारांतून कलेकडे बघण्याची नजर आहे, त्यात कलेला आपण वास्तवाचं अनुकरण मानत नाही; वास्तवाला समांतर मानतो.

जेव्हा वेद लिहिले गेले तेव्हा भारतात शिल्पकला नव्हती. तेव्हा वाद होता : जे मंत्र आहेत ते देवतांबद्दलचे संकेत आहेत, का मंत्र स्वतःच देवता आहेत? म्हणजे हे देव शब्दाधारी आहेत का? म्हणजेच देवताच शब्द धारण करतात का? दुसरी बाजू अशी होती की देवता इतरत्र कुठे तरी आहेत आणि मंत्र त्यांच्याकडे बोट दाखवत आहेत. भारतात, या परंपरेत, वाद हा होता की शब्द स्वतःच प्रतिमा किंवा मूर्ती आहेत, की शब्द प्रतिमेविषयीचा संकेत आहेत? आता बऱ्याच काळानंतर, म्हणजे वैदिक काळ उलटून गेल्यानंतर, चित्रकला येते, विष्णुधर्मोत्तरपुराण येतं, नाट्यशास्त्र येतं. तोपर्यंत या परंपरेकडे शिल्पविधान नाही. त्याला नंतर देवतांचं स्वरूप येतं, आणि ते असं की या देवता रोजच्या आयुष्याचा भाग बनतात. मग प्रतिमा आपल्यासाठी एवढी वास्तव होऊन जाते, की ती आपली दोस्त असल्यासारखीच होऊन जाते. आपण तिला त्याच रूपात ग्रहण करतो; तिचा अनुभव तसाच घेतो.

हे जसं वेदकाळात घडलं तसंच, कर्मधर्मसंयोगाने, विसाव्या शतकातही घडलं. एक आदिवासी समुदाय आहे, गोंड. त्यांच्याकडे कहाण्या सांगणारे लोक असतात. हे लोक त्यांच्या स्मृतीचे वाहक असतात. शिवाय त्यांचे गायक, संगीतकार असतात. त्यांना प्रधान म्हणतात. गोंडांमधलाच एक उपसमुदाय म्हणता येईल त्यांना. ते फक्त आख्यानं गात. त्यांच्याकडे चित्रकला नव्हती. घरात केवळ भिंतींवर काही नक्षीदार महिरप, वेलबुट्टी, वगैरे असायची एवढंच. आता या आख्यान सांगणाऱ्या लोकांसाठी त्या समाजातच त्यांचे आश्रयदाते लोक असायचे. त्यांची वाद्यं आणि इतर सामग्री खरेदी करणं, तिची देखभाल करणं वगैरेंची काळजी हे आश्रयदाते घेत. हळूहळू त्यांचा आधार कमी झाला. एकदा कधी जगदीश स्वामीनाथन या प्रधान लोकांना भेटले, तेव्हा त्यांनी प्रधान लोकांना आग्रह केला की त्यांनीही चित्रं काढावीत. कारण, त्यांच्यात अचानक एक चांगला चित्रकार झाला होता — जनगढ सिंग श्याम. मग त्यांनी इतिहासात पहिल्यांदाच त्यांच्या देवता चितारल्या. त्यांच्या मनात देवतांची जी चित्रं आधीपासूनच होती, ती आता अगदी सहज कागदावर उतरली. इतर भारतीयांप्रमाणेच त्यांच्या देवताही खूपशा असतात. रोजच्या, व्यापक भारतीय जीवनात असणाऱ्या गोष्टीच त्यात असतात — चुलीवर जेवण शिजतं, तर चूल ही देवता. तिला जेवण दिल्याशिवाय जेवायचं नाही. नाही तर तोंड वाकडं होतं. झोपाळा ही देवता. झाडू देवता असते. या सगळ्यांची चित्रं काढायला सुरुवात झाली. एक प्रकारे ज्या ध्वनिप्रतिमा होत्या त्या दृश्यप्रतिमा झाल्या. म्हणजेच, त्यांच्यासाठी त्या सगळ्या प्रत्यक्षात होत्या. सगळ्या प्रतिमा रोजच्या आयुष्याचा भाग होत्या. तोपर्यंत फक्त कानावर पडत होत्या, आता त्यांना दृश्यरूप मिळालं. त्यामुळे आता आपणही त्या पाहू शकतो. आधी ते शक्य नव्हतं, कारण त्यांची गायकी समजणं कठीण आहे. आपले समजून घेण्याचे प्रकार निराळे आहेत, इतरांचं संगीत आपल्याला सहज समजत नाही. पण त्यांनी चित्रं काढली तेव्हा आपल्याला कळलं की या देवतांसोबत ते किती शतकं राहत होते. अशा रीतीनं प्रतिमा खऱ्या असतात. त्या सगळ्यांसोबत, आपल्यातच असतात.

