जुना खलाशी

"उद्यापासून नवीन ड्युटी. वरळी सीफेसला. पत्ता व्हाट्सऍप करते. तुला नाईट ड्युटी देतेय. म्हातारा ठीक आहे तसा. मदत केलीस तर उठून बसतो. बेडसोअर वगैरे नाहीत." मोरे मॅडम तिच्या गेंगाण्या आवाजात सांगत होती. तशी बरी आहे - मला जास्त नाईट ड्युटी देते. पंचवीस टक्के जास्त मिळतात डेपेक्षा.

दुसऱ्या दिवशी साडेसातला दिलेल्या पत्त्यावर गेलो. ड्युटी आठची, पण पहिल्या दिवशी लवकर गेलो तर वॉचमनशी ओळख करून घेता येते. इंप्रेशनपण चांगलं पडतं.

जुनी बिल्डिंग, पण चांगली मोठ्ठी. चौथ्या माळ्यावर फ्लॅट. वन बीएचके. पेशंट बेडरूममध्ये. सीफेसिंग बेडरूम. थोडासा खारट वास. डेला जोशी होता. त्यानेच दरवाजा उघडला. "अरे तू? तू तर त्या खारच्या बाईकडे नाईटला होता ना?"

"तिला लंडनला घेऊन गेली तिची पोरगी. मग दहा दिवस काही काम नव्हतं. मोरे मॅडमनी आज इथे पाठवलं ते बरं झालं."

"बरं ऐक. म्हातारा चांगला आहे. थोडा वेळ झोपलास तर काही म्हणणार नाही. औषधं दाखवतो तुला. बाकी बेडपॅन वगैरे तर तुला माहितीच आहे." जोशीनी सगळं दाखवलं आणि मग मला म्हाताऱ्याकडे घेऊन गेला.

"साहेब, हा नाईटला येईल. आधीचा माणूस गावाला गेला." जोशी मोठ्याने म्हणाला. म्हाताऱ्याला नीट ऐकू येत नसणार, पण त्याने मान डोलावली आणि माझ्याकडे बघून हात जरा वर करून दाखवला.

"नमस्कार साहेब. जोशीनी तुमची औषधं दाखवली सगळी. मी नीट वेळेवर देईन. आणि काही पाहिजे तर बटण दाबा, मी इथे कोपऱ्यातच असीन." मीपण मोठ्ठ्याने बोललो.

म्हाताऱ्याने परत हात वर करून दाखवला. "ओके" म्हणायची त्याची स्टाईल असणार.

जोशी घरी गेला. मी म्हाताऱ्याला नऊ वाजता पेजेचं पाणी दिलं. मग गोळी दिली, दिवा बंद केला आणि कोपऱ्यात बसून तो झोपायची वाट बघत राहिलो. म्हातारा सव्वादहाला झोपला. मग मी हॉलमध्ये गेलो, डबा खाल्ला आणि पिशवीतून नोट्स काढून अभ्यास करत बसलो. बारा वाजता परत बेडरूममध्ये गेलो आणि खुर्चीवर बसून पेंगत राहिलो. म्हाताऱ्याने सकाळी पाचच्या आसपास बेल वाजवली तेव्हा त्याला नीट साफसूफ करून स्पंजिंग केलं, आणि आधार देऊन बसवलं. मग दोन तास तो त्याच्या बेडवर आणि मी माझ्या खुर्चीवर नुसतेच बसून राहिलो.

जोशी सव्वाआठला आला. मी म्हाताऱ्याचा निरोप घेतला, खाली टपरीवर चहा आणि बनमस्का खाल्ला आणि घरी गेलो.

पुढचे पाचसहा दिवस असेच गेले. मग एका रात्री म्हाताऱ्यानं रात्री एक वाजता बेल वाजवली. मी लगेच उठलो आणि दिवा लावून त्याच्याजवळ गेलो. त्यानी हातानी मला बोलावलं आणि एकदम बारीक आवाजात म्हणाला, "मला बसव. आणि पडदा उघड." त्याला बरं आहे हे बघून मला जिवात जीव आला. नाहीतर डॉक्टरला बोलवा वगैरे धावपळ करायला लागली असती. मी म्हाताऱ्याला आधार देऊन बेडवर बसवलं आणि पडदा उघडला. समुद्र दिसत होता आणि लाटांचा आवाज येत होता. म्हातारा काहीतरी बोलला, म्हणून मी त्याच्याजवळ गेलो. "पौर्णिमा आहे. उधाणाची भरती." एवढं बोलून तो गप्प बसला आणि समुद्राकडे बघत बसला.

