आता परमेश्वराचे काय करायचे- भाग 1

(1979 या वर्षामधील भौतिकीसाठी दिल्या गेलेल्या नोबल पुरस्काराचा विजेता स्टीव्हन वाइनबर्ग हा माझा अत्यंत आवडता असा लेखक आहे. सैद्धांतिक भौतिकी या विषयामध्ये त्याने केलेले संशोधन हे अत्यंत महत्त्वाचे आहेच, परंतु तो अतिशय उत्तम लेखक आहे. अतिशय गहन विषयसुद्धा सोप्या भाषेत समजावून सांगण्याची त्याची हातोटी विलक्षणच म्हणावी लागेल. विश्वातील मूलकण व त्यांच्यावर कार्य करणारी बले हा त्याचा आवडीचा विषय. या विषयावर लेखन करत असताना तत्वज्ञानातील सिद्धांत दृष्टीआड करून चालणार नाही याची जाणीव असल्याने लेखन करत असताना तो मधून मधून तत्वज्ञानाकडे वळत असतो. त्याचे या विषयांवरील लेख मला विशेष रुचतात. What about God? हा त्याचा असाच एक, मला आवडलेला लेख आहे. त्याच्या मूळ कल्पनांना थोडाफार भारतीय साजश्रुंगार परिधान करावयास लावून, लेखाचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. वाचकांना तो आवडेल अशी आशा आहे.)

हे विश्व कोणी निर्माण केले असावे याचे गूढ आपल्यासारखेच आपल्या वेदकालीन पूर्वजांनाही वाटत होते. ऋग्वेदाच्या प्रारंभीच याबाबतीतील आपले कुतुहूल नासदीय सूक्तात ऋग्वेदाच्या रचनाकारांनी व्यक्त केले आहे. ते म्हणतात.

नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत्‌ ।
किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य शर्मन्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम्‌ ॥ १ ॥
न मृत्युरा॑सीद॒मृतं न तर्हि न रात्र्या॒ अह्र आसित्प्केतः ।
आनी॑दवा॒तंतं स्वधया॒ तदेकं॒ तस्माद्धा॒न्यन्न प॒रः कि च॒नास‌ ॥ २ ॥
तेव्हा ना असणे ना नसणे होते,
धूळही नव्हती, ना आकाश पल्याड
कुठे, काय आश्रय, काय आवरण होते?
होते का पाणी गहन आणि गाढ?
ना होता मृत्यू, ना अमृतत्व तेव्हा
रात्री-दिवसांचे प्रकटणे नव्हते
निर्वाताने एका स्वत:ला आणले जेव्हा,
आणिक नव्हते नाही, काहीच नव्हते.
(मराठी भाषांतर श्री धनंजय)

