पुलंचं गर्वहरण करणारा बाबा

Jeeves & Wooster


मराठी माध्यमातून शिकणाऱ्या आणि मराठी वस्तीत रहाणाऱ्या मुलांच्या आयुष्यात इंग्रजी पुस्तकं जशी उशीरा येतात तसंच माझंही झालं. अगदी कॉलेजात गेलो तरी माझा पिंड मराठी लेखकांच्या लेखनावर आणि इंग्रजी लेखकांच्या मराठीतल्या अनुवादांवर पोसला जात होता. त्यामुळे हा बाबा माझ्या आयुष्यात येण्याची शक्यता अजिबात नव्हती.

माझ्यावर ज्यांनी गारुड केलं त्या पुलंनीही याच्यावर एक लेख लिहिला होता. तो लेख इयत्ता आठवीत समोर येऊनही का कुणास ठाऊक पण तो सोडून पुलंच्या त्या पुस्तकाची पारायणं केली होती.

नंतर सीए करायला लागलो. इंग्रजी माध्यमात शिकलेली प्रेयसी आयुष्यात आली. तिने इंग्रजीत वाचलेली पुस्तकं मराठीत अनुवादित स्वरूपात उपलब्ध असल्याने आणि मी ते अनुवाद वाचलेले असल्याने माझी कॉलर ताठ ठेवणं मला सोपं गेलं होतं. पण 'शिखरावर पोहोचणं सोपं, तिथे टिकणं अवघड' या नियमाप्रमाणे प्रेयसीवर छाप पाडणं सोपं पण तिची निवड उत्कृष्ट आहे याची तिला सातत्याने खात्री पटवत रहाणं अवघड असतं. त्यामुळे मी इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीतला आळस झटकला आणि इंग्रजी पुस्तकं इंग्रजीत वाचायच्या मागे लागलो.

डोंबिवलीत फ्रेंड्स लायब्ररीत माझं खातं होतं. तिथे इंग्रजी पुस्तकांचा भाग मर्यादित होता. जेम्स हॅडली चेसच्या पुस्तकांची मुखपृष्ठ समंथा फॉक्स आणि इतर ललनांच्या अर्ध अनावृत्त फोटोंचं आवरण घेऊन असल्याने आमच्या चाळीतल्या घरात तीर्थरूपांसमोर वाचणं अशक्य होतं. सिडनी शेल्डन, जेफ्री आर्चर मराठीत वाचून झाले होते. त्यामुळे आमच्या फ्रेंड्स लायब्ररीत माझ्या इंग्रजी वाचनासाठी अतिशय तुटपुंजे पर्याय उपलब्ध होते. मग एक दिवस घाईघाईत दोन पूर्ण पोषाखातल्या पुरुषांचं चित्र मुखपृष्ठावर असलेलं पुस्तक घेऊन घरी आलो. लेखकाचं नाव, पुस्तकाचं नाव, काही न बघता केवळ घरी स्वीकार होईल असं मुखपृष्ठ आहे म्हणून आणलेल्या त्या पुस्तकाने माझ्या सीएच्या अभ्यासाचं ओझं इतकं सहजगत्या हलकं केलं की ज्याचं नाव ते. शिवाय प्रेयसी आणि तिची बहीण दोघी 'अय्या, कित्ती हुश्शार आहे हा मुलगा' अशा नजरेने बघू लागल्या ते वेगळंच. तीर्थरूपांच्या करड्या नजरेचा एक अनपेक्षित फायदा झाला तो असा.

त्यानंतर हा बाबा माझ्या आयुष्यात आला तो कायमचा. मग एकदा पुन्हा पुलंचं ते पुस्तक समोर आलं. त्यातला तो मी नेहमी काणाडोळा केलेला लेख समोर आला. यावेळी मात्र तो वाचला. जेव्हा पुलंना आपण विनोदी लेखन करतो याचा थोडाफार गर्व होतो तेव्हा ते या माणसाचं कुठलंही पुस्तक हातात घेतात, कुठल्याही पानावरून सुरुवात करतात आणि एखाद्या वाक्यातच हा बाबा त्यांचं गर्वहरण करतो हे कळल्यावर आपली आवड फार छान आहे यावरचा विश्वास वाढला.