म्हातारा काहीतरी वेगळाच होता. उगाच बेल वाजवायचा नाही. खूप वेळ गप्प बसायचा - अगदी सकाळी जागा असतानापण. पण कधीकधी रात्री मला बोलावून पडदा उघडायला सांगायचा. एकदा रात्री पाऊस पडत होता तर खिडकीपण उघडायला लावली, आणि खाऱ्या हवेचा वास घेत गप्प बसून राहिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजताच त्यानी बेल मारली. मी जांभया देत गेलो तर उठून बसवायला सांगितलं. आणि मग खूप वेळ हळू आवाजात माझ्याशी बोलत बसला. त्याचा चेहरा आणि आवाज मला अजून आठवतोय. त्याचा चेहरा रापलेला होता, आणि म्हाताऱ्या डोळ्यांमध्ये त्या वेळेला एक वेगळीच चमक होती. आवाज खूप खोलवरून येतोय असं वाटत होतं. त्या पहाटे त्यानी सांगितलं ते काहीतरी भन्नाट होतं.

"माझे आता फार दिवस राहिले नाहीत. माझ्या नातवाची परीक्षा संपली की कॅनडातून माझा मुलगा आणि सून येतील, पण मी तोपर्यंत जगीन का ते ठाऊक नाही. आता हे तुलाच सांगावं लागेल. जोशीपेक्षा तू हुशार वाटतोस. रात्री अभ्यास वगैरे करतोस. आता हे नीट एक आणि लक्षात ठेव. किंवा असं कर - तुझ्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करून घे.

मी इथे वरळीलाच वाढलो. कोळीवाड्यात. समुद्राच्या अंगाखांद्यावर. बापानं मागे लागून इंटरपर्यंत शिकवलं. पण पुढे शिकायची माझी इच्छा नव्हती. समुद्र खुणावत होता - माझ्या आधीच्या कित्येक पिढ्यांना खुणावत होता तस्साच. मग एके दिवशी भाऊच्या धक्क्याला गेलो आणि बोटीवर खलाशी म्हणून काम सुरू केलं. जवळच्याच सफरी. रेवस, दापोली, दाभोळ, हर्णे. फार फार तर गोवा. अरबी समुद्रात फार खोल न जाता पॅसेंजर फेरी करणाऱ्या बोटी. काम करत होतो, शिकत होतो.

आईबापानं माझं लग्न करायचं ठरवलं. मुलगी बघायला म्हणून चार दिवसांची सुट्टी घेतली आणि गावी गेलो. आणि त्याच वेळी तो भयानक अपघात झाला. रामदास बोट बुडाली, जवळपास ७०० माणसं गेली. सुट्टी घेऊन गावी गेलो नसतो तर मीपण त्या बोटीवर असतो. मी वाचलो, पण सहकारी आणि दोस्त गेले. डोकंच चालेना. बोटीवर जायची भीती वाटायला लागली. नोकरी शोधायला म्हणून रोज भाऊच्या धक्क्यावर जायचो पण समुद्राचा खारा वास आला की काही सुचायचंच नाही. दिवसभर इकडेतिकडे भटकायचो आणि संध्याकाळी घरी यायचो.

ठरलेलं लग्नपण मोडलं तेव्हा मी मुंबई सोडायचं ठरवलं. आईबापानं खूप समजावलं पण मी हट्टाला पेटलो होतो. मग बापानेच कुठेतरी ओळख काढली आणि मी एडनला गेलो.

पुढची काही वर्षं निरुद्देश गेली. इथे मोठ्या जहाजावर काम करायचो. महिनोनमहिने समुद्रात भटकत असायचो. अरबी समुद्र, पर्शियन आखात, बंगालचा उपसागर, साऊथ चायना सी सगळं बघितलं. कामात हुशार होतो आणि काही व्यसनं नव्हती त्यामुळे तांडेल माझ्यावर खूष होता. हळूहळू जहाजाचं सगळं शिकत होतो. वर्ष-दोन वर्षातून कधीतरी घरी जायचो. आई परत लग्नाचं बोलायची पण मला समुद्रावरच राहायचं होतं.