या कूट प्रश्नाचे मानवाला सुचलेले सहजसोपे उत्तर, ही निर्मिती परमेश्वराने केली असावी, हेच म्हणावे लागेल. पण हे विश्व म्हणजे आहे तरी काय? आणि त्याच्या दृष्य स्वरूपाचे साक्षीदार कोण आहेत? असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. आधुनिक जगातील मानवाची, विश्व म्हणजे आजुबाजूला दिसणारे दगडधोंडे, वृक्ष आणि फारतर आकाशात दिसणारा चंद्र हे इतकेच! अशी कल्पना होणे स्वाभाविक आहे. त्या मानाने आपल्या पूर्वजांना रोज आकाशात अतिशय नियमितपणे दिसणारे सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह गोल, रात्री चमचमणारे तारे हे परमेश्वराने निर्मिलेल्या व पूर्णत्वाला नेलेल्या विश्वरचनेचे साक्षीदार आहेत असे वाटत असले तरी आश्चर्य वाटावयास नको. चंद्र,सूर्य, तारे यांना आपल्या पूर्वजांनी परमेश्वराच्या रचनेचे साक्षीदार म्हणून दिलेले विशेष स्थान आता पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे. आपल्या दृष्टीने सूर्य आणि इतर तारे हे अतितप्त वायूचे गोळे आहेत. गुरुत्वाकर्षणाच्या बलाने या तार्‍यांमधील वायूचे अणू एकमेकाला धरून राहतात व या तार्‍यांच्या अंतर्भागात सतत चालू असलेल्या औष्णिक-आण्विक प्रक्रियेत निर्माण झालेल्या उषणेतेमुळे या वायूच्या गोळ्यांचे अतिसंकुचन होण्यास प्रतिबंध होतो याचे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेले असल्याने परमेश्वराच्या या अगाध रचनेचे साक्षीदार म्हणून सूर्य, चंद्र आणि तारे यांना जमिनीवर पडलेल्या दगडधोंड्यांपेक्षा फारसे काही जास्त महत्व आहे असे मानण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. परमेश्वराच्या विश्वरचनेला साक्षीदार जर कोणी असले तर ज्या नियमांनुसार परमेश्वराने या विश्वाची रचना केलेली आहे ते नियमच असले पाहिजेत आणि या नियमांचे ज्ञानच फक्त आपल्याला परमेश्वराने ही रचना कशी केली असावी हे सांगू शकेल. आपण आधी उदाहरणार्थ म्हणून घेतलेले सूर्य, चंद्र आणि तारे यांचे नियंत्रण सुद्धा या नियमांनुसार होत असले पाहिजे हे उघड आहे. म्हणूनच स्टिफन हॉकिन्ग हा जगप्रसिद्धशास्त्रज्ञ या नियमांना “परमेश्वराचे मन” म्हणून उल्लेखितो. परंतु एखाद्या शास्त्रज्ञाला असा प्रश्न विचारला की विश्वरचना भौतिकीच्या यांच नियमांनुसार का केलेली असावी? तर कदाचित त्याचे उत्तर “देवाला ठाऊक!” असेही येऊ शकेल. अल्बर्ट आइनस्टाइन याने एकदा आपला सहकारी अर्न्स्ट स्ट्राऊस याच्याकडे असे उद्गार काढले होते की “मला हे जाणून घेणे खरे आवडेल की विश्वरचना करताना परमेश्वराला निवडीचे काही स्वातंत्र्य होते का?”. दुसर्‍या एका प्रसंगी, भौतिकीमधील सिद्धान्त शोधण्यामागच्या खर्‍या हेतूबद्दल बोलताना आइनस्टाइनने हे उद्गार काढले होते. “हा हेतू सृष्टीचे स्वरूप काय आहे आणि ती आपले व्यवहार कसे चालवते हे जाणून घेणे एवढाच फक्त नसून सृष्टीचे स्वरूप हेच का आहे व दुसरे का नाही? या सध्या तरी अशक्यप्राय आणि उद्धट वाटत असलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधणे हा सुद्धाआहे”. आइनस्टाइन पुढे म्हणतो. “हा हेतू शोधत असताना शोधकाला असा अनुभव येतो की परमेश्वराला या सृष्टीची रचना सध्या आहे त्याच्या शिवाय दुसर्‍या कोणत्याच स्वरूपात करणे त्याला शक्य नव्हते”. वेदान्ताचा अभ्यासक पॉल टिलिच याने एकदा असे उद्गार काढले होते की शास्त्रज्ञांच्या समुदायामध्ये भौतिकशास्त्रज्ञच फक्त ‘परमेश्वर’ हा शब्द मनात कोणताही गोंधळ निर्माण न होता उच्चारू शकतात. त्यामुळेच तो भौतिकशास्त्रज्, स्वतःचा धर्म कोणताही असला तरी भौतिकीच्या अंतिम नियमांचा, ‘देवा‌चे मन’ असा उल्लेख सहजपणे करू शकतो.

