माईंची सूरसंगत ( लोकसत्ता ) आणि जगदीश पटवर्धन यांचा गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर ह्यांच्यावरील लेख

मोगूबाई कुर्डीकरांचा जन्म १५ जुलै १९०४ रोजी गोव्यातील कुर्डी गावात झाला. लहानपणापासूनच घरातील संस्कार व आई जयश्रीबाई यांची शास्त्रीय गाण्याची तळमळ मोगूबाईंना गानतपस्विनी होऊनच शांत झाली असेल. मोगूबाईंना आईने १९११ साली हरिदासबुवांकडून प्रथम गानसंस्कार केले. पण हरिदासबुवा म्हणाले मी एका गावात फार दिवस राहत नाही त्यामुळे त्या हताश झाल्या.

मोगूबाईंच्या आईने शेवटच्या श्वासाआधी बाळकृष्ण पर्वतकराना बोलावून आपली अखेरची इच्छा प्रगट केली “मोगू” तुझ्याभोवती घोटाळणारा माझा आत्मा ज्या दिवशी तू मोठी गाइका म्हणून मान्यता पावशील त्याच दिवशी पावन होईल. मोगूबाई मुळातच बुद्धीमान. कोणतीही गोष्ट एकदा सांगितली की चटकन आत्मसात करायच्या. वयाच्या ९व्या वर्षी १९१३ साली त्यांनी चंद्रेश्र्वर भूतनाथ नाटक कंपनीत दाखल झाल्या. पण योगायोग विचित्र होता १९१४ साली मातोश्री जयश्रीबाईना मोगूबाईंपासून देवाने अलग केले त्यांची छत्रछाया गेली.

१९१७साली सतारकर स्त्री नाटक कंपनीत दाखल झाल्या तेथेच चिंतुबुवा गुरव यांनी त्यांना गायनाचे धडे देण्यास सुरूवात केली. त्याच वेळी रामलाल यांच्याकडून त्यांनी दक्षिणात्य कथ्थक नृत्याचे शिक्षण घेण्यासही सुरूवात केली. नर्तनातील मोहक पदन्यास्ा भावपूर्ण मुद्रा लय व अभिनय हे पुढे त्यांच्या स्वरांना सखोल समज व परिणाम देण्यास उपयोगी पडले. चिंतुबुवाना मोगूबाईंच्यात आकलन शक्तीला आणि ग्रहण क्षमतेला एक प्रकारची धार होती तसेच गाणं शिकण्यासाठी कितीतरी ओढ आणि तत्परता आहे असे वाटले. सुरांवरील हुकूमत तालाच ज्ञान व सुरेल संगीत सादर करण्याच भान निराळ होत.

त्या काळात सौभद्रात ‘सुभद्रा’ पुण्यप्रभाव नाटकात ‘किंकिणी’ शारदेत ‘शारदा’ मृच्छकटिकात ‘वसंतसेना’ अशा विविध आर्त आव्हानात्मक भूमिकांतून त्यांना रंगमंच वैभवी करून टाकला. याच काळात त्या दत्तारामजी नांदोकरांच्याकडे गझल शिकल्या ठुमरी दादरा कजरी टप्पा होरी हे संगीत प्रकार आत्मसात केले परंतू त्यांच मन रमेना. काही संगीत प्रकार त्यांना फुलदाणीत सुरेख रचना करून ठेवलेल्या कागदी फुलांसारखे वाटत तर काही कुंडीतील गोजीरवाणी रोपटी पण घनगर्द जंगलाचे भान देणारे पुरातन वृक्ष त्यांना या संगीतात कोठेच आढळले नाहीत. ज्या स्वरांच्या आराधनेने कंठाचे तिर्थस्नान होईल तो सूर हा नव्हे आपल्या आईला अभिप्रेत असलेले संगीत हे नव्हे.

मोगूबाई खूप खचल्या होत्या प्रत्येक ठिकाणी दैव आड येत होतं. त्यात शरीर कमजोर झाले होते. त्यांच्या मावशीने त्यांना १९१९साली प्रकृती स्वास्थासाठी सांगलीला नेलं. सांगलीला जाण त्यांच्या संगीत जिवनाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच पर्व होत. याच वर्षी खाँ इनायत पठाण यांच्याकडे त्यांनी एक वर्ष संगीत शिक्षण घेतले. सांगलीतील राजवैद्य आबासाहेब सांबारे यांच्याकडे प्रकृतीच्या उपचारासाठी आल्या आणि त्यांना ऐक नवीन दालनच उघडून मिळाले. राजवैद्यांच्या दिवणखाान्यात दर शुक्रवारी संगीताची मैफल भरत असे. त्यात पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर पं.पलुस्कर खाँसाहेब अबदुल करीम खॉं भूगंधर्व रहिमत खॉं गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे आणि संगीतातील शिखर म्हणून महाराष्ट्राने गौरविलेले खाँसाहेब अल्लादिया खाँ. महाराष्ट्रातील शिष्ट समाजात शास्त्रीय संगीताला उत्तरेतून आणून मानाचं स्थान मिळवून दिलं. जसं ज्ञानेश्र्वरांच्या काळी थोर संतांची मांदियाळी एकत्र आली आणि सावळया परब्रम्हांचे वेड त्यांनी सगळया समाजात संक्रमित केलं तसचं.

