घन तमी शुक्र बघ राज्य करी

https://www.aathavanitli-gani.com/Images/Photo/Lyrics/Bha_Ra_Tambe.jpg
.
'घन तमी शुक्र बघ राज्य करी' आज पुन्हा हे गाणं ऐकलं. भा रा तांबे यांचे, हे गाणं ऐकायला घेतलं की आपोआप ते गाणंच सदा वाजत रहातं. तदुपरांत, अन्य कोणत्याच गाण्यावरती मन जात नाही. हृदयनाथ मंगेशकरांनी चढ उतार असलेली विलक्षण चाल या गाण्याला लावलेली आहे. गाणं ऐकताना, हृदयात, काहीतरी लकलक हलत रहातं. सरीअल वाटत रहातं. कोणत्या मनोवस्थेत हृदयनाथांना ही चाल सुचली असेल! अतोनात, गोड, दैवी सूरात हे गाणे लतादीदींनी गायलेले आहे.
................'घन तमी शुक्र बघ राज्य करी,'...........
गाणं सुरु झालं की चमचमणारा शुक्र तारा डोळ्यासमोर येतो. घनदाट काळोखात चमकणारा, काळोखावरती अधिराज्य गाजवणारा, शुक्र डोळ्यासमोर येतो. अन्य गाण्यांमध्ये असे चित्र चटकन डोळ्यांसमोर येत नाही. मला वाटतं ही चित्रमयता तांबे यांच्या कवितांची खासियत असावी का? कारण 'तीन्ही सांजा सखे मिळाल्या' मध्येदेखील अशीच दुपार पश्चात संध्याकाळ अशी संक्रमणाची, सांजवेळ हमखास डोळ्यासमोर येते. १४-१५ वर्षांची मी बालकनीत उभी असते, केशरी, गूढ संधीप्रकाश आणि समोर तांबड्या ज्वाळांत पेटलेला गुलमोहर हेच दृष्य दरवेळी दिसतं मला. असे म्हणतात, आयुष्याच्या अंतिम समयी, तुमच्या आयुष्यातील घटनांचा चलतपट झरझर डोळ्यांसमोरुन सरकत जातो. मला अन्य कोणती दृष्ये दिसतील, न दिसतील परंतु त्या आडनिड्या वयातली, त्या दिवशीची, ती संधीप्रकाशाचा वेळ नक्की दिसणार, खात्री आहे.
.........'रे खिन्न मना बघ जरा तरी' ............
या बघ जरा तरी आलापात कमालीचं आर्जव आहे. उदास मनाला, समजविण्याची शक्ती आहे.
गाणं जसं पुढेपुढे जात रहातं, काहीतरी आठवत रहातं. काय आठवतं ते चिमटीत पकडता येत नाही. एक अनामिक हुरहूर लागते. पण आभाळ दाटुन आलेली व्याकुळ हुरहूर नसते ती. अंहं! ती असते कोणत्या तरी ओळखीच्या पण आता विस्मृतीत गेलेल्या प्रसंगांची चाहूल. 'gossamer' हाच शब्द बरोबर आहे. स्मृतीच्या कप्प्यात, एक झिरझिरीत फुलपाखराच्या पंखासारखा, चंद्रवर्खी gossamer, पडदा, हलत रहातो आणि हलता हलता त्या पडद्याआडचं दिसतं न दिसतं - दिसतं, न दिसतं. मला वाटतं पूर्वजन्माशी निगडीत स्मृती चाळवल्या जातात. दर्शन घडते न घडते तोच त्या आठवणी झिरझिरीत पडद्याआड लोपतात. हे गाणे ऐकताना, गूढ अनुभूती येते मला. काही अमूर्त स्मृती , मूर्त मनात प्रकट होताहोता रहातात. गाणे वरचेवर ऐकायला हवे. न जाणो कधीतरी सबक्कॉन्शसमध्ये फार खोलवर दडलेली पुरातन शिंपल्याची डबी उघडेल व माझ्या हाती आठवणीचा टपोरा पाणीदार मोती लागेल.
------------------------------------------------------ पूर्ण कविता-----------------------------------------------------

घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी !

ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी

प्रसवे अवस सुवर्णा अरुणा
उषा प्रसवते अनंत किरणा
पहा कशी ही वाहे करुणा
का बागुल तू रचितोस घरी ?

फूल हसे काट्यांत बघ कसे
काळ्या ढगि बघ तेज रसरसे
तीव्र हिमांतुनि वसंतहि हसे
रे, उघड नयन, कळ पळे दुरी

फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?

