द फ्रेंच एक्सपीरिअन्स

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. सद्गुरू स्टॉलकडे म्युन्सिपाल्टीची काहीतरी गडबड चालली होती म्हणून मह्या आणि मी चहा प्यायला मामांच्या हॉटेलात गेलो होतो. बंड्यामामा म्हणजे माझे चुलतमामा. त्यांना सख्खी बहीण नाही, म्हणून आईवर त्यांचा फार जीव. माझेपण लहानपणापासून लाडबिड करतात. त्यांच्या हॉटेलात कितीही खा-प्या, आपल्याला बिल द्यायला लागत नाही. पण तरी तिथे कधीतरीच जातो. मामांच्यासमोर सुट्टा ओढता येत नाही ना!

बंड्यामामांचं 'हॉटेल सागर डिलक्स' बरं आहे. काय डिलक्स वगैरे नाही, पण जुनं हॉटेल असल्यामुळे उंच वगैरे आहे. टेबल-खुर्च्या चांगल्या शिसवी लाकडाच्या आहेत. तर तिथे गेलो. मामांना नमस्कार करून बसलो. मह्याने डोसा सांगितला आणि मी वडासांबार. जरा वेळानी मामा आमच्यात येऊन बसले.

"कसं चाललंय मामा?" मह्यानी विचारलं.

"ठीक चाललंय रे. लागतं तेवढं कमावून झालं. सागर ऑस्ट्रेलियात असतो. माझा वेळ जात नाही म्हणून इथे येऊन बसतो झालं. पण काय एक्साईटमेन्ट नाय हॉटेलात आता." मामा बोलले.

आम्ही खाऊन संपवलं. स्पेशल चहा प्यायलो आणि घरी गेलो.

पंधरा दिवसांनी रविवारी सकाळीसकाळी मह्याचा फोन आला, "चल लगेच. सेटिंग करायचीय."

"भेंजो साडेसात वाजलेत फक्त. आत्ता कुठली सेटिंग?" मी डोळे चोळत विचारलं. पण बोलण्यात काय पॉईंट नव्हता. जरा तयारी करून खाली गेलो. मह्यानी बाईक काढली. आम्ही पेट्रोल पंपावर गेलो आणि मह्यानी टाकी फुल्ल करायला सांगितली.

"दोनशेच्या वर तू कधी पेट्रोल नाही भरत. आज काय दिवाळी काय?" मी विचारलं.

"लांब जायचंय भेंजो. काय तलावपाळीला चाललो नाहीये," बाईकला किक मारत मह्या बोलला. ट्रॅफिक कमी होता, आणि आम्ही पाऊण तासात अंधेरी लोखंडवालाला पोचलो. मह्यानी एका सीसीडीबाहेर बाईक पार्क केली आणि आम्ही आत गेलो.

एक लंबू गोरा कोपऱ्यात बसून पुस्तक वाचत होता. मह्याला बघून तो हसला आणि आम्ही त्याच्या टेबलवर जाऊन बसलो.

"जीन पॉल, मीट माय फ्रेंड ____". गोरा हसला आणि माझ्याशी शेकहॅण्ड करत मह्याला म्हणाला, "ज्यां पॉल. प्लेझर मीटिंग यू."

मग मह्यानी सगळा प्लॅन सांगितला. ज्यां पॉल कॅनडियन आर्टिस्ट होता आणि बॉलिवूडमध्ये छोटे रोल करायचा. त्याला आता जरा तंगी होती म्हणून आमच्याबरोबर काम करायला तो तयार झाला होता. मग त्याच्याबरोबर सेटिंग केली, TTMM करून कापुचिनो प्यायलो आणि डायरेक्ट बंड्यामामांच्या हॉटेलवर गेलो. बाकीची चिकार सेटिंग करायची होती.

पुढच्या आठवड्यात हॉटेलबाहेर फ्लेक्स लागला, पेपरमधून पॅम्प्लेट्स टाकली, आणि एका सोशल मीडिया इन्फ्लूएंसर मित्राला थोडे पैसे देऊन कॅम्पेनपण केली.