तर एकदा मलाक्का स्ट्रेटमधून चाललो होतो. हॉंगकॉंगमधून निघालो होतो आणि सोकोत्राला जाऊन माल द्यायचा होता. पण अचानक चाच्यांनी आमच्या जहाजावर हल्ला केला. त्यांच्याकडे बंदुका वगैरे होत्या, त्यामुळे प्रतिकार करण्यात अर्थ नव्हता. त्यांनी जहाजाचा ताबा घेतला, आणि कप्तान आणि अजून एकदोन जण सोडून आम्हा बाकी खलाशांना होल्डमध्ये कैद करून ठेवलं. रोज अन्न आणि पाणी देणारा चाचा सोडला तर बाहेरच्या जगाशी आमचा काहीच संबंध नव्हता.

काही दिवसांनंतर जहाज वादळात सापडलं. आम्हाला होल्डमध्ये काही दिसणं शक्यच नव्हतं, पण जहाज लाटांवर फेकलं गेल्याची जाणीव तर व्हायचीच ना. आम्ही सगळे एवढे तयारीचे खलाशी, पण दोनतीन दिवसांत आम्हालाही वांत्या सुरू झाल्या. खूप हाल झाले.

एके दिवशी डेकवर असलेला आमचा एक सहकारी अचानक आला आणि होल्डमध्ये दोराची शिडी टाकून म्हणाला, "पळा. आपला जीव वाचवा." आम्ही कसेबसे डेकवर आलो. जहाज डावी-उजवीकडे हेलकावे घेत होतं. विजा चमकत होत्या आणि पाऊस कोसळत होता. मोठमोठ्या लाटा उसळत होत्या. चाचे सैरभैर पळत होते. एवढ्यात एक प्रचंड लाट आली आणि बरेचजण डेकवरून फेकले गेले. मी एक फळकूट पकडलं आणि तेवढ्यात दुसऱ्या एका लाटेने मीसुद्धा समुद्रात फेकलो गेलो.

नशीबाने फळकुटावरची पकड सुटली नाही. एकदोन गटांगळ्या खाऊन मी परत वर आलो. आजूबाजूला हाहा:कार माजला होता. मी जहाजाकडे जात होतो तेवढ्यात जहाज कलंडलं आणि मी उलट फिरून शक्य तेवढ्या वेगाने जहाजापासून दूर जायचा प्रयत्न करू लागलो. तेवढ्यात मनात विचार आला - "रामदास"च्या वेळी वाचलास, पण आता तुझी वेळ आली.

त्राण जाईपर्यंत पोहत राहिलो. कुठे जातोय वगैरे काहीच भान नव्हतं. मग कधीतरी ग्लानी आली. जाग आली तेव्हा घशाला कोरड पडली होती. आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. फक्त अथांग समुद्र. फळकुटाला पकडून कसाबसा तरंगत राहिलो. पोहायची शक्ती राहिली नव्हती. रात्र होईल तेव्हा तारे बघून कुठे आहोत हे कळेल आणि त्याप्रमाणे पोहीन असं ठरवलं. पण संध्याकाळी परत ढग दाटून आले आणि जोराचा पाऊस सुरू झाला. प्यायला पाणी मिळालं आणि जिवात जीव आला; पण कुठे आहोत ते अजूनही कळलं नव्हतं. मनाचा हिय्या करून पूर्वेकडे पोहत निघालो. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पाऊस पडताच होता. थकव्याने परत ग्लानी येऊ लागली आणि फळकुटाला धरून गप्प बसून राहिलो.

अचानक कधीतरी जाग आली. कसेबसे डोळे उघडले तर मी एका लहानशा होडीत होतो. वल्हवणाऱ्या माणसाने मला प्यायला पाणी दिले आणि खुणेनेच परत झोपायला सांगितले. मी प्रचंड थकलो होतो. थोडं पाणी पिऊन झोपलो.

परत जाग आली तेव्हा एका झोपडीमध्ये होतो. मला वाचवणारा माणूस जवळच होता. मी डोळे उघडल्याचं बघून तो हसला, आणि एका पडद्यामागे जाऊन पाच मिनिटांत माझ्यासाठी तळलेली अंडी घेऊन आला. मी कसाबसा उठून बसलो आणि अधाशासारखी अंडी खाल्ली.