परमेश्वर या संकल्पनेबद्दल काही मंडळींचे मत एवढे उदार आणि लवचिक असते की ते कोणत्याही गोष्टीत, जिथे ते शोधतील तिथे, त्यांना परमेश्वराचे अस्तित्व अपरिहार्य रित्या जाणवते. काही मंडळी परमेश्वर हा कोणत्याही गोष्टीचा अंतिम किंवा शेवट आहे असे धरून चालतात तर काहीं आपल्यामधील सद्‌प्रवृत्तीना परमेश्वर मानतात. काहींना परमेश्वर हे विश्वाचेच एक रूप आहे असे वाटते. अनेक अर्थ निघू शकत असलेल्या इतर शब्दांप्रमाणेच परमेश्वर या शब्दाचा कोणताही अर्थ लवणे शक्य असते. उदाहरणार्थ परमेश्वर हे शक्तीचे एक रूप आहे असे मानणार्‍या लोकांना एखाद्या कोळश्यातही परमेश्वर दिसू शकतो. शब्दांचे हे खेळ ज्या कोणाला करायचे असेल त्यांनी ते खुशाल करावेत. आपण मात्र परमेश्वर या शब्दाचा अर्थ एक स्वतंत्र अस्तित्व असा घेणार आहेत. या अस्तित्वाने विश्वनिर्मिती तर केलेलीच आहे पण त्या शिवाय प्रकृति आणि विश्व यावर नियंत्रण करणारे नियमही तयार केलेले आहेत. हे अस्तित्व आपल्यासाठी चांगले काय आणि वाईट काय याची मानके ठरवत असते आणि. आपल्या वर्तनाविषयीहे अस्तित्व काळजीही करत असते. थोडक्यात म्हणजे आपल्याला पूजनीय वाटेल असेच हे अस्तित्व असते. मानवाच्या संपूर्ण इतिहासामध्ये, अगदी आनिमानवाच्या कालापासून, या अस्तित्वालाच परमेश्वर म्हणून संबोधले गेलेले आहे. शास्त्रज्ञ सुद्धा परमेश्वर या शब्दाचा अर्थ एक निराकार किंवा अमूर्त आणि विमुक्त अस्तित्व असाच घेतात. त्यांच्यासाठी प्रकृतिचे नियम आणि परमेश्वर या गोष्टी निराळ्या असू शकत नाहीत. आइनस्टाईनने एके ठिकाणी असे म्हटले आहे. “स्पिनोझाचा परमेश्वर (स्पिनोझा हा सतराव्या शतकातील एक डच तत्ववेत्ता होता.) या विश्वात असलेल्या सर्व गोष्टींमध्ये सुव्यवस्थित सुसंवाद चालू ठेवण्यासाठी प्रगट होत असतो. मानवाचे उद्योग आणि नशीब यांच्याशी त्याचे काही सोयरसुतक नसते.” आइनस्टाईनचा युक्तिवाद पुढे नेऊन आपण सुव्यवस्थितता आणि सुसंवाद यांच्या जागी परमेश्वर हा शब्द वापरत राहिलो तरी खरे म्हणजे काहीच फरक पडणार नाही. मात्र आपल्यावर नास्तिकतेचा शिक्का बसण्याची बरीच शक्यता गृहित धरावी लागेल. ज्या कोणाला स्पिनोझाची परमेश्वराची संकल्पना वापरायची असेल त्याने ती वापरण्यास काहीच हरकत दिसत नाही. परंतु असे केल्याने परमेश्वर चुकीचा वागतो असा जरी अर्थ निघत नसला तरी त्याचे महत्व कमी होते आहे असे मात्र नक्कीच दिसून येईल.