रविवारी सकाळपासून मह्या आणि मी 'हॉटेल सागर डिलक्स'मध्ये धावपळ करत होतो. टेबल-खुर्च्या आधीच पॉलिश करून घेतले होते. बंड्यामामा स्वच्छ दाढी वगैरे करून आणि ठेवणीतला बुशशर्ट घालून गल्ल्यावर बसले होते. वेटर्सनापण नवीन युनिफॉर्म दिले होते. थोडं पब्लिक बाहेर जमा झालं होतं. (त्यातल्या चार मुली आणि दोन मुलं मह्याच्या मावसबहिणीच्या कॉलेजातल्या नाट्यमंडळातले होते आणि फुकट लंच देणार असं प्रॉमिस करून त्यांना आणलं होतं.)

बरोबर साडेअकरा वाजता पांढरे कपडे घातलेला आणि शेफची हॅट घातलेला ज्यां पॉल दारात आला, आणि दारात बांधलेली लाल फीत कापत म्हणाला, "वेलकम टू द फ्रेंच एक्सपीरिअन्स ऍट हॉटेल सागर डिलक्स!"

पब्लिक आत आलं. एका भिंतीवर आयफेल टॉवरचा फ्लेक्स लावला होता. नेहमीचे मेनू बाजूला ठेवून निळ्या, पांढऱ्या आणि लाल रंगातले स्पेशल "टुडे'ज मेनू" टेबलवर ठेवले होते. (ज्यां पॉलनी टाब्ल डोट का काहीतरी शब्द सांगितला होता, पण आम्हाला तो उच्चारायलाच जमत नव्हतं.) मिक्स्ड सॅलड, ओनियन सूप, राटाटुई, फ्रेंच बॅगेट, चीझ, क्रेम ब्रुले, आणि कॉफी असा शुद्ध शाकाहारी मेनू होता.

ज्यां पॉल मधेमधे किचनमध्ये जात होता. फ्रेंचमध्ये काहीतरी ओरडत होता. मधेच कोणत्याही टेबलवर जाऊन एखाद्या काकूंना जेवण कसं वाटलं याची आवर्जून चौकशी करत होता. मह्या आणि मी फोटो काढत होतो आणि आमच्या सोशल मीडिया इन्फ्लूएंसर मित्राला पाठवत होतो.

एवढ्यात कोणीतरी फ्रेंच शिकवणाऱ्या टीचर आणि आणि त्यांचे स्टुडन्ट्स आले. ज्यां पॉल त्यांच्याशी फर्ड्या फ्रेंचमध्ये बोलला. मह्या मला म्हणाला, "म्हणून सेटिंगला वेळ लागला भेंजो. कोणी ब्रिटिश नाहीतर अमेरिकन आणला असता तर स्वस्तात झालं असतं पण आता वांदे झाले असते ना!"

पुढच्या तीन तासांत साधारण दोनशे माणसं जेवून गेली. त्यात कॉलेजच्या पोरींची संख्या बरीच होती. मह्या "लक्षणीय" म्हणाला - संख्येला का पोरींना, काय माहीत.

तीन वाजता शटर बंद करून आम्ही हिशोब केला. प्रत्येकी पाचशे रुपये अशा रेटनी ब्याण्णव हजार रुपये गल्ला जमला होता, म्हणजे पेटीएम धरून. ज्यां पॉलला पंधरा हजार दिले. मह्याने शोधून काढलेल्या केटरिंग कॉलेजच्या दोन स्टुडन्ट्सना पाच-पाच हजार रुपये दिले. फ्लेक्स, सोशल मीडिया वगैरे सगळं धरून अजून बारा हजार रुपये खर्च झाले होते.

मह्या म्हणाला, "मामा, पंचावन्न हजार सुटले तुम्हाला. ठरल्याप्रमाणे त्यातले चाळीस टक्के आम्हाला ना - बावीस हजार?"

मामा म्हणाले, "पंचावन्न हजार कसे? मटेरियल, गॅस आणि लेबरचे वीस हजार लागले की."

मह्या काही बोलला नाही, पण माझा चेहरा जरा पडला. एवढ्यात मामा म्हणाले, "तर ते वीस हजार माझे. बाकी पस्तीस हजार तुमचे. एक्साईटमेन्ट मिळाली मला."

मग आम्ही उरलेलं चीझ-ब्रेड खाल्लं, कॉफी प्यायलो, आणि घरी गेलो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Smile भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त!
कोणी सांगावं...
ह्यातनं कधीतरी जेन्युईन स्टार्ट-अपची आयडिया मिळून जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठून कुठून कल्पना सुचतात ...! सध्याचं वातावरण पाहता, मामांनी एक्साईटमेन्टसाठी हे केलं असेल हे सहज पटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक नंबर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0