त्या गावात मी पंधराएक दिवस राहिलो. त्या कावेसकरनी आणि त्याच्या सगळ्या नातेवाईकांनी माझी खूप काळजी घेतली. जरा बरं वाटल्यावर मी त्यांच्याबरोबर कालवं गोळा करायलाही जायचो.

त्याने पोलिसांना वगैरे कळवलं आणि पोलिसांच्या मदतीने मी अखेरीस घरी पोचलो.

माझ्या पुढच्या आयुष्यात तसं काही खास घडलं नाही. अजून बरीच वर्षं वेगवेगळ्या जहाजांवर नोकरी केली. उशीरा लग्न केलं. बायको बाळंतपणात गेली तेव्हा नोकरी सोडली आणि मुलाला वाढवायला मुंबईतच राहिलो. आता मुलगा कॅनडात सेटल झालाय आणि मी इथे आहे. बारा वर्षं एकटाच राहतोय.

काही राहिलं नाही. फक्त एक इच्छा आहे. त्या कावेसकरला किंवा तो हयात नसेल तर त्याच्या मुलाबाळांना काहीतरी मदत करावी असं नेहमी वाटायचं पण तसं करायची हिंमत झाली नाही. मुलाच्या शिक्षणाला, माझ्या म्हातारपणासाठी लागेल म्हणून पैसे वाचवत राहिलो आणि त्याला कधी काही पाठवलं नाही. आता माझ्या मुलाचं चांगलं चाललंय. माझ्या थोड्याफार पैशांची त्याला गरज नाहीये. जर तो येण्यापूर्वी मी गेलो तर त्याला हे सगळं सांग, हा व्हिडीओ दाखव आणि माझ्या एफडीचे बारा लाख रुपये आहेत ते त्या कावेसकरला पाठवायची व्यवस्था कर."

एवढं बोलताना म्हातारा बऱ्याचदा थांबत होता. त्याला हवं तेव्हा मी पाणी देत होतो. तरीही तो थकला होता. त्यानी माझ्याकडे बघून हात जरा वर करून दाखवला, आणि "आता पुरे" अशी खूण केली. मी त्याला आडवं व्हायला मदत केली. थोड्या वेळानं तो गाढ झोपला. जोशी आला तेव्हाही म्हातारा झोपूनच होता.

मी घरी गेलो पण त्याच्या गोष्टीचाच विचार करत होतो. दुपारी जेवून झोपलो आणि संध्याकाळी परत ड्युटीवर गेलो, तर वॉचमन म्हणाला, "अरे तुला जोशीनी फोन नाय केला? साहेबांना दुपारी हार्ट अटॅक आला, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलंय अँब्युलन्समधून."

मला काही कळेना. काल तर बरा होता म्हातारा. एकदम हॉस्पिटलमधे? वॉचमनला बोललो, "परत आले की मला फोन कराल का? आणि काही बरंवाईट झालं तरी नक्की फोन करा."

दुसऱ्या दिवसापासून मोरे मॅडमनी लोखंडवालाला एका पेशंटची ड्युटी दिली. डे ड्युटी, आणि पेशंटच्या घरात बरेच लोक असायचे, म्हणून अभ्यास वगैरे व्हायचा नाही. तर आठदहा दिवसांनी त्या वॉचमनचा फोन आला, "साहेब गेले. चांगली गोष्ट एवढीच की त्यांचा मुलगा आणि सून दोन दिवस आधी पोचले इथे. दर्शन घ्यायचं असेल तर लगेच ये." मग मी काहीतरी इमर्जन्सी आहे असं मोरे मॅडमना कळवलं आणि बदलीची अरेंजमेंट करून वरळीला गेलो.

तिकडे फार लोक नव्हते. बिल्डिंगमधले काही शेजारी, काही नातेवाईक वाटणारे लोक. म्हाताऱ्याचं दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि मग त्याचा मुलगा कोण हे कोणालातरी विचारलं. त्यांनी जीन्स आणि टीशर्ट घातलेला एक लंबू फोनवर बोलत होता त्याच्याकडे बोट दाखवलं. त्याचं बोलून झाल्यावर गेलो आणि बोललो, "साहेब, तुम्हाला काही सांगायचं होतं. मी नाईटला अटेंडंट म्हणून यायचो. साहेबांना ऍडमिट करायच्या आधी त्यांनी मला काहीतरी सांगितलं होतं, ते तुम्हाला सांगायचंय. त्यांनी व्हिडीओ पण काढायला लावला मला."