आता अवताराची धारणा पाहा. अवतारात तीच धारणा आहे. पौराणिक दृष्टी सोडून हॉलिवूडचा सिनेमा पाहा. ‘अवतार’ याचा अर्थ तिथेही तोच आहे. एका कोणाचं रूपांतर दुसऱ्यात होतं, यंत्र लावून. आपल्या पूर्वजांनी कहाण्या लावल्या आणि रूपांतर घडवलं ते यंत्राशिवाय. ते आणखी सुंदर वाटतं. विचार तर तोच राहतो. वास्तव रूपांतरित झालं, पण दुसऱ्या प्रतिमेत; आणि ती प्रतिमाही वास्तवच आहे; दोन्ही प्रतिमाच आहेत. राम, कृष्ण, ब्रह्म याही प्रतिमाच आहेत. This is a realization into an image. वेगवेगळी realization आहेत म्हणून निरनिराळ्या प्रतिमा आहेत.

तर, सांगायचा मुद्दा असा, की आपल्या समाजात प्रामुख्यानं, पूर्णतया प्रतिमा आणि वास्तव यांच्यात, विभाव-भाव यांच्यात आपण फार फरक करत नाही. त्याचा एक मोठा दुष्परिणाम झाला, तो असा : आपल्या इथे सहज प्रतिमा बनवल्या जात होत्या. लोकसमुदाय या प्रतिमा बनवत होता. म्हणजे जनगढसिंग श्यामनं जेव्हा पहिल्याप्रथम प्रतिमा निर्माण करायला सुरुवात केली, तेव्हा त्या प्रतिमा कशाच्या आहेत हे त्याच्या समाजाला सांगावं लागलं नाही; त्यांना त्या आपसूक कळल्या आणि मग तो समुदाय प्रतिमा निर्माण करू लागला. तर या कागदावर आल्या तेव्हा सगळ्यांना ओळखीच्याच वाटल्या, म्हणजे त्यांना अभिज्ञान झालं. (जसं शकुंतलेची अंगठी पाहून दुष्यंताला पूर्वीचं आठवलं, तसं.) कारण त्या समाजाच्या सामायिक स्मृतीचा आधीपासून भाग होत्या. सूर्य कसा असेल, ह्याचे मूर्तिशास्त्रीय तपशील पाहिले, तर खजुराहो आणि पुराणात यात फार अंतर नाही. त्यांच्या प्रत्यक्षरूपांत काही फरक असले तरीही. सामायिक स्मृतीमधून प्रतिमा बनत गेल्या. आणि त्यात ह्या सामायिकतेचा उत्सव होता, कारण त्या ओळखणं शक्य होतं.

उदाहरणार्थ, प्रतिमाशास्त्रानुसार (iconography) कालीदेवीच्या प्रतिमेला पुष्कळ हात असतात. मात्र, ते हात अवकाशात पुष्कळ नाहीत तर ते कालाच्या मितीमध्ये आहेत. हे अधिक चांगलं क्यूबिझम आहे. आफ्रिकन मुखवटे बघून पिकासोनं जेव्हा वस्तू बनवली, तेव्हा त्यामागे त्याचा विचार असा होता की सगळ्या बाजूंनी वस्तू घडवायची आहे. संपूर्ण वास्तव दाखवायचं आहे. कारण आधी आपण समोर पाहूनच बनवत होतो. त्यात इतर बाजूंचं वास्तव निसटून जात होतं. आता त्यानं मागून-पुढून-बाजूनं कसं दिसतं हे बघितलं; त्याची प्रतिमा बनवली; तेव्हा मूळ वस्तू भंगली. पण देवीच्या हातांमागे काळ हा फार मोठा आयाम होता. एकाच प्रतिमेत काळाच्या वेगवेगळ्या तुकड्यांतले हात होते ते. ती काळाची जोडणी होती. देवीचे एवढे हात इंग्रजांनी बघितले तेव्हा ते म्हणाले, की हे राक्षसी आहे. कारण त्यांना बघता येत नव्हतं. देवीच्या मूर्तीतला stylistic genius त्यांना समजला नाही. हे प्रतिमाशास्त्र देशभरात अनेक ठिकाणी सापडेल. पूर्ण संस्कृतीच्या सामायिक स्मृती यामागे कार्यरत असतात. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर या प्रतिमा लोकांना कळतात. यात जणू काही सगळ्यांच्या कल्पनेचं योगदान असतं. म्हणजे हे एक प्रकारचं shared creation असतं. त्याच आधारावर शिल्पशास्त्र बनतं.

