एका लेखकूची दिवाळी

एका लेखकूची दिवाळी

मे महिना उजाडला, हवा गरम व्हायला लागली, आणि एके दिवशी लेखकूला जाग आली. तो सवयीप्रमाणं लगेच स्वयंपाकघरात गेला.

“थांबा जरा. पोहे होतायत अजून. लगेच उठल्याउठल्या ‘खायला दे’ म्हणून घाई करू नका,” लेखकूपत्नी म्हणाली.

पण लेखकूला त्यावेळी पोह्यांची भूक नव्हती, हे त्याच्या अजाण आणि असाहित्यिक पत्नीला काय कळणार? त्यानं तडक जाऊन सासरेबुवांनी मागच्या दिवाळीत भेट दिलेल्या फ्रीजला लावलेलं कॅलेंडर उघडलं आणि गब्बरसिंगसारखा प्रश्न फेकला,” दिवाळी कधी आहे? कधी आहे दिवाळी?”

लेखकूपत्नीनं या प्रश्नाकडं दुर्लक्ष केलं आणि लिंबू काढण्यासाठी फ्रीजचा दरवाजा उघडला. तो दरवाजा कॅलेंडरमध्ये डोळे घुसवलेल्या लेखकूच्या डोक्यावर जाऊन आपटला, पण त्याच्या मेंदूला आलेल्या झिणझिण्या फक्त त्यामुळं नव्हत्या. ७ नोव्हेंबरला दिवाळी, म्हणजे त्याच्याकडं दिवाळी अंकांसाठी लिहायला फक्त चारेक महिनेच होते! तो तसाच उलटपावली अभ्यासिकेत गेला, टेबलखुर्चीशी बसला आणि त्यानं कोरे ताव समोर ओढून लिहायला सुरुवात केली.

पुढचे कित्येक दिवस लेखकू नेमानं लिहीत सुटला होता. साहित्याच्या कुरणात त्याची प्रतिभा माजलेला वळू उधळावा तशी उधळली होती. त्या दिवसांत कुठलाही साहित्यप्रकार लेखकूच्या लेखणीला वर्ज्य नव्हता. मग ती भले नियतीनं मांडलेला खेळ आणि त्याला मानवानं दिलेला प्रतिसाद यांचं मूलगामी परस्परद्वंद्व दाखवणारी नवकथा असो, भावनांचा अबोधगूढ आणि भावतरल आलेख चितारणारी कविता असो किंवा हलक्याफुलक्या शैलीत जीवनातील विसंगतीवर भेदक भाष्य करणारं ललित असो, लेखकूची लेखणी हे सगळे गड लीलया सर करून येत होती. आयुष्यभर स्वत:च्या तालुक्याबाहेरही कधी पाऊल न टाकलेला लेखकू गूगल मॅप्स आणि विकिपीडियाच्या मदतीनं आपल्या कथांसाठी नागालँडपासून ग्रीनलँडपर्यंतची पार्श्वभूमी हा हा म्हणता उभी करत होता. याशिवाय याच गूगल आणि विकिपीडियाचा आधार घेऊन, झालंच तर नेटफ्लिक्स आणि अमेझॉनवरच्या अनेक डॉक्युमेंटऱ्या बघून तो बरेच अभ्यासपर आणि विद्वत्ताप्रचुर लेखही पाडत होता. मग लेखाचा विषय ‘आदिमानवाच्या गुहेतील सौंदर्यस्थळांची नवआधुनिक चिकित्सा’ असो किंवा ‘व्हेनेझुएलामधील तेलांचे साठे: काल, आज आणि उद्या’, लेखकू न घाबरता बाह्या सरसावून लेख लिहायला बसत होता. त्यानं लिहिलेल्या विषयांची यादी आता ‘वाढता वाढता वाढे’ असं करत शून्यमंडळाला भेदू पहात होती. तो या लेखनयज्ञात गुंतल्यामुळं सध्या त्याच्या शय्यागृहातला ‘विषय’ शून्यावर आला होता, पण त्याचीही त्याला पर्वा नव्हती.

