१९२७ पॅरिस | गतशतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरचं हॉटेलजीवन

१९२७ पॅरिस | गतशतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरचं हॉटेलजीवन

काळ उघडा करणारी पुस्तकं । लेखांक पहिला

Down and Out in Paris and London

by George Orwell

Originally published: 9 January 1933 | Genre: Memoir | http://gutenberg.net.au/ebooks01/0100171h.html

ललित साहित्याचं वाचन ही तशी अभिजनांची आवड आहे. त्यातही मध्यमवर्गाची. पुस्तकवाचनाशी संबंधित शब्दप्रयोगही मध्यमवर्गालाच फिट्ट बसतात. उदा० 'curling up with a good book' म्हटल्यावर सौ० मे० डो० ट्रम्प व्हाईट हौसाच्या एखाद्या उबदार कोपऱ्यात दुलई लपेटून पुस्तक वाचत बसल्याचं चित्र डोळ्यांसमोर येत नाही. तसंच, 'पावसाळी हवा, वाफाळती कॉफी आणि कवितासंग्रह' हे नवफेसबुकी नवप्रौढेचं नवफुलपाखरी नवस्वप्न वाटतं, सौ० अंबानींचं नव्हे.

अभिजनांच्या या छंदात गरिबीचं चित्रण येणं तसं अवघडच. आलं तरी ते परानुभवी, परप्रकाशित असतं. स्वानुभवातून आलेलं सहसा सापडत नाही. जे चित्रण येतं, तेही वाचक अभिजन-मध्यमवर्गाला डोळ्यांसमोर ठेवून केलेलं करुणेचे कढ आणणारं, आणि त्याच वेळी "बरं, आपल्या वाट्याला असे भोग आले नाहीत!" असं चोरटं समाधान अभिजन-मध्यमवर्गाला देणारं.

हे आडमाप सरसकटीकरण आहे याची कल्पना आहे. या विधानांना अपवाद म्हणून कोणी वेगवेगळी पुस्तकं दाखवू शकतील. ही चर्चा अशाच एका पुस्तकाबद्दल आहे. आणि नाहीही.

***

विसाव्या शतकातलं दुसरं दशक. पहिलं महायुद्ध संपलं होतं, दुसऱ्या महायुद्धाला दहा वर्षं अवकाश होता. पराभूत जर्मनी सोडली तर अन्य युरोपीय देशांतला हा शांततेचा, चैनीचा काळ. विशेषतः फ्रान्समध्ये या काळात उदारमतवादी सरकार होतं. कलाप्रांतात क्युबिझम, 'जॅझ युग' अवतरलं होतं. अन्य युरोपीय देशांतले कलाकार पॅरिसकडे ओढले जात होते. इंग्लंडसारख्या देशामध्ये शुचितेच्या कर्मठ कल्पना असलेला व्हिक्टोरीयन काळ होता. परिणामी सेन्सॉरशिपचे नियम कडक होते. अशा स्थितीत कलाप्रांतात नवं काही करू इच्छिणाऱ्या लोकांना पॅरिसची भुरळ पडणं स्वाभाविक होतं. अन्य चलनांच्या मानाने फ्रँक (फ्रान्सचं तत्कालीन चलन) अशक्त होता, त्यामुळे या पाहुण्या कलाकारांना कमी पैशांत राहणं परवडे. पण सर्वात मोठं आकर्षण असतं समानशीलांचं - हेमिंग्वे, जेम्स जॉईस, पिकासो असे अनेक कलाकार या काळात पॅरिसमध्ये तळ ठोकून होते.

त्यातच एक होता एरिक आर्थर ब्लेअर. भारतीय वसाहतींशी संबंध आल्याने अनेक ब्रिटिश कुटुंबांचं सामाजिक उत्थान होऊन ते उच्चमध्यमवर्गात प्रवेश करते झाले होते. अशाच एका कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. वडील भारत-ब्रह्मदेशात सरकारी सेवेत होते, आणि मुलांना ब्रिटिश पब्लिक स्कूलचं शिक्षण मिळावं म्हणून एरिकची आई मुलांसह इंग्लंडला परतली. शालेय जीवनातच लेखक होण्याचा किडा एरिकला चावला. पण कमी मार्कांमुळे स्कॉलरशिप मिळाली नाही, आणि पैशाच्या अभावामुळे ऑक्सफर्ड-केम्ब्रिजसारख्या विद्यापीठांत प्रवेश मिळवणं एरिकाला शक्य नव्हतं. मग वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्याने वसाहतींत स्वतःचं नशीब आजमावायचं ठरवलं. एरिक 'बर्मा पोलीस'मध्ये भरती झाला.

लेखनाचा किडा पाठ सोडेना. ब्रह्मदेशात एरिक रमला नाही. इंग्लंडला परतला, आणि कुटुंबापासून दूर लंडनमध्ये एकटाच राहायला लागला. त्याला छानछोकीमध्ये, आरामशीर आयुष्यात रस नव्हता. परीटघडीच्या ड्यूकच्या, तुपाळ डचेसच्या, आणि त्यांच्या 'लीन बटलर'च्या गोष्टी त्याला लिहायच्या नव्हत्या. आपल्या समकालीन लेखकांत वावरावं, त्यांच्याशी दोस्ती वाढवून त्या कंपूत प्रवेश मिळवावा, असंही त्याला करायचं नव्हतं. दारिद्र्याने ग्रासलेल्या सामान्य माणसाचं जिणं त्याला कागदावर आणायचं होतं. 'दारिद्र्य म्हणजे नक्की काय?' हे त्याला प्रत्यक्ष कार्यानुभवातून, स्वानुभवातून मांडायचं होतं.

आपलं उच्चमध्यमवर्गीय आयुष्य सोडून तो स्वेच्छेने रस्त्यावर आला. प्रथम लंडनच्या, आणि त्यानंतर फेब्रुवारी १९२८मध्ये, पॅरिसच्या.

***

पॅरिस अनेक गोष्टींसाठी आजही प्रसिद्ध आहे. त्यातली एक गोष्ट म्हणजे पॅरिसमधली हॉटेलं, कॅफे, ब्रासरीज आणि रेस्टोरंटस. बिल भागवायला पैसे नव्हते म्हणून नेपोलियनने आपली हॅट एका रेस्टोरंटमध्ये गिरवी ठेवली होती.

पण हॉटेलात आलेल्या पाहुण्याला जे दिसतं, किंवा जे दाखवलं जातं, ते पूर्ण चित्र नव्हे. हॉटेलच्या आतलं, कर्मचाऱ्यंचं हॉटेल संपूर्ण वेगळं असतं. त्या जगाचं दर्शन घडवणारी काही पुस्तकं आहेत. मराठीत प्रिया तेंडुलकरांनी लिहिलेलं 'पंचतारांकित'. इंग्रजीमध्ये आर्थर हेलीने लिहिलेलं 'हॉटेल' ही चटकन आठवलेली उदाहरणं. दोन्ही पुस्तकं अतिशय वाचनीय, आणि 'आत काय चालतं?' हे कुतूहल शमवणारी आहेत.