बनी-ठनी इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी : आपल्याकडे ‘जसंच्या तसं’ पोर्ट्रेट बनवण्याची प्रथा नव्हती. आपण प्रतिमाशास्त्रानुसार प्रतिमा निर्माण करतो. समजा, एखाद्या सुंदर स्त्रीचं चित्र काढलं जात आहे; त्यामागे विचार असतात; एक नाही अनेक विचार असतील; त्यानुसार प्रतिमा काढली जाईल. स्त्रीला समोर बसवून बनवणार नाहीत. म्हणजे प्रतिमाशास्त्रानुसार कल्पनेला प्राधान्य दिलं जातं. समोर मॉडेल बसवून हे केलं जात नाही. आपली मिनीएचर चित्रं पाहा. पिछवाई शैलीमध्ये ‘बनी-ठनी’ स्त्री असते (सोबत दिलेली प्रतिमा पाहा). मोठ्या डोळ्यांची अशी ही स्त्री असते. तुम्ही पाहाल, तर विष्णुधर्मोत्तरपुराणात जे गुण दिलेले आहेत, ती सारी लक्षणं तिच्या चेहऱ्यात असतील. हे प्रतिमाशास्त्रानुसार आहे, आणि हे प्रतिमाशास्त्र आपल्या संपूर्ण संस्कृतीचं सामायिक स्मृतिसंचित आहे.

आपल्या या वृत्तीचा मोठा गैरफायदा राजकारणी शक्तींनी घेतला आहे — जाहिराती निर्माण करून. मुळात, जाहिराती आल्या कुठून? बऱ्याच काळापर्यंत जगभरात गरजेनुसार डिझाईन केलं जात असे. म्हणजेच तुमची गरज काय आहे, त्याला अनुरूप उत्पादनही होत होतं. पण मग जेव्हा औद्योगिक क्रांती आली, तेव्हापासून एकसमान गोष्टी बनायला लागल्या. आता एका-साच्यातल्या-खूप-गोष्टी बनत असतील तर तुमची जी गरज आहे त्यात आणि त्या गोष्टींमध्ये अंतर असणारच. मोठाच फरक असेल. तो फरक नाहीच असं भासवण्यासाठी जाहिरातींची निर्मिती झाली. जाहिरातींचा अचूक अर्थच हा आहे. जिथे आवश्यकतेनुसार गोष्टी डिझाईन होतात आणि उत्पादित होतात तिथे जाहिरातींची गरजच राहत नाही. जाहिरातींची गरजच ह्यासाठी पडते, कारण गरजा निर्माण केल्या जात आहेत. वापरण्याआधी तुम्हाला कसं माहीत की तुम्हाला लक्स साबण हवाय! मी तर जेनेटिक्स शिकवतो. मला माहीत आहे की तुम्हाला लक्सच आवडत असणार असं सांगणारी तुमच्या आत एकही गोष्ट नाही. असा कोणताही डीएनए सीक्वेन्स नाही. हळूहळू जाहिराती ह्या दोन्हींतलं अंतर भरून काढतात.

जगभरातल्या राजकीय शक्तींना याचं बरोब्बर आकलन झालं. अमेरिकेपासून अलम दुनियेत निवडणुकांत एवढे पैसे का खर्च होतात? तर प्रतिमा निर्माण करण्यासाठी. कारण राजकारण्यांचा जन्म लोकांमधून झालेला नाही. त्यांची लोकप्रियता मागाहून येते. आधी ते पुढारी बनतात, नंतर लोकप्रिय होतात. लोककला आणि लोकानुनयी (पॉप्युलिस्ट) कला यांतला फरक हाच असतो. लोककला (किंवा देशी कला) लोकांमधून निर्माण होतात. लोक एकत्र येतात, गातात, नाचतात, गोष्टी सांगतात; त्यातून ती निर्माण होते. त्यात सामायिक संस्कृती असते. पण लोकप्रिय, लोकानुनयी कला घ्या : उदा. सोनू निगमचं गाणं. आता भारतातले लोक थोडंच सोनू निगमचं गाणं गात असतात? पण त्यांना ते इतक्या वेळा ऐकवलं जातं, इतक्या वेळा ऐकवलं जातं की ते त्यांना आपलंसं वाटू लागतं. हे सारखंसारखं ऐकवणं ही जाहिरात आहे. मी मघाशी म्हणालो ते अंतर त्यात सांधलं जातं. सगळ्या जगभरात हेच चालतं. अमेरिकेत तर फारच!