अर्थात लेखकूला हे माहित होतं की नुसतं लिहून काही होणार नाही, ते छापणारे आणि वाचणारे लोक हवेत. मग त्यानं त्यासाठीही कंबर कसली. सर्वप्रथम त्यानं फेसबुकवरची आपली ऍक्टिव्हिटी वाढवली. मराठी साहित्याची उन्नती करण्याच्या उदात्त इ. हेतूनं सुरु करण्यात आलेले बरेच फेसबुक ग्रूप्स त्यानं धपाधप जॉईन केले. त्यांतल्या लिहिणावाचणाऱ्या लोकांची पोस्ट्स वाचून, त्यांच्या फ्रेन्डलिस्टसमध्ये बुडी मारून त्यानं बरीच खुफिया तहकीकात केली आणि अनेक लेखकांची, प्रकाशकांची नावं गोळा केली. मग तो सटासट या सगळ्यांना फ्रेन्ड रिक्वेस्ट्स पाठवत सुटला. लवकरच त्याची फ्रेन्डलिस्ट त्याच्या मेहुणीनं सोडा घालून केलेला चिकनचा रस्सा खाऊन त्याचं पोट जसं फुगतं तशी फुगली. मग यातले कोण कुठल्या कंपूत आहेत, कुणाची वट कुठं जास्त आहे, कुणाला कुठल्या प्रकारचं साहित्य आवडतं या सगळ्याचा त्यानं बारकाईनं अभ्यास केला . या लोकांच्या प्रत्येक पोस्टवर, मग ते कितीही फालतू का असेना, त्यानं न चुकता कॉमेंट किंवा गेला बाजार ‘लाईक’ तरी ठोकायला सुरुवात केली. ‘लाईक के बदले लाईक’ आणि ‘कॉमेंट के बदले कॉमेंट’ या न्यायानं हे लोक आपल्या पोस्ट्सनाही प्रतिसाद देतील असा लेखकूचा हिशेब होता.

जसाजसा एकेक लेख लिहून होईल तसातसा लेखकू तो संपादकांना पाठवू लागला. संपादकांनी तो स्वीकारला की खूष होऊ लागला, नाही स्वीकारला तरी धीर न सोडता दुसऱ्या संपादकांना पाठवू लागला. असं करता करता जेव्हा त्याला दिवाळीत आपलं कुठंकुठं कायकाय छापून येणार आहे याचा अंदाज आला, तेव्हा त्यानं आपल्या संप्रदायातल्या भेटतील त्या लोकांना “यावेळी तुमचे किती?’ असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. जर समोरच्याचा आकडा लेखकूपेक्षा कमी असेल तर लेखकू नसलेल्या मिशीला मनातल्या मनात पीळ भरू लागला. जर आकडा जास्त असेल तर ‘लेखनाचा दर्जा टिकवला पाहिजे, नुसता रतीब काय कामाचा?’ असं म्हणून स्वत:चं समाधान करू लागला. एका लेकुरवाळ्या गृहस्थांना चुकून लेखक समजून त्यानं ‘तुमचे किती?’ असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी ‘आमचे चार, आणि पाचवं या दिवाळीत येऊ घातलंय’ असं त्यांच्या बायकोच्या गरगरीत पोटाकडं हात दाखवत उत्तर दिलं, आणि वर त्यालाच उलट ‘ तुमचा पहिल्याचा कधी विचार? फार उशीर करू नका, आता काही तरुण नाही राहिला तुम्ही!” असा प्रश्न-कम-सल्ला दिला. त्यांनी साहित्यनिर्मिती आणि मानवनिर्मितीची अशी गल्लत केलेली बघून लेखकू उखडला. घरी जाऊन त्यानं ‘साहित्यसर्जनातल्या प्रसववेदना’ यावर विचारपरिप्लुत का काय म्हणतात तसा एक लेख खरडला आणि एका ऑनलाईन दिवाळी अंकाच्या उशिरा जाग्या झालेल्या संपादकाला पाठवला, तेव्हा कुठं त्याचा आत्मा शांत झाला.

आणि म्हणता म्हणता दिवाळी काही दिवसांवर आली. लेखकूचे लेख, कथा, कविता वगैरे असलेले दिवाळी अंक बाजारात येऊ लागले. त्या काही दिवसांत तर लेखकूचा उत्साह अगदी शिगेला पोचला होता. आपल्या प्रत्येक प्रसिद्धीची माहिती त्यानं त्वरेनं फेसबुकवर पोस्ट केली. ती करताना संपादकापासून ते त्या अंकाची छपाई ज्या प्रेसमध्ये झाली त्याच्या मालकापर्यंत सगळ्यांना त्यानं टॅग केलं. आलेल्या प्रत्येक कॉमेंटला त्वरित उत्तर दिलं. प्रत्येक पोस्ट लोकांच्या फीडमध्ये दिसत राहावी म्हणून दोनतीन दिवस थांबून त्यावर पुन्हा नव्याने कॉमेंट्स टाकल्या. अशा प्रकारे त्यानं स्वत:वर भरपूर कॉमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडून घेतला. आता या दिवाळीत साहित्यनगरीमध्ये आपण चैतन्याचे पलिते पेटवणार आहोत याची खात्री पटल्यावरच त्यानं चकलीचा पहिला तुकडा मोडला.