वरील चर्चेनंतर, प्रकृतिवर नियंत्रण ठेवणार्‍या अंतिम नियमांमध्ये आपल्याला परमेश्वर सापडू शकेल का? असा प्रश्न कोणी विचारेल. परंतु मला असे वाटते की या प्रश्नातच एक मूलभूत विरोधाभास किंवा वैगुण्य आहे. एक तर आपल्याला हे अंतिम नियम अजून माहितीच झालेले नाहीत आणि या पेक्षा, त्यांच्यापेक्षा जास्त सखोल मूलभूत तत्वांवर आधारलेल्या विवरणाची आवश्यकताच भासणार नाही असे अंतिम नियम आपल्या जवळ असतील अशी कल्पनाही करणे आजमितीला अशक्य वाटते आहे. माझे असे मत आहे की प्रकृतिचे नियंत्रण करणारे हे अंतिम नियम जरी आपल्याला समजले तरी या नियमांमागे परमेश्वराचा हात आहे याच्या कोणत्याही खुणा आपल्याला सापडणार नाहीत.

आपल्या वैज्ञानिक विकासाच्या इतिहासामधील अनुभवांवरून असे दिसते की प्रकृतिचे नियंत्रण करणारे नियम कमालीचे व्यक्तिनिरपेक्ष असतात. मला तर वाटते की हे अनुभव आपल्याला या नियमांमागे परमेश्वराचा हात असावा या विचारांच्या बरोबर विरुद्ध दिशेने नेत राहिले आहेत. या मार्गावरील पहिले पाऊल कोपर्निकस् या युरोपियन शास्त्रज्ञने, पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी असणे शक्य नाही हे सांगून व अनादि कालापासून मानवाला पडलेले त्याच्या डोक्यावरील दिसणार्‍या अनंत आकाशाचे कोडे किंवा गूढ काही प्रमाणात कमी करून टाकले होते असे म्हणता येते. याच प्रकारचे अनुभव आपल्याला गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावून कोपर्निकसचा सिद्धान्त बरोबर असल्याचे दाखवून दिले होते तेंव्हा, सूर्य हा आकाशातील अनंत तार्‍यांपैकी एक आहे हा शोध ब्रूनो या शास्त्रज्ञाने लावला तेंव्हा आणि न्यूटन या शास्त्रज्ञाने गती आणि गुरुत्वाकर्षणाचे नियम जसे पृथ्वीवरील जड वस्तूंना लागू पडतात तसेच ते सूर्यमालेतील ग्रहांनाही लागू पडतात हा शोध लावला तेंव्हाही आले होते. मला तर असे वाटते की या बाबतीतील कळीचा अनुभव आपल्याला, जेंव्हा न्युटनने हे सिद्ध केले होते की पृथ्वीतलावर एखादी जड वस्तू उंचीवरून पडते तेंव्हा ती पडणारी वस्तू आणि पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र हे दोन्ही गुरुत्वाकर्षणाच्या त्याच नियमानुसारच वागतात, तेंव्हा आला होता. मागच्या शतकात अशाच प्रकारचा अनुभव आपल्याला एडविन हबल याने देवयानी नक्षत्रातील दीर्घिकेचे पृथ्वीपासूनचे अंतर मोजण्यात यश मिळवले होते तेंव्हा आला होता. त्याच्या या शोधामुळे आणि त्यावरून काढलेल्या निष्कर्षांमुळे हबल हे दाखवू शकला होता की देवयानी दीर्घिका आणि इतर नक्षत्रांमधील अशाच प्रकारच्या दीर्घिका या विश्वाच्या सर्वात बाहेरच्या कडेला असलेले तारका समूह नसून सूर्यमाला ज्या आकाशगंगा दीर्घिकेत स्थित आहे त्या आकाशगंगेप्रमाणेच स्वतंत्र आणि तितक्याच प्रभावी दीर्घिका आहेत. विश्वाचा अभ्यास करणारे आधुनिक शास्त्रज्ञ तर आता असे मानतात की आकाशगंगा विश्वात एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानावर आहे असे मानणार्‍या कोणत्याही सिद्धान्ताला विचारात घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही. या सिद्धांताला या शास्त्रज्ञांनी कोपर्निकसचा सिद्धान्त असे नाव देखिल बहाल केले आहे.