राजकारण्यांचा धर्म काय होता? त्यांची नैतिक मूल्यं काय होती? तर, त्यांनी लोकांच्या आकांक्षा व्यक्त कराव्यात. आजकाल मात्र सामान्य लोक आणि नेत्यांमध्ये एवढं भयंकर अंतर आहे की ते भरून काढण्यासाठी प्रतिमा निर्माण केल्या जातात. आणि आपण लोक तर विभावाचं भावात रूपांतर करण्यात फारच प्रतिभावान आहोत. तर त्यामुळे आपण त्या प्रतिमांनाच वास्तव समजू लागतो, म्हणजे जणू या माणसांच्यातच सगळ्या शक्ती आहेत असंच आपण मानू लागतो. म्हणूनच कलांसमोर, विशेषतः प्रतिमा निर्माण करणाऱ्या कलांसमोर (आणि माझ्या मते म्हणजे यात सगळ्याच कला आल्या) आज एक मोठंच आव्हान आहे. हे एकविसाव्या शतकाचंच आव्हान आहे. कला आपल्या परिसरापासून फटकून राहणं, आपल्या परिसराविषयी अज्ञ राहणं हे शक्यच नाही. आजच्या प्रतिमानिर्मितीमध्ये हा जो जाहिरातीचा शिरकाव झाला आहे, त्यामुळे सर्व संस्कृतीच लुटली जात आहे; आणि त्यावर शंका कोण उपस्थित करू शकतं? तर ते काम फक्त कलाच करू शकतात.

आणि हे कसं होऊ शकतं? आपल्याकडे याचा मार्ग काय, तर तो पुन्हा नाट्यशास्त्रात आहे. नाट्यशास्त्रात अभिनयाची चार तत्त्वं आहेत. वाचिक - बोलून; आंगिक - हात-पाय, शरीराने करतात; सात्त्विक - भाव, एखाद्या भूमिकेत किती शिरलं ते; आणि आहारिक - कपडे, वगैरे बाह्य गोष्टी.

आता ह्या चार अंगांमध्ये जर क्रम नसेल तर रस उत्पन्न होणार नाही. विशेषतः वाचिक आणि आंगिक ह्यांच्यात जर योग्य क्रम नसेल तर त्यातून वाक्य तयार होणार नाही. संक्रमित रस निर्माण होणार नाही. रसनिष्पतीचा मूलभूत सिद्धांत असा की, जेव्हा रस क्रमिक पद्धतीनं निर्माण केला जाईल तेव्हाच तो संक्रमित होईल. कारण त्याचा पाया ‘भाषा’ आहे. उदा. जे कुशल नर्तक असतात त्यांना अभिनयाच्या तत्त्वांमधून वाक्य कसं निर्माण करायचं ते माहीत असतं. मी अनेकदा हे उदाहरण देतो : नृत्यात जर घागर उचलण्याचा अभिनय करायचा असेल तर प्रत्यक्षात कोणालाही घागर उचलताना बघू नये, कारण नृत्यातलं घागर उचलणं फार निराळं असतं. प्रत्यक्षात घागर उचलताना वाक्य बनत नाही, पण नर्तिका घागर उचलते तेव्हा ती आधी बघेल, मग हात पुढे करेल, मग काही गायलं जाईल, त्या सगळ्यातून एक वाक्य बनतं. हे होतं तेव्हाच त्यातून रस निर्माण होतो आणि मगच त्यात अनुकीर्तन होईल. त्यातून एक अतिशय पायाभूत गोष्ट निर्माण होते. तिचं पितृत्व एका जर्मन नाटककराकडे सोपवलं जातं.