मना, वृथा का भिशी मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी

- हा लेख फेसबुकवर टाकणार होते परंतु नाही टाकणार. काही वडीलधारी काका, मामा लगेच 'काळजी घ्या' वगैरे उपदेश सुरु करतात. The point gets totally lost on them. असो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

'काळजी घ्या' वगैरे
लिहिणार होतो.
पण -
पुरातन शिंपल्याची डबी उघडून माझ्या हाती आठवणीचा टपोरा पाणीदार मोती लागला आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या कवितेचं "फूल गळे..." हे कडवं भिडतं.
btw बागुल चा अर्थ नक्की काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हृदयनाथ मंगेशकरांनी चढ उतार असलेली विलक्षण चाल या गाण्याला लावलेली आहे. गाणं ऐकताना, हृदयात, काहीतरी लकलक हलत रहातं. सरीअल वाटत रहातं. कोणत्या मनोवस्थेत हृदयनाथांना ही चाल सुचली असेल!

हे गाणे ॲज़ सच कधी ऐकलेले नाही (बोले तो, तांब्यांची अशी कविता आहे, हे ठाऊक होते, परंतु ती आकाशवाणीवर किंवा अन्यत्र वाजवलेली कधी ऐकलेली नाही), परंतु (तांब्यांच्याच) 'नववधू प्रिया मी बावरते'ची चाल बहुधा याला फिट्ट बसावी. (म्हणजे, बहुधा त्याच जातीतले असावेसे वाटते (चूभूद्याघ्या.), सबब ती चाल फिट्ट बसण्यास प्रत्यवाय नसावा.)

बाकी, ती 'नववधू'सुद्धा त्याच पठडीतली. 'काळजी घ्या' म्हणायला लावणारी. बोले तो, ही जी कोणी 'नववधू' आहे, तिचा 'प्रिय', 'प्राणसखा' वगैरे ज्याला उद्देशून ती गात आहे, तो साक्षात मृत्यू आहे, अशी कविकल्पना आहे असे काहीसे ऐकलेले आहे. (खरेखोटे ते एक दिवंगत तांबेच जाणोत! पण प्लॉज़िबल वाटते. 'कळे मला तू प्राणसखा जरि ... मन जवळ यावया गांगरते'वाले कडवे पाहा.)

बाकी, 'मधु मागशि माझ्या सख्या, परी'मध्ये तर सरळसरळ, उघडउघड, अगदी खुल्लमखुल्ला 'लागले नेत्र रे पैलतिरी'चा ज़िक्र केलेला आहे. अर्थात, एका अर्थाने ते बरोबरच आहे म्हणा. किंवदंतेनुसार, तांब्यांना कोणीतरी कवितेची मागणी केली असता, त्या मागणीकर्त्याला, 'बाबा रे! आता मी म्हातारा झालो. आता माझ्याच्याने कविताबिविता काही होत नाही. तेव्हा कृपा करून मला कविता मागू नकोस.' हे कळविण्याकरिता तांब्यांनी त्याला ही कविता करून पाठविली म्हणे. आता, आपले आर्ग्युमेंट वर्मी लागावे, म्हणून त्यात थोडा पेथोस वगैरे घुसडण्याकरिता, ते इंग्रजीत म्हणतात ना, 'इतका म्हातारा, की एक पाय थडग्यात आहे', त्या धर्तीवर 'लागले नेत्र रे पैलतिरी' ठेवून दिले, झाले. (शिवाय वर, फॉर गुड मेझर, 'ढळला रे ढळला दिन सखया, संध्याछाया भिवविती हृदया' हेही त्या मिश्रणात बचकभर फेकून दिले. अल्काझाम! आहे काय, नि नाही काय?) चालायचेच.

परंतु म्हणजे, या मनुष्याला मृत्यूचे आत्यंतिक ऑब्सेशन असावे, अशी शंका येते. अर्थात, तांबे हे कऱ्हाडे ब्राह्मण असल्याकारणाने, यात आश्चर्यकारक असे फारसे काही नसावे, परंतु मग, 'तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा' मधल्या 'मोत्यांच्या माळा' म्हणजेसुद्धा काही फासबीस असावेत की काय, अशी उगाच शंका येऊ लागते.

