करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग २)

करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे (भाग २)

डॉ. राजीव ढेरे

सीरम इन्स्टिट्यूट जगातली व्हॅक्सिन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. डॉक्टर राजीव ढेरे सीरम इन्स्टिट्यूटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत. 'ऐसी अक्षरे'ला त्यांनी दिलेल्या मुलाखतीच्या पहिल्या भागात 'कोरोनाची लस सर्वसामान्य लोकांच्याकरता बाजारात कधी उपलब्ध होणार?' या आणि इतर तांत्रिक प्रश्नांची उत्तरं दिली होती. या मुलाखतीचा हा दुसरा आणि अखेरचा भाग.

प्रश्न : कोरोना हा केवळ अधिक वाईट, जास्त धोकादायक फ्लू आहे का? कोरोना आणि फ्लू यातलं साम्य आणि फरक याचं वैज्ञानिक ज्ञान गेले काही महिने सतत कमी-जास्त होत असताना मला आपल्यासारख्या प्रथितयश व्हायरॉलॉजिस्टकडून व्हायरॉलॉजिकल वास्तव जाणून घ्यायला आवडेल.

डॉक्टर ढेरे : सुरुवातीला मलाही तसंच वाटलं. आम्ही इन्फ्लुएंझा व्हायरसवर बऱ्याच काळापासून काम करत आहोत. सामान्यतः अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टच्या व्हायरस इन्फेक्शननंतर शरीराची प्रतिकारसंस्था Th1 आणि त्यानंतर Th2 हे प्रतिसाद कार्यान्वित करते (अधिक माहिती इथे). इन्फ्लुएंझा आणि काही प्रमाणात ॲडिनोव्हायरस यांच्या बाबतीत हे सिद्ध झालं आहे. आधी Th1, त्यानंतर Interferon secretion, त्यानंतर Th2 या क्रमाने ही साखळी सूक्ष्म जंतूंचा मुकाबला करते.

पण कोव्हिडव्हायरस याला अपवाद आहे. तो आपल्या Open reading frame आणि non-structural protein या विकसित केलेल्या यंत्रणांद्वारे Th1चा प्रतिसाद दाबून ठेवून त्याला आणि अनुषंगाने इंटरफेरॉनला कार्यान्वित होऊ देत नाही. त्यामुळे मानवी शरीराची प्राथमिक संरक्षक यंत्रणा कोसळते आणि जेव्हा (तिच्या अभावी) व्हायरस लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये, म्हणजे फुफ्फुसांत पोहोचतो, तेव्हा न्यूमोसाइट्स – अर्थात फुफ्फुसांमधल्या पेशी आणि एकूण प्रतिकार यंत्रणा यांना हे थेट Th2 कार्यान्वित करण्याचं वास्तव अत्यंत वेगळ्या, असामान्य आणि भयानक पध्दतीने दिसतं : सायटोकाईन रिलीज सिंड्रोम – मी त्याला सायटोकाइन स्टॉर्म या प्रचलित नावाने संबोधणार नाही. हा फॅगॉसायटोसीस आणि आयएल-सिक्सच्या असामान्य, अतिरेकी रिस्पॉन्सच्या स्वरूपात अवतरतो. पूर्वीच्या सार्स आणि मर्स यांपैकी मर्सलाही असाच कोरोनासारखा इम्यून रिस्पॉन्स येतो, पण मर्स व्हायरस कोरोनापेक्षा खूपच जास्त, म्हणजे जवळजवळ पाचपट अधिक धोकादायक आहे. अर्थात, कोरोनाची संसर्ग पसरवण्याची क्षमता मर्सपेक्षा खूपच जास्त आहे.
(कोरोनाव्हायरस आपल्या प्रतिकारसंस्थेवर कसा हल्ला करतो याविषयी सोप्या शब्दांत माहिती इथे आणि इथे पाहता येईल.)

प्रश्न : आपल्या सखोल विश्लेषणाबद्दल आभार. मी आपणास इंट्रानेजल (नाकात थेंब टाकून) देण्यात येणाऱ्या लशीबद्दल आणि त्याचं वैयक्तिक आणि राष्ट्रीय स्तरावर राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमातलं महत्त्व याबद्दल इथे विचारणार होतो, पण त्याचं उत्तर आपण मघाशी दिलंत.

डॉक्टर ढेरे : तुम्ही योग्य बोलताय. मी माझ्या आयुष्यभर नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीसंबंधात आग्रही राहिलोय. जोपर्यंत लोकल – नाकातली इम्युनिटी – IgA आणि इंटरफेरॉन आणि तद्नुषंगाने Th2 रिस्पॉन्स येणार नाही तोपर्यंत जोरकस आणि दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही. इंजेक्शनद्वारे देण्यात येणारी लस, विरुद्ध जिवंत पण व्हायरसची हानिकारकता क्षीण केलेली (Live attenuated) नाकावाटेची लस यातल्या नाकावाटेच्या लशीमुळे मिळणारी लोकल इम्युनिटी ही जास्त सरस असते हे इन्फ्लुएंझा लशीच्यावेळी सिद्ध झालं आहे.