बर्टोल्ट ब्रेख्त नावाचा एक बिचारा जर्मन नाटककार एकदा चीनमध्ये गेला होता. अभिनयाची वेगवेगळी तत्त्वं काय असतात, ही भारतातून चीनमध्ये गेलेली गोष्ट त्यानं तिथे पाहिली. आता सगळे लोक कोरसमध्ये म्हणतात की alienation effect ब्रेख्तची देणगी आहे. अजिबात नाही. त्यानं याचं सशक्त पुनर्कथन केलं हे खरं आहे. पण ते पुनर्कथन होतं. आपण अभिनयात जेव्हा एक वाक्य निर्माण करतो, तेव्हा हे वास्तव नाही, हा अभिनय आहे हे लगेच समजतं. यालाच alienation म्हणतात. नाटक, नृत्य सुरू असताना हे वास्तविक नाही, हे नाटक किंवा नृत्य सुरू आहे असा अनुभव आपल्याला येतो. हे रोजचं जगणं नाही. हे काही तरी वेगळं होतं आहे. म्हणजे तुम्ही कुडिअट्टम पाहाल, तर त्यात सर्वप्रथम ते काही तरी संस्कृतातलं म्हणतील, म्हणजे भासाचं वाक्य किंवा तत्सम काही तरी. मग हलक्याने वाचिक अभिनय होईल, मग आंगिक होईल. आणि आंगिक अभिनयातून ते हळूहळू त्याला उमलतील. कथकमध्येही असं होतं. कुणी सफाईनं, तलमपणे करतं त्यामुळे हे पटकन कळत नाही; कोणी इतर प्रकारे करतं तेव्हा कळतं. पण ज्यात सहजपणे ही गोष्ट होत नाही असं कोणतंही नृत्य नाही. म्हणजे एकेक वाक्य होतं आणि ते क्रमिक होतं, आणि त्या क्रमिक करण्यामध्ये गोष्टी खुलू लागतात. त्यातून एक चमत्कार संचारी होतो. हा जो चमत्कार असतो, sense of wonder, तो कलेत मूलभूत आहे. त्यामुळे असं सारखं वाटत राहतं, की अरे आता काय होणार? आता काय होणार? त्यातून रसनिष्पतीत मदत होते. त्यातून काय होतं? तर ही प्रतिमा नर्तकीनं, अभिनेत्यानं तयार केलेली, बनवलेली आहे, हे तुम्हाला समजतं. म्हणजे त्या प्रतिमेचं प्रतिमा असणं तुम्हाला कळतं, त्याची अनुभूती तुम्हाला होते. अशा वेळेस जाहिरात आपल्याला फसवू शकत नाही. जाहिरातीचं ‘बनवलेलंपण’ तुम्हाला समजून चुकलं, तिचं मिथ्यापण समजलं, तर जाहिरातीचं काम कसं होईल? मग ती जाहिरात राहणारच नाही. ते तुम्हाला समजू न देणं हीच त्यांची खेळी आहे. आजकाल वास्तववादाचा सगळ्यात जास्त वापर जाहिरातीत होतो ही आश्चर्यजनक गोष्ट आहे, पण खरी आहे. म्हणजे, ते कुणाच्या तरी घरात घुसून इंटरव्ह्यू घेतात की बाबा तुमच्या घरात कोणता टॉयलेट क्लीनर वापरतात? तर ते खरं नसतं, सगळं रचलेलं असतं. तिथे कॅमेरा लावावा लागतो, लाइट चेक करावा लागतो, सगळं करावं लागतं ना! असं आपलं गेलं, घरात घुसलं की झालं असं थोडंच ते होत असतं? २५ टेक्स घ्यायला लागत असतील त्याचे! पण तुम्हाला जर ते माहीत नाही, तर तुम्हाला असं वाटेल की हे स्वाभाविक आहे. पण आपल्याकडे नाट्यशास्त्रामध्ये, शेकडो वर्षांपूर्वीच हे आपण जाणून चुकलो होतो, की समोर नाटक, नृत्य सुरू आहे ही जाणीव असल्यामुळे त्यातून अधिक रसनिष्पत्ती होते. आणि असं झालं तर मग त्यातून आणखी एक गोष्ट होते — त्या रूपाविषयीचं तुमचं चिंतन त्यातून सुरू होतं. ज्यात चिंतनाला जागा आहे, reflective space आहे, त्याला मी एकविसाव्या शतकात उच्च कला मानतो.

ही वास्तविकता नाही; हे कलाकाराच्या आंतरिकतेचा पुनरुच्चार आणि पुनःसृजन आहे; त्याची ही अभिव्यक्ती आहे, हे समजल्यावर चित्रासाठी, कलेसाठी स्थान तुमच्या मनात निर्माण होऊ शकेल. इतकंच नव्हे, तर अस्तित्वात असलेल्या सगळ्या गोष्टींसाठीच चिंतनासाठी तुमच्या मनात जागा उत्पन्न होईल. एकविसाव्या शतकात आपण सगळे जाहिरातींनी घेरले गेलेलो असताना जर चित्रकार, नाटककार, अभिनेते, नर्तक-नर्तिका हा अवकाश जर निर्माण करू शकले नाहीत, तर ते एकविसाव्या शतकात कलाकार म्हणून कमी पडत आहेत.

चिंतनाची जागा निर्माण करण्याचा आणखी एक मार्ग आहे. मलासं वाटतं, भारतात याचंदेखील स्थान महत्त्वाचं राहिलं आहे. दहाव्या शतकात आनंदवर्धन यांनी ध्वन्यालोक नावाचा ग्रंथ लिहिला. ध्वनि आणि प्रकाश. ध्वनीचा प्रकाश. म्हणजे ध्वनीवर प्रकाश पाडला जात आहे. पण, इथे ध्वनि या शब्दाचा अर्थ निराळा आहे. आनंदवर्धन म्हणतो की ध्वनि म्हणजे काव्याचा (कलेचा) आत्मा आहे. इथे आत्मा म्हणजे काय? तर Art is suggestive. कला ऐंद्रिय (sensuous) तर असतेच, म्हणजे सुंदर असतेच, पण तिच्याद्वारे काही तरी सूचितही केलेलं असतं. भारतीय प्रतिमाशास्त्रात हे खूप आहे. त्यानुसार प्रतिमा केवळ स्वतः जी असते तेवढीच नसते. जर त्याकडे फक्त प्रतिमा म्हणून बघितलं आणि त्यातलं सूचित समजलं नाही, तर ती अपूर्ण राहते. मी एक उदाहरण सांगतो. त्यानंतर तुम्ही स्वतः प्रतिमेकडे असं बघून पाहा.