जाऊद्या. टेन्शन नहीं लेने का. आपण आपले 'कळा ज्या लागल्या जीवा' हे 'मुहब्बत ऐसी धड़कन है'च्या चालीवर गाऊन त्याची मजा लुटू या, कसे? (अर्थात, 'कळा ज्या लागल्या जीवा'मध्येसुद्धा 'नदी लंघून जे गेले' त्यांची हाक कानी आल्याचा ज़िक्र - पुन्हा मृत्यूचे ऑब्सेशन! - आहेच म्हणा, परंतु त्याकडे दुर्लक्ष करू या. च्यामारी, आयुष्यात रडून रडून म्हणून रडायचे तरी किती? त्याला काही सुमार?)

असो.

-----------

तळटीपा:

जाति बोले तो मात्रावृत्त ना? (चूभूद्याघ्या.)

म्हणजे बहुधा भा.रा. तांबे स्वतः. (चूभूद्याघ्या.)

पोर नुकतेच बारावी झाले. बारावीला इंग्रजी विषयाला होत्या त्यांना त्या ईथोस, लोगोस नि पेथोस वगैरे भानगडी. नि गृहपाठाला हे मोठे उतारे, नि त्या उताऱ्यांत कोठकोठल्या वाक्यांत या ईथोस/लोगोस/पेथोसपैकी कायकाय वापरले आहे, याची चिरफाड करायला असायची. (छळ नुसता!३अ) म्हणून मला या भानगडी ऐकून ठाऊक. अर्थात, अजूनही त्या तीनमध्ये घोटाळा होतो, पण हू केअर्स? चालायचेच.

३अ जगातल्या तमाम भाषाविषयाच्या शालेय शिक्षकांना मरणोत्तर नरकवास नि त्या नरकवासात जगाच्या अंतापर्यंत उकळत्या तेलात शीर्षासन करताकरता उजव्या हाताने प्राणायाम आणि एकसमयावच्छेदेकरून डावा हात (स्वतःच्या) पोटावरून गोलगोल फिरवीत राहण्याची शिक्षा आहे.३अ१ एका (खिशास झेपेल त्याप्रमाणे कधीमधी गोमांस खाणाऱ्या का होईना, परंतु) देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणाचा शाप तथा एका बापाचा तळतळाट लागू आहे.

३अ१ सभ्यतासंकोचास्तव इतकेच.

त्या पिढीतल्या कऱ्हाडे ब्राह्मणांत ही रडी टेंडन्सी मोठ्या प्रमाणावर निरीक्षिलेली आहे.४अ इतकी, की झाशीची राणी४ब हे बहुधा एखादे काल्पनिक पात्र असावे, अशी कोणासही शंका यावी.४क

४अ आपल्या पितृसत्ताक पद्धतीत वडिलोपार्जित जातीने जरी कऱ्हाडे ब्राह्मण नसलो, तरी गणगोतात - नि किमान एका बाजूच्या पूर्वजांत - कऱ्हाड्यांचा प्रादुर्भाव असल्याकारणाने, काही निरीक्षणे ही चक्षुर्वै सत्यं न्यायाने मांडू शकतो.

४ब ऐकीव माहितीनुसार, प्रत्येक कऱ्हाडा ब्राह्मण हा या पात्राशी आपले काही ना काहीतरी ओढूनताणून नाते सांगतो. किंबहुना, ही विभूती माझ्या आईच्या आजीच्या खापरपणजीची सख्खी बहीण (की अशीच कोणीतरी; नक्की नाते विसरलो.) असल्याचे मलाही सांगण्यात आलेले आहे. खरे तर झाशीची राणी ही काल्पनिक असावी अशी शंका येण्याकरिता एवढे एकच कारण पुरेसे ठरावे. कारण, तिचे तथाकथित सद्गुण (शौर्य, पराक्रम, स्वजनांबद्दलची आस्था, वगैरे) माझ्यात तर सोडाच, परंतु माझ्या निरीक्षणातल्या एकाही कऱ्हाड्यात उतरलेले निदान मला तरी आढळलेले नाहीत. किंबहुना, झाशीची राणी ही जर खरी असती, तर (१) इंग्रजांविरुद्ध लढली नसती, (२) झाशीची मागणी करावयास आलेल्या ह्यू रोज़ला 'मेरी झाशी नहीं दूंगी!' म्हणून ठणकावले नसते, (३) उलट, 'अलेलेलेलेले! आमचे जॉइंट्ट्ट फ्यामिलीतले इंग्रज! चो च्वीट!' असे म्हणून ह्यू रोज़चा गालगुच्चा घेऊन, डलहौसीचा मुका घ्यायला त्याच्याबरोबर लगबगीने निघून गेली असती, नि जाताजाता (४) तेथे टपकलेल्या तात्या टोपे, नानासाहेब वगैरे 'आपल्या लोकां'ना 'हॅट साले! ह्या इंग्रजांपुढे तुमची काय लायकी आहे काय? आलेत मोठे क्रांती करणारे! हुडूत्!' म्हणून त्यांना हिणवून, वेडावून दाखवले असते.४ब१ किंवा मग, ह्यू रोज़ टपकण्याअगोदरच्या काळात, (तात्या टोपे आणि नानासाहेब हे कऱ्हाडे नव्हते म्हणून, नाहीतर) नानासाहेबाच्या अनुपस्थितीत तात्याबरोबर नानासाहेबाच्या नि तात्याच्या अनुपस्थितीत नानासाहेबाबरोबर तात्याच्या कुचाळक्या करत फिदीफिदी हसत बसली असती.४ब२ (किंबहुना, तात्या नि नानासाहेब हेसुद्धा जर कऱ्हाडे असते, तर तेसुद्धा झाशीच्या राणीच्या अनुपस्थितीत तिच्या कुचाळक्या करून आपसांत फिदीफिदी हसले असते. परंतु ते सोडून देऊ.)