पॅरिसमध्ये पोचलेला आपला एरिक आर्थर ब्लेअर एका स्वस्त लॉजमध्ये राहायला लागला. काही दिवसांनी लॉजच्या खोलीवर आणलेल्या एका वेश्येने त्याच्याकडचे पैसे लुटले. एरिकची अन्नान्न दशा झाली. त्याला आपले कपडे विकावे लागले. एवढं करूनही उपासमारी व्हायची वेळ आली. शेवटी एका मित्राच्या ओळखीने एका हॉटेलात 'मोरीवाला' ('un plongeur dans un restaurant') म्हणून नोकरी मिळाली. (मोरीवाला म्हणजे भांडीघाश्या, आणि हॉटेलच्या भटारखान्यात पडेल ते काम करणारा हरकाम्या. हॉटेलव्यवसायात हा पेशानिदर्शक शब्द रुळलेला आहे. विविध मराठी वर्तमानपत्रात येणाऱ्या 'छोट्या जाहिरातीं'त 'मोरीवाला पाहिजे' अशी जाहिरात असतेच असते.) आपल्या अनुभवकथनात एरिकने आपल्या मोरीवाल्याच्या अनुभवाबद्दल, आणि एकंदर हॉटेल-आयुष्याबद्दलच, तपशिलात लिहिलं आहे. १९२८-२९ सालात पॅरिसमधली सुप्रसिद्ध हॉटेलं कशी चालायची हे कळण्यासाठी त्या लेखनातल्या एका भागाचा अनुवाद (निळ्या ठशात) करत आहे. तळटिपा अर्थातच माझ्या आहेत.

***

काही दिवसांतच मला हॉटेल कसं चालतं याची कल्पना आली. हॉटेलच्या बाह्य भागात, म्हणजे जिथे पाहुण्यांचा वावर असतो त्या 'गेस्ट एरिया'त, सगळं काही शिस्तशीर, सुरळीत, शांत असतं. पण त्याचा हॉटेलच्या अंतर्भागात, म्हणजे कर्मचारी वावरतात त्या 'सर्व्हिस एरिया'त कर्कश आवाज, गडबड, गोंधळ असतो. शिस्तशीर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांच्या तुलनेत हॉटेलांचा सर्व्हिस एरिया बेशिस्त आणि अजागळ वाटतो. हॉटेलांतलं काम तसं सोपं असतं, पण ते ठरावीक वेळेला आणि ठरावीक वेळेतच करायला लागतं. ते अगोदरपासून 'करून ठेवता' येत नाही. उदाहरणार्थ, जेवणाच्या दोन तास आधी स्टेक ग्रिल करून चालत नाही. तो गार आणि वातड होईल. तो ग्राहकाला द्यायच्या काही मिनिटं अगोदरच ग्रिल करावा लागतो. त्या-त्या वेळेलाच करायची अशी अनेक कामं साठत जातात, आणि मरणाच्या घाईने ती करावी लागतात. परिणामतः जेवणाच्या वेळेला हॉटेलातला प्रत्येक कर्मचारी किमान दोन लोकांचं काम करत असतो. अशा वेळी डोकी तापतातच, भांडणं होतातच. किंबहुना आरडाओरडा, शिव्यागाळी केल्याशिवाय, आणि एकमेकांना आळशी म्हटल्याशिवाय त्या कर्मचाऱ्यांचा कामाचा वेग टिकणारच नाही! या काळात हॉटेलातला प्रत्येक जण एकमेकांची आईबहीण काढत असतो. 'झवणे' या क्रियापदाची विविध सर्जनशील रूपं पाहायला मिळतात. बेकरीतल्या एका सोळा वर्षांच्या कोवळ्या मुलीचा शिव्यासंग्रह पॅरिसच्या टॅक्सीवाल्याला लाजवेल इतका समृद्ध होता! ('हॅम्लेट'मध्ये 'cursing like a scullion' असा उल्लेख आहे. 'स्कलियन' म्हणजे स्वयंपाकघरातली मदतनीस. शेक्सपियरच्या पाहण्यात चित्रदर्शी भाषा असलेले अनेक स्कलियन्स आले असावेत!) पण आम्हांला कोणाचा अपमान करायचा नसतो, उलट ही शिव्यागाळी प्रोत्साहनपरच असते!

कितीही कष्टाचं, पाशवी काम असलं, तरी आम्हांला आमच्या या कामाचा प्रचंड अभिमान वाटतो. या एकाच भावनेमुळे हॉटेलचं स्वयंपाकघर चालतं. एखादा मनुष्य कामचुकार असेल, तर त्याच्या सहकाऱ्यांच्या लक्षात ते ताबडतोब येतं, आणि त्याला कामावरून काढून टाकायचा कट शिजायला लागतो. भटारी, वेटर आणि मोरीवाले यांची कामं वेगवेगळी असली, तरी आपल्या कामसूपणाचा अभिमान मात्र सगळ्यांना सारखाच असतो.

सर्वांत जास्त कष्ट करणारे, आणि म्हणूनच की काय सर्वांत जास्त बंडखोर, भटारी लोक असतात. त्यांना पगार फारसा नसला, तरी मान मोठा असतो. त्यांची नोकरीही सहसा जात नाही. भटारी स्वतःला कुशल कामगार ('un ouvrier') म्हणवतो, आणि बाकी सगळ्यांना अकुशल कामगार म्हणून तुच्छ लेखतो. स्वतःचं मूल्य तो जाणून असतो. रेस्टोरंट तरतं किंवा मरतं ते स्वयंपाक्यामुळे! त्याला पाच मिनिटं उशीर झाला, तर सगळंच गाडं रुळावरून घसरतं. इतर सगळ्या कामवाल्यांना भटारी पाण्यात पाहतो, आणि हेड वेटर सोडला तर सगळ्यांचा तोंडावर अपमान करतो. आपल्या कलेवर त्याचं नितांत प्रेम असतं. स्वयंपाक करणं ही तशी मोठी कला नाही, पण तो वेळेत साधणं ही मात्र आहे. न्याहारी आणि दुपारच्या जेवणामधल्या वेळेत मुख्य भटाऱ्याला शेकडो पदार्थ बनवायच्या ऑर्डरी मिळतात. सगळ्या ऑर्डरी वेगवेगळ्या वेळांना पूर्ण करायच्या असतात. मुख्य भटारी स्वतः आपल्या हाताने त्यातले फार थोडे पदार्थ बनवतो. पण प्रत्येक पदार्थ कसा बनवायचा याबद्दल बारीकसारीक सूचना देतो, आणि प्रत्येक पदार्थ वर ग्राहकाकडे जायच्या आधी चाखून बघतो. ऑर्डरींच्या खरडचिठ्ठ्या एका फळ्यावर टाचलेल्या असतात, पण तो त्यांकडे बघतही नाही. त्याच्या डोक्यात सगळं स्पष्ट असतं. अगदी मिनिटवार हिशेब असतो! त्या पदार्थाची वेळ झाली, की तो पुकारा करतो, "Faites marcher une côtelette de veau..." कामाच्या या दांडग्या उरकामुळे मोठ्या हॉटेलांत पुरुष स्वयंपाक्यांना प्राधान्य दिलं जातं. बाकी स्वयंपाकाच्या तंत्रात फारसा फरक नसावा.

वेटरचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यालाही त्याच्या कौशल्याचा अभिमान वाटतो. पण त्याचं कौशल्य असतं विनम्रतेत, सेवाभावी मनोवृत्तीत. त्याच्या कामाच्या स्वरूपामुळे तो मनाने कधीच शिष्ट, उच्चभ्रू झालेला असतो. दिवसभर तो श्रीमंत लोकांच्या अवतीभवती वावरतो. त्यांचं बोलणं ऐकतो. लाचार हसून, प्रसंगी एखादा विनोदी शेरा मारून, स्वतःचं अस्तित्व त्यांना जाणवून देतो. पाहुण्यांचं आपसांतलं बोलणं, त्यांचे खासगी विनोद वेटरला समजतात. आपल्या पाहुण्यांच्या खर्चीक सवयी आपल्या स्वतःच्याच असल्यागत तो वावरतो. चुकून काहीतरी चमत्कार होऊन वेटर श्रीमंत व्हायची शक्यताही असते. असं सहसा होत नाही - बरेच वेटर दारिद्र्यातच मरतात, पण ती आशा मात्र त्यांचा पिच्छा सोडत नाही. भरभक्कम बक्षिशीची त्यांना सवय झालेली असते. इतकी, की ग्रँड बुलेव्हारवरच्या काही कॅफेंत नोकरीला ठेवून घेतल्याबद्दल वेटरच मालकाला पैसे देतात! वेटरच्या अवतीभवती पैसा खेळत असतो, नाचत असतो, बागडत असतो. इतका, की वेटरला आपण स्वतःच पैशाने गब्बर असल्याचा भास होतो. एखादं जेवण नीट पेश व्हावं यासाठी वेटर जिवापाड झटतो, कारण तो स्वतः त्या जेवणाचा भाग असतो. जेवणाबरोबर स्वतःलाही पेश करत असतो.

आमच्या हॉटेलातला वॅलेंती नावाचा वेटर एकदा नीसमध्ये एका मेजवानीसाठी गेला होता. परतल्यावर मला सांगू लागला, "काय सांगू भावा! अप्रतिम! Mais magnifique! दोन हजार फ्रँक बिल झालं! काय शॅम्पेन, काय ऑर्किडस, काय कटलरी! असा नजारा आधी कधीच पाहिला नव्हता! सुंदर!"

"अरे, पण तू तिथे वेटर म्हणून गेला होतास ना?"

"म्हणून काय झालं? सुंदर ते सुंदर! दिलखेचक ते दिलखेचक!"

हा विषय त्याला महिनोन्महिने पुरला.

तात्पर्य काय, तर वेटरबद्दल जराही वाईट वाटून घेऊ नका. समजा, तुम्ही रेस्टोरंटमध्ये जेवणावर आडवा हात मारत आहात, आणि रेस्टोरंट बंद व्हायची वेळ उलटून अर्धा तास झाला आहे. तुमच्या बाजूला थकलाभागला वेटर उभा आहे. तुम्हांला वाटत असेल, हा आपल्याला मनोमन यथेच्छ शिव्या घालत असणार. पण तसं नसतं! त्याच्या मनातला विचार 'गळ्यापर्यंत कोंबतोय, बकासुर भोसडीचा!' हा नसतो. तो मनातल्या मनात म्हणत असतो, "कधीतरी माझ्याकडेही असेच पैसे येतील, आणि मीही याच्यासारखाच या चकाचक हॉटेलातल्या जेवणावर ताव मारेन!" वेटर इतरांना देतो ते सुख त्यालाही आतून हवंहवंसं असतं. म्हणूनच वेटर सहसा समाजवादी नसतात. त्यांची कामगार संघटना नसते. दिवसाला बाराबारा, पंधरापंधरा तास, आठवड्याचे सातसात दिवस काम करतात. वेटरचं लीन, नम्र, लाचार काम त्यांना स्वतःला आवडतं, कारण ते स्वतःही तशाच स्वभावाचे असतात, किंवा तसे झालेले असतात.

मोरीवाल्यांचं मात्र वेगळंच असतं. त्यांच्या कामाला कोणतंही कौशल्य लागत नाही. या कामात काहीही भविष्य नसतं. लागते ती चिकाटी आणि अमर्याद ताकद. जर एखादी स्त्री पुरेशी ताकदवान असेल, तर मोरीवाल्याचं काम तीही करू शकेल. कोंदट वातावरणात, सततच्या ओल्यात तासन्तास वावरता आलं की झालं! मोरीवाल्याच्या कामातून सुटका नसते - त्यांचा पगार इतका कमी असतो, की त्यातून बचत वगैरे काहीच होणं शक्य नसतं. आठवड्याला ऐंशी-शंभर तास काम करून त्यांना अन्य काही शिकता येणंही अशक्य असतं. काहीतरी चमत्कार होऊन आपल्याला रखवालदाराची किंवा सफाईकामगाराची नोकरी मिळेल अशी वेडी आशा करण्याशिवाय ते काहीही करू शकत नाहीत.

मोरीवाल्यांना स्वतःच्या कामाचा एक विचित्र अभिमानही असतो. ढोरमेहनत करायच्या क्षमतेचा, कामाचे अमानुष बोजे उचलायचा अभिमान. हेच मोरीवाल्यांना भूषणास्पद वाटतं. 'हरकाम्या' (débrouillard) ही मोरीवाल्यासाठी सर्वोच्च पदवी आहे. असाध्य वाटणारं हरेक काम साध्य करून देणारा तो 'हरकाम्या'. आमच्या हॉटेलमधला एक जर्मन हरकाम्या प्रसिद्ध होता. एकदा हॉटेलात एक ब्रिटिश लॉर्ड आला. रात्री उशिरा त्याला पीच फळं खायची लहर आली. पण हॉटेलात एकही पीच नव्हतं, आणि रात्र झाल्याने दुकानंही बंद होती. "मी बघतो!" जर्मन म्हणाला. बाहेर गेला, आणि दहा मिनिटांत चार तुकतुकीत पीचेस घेऊनच परतला. बहाद्दर शेजारच्या रेस्टोरन्टमध्ये गेला, खिडकी फोडून आत घुसला, आणि त्यांच्या स्वयंपाकघरातून चार पीचेस घेऊन अलगद सटकला. याला म्हणतात 'हरकाम्या'! त्या ब्रिटिश लॉर्डने एका पीचला वीस फ्रॅंक मोजले!

याउलट मानसिकता असलेले - जेवढ्यास तेवढं काम करणारे - मोरीवालेही असतात. आमच्या हॉटेलाचा मुख्य मोरीवाला मारियो त्यांतला अगदी प्रातिनिधिक मोरीवाला म्हणता येईल. लवकरात लवकर काम 'उडवण्या'कडे त्याचा कल असे. चौदा वर्षं मोरीवाल्याचं काम करून त्याच्यात एखाद्या दट्ट्याची रटाळ यांत्रिकता आली होती. कोणी तक्रार केली की त्याचं पालुपद असे : "भावा, औघड असतंय ते!" पण हा अपवाद. सामान्यतः मोरीवाले स्वतःच्या ताकदीबद्दल बढाया मारतात. जणू काही ते मोरीवाले नसून सैनिक आहेत.

तर असा सगळ्यांचा आत्मसन्मान. तो बाळगूनही अंगावर पडलेलं काम आम्ही सगळे एक प्रयत्नाने ते पूर्ण करत असू. तिन्ही खात्यांतले आपापसांतले ताणेबाणे आमच्या हॉटेल म्हणून दिसणाऱ्या एकत्रित प्रभावासाठी पूरकच ठरत असत. आळशी आणि हाताळ कामवाल्यांचा काटा परस्पर निघत असे हा आणखी एक फायदा.