१९२० साली मोगुबाईंना स्वतःहून शिकविण्यासाठी त्यांचे रियाजाचे बोल ऐकून संगीतसम्राट खाँसाहेब अल्लादियाँखाँ यांनी आपण होऊन त्यांचा शिष्या म्हणून स्वीकार केला. ही तालीम वर्षभर चालली कारण खाँसाहेब इनायत पठाण यांनी त्यांची शिकवणी आचानक थांबवली होती.

गोंदवलेकर महाराज आपल्या गुरूच्या शोधात संपूर्ण भारतभर हिंडले. धोर संतपुरूषांना भेटले पण ते आपल्या जीवीचं शिवतीर्थ आहे असं त्याना वाटल नाही. गोंदवलेकर महाराजांना त्यांचा गुरू आसेतू हिमाचल हिंडून झाल्यावर परभणी जिल्हात येहेळ गावी मराठवाडयातील एका कोपर्‍यात तुकामाईंच्या स्वरूपात भेटला. रामनाम रसायनानं ते साक्षात्कार त्यांनी अनुभवले. अशीच उत्कट इच्छा त्यांना खाँसाहेब अल्लादियाँखाँ भेटल्यावर झाली व त्या म्हणाल्या होत्या “हेच दिव्य संगीत मला आत्मसात करायचं होतं.” १९२२ साली राजर्षी शाहू छत्रपती गेले. त्यातच खाँसाहेबांच उताराला आलेल वय व त्यातच राजाश्रय संपला होता म्हणून त्यांना नाइलाजाने आता सांगलीतून मुंबईला मुक्काम हलवावा लागणार होता त्यामुळे मोगूबाईंच्या गाण शिकविण्यात पुन्हा व्यत्यय येणार होता. पण त्या परत गोव्याला गेल्या.

१९२२ साली मोगूबाई रमामावशी बरोबर मुंबईत खेतवाडीत आल्या. खाँ. अल्लादियाँ खाँची पुन्हा तालीम जवळ जवळ दीड वर्षे लाभली. याच सुमारास लयभास्कर खाप्रुमामा यांची ओळख व सहवास लाभला. त्या दिवसात सुद्धा गायकात शिक्षकांत कुरघोडी दुस्वास मत्सर होता म्हणून अश्या काही अटींवर खाँसाहेबाना एका विद्यार्थीनीची शिकवणी करावी लागली की त्यामुळे मोगूबाईंची शिकवणी बंद झाली. हा अघात त्यांच्यासाठी खूपच मोठा होता.

१९२३ साली श्री.माधवराव भाटियांशी विवाह झाला. पण त्या आधी त्यांना आलेल्या अनुभवावरून त्यांनी एकदम पसंती कळवीली नाही. कारण त्यांना आई हवीहवीशी वाटली तेव्हा ती दुरावली. गुरूदारी आले ज्ञानार्जन केले आणि दूर गेले म्हणून श्री भाटियांना होकार कळविण्या आधी त्यांना त्यांचे मनोगत सांगितले एकमेकांचा विश्वास बसला व मग लग्न झाले. पण १९२३ ते १९३९ साला पर्यंत त्यांच्या संगीत जीवनातील स्थित्यंतर आता त्या एकटया भोगत नव्हत्या तर त्यांना श्री भाटियांचा म्हणजे पतीचा आधारही होता. १९२४ साली आग्रा घराण्याचे बशिरखाँ यांच्याकडे संगीताचे धडे घेण्याचे श्री माधवरावांच्या आग्रहामुळे झाले पण नंतर १९२६ साली बशिरखाँ म्हणाले तुम्ही बडे मियाँचा गंडा बांधा. तरी तालीम बशिरखाँची चालू आणि गंडाबंधन विलायत हुसेन खाँ यांचे त्याना जरा नवलच वाटले. पण बशिरखाँच्या आग्रहावरून गंडाबंधनाचा कार्यक्रम मुंबईतील बोरभाट लेनमधील ‘कालिदास’ बिल्डिंगमध्ये १९२६साली झाला. घराण बदललं तरी कुंडलीतिल खंडीत शिक्षण योग कसा बदलणार. नंतर तीनएक महिन्यानी प्रकृतिच्या कारणास्तव विलयत हुसेनखॉ मुंबईबाहेर गेले.

अल्लादियाखाँ साहेब ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते त्यांच्या जवळच्या मागील बाजूस मोगूबाई राहत होत्या. त्यांच्या गाण्यातील बदल त्यांना असहय झाला. अल्लादियॉखाँ यानी त्यांच्या भावाला हैदरखाँना कोल्हापूरहून बोलावून मोगूबाईंची तालीम पुन्हा सुरू केली ते साल होते १९२६ आणि घराणे जयपूर. १९२६ सली सूरू झालेली तालीम १९३१ सालच्या एप्रिल महिन्या पर्यंत चालू होती. पण त्यावेळेस मोगूबाई गर्भवती होत्या. १० एप्रिल १९३१ साली मोगूबाईंना कन्यारत्न झाले.

