IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ९)

(भाग ८)

पॅरासाइट

Parasite (2019)

संपूर्ण महोत्सवात मी पाहिलेला सर्वात चांगला चित्रपट ‘पॅरासाइट’. अर्थात, यावर मतभेद होऊ शकतात; पण तो पाहून इतकं तृप्‍त वाटलं की दुसर्‍या दिवशीचा निरोपाचा चित्रपट बघितलाच नाही: शेवट ‘पॅरासाइट’नेच होऊ दे!

हा कोरियन सिनेमा. कोरियन सिनेमा बहुधा रक्‍तपातमय असतो. (हासुद्धा अपवाद नाही!) दक्षिण कोरियातल्या एका चकाचक शहरात रहाणारं कुटुंब. दक्षिण कोरिया भांडवलशाही देश. तिथे अत्यंत श्रीमंत आणि अगदी गरीब, असे दोन्ही लोक सापडतात. विशेषत: शहरात. ही कहाणी दोघांची. गरिबांच्या नजरेतून सांगितलेली. पण गरिबांची बाजू न घेणारी. गरीब कुठे रहातात? रस्त्याच्या खालच्या पातळीवरच्या घरात. छताशी असलेल्या खिडकीतून रस्त्यावरून चालणार्‍यांच्या तंगड्या दिसतात. वस्ती बकाल. अधून मधून एखादा दारुडा झिंगत झिंगत येऊन त्यांच्या खिडकीसमोरच मूत्रविसर्जन करतो. घरात इंटरनेटची, फोनची रेंज नीट मिळत नाही. कुठेतरी उंच उभं राहून मिळते. अशा घरात असावं तसं फर्निचर, तशी भांडी, तसं जेवण. माणसं नवरा-बायको आणि त्यांची दोन मुलं. मुलगा-मुलगी. चौघेही ‘स्ट्रीट स्मार्ट’. बाहेरच्या दयामाया नसलेल्या जगात स्वत:ला व्यवस्थित सांभाळू शकणारे. पण म्हणून त्यांचं नीट, मजेत चाललंय, असं नाही. तसल्या जगात खालच्यांना वर येण्याची संधी सहसा मिळत नाही. खालच्यांना आपापसातच संघर्ष करत उदरभरण करावं लागतं. तर तसल्या जगात वावरण्याची सवय असलेले हे लोक.

या जगण्याला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण होते. ‘मी काही दिवस नाही आहे, तेवढा काळ तू अमुक मुलीची इंग्रजीची शिकवणी घे,’ अशी गळ मुलाचा मित्र त्याला घालतो. ‘माझे बाकीचे मित्र विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत आणि मुलगी कॉलेजला जाऊ लागली की मीच तिला रीतसर पटवणार आहे. तुझ्यावर माझा विश्वास आहे, म्हणून तुला सांगतो आहे!’ बहीण खोटं सर्टिफिकेट बनवून देते. तिच्या सफाईचं बाप कौतुक करतो. ते घेऊन भाऊ त्या मुलीच्या घरी जातो. तर ती भलतीच श्रीमंत. तिचं घर ‘वर’. म्हणजे वरच्या दिशेने जाणारे रस्ते चालत, ओलांडत हा तिथे पोचतो. एकदम इम्प्रेस होतो.

ही उन्नतीची संधी ठरते का? की कोळ्याच्या जाळ्यात शिरणार्‍या माशीसारखी त्याची अवस्था होते? कुटुंबाचं काय होतं? गरीब आणि श्रीमंत, अशा या दोन कुटुंबांचे संबंध कोणत्या पातळीवर प्रस्थापित होतात?

हा चित्रपट चालू असताना त्याच्याकडे प्रतीकात्मक म्हणून बघता येत नाही, कारण घटना भराभर घडत जातात आणि आपलं लक्ष पूर्णपणे खेचून घेऊन गोष्टीशी समरस व्हायला लावतात. पात्रं एका बाजूने ‘सोपी’, प्रतीकात्मक वाटता वाटता खरी, जिवंतसुद्धा होतात. गोष्ट कुठल्या वळणाने पुढे जाणार, याचा अंदाज येता येता आपल्या कल्पनेच्या बाहेर सटकते आणि मग केवळ उत्कंठामय होऊन घटनांचा प्रवास बघत रहायला होतं. विनोद होतात. चित्रपट डार्क कॉमेडीकडे झुकतो. मग भेदक सामाजिक भाष्य करतो. मग भलतंच काही होऊन रहस्यमय होतो. पुढे एकूण मानवी अस्तित्वाविषयी काही भाष्य करतो, असं वाटू लागतं.

आणि या सगळ्या इंटरप्रिटेशनकडे साफ दुर्लक्ष करून नुसतं बघत, ऐकत, अनुभवत गेलं; तरी एक लक्षात ठेवण्यासारखा, भारावून टाकणारा, अस्वस्थ करणारा अनुभव मिळतो.

थोडक्यात, थोर.