याच प्रकाराने सजीवतेचे कोडेही सोडवण्यात मानवाला काही प्रमाणात यश प्राप्त झालेले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस, सजीवतेशी संलग्न असलेल्या युरिक अ‍ॅसिड सारख्या रासायनिक पदार्थांचा प्रयोगशाळेत संयोग करणे शक्य असल्याचे जस्टुस फॉन लिबिग आणि इतर सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञांनी दाखवून दिले होते. या शिवाय याच काळात कोणतेही बाह्य मार्गदर्शन किंवा आराखडा नसताना केवळ नैसर्गिक निवडीमुळे सजीवांची उत्क्रांती होऊ शकते हे दाखवून चार्ल्स डार्विन आणि आल्फ्रेड रसेल यांनी सजीवतेचे रहस्य उलगडण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा मानता येईल असा शोध लावला होता. जैविक रसायनशास्त्र आणि आण्विक जीवशास्त्र या विषयांचा वापर करून सजीवांचे कार्य कसे चालते याचा खुलासा करण्याच्या प्रयत्नांना मागच्या शतकात मोठे यश मिळाल्याने, सजीवतेचे गुढ कमी होण्यास आणखी मदत झाली आहे.

भौतिकीमधील कोणत्याही शोधापेक्षा सजीवतेमागची गुढता कमी करण्याच्या या प्रयत्नांचा धर्माच्या बाबतीत असलेल्या आपल्या संवेदनाशीलतेवर सर्वात सखोल परिणाम झाला आहे. गणिताच्या अभ्यासात एखादे समीकरण सोडवण्यासाठी त्या समीकरणातील संख्यांचे घटक पाडून ते समीकरण सोडवणे बर्‍याच वेळा सोपे जाते. या प्रक्रियेला रिडक्शनिझम असे म्हणता येते. या प्रक्रियेचा जीवशास्त्रात वापर आणि उत्क्रान्तिवाद या दोन गोष्टींना भौतिकीतील किंवा ज्योर्तिविद्येतील कोणत्याही शोधांच्या मानाने अतिशय कडा विरोध या संवेदनशीलतेमुळे होत असल्याचे सतत आढळून येते आहे.

रसायनशास्त्र किंवा भौतिकीच्या सिद्धांतानुसार ज्याचा खुलासा करणे अजून तरी शक्य नाही असा सजीवतेमध्ये आढळून येणारा जिवंतपणाचा गुण, हा कोणत्या तरी एका अभौतिक तत्वामुळे निर्माण होतो असे अजूनही क्वचित मानले जाते. सध्याच्या काळात जीवशास्त्रज्ञ (रिडक्शनिझम प्रक्रियेला विरोध असणारे जीवशास्त्रज्ञ सुद्धा) जिवंतपणा या गुणाचा खुलासा करण्याच्या प्रयत्नात पडत नाहीत. परंतु अगदी पन्नास वर्षांपूर्वी सुद्धा (1944 मध्ये) एरविन श्रोडिन्जर सारख्या शास्त्रज्ञाने आपल्या “सजीवता म्हणजे काय?” या पुस्तकात असे म्हटले होते की “सजीवांच्या शारिरिक संरचनेबद्दल असलेले आपले ज्ञान त्यांच्यातील जिवंतपणाचे रहस्य उलगडून दाखवू शकत नाहीत”. याचे कारण त्याने असे दिले होते. “आनुवंशिक ज्ञानामुळे स्थिरता प्राप्त झालेल्या सजीवतेचा खुलासा, अस्थिरतेचे विवरण करणारी क्वांटम यांत्रिकी किंवा सांख्यिय यांत्रिकी ही शास्त्रे करू शकत नाहीत”. आपल्या रक्तात आढळणार्‍या हेमोग्लोबिन या घटकाच्या रचनेवर संशोधन करणारा आण्विक जीवशास्त्रज्ञ, मॅक्स पेरुट्झ याने श्रोडिन्जरच्या विधानातील चूक दर्शवून दिली आहे. तो म्हणतो की “श्रोडिन्जरने रासायनिक प्रक्रियांमध्ये एन्झाइमचा वापर केल्यामुळे जी स्थिरता निर्माण होते त्याचा विचारच केलेला नाही”.