४ब१ स्वतःच्या मुलाबाळांना कमी लेखणे आणि 'जॉइंट्ट्ट फ्यामिली'च्या नावाखाली कोठल्यातरी भडभुंजाचे - खास करून स्वतःच्या इमीजिएट फ्यामिलीसमोर - वारेमाप कौतुक करून त्याला डोक्यावर चढवून ठेवणे, ही टेंडन्सीसुद्धा या जमातीत पुष्कळ निरीक्षिली आहे.

४ब२ 'जॉइंट्ट्ट फ्यामिली'च्या नावाखाली घोळक्याने जमून, प्रसंगी उपस्थित नसलेल्या ('जॉइंट्ट्ट फ्यामिली'पैकीच) कोणाच्यातरी कुचाळक्या करणे, हादेखील एक स्थायीभाव पाहिलेला आहे.

४क किंबहुना, कम टू थिंक ऑफ इट, झाशीची राणी हीसुद्धा (सपोज़ेडली) 'तांबे'च! मग ही तांबीण जर इतकी (सपोज़ेडली) शूर, तर मग हाच तांबे इतका कसा रड्या, असा प्रश्न पडतो. झाशीची राणी म्हणाली असती काय 'लागले नेत्र रे पैलतिरी'? (खरी असती, तर अवश्य म्हणाली असती, असे आमचे प्रतिपादन आहे; परंतु ते एक असो.) आणि, 'रे हिंदबांधवा, थांब या स्थळी, अश्रु दोन ढाळी, ही पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशिवाली' ही कविता लिहिणारे हेच का ते तांबे? (अर्थात, त्या कवितेतसुद्धा, अंतिमतः, मेलेल्या झाशीच्या राणीच्या नावाने अश्रू ढाळणे हाच रडा कार्यक्रम दिसतो. जाऊद्या झाले!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ2

नववधु हेच वृत्त.

बाकी, तुमच्या हार्श, असंवेदनशिल प्रतिसादाचे काही वाटून घ्यायचे केव्हाच बंद केले आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

इनोदनिर्मितीचा अट्टाहासी खटाटोप. या प्रतिसादाला रोचक देणार्‍यास साष्टांग xxxx

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'रोचक' हा शब्द दर्शनीमूल्यावर घेतल्यामुळे झालेला आपला गोंधळ समजू शकतो. अर्थात, 'रोचक' या शब्दाच्या '(Hmmm...) Interesting!' या (बहुधा) अमेरिकन अवताराशी आपण अनभिज्ञ असावात, अशी शक्यता निदर्शनास येते.

'रोचक' आणि 'रोचक!' यांमध्ये अर्थच्छटेचा किंचित नव्हे, चांगला १८० अंशांचा फरक आहे. नुसते 'रोचक' म्हणजे रोचक, तर 'रोचक!' म्हटल्यावर 'काय बरळून राह्यलाय बे!' असा संदेश सुज्ञांस अभिप्रेत व्हावा.

गंमत म्हणजे, 'रोचक' ही श्रेणी 'रोचक' तथा 'रोचक!' अशा दोन्हीं अर्थांनी वापरता येते!

(थोडक्यात, 'पकाऊ' ही श्रेणी काय, कोणीही देईल. परंतु त्याजागी 'रोचक' देण्यास एक विशेष प्रकारचे टंगिन्चीकित्व लागते.)

