तैवान झिंदाबाद

तीनेक वर्षांपूर्वीची गोष्ट.

मी ऑफिसमध्ये चटर्जीदाबरोबर काम करत बसलो होतो. म्हणजे तो एडिटिंग करत होता आणि मी "क्या बात है सर" वगैरे म्हणत त्याला प्रोत्साहन देत होतो. तेवढ्यात मह्याचा फोन आला. "कामात आहे रे, नंतर बोलूया," एवढं बोलून मी फोन ठेवला. "महेश का फोन था क्या? साला उतना जुगाडू आदमी मैंने जिंदगी में नही देखा!" चटर्जीदा म्हणाला. त्याच्या एका खडूस क्लायंटकडून अडकलेल्या पैशांची रिकव्हरी मह्याने करवून दिली होती तेव्हापासून मह्याबद्दल त्याला कौतुकयुक्त आदर आहे.

काम जरा आटपलं तेव्हा मी मह्याला फोन केला. "अरे कॉलनीत फनफेअर आहे पंधरा दिवसांनी. या वेळी चायनीजचा फूडस्टॉल लावूया, काय म्हणतोस?' मह्या एक्साईट होऊन म्हणाला.

"चालतंय की. काहीतरी वेगळं करूया - ते चायनीज भेळ आणि गोभी मांचुरियन नको." मी बोललो.

आता आमच्या कॉलनीत दर वर्षी फनफेअर होतं. आणि दर वर्षी काहीतरी स्टॉल टाकून आम्ही थोडे पैसे कमावतो आणि त्या निमित्ताने कॉलनीतलं नेटवर्क मेंटेन करतो. तसंच त्या वर्षीपण आम्ही फूड स्टॉलचं बुकिंग केलं, आणि मग कामाला लागलो. शेफ शोधला. बॅनर वगैरे प्रिंट करून घेतला. फनफेअरला एनीवे अख्खी कॉलनी येतेच, त्यामुळे पॅम्प्लेटची गरज नव्हती.

आणि ज्या संध्याकाळी फनफेअर होतं त्याच दिवशी सकाळी मह्याचा हायपर होऊन फोन आला, "टीव्ही लाव भेंजो. पटकन."

मी टीव्ही लावला, तर बॉर्डरवर कुठेतरी भारतीय आणि चायनीज सैन्याचा काहीतरी गोंधळ चाललंय एवढं कळलं. तिथे मह्या फोनवर बोलत होता, "सगळा लोच्या झाला. आता कोण पब्लिक चायनीज खाणार? सगळी इन्व्हेस्टमेंट फुकट जाणार भेंजो."

मह्या जनरली एवढा हायपर होत नाही. मी त्याला शांत करायचा प्रयत्न केला, "थांब रे, काहीतरी सुचेल. विचार करू दे." तेवढ्यात मला चटर्जीदाचा नवीन एसर लॅपटॉप आठवला, आणि एकदम आयडिया सुचली. "डोन्ट वरी पार्टनर, आय हॅव गॉट ऍन आयडिया," मी बोललो आणि मग मह्याला बेसिक आयडिया सांगितली. मह्या शांत झाला आणि पुढच्या सगळ्या डिटेल्सबद्दल बोलू लागला.

नवीन बॅनर बनवायला वेळच नव्हता. मग आम्ही कात्री घेऊन जुनाच बॅनर कापून बदलला. तरी पब्लिक कन्फ्यूज व्हायची शक्यता होती, म्हणून एका क्लासमधला व्हाईटबोर्ड आणून शेजारच्या एका आर्टिस्ट पोराकडून सुंदर अक्षरात लिहून घेतलं आणि चित्रपण काढून घेतलं. मग शेफला फोन केला आणि त्याला समजावून सांगितलं.

संध्याकाळ झाली तसा आम्ही स्टॉल सेट केला. बॅनरमधल्या "Enjoy delicacies from" आणि "Republic of China" या दोन भागांच्या मध्ये तैवानच्या झेंड्याचा प्रिंटआऊट लावला होता. बॅनरमधून "People's" हा शब्द कापून टाकला तिथल्या कापल्याच्या खुणा त्या प्रिंटआऊटने झाकल्या गेल्या होत्या. बाजूला व्हाईटबोर्डवर "Taiwanese Cuisine" असं लिहिलं होतं, आणि त्या आर्टिस्ट पोरानी काढलेल्या तैवानच्या नकाशाच्या बाजूला मेनू लिहिला होता - तैवानीज सूप, तैवानीज डम्पलिंग्स, तैवानीज फ्राईड टोफू, तैवानीज चिकन नूडल्स.

पब्लिक हळूहळू येत होतं. कॉलेजची पोरं सूप किंवा डम्पलिंग्स घेऊन खात होती. एवढ्यात तीन नंबर बिल्डिंगमधले एक काका आले. "काय रे महेश, चायनीज स्टॉल लावलात? कशी रे तुमची पिढी?"

मह्या शांतपणे म्हणाला, "नाही काका. आम्ही चायनीज स्टॉल लावायचा विचारही करू शकलो नसतो. आमचा स्टॉल तैवानीज फूडचा आहे. Republic of China म्हणजे तैवान. चायनाजवळच्या एका बेटावरचा स्वतंत्र देश आहे तो. आणि चायनाशी पंगे असतात त्यांचे. तो नकाशा आणि झेंडा बघा ना - चायनाचा आहे का?"

काकांनी मान डोलावली, मेनूपण वाचला, आणि आपल्या अख्ख्या फॅमिलीसाठी तैवानीज फ्राईड टोफूची ऑर्डर दिली. मग टोफू खाता खाता ते ओळखीचं कोण दिसलं तर त्यांना बोलावत होते आणि आपणहून सांगत होते, "अरे हे तैवानीज फूड खाऊन बघा. मस्त आहे. मी कधी खाल्लं नव्हतं असं तैवानीज फूड. आणि तैवानचा चायनाशी पंगापण आहे."

आमच्या ऑनररी ब्रँड अँबॅसेडरमुळे बरंच पब्लिक आमच्या स्टॉलवर आलं. एकदा तर मला दुकानात जाऊन एक्स्ट्रा सोय सॉस आणि पेपर प्लेट्स आणायला लागल्या.

रात्री उशीरा फनफेअरची वेळ संपल्यावर आम्ही सगळं पॅक केलं. मग हिशेब केला. आठ हजाराचा प्रॉफिट झाला होता - आमच्या ओरिजनल अपेक्षेपेक्षाही जास्त.

मह्या आणि मी एकदमच बोललो - "तैवान झिंदाबाद!"

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

तैवान झिंदाबाद .
नै तर काय. चला चला आता HTC फोन घेऊ चला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0