हॉटेलकाम हे असं चालतं. हा जगन्नाथाचा भलाथोरला रथ अखंड गडगडाटत असतो, कारण प्रत्येकाला आपली भूमिका माहीत असते, आणि ती तो डोळ्यांत तेल घालून बजावतो. पण यात एक गोम आहे. ग्राहक हॉटेलांत ज्यासाठी येतो ते कारण, आणि स्टाफ ज्यासाठी झटतो ते कारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असतात. ग्राहक चांगली सेवा मिळावी म्हणून पैसे मोजतो, तर कर्मचारी 'काम करण्याचे' पैसे घेतो. म्हणजे स्टाफच्या काम करण्याने ग्राहकाला चांगली सेवा मिळेलच याची काहीच शाश्वती नसते. कित्येकदा दिसतो तो चांगल्या सेवेचा फक्त आभास असतो. वक्तशीर सेवा देणारी हॉटेलंही काही अतिमहत्त्वाच्या गोष्टींची प्रचंड हेळसांड करतात.

एक उदाहरण घेऊ : स्वच्छता. सर्व्हिस एरियामध्ये असणारी घाण अवर्णनीय असते. आमच्या मोरीच्या कोपऱ्यात साचलेली घाण किमान वर्षभर जुनी होती, आणि पाव ठेवायच्या जागी झुरळांचा मुक्त वावर होता. "ही झुरळं मारून टाकू या", एकदा मी मारियोला सुचवलं. "का रे बिचाऱ्यांना मारायचं? मुके प्राणी आहेत ते!" तो काकुळतीला येऊन म्हणाला. सुरुवातीला मी हात स्वच्छ धुवूनच लोण्यामध्ये घालत असे. सगळे मला हसत. पण ही दृष्टीआडची सृष्टी. जिथे स्वच्छता हा 'दाखवण्या'चा भाग होता, तिथे ती कटाक्षाने पाळली जाई. टेबलं चकचकीत, आणि पितळेची भांडी लखलखीत केली जात, कारण तसा दंडक होता. पण स्वतःला स्वच्छ ठेवण्याबद्दल मोरीवाल्यांना काहीच सूचना नव्हत्या, आणि असले चोचले पुरवायला आम्हांला वेळही नसे. आम्ही आमचं काम करायला बांधील होतो. आमच्या कामाचं ध्येय होतं वक्तशीरपणा. आणि स्वच्छता करण्यात वेळ जायचा, म्हणून आम्ही घाणेरडं राहून वेळ वाचवायचो.

स्वयंपाकघरातली घाण आणखीच भयानक असायची. 'स्वतःला प्यायचं नसेल तर फ्रेंच भटारी सुपात थुंकतो' हा बिलकल कल्पनाविलास नाही. फ्रेंच भटारी कलाकार असतो, पण स्वच्छता त्याच्या कलेत मोडत नाही. 'भटारी जितका गलिच्छ, तितकी अन्नाला चव जास्त' या तत्त्वावर त्याचा नितांत विश्वास असतो. उदाहरणार्थ : ग्रिल केलेल्या स्टेकवर रस्सा (ग्रेव्ही) ओतून मुख्य स्वयंपाक्यासमोर ठेवलं जातं. तो आपल्या बोटांनी स्टेक उचलतो, आणि त्यात नखं रोवून कितपत शिजलाय याचा अंदाज घेतो. मग बशीच्या कडेकडेने अंगठा फिरवून ग्रेव्ही निपटून काढतो, आणि अंगठा तोंडात घालून चव पाहतो. त्याचं समाधान झालं, की त्या स्टेकला आपल्या गुबगुबीत गुलाबी बोटांनी परत बशीत ठेवतो, सजवतो. (याच उष्ट्या बोटांनी त्याने सकाळपासून शेकडो पदार्थ चाटून-चोखून पाहिलेले असतात.) त्याच्या मनाप्रमाणे सगळं झालं, की एक फडकं घेऊन त्या बशीवरचे बोटांचे ठसे अलगद पुसून घेतो, आणि ती डिश हेडवेटरच्या ताब्यात देतो. सर्व्हिस एरियाचं दार उघडून बाहेर जायच्या आधी तो हेडवेटर एकदा ग्रेव्हीत बोट बुडवून ती पुरेशी गरम राहिल्याची खात्री करून घेतो. (त्याच बोटांनी त्याने सकाळपासून शंभर वेळा आपल्या ब्रिलियंटाईनयुक्त चिकट केसांना चपचपीत बसवलेलं असतं.) पॅरिसमध्ये तुम्ही एखाद्या डिशसाठी दहा फ्रँकहून अधिक पैसे मोजले असतील, तर तुमचा हा पदार्थ अशा प्रकारे 'हाताळला' गेला आहे याची खात्री बाळगा. स्वस्त हॉटेलांत पदार्थांवर एवढे श्रम घेतले जात नाहीत. ते भांड्यातून थेट तुमच्या बशीत डावाने काढले जातात. ढोबळ मानाने बोलायचं तर तुमचा पदार्थ जितका महाग, तितका त्यात जास्त घाम आणि तितकी जास्त थुंकी.

जिथे हॉटेल तिथे घाण, कारण चकाचक दिखाऊपणापायी खऱ्या स्वच्छतेचा बळी दिला जातो. हॉटेल कामगार एखादा पदार्थ तयार करण्यात एवढा गुंतलेला असतो, की तो पदार्थ खाण्यासाठी बनवतो आहोत हे त्याच्या लक्षातच राहत नाही. जसं एखाद्या वैद्यासाठी आजारी माणूस म्हणजे निव्वळ एक औषधी नोंद, तसं गिऱ्हाइकाची मागवणी म्हणजे हॉटेल-कामगारांसाठी फक्त एक हातावेगळं करायचं काम! हॉटेलच्या तळघरात असलेल्या काळपट मळकट स्वयंपाकघरातल्या कोणालातरी तो टोस्ट बनवावा लागतो. त्याला शंभर कामं. 'हा टोस्ट पौष्टिक होण्यासाठी काय बरं करता येईल?' एवढा विचार करायला त्याला वेळ नसतो. त्याला एवढंच माहीत, की टोस्टसारखा दिसणारा पदार्थ तीन मिनिटांच्या आत तयार नसेल, तर कोणीतरी वेटर त्याची आईबहीण काढेल. समजा, त्या भटाऱ्याच्या भाळीचे चार घर्मबिंदू टोस्टवर पडले. त्यात काय? चालतं की! समजा, टोस्ट जमिनीवरच्या भुशात पडला. मग काय तो फेकून द्यायचा की काय? त्यापेक्षा त्या टोस्टला लागलेला भुसा झटकणं सोपं नाही का? वेटरही तसलेच. समजा, वर नेताना परत एकदा टोस्ट पडला. आणखी एकदा फडका मारला, की टोस्ट परत चकचकीत तयार. आणि असंच सगळ्यांबद्दल. आमच्या हॉटेलात स्वच्छतेत रांधलेलं/शिजवलेलं अन्न असे, ते कामगारांसाठी नि मालकांसाठी. सगळ्या कामगारांच्या तोंडी एक पालुपद नेहमी असे : 'मालकाची काळजी घ्या रे. गेस्ट गेला भोसड्यात!'

