काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
आयुष्यात थोडा काळ का होईना काळी-पिवळी टॅक्सी चालवायची हे मी बरीच वर्षं घोकत होतो.
आता का?
तर बरीच कारणं:
१. मन्नत:
बरीच वर्षं रखडलेलं आमचं घर होण्यासाठी आईनं अपार कष्ट आणि धडपड केली.
तेव्हाच मी ठरवलेलं की आपलं मुंबईतलं घर झाल्यावर या युनिव्हर्सचे, मुंबईचे आभार मानायचे.
कसं?
तर किमान एक महिना टॅक्सी चालवून...
लोकांना सेवा देऊन.
म्हणजे लोकं कसे गुरुद्वारात चप्पल संभाळतात, किंवा भंडाऱ्यात आनंदानी वाढायला सरसावतात तसं काहीतरी.
बाय द वे कसं कोण जाणे... कुठल्याही भंडाऱ्याचा साधा डाळ-भात-भाजी नी लाडू कातील टेस्टी लागतो.
एन्नी वेज...
शेवटी आमचं ते छोटंसं सुबक सुंदर घर झालंच.
सो इट वॊज हाय टाइम .
२. मुंबूड्या:
म्हणजे जी मुंबई मुंबई म्हणून आपण उमाळे काढून बोलत असतो ती खरंच आपल्याला माहीत आहे का?
की नाही?
नसल्यास या निमित्ताने ती धांडोळून बघता येईल का?
फार नाहीतर थोडीतरी??
३. पर्स्पेक्टिव्ह:
आमचे नयन खानोलकर सर मुंबईच्या बिबट्यांसाठी खूप काम करत असतात.
(भारी सॉर्टेड माणूस.)
ते एकदा बोलण्याच्या ओघात म्हणलेले, "आपण नं रस्त्यावर उतरून आयुष्य जगत नाही."
पटलंच ते एकदम रप्पकन!
हो म्हणजे आपले मित्र, बायको, नातेवाईक, कलीग्ज सगळॆ जवळ जवळ त्याच त्याच डेमोग्राफिक मध्ये असतात.
तर मग आपल्या ह्या हायर मिडल क्लास वाल्या, ठाणे-बोरिवली-वांद्रे-बाणेर-विमाननगर मध्ये २ बी. एच. के. त रहाणाऱ्या,
७ ते १३ लाखाची गाडी चालवणाऱ्या,
जाराचे शर्ट्स घालणाऱ्या (स्पेलींग ZARA असलं तरी उच्चार जारा आहे. हाच तो हायर मिडल क्लास स्नॉबिशपणा :)),
वर्षातून एक फॉरीन टूर करणाऱ्या,
दणादण स्विगीवरून अजब गजब पदार्थ ऑर्डर करणाऱ्या,
गेम ऑफ थ्रोन्स नी सॅक्रेड गेम्स बघणाऱ्या कोषाबाहेरचं जे मोठ्ठ आणि तितकंच खरं जग आहे...
त्या जगातले लोक कसे रहातात हे कणभर तरी समजून घेता येईल का?
आपण ज्यांना टॅक्सीवाला भैया म्हणत आईबहिणीवरून शिव्या देत आपल्या शौर्याची सुरक्षित खाज भागवून घेतो,
त्यांची ही काही बाजू असेलच... ती या निमित्ताने एक शतांश तरी समजावी असाही हेतू.
आता ह्याला रॉकस्टार मधल्या रणबीरचा भाबडेपणा म्हणा, सोशल एक्सपेरिमेंट म्हणा, एका फेसलेस होतकरू लेखकानं जगण्याला कवटाळण्याची केलेली प्राणांतिक धडपड म्हणा किंवा सुलेमानी कीडा म्हणा.
ह्याचं जे पण काही होतंय त्याच्या नोंदी मी इथे वेळोवेळी टाकत जाईनच.
तर...
आधी काही रूल्स सेट केले.
ते खालील प्रमाणे:
नियम १:
साधारण तीस दिवस टॅक्सी चालवायची. हे तीस दिवस अर्थातच जॉबमुळे सलग मिळणं अशक्य. तेव्हा बहुधा शनिवार-रविवार चालवून हे फ्लाईन्ग अवर्स पूर्ण करायचे.
नियम २:
टॅक्सी चालवून वरकमाई करणं हा काय आपला हेतू नाय. हा मुळात एक प्रकारे कायनातला थँक्यू बोलायचा प्रयत्न आहे. सो...
नियम २-अ: इमानदारीत टॅक्सी चालवायची. कुठेही नियम वळवा-वाकवायचे नाहीत.
नियम २-ब: पाशिंजरला होईल तितकी मदत करायची.
नियम २-क: नाही बोलणारे टॅक्सी-रिक्षावाले असंख्यवेळा आपल्या डोक्यात तिरके गेलेयत सो कुणालाही नाही म्हणायचं नाही. येईल ते भाडं स्वीकारत जायचं.
नियम ३:
ओला-उबेर चालवणं शक्य आहे...
पण मला लहानपणापासून काळ्या पिवळ्या टॅक्सीचं भारी आकर्षण...