पाहून झाल्यावर चर्चा करताना किंवा हे असं लिहायला बसल्यावर कुठून कुठून काय काय अर्थ सुचू लागतात. प्रकाश, आवाज, गंध, अवकाश यांच्या मिती आकळतात. निरागसता आणि बनेलपणा यांचं मूल्यमापन करण्याच्या चौकटी दिसू लागतात. हा सिनेमा म्हणजे ‘विदारक भाष्य’ आहे, असंसुद्धा म्हणावंसं वाटत नाही. एका चित्रपटात, एका कलाकृतीत किती परिमाणं असावीत, याने थक्क व्हायला होतं. चित्रपट, त्याची पटकथा आणि त्याचं दिग्दर्शन आपल्याला किती सघन अनुभव देऊ शकतात, याचं दर्शन होतं.

या अनुभवाची मांडणी इथे सविस्तर करावीशी वाटत नाही; कारण, तसं केल्यास हे वाचून चित्रपट बघायला जाणार्‍याचा आस्वाद पातळ होईल. एक सुचवावंसं वाटतं: सगळी ज्ञानेंद्रियं टवकारून, सगळे अँटेने उभारून ‘पॅरासाइट’चा अनुभव घ्या!

एक शंका. आपल्याकडे हे घडू शकतं का?

आपल्याकडे विषमता आहे. पण दोन वर्गातली दरी लपवणं कितपत शक्य आहे? रूप, हावभाव, भाषिक उच्चार आणि भाषावापरातील वाक्प्रचार अशा कितीतरी गोष्टी इथल्या माणसाचा आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक वर्ग उघडा करतात. तो लपवण्याची सफाई कमावली, तरी ‘जाती’चं काय? आपल्या श्रीमंतांना जी या इन्शुरन्सची कवचकुंडलं लाभलेली आहेत, त्याची नीटशी जाणीव तरी इथे कोणाला आहे का?

ट्रेलर :

(चित्रपटाला ह्या वर्षी कान महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. ह्या वर्षीच्या बहुचर्चित चित्रपटांपैकी एक.)

(भाग १० - समारोप)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं ऑस्कर मिळवून आज या चित्रपटानं इतिहास घडवला आहे. परकीय भाषेतल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं ऑस्कर मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. त्या निमित्तानं धागा वर आणला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घराजवळ आला आहे. जमवलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यावर एका गोऱ्याचं मत पडलं - "दिग्दर्शकाला गोष्ट सांगता येत नाही; ही गोष्टच चूक आहे." मग त्याच्यापेक्षा वीस वर्षांनी तरुण असणाऱ्या चिनी मुलीनं गोऱ्याचं बौद्धिक घेतल्याचं बघितलं आणि धन्य झाले ... हे तिला सांगितलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सिनेमात शेवटी भाऊ जिवंत राहतो आणि बहीण मरते. असं का? कुणाचं काय मत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हल्ला होतो तेव्हा तेथे बहीण असण्याचं आणि भाऊ नसण्याचं संयुक्तिक कारण कथानकात आहे. यात स्त्रीवादी चष्मा कशाला ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका सहकर्मचाऱ्याचं मत - भाऊ हे दिग्दर्शकाचं रूप, प्रतीक किंवा प्रतिमा आहे, कारण दिग्दर्शक पुरुष आहे. त्यामुळे कहाणी भावाच्या नजरेतून दिसते; ती सुरू राहण्यासाठी भावाचं जिवंत असणं गरजेचं आहे.

माझं मत - बहीण आधी स्वार्थी असते; आपल्यासारख्या इतरांचं काय होतं, चाललंय ह्याबद्दल तिला घेणंदेणं नाही. पण जेव्हा तिच्यासारखे इतर समोर येतात, तेव्हा ती सहृदयपणे त्यांचा विचार करायला लागते, त्यांना माणूस म्हणून वागवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ती निरागस आहे (पुरुषाची बहिणीकडे बघण्याची नजर). भावाचा प्रवास उलट होतो. तो निरागसपणा टाकून बनचुकेपणा करू पाहतो. पॅरासाईटांचं आयुष्य क्रूर आहे; त्यात निरागसपणाला स्थान नाही. म्हणून ती मरते.

उलटपक्षी, श्रीमंतांच्या आयुष्यातलं क्रौर्य टाळता येतं - असे उल्लेख पॅरासाईटांच्या बोलण्यात येतात. तरीही श्रीयुत श्रीमंत मोक्याच्या वेळेस नाक दाबून क्रौर्य दाखवतो, त्यामुळे तो मरतो. नको तेवढी निरागस असली तरीही, तिला परवडतं म्हणून श्रीमती श्रीमंत वाचते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सॉरी. तो फ्रीजजवळचा प्रसंग मी विसरले होते. माझ्या आठवणीत तो भाऊ वरून लॉनवर जमलेले सारे श्रीमंत पाहुणे पाहतोय हेच होतं. आणि लुटुपुटुचा हल्ला त्या बहिणीवरच होणार हे ठरलेलं असतं ना.
ह्या दोन मतांपैकी पहिलं अर्थात सिनेमाच्या बांधणीच्या अंगाने जाणारं आणि माझ्याही मनात आलेलं असं आहे.
''पॅरासाईटांचं आयुष्य क्रूर आहे; त्यात निरागसपणाला स्थान नाही. म्हणून ती मरते.'' ही संगती रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0