घाणीव्यतिरिक्त आणखीही गोष्टी असतात. मालक तर ग्राहकांची अमर्याद फसवणूक करत असतो. स्वयंपाकात वापरलेलं साहित्य (धान्य, भाज्या वगैरे) निकृष्ट दर्जाचं असतं. पण ते चांगल्या 'दिसणाऱ्या' पदार्थात कसं दडपायचं हे कौशल्य भटाऱ्याकडे असतं. कोणीही सुगृहिणी ते तसले मांसाचे कट्स आणि भाज्या स्वतःच्या घरासाठी घेणार नाही. लोण्यात दूध मिसळून ते पातळ केलेलं असे. चहा, कॉफी आणि जॅम सुट्या लेबलविहीन (unbranded) पातेल्यांतून आणलेलं असे. साध्या वारुण्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या विक्रेत्यांकडून घेतल्या जात. 'कामगाराने खराब केलेल्या वस्तूंचे पैसे पगारातून कापले जावेत' असा सक्त नियम होता. त्यामुळे खराब वस्तू दडवण्या-लपवण्याकडे कल असे. एकदा तिसऱ्या मजल्यावरच्या आमच्या वेटरकडून एक अख्खं रोस्ट चिकन सर्व्हिस लिफ्टच्या मोकळ्या उभ्या बोळकंडीतून पार तळघरात पडलं. जिथे ते पडलं तिथे शिळ्या ब्रेडचा कचरा, फाटके कुजके कागद वगैरे घाण होती. आम्ही ते एका फडक्याने पुसून परत वर धाडलं. वरच्या खोल्यांशी आमचा संबंध येत नसे, पण अनेक कहाण्या ऐकायला मिळत. वापरलेले, शिळे पलंगपोस धुवायला न टाकता थोडे दमट करून, त्यावर इस्त्री फिरवून परत वापरले जात. तस्मात, मालकाचा कवडीचुंबकपणा फक्त आमच्याकरताच नव्हता, तर पैसे देणाऱ्या मायबाप गिर्‍हाइकासाठीही होता. कोपरे झाडण्यासाठी वापरायचा लहान दांड्याची केरसुणी (/दांड्याचा ब्रश) नि केरभरणी अख्ख्या हॉटेलात कुठेही नव्हती. त्याऐवजी लांब दांड्याचे झाडू आणि जुन्या वर्तमानपत्रांचे कागद वापरून केर काढावा लागे. कामगारांसाठी असलेल्या स्वच्छतागृहातली 'स्वच्छता' एखाद्या मध्यआशियाई तांड्याला शोभली असती. त्यातल्या त्यात स्वच्छ असत ती काचसामान धुण्याची सिंक्स, कारण काचसामानावर काळा डाग चालत नसे.

हे सगळं असलं, तरी आमचं हॉटेल पॅरिसमधल्या सर्वांत महाग डझनभर हॉटेलांपैकी होतं. ग्राहक अव्वाच्या सव्वा किमती मोजून खोल्या राखून ठेवत. एका खोलीचं एका रात्रीचं भाडं दोनशे फ्रँक्स होतं, आणि त्या भाड्यात ब्रेकफास्ट मिळत नसे. वाईन आणि तंबाखू किरकोळ दुकानांपेक्षा दुप्पट किमतीत मिळे. (अर्थात मालक घाऊक दरांत खरेदी करत असे.) एखादा ग्राहक मोठा अधिकारी असला, किंवा लखपती असला तर बिल आपोआप फुगत असे. एकदा चौथ्या मजल्यावरच्या एका अमेरिकी ग्राहकाला नाश्त्याला फक्त मीठ आणि गरम पाणी हवं होतं. "साला हरामी! माझ्या दहा टक्क्यांचं काय? मीठपाण्याचे दहा टक्के घेऊ होय!" वेटर करवादला. शेवटी त्याने नाश्त्याचे पंचवीस फ्रँक्स लावले, आणि मौज अशी, की त्या गिर्‍हाईकानेही काहीही कटकट न करता ते बिल भरलं!

बोरिसच्या म्हणण्यानुसार पॅरिसमधल्या सगळ्या मोठ्या हॉटेलांत हेच चालतं. पण मला वाटतं आमच्या हॉटेलातले ग्राहक फसवायला अधिक सोपे होते. एक तर बरेचसे अमेरिकी असत, आणि त्यांना फ्रेंचचा गंध नसे. त्यांना उत्तम खाद्यपदार्थ कशाला म्हणतात याची तर बिलकूल कल्पना नसे. हे अमेरिकी लोक नाश्त्याला 'सिरियल्स' नावाचा घाणेरडा अमेरिकी कडबा खात. चहात मार्मलेड मिसळत. रात्रीच्या जेवणानंतर व्हर्मूथ (vermouth) पीत. कहर म्हणजे कोंबडीचा एक राजेशाही पदार्थ (poulet à la reine) मागवून त्यावर वूस्टर सॉस घालून सगळा रहाडा करून टाकत. पिट्सबर्गहून आलेला एक ग्राहक रोज रात्री आपल्या खोलीत ग्रेपनट्स हे सिरीयल, स्क्रॅम्बल्ड एग्ज, आणि कोको मागवत असे. असल्या लोकांना फसवल्याचं दुःखही होत नसे.

***

या लेखात एरिकच्या पॅरिसमधल्या आयुष्याचा एक भाग घेतला आहे. लंडनमधला भागही तितकाच रोचक आहे. पण त्याविषयी आत्ता नको.

संपूर्ण पुस्तक अनेक अर्थांनी उल्लेखनीय आहे.

हे ललितलेखन-अनुभवकथन आहे. पण लेखकाचे अनुभव त्यात प्रामाणिकपणे आलेले नाहीत. एरिक ब्लेअर फेब्रुवारी १९२८ ते ऑगस्ट १९२९ या जवळजवळ अठरा महिन्यांच्या काळात पॅरिसमध्ये होता. पण संपूर्ण पुस्तकात येतं ते उण्यापुऱ्या दहा आठवड्यांचं वर्णन. त्यातही, दारिद्र्यात जगणाऱ्या एरिकने स्वेच्छेने दारिद्र्य पत्करलं होतं. त्याला परिस्थितीने दारिद्र्यात ढकललं नव्हतं. पॅरिसमध्ये त्याची एका आत्या राहत होती. आपदेत तिच्याकडे जाण्याचा पर्याय त्याच्याकडे होताच. शिवाय त्याचं कुटुंब खाडीपलीकडच्या इंग्लंडात सुस्थित होतं. कधीही आपल्या सुरक्षित कोशात परतण्याचा पर्याय त्याच्याकडे होताच. (आणि तसा तो पुढे परतलाही.)

याचा अर्थ पुस्तकात लिहिलेले अनुभव - विशेषतः हा अनुभव - बनावट आहे असं नव्हे. उलट तो कमालीच्या सहृदयतेने लिहिलेला आहे. एरिकने त्यांच्या आयुष्याची सह-अनुभूती घेतल्याने त्यात भेटलेल्या लोकांबद्दल एरिकला सहानुभूती असल्याचं स्पष्ट जाणवतं. एरिकच्या पुढच्या लेखनातही समाजातल्या पददलित वर्गाबद्दल असलेली ही सहृदयता त्याने गमावली नाही.

पण सहृदयतेने लेखन करणे म्हणजे वाचकाच्या भावनेला हात घालणारं, डोळ्यांतून खळकन अश्रू टपकवणारं, बुळबुळीत लेखन नव्हे. संपूर्ण पुस्तकात एरिक अतिशय स्पष्ट आणि नेमकं लिहितो. (किंबहुना उत्तरायुष्यात एरिकने असं लिहायचे सहा नियम सांगितले. नवोदित लेखकाने शिरसावंद्य मानावेत असे आहेत ते.) वरील उताऱ्याचं भाषांतर करतानाही एरिकच्या मूळ भाषेतला नेमकेपणा टिकवायची धडपड केली आहे.

