मला सगळे सारखेच!

काँक्रीटच्या जंगलातल्या माझ्या घरातून जेवढा निसर्ग दिसतो त्यात सर्व काही आलबेल दिसते आहे. समोरचे झाड वसंताच्या आगमनाने बहरुन आले आहे. त्याला घर मानणाऱ्या दोन-तीन खारुताई त्याच्या फांद्यांवरून नेहमीसारख्याच मजेत पकडापकडी खेळत आहेत. त्या झाडाचे दुसरे एक भाडेकरु कबुतरांचे एक जोडपे. त्यातला नर सध्या आपला गळा फुगवून त्यावरचे करडे जांभळे मोहक रंग दाखवून कबुतरणीला वश करु बघत आहे. मध्येच दोघे माझ्या बाल्कनीत एकांत शोधायला येतात बहुतेक. पण मीही सध्या घरीच असल्याने त्यांची गैरसोय होते. परंतु त्यांना त्याची फारशी फिकीर नाही. माझ्यापासून दोन मीटर अंतर ठेवायचा सोशल डिस्टंसिंगचा नियम मात्र ते आवर्जून पाळतात. घरकामात अननुभवी असलेल्या माझ्याकडून चुकून ओट्यावर कसलेले भांडे खोलगट ताटलीत पाणी भरून केलेल्या खंदकात ठेवायचे राहून गेले तर सकाळीच सफाई कर्मचारी मुंग्या इमानेइतबारे रांग लावून आल्या. लॉक डाऊनला न जुमानता. भुकेल्या होत्या बिचाऱ्या. माझ्या मुलीनेही अलीकडेच तिच्या रूममध्ये पाल की झुरळ दिसले अशी आवई उठवून आजी-आजोबांच्या खोलीत मुक्काम हलवला. खरंही असेल तिचे. पण त्यांच्याही बेडरुममध्येही परवा अचानक एक मधमाशी आपले आठव्या मजल्यावरच्या दुर्गम ठिकाणावरचे, त्या केम्भावींच्या बाल्कनीजवळचे प्रशस्त पोळे सोडून चुकून आमच्या घरात घुसली. आमच्याकडच्या सॅनिटायझरचा वास न आवडल्याने तिने मग बाजूच्या देशपांड्यांचा पाहुणचार घ्यायचे ठरवले. कशी काय कोण जाणे, पण त्या अँटनींच्या खिडकीतून काही ती आत गेली नाही. ते नुकतेच दुबईहून आल्यामुळे त्या क्वारंटाईम की कुठल्याशा ऍपमध्ये त्यांचे नाव आहे हे तिला कसे कळले?

सांगायचा मुद्दा असा की माणसाच्या जगातला सध्याचा हाहाकार इतर सजीवांच्या आणि निसर्गाच्या गावीही नाही. पृथ्वीमातेला तिच्या लाडक्या आणि सगळ्यात हुशार (?) मनुष्य बाळावर गुदरलेल्या संकटाची काहीच चिंता दिसत नाही. चिंता तर सोडाच, पण ही सर्व अमानवी मंडळी स्वत:तच इतकी मश्गुल आणि मजेत आहेत की जणू काही आपण माणसं ह्यांचे कोणी लागतच नाही. मला तर मनोमन असे वाटते आहे की पृथ्वीमातेकडे व्हॉट्सअँप असतं तर तिने आपल्याला असा मेसेज टाकला असता - अरे बबड्यांनो, तुम्ही काय आणि तो चरबी वेष्टित प्रथिन-साखळी कोरोना काय, मला सगळे सारखेच!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे बखरीतच का नाही घालत ? नंतर संकलित होणाऱ्या निवडक वेच्यांत समावेश होण्यासारखे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंतरच्या विशेष अंकांत घेण्याचे योजले आहे काय? मग काही लिहायलाच हवे.
----
पशुपक्षी-कीटकांना काय वाटते याची दखल आवडली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे ऐसीच्या फेसबुक पानावर वाचले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0