लंबूनी रुमालानी तोंड पुसलं. "केवढं उकडतंय रे. अरे, त्यांना काहीतरी मानसिक त्रास झाला होता वयानुसार. ते बोलणं सिरियसली नाही घ्यायचं. हॉस्पिटलमध्येपण बोलत होते काहीतरी - चाचे, वादळ, कालवं गोळा करणारे लोक वगैरे. बिचारे. एवढा हुशार माणूस, पण इतकी वर्षं एकटं पडल्यामुळे डोक्यात काहीपण विचार चालू असणार त्यांचे. मी सांगत होतो कॅनडात येऊन रहा म्हणून, पण ऐकलं नाही."

"साहेब, पण त्यांची शेवटची इच्छा होती त्या माणसाला मदत करायची," मी एकदम बोलून गेलो.

"अरे असा कोण माणूस असेल तर मदत करणार ना? हे सगळं त्यांच्या डोक्यातले खेळ होते रे फक्त." लंबूनी सुस्कारा सोडला. "बरं ते जाऊदे. हे तुला आणि त्या डे अटेंडंटला. निम्मेनिम्मे वाटून घ्या दोघे. आणि थँक यू हां - तुम्ही दोघांनी खूप केलं त्यांचं." लंबूनी मला एक पांढरं पाकीट दिलं आणि तो परत कोणालातरी फोन लावायला लागला.

मी घरी आलो. पाकिटातले पैसे मोजले. वीस हजार होते. जोशीला फोन केला, तो घरीच होता. त्याच्याकडे गेलो आणि दहा हजार त्याला दिले आणि मग सगळी स्टोरी सांगितली. व्हिडिओपण दाखवला. "मला वाटतं की म्हाताऱ्यानी मुलाला सांगितलं असणार सगळं. पैसे जायला नको म्हणून मुलगा लक्ष देत नाहीये. बारा लाख काय लहान रक्कम नाय."

जोशी म्हणाला, "तसं असलं तरी तू काय उखडणार? पोलिसात जाणार? कंप्लेन करणार? सोड ना. दहा हजार मिळाले त्यात खूष रहा."

मी घरी आलो. पॉईंट पैशाचा नव्हता. म्हातारा बोलला ते खरं का खोटं हे कळणं महत्त्वाचं होतं. मग तो व्हिडीओ परतपरत ऐकला. कावेसकर सोडला तर कोणाच्या नावाचा उल्लेख नव्हता. आता या कावेसकरला कुठे शोधायचा? नाव तर कोकणी होतं - गावसकरसारखं. पण कोणतं गाव?

मग व्हिडीओ परत बघितला. दुसरा क्लू कळला - रामदास बोटीचा. म्हातारा त्याच्यावर काम करायचा कधीकाळी. मग त्या बोटीला ऍक्सिडेंट झाला ते गूगल केलं. त्या ऍक्सिडेंटमधे वाचलेले लोक रेवसजवळ पोचले आणि त्यांनी तिथे बोडणी नावाचं गाव वसवलं असं विकिपीडियावर वाचलं.

रविवारी सुट्टी घेतली आणि बोडणीला गेलो. मच्छीमारांचं गाव. होड्या , जाळी, सुकायला ठेवलेले बोंबील. पानाच्या ठेल्यावर गेलो, सिगरेट घेतली आणि बोललो, "दादा, रामदास बोट बुडाली त्याची माहिती शोधतोय. कोण बुजुर्ग आहेत का गावात?"

"तुला कशाला पाहिजे ती माहिती? सत्तर वर्षं होऊन गेली त्या ऍक्सिडेंटला," पानवाला बोलला.

"मी युनिव्हर्सिटीत इतिहास शिकतोय, आणि हा प्रोजेक्ट करतोय." मी त्याला माझं युनिव्हर्सिटीचं आय-कार्ड दाखवलं. त्यानी निरखून बघितलं आणि मग कोणालातरी फोन लावला. "थांब जरा," तो म्हणाला.

दहा मिनिटानी एक साठीचे चाचा आले. "चल, अब्बा सांगतील तुला रामदासची स्टोरी," ते म्हणाले. मी त्यांच्यासोबत गेलो. त्यांचे अब्बा नव्वद वर्षाचे असतील. मग दोघा बापलोकांनी मला रामदास बोटीची गोष्ट सांगितली. मी उगाच नोटस काढत होतो, पण मला त्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट नव्हता.