दिवाळी पार पडली पण लेखकूला त्याचं लेखन वाचलेल्या लोकांचे फारसे संदेश वगैरे आले नाहीत. लोक दिवाळी साजरी करण्यात मग्न असतील अशी त्यानं स्वतःची समजूत घालून घेतली. दिवाळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी लेखकू कामावर जायला बाहेर पडला (होय, त्याला अजूनही दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यासाठी कुठं तरी खर्डेघाशी करावी लागायची - हाय ये जालीम दुनिया!). वाटेत कुणीतरी भेटेल, अभिनंदन करेल, कुणी सांगावं-कदाचित स्वाक्षरी मागेल, अशी त्याची सुप्त अपेक्षा होती. पण बाहेरचं जग आपल्याच नादात होतं. साक्षात एक शब्दप्रभू रस्त्यातून चाललाय याची कुणी साधी नोंदही घेतली नाही. नाही म्हणायला लेखकूचा एक खूप जुना मित्र त्याला बघताच उत्साहानं हात हलवत रस्ता ओलांडून त्याच्याकडं आला. लेखकूही क्षणभर खूष झाला, पण त्या मित्रानं काही त्याचं लेखनबिखन वाचलं नव्हतं, त्याला फक्त सिगारेटचं पाकीट घ्यायला उसने पैसे हवे होते. लेखकू चरफडला. पण धीर न सोडता तो कामावर गेला. ऑफिसमधल्या कॉमन रूममध्ये त्यानं काही दिवाळी अंकांच्या प्रती ठेवल्या. आणि थोड्या वेळानं बघतो तर काय- चक्क ह्युमन रिसोर्समधली नयना तिथं उभी राहून एक प्रत चाळत होती. ऑफिसमधल्या अनेकांसारखीच त्यालाही नयना आवडायची- दिसायला सुंदर, स्टायलिश, त्याच्यासाठी ‘आऊट ऑफ लीग’ असलेली. यापूर्वी एकदोनदा त्यानं तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता, पण ती समोर आली की त्याच्या तोंडून फक्त त्याच्याच एका कवितेसारखी दुर्बोध आणि अनाकलनीय घरघर बाहेर यायची. पण ‘आजची संधी दवडायची नाही’ असं त्यानं ठरवलं आणि तो तिच्यापाशी गेला.

“मीच इथं ही कॉपी ठेवली होती. या अंकात माझा एक लेख आला आहे,” तो म्हणाला.

तिनं मान उचलून त्याच्याकडं पाहिलं. तिच्या नावाला साजेलशा त्या टपोऱ्या डोळ्यांत बघताना लेखकू स्वतःला विसरून गेला. आपल्या हृदयाला गुदगुल्या होतायत असं त्याला वाटलं (नंतर त्याला लक्षात आलं की शर्टाच्या खिशात व्हायब्रेट मोड वर असलेला त्याचा फोन तेव्हा वाजत होता, पण ते जाऊ दे!).

“मी ही कॉपी एक मिनिट घेऊन जाऊ? लगेच परत आणून ठेवते,” पैंजणांसारख्या मधुर आवाजात ती म्हणाली.

लेखकूला स्वर्ग ठेंगणा झाला, “ म्हणजे काय? नक्कीच! माझा लेख पान नंबर ८७ वर आहे…”

“नाही, मला लेख वगैरे बोर होतात. या अंकात ना, एका ज्वेलरी स्टोअरमधल्या नवीन कलेक्शनची जाहिरात आली आहे, त्या स्टोअरचं नाव आणि नंबर मला लिहून घ्यायचे होते,” असं म्हणून नयना अंक घेऊन तिच्या डेस्ककडं निघून गेली. लेखकू स्वर्गातून धाडकन जमिनीवर आदळला.

ऑफिसमधून घरी जाताना लेखकूला त्याच्या एका मित्राचा कॉल आला.

“अरे, तुझी गोष्ट वाचली दिवाळी अंकात आज! हसून हसून पडलो लेका!”

लेखकू खूष झाला. “थँक्यू, थँक्यू! नक्की कुठली गोष्ट वाचलीस?”