क्रमश:

15 मार्च 2018

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख छान जमला आहे. या पहिल्या भागातील प्रतिपादनाशी दुमत होण्याचे काहीच कारण दिसत नाही.
' सजीवता' या बद्दल पुढील लेखात काय विवेचन येते ते पाहाणे रोचक ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो. लेख छान आहे. पुढील भागात काय येतंय त्याची वाट पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नमस्कार चन्द्रशेखरजी. ३ वर्षांनंतर परत येथे दिसलात त्यामुळे बरे वाटले. पुनरागमनाचे स्वागत.

लेखामधील विचारांच्या विषयी अजून काही लिहावे असे मजजवळ काही नाही हे प्रांजळपणे मान्य करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिहा पुढचा भाग.
रेडियो अॅक्टिव कण एकत्रित असताना किती कणांनी किती काळात फुटायचे यावरचे एकमत कसे होते हेसुद्धा कळत नाही.
सजिवांतला प्राण समजलाच नाही. प्रत्येकाचं आयुष्य आणि मर्यादा कुणी ठरवली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आइनस्टाईनचा युक्तिवाद पुढे नेऊन आपण सुव्यवस्थितता आणि सुसंवाद यांच्या जागी परमेश्वर हा शब्द वापरत राहिलो तरी खरे म्हणजे काहीच फरक पडणार नाही. मात्र आपल्यावर नास्तिकतेचा शिक्का बसण्याची बरीच शक्यता गृहित धरावी लागेल.

वाक्यात काही गडबड वाटतीय का? नास्तिकतेच्य ऐवजी अस्तिकतेचा शिक्का असे आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

वाइनबर्गचा मूळ इंग्लिश मजकूर याप्रमाणे आहे.
Einstein once said that he believed in “Spinoza’s God who reveals Himself in the orderly harmony of what exists, not in God who concerns himself with fates and actions of human beings”. But what possible difference does it make to anyone if we use the word “God” in place of “Order” and or “harmony,” except perhaps to avoid the accusation of having no God.
माझ्या मताने मी अनुवाद बरोबर केलेला आहे. परंतु त्यातून दुसराच विरूद्ध अर्थ निघतो आहे असे वाटत असल्यास अर्थातच चूक माझीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवही विश्वनियमानी बद्ध आहेत अस मानायला भारतीय मनाला अडचण येत नसावी, त्यामुळे अनुवाद योग्य वाटला तरी ते अनुवादित वाक्य चुकीच वाटतय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाइनबर्गचा मूळ मजकूर उद्धृत केल्यावर सुद्धा त्याचा मी केलेला अनुवाद श्री अंतराआनंद यांना चुकीचा वाटतो आहे. त्यामुळे जास्त खोलात जाऊन खुलासा करण्याची गरज आहे असे दिसते. परमेश्वर या संकल्पनेवर विश्वास ठेवल्यानंतर या संकल्पनेचे कार्यक्षेत्र काय? असा प्रश्न निर्माण होतो. परमेश्वराच्या कार्यक्षेत्राची दोन भागात साधारण विभागणी करता येईल.
1. त्यानेच निर्माण केलेल्या या विश्वात असलेल्या सर्व गोष्टींमध्ये सुव्यवस्थित सुसंवाद चालू ठेवणे
2. त्यानेच निर्माण केलेले सजीव आणि मुख्यत्वे त्यातील मानवजातीचे उद्योग आणि नशीब यांची काळजी घेणे व मानवांचे भले कसे होईल याची सतत दक्षता घेत राहणे व त्यासाठी आवश्यक अशी पावले उचलणे.
आइनस्टाइनला आवडलेला स्पिनोझाचा परमेश्वर हा या दोन विभागांच्या पैकी फक्त पहिल्या विभागातचच कार्यरत असतो. मानवाचे उद्योग आणि नशीब यांच्याशी त्याचे काही सोयरसुतक नसते. यामुळे आपण स्पिनोझाचा परमेश्वर जर आपलासा करणार असलो तर अर्थातच आपल्याला हे मान्य करावे लागेल की मानवाच्या कल्याणासाठी तो काहीच करत नाही व त्यात त्याला रुचीसुद्धा नाही, तो फक्त विश्वात सुव्यवस्थित सुसंवाद चालू ठेवण्यात मग्न असतो. परमेश्वराच्या पारंपारिक संकल्पनेवर विश्वास ठेवणार्‍या लोकांना ही गोष्ट साहजिकच न पटणारी असल्याने त्यांना स्पिनोझाच्या परमेश्वराला मानणारे लोक नास्तिक वाटत असले तर नवल नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देव मानणाय्रा लोकांना "या देवाचं काय करायचं " असा प्रश्न पडू शकतो. न मानणाय्रांना नसलेले प्रश्न सतावत नाहीत.
आपल्या समजण्याच्या कुवतीवर मर्यादा घातली गेली आहेच शिवाय जगाच्या घडीला विस्कटण्याची चळवळही अपुरी पडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गणपती अथर्वशीर्षामध्ये रूतम वच्मि सत्यम वच्मि असा उल्लेख आहे. त्यातील ऋत म्हणजे हे सर्व नियम ज्याच्या आधारे हे जग चालते. हे सर्व नसताना सुद्धा जे होते ते सत्य. हे सत्य ज्यातून उत्पन्न होते आणि लयास जाते त्याला परमेश्वर म्हणावे का ? शेवटी ओशो म्हणतो तेच खरे. known ,unknown and unknowable . असे हे ज्ञान असते. काही गोष्टी आपल्याला कधीच समजणार नाहीत . आपला लेख सुंदर झाला आहे. अभिनंदन. पुढचा भाग येऊ द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेख आहे. पुढील भाग वाचायला उत्सुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला लेख.