नंतर मुंबईत फिरत असताना टेलिग्राम ऑफिससमोरच्या रस्त्यावरच्या जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्याकडे त्याचा फोटो असलेलं पुस्तक मिळालं म्हणून अत्यंत आनंदाने विकत घेतलं आणि त्याकाळच्या व्हिटी स्टेशनवरच्या पीसीओ बूथवरुन प्रेयसीला फोन करून आनंद शेअर केला होता, ते अजूनही आठवतंय.

त्याचा फोटो त्याच्या ब्रिटिश वंशाला साजेसा होता. स्टिफ अप्पर लिप. बघून कुणाला वाटणार नाही की याला प्रेमाने अख्खं जग प्लम म्हणून ओळखतं आणि याने इंग्रजी भाषिक जगाला आपल्या विनोदाने खळखळून हसवलंय आणि अजूनही हसवतो आहे.

प्लम ऊर्फ पी जी वुडहाऊस म्हणजे इंग्रजी साहित्यातील विनोदाचं झळाळतं पान. अक्षरशः शेकड्याने ग्रंथापत्यं प्रसवणारी त्याची लेखणी अजोड आहे. बर्टी वूस्टर आणि जीव्हज्, स्मिथ (ज्याच्या आडनावाच्या सुरवातीला P असतो) मि. मुलीनर, लॉर्ड एम्सवर्थ, उल्क्रिज हे सगळे वुडहाऊसचे मानसपुत्र आपापल्या आयुष्यात जी धमाल उडवत असतात ती वाचणं हा शब्दातीत आनंद आहे.

फ्रेंड्स लायब्ररीत हाताला लागलेलं याचं पहिलं पुस्तक बर्टी वूस्टर आणि जीव्हज्चं असल्याने मला या दोघांवरची पुस्तकं त्याच्या इतर मानसपुत्रांपेक्षा जास्त आवडतात.

हा बर्टी वूस्टर, पहिल्या महायुद्धापूर्वीच्या इंग्लंडात रहात असतो. उमराव घराण्याशी संबंध असल्याने याला उपजीविकेसाठी काही कामधंदा करावा लागत नाही. याच्या अगाथा (कजाग) आणि डालिया (प्रेमळ) अशा दोन काकवा (किंवा मावश्या किंवा आत्या) असतात. (अमृतातेही पैजा जिंकेवाल्या मराठीत काकू, मावशी आणि आत्या या तीन नात्यातला दिसणारा फरक वाघिणीच्या दूधवाल्या इंग्रजीत कळत नाही) तर या काकवा किंवा मावश्या वूस्टरची काळजी घेत असतात. जन्मजात वेंधळेपणा अंगी असलेल्या बर्टीचा मदतनीस (वॅले) म्हणजे जीव्हज्.

दिवसभर लंडनच्या ड्रोन्स क्लबमधे मित्रांबरोबर पत्ते किंवा अन्य खेळ खेळायचे, स्वतः वेगवेगळ्या मुलींच्या प्रेमात पडायचं किंवा मित्रांना असं प्रेमात पडलेलं पहायचं, मग त्यांना मदत करायला जायचं, किंवा मग त्यांना प्रेमातून बाहेर पडण्यासाठी मदत करायला जायचं, त्यासाठी वेगवेगळ्या योजना बनवायच्या, त्यात गोंधळ घालायचा आणि मग शेवटी जीव्हज् कडून मदत घ्यायची, मधे मधे काकवा (किंवा मावश्या किंवा आत्यांकडून ) शिव्या खायच्या किंवा चिमटे काढणारं कौतुक करुन घ्यायचं,शेवटी पुन्हा बॅचलरच रहायचं, ही बर्टीची खासियत. जीव्हज् याला सांभाळून घेत असतो.