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात मूर्तीचे डोळे खूप मोठे आहेत. ओडिसीमध्ये असतात ना, तसे. मी एका पंड्याला विचारलं, “या मूर्तीचे डोळे एवढे मोठे का?” तो मोठा शहाणा माणूस होता. तो म्हणाला, “तुम्हाला समजलंय म्हणून तुम्ही विचारत आहात. माझी परीक्षा घेत आहात ना!” तेव्हा मी म्हटलं, “परीक्षा घेणारा मी कोण! आपण तर पंडे आहात; एवढ्या मोठ्या मंदिराची आपण व्यवस्था पाहता. त्यापुढे माझी पात्रता ती काय!” आणि मला खरंच असं वाटतं. एके काळी ३०,००० लोक तिथे जेवत असत. तर त्यानं मला उलटा प्रश्न विचारला, की तुम्हाला काय वाटतं ते सांगा. मी माझा अंदाज सांगितला. : हे डोळे नाट्यशास्त्रातून आलेले आहेत. नाट्यशास्त्रात ‘विस्फारित नेत्र’ ही संकल्पना असते. असे डोळे चमत्कृती दर्शवतात. जगन्नाथ म्हणजे जग बनवणाऱ्याचे हे डोळे आहेत. सर्जक आपली सर्जना बघून चकित झालेला आहे. प्रत्येक सर्जक आपली सर्जना पाहून चकित होतो. या चमत्कारामुळे त्याचे डोळे विस्फारले आहेत. म्हणजे ह्यात जे सूचित केलेलं आहे ते काय आहे? तर, हे जगच जादुई आहे, चमत्कार आहे. म्हणजे हे केवळ डोळे नाहीत; त्यात संगीतन आहे; ध्वनी आहे. आणि हा सूचित ध्वनी कोणता आहे? तर, तो जगाच्या स्वरूपाची व्याख्या करू पाहतो आहे. हे डोळे आपल्या जागी डोळे तर आहेतच. पण त्याशिवाय काही तरी ते सांगू पाहतात. जगाच्या स्वरूपाची व्याख्या करतात.

आपल्या आधुनिक शिक्षणानं आपल्याला पारंपरिक व्याख्येनुसार अशिक्षित केलेलं आहे. आपण अशिक्षित असल्यामुळे होतं काय, तर त्यात जे सूचित केलेलं आहे, ते आपल्याला समजत नाही. एवढी साधी गोष्ट मला कळली ह्याचा मी एवढा गाजावाजा करतोय त्याचं कारणच हे आहे, की मी अशिक्षित आहे!

मला समजलेलं दुसरं उदाहरण देतो, ते नंतर मी कालिदास वगैरे जुन्या लोकांकडून कन्फर्मसुद्धा करून घेतलं. यात आपले जुने कवी फार मदत करतात; कुठे अडखळलो, तर सांभाळून घेतात. शिव-पार्वतीचं शिवलिंग असतं, ते इंग्रजांना scandalous वाटलं होतं. मला वाटतं, बहुतेकशा आधुनिक भारतीयांनादेखील तसंच वाटेल. कारण त्यांनाही त्यातलं सूचित समजत नाही. मला माहीत होतं की हे केवळ शिवलिंग नाही, आणखी काही तरी आहे; पण मला ते कळायला खूप वर्षं जावी लागली. आपण म्हणू शकतो की आपला देश अशा संकेतांनी ओतप्रोत आहे. संपूर्ण देशच जणू त्यासाठीचा कॅनव्हस आहे, एक नृत्य आहे. त्याला समजून घ्या आणि आनंदित होत राहा. अर्धनारीनटेश्वर काय आहे? शिव आणि पार्वती एका अनंत मैथुनामध्ये रत आहेत. त्यांना वेगळं करता येत नाही. त्यांच्या मैथुनाचा अंत होऊ शकत नाही. ‘कुमारसंभव’मधली कार्तिकेयाची कथा वाचाल, तर त्यात मैथुनाचा अंत होत नाही. This is eternal coupling. जर ते तसं असेल, तर त्यात शिवलिंग पार्वतीच्या गर्भाशयात आहे. संपूर्ण जगच पार्वतीचा गर्भ आहे. म्हणजे मग आपण कुठे आहोत? तर, जणू काही अजून आपला जन्मच झालेला नाही. जोपर्यंत आपल्याला बोध होत नाही तोपर्यंत आपण शिवदृष्टीतून, म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीनं अजूनही जन्मलेलो नाहीत. हा त्यातला संकेत, किंवा ध्वनि, किंवा त्याचं सूचित आहे. बोध झालेला नसणं म्हणजे ही आपली विस्मृती असू शकेल; आपल्याच संस्कृतीविषयीची ती विस्मृती किंवा अज्ञान असू शकेल. तसं असेल तर हा ध्वनी फार महत्त्वाचा आहे, कारण त्याचा अर्थ हे जग अंधःकारात बुडलेलं आहे. यापेक्षा आणखी सुंदर पद्धतीनं ही गोष्ट कशी मांडता येईल! मग सगळं स्पष्ट होऊन जातं. त्यात काहीही scandalous नाही. आपल्याला ह्या संकेतनापर्यंत, ह्या ध्वनिपर्यंत पोहोचता येत नसेल, तर शंकराच्या देवळात पूजा करण्याची आपली पात्रता नाही.