“अरे ती ‘नारंगी पारंबी’ च्या दिवाळी अंकातली रे! कसलं विनोदी लिहिलंयस तू!”

नारंगी पारंबी? त्यात तर त्यानं ‘निओ- नुवार’ शैलीतली ‘रात्रीतली शीळ’ नावाची डार्क रहस्यकथा लिहिली होती. ती याला विनोदी वाटली?

तो मित्र बोलतच होता,” कथेवरचा फोटो पाहिला, किती सुटलायस लेका! काय खातोस तरी काय?”

पुढचं बोलणं लेखकूनं ऐकलं नाही. तो खिन्न मन:स्थितीत घरी आला, आणि त्याला एकदम आठवलं. एका संपादकानं उदार होऊन त्याला अंकाच्या दोन प्रती पाठवायचं कबूल केलं होतं, त्यातली एक प्रत त्यानं त्याच्या आईबाबांच्या पत्त्यावर पाठवायला सांगितलं होतं. बाकी कुणाला नाही, तर जन्मदात्यांना तरी आपलं कौतुक नक्कीच असेल या खात्रीनं त्यानं आईला फोन लावला.

“आई, अंक मिळाला का? त्यातली माझी कथा वाचली का? अगं तुला नक्की आवडेल. त्यात आपल्या गावच्या नारळीपोफळी, सागरतीर वगैरे सगळं…” ‘घुसडलंय’ म्हणता म्हणता लेखकू थांबला आणि म्हणाला,” घातलंय. शिवाय त्यातल्या खाष्ट सासूचं पात्र जगताप काकूंवर बेतलंय,” गावातल्या जगताप काकू आणि त्याची आई यांचा छत्तीसचा आकडा होता. त्यामुळं हे कळल्यावर आई गोष्ट नक्कीच वाचेल याची त्याला खात्री होती.

“काय म्हणालास? हो, अंक आजच मिळाला!,” आई काहीतरी काम करता करता म्हणाली, “ आणि काय रे? तुझ्या त्या मेल्या संपादकाला कागद जरा जाड वापरायला सांग की रे! किती पैसे वाचवशील म्हणावं!”

“म्हणजे तू अंक उघडून बघितलाससुद्धा? माझी कथा वाचलीस?” लेखकूच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

“नाही रे. वाचायला वेळ कुणाला आहे इथं? दुपारी तुझी मुंबईची आत्या घरी आली होती. तिला फराळ बांधून द्यायचा होता. चकल्यांचं तेल पिशवीला लागू नये म्हणून थोडे कागद हवे होते आणि दुसरं काही हाताशी नव्हतं. समोर तुझा अंक पडला होता म्हणून त्याचेच कागद वापरावे म्हणलं, तर ते किती पातळ! निम्मा अंक त्यातच खर्ची पडला!” लेखकूमाता अगदी आरामात हे सगळं सांगत होती.

आपली कथा असलेल्या दिवाळी अंकाचे कागद आईनं चकल्या बांधायला वापरले? लेखकूच्या दिवाळीतील साहित्यसेवेच्या शवपेटिकेतला हा शेवटचा खिळा होता. तो तसाच खिन्नपणे खुर्चीत बसून राहिला. पत्नीनं समोर आणून ठेवलेल्या चहाच्या कपाला त्यानं तोंडही लावलं नाही.

अचानक त्याला खूप हुडहुडी भरून आली. तो काकडतच पत्नीला म्हणाला,” थंडी वाजतेय गं!”

पत्नी म्हणाली,” मग आत जाऊन झोपा. बरं वाटल्यावर उठा.” तिची आज्ञा प्रमाण मानून तो बेडरूममध्ये गेला आणि चादर पांघरून गुडूप झोपून गेला.

हिवाळ्यात बेडूक घेतात तशी लेखकूसुद्धा आता शीतकालसमाधी घेणार होता. आणि उठणार होता एकदम पुढच्या वर्षीच्या मे मध्ये, पुन्हा एकदा दिवाळीची बेगमी करण्यासाठी!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अय्या, लेखकुच्या घरात शय्यागृह आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर लिहा लेखकू, पत्नीला चकल्या बांधण्यासाठी डबे वापरावे लागतील ... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भन्नाट लिहिलं आहे. 'प्रधानांचं घर' आणि 'लेखूकची दिवाळी' एकाच लेखकानं लिहावं यावरून भ्रमर यांच्या लेखनाची व्याप्ती कळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफक मजा आली. म्हणजे ही कॉम्प्लिमेन्टच (स्तुती) आहे. मजा आली. पण माफक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0