जी व्यक्ती स्वर आणि लय यांच्या स्वाधीन झाली त्यांना संगीतातील मर्म कळले असे म्हणतात. तंतुवाद्यात सारंगी व चर्मवाद्यात तबला ही दोन अती कष्टसाध्य तितकीच कठीण वाद्यं. उस्तादलोक देखील लयीला बिचकतात. मोगूबाईंच्या शेजारी खाप्रूमामा पर्वतकर राहायला आले. त्यांना ‘लयभास्कर’ हीच पदवी होती. स्वर व लय येथे लय पावतात आणि त्याच्या डोलात गाणारा आणि ऐकणारा या दोघांचीही लय लागते. म्हणून त्याला लय म्हणायचे असे पर्वतकरमामा होते. त्यांच्या उपस्थीतीत एकदा HMV मधील रखडलेल साडेपंधरा मात्रेतील योगतालतील यमन रागातील तराण्याची ध्वनिमुद्रिका पाच मिनिटांत रेकॉर्ड झाली जी सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत झाली नव्हती.

१९३४ साली संगीत सम्राट अल्लादियाखाँ यांचा गंडा बांधला. त्यासाठी त्यांनी १२५ तोळे सोने विकून गुरूदक्षिणा दिली. त्या काळात गंडाबंद शागिर्द असणे व नसणे यात औरस व अनौरस संतती इतका फरक केला जात होता. हा २६ वर्षांचा काळ म्हणजे खर्‍या अर्थाने कुरूक्षेत्रावरील रणांगण होतं. हयाच सुमारास त्या ख्यातनाम गायिका म्हणून मान्यता पावल्या ही तालीम १२ वर्षे चालली. १९३५ साली व्दितीय कन्या ललिता हिचा जन्म झाला. आणि १९३८ साली चिरंजीव उल्हास उर्फ बाबू याचा जन्म झाला. १९३९साली श्री.माधवराव भाटिया यांचा मृत्यु झाला. १९४० पासून मैफलींचे दौरे रेडिओवरून गायन संगीताच्या तालमी सुरू झाल्या.

शास्त्रीय संगीताची उपासना करताना महाराष्ट्रातील कलवंताना जे कष्ट उपसावे लागले आणि अर्ध्या अधीक आयुष्याची वाट लावावी लागली तसे कष्ट दगदग उत्तर हिन्दुस्थानतून गायक व वादक महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले त्यांच्या वाटयाला आले नाहीत. गायन वादन हेच मुळी त्याचं खानदान. श्रीमंती मोजायची ती रूपये मोहरांनी नाही तर किती हजार अस्ताई अंतरे आणि धृपदे जवळ आहेत या संख्येवर. मुलीला लग्नात जावयाला हुंडा म्हणून लखनौ घराण्यातील ह्यतबल्यातीलहृ तीनशे कायदे मिळाले होते. अल्लादियाँ खाँसाहेब १८९२साली महाराष्ट्रात आले आणि लोकांच्या गळयातील ताईत झाले. जाणकारांनी त्यांना बरीच बीरूद विशेषणं लावली. उत्तुंग अशा पदव्या बहाल केल्या. अल्लादियाँ खाँसाहेब १३ मार्च १९४६साली मुंबईत पैगंबरवासी झाले.

त्यानंतर मोगुबाईंनी त्यांच्या मुलीला किशोरीला गायनाचे धडे देण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यानी बर्याच गुरूंकडे शिक्षणासाठी पाठवले. १९६५ साली त्यांनी कुर्डीगावातल्या रवळनाथ मंदिराचा जिर्णोद्धार केला ज्याने मोगूबाईंनी त्यांच्या आजीला दिलेला शब्द पुरा केला.

१९६८साली नोव्हेंबरमध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते “संगीत नाटक अॅकेडमीचे अॅवॉर्ड” देऊन गौरवण्यात आले होते. १९६९ मध्ये आकाशवाणी तर्फे सत्कार झाला. केंद्र सरकारने २६ जानेवारी १९७४ साली मोगुबाईंना ‘मद्मभुषण’ पुरस्कार देऊन गौरवीले. मार्चमध्ये महाराष्ट्र शासनाने गौरवपूर्वक मानधन मंजूर केले. १९७५ साली अनेक संगीत संस्थानी सन्मान केले. ‘द लास्ट टिटान’ ‘द ओनली व्हिजार्ड‘ ‘गानतपस्विनी’ म्हणून सन्मान. १९८५साली किशोरी ताईंस संगीत नाटक अॅकेडमीचे अॅवॉर्ड मिळाले. ‘पद्मभुषण’ पुरस्काराचा मान १९८७ साली राष्ट्रपतींच्या हस्ते प्राप्त झाला. हे व असे अनेक पुरस्कार मिळाल्याचे ऐकून त्यांना धन्य झाल्याचे वाटले.

मोगूबाईंच्या काळात संगीतविद्या आत्मसात करण ही सोपी गोष्ट नव्हती कारण थोर उस्तादांच्या जीवन धारणा वेगळया होत्या. आपली विद्या आपल्या कुटुंबीयाना वारसदारनाच देण्याची अत्यंत संकुचित आणि मार्यादीत कल्पना असल्यानं इतर कोणालाही ही कला मिळवणं म्हणजे कष्टाचं व किमतीचं काम होतं. विद्यादानाच्या बाबतीत ही मंडळी कंजूष होती. इतर कलकार आपल्या अनमोल चिजा हिरावून नेतील म्हणून फारच गुप्त ठेवण्यात येत असत. ‘कुबेरान आपल अक्षय भांडार चोरांच्या भीतीनं भूमीत दडवावं अशा पैकी हा प्रकार होता” हे गोविंदराव टेंबे यांनी फार खेदाने म्हंटल आहे.

गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना १० फेब्रुवारी १९९९ रोजी देवाज्ञा झाली आणि एका तळपत्या व्यक्तीमत्वाचा अस्त झाला.