***

आपले पॅरिस आणि लंडनचे अनुभव एकत्र करून एरिकने ते हस्तलिखित अनेक प्रकाशकांना दाखवलं. पण 'असलं काही' छापायची इच्छा कोणालाच नव्हती. सभ्यतेच्या तत्कालीन संकेतांना धाब्यावर बसवणाऱ्या गोष्टींनी भरलेलं हे पुस्तक प्रकाशित करायला कोण धजावणार होतं? वेश्यागृहांतली वर्णनं, बलात्कारांच्या 'ऐकीव' कहाण्या, आणि जनपदाची खरखरीत रांगडी स्लँग बोली प्रकाशकांना रुचत नव्हती. शेवटी एरिकने हे लेखन छापवून आणायची खटपट सोडली, आणि तो इतर गोष्टींकडे वळला. शेवटी एका मैत्रिणीने त्याचं हे बाड व्हिक्टर गोलांझ (Gollancz) या समाजवादी प्रकाशकापर्यंत पोचवलं. त्यांनी ते स्वीकारलं, पण तत्कालीन रुचीनुसार सेन्सॉर करूनच. वेश्येकडून लुटलं जाण्याचा प्रसंग बदलून 'लॉजमधल्या एका इतालियाई सहप्रवाशा'कडून लुटलं जाण्याचा प्रसंग रंगवण्यात आला. बत्तिसाव्या प्रकरणात एरिक भाषेबद्दल लिहितो, तेव्हा 'फक्' हे त्या कालखंडातलं आवडतं क्रियापद असल्याचं निरीक्षण नोंदवतो. सुरुवातीच्या आवृत्त्यांमध्ये हा उल्लेख गाळण्यात आला होता. (माझ्याकडच्या २०१३ साली छापलेल्या पेंग्विन आवृत्तीतही 'f**k' असाच उल्लेख आहे!) पण वरच्या भाषांतरित परिच्छेदात आलेलं समानार्थी फ्रेंच क्रियापद 'foutre' मात्र सेन्सॉर झालेलं नाही! सभ्यतेचे व्हिक्टोरियन नियम परभाषेला लागू नसावेत! किंबहुना १८८०च्या आसपास प्रकाशित झालेली हॉब्सन जॉब्सन डिक्शनरीही 'banchoot' आणि 'beteechoot' या शब्दांचा अर्थ 'Terms of abuse, which we should hesitate to print if their odious meaning were not obscure "to the general".' असा देते! शब्दकोशाची ही कथा, तर ललितलेखनाचे काय होय!

शेवटी काटछाटीनंतर पुस्तकाची मुद्रणप्रत तयार झाली. पण प्रकाशकांना 'फट्टू' म्हणणाऱ्या एरिकची आता फाटली. आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबाला लाज आणायला नको म्हणून एरिक आर्थर ब्लेअरने 'जॉर्ज ऑरवेल' हे टोपणनाव घेतलं. जानेवारी १९३३मध्ये 'डाऊन अँड आऊट इन पॅरिस अँड लंडन' प्रकाशित झालं.

जॉर्ज ऑरवेलचं हे प्रकाशित झालेलं पहिलं पुस्तक. त्याला जागतिक कीर्ती मिळवून दिली ती 'नाईन्टीन एटीफोर' या त्याच्या शेवटच्या पुस्तकाने. या प्रवासाला सुरुवात झाली होती.

(समाप्त)

तळटिपा


  1. ते रेस्टोरंट (https://goo.gl/maps/vYnF8zJkTox) आजही चालू आहे. 

  2. आपल्या अनुभवकथनात नंतर हा प्रसंग एरिकने वेगळ्या पद्धतीने हाताळला.  

  3. मूळ वाक्य: It is for their punctuality, and not for any superiority in technique, that men cooks are preferred to women. 

  4. A débrouillard is a man who, even when he is told to do the impossible, will se débrouiller—get it done somehow. 

  5. हे थोडं मापात बसवू या. "आमचं हॉटेल पॅरिसमधल्या सर्वात महाग डझनभर हॉटेलांपैकी होतं" असं एरिक म्हणतो. या साईटवर हा लेख लिहिते वेळच्या पॅरिसमधल्या सर्वात महागड्या १० हॉटेलांचे दर दिले आहेत. त्या दराचं मीडियन आहे €१,१८८ (एका रात्रीसाठी).  

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

लेख उत्कंठेने वाचला, आणि तितकाच आवडला. हॉटेल व्यवसायाबद्दलची जी निरीक्षणे आहेत ती अनेक क्लिशे दृढ करणारी आहेत. शंभरेक वर्षांपूर्वीच्या पॅरिसमधील सोकॉल्ड उच्चभ्रू हॉटेलांमध्येही तसेच चालायचे हे पाहून बेस्ट वाटलं. लेखकाचे अनुभव, त्याची सोशल चौकट, यांचा परिणाम त्याच्या सहृदयतेवर झाला नाही हे विशेष दखलपात्र आहे.

या निमित्ताने हॉटेल व्यवसायाशी संबंधित वाचलेल्या पुस्तकांबद्दल/लेखांबद्दल काही रॅण्डम निरीक्षणे/आठवणी.

इडली, ऑर्किड आणि मी: विठ्ठल कामतचं हे पुस्तक इतर अनेक आत्मचरित्रपर आणि त्यातही उद्योगपतींच्या आत्मचरित्रपर पुस्तकांमध्ये नेहमीच आढळणाऱ्या अहं ने पुरेपूर भरलं असलं तरी सदर लेखातील भाषांतरात हॉटेल व्यवसायातील जी "लगबग/लगीनघाई" दिसते ती मला आठवते त्याप्रमाणे त्या पुस्तकातही आहे.

मिपावर प्रभाकर पेठकर हॉटेल व्यवसायाबद्दल बरेच लिहीत असतात त्यात या फायरफाईटचे वर्णन तितकेसे दिसले नाही. म्हणजे टिपिकल अडचणी, उद्दिष्टे, इ. सगळं कळतं पण फायरफाईटचा तितका उल्लेख दिसत नाही किंवा तसा दिसलेला आठवत नाही.

एक कुठलीशी पाचसहाशे पानी इंग्लिश कादंबरी आहे, नाव विसरलो. एका मोठ्या हॉटेलमध्ये एक मर्डर होतो, तिथे मग तपास कसा चालतो, इ. वर्णनात तिथली फायरफाईट आलेली आहे.

एकूणच ही फायरफाईट हा हॉटेल व्यवसायाचा गाभा दिसतो. अनेक ठिकाणची व अनेक काळांतील उदाहरणे हेच दाखवतात यातून तेच सिद्ध होते.

सरतेशेवटी: ऑर्वेलकृत लेखनाचे नियम पाहिले, आणि आवडले. अनुसरण्यासारखे आहेत. जाता जाता या अनुषंगाने दासबोधही तपासला पाहिजे असं वाटतं. बारीकसारीक गोष्टींत लक्ष घालणाऱ्या समर्थांचं लक्ष लेखनकळेकडं नक्कीच गेलं असणार, संबंधित समास वगैरे चेकवले पाहिजेत.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकदमच आवडलेलं आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

पुस्तकाची निवड, उताऱ्याची निवड, भाषांतर आणि एकंदरीत लेख आवडला.

एक विचार / प्रश्न / शंका : ouvrier हा शब्द ऑरवेलच्या काळात कशा अर्थानं वापरला जाई? साधारणतः त्याचा अर्थ (कष्टकरी) कामगार असा होतो. उदा. सार्त्रचं हे उद्धृत : Pour tous les ouvriers du monde, le bourgeois est le produit du capital ; pour les nôtres, il est aussi le fils de ses oeuvres, un tueur - et il va le rester longtemps.
(गूगलमधून भाषांतर : For all the workers of the world, the bourgeois is the product of capital; for ours, he is also the son of his works, a killer - and he will remain so for a long time.)

कदाचित ऑरवेलच्या विचारसरणीला अनुसरून त्यानं त्याला कौशल्य बहाल केलं असावं की काय, असा विचार मनात आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऑरवेलचं मूळ वाक्य असं :

The cook does not look upon himself as a servant, but as a skilled workman; he is generally called 'un ouvrier' which a waiter never is.

मला विचारसरणी थियरी योग्य वाटते. पुस्तकात पुढे तो म्हणतो "A plongeur is a slave, and a wasted slave, doing stupid and largely unnecessary work." त्या तुलनेने ouvrier हा कष्टकरी का असेना पण स्किल्ड - आणि श्रममूल्य असलेला कामगार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मस्त आहे लेख. ओरवेल हे नाव आणि त्याची दोन पुस्तकं याखेरीज इतर काहीच माहित नव्हते.

===
> त्यातही, दारिद्र्यात जगणाऱ्या एरिकने स्वेच्छेने दारिद्र्य पत्करलं होतं. त्याला परिस्थितीने दारिद्र्यात ढकललं नव्हतं. पॅरिसमध्ये त्याची एका आत्या राहत होती. आपदेत तिच्याकडे जाण्याचा पर्याय त्याच्याकडे होताच. शिवाय त्याचं कुटुंब खाडीपलीकडच्या इंग्लंडात सुस्थित होतं. कधीही आपल्या सुरक्षित कोशात परतण्याचा पर्याय त्याच्याकडे होताच. (आणि तसा तो पुढे परतलाही.) > माबोवरची अर्निकाची ग्रीस मालिका आठवली! https://www.maayboli.com/node/67645

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अॅमी, या लिंकसाठी अनेक, अनेक आणि अनेक आभार! अप्रतिम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पूर्ण लेखमाला वाचली का?
लेखनशैली छान आहे मान्य, जेकाही केलं ते 'वेगळं' आहे मान्य, पण सुरवातीपासून लेख, त्यावरचे प्रतिसाद वाचून मला प्रश्न पडलेत (जे मी तिकडे विचारले नाही, ब्लास्फेमी होईल म्हणून ;))

> लहान मुलं सांभाळायची, त्यांना इंग्लिश शिकवायचं, स्वयंपाक करायचा, इथल्या भाडेकरूंना काही हवं-नको असेल ते बघायचं, आणि त्याबदल्यात या गावात राहायचं आणि मालक कुटुंबाबरोबर फिरायचं. >
• लेखिकेने हेसगळे भारतात राहत असती तर केलं असतं का? वेगळ्या राज्यातील, पर्यटक जागेतील निवासी हॉटेलमधे ही कामं करायची.
• तिला तिच्या कुटुंबाने सपोर्ट केलं असतं का?
• आणि इतरांकडून आता होतंय तेवढं कौतुक झालं असतं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजपासून तीन महिने दररोज फक्त ग्रीसबद्दल सांगायला गेले तरी काहीतरी निसटेलच इतकं दिलं ग्रीसने गेल्या तीन महिन्यांत.

तीन महिन्यात असं जन्म जन्मांतरीची खूण पटल्यासारखं लिहिणं मला थोडं कृतक वाटतं. लेखन फ्रेश आहे किंबहुना कर्णीकी रतीब नाही एवढ्यावर देखील समाधान झालं. बाकी, जरा वेगळ्या प्रतीचा फेसबुकी अभिनिवेश टाळता आला असता तर बरं वाटलं असतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

हम्म.
अलंकारिक, शब्दबंबाळ भाषेत लिहलेले वैयक्तिक अनुभव मला आवडत नाहीत असं वाटू लागलंय.

"बरं मग? आम्ही काय करायचं? गुड फॉर यू! (खांदे उडवत)" याखेरीज इतर काहीच वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिंगो.
शैलीलाही मी एकवेळ माफ करेन. पण एक दोन दिवसात परक्या घरातली मुलं जर सहजपणे अंगावर खांद्यावर आली तरी "अनोखे भावबंद-आय लव्ह यु" वगैरे जाता जाता आवर्जून सांगून तरल-तरल वाटून जोरात कीबोर्ड बडवणं हं हं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

ते कृष्ण घालतो लोळण का? लॉल आयरोल आहे ते Biggrin Biggrin

आणि https://www.maayboli.com/node/68223 हा भाग वाचला का? काही दांभिकपणा जाणवतोय का?

हुश्श चला कोणीतरी भेटलं असल्या लेखनाची टवाळी करणारं. आभार Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा. लेखिकेला गणपती विशेष आवडतो वाटतं. थायलंडमध्ये हत्तीची सेवा काय सिक्यात आरत्या काय.

शिवाय पुढचे दोन आठवडे अंगणातला जास्वंद डवरलेला होता... अजून काय लागतं?

मोरया..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

ते गणपती वगैरे बाकी सगळ्या लेखनाशी इनसिंकच आहे.

इंग्लडमधे भेटलेले ग्रीक, ग्रीसमधे भेटलेले ग्रीक, ग्रीसमधे भेटलेले रशियन आणि ग्रीसमधे भेटलेले भारतीय यांच्याशी वागण्यात काही वर्गवाद, वर्णवाद, वंशवाद, प्रांतवाद जाणवतोय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ती लेखमाला किंचितच चाळली. त्यामुळे लेखिकेला काय म्हणायचं आहे यापेक्षा मला घराबाहेर, देशाबाहेर पडून समजलं त्यावरून लिहित्ये.

हे सगळं भारतात करण्याची फारशी गरज नसते. भारतात माणसांचे आपसांतले व्यवहार कसे चालतात, हे मला लहानपणापासून बघून, अनुभवून माहीत आहे. जेवायला बसताना ब्राह्मण पुरुषांनी चित्राहुती घालणं असो, किंवा जेवताना सांडलेलं अन्न वेचण्याच्या निरनिराळ्या जाती-समाजांमधल्या पद्धती असोत; हे बघूनच आत्मसात करता येतं. अशा गोष्टींची वर्णनं कथा-कादंबऱ्यांमध्ये असतीलच असं नाही. संपूर्णतया वेगळ्या समाजात जाऊन हे बघता येतं.

जर देशात राहून फार नवं शिकता येणार नाही; त्यातून आनंद मिळणार नाही; तर मुळात कोणी असं काही करेलच कशाला? शिवाय आपण परदेशात असणं (नवीन काही बघणं) आणि आपण परदेशी असणं यांचं अप्रूप बहुतेकांना असतंच. तीन महिने परदेशात राहून नजर, दृष्टिकोन मरत नाहीत; थोडी सवय होते एवढंच. म्हणून मला कधी राहतं शहरही पाहुण्यांबरोबर बघायला आवडतं, कारण त्यांची नजर ताजी असते.

असे सगळे अनुभव ममवपणाच्या नेहमीच्या कक्षेत नसतात, म्हणून त्याचं कौतुक वाटणं, त्यामुळे कुटुंबीयांनी पाठिंबा देणं, यात काही नवल वाटत नाही.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आणि भाषांतर दोन्ही आवडलं. अजून येऊद्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख उत्तम झालेला आहे.

ऑरवेलच्या पुस्तकाच्या या वर्णनावरून मला गो नी दांडेकरांच्या "स्मरणगाथा" नावाच्या आत्मकथनाची आठवण झाली. १९३० साली "एका वर्षात स्वराज्य" या गांधींच्या घोषणेने प्रभावित होऊन ते पौगंडावस्थेत घरातून पळून गेले. स्वराज्य वगैरे बारगळलं पण स्वतःची लाज वाटून हे घरी गेलेच नाहीत. विविध ठिकाणी विनातिकिट प्रवास करण्यापासून, आश्रितापासून, भिकार्‍यापर्यंतच्या अवस्थेतून गेले. मग कधी गाडगेबाबांच्या वर्तुळात त्यांचे सगळ्यात जवळचे साथीदार/शिष्य बनले. पुस्तकाचा शेवट त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवेशाचं वर्णन करून होतो. त्या पुस्तकात भारतातल्या दुर्गम, ग्रामीण आणि त्याच बरोबर शहरी भागातल्या दारिद्र्याची अगदी फर्स्ट हँड वर्णनं आहेत. (एके ठिकाणी त्यांच्यावर एका माणसाने बलात्कार केला ; अशा स्वरूपाची वर्णनं आलेली आहेत. )

गो नी दांडेकरांच्या एकंदर लेखनापासून मी मनाने बराच दूर गेलेलो असलो (त्यातसुद्धा "माचीवरला बुधा", "जैत रे जैत" सारखे काही अपवाद सोडून. ती काही पुस्तकं अजून बरीच आवडतात.) तरी हे त्यांचं माझ्याकरता सर्वाधिक संस्मरणीय पुस्तक आहे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

या लेखमालेबद्दल लिहिलं होतंस, तेव्हा काय अपेक्षा करावी हे समजत नव्हतं. आता अगदी लख्खपणे समजलं.

भाषांतर आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अतिशय सुंदर लेख आणि अनुवाद. खूप खूप धन्यवाद. "... नेपोलियनने आपली हॅट एका रेस्टोरंटमध्ये गिरवी ठेवली होती" ह्यातील गिरवी हा शब्द इतक्या सुंदर लेखाला तीट म्हणून मुद्दाम वापरल्यासारखा वाटतो. गहाण हा मराठी शब्द बराच प्रचलित आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, 'गहाण' हा शब्द वापरायचा मोह झाला होता. पण इथे अभिप्रेत आहे ते असं : "एवढा जगज्जेता सम्राट नेपोलियन, पण त्याच्याकडेही एकदा बिल भागवायचे पैसे नव्हते, म्हणून हॅट ठेवावी लागली." म्हणजे हे प्रथेपेक्षा, अपेक्षेपेक्षा विपरीत काही आहे.

'गहाण' हा शब्द वापरून वापरून गुळगुळीत झाला आहे. उत्पन्नाच्या दहादहा पट असलेल्या गृहकर्जांच्या जमान्यात एखादी गोष्ट गहाण ठेवली जाणे यात काही नवल राहिलं नाही. म्हणून हा 'प्रथेपेक्षा विपरीतपणा' नोंदवायला बॉलिवूडने विविध डायलागांतून उपकृत केलेला 'गिरवी' वापरला.

इंग्रजीमध्येही 'to hypothecate' ही सामान्य गोष्ट आहे. पण 'to pawn' म्हणजे वेगळं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वस्तू मराठी 'गहाण'ऐवजी हिंदी 'गिरवी' ठेवल्यास त्या ठेवण्याचा विपरीतपणा, त्याचे नवलमूल्य वाढते काय?

मराठी लोक हे भय्यांच्या तुलनेत घरच्या वस्तू ऊठसूट लेफ्ट-अँड-राईट गहाण टाकत सुटतात; उलटपक्षी, भय्ये हे घरच्या वस्तू क्वचितच गिरवी ठेवतात, असे दर्शविणारे काही स्टॅटिस्टिक उपलब्ध आहे काय (अथवा आपणांस ठाऊक आहे काय)? कारण, अन्यथा, या दोन शब्दांत (एक मराठी आहे तर एक हिंदी आहे एवढे सोडल्यास) अर्थच्छटेच्या दृष्टीने काहीही फरक नाही.

आणि, 'हायपॉथिकेट'करिता मराठीत बहुधा 'तारण ठेवणे' असा शब्दप्रयोग करतातसे वाटते. (चूभूद्याघ्या.)

(हायपॉथिकेट आणि पॉन यांच्यात किंचित फरक आहेसे वाटते. चूभूद्याघ्या. इच्छा असल्यास चिकित्सा करूच, परंतु तूर्तास कंटाळा/कंटाळा करीत आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वस्तू मराठी 'गहाण'ऐवजी हिंदी 'गिरवी' ठेवल्यास त्या ठेवण्याचा विपरीतपणा, त्याचे नवलमूल्य वाढते काय?

असं मला वाटलं खरं. वेगळी भावना म्हणून वेगळा शब्द वापरला, एवढंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तरीच मुद्दाम वापरल्यासारखाच वाटला तो शब्द. लेखकाची प्रयोगशीलता ही काही गोष्ट असतेच. एखादवेळी कुणाला रुचेल, कुणाला रुचणार नाही. असो. लेख बाकी उत्तम हो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निवडलेला लेख, पार्श्वभूमी आणि त्याचा अनुवाद आवडला. लेखमालेतील पुढील लेखांबद्दल उत्सुकता आहे.

काही अवांतर गोष्टी:

१. >>> मित्राच्या ओळखीने एका हॉटेलात 'मोरीवाला' ('un plongeur dans un restaurant') म्हणून नोकरी मिळाली. (मोरीवाला म्हणजे भांडीघाश्या, आणि हॉटेलच्या भटारखान्यात पडेल ते काम करणारा हरकाम्या.
--- याची व्युत्पत्ती to dive/to plunge या अर्थाच्या क्रियापदावर बेतलेली दिसते आहे. बहुतेक 'झोकून देऊन काम करणारा' ही अपेक्षा/शब्दश: अर्थ आणि त्यातून मग हरकाम्या/पडेल ते काम करणारा, असा अर्थ आला असावा. त्या तुलनेने, ouvrier अधिक well-defined आणि श्रममूल्य असलेला कामगार आहे, हे आबांच्या वरील प्रतिक्रियेतलं निरीक्षण पटतं.

२. >>> शिवाय त्याचं कुटुंब खाडीपलीकडच्या इंग्लंडात सुस्थित होतं. कधीही आपल्या सुरक्षित कोशात परतण्याचा पर्याय त्याच्याकडे होताच.
--- सुरतेतल्या एका धनाढ्य हिरे व्यापाऱ्याने आपल्या मुलाला महिनाभर केरळात बारीकसारीक कामं करायला पाठवलं होतं, अशी बातमी मागे आली होती - ते आठवलं.

३. >>> त्याच्या कामाच्या स्वरूपामुळे तो मनाने कधीच शिष्ट, उच्चभ्रू झालेला असतो. दिवसभर तो श्रीमंत लोकांच्या अवतीभवती वावरतो. त्यांचं बोलणं ऐकतो....वेटरच्या अवतीभवती पैसा खेळत असतो, नाचत असतो, बागडत असतो. इतका, की वेटरला आपण स्वतःच पैशाने गब्बर असल्याचा भास होतो.
--- थत्तेचाचांना आठवण यायचं कारण उमगलं Wink [कृ. ह. घे.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेख. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0