बोडणी गाव कसं वसवलं ही स्टोरी चाचा सुरू करत होते तेव्हा मी थांबवलं. "एक मिनिट. मी एक गोष्ट ऐकली होती की रामदास बोटीचा एक खलाशी नेमका त्या दिवशी रजेवर होता आणि त्यामुळे वाचला."

चाचांच्या अब्बानी माझ्याकडे बघितलं आणि हळू बोलले, "तांबे. त्या दिवशी वाचला पण पुढे खूप सोसलं बिचाऱ्यानी."

"म्हणजे?" मी पटकन विचारलं.

"रामदासच्या ऍक्सिडेंटनंतर तो जरा भिरभिरला होता. नंतर जरा बरा झाला, परत नोकरी करू लागला तर एकदा चाच्यांनी त्याचं जहाज पकडलं. मग ते जहाज वादळात खेचलं गेलं. तांबे वाचला, पण त्या जहाजावरचं अजून कोणीच नाही वाचलं. त्याचा धक्का घेतला तांबेनी."

"त्यांना वाचवलं ते कावेसकरनी ना? कुठेसे राहतात ते? रत्नागिरी जिल्हा का सिंधुदुर्ग?" मी विचारलं.

म्हातारा बोळकं दाखवत हसला. "सिंधुदुर्ग? नाही रे बाबा. पॅसिफिकमधलं वादळ ते - सिंधुदुर्गला कशाला येतंय? तांबे पोचला होता चिली देशात. तिकडच्या आदिवाश्यांनी वाचवला त्याला."

"काय? चिली देशात? दक्षिण अमेरिकेत?" मी उडालोच.

मग जरा अजून बोललो आणि दोघांचा निरोप घेऊन निघालो. घरी येताना गूगल करायला लागलो. कावेसकर (Kawésqar) हे चिलीमधले मासेमारी करणारे आदिवासी होते. आता खूप कमी राहिलेत. दूरच्या मुंबईतला तांबे नावाचा खलाशी तिथे जातो काय आणि कोणतरी कावेसकर त्याला वाचवतो काय, सगळंच अद्भुत.

त्या कावेसकरला किंवा त्याच्या मुलांना बारा लाख रुपये मिळणार नाहीत, पण म्हातारा तांबे खरं बोलत होता हे एवढं मला कळलं. त्या रात्री गोष्ट सांगतानाचा त्याचा आवाज आणि त्याच्या डोळ्यातली चमक खोटी असूच शकत नव्हती.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तांबे हाँगकाँगवरून सोकोत्राकडे निघाला होता. बोले तो, साधारणत: पश्चिमेच्या दिशेने. मलाक्काच्या जवळपास त्याच्या जहाजात चांचे घुसले. त्यांनी काही काळ तांब्याला होल्डमध्ये कैद केले, परंतु काहीच दिवसांत त्याची सुटका झाली, आणि त्याने समुद्रात उडी टाकली.

त्याने समुद्रात उडी टाकल्यानंतर तो जहाजाच्या विरुद्ध दिशेने पोहू लागला, आणि ती दिशा पूर्व होती. इथवर ठीक आहे; चिली हे (पॅसिफिकमार्गे) मलाक्काच्या पूर्वेला आहे. त्यामुळे, पूर्वेच्या दिशेने तो वाहत, भरकटत गेल्यास कधीतरी का होईना, परंतु तो दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याला - चिलीत - जाऊन लागूही शकेल.

पण मग, ज्याअर्थी तो पूर्वेकडे - जहाजापासून दूर! - पोहत होता, त्याअर्थी जहाज पश्चिमेकडे चालले असले पाहिजे. म्हणजे, सोकोत्राच्याच साधारण दिशेने. बोले तो, मूळ कोर्सपासून फारसे विचलित न होता.

आता प्रश्न निर्माण होतात.

- ज्याअर्थी चांच्यांनी जहाज मलाक्काच्या जवळपास ताब्यात घेतल्यानंतरसुद्धा ते पश्चिमेकडेच जात होते, त्याअर्थी तांब्याने पाण्यात उडी घेतली ते ठिकाण मलाक्काच्या पश्चिमेस असले पाहिजे. बोले तो, मलाक्काच्या तुलनेत चिलीपासून अधिक दूर.

कोलंबसला स्पेनहून निघाल्यानंतर वाटेतल्या (आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या) कॅनरी बेटांपासून ते बहामापर्यंत जायला जवळपास सव्वा महिना लागला होता म्हणतात. आता, त्या वेळेस कोलंबस पूर्णपणे शुद्धीत होता, असे मानावयास जागा आहे. म्हणजे, तो जाणूनबुजून पश्चिमेच्या दिशेस नावा हाकीत चालला होता; लाटा आणि वारे नेतील तसा भरकटत नव्हता.

मलाक्कापासून ते कावेसकर मंडळी राहतात त्या चिलीच्या भागापर्यंतचे अंतर हे कॅनरी बेटांपासून ते बहामापर्यंतच्या अंतराच्या साधारण तिप्पट असावे. तांब्याने मलाक्काच्या पश्चिमेस समुद्रात उडी मारली, हे लक्षात घेता, त्याला काटायचे अंतर हे तिपटीहूनही थोडे अधिक. त्यात या प्रवासात तांबे बेशुद्धावस्थेत होता; लाटा नेतील तसा आणि तेव्हा भरकटत होता, आणि लक-बाय-चान्स चिलीत जाऊन पोहोचला. म्हणजे या प्रवासास त्याला कदाचित किमान चारपाच महिने लागले असावेत, किंवा कसे?

आता, इतका वेळ जर तो बेशुद्धावस्थेत होता, तर, मध्यंतरीच्या काळात त्याच्या हातातून फळकूट निसटले नाही, असे जरी मानले - मिरॅकल्स डू हॅपन! - तरीसुद्धा, इतके महिने अन्नपाण्यावाचून आणि बेशुद्धावस्थेत तो चिलीला जिवंतावस्थेत पोहोचला असू शकेल, हे किंचित फारफेच्ड वाटते.

- तेही सोडा. मलाक्काला चांच्यांच्या ताब्यात गेल्यानंतर काहीच दिवसात जहाज जेव्हा वादळात सापडले, तेव्हा ते पश्चिमेच्या दिशेने चाललेले होते. (कारण, तांबे जहाजाच्या विरुद्ध दिशेने पूर्वेकडे पोहला, वगैरे वगैरे.) आता, हे वादळ पॅसिफिकमध्ये झाले, असे कथेच्या शेवटी नमूद केलेले आहे. पॅसिफिक महासागर झक मारायला मलाक्काच्या पश्चिमेस कोठे मरायला गेला?

थोडक्यात, म्हाताऱ्याने छान फिरकी घेतली म्हणायची.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही दिवसांनंतर जहाज वादळात सापडलं: वादळाच्या दिशेचा उल्लेख केला नाहीये, पण हे पूर्वेकडे जाणारं वादळ असू शकेल. म्हणजे चाच्यांनी जहाजाची दिशा बदलून न्यू गिनीच्या पूर्वेला जहाज नेलं आणि मग त्याला वादळाने गाठलं.

जहाज कलंडलं आणि मी उलट फिरून शक्य तेवढ्या वेगाने जहाजापासून दूर जायचा प्रयत्न करू लागलो: म्हणजे पश्चिमेच्या दिशेने.

मनाचा हिय्या करून पूर्वेकडे पोहत निघालो.: जहाजाखाली येण्याची किंवा त्याच्या तुकड्यांमुळे इजा होण्याची शक्यता कमी झाल्यावर तांबेने दिशा बदलली व तो पूर्वेकडे पोहू लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त!
थोडीफार अशा थीमवर अनुभव २०१९दिवाळी अंकात "मेल्यालयसयsssहो" नावाची गोष्ट आहे.
जमल्यास वाचा. बहुतेक आवडेल तुम्हाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रा रा लेखक महोदय यांच्या प्रतिभेच्या दशदिशातून होणाऱ्या भराऱ्या बघून अशी शंका येते की त्यांच्या भागात कुठली तरी मनबदलणाऱ्याऔषधे उपलब्ध आहेत किंवा कसे.
म्हणजे आज्याबात आक्षेप नाही.
पण आम्हाला पण पत्ता भेटला असता तर लै उपकार झाले असते.
शेवटी काय प्रतिभा महत्वाची
कसें ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0