( लेखन व संशोधन – जगदीश पटवर्धन

स्मरण
केशव परांजपे
पुण्यश्लोक गानतपस्विनी
मोगूबाई कुर्डीकर वयाच्या सत्त्याण्णवाव्या वर्षी स्वर्गवासी झाल्या. युगाचा अंत तर आधीच झाला असावा, पण युगाची निशाणीही मिटली. बदलणारा काळ कुणालाच थांबवता येत नाही. पण ज्यांच्या जीवनकार्याच्या स्मरणाने माणूस म्हणून पाय रोवून उभे राहण्याची शक्ती मिळावी, अशा दीपस्तंभांपैकी त्या एक होत्या. मोगूबाईंनी ज्या निष्ठेने अभिजात संगीतकलेची साधना केली ती निष्ठा संगीतकलेचे मोठेपण अधोरेखित करते.
दि.१५ जुलै २००४. गानतपस्विनी कै.मोगूबाई कुर्डीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची समाप्ती. मोगूबाईंच्या नावाचा कुठे रस्ता, चौक, ऍक ॅडमी किंवा एखादा पुरस्कारही त्यांच्या कर्मभूमी मुंबापुरीत नाही. संगीताच्या प्रवाहाला अभिजाततेचा घाट बांधून त्याचं ‘तीर्थ‘ बनविणार्‍या त्या पुण्यश्लोक तपस्विनी होत्या या बाबतीत मात्र शंका नाही. १० फेब्रु. २००१ रोजी आपली इहलोकीची सुदीर्घ यात्रा संपवून वयाच्या सत्त्याण्णवाव्या वर्षी त्या स्वर्गवासी झाल्या. युगाचा अंत तर आधीच झाला असावा, पण युगाची निशाणीही मिटली. बदलणारा काळ कुणालाच थांबवता येत नाही. पण ज्यांच्या जीवनकार्याच्या स्मरणाने माणूस म्हणून पाय रोवून उभे राहण्याची शक्ती मिळावी, अशा दीपस्तंभांपैकी त्या एक होत्या. मोगूबाईंनी ज्या निष्ठेने अभिजात संगीतकलेची साधना केली ती निष्ठा संगीतकलेचे मोठेपण अधोरेखित करते. दि. २८ फेब्रु. २००१ या दिवशी विलेपार्ल्याच्या ‘स्वरमाऊली‘ या संस्थेने आयोजित केलेल्या मोगूबाईच्या श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केलेल्या मनोगतांचे हे संक्षिप्त संकलन ः

मोगूबाईंकडे शिष्यवृत्तीच्या अंतर्गत सहा वर्षे तालीम घेतलेल्या सुप्रसिद्ध गायिका पद्मा तळवलकर ः-

माईंचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या गाण्यासारखंच पवित्र, सोज्ज्वळ होतं. त्या गाण्याला तपस्येचं तेज होतं आणि व्यक्तिमत्त्वाला दरारा होता. ख्याल गायकीत आणखी काहीतरी घालून गायिका बनावं असं माईंना कधी वाटलंच नाही. ‘‘एकामागून एक चार, फक्त ख्याल गाऊन तुम्ही मैफल मारू शकलात तर तुम्ही खरे खानदानी गवई झालात,‘‘ असं त्या नेहमी सांगायच्या. या बाबतीत आम्ही हरलो. सर्व प्रकारची प्रतिकूलता असूनही माई मात्र जिंकून गेल्या. मुखडा सुंदर करण्यासाठी तो नटवावा, त्यात काहीकाही भरावं, त्यात विविधता आणि वैचित्र्य आणावं, असं माईंनी कधीच केलं नाही. अगदी त्याच जागेवरून उठून तसाच तो समेला येई आणि तरीही प्रत्येक वेळी तो नवा, वेगळा आनंद देई. आलापीबरोबर तो असा काही जुळून येई की आलापीच्या कोंदणातला जणू हिरा. माईंच्या कलाकृतीत अंधुकपणा बिलकुल नव्हता. काम सूक्ष्म असूनही त्यात इतकं सौष्ठव होतं! माईंची लयीवर हुकूमत होती म्हणजे किती? अनभिज्ञ श्रोत्यांपर्यंत आवर्तनाची जाणीव त्या संक्रमित करू शकत होत्या. अस्ताई सुरू केली की जणू संपूर्ण मैफलीला सम दिसू लागे- अवघी मैफलच माईंबरोबर हो-हो करत मुखडा घेऊन समेला येई! असं ते हुकमी काम होतं. माई प्रत्येक बाबतीत काटेकोर होत्या. जसं गाण्याचं, तसंच नेसण्याचं, बसण्याचं, वेळेचं. सबब ही गोष्ट त्यांच्या कोशात नव्हती. दुसर्‍यासाठी नाही आणि स्वतःसाठी तर नाहीच नाही. सत्तराव्या वर्षीही माई नियमितपणे तबलजी लावून रियाज करीत. गाणं ठरलं की त्या मैफिलीच्या रागांचा सकाळ- संध्याकाळ रियाज चाले आणि मग तो एकेक राग जो चढे, तो श्रोत्यांच्या स्मरणातून आयुष्यभरात न उतरावा.

विद्वान तबलावादक पं. सुरेश तळवलकर ः

मोगूबाई म्हटलं की शिस्त, तत्त्वनिष्ठा! तो काळ कसा होता? माझ्या आवाजाचा पल्ला किती मोठा आहे, माझी तान किती द्रुत जाऊ शकते याचं प्रदर्शन मांडण्यासाठी गाणं नव्हतं- गाणं गाण्यासाठी होतं. गाण्याची एक शिस्त होती. आपले उपजत गुण असोत की साैंदर्याच्या कल्पना असोत, शिस्तीच्या मुशीतूनच तावून सुलाखून त्या आपल्या गाण्यात स्थिर झाल्या पाहिजेत, असा दंडक होता. परंपरा, शिस्त, दर्जा यांचा साधनेने खोलवर संस्कार झाल्याशिवाय कल्पनेकडे बघायचंही नाही. नाहीतर नवीन कल्पनांच्या आहारी जाणं आणि तडजोड करणं येतं. सांगीतिक साैंदर्याच्या कल्पना कालपरत्वे बदलतात, व्यक्तिपरत्वेही बदलतात, पण त्यात काही शाश्वत असतं. त्या शाश्वतापर्यंत पोहोचण्यासाठी, कल्पनांचा विस्तार होण्यापेक्षा त्या अधिक खोल, कसदार बनण्यासाठी, शिस्तीची नितांत आवश्यकता असते आणि माईंचं चैतन्यमय, नित्यनूतन गाणं, या तत्त्वप्रणालीचा वस्तुपाठ होतं. गाण्यात रंग आणण्यासाठी माईंनी काहीही उसनं घेतलं नव्हतं. माईंइतका निर्मळ अस्ताई- अंतरा कुणाचाही नाही- अनलंकृत पण कसदार, पीळदार आणि घोटीव- राग, ताल, ठेकावाचक. राग- तालाचं सत्त्व सांगणारा तो अस्ताई अंतरा म्हणजे तबलजींना वाटावं की मूर्तिमंत ताल-ठेका! तर त्याच वेळी गायकांना वाटावं की मूर्तिमंत राग! माईंच्या मैफिलीत माईंबरोबर त्यांच्या दोन-तीन शिष्या मुखडा इतका तंतोतंत सारखा म्हणत, की त्याच्या शिल्पसदृश काटेकोरपणाची पुरती जाणीव श्रोत्याला व्हावी आणि त्या साैंदर्याने श्रोता दिपून जावा. रागदारी संगीतात, विशेषतः खयाल गायकीत हा काटेकोरपणा येण्यासाठी अभ्यास अतिशय सूक्ष्म असायला पाहिजे. मोकळेपणातली शिस्त ही खरंच फार कठीण असते. माईंची तान काय वर्णावी? एवढी पल्लेदार, सुरेल, आकारयुक्त आणि डौलदार तान फारच दुर्मिळ! घोटीवपणाची अचूकता आणि उत्स्फूर्ततेचा तजेला तिच्या ठायी एकाच वेळी होता. योग तालातला (साडेपंधरा मात्रा) माईंचा यमनचा तराणा ऐका. साडेअकराव्या मात्रेवरून मुखड्याला सुरुवात आहे. तालाच्या कोणत्याच खंडावरून मुखडा उठत नाही. (विषमग्रह). आपल्या गायकीचा आविष्कार मुखड्याच्या टोकाशी संपवून प्रत्येक वेळी तिथूनच त्या मुखडा घेतात. पुन्हा गायकीही तांत्रिक, गणिती नाही. वेगळ्याच लयीत ताना चालल्या आहेत आणि तरीही अचूकच नव्हे, तर ‘सहज‘ त्याच मात्रेवर मुखडा उठतो आहे- इतका सहज, की जणू त्रिताल चालला आहे. योगतालासारख्या अवघड तालात ठाय, दुगुण, दीडी करण्याचा माईंचा रियाज होता. (किशोरीताईही त्यात सहभागी असत.) परंतु प्रस्तुतीमध्ये माईंनी लयीच्या आघातांनी, धक्क्यांनी कधी रसभंग होऊ दिला नाही. स्त्री कलाकाराला शोभेल, अशी शैली माईंनी विकसित केली. लयकारीसाठी कधी शब्द तोडले नाहीत. बंदिशीची काव्यपंक्ती कधी अर्धवटही सोडली नाही.
बबनराव हळदणकरांनी माईंच्या हृद्य आठवणी सांगितल्या. माईंकडे शिकायला लागल्यावरही माईंनी त्यांना आपली ‘अंगात मुरलेली‘ आग्रा गायकी पुसून जयपूर स्वीकारायला लावली नाही. ‘मी तुझा आवाज मोकळा करून देते. बाकी तुला गायचं ते तू गा,‘ असंच त्यांनी सांगितलं. खादिम हुसेन खांकडे जावं, असं बबनरावांच्या मनात आल्यावरही माईंनी उदारपणे खांसाहेबांबद्दल गौरवोद्‌गार काढून त्यांच्याकडे जाण्याची परवानगी दिली. गणपती उत्सवात हळदणकरांकडे अन्वर हुसेन खां आदी कलाकार मंडळी आक्षेपून गाऊन जात. असेच एकदा पाहुण्यांनी बैठक भरलेली आणि खांसाहेब बर्‍याच उशिरापर्यंत आले नाहीत, तेव्हा केवळ ऐकायला आलेल्या माईंनी कुणाच्याही नकळत आपली वाद्यं आणवली, साथीदारांना बोलावलं आणि आपण स्वतः गाऊन प्रसंग उत्तम रीतीनं साजरा केला! उशिरा आलेले खांसाहेब मात्र त्यानंतर माईंचा मान म्हणून गायले नाहीत. बबनराव बी.एस्सी. झाले त्याच वर्षी माईंची कनिष्ठ कन्या ललिता मॅट्रिक झाली. माईंनी हळदणकरांकडे पेढ्यांचे दोन पुडे पाठवले- एक छोटा, लेकीच्या कौतुकाचा, दुसरा मोठा, बबन पदवीधर झाल्याचा! ललिताच्या वर्गमैत्रिणीचा कॉलेजचा प्रवेश, फी वेळेवर देता येत नसल्याने रद्द व्हायची वेळ आली, तेव्हा मागचा-पुढचा विचार न करता माईंनी त्या काळात २०० रुपये काढून ललिताच्या हातावर ठेवले.