'श्री. वूस्टर यांचं वर्णन करण्यासाठी अनेक विशेषणं वापरता येतील पण हुशार हे विशेषण काही लागू होत नाही' हे जीव्ह्जचं आपल्या मालकाबद्दलचं मत. आणि आपण जीव्ह्जच्या हातातला बाहुला नाही हे दाखवण्यासाठी वारंवार बर्टीने 'मखमली हातमोजामधील पोलादी पंजा' दाखवण्याचा प्रयत्न करणं हे या दोघांच्या नात्याचं सूत्र. कुठे खलनायक नाही, खून नाही, बलात्कार नाही, अन्याय नाही. अगदी साधी सोपी पण अतुलनीय शब्दात मांडलेली गोष्ट. अतुलनीय अशासाठी की वुडहाऊसचा विनोद प्रसंगनिष्ठ असला तरी शब्दांचे फुलोरे इतके सुंदर की त्यांचा अनुवाद करणं अतिशय कर्मकठीण. त्यामुळे वुडहाऊस वाचावा तो इंग्रजीतच. वुडहाऊस वाचण्याची संधी मिळाली, केवळ या एकमेव कारणासाठी मेकॉलेच्या कट्टर विरोधकांनीही मेकॉलेचे आभार मानायला हरकत नाही.

या बर्टी वूस्टर आणि जीव्ह्जवर बीबीसीने सिरीयलही केली होती. ज्यात सध्या डॉ हाऊस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्यू लॉरीने वेंधळ्या वूस्टरचं आणि स्टीफन फ्रायने जीव्ह्जचं काम केलं होतं. सिरीयल अतिशय सुरेख असली तरी तिला पुस्तकाची सर नाही हेही खरं.

दोन तीन महिन्यांपूर्वी सकाळी चालायला जाताना ऐकायला हवी म्हणून डॉक्युमेंटरी शोधत होतो. सहज गंमत म्हणून पी जी वुडहाऊस सर्च केलं आणि बीबीसी सिरीयलच्या व्हिडिओजखाली एक नवीन व्हिडिओ दिसला आणि जो आनंद झाला की 'माझा आनंद गगनात मावेना' हा वाक्प्रचार अनुभवता आला. तो व्हिडिओ म्हणजे वूस्टर आणि जीव्ह्जच्या पुस्तकांचं अभिवाचन होतं. १९९२-९५मध्ये ही ऑडियो बुक्स रेकॉर्ड केली गेली होती आणि आता त्या सीडीजचे संच युट्यूबवर कुणीतरी अपलोड करून ठेवले आहेत.

लगेच जवळच्या मित्रमैत्रिणींना याची लिंक दिली आणि दोन्ही मुलांना म्हटलं आता हे ऐकल्याशिवाय तुमची खैर नाही.

आज दुपारी एका पोस्टवर 'मी जर घोड्याच्या शर्यतीत एखाद्या घोड्यावर पैसे लावले तर तो इतका हळू धावेल की तो दुसर्‍या शर्यतीत पहिला येईल' हे वुडहाऊसच्या वाक्यावर बेतलेलं वाक्य लिहिलं आणि ते इथल्या मैत्रिणीला आवडलं. तेव्हा म्हटलं की आपल्याला मिळालेला खजिना सगळ्यांबरोबर वाटावा. म्हणून ही पोस्ट.

खाली एका ऑडियो बुकची आणि बीबीसीच्या सिरीयलची लिंक देतो आहे. नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमवरच्या वास्तववादी सिरीयल्सच्या जमान्यात कुणाला इच्छा असेल तर हा निर्विष आणि प्रसन्न विनोद अनुभवून बघा.

P.G. Wodehouse - Carry On Jeeves (1925) Audiobook. Complete & Unabrigded.
Full Episode Jeeves and Wooster S01 E1 In court after the boat race

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

दुव्यांबद्दल अनेक आभार. निवांत ऐकतो/पाहतो.

अवांतर:
१. आता लिहिताना ध्यानी आलं, वुडहाऊस हा पुस्तक हाती घेऊन वाचावा असाच लेखक मला कायम वाटत आला आहे. पुलंच्या बाबतीत त्यांची पुस्तकं जरी आधी वाचली असली - तरी त्यांच्या कार्यक्रमांच्या सहज उपलब्धतेमुळे आणि क्वचित अतिपरिचयामुळे असेल कदाचित - तसं एक्स्क्लुझिव्हली, साऱ्याच लेखांबद्दल, वाटत नाही.

२.

तीर्थरूपांच्या करड्या नजरेचा एक अनपेक्षित फायदा झाला तो असा.

वूडहाऊसची आद्याक्षरं निराळ्या अर्थाने इथे चपखल बसतात म्हणायची! Smile (PG = Parental Guidance)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा कोटी मस्तच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता लिहिताना ध्यानी आलं, वुडहाऊस हा पुस्तक हाती घेऊन वाचावा असाच लेखक मला कायम वाटत आला आहे.