ह्या अंधःकारातून बाहेर येण्याचे अनेक रस्ते आहेत. त्यांविषयी आत्मचिंतन करण्याविषयीचा हा संकेत आहे. जाहिरात नावाचं जे सगळ्यात नवं अस्त्र ह्या जगापाशी आहे, ते अस्त्र शक्तिशाली आहे, कारण तुमची आकांक्षा काय आहे, ते तुमचं तुम्हाला कळतच नाही आहे. पण ते नेत्याला कळतं आहे. तुम्ही काही बोलायच्या आधीच तो ते सांगून मोकळा होतो, कारण जाहिरात त्याची मध्यस्थ असते. आणि हे जाहिरातीचं जाहिरात असणं आपल्याला समजलं पाहिजे. जी कला वास्तववादी असण्याचं सोंग करत नाही, आपल्यात आणि वास्तवात जी कला दरी निर्माण करते, जिथे आस्वादकाला हे उघड दिसतं, की ही कला आहे, वास्तव नाही, आणि तरीही जी वास्तवाच्या बरोबरीचीच आहे, अशी कला जेव्हा भारतात पुन्हा पूर्वीप्रमाणे निर्माण होऊ लागेल, तेव्हा हे होऊ शकेल.

यात छंदशास्त्र, काव्यशास्त्र, ललित कला, शिल्पकला वगैरेंविषयी सैद्धांतिक मांडणी आहे. उदा.
कलानां प्रवरं चित्रम् धर्मार्थ काम मोक्षादं ।
मांगल्य प्रथम् दोतद् गृहे यत्र प्रतिष्ठितम् ॥
सर्व कलांमध्ये चित्रकला श्रेष्ठ आहे. त्यातून धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते. ज्या घरात चित्रांना प्रतिष्ठा आहे, त्या घरात मांगल्य नांदतं.

किंवा आयफोन

नाट्यशास्त्रानुसार अनुकरण म्हणजे नक्कल पुरेशी नाही. रसनिष्पत्तीसाठी सृष्टीचं भावानुकीर्तन व्हायला हवं.

---

उदयन वाजपेयी हे कवी आणि लेखक आहेत; चित्रपट दिग्दर्शक मणी कौल, इतिहासकार धर्मपाल यांच्या मुलाखतींची पुस्तकं आणि भाषणात ज्या गोंड समाजातल्या प्रधानांचा उल्लेख येतो, त्यांच्याबद्दल त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. जगदीश स्वामिनाथन यांच्या चित्रांचा कॅटलॉग, तसंच श्रीकांत वर्मा आणि कृष्ण वलदेव वैद यांच्या लेखनाचं संपादनही त्यांनी केलं आहे. अनेक भारतीय आणि अभारतीय भाषांमध्ये वाजपेयींच्या लेखनाचे अनुवाद झाले आहेत.

---

हिंदी भाषणाचं भाषांतर करण्याच्या प्रक्रियेबद्दल

मला हिंदी भाषेबद्दल किंचित अढी आहे. लिपी देवनागरीच, त्यामुळे वाचायला सोपी वाटली पाहिजे. शिवाय मराठी आणि हिंदीत कितीतरी शब्द एकसारखेच आहेत. पण भाषा निराळी आहे. त्यामुळे वाचताना मराठीपेक्षा बराच जास्त त्रास होतो. मी हिंदीपासून शक्यतोवर लांब राहते. शिवाय हिंदी बोलण्याची, वाचण्याची, ऐकण्याची सवयही नाही. दिवाळी अंकासाठी, कोणीतरी काम करायला पाहिजे म्हणून मी हे काम करायला घेतलं. सुरुवातीला फक्त हिंदी भाषण ऐकून ते लिहून काढायचं, एवढंच काम करेन, असं मी म्हटलं. वाजपेयी भाषणाच्या सुरुवातीला म्हणतात, “मी एका लहान मुलीला विचारलं, “हिंदीत बोलू का इंग्लिशमध्ये?” ती म्हणाली, “हिंदीत बोला.” त्यामुळे मी हिंदीतच बोलणार आहे. तुम्हाला ते समजायला त्रास होत असेल… तर होऊ देत.” त्यांचा डांबिसपणा मला आवडला तरीही “हिंदी! का?” अशी मी कुरकूर मनात केलीच.