माईंच्या ज्येष्ठ शिष्या कौसल्या मंजेश्वर

माईंच्या आणि त्यांच्या पहिल्या मुलाखतीचा किस्सा तर विलक्षण उद्‌बोधक आहे. एका कार्यक्रमात कौसल्याताईंचं गाणं ऐकून दुसर्‍या दिवशी माई कौसल्याताईंच्या घरी उभ्या ठाकल्या- बंदिशीच्या शब्दरूपात काही चूक होती- ती दुरुस्त करण्यासाठी! ‘‘मी पण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो!‘‘ हेच खरे.
केसरबाईंच्या शिष्या धोंडूताई कुलकर्णी म्हणतात, ‘‘आमच्या घराण्यातला एकेकजण ताठ मानेने उभा असतो. कारण खांसाहेबांच्या गाण्याचे जे अंग आत्मसात होईल, जो अंश मिळेल तेवढाही मान ताठ ठेवायला पुरेसा आहे. पण ही सारी शक्ती एक झाली असती तर!‘‘ धोंडूताई माईंच्या समोर तानपुरा घेऊन बसल्या आहेत. माईंच्या मागेही बर्‍याचदा बसल्या आहेत. ‘‘मोगूबाई विलक्षण विचक्षण होत्या. थातुरमातुर त्यांच्याकडे काही चालतच नसे. त्या खरोखर मोठ्या होत्या,‘‘ असे धोंडूताई आक्षेपून म्हणाल्या. मोगूबाईंची कन्या आणि शिष्या- गानसरस्वती किशोरी आमोणकर! अगदी शेवटीशेवटी एकदा माई विकलपणे म्हणाल्या, ‘‘जे काही गाणं केलं ते या कुडीत आहे, माझ्याबरोबर ते जाणार-‘‘ मग किशोरीताईंकडे बोट करून म्हणाल्या, ‘‘आणि त्यातल्या त्यात हिच्याकडे आहे.‘‘ आणि हसल्या. माईंच्या तालमीपासून फारकत घेऊन किशोरीताई स्वतःच्या वाटेने जाऊ लागल्या, तेव्हा एकच खळबळ झाली होती. आपल्या आरंभ बिंदूपासून निघून आज एक आवर्तन किशोरीताईंनी जवळजवळ पुरं केलं आहे. शास्त्रीय संगीतातील तंत्रखोरीविरुद्ध बंडाचे निशाण उभारून शास्त्रीय संगीताचा भावनिष्ठ आविष्कार साधण्यासाठी किशोरीताईंनी जिवाचे रान केले. शास्त्रीय संगीताच्या भावात्म रूपाबाबत किशोरीताई बोलल्या, नव्हे, ते या हृदयीचे त्या हृदयी घालण्यात त्या यशस्वीही झाल्या आहेत. तरीही त्या म्हणतात, ‘‘मी जसजशी मोठी होत जाते, तसतसं माईंचं मोठेपण मला अधिकाधिक उमगू लागलं आहे. माई मला आक्षेपून जे सांगायची, ते काय आणि का ते आता कुठे कळू लागलंय!‘‘ आपलं गाणं माईंच्या गाण्याहून वेगळं का हे सांगताना किशोरीताई म्हणतात, ‘‘कारण मी माईहून वेगळी आहे, एवढंच. पण संगीतातील दिव्यत्वाचा साक्षात्कार मला माझ्या माईच्या गाण्यातूनच झाला आहे. मला ‘माझ्या‘ गाण्यातून तोच साक्षात्कार साधण्याची तळमळ आहे. माईचं गाणं नाट्यधर्मी होतं. नाट्यधर्मात ते इतकं परिपूर्ण होतं, की ते दिव्यत्वाला पोहोचलं. मी काव्यधर्म अनुसरला आहे. माईच्या पंखांच्या उबेतच मला माझी स्वप्नं दिसली आणि ती साकारण्यासाठी भरारी मारण्याची ताकद माझ्या पंखांना तिथेच मिळाली. मी माईच्या पलीकडचं काही गात नाही. माईच्या गाण्यात उत्तरं आहेत, फक्त मला प्रश्न पडतो, तेव्हा मला ती दिसतात.‘‘ माईंच्या गाण्यावरची किशोरीताईंची श्रद्धा, कन्या आणि शिष्या म्हणून नव्हे, तर एक संगीतसाधक म्हणून अधिक दृढ होत आहे. यातच माईंचं मोठेपण सामावलं आहे!
कल्याणी इनामदारलिखित ‘गानतपस्विनी‘ हा चरित्रग्रंथ, मोहन नाडकर्णी यांचे काही लेख, दूरदर्शन, मुंबईने केलेला एक लघुपट आणि काही इतर स्फुट लेख, एच्‌एम्‌व्हीसारख्या कंपन्यांनी प्रकाशित केलेल्या, आता दुर्मिळ झालेल्या ध्वनिमुद्रिका, आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या गायनाचं काही अभ्यासकांनी करून ठेवलेलं ध्वनिमुद्रण, कौसल्याताई मंजेश्वर आणि निवडक शिष्यमंडळी- ‘मोगूबाई कुर्डीकर‘ या विषयाच्या अभ्यासाची एवढी साधने उपलब्ध आहेत. परंतु ९७ वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या कलावतीने भारतीय संगीत क्षेत्रात पाहिलेल्या चढउतारांचा दीर्घ मुलाखत रूपात आलेख मात्र उपलब्ध नाही, या आपल्या करंटेपणाची जाणीव या क्षणाला नक्कीच अस्वस्थ करू लागली आहे .