याव्यतिरिक्त, 'रोचक' ही श्रेणी 'मार्मिक' या श्रेणीशी काँट्रास्ट केली असता 'रोचक'चा आणखी एक अर्थपैलू उलगडण्यास मदत व्हावी. 'मार्मिक' म्हटले, की 'कसे बोललात!' असा अर्थ, आणि पर्यायाने श्रेणीदात्याची प्रतिसादाशी उघडउघड तथा शतप्रतिशत सहमती अभिप्रेत होते. याउलट, 'रोचक'मध्ये, 'या प्रतिसादातल्या मजकुराशी किंवा त्यातील आशयाच्या गाभ्याशी मी सहमत आहेच, असे नाही - किंबहुना, कदाचित किंवा बहुधा नसेनही - परंतु, असा(ही) विचार (किंवा अविचार, टेक युअर पिक!) कोणी मांडावा, ही बाब रोचक आहे', ही(सुद्धा एक) अर्थच्छटा आहे.

असो.

----------

अधिक चर्चा इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तांब्यांच्या कऱ्हाडेपणावर का रुसले न'बा अचानक?
बाकी प्रत्येक मनुष्य जातींमध्ये एक ठराविक गुण बहुतांश उतरतोच त्यास आम्हीही अपवाद नाहीच. दिसण्यात तिरळेपणा आणि वागण्यात उरकणेपणा आपसुकच येतो.

पण कवितेच्या रसग्रहणातून फारच डायवर्शन झाले हो!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वागण्यात उरकणेपणा आपसुकच येतो.

उरकपणा नाही शरदजी. उरक म्हणायचय तुम्हाला. 'फार उरक आहे गं बाई तिला' मधला उरक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कामाचा उरक म्हणजे भाराभर कामं धडाडीने करणे.

उरकणे म्हणजे कामांत भावनिक गुंता न घालता हातावेगळे करणे पटापट. आम्ही त्यातले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर शरदजी. मला वाटलं की तुम्हाला 'भराभर काम करण्याची क्षमता=उरक' म्हणायचे आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी धो धो हसले हा प्रतिसाद वाचून! शिवाय माझ्या दोन्ही बाजूंकडे कोणीही कऱ्हाडे नसल्यामुळे लोकांवर हसायला आपलं काय जातंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अर्थगर्भ कवितेला अप्रतिम चालीत बांधलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ंचन्द्रहस्

खरे मोती म्हणजे वरची आवरणं निघाली तरी आत मोतीच असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

सर्व वाचकांचे व प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उथळ प्रतिसादांनाही आभार दिल्याबद्दल धन्यवाद.
खरं म्हणजे कविता कळत नाही पण नुसतेच वाचली, छान! कसे लिहिणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शरदजी, ही कवितादेखील मृत्युबद्दलच आहे.
>>>>मना, वृथा का भिशी मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी
>>>> फार गोड कविकल्पना आहे ही. की साक्षात ईश्वर जो की वात्सल्यरुप आई आहे, तो जीवन-मरणाच्या उंबरठ्यापलिकडे आहे. तेही कसा तर बाहू पसरुन, आपल्याला कुशीत घेण्याकरता.
.
या गंभीर व नितांत सुंदर कवितेस चाल लावण्यास हृदयनाथ लाभले हे आपले नशीब. नाहीतर कोणीही थिल्लर किंवा सपक चाल लावून विचका करुन ठेवला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम रसग्रहण!!
गाणे खुप आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

या कवितेचे विडंबन वाचल्यावर नबा आम्हाला कसे फटकारे मारतात, ते वाचण्याची उत्सुकता आहे.

http://www.misalpav.com/node/26704 हे ते विडंबन !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रयत्न/कल्पना चांगली आहे, परंतु वृत्तात अनेक ठिकाणी मार खाल्ल्यामुळे रसभंग होतो. (वृत्त ठिकठिकाणी पोटावरून घसरणाऱ्या प्याण्टीसारखे घसरते.) तेवढे वृत्त सांभाळण्याबाबत अधिक कष्ट घेतले, तर बरे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा मान्य आहे. कुणी चांगला कवी/विडंबनकार या अर्धवट कामाला पूर्णरुप देईल का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गाणे ऐकताना, गूढ अनुभूती येते मला. काही अमूर्त स्मृती , मूर्त मनात प्रकट होताहोता रहातात. गाणे वरचेवर ऐकायला हवे. न जाणो कधीतरी सबक्कॉन्शसमध्ये फार खोलवर दडलेली पुरातन शिंपल्याची डबी उघडेल व माझ्या हाती आठवणीचा टपोरा पाणीदार मोती लागेल.

वा! काय मस्त गूढार्थ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/