देव मानणाऱ्यांच्या वाट्याला मी फार कधी जात नाही. पण तरीही 'हे विश्व देवाने निर्माण केले' असे म्हटले तर मग देवाला कोणी निर्माण केले हा प्रश्न पडतोच.

(आजचे वजन ४९३२ किलो असलेला) महाकाय हत्ती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ इंग्रजीतला लेख कुठे वाचायला मिळेल?

एक छोटासा टेक्निकल मुद्दा - "आपल्या वेदकालीन पूर्वजांनाही" याऐवजी "वेदकालीन लोकांनीही" असे लिहिले पाहिजे असे मला वाटते.

कारण "आपल्या" म्हणजे कोणाच्या ? भारतीय लोक का जगातले सगळे लोक? जर जगातल्या सगळ्या लोकांसाठी हे वाक्य लिहिले असेल, तर मग "आपल्या" असे लिहिण्याची गरज नाही.

दुसरी शक्यता म्हणजे - हे श्लोक रचणाऱ्या लोकांना मुले नसतील तर मग ते कोणाचेच "पूर्वज" असणार नाहीत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ इंग्रजीतील लेख तुम्हाला
Dreams of a Final Theory by Steven Weinberg
या पुस्तकात वाचता येईल.
“आपल्या” म्हणजे भारतीयांच्या. मी स्वत:ला भारतीय समजत असल्याने मी भारतीयांना आपले असे संबोधतो. श्री प्रणव हे भारतीयांना आपले मानत नसतील तर त्यांनी “आपल्या” ऐवजी “भारतीय” असे वाचल्यास माझी काहीच हरकत नाही.

पूर्वज या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. त्यापैकी या ठिकाणी ancient, primaeval, किंवा born or produced before or formerly, former या अर्थाने हा शब्द वापरला आहे. ते आपल्या मागच्या पिढीतील, an ancestor, forefather, या अर्थाने वापरलेला नाही. त्यामुळे त्यांना मुले नसतील तर काय होईल हा मुद्दा गैरलागू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0