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लोकसत्ता , ५ एप्रिल २००९
बलवंत संगीत मंडळीतील प्रमुख स्त्रीपार्टी नट गणपतराव मोहिते यांचे
शुक्रवारी पहाटे सांगली मुक्कामी निधन झाले. नुकतीच, १ जानेवारी २००९ रोजी गणपतरावांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. गणपतरावांना उत्तम आरोग्य लाभले होते. वयाच्या शंभरीतही ते उत्साही होते. संगीत-नाटय़विषयक कुणी काही विचारले तर प्रेमाने सांगत होते. असा हा कलाक्षेत्रातला एका शतकाचा साक्षेपी साक्षीदार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.
गणपतरावांचे पूर्ण नाव गणेश लक्ष्मण मोहिते. जन्म १ जानेवारी १९०९ रोजी मिरज येथे. गणपतरावांचे शालेय शिक्षण मिरज येथेच इयत्ता पहिलीपर्यंत झाले. वडील लक्ष्मणरावांना संगीताची आवड होती. संगीताचे भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे ते थोडीफार गायकी शिकले होते. गणपतरावांना २ भाऊ आणि ५ बहिणी. मोठा बळवंत हा बळवंतराव मराठे यांच्या ‘हिंदी नाटक मंडळीत’ बालनट होता. मधला शंकर हा जनुभाऊ निमकरांच्या ‘स्वदेश हितचिंतक मंडळीत होता. पुढे लक्ष्मणरावांनी शंकर आणि गणूला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’मध्ये दाखल केले. ललितकलादर्शच्या ‘शापसंभ्रम’ मध्ये गणूने महाश्वेताच्या मैत्रिणीचे काम केले.
मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या किलरेस्कर संगीत मंडळीतील मा. दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांनी ‘किलरेस्कर’मधून बाहेर पडून नवीन नाटय़संस्था काढण्याचे ठरविले. १८ जानेवारी १९१८ रोजी बोरिवली येथे या नवीन ‘बलवंत
संगीत मंडळी’ची स्थापना झाली. या तीन प्रमुख कलाकारांबरोबरच अन्य कलाकारांचीही संस्थेला आवश्यकता होती. शंकर आणि गणू या बालनटांची कीर्ती ऐकून कृष्णराव कोल्हापुरे यांनी त्यांना ‘बलवंत’मध्ये आणले. ज्या बलवंत संगीत मंडळीने गणूचे आयुष्यच बदलून टाकले, उजळून टाकले त्या कंपनीत गणू वयाच्या दहाव्या वर्षीच दाखल झाला.
नाटय़ाचार्य अण्णासाहेब (बळवंत) किलरेस्कर आणि लोकमान्य टिळक यांच्या नावाचा सार्थ अभिमान बाळगणारी बलवंत कंपनी राष्ट्रकार्यातही अग्रेसर होती. कंपनीच्या स्थापनेनंतर लगेचच लोकमान्य टिळकांच्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी आयोजित केलेल्या ‘पुण्यप्रभाव’ या नाटकाच्या प्रयोगाला स्वत: लोकमान्य टिळक हजर होते. या नाटकात युवराजाची भूमिका करताना गणूच्या ‘भुलूनिया खलजनालापा’ ‘दुर्दैवे हेतू झाला’ ‘अंतरि खेद भरे’ या पदांना आणि भूमिकेला श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली. पदांना ‘वन्समोअर’ मिळाले. मध्यंतरात लोकमान्यांनी गणूचे विशेष कौतुक करताना म्हटले,
‘युवराजाची सुंदर भूमिका करणऱ्या या मुलाचे कौतुक करावेसे वाटते. याला काहीतरी द्यायला हवे. पण मी हा असा! काय देऊ या मुलाला?’
टिळक असे म्हणताहेत तोच त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या गृहस्थांनी आपली सोन्याची अंगठी काढून टिळकांच्या हातात दिली. ‘‘या सद्गृहस्थांनी दिलेली ही अंगठी मी या मुलाला बक्षीस देतो,’’ असे म्हणून टिळकांनी ती अंगठी गणूच्या बोटात घातली.
पुढे १९३१ मध्ये झालेल्या बलवंतच्या स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या वेळीही नलिनीच्या अप्रतिम भूमिकेबद्दल स्वातंत्र्यवीरांनी त्यांचे कौतुक केले. शासकीय पुरस्कारांकडून सदैव उपेक्षित राहिलेल्या गणपतरावांना लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीरांनी केलेले हे कौतुक कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे वाटत असे.
१९१८ ते १९४० या बलवंत कंपनीच्या कार्यकाळात गणपतरावांनी कंपनीचे मुख्य कलाकार मा. दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्याबरोबर प्रामुख्याने स्त्री भूमिका केल्या. शारदा, उग्रमंगल, भावबंधन, राजसंन्यास, संन्यस्त खड्ग, ब्रह्मकुमारी इ. नाटकातील त्यांच्या भूमिका रसिकांना पसंत पडल्या. मा. दीनानाथांच्या सहवासात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या संगीत शिक्षणाने गणपतरावांची कला बहरली. बलवंत कंपनीच्या मालकांनी कपंनी बंद करून ‘बलवंत पिक्चर्स’ ही चित्रपटनिर्मिती संस्था काढली. मा. दीनानाथांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही तरी ‘कृष्णार्जुन युद्ध’, ‘ठकीचं लग्न’, ‘भक्त पुंडलिक’, ‘अंधेरी दुनिया’ या चित्रपटातील गणपतरावांच्या भूमिका रसिकांना भावल्या. यातील काही चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले.
मा. दीनानाथांच्या अकाली निधनानंतर त्यांनी मो. ग. रांगणेकराच्या ‘आशीर्वाद’, ‘कुलवधू’ इ. नाटकात प्रमुख भूमिका केल्या. अत्रे पिक्चर्सच्या ‘पायाची दासी’ या चित्रपटाच्या वेळी आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘मा. अविनाश’ हे नाव दिले आणि तेच पुढे रूढ झाले.
मा. दीनानाथांचे शिष्य आणि माझे गुरू डॉ. प्रभाकर जठार यांच्याकडून गणूमामांच्या बद्दल खूप ऐकायला मिळे. मा. दीनानाथांचे शिष्य आणि प्रमुख सहकारी या नात्याने गणपतराव हे मंगेशकर भावंडांचे तसेच सर्वाचे गणूमामा झाले. डॉ. जठार यांच्याकडून मला मिळालेल्या मा. दीनानाथांच्या बंदिशी मी पुन्हा गणूमामांकडून तपासून घ्याव्यात असा जठारांचा आग्रह असे. कारण गणूमामा म्हणजे दीनानाथांची जणू सावलीच. मा. दीनानाथांचेही गणपतराव हे प्रिय शिष्य सहकारी होते. १९४२ साली मा. दीनानाथांच्या निधनाच्या वेळी गणपतराव पुण्यात नव्हते. दीनानाथांनी मृत्यूपूर्वी आपल्या या प्रिय शिष्याची आठवण काढताना,
‘इतुके कळवि आजि माझ्या गुरुला’
‘मरताही भय नाही शिवले कचाला’
या विद्याहरण नाटकातील पदात थोडा पदल करून
‘इतुके कळवि आजि माझ्या गणूला
मरताही भय नाही शिवले दिनाला’
असा निरोप गणूसाठी ठेवला.
गणूमामा आणि नादब्रह्म परिवाराचा स्नेहबंध गेल्या दशकातला. पीएच.डी. साठी मा. दीनानाथांच्या कलाक्षेत्रातील योगदानावर आधारित संशोधन प्रबंध लिहिताना वंदना घांगुर्डे यांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कित्येक तासच्या तास चर्चा करून केवळ त्यांच्याकडेच असलेल्या माहितीचा खजिना उपलब्ध करून दिला हे त्यांचे ऋण न फिटणारे असे आहे. शताब्दिपूर्तीनिमित्त त्यांचा भव्य सत्कार करण्याचे योजिले होते, पण तो योग आला नाही. गणूमामांनी ऐकविलेल्या मा. दीनानाथांच्या अप्रतिम चीजांवर आधारित ‘हे श्यामसुंदर राजसा’, ‘दयाघना’ सारखी अनेक नितांतसुंदर भावगीते पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतविश्वाला दिली आहेत.
संगीत आणि नाटय़क्षेत्रातून अकाली, अकारण निवृत्ती घेतलेल्या गणपतरावांनी १९५३-५७ मध्ये तळेगाव दाभाडे येथे ‘अशोक सहकारी शेतकरी संघा’च्या माध्यमातून सामुदायिक शेतीचा प्रयोग केला. त्यानंतर मात्र सांगली येथे जाऊन वानप्रस्थ जीवन ते व्यतीत करू लागले. सांगलीकरांनी त्यांचा योग्य तो सन्मान करताना ‘‘विष्णुदास भावे पुरस्कार’, ‘सांगली भूषण’ हे पुरस्कार त्यांना दिले. तरी शासकीय सन्मान त्यांच्या योग्यतेनुसार मिळणे आवश्यक होते ते त्यांना मिळाले नाहीत. शासनदरबारी त्यांची उपेक्षा झाली हे शल्य त्यांच्या मित्रपरिवाराला आणि चाहत्यांना अस्वस्थ करणारे आहे.
संगीत आणि नाटय़क्षेत्राचा चालताबोलता इतिहास आणि शतकाचा साक्षीदार अनंतात विलीन झाला आहे.
डॉ. रवींद्र घांगुर्डे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संगीतातील काही कळत नाही. पण लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0