ते विडीचा वास येणारे शिडशिडीत मुस्लिम ड्रायव्हर्स...
त्यांच्या त्या साळुंकी सारख्या फियाट...
ते हॅन्ड गियर आणि त्यांच्या टोकाच्या त्या कट ग्लासचा पाचू असलेल्या मुठी.
जाम आवडायचं लहानपणापासून...
सो काळी पिवळीच चालवायची.
मुंबईची शान आहे ती!!!
आता टॅक्सी चालवण्यासाठी ऑब्व्हियस गोष्ट म्हणजे अर्थातच टॅक्सीचा बॅज काढणं.
उद्यापासून ते ऑपरेशन चालू.
प्रतिक्रिया
पुढे?
कुतूहल वाढलेलं आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उत्तम पण धाडसी कल्पना
कल्पना उत्तम आहे. पण प्रत्यक्षं काम केल्यावर अडचणी समोर येतील. मन अत्यंत कणखर ठेवुन त्यांना सामोरं जावे लागेल. आपली अनुभव दरेक दोन दिवसांनी मांडत जा. नक्की अनेक लोक वाचतील.
थॅन्क्स अदिती, वाव्वी .. इकडे
थॅन्क्स अदिती, वाव्वी .. इकडे टाकेनच.
उबर
माझी एक मैत्रीण नोकरी मिळेस्तोवर उत्पन्नाचा स्रोत म्हणून काही काळ उबर चालवत होती. सुरुवातीला मी तिला काही म्हणलं नाही पण माझी प्रतिक्रिया होती, "हे फार काळ चाललं नाही पाहिजे." तिला दोनेक महिन्यांत नोकरी मिळालीही.
पण मधल्या काळात तिला जे अनुभव आले तिनं त्यांतले काही सांगितले होते. ती सगळ्याच गोष्टी, 'ही पाहा कशी गंमत झाली' अशा पद्धतीनं सांगते. शुक्रवारी रात्री 'जास्त झालेल्या' लोकांमुळे गाडी खराब होईल ह्याची तिला धास्ती वाटत होती, ही गोष्टसुद्धा ती 'माझी कशी तारांबळ उडाली' छापात सांगते. तिच्यामुळे मलाही वाटायला लागलं होतं, आपणही काही काळ उबर चालवून बघावी.
ह्या सगळ्यात मला महत्त्वाचं वाटलं ते हे की माझ्यासारख्या शिकलेल्या, सुस्थित लोकांकडे एक माज असतो; आपल्याला जगाची गरज नाही छापाचा. काही इलाज नाही म्हणून टॅक्सी चालवताना तो माज करता येत नाही. 'माझंच खरं' वगैरे सोडून द्यावं लागतं. ह्या मैत्रिणीला अशी असोशीच नाही. सुखदुःख सगळं एकसमान, हे तिनं आत्मसात केलं आहे. माझ्याच वयाची आहे ती, पण मला नाही हे जमलेलं.
तिला लवकर नोकरी मिळावी म्हणून माझ्याकडून शक्य तेवढे प्रयत्न मी केले. त्यातून मला बरं वाटलं. पण खरं तर मलाच तिची खूप मदत होते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माझा वर्गमित्र (१-४) शाळा
माझा वर्गमित्र (१-४) शाळा सोडल्यावर नंतर कधी भेटला होता. ट्याक्सी चालवतो म्हणाला. त्याचे वडीलही ट्याक्सीवरच होते. आताशा मुंबईत ट्याक्सी मिळणे दुरापास्त. कायम मीटर डाऊनच. मध्यंतरी कोपऱ्याकोपऱ्यावर गाड्या उभ्या करून वाट पाहणारे चालक दिसत. मित्र म्हणाला"मला एक जागा/लाईन सापडली आणि चिंता मिटली. शिवाय कटकट न करणारं गाऱ्हाइक. फिल्म स्टुडिओ ते बान्द्रा."
-----------------------
नयन खानोलकर भारी फोटोग्राफर.
लेखन आवडतंय.
लेखन आवडतंय.
आभार
आभार आ. बा.
फारीनर लोक ड्राइवरांचे स्किल
फारीनर लोक ड्राइवरांचे स्किल लगेच ओळखतात.
--
आमचा एक नवीन कलिग. तो भांडुप काजुपाड्याला राहतो म्हटल्यावर "आत जाता येईल का?"
"हो. या एकदा."
गेलो. टेकडीवर त्याचे घर.
"इकडे कसं काय?"
"बाबा ट्याक्सीवर. एकदा एक साहेब बसला -मुंबईत जाण्यासाठी. उतरताना म्हणाला 'उद्यापासून माझ्या गाडीवर राहणार का?'
मग कंपनी गाडीवर. रोज त्या सायबाच्या क्वार्टरवरून परत तिथे सोडायचे तर इथे जागा घेतली जवळ. "
इंटरेस्टिंग.. संकल्प
इंटरेस्टिंग.. संकल्प पुर्णत्वाला जाओ अशी सदिच्छा!
गॉडस्पीड!
गॉड"स्पीड"