१. वुडहाउस हा वाचण्याचा विषय आहे, ऐकण्याचा नाही.

२. वु. हा वा. वि. आ., त्याच्याबद्दल लिहिण्याचा नाही.

पुस्तक हाती घेऊन

किंडलसुद्धा चालेल. (पण पुस्तक अर्थात बरे. शक्यतो ब्रिटिश आवृत्तीतले, पेंग्विनने प्रकाशित केलेले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय? PG-13??????

म्हणजे, या सद्गृहस्थाला वयाच्या १३व्या वर्षी प्रेयसी होती???

(नाही म्हणजे, PG ठीकच आहे. PG-13 कशापायी?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

वा! P G Wodehous कधी वाचला नाही पण आता वाचेन. अतिशय सुंदर ओळख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्लँडिंग्ज़ची सम्राज्ञी मस्त. (प्)स्मिथ धमाल. लॉर्ड इकनहॅम (अंकल फ्रेड) अफलातून.

काही वन-ऑफ पुस्तकेसुद्धा (कोठल्याही मालिकेचा भाग नसलेली) उत्तम आहेत.

बाकी जीव्ह्ज़(/बर्टी वूस्टर) वगैरे बिगिनरांसाठी ठीक आहे. पण का कोण जाणे, वुडहाऊसबद्दल (विशेषतः मराठीतून) लिहिणारे त्याचाच ज़िक्र सर्वाधिक करतात. (याला पु.ल.सुद्धा अपवाद नसावेत.) चालायचेच.

(आणि हो. Woodhouse नव्हे. Wodehousसुद्धा नव्हे!!! Wodehouse.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबा ओळख करुन द्या ना या पात्रांची/पुस्तकांची. त्यामुळे वाचनात रस निर्माण होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वु. हा वा. वि. आ., त्याच्याबद्दल बोलण्याचा नाही.

स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.

पढ़ो, तो जानो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वूस्टर आणि जीव्हज् बद्दल जास्त बोललं जातं हे खरं आहे...आणि ते केवळ मराठीतच नाही तर एकंदरीत संपूर्ण भारतात ती जोडगोळी फार लोकप्रिय आहे.. वुडहाऊसनेही एका मुलाखतीत त्याचा उल्लेख केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचून एकच प्रश्न भेडसावू लागला. अजूनही पिच्छा सोडत नाही.


प्रेयसीचे काय झाले???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायको झाली. याहून अधिक वाईट काय .... Wink असो!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लग्न

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

न बा चा रंगांधळेपणा लवकर बरा होऊदे, त्यांचा णिशेद काळ्या रंगात वाचताना त्रास होतो आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

कुठलंतरी एक पिजि वु पुस्तक हातात घेतलं पुलंनी भलामण केली होती म्हणून. दोनचार पानानंतर नाय जमलं. शिवाय संदर्भ माहीत नसले तर विनोद समजत नाहीत.

बाकी त्या फोटोच्या आत तुम्ही पाईपाऐवजी चष्मा धरायचा प्रयत्न केलाय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोनचार पानानंतर नाय जमलं.

तुमारा हमारा जम्या. क्रिकेट आवडता नही म्हणजे टोटलच जम्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठलंतरी एक पिजि वु पुस्तक हातात घेतलं पुलंनी भलामण केली होती म्हणून. दोनचार पानानंतर नाय जमलं.

ते ठीकच. त्रिभुवनातील प्रत्येकाला वुडहाउस आवडलाच पाहिजे, असा खुद्द वुडहाउससाहेबाचा आग्रह नसावा.

शिवाय संदर्भ माहीत नसले तर विनोद समजत नाहीत.

सगळे संदर्भ समजलेच पाहिजेत, असे थोडेच आहे? मजा घेण्याच्या ते आड येऊ नये. काय फार तर पन्नासातले दहा विनोद नाही कळणार. काय बिघडते?

(पु.लं.चे तरी सगळे संदर्भ थोडेच समजतात? तरीही हसतातच ना लोक? आणि नाही नाही तेथे त्यांच्या लिखाणातली वाक्ये औट-ऑफ-कॉण्टेक्स्ट उद्धृत करतातच ना?)

शिवाय, वाचताना नाही, तरी नंतर पुढेमागे त्यातला एखादा (वाचताना न समजलेला) संदर्भ समजलाच, तर बॅकडेटेडसुद्धा हसता येते, हा आणखी एक फायदा.

(अर्थात, वाचलेच पाहिजे, आवडलेच पाहिजे, असा आग्रह नाहीच.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ज्या वेळी / वयात वाचायला घेतलं पुस्तक तेव्हा पकड घेईना. माझं अगोदरचं वाचन, समज तेवढी तयार नव्हती.

(पु.लं.चे तरी सगळे संदर्भ थोडेच समजतात?)

वर्धा किंवा कांदे पिकणाऱ्या भागातल्याने मत व्यक्त केलेलं की चाळीत आम्ही कांदे साठवतो. चाळीत लोक का राहतात? त्या संदर्भातले विनोद नाही समजत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर्ध्याकडच्या लोकांना बटाट्याऐवजी कांद्याची चाळ समजेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वुडहाउसचा परिचय पु.लं.द्वारेच झाला पण १९७९साली प्रकाशित झालेलल्या “पु.ल. एक ‘साठ’वण” या पु.लं.च्या षष्ट्यब्दीनिमित्त जयवंत दळवी, मंगला गोडबोले संपादित निवडक पु.ल. मधून. पुढे बऱ्याच वर्षांनी वुडहाउस वाचू पाहिला पण फार काही भावला नाही. कोणतं पुस्तक होतं तेही आठवत नाही. मात्र एका वुडहाउसप्रेमी व्यक्तीची अगदी वेगळी आठवण या निमित्ताने झाली.
सदर मनुष्य आमच्या घराजवळ राहायचा आणि आलिआँस फ्राँसेजमध्ये दुसऱ्या इयत्तेच्या (?) वर्गात फिरतीच्या कामामुळे बऱ्याचदा अनुपस्थित राहावे लागल्याने त्याला शिकवणीची गरज होती. डोक्याने बरा होता म्हणून मी पत्करलं त्याला शिकवणं. तर तो एकदा म्हणाला की त्याच्या वर्गशिक्षिका आहेत त्यांच्याशी त्याचं एवढं जमत नाही, त्या उगाचच अपमान करतात वगैरे. मग मी म्हटलं, तुमची कोणत्याही स्त्रीचा उल्लेख फीमेल म्हणून करण्याची सवय पाहता तुमचा तरी मुलाहिजा का राखावा कोणी ? तर म्हणे असं काय म्हणता, वुडहाउससुद्धा हा शब्द वापरतो, त्यात काय आहे ? मी म्हटलं त्याला मरून वीसेक वर्षं होऊन गेली आणि मेला तेव्हा चांगला ऐशी नव्वद वर्षांचा होता. त्याच्या काळचे शब्द तुम्ही या काळात कसे बिनदिक्कत वापरू शकता ? त्या नंतर तो पुन्हा फिरतीवर गेला तो फिरकलाच नाही.
अभिवाचनाची लिंक ऐकायला पाहिजे. फक्त त्यात आधीच श्रोत्यांचा हशा मिसळलेला नसू दे म्हणजे मिळवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मात्र एका वुडहाउसप्रेमी व्यक्तीची अगदी वेगळी आठवण या निमित्ताने झाली.

आणि

तर म्हणे असं काय म्हणता, वुडहाउससुद्धा हा शब्द वापरतो, त्यात काय आहे ?

हे जर त्याचे आर्ग्युमेंट असेल, तर प्रस्तुत सद्गृहस्थास वुडहाउस कळलाच नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते; अत एव, प्रस्तुत प्राणिविशेषास 'वुडहाउसप्रेमी' हे बिरूद चिकटविल्याबद्दल आपला (एखाद्या तृतीय देशाच्या अधिकृत सूत्रांनी आपल्या नकाशांत जाहीररीत्या जम्मू आणि कश्मीरचा काही भाग पाकिस्तानात (आणि/किंवा चीनमध्ये) दाखविला, तर भारतीय परराष्ट्रखाते प्रस्तुत सूत्रांचा जितका कडक निषेध करेल, त्याहूनही कडक) निषेध. (मौलवी असतो, तर तुमच्याविरुद्ध फतवा काढला असता.)

वुडहाउसच्या लिखाणात स्त्रियांचा उल्लेख 'फीमेल' असा केलेला अनेकदा आढळतो, हे खरेच. परंतु तो कोणत्या संदर्भात? सामान्यत:, दोन विशिष्ट परिस्थितींत हे उद्भवू शकते.

(१) त्याच्या पात्रांपैकी बर्टी वूस्टर, पाँगो ट्विसलटन किंवा तत्सम एलीट परंतु निरुद्योगी, एसेन्शियली गूड-फॉर-नथिंग (कदाचित काहीशा प्रेटेन्शियससुद्धा) तरुणाईच्या तोंडी. (जेथे ते नैसर्गिक अत एव सुस्थानी - गेला बाजार सुसंगत - आहे.)

किंवा,

(२) एखाद्या डिटेक्टिव पात्राच्या लेखी रिपोर्टात, तो ज्यांना ट्रेल करीत असतो, अशा व्यक्तींच्या संदर्भात. ("टू सब्जेक्ट्स, वन मेल अँड वन फीमेल" (किंवा, त्याहीपेक्षा, "टू सब्ज्स, वन एम. अँड वन एफ."))

वुडहाउसच्या सभ्य, पोक्त वा प्रतिष्ठित पात्रांच्या तोंडी अशी शब्दयोजना आढळल्याचे उदाहरण आठवणीत नाही. (लॉर्ड इकनहॅम (उपाख्य अंकल फ्रेड) अथवा गॅलॅहड थ्रीपवुड (उपाख्य गॅली) हे, नक्की आठवत नाही, परंतु कदाचित अपवाद असू शकतीलही. ही मंडळी वयाची साठी उलटून गेली तरी स्वत:ला तरुणाईपैकी समजतात, त्यामुळे, शक्य आहे. संदर्भ हुडकून पाहावे लागतील. असो.)

आता, हे दाखले "वुडहाउस हा शब्द वापरतो" म्हणून वापरता यावेत का, हे तुम्हीच सांगा.

(हे म्हणजे, उद्या 'ती फुलराणी' पाहून आल्यावर त्यातील प्रोफेसराच्या पात्राचे अनुकरण करून येथे मी भकारादि शब्द आणि/किंवा "गेला गाढवाच्या गांडीत"-छाप भाषेत लिहू लागलो - आणि वर "पु.ल.सुद्धा असे शब्द वापरतात, त्यात काय आहे?" म्हणून मखलाशी केली - तर कसे होईल? तशातली गत आहे.)

बाकी, अन्यथा वुडहाउसची स्वत:ची भाषा नको तितकी सभ्य असे. म्हणजे, वेड्यावाकड्या शब्दांमागील संकल्पनांचे त्याला वावडे असावे, असे मुळीच नाही. परंतु त्या परिस्थितसुद्धा, प्रसंगी यूफीमिझम वगैरे वापरून, तो ती भाषा इतकी बेमालूमपणे सभ्य करून टाकत असे, की विचारू नये. 'सन ऑफ अ बॅचलर' किंवा '(टू हॅव समवन) व्हेअर द हेअर इज़ क्रिस्प' वगैरे वाक्प्रचारांतून त्याला नेमका कशाकडे निर्देश करावयाचा असावा, ते मुद्दाम विचार केल्याखेरीज चटकन लक्षात येत नाही. असो.
----------
तळटीपा:

नाही म्हणजे, तसल्या भाषेचे आणि/किंवा ती (येथे किंवा कोठेही) वापरण्याचे मला व्यक्तिश: वावडे नाही. परंतु, तशी ती वापरण्याकरिता "पण पु.ल.सुद्धा हे शब्द वापरतात ना!" या आधाराचीही मला गरज भासत नाही. परंतु ते एक असो. प्रस्तुत आधार सकृद्दर्शनी निराधार आहे, एवढाच मुद्दा आहे.

हे थोडेसे आमच्या अमेरिकनमधील 'व्हेअर द सन डोण्ट शाइन'सारखे आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

PG W तिकडचे व.पु. असतील. कुणाकुणाला आवडणाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

नशीब 'इंग्रजी भाषेचे दवणे' नाही म्हणालात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दवणे म्हटल्यास पकाऊ चा घन मिळाली असती का?
------
मोरे सर तुमचा धागा विषय मी उगाच भरकटवतोय, थांबतो इथेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिचय चांगला आहे.
वुडहाउस आवडणारे काका आठवले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0