बॉलिवूडी सिनेमे बघून ‘मला हिंदी समजते’, असं मी म्हणून टाकते. पण वाजपेयींनी ‘हिंदी किती वेगळी, पण सुंदर आणि सोपी आहे’ याची जाणीव करून दिली.

पानभर लिहून झालं नसेल, मी प्रेमात पडले. उदयन वाजपेयी या व्यक्तीच्या प्रेमात पडले, असं हे भाषण ऐकल्यावर निश्चितच म्हणणार नाही. त्यांची जी प्रतिमा माझ्या मनात तयार झाली, त्या प्रतिमेच्या प्रेमात पडले. काय रसाळ बोलतो हा माणूस! त्यामुळे भाषणाचा एक तुकडाही सोबत दिलेला आहे.
ज्यांच्याकडे वरचा ऑडिओ चालत नसेल त्यांनी इथे क्लिक करून पाहा.

वाजपेयी ज्या अनुभूती, सांस्कृतिक संचिताबद्दल बोलतात त्याचीही अनुभूती(!) मला पुढे आली. मी भाषणातलं एकेक वाक्य ऐकून टंकत होते. भाषण किंवा मुलाखत ऐकून टंकताना बरेचदा संपादन करावं लागतं. आपण जसं बोलतो, तसंच्या तसं आणि ते सगळं लिहीत नाही. वाक्यरचना थोडी बदलते. ते बदल करताना, माझ्या डोक्यात आपसूक मराठी वाक्यं तयार होत होती. शेवटचा काही भाग तर हिंदीतून ऐकत होते आणि आपसूक मराठीत टंकत गेले.

‘ऐसी’साठीच मी बरेचदा इंग्लिशमधून मराठीत भाषांतरं केली आहेत. (याच अंकातल्या सुहास पळशीकरांच्या लेखाचंही बहुतांश भाषांतर मी केलं.) त्या कामात बरेचदा शब्द काय असतील, वाक्यरचना कशी करायची याचा विचार करावा लागतो. वाजपेयींची भाषा एवढी सोपी आहे, आणि कदाचित ज्या सांस्कृतिक संचिताबद्दल ते बोलतात, त्याच्या जवळ असलेली, खरोखरच लोकभाषा आहे, की ती हिंदी किंवा परकी भाषा न वाटता मला माझीच भाषा वाटली. (व्यक्तिगत कारणांसाठी मी याचं इंग्लिश करण्याच्या विचारात आहे. दोन परिच्छेदांचं भाषांतर करतानाच मी धापा टाकायला लागले. आणि मी स्वतःला द्विभाषिक - इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषा व्यवस्थित येतात - समजते!)

कोणाचा तरी एखादा विचार ऐकावा, त्यावर आपण चिंतन करावं आणि ते करत असतानाच त्या विचाराची अनुभूती येते; असा अनुभव मला आजपर्यंत नव्हता. किंबहुना, देव आणि दैव न मानणारी मी ‘अनुभूती’ हा शब्द स्वतःसंदर्भात कधी वापरेन असं वाटलंही नव्हतं. पण हा चमत्कार वाजपेयींनी करून दाखवला.

-- अदिती

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

भाषांतर केलं आहे असं वाटत नाही इतकं सहज सुगम आहे.
चित्रकला आवडते. प्रदर्शनं,चित्रफिती आवर्जून पाहतो. माध्यमं वेगळी असतात पण चित्रविषय, मांडणी यांमध्ये फरक पडतो तरीही काही चित्रकार बघणाय्रांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. ते असं का होतं याची कारणं सतत शोधली जातात. ती सापडली असं वाटून नवचित्रकार त्याप्रमाणे चित्रं काढतात. म्हणजे तो एक साचा /टेम्प्लेट ठरतो. जाहिरात क्षेत्रात ते यशस्वी होतातही. उदयननी बरीच उदाहरणं देऊन पटवलं आहे. आपण कधी एखाद्या टुअरिस्ट कारने जातो अन ड्राइवरचे बोलणे आवडू लागते तसं आहे. तो चांगली गाडी चालवण्याबरोबर आणखी संवाद साधतो. तसं काहिसं चित्रांचं होत असेल.
पुन्हा एकदा धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृपया पूर्ण ऑडिओ देता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला