पुस्तकांचे जादुई जग

xxx निसर्गाने मानव जातीला भरभरून दिले आहे, याची प्रचीती आपल्याला नेहमीच येत असते. निसर्गदत्त देणगी म्हणवून घेणाऱ्या चमत्कारसदृश प्राण्यांच्या, कृमी-कीटकांच्या, फुला-फळांच्या, डोंगर-दऱ्यांच्या, समुद्र-नद्यांच्या जगात माणूस, क्षणभर का होईना, आपले सर्व दुःख, चिंता, वेदना, गरीबी, अन्याय सर्व विसरू शकतो. निसर्गातील वैविध्यता, विपुलता व ताजेपणा अनुभवत असताना माणूस थक्क होतो. हे सगळे कसे शक्य झाले याबद्दल आश्चर्य व्यक्त करत त्यासमोर नतमस्तक होतो.

निसर्गाकडून मिळालेल्या या भेटवस्तूंचे भान ठेवत असतानाच मानवाने स्वतःच्या कर्तृत्वशक्तीने उभे केलेले अजून एक जग असून त्यात हरवून न जाणारा अक्षरओळख असलेला माणूस विरळा. ते म्हणजे पुस्तकांचे जादुई जग. हेर्मन हेस यांच्या मते पुस्तकाचे जग पूर्णपणे मानवनिर्मित आहे. लिखित शब्द वा पुस्तकं नसते तर इतिहास वा मानवता या संकल्पना अस्तित्वातच आल्या नसत्या. एखाद्या घरातील एका खोलीतील बंदिस्त अवकाशात स्वतःला कोंडून घेत मानवी चैतन्याच्या इतिहासाचा शोध घ्यायचे ठरविल्यास त्याला पुस्तकाच्या ढिगात रममाण झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही.

काफ्काला पुस्तक म्हणजे गोठलेल्या बर्फाला कापणारी कुऱ्हाड वाटते. कार्ल सॅगनला मानवी जादुई शक्तीचा प्रत्यक्ष पुरावा तर जेम्स बाल्डविनला मानवी नियतीला बदलू शकणारे वाहन असे वाटते. हेर्मन हेसला तर संपूर्ण ग्रंथव्यवहार, लेखकाने निवडलेले शब्द व त्याचे लेखन हे सर्व जादुई चमत्काराचाच प्रकार वाटतो. ते केवळ चमत्कार नव्हे तर त्याला पवित्रतेची काठ आहे. फक्त हीच लेखन कला त्यांना पवित्र ऋषी-मुनींच्या पङ्तीत बसवू शकते.

त्यामुळे निखिलेश चित्रे यांचे ‘आडवाटेची पुस्तकं’ म्हणजे लेखकानी मांडलेल्या पुस्तकशोधाचा, पुस्तक निर्मितीचा, भाषांतरांचा, पुस्तक-लेखक यांच्या संबंधीच्या हकीकती-आख्यायिकांचा विस्तीर्णपट असून हा सुखद प्रवास कधीच संपू नये असे वाटू लागते. हे पुस्तकाचे जग किती विस्तीर्ण व अवाक करणारी आहे याची कल्पना आल्यावर आपण थक्क होतो. गणेश विसपुते या कवीनी या पुस्तकाबद्दलच्या उल्लेखात म्हटल्याप्रमाणे य़ा आडवाटांवरून प्रवासाचा जो विस्तीर्ण पट मांडला आहे, तो प्राचीन भारतीय साहित्यापासून जागतिक साहित्यातल्या श्रेष्ठ साहित्यकृतीपर्यंत समकालीन साहित्याचा रोचक तपशील देत हा वाचनप्रवास रम्य करतो, दृष्टी विस्तारतो आणि जाणीवांच्या मितींची व्याप्ती वाढवतो.

या पुस्तकाचे लेखक आडवाटेवरची श्रेष्ठ दर्ज्याची पुस्तकं शोधत शोधत आपल्यासारख्या वाचकांना अपरिचित असलेल्या स्पेन, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, बल्गेरिया, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, सर्बिया, ब्राझिल, पोलंड, इटली, इस्राइल, अर्जेंटाइना इत्यादी देशातील अत्युत्तम साहित्याचा परिचय करून देतात. त्यांना आवडलेल्या लेखकांची यादी थक्क करून जाते. या यादीत सर्बियन लेखक मिलोराद पाविच, पॉल व्हलेरी, दानिलो किश, झोरान झिक्वोविच, स्पॅनिश लेखक एंत्रिके मातास, सेर्गिओ पितोल, आर्तुरो पेरेझ रिवेर्ते, रोबेर्तो बोलानो, अन्तोनिओ मुन्योझ मोलिना, लुइस गोयतीसोलो, फ्रेंच लेखक जॅक प्रेवेर, मार्सेल बेनाबू, मेक्सिकन लेखक इग्नाशियो पॅदिल्ला, जर्मन लेखक कार्लोस मारिआ दॉमिगेझ, मायकेल क्र्यूगर, पोर्तुगीज लेखक फर्नांदो पेस्सोआ, रशियन लेखक आन्द्रे कुर्कोव्ह, पास्तरनाक, स्वेताएव्हा, सिगिझमुंड शिशानोवस्की, आन्द्रे बिटोव्ह, व्हिक्टर पेलेविन, झेक लेखक मिरोस्लाव होलुब, इटालियन लेखक जिऑर्जिओ प्रेसबर्गर, अन्तोनियो ताबुकी, कार्लो एमिलिओ गाद्दा, जपानी लेखक हारुकी मुराकामी, रोमन लेखक इओन मानोलेस्कु, पोलिश लेखक गुस्ताव्ह हर्लिंग, बल्गेरियन लेखक गेऑर्गी रुपचेव्ह, इस्रायली लेखक अहरॉन मेग्गेद, युगोस्लाव्ह लेखक डेव्हिड अल्बाहारी, रुमानियन लेखक दुमित्रु सेपेनियग, ब्राझिलियन लेखक शिको बुआर्क, मोअकिर स्किलयार, हंगेरियन लेखक लास्लो क्रास्नोहर्काई, इशत्वान ओकेन्य, चिलियन लेखक कार्लोस लाबे इत्यादी लेखक आहेत.

काही अपवाद वगळता या यादीतील लेखकांचे मासलेवाइक साहित्यकृतींचा परिचय करून देताना आपल्याला ही पुस्तकं वाचायला मिळाले नाहीत याबद्दल हळहळ वाटू लागते. डिक्शनरी ऑफ खजार्स, लास्ट लव्ह इन कॉन्स्टांटिनोपल, शॅडो विदाऊट अ नेम, एनसायक्लोपिडिया ऑफ द डेड, सीन्स फ्रॉम द लाइफ ऑफ अ बेस्ट सेलिंग ऑथर, मॅन इन द टॉवर, बुक ऑफ डिस्क्वाएट, लेटर्सःसमर 1926, मस्यू तेस्ते, टीथ अँड स्पाइज, बुडापेस्ट, अ वाइल्ड शीप चेज, रेक्वियम, 2666, स्किड, व्हाय आय हॅव नॉट रिटन एनी बुक्स, द टेल दॅट किल्ड एमिली नॉर, द लिटल् फिंगर ऑफ बुद्ध, द पिजन पोस्ट, काफ्का अँड लेपर्ड्स, द ब्लाइंड आउल, वन् मिनट स्टोरीज, ... अशा अनेक पुस्तकांचे परिचय लेखक करून देत आहेत. या पुस्तकातील काही महत्वाच्या नोंदी वाचत असताना पूर्ण पुस्तक वाचावेसे वाटू लागते.

या संपूर्ण आडवाटेच्या जागतिक ग्रंथव्यवहारात प्राकृत भाषेतील पुष्पदंत यांचे जसहर चरिउ, श्रीधरदासकृत सदुक्तिकरणामृत आणि हिंदीतील मनोहर शाम जोशी यांचे कुरु-कुरु स्वाहा या भारतीय ग्रंथांचा समावेश आहे. कदाचित आधुनिकोत्तर साहित्याच्या मोजपट्टीतून मोजल्यास भारतीय अशी एवढीच ग्रंथसंपदा असू शकेल, हेही नसे थोडके!

‘आडवाटेची पुस्तकं’ यातील सर्वच्या सर्व चाळीस लेख ‘आपले वाइमयवृत्त’ आणि ‘लोकसत्ता’ या नियतकालिकेत या पूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. तरीसुद्धा तुकड्या-तुकड्याने या प्रकारचे लेख वाचण्यापेक्षा सलग वाचण्यातली मजा और असते. पुस्तकाच्या मनोगतात लेखकानी त्यांच्यात पुस्तकाची आवड कशी निर्माण झाली, अशा प्रकारची पुस्तकं त्यांना कुठ कुठ व कसे मिळत गेली, आधुनिकोत्तरवाद देत असलेली दृष्टी इत्यादीबद्दल विस्तृतपणे सांगितले आहे. लेखकाच्या मते आजच्या मूल्यहीन, चंगळवादी आणि खंडित जगण्याला व्यक्त करू पाहणारी आधिनिकोत्तरवाद ही महत्वाची दृष्टी आहे. ती परिपूर्ण नसली तरी तिच्यामुळे लेखन आणि वाचन प्रक्रियेत ताजेपणा आला हे नाकारून चालणार नाही, लेखक-वाचक संबंधात अनेक नव्या मिती जोडल्या गेल्या. याच परिप्रेक्ष्यातून हे लेख वाचत गेल्यास लेखकाचे म्हणणे पटू लागते.

लेखात लेखकांनी उल्लेख केलेली पुस्तकं कदाचित मूळ स्वरूपात न वाचता अनुवादित स्वरूपातूनच वाचले असण्याची शक्यता जास्त आहे. आणि यातील बहुतेक पुस्तकं लेखकांच्या कल्पनाशक्ती व सर्जकतेला वाव देणाऱ्या कादंबरी या लेखन प्रकाराचे आहेत. लेखकांनी एके ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे कादंबरीत भाषा हे केवळ साधन नसून साध्य आहे. ती अनुवादित रूपात वाचणं चांगल नाही. कारण आपण नेमके काय गमावतोय हे वाचकाला कधीच कळणार नाही. तो अनुवादकाचं बोट धरून पुढे जात असतो. त्यामुळे वाचताना किमान ठेच लागू नये अशी त्याची अपेक्षा असते. कदाचित या जागतिक कीर्तीच्या लेखकांना चांगला अनुवादक मिळाल्यामुळे पुस्तकांचा दर्जा घसरला नसावा.

लेखकानी आपल्या मनोगतात उल्लेख केल्याप्रमाणे मी का वाचतो? या प्रश्नाचे उत्तर ‘आनंदासाठी’ असं देता येईल. पण वाचताना आणि वाचून झाल्यावर वाचकांच्या आत अनेक सूक्ष्म बदल घडत असतात. पुस्तक वाचणं हा एक सांस्कृतिक संवाद तर असतोच. पण त्याचबरोबर तो जैविक, भौगोलिक आणि राजकीय संवादही असतो. हा संवाद लेखक आणि वाचक दोघांच्याही क्षमतेवर अवलंबून असतो. पुस्तकं केवळ आनंदच देतात असे नाही, वेळप्रसंगी भक्कम आधारही देतात. जगण्याच्या गुंतागुंतीवर एखादा समाजशास्त्रज्ञ किंवा मानसोपचारतज्ञ ज्या नेमकेपणानं बोट ठेवतो त्याच, किंबहुना जास्तच नेमकेपणानं काफ्का किंवा तुकाराम आपल्या साहित्यातून ही जटिलता व्यक्त करत असतात. श्रेष्ठ लेखक आपल्या लेखनातून कोणतही ढोबळ विधान करत नाही. तो वाचकाला मोकळं सोडतो. स्वतःहून भिन्न असलेल्या माणसांच्या सहवासात राहण्याची त्यांना समजून घेण्याची अद्भुत क्षमता साहित्यातून वाचकाला मिळत असते. ही भिन्नता जेवढी अधिक, तेवढं वाचकाच्या समजूतदारपणाचं आणि आकलनाचं क्षितिज रुंदावत जातं. आणि हे क्षितिज आणखी जास्त विस्तारण्यासाठी जागतिक श्रेष्ठ साहित्यिक नक्कीच हातभार लावत असतात.

या पुस्तकातील एकूण एक लेख चांगल्या चित्रपटांच्या ट्रेलर्सची आठवण करून देतात व संपूर्ण चित्रपट बघायचे राहून गेले अशी चुटपुट मनाला लावतात. पुस्तक म्हणजे रद्दी म्हणून विकणारी वस्तू नव्हे किंवा केवळ आपल्या कल्पनांना वाट करून देणारे वाहकही नव्हे. त्या आपल्या भावनांना प्रतिसाद देणाऱ्या चिरंतन आठवणी आहेत. निखिलेश चित्रे यांनी त्यांच्या या दोनशे पानी पुस्तकातून चिरंतन जागतिक साहित्य काय असू शकते याची कल्पना दिली आहे. त्यासाठी वाचक नेहमीच त्यांचे ऋणी राहतील.

आडवाटेची पुस्तकं
निखिलेश चित्रे
लोकवाङ्मय गृह, मुंबई
मूल्यः 350 रु, पृ. सं 201

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

यात सुचवलेली पुस्तके मिळवुन वाचणं एक अनुभव आहे.
सध्या या पुस्तकात वर्णन आलेलं एनसायक्लोपिडिया ऑफ द डेड, वाचतोय्
भन्नाट आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0