Vaccines

प्रश्न : माझा पुढचा प्रश्न व्हायरॉलॉजीच्या परिप्रेक्ष्याबाहेरचा आहे. लाईव्ह व्हॅक्सिन्स ही किल्ड व्हॅक्सिन्सपेक्षा जास्त परिणामकारक असताना उत्पादक किल्ड व्हॅक्सिन्सवर भर देताना का दिसतात?

डॉक्टर ढेरे : लाईव्ह व्हॅक्सिन्स गरोदर स्त्रिया, तान्ही बाळं आणि अनियंत्रित मधुमेही यांना देऊ नये असा वैज्ञानिक दंडक आहे. रुबेलाच्या वेळी गरोदर स्त्रियांना अशी लस दिल्याने स्टिलबर्थ (जन्माआधीच गर्भाचा मृत्यू) वगैरे दुष्परिणाम आढळले. वस्तुतः H1N1च्या वेळी गरोदर स्त्रियांना चुकून लाईव्ह व्हॅक्सिन दिलं तरी असं काही आढळलं नव्हतं, तरी पण अतिरिक्त दक्षता म्हणून ती दिली जात नाहीत. ट्रान्सप्लासन्टल स्टडीज, एम्ब्रियनल (गर्भावरील) स्टडीज झालेले नाहीत. तसंच, पंचाहत्तर वयापुढचे, स्टिरॉइड्स घेणारे, दमेकरी, इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्जवर असणारे हा गट लाईव्ह व्हॅक्सिन्ससाठी बाद ठरतो. शिवाय, इनॅक्टिव्हेटेड – किल्ड व्हॅक्सिन्सची यशस्वी होण्याची शक्यता चांगलीच असते.

प्रश्न : माझा हा प्रश्न थोडा विवादास्पद आहे. कागदावर असलेल्या लशीसाठी एवढी मोठी गुंतवणूक करणं हा जुगार कितपत योग्य?

डॉक्टर ढेरे : तुमच्या प्रश्नामागच्या भूमिकेशी सहमत. फक्त ‘जुगार’ या शब्दाऐवजी मी ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’ असं म्हणेन.

आम्ही ऑक्सफर्डचा ॲडिनोचा डेटा पाहिला होता.आणि डब्लू. एच. ओ.कडूनही मिळालेल्या माहितीनुसार रीॲक्टोजेनेसिटी जास्त असली तरी आम्ही परिणामकारकता इबोलाच्या संदर्भात जोखली होती. उत्पादनक्षमता आणि स्केलेबिलिटी, उपयुक्तता क्षमता या निकषांवर ही लस तावूनसुलाखून निघेल याची खात्री आणि सीरम इन्स्टिट्यूटची आर्थिक ताकद या जीवावर हा धोका आम्ही पत्करला. पन्नास-शंभर कोटी रुपये वाया गेल्याने (आर्थिकदृष्ट्या ) सीरम इन्स्टिट्यूटवर गंभीर संकट वगैरे आलं नसतं. (सीरम इन्स्टिट्यूट आर्थिकदृष्ट्या दणकट संस्था आहे, आणि काळाची गरज लक्षात घेता तेवढी कॅल्क्युलेटेड आर्थिक रिस्क घेणं आमच्या मॅनेजमेंटला योग्य वाटलं. आताच्या परिस्थितीत शास्त्रीयदृष्ट्या तावूनसुलाखून लस लवकर येणं जरुरीचं आहे.) त्यामुळेच ह्यूमन ट्रायल सुरू व्हायच्या आधी, मंकी ट्रायलच्या वेळीच आमचा करार झाला.

अर्थात, फेज-वन ट्रायलच्या आधी पोटात गोळा होताच. कारण न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज आल्याच नसत्या तर कठीण होतं.

प्रश्न : लशीकरण हा इन्फेक्शन नियंत्रणात आणण्याच्या इतर मार्गांना पर्याय असू शकतो? माध्यमांमधला प्रचार हा लशीकरणावर इतका जोर देतोय आणि असं वातावरण निर्माण केलं जातंय की लस बाजारात आली की इतर कोणत्याही प्रतिबंधक खबरदारीची गरज राहणार नाही. ज्या कारणांनी इन्फ्लुएंझा व्हॅक्सिन अयशस्वी झालं, त्याच कारणांनी (कोरोनाच्या एपिडेमिऑलॉजीमुळे) व्हॅक्सिन जर अयशस्वी झालं, तर पुढे काय?

डॉक्टर ढेरे : इन्फेक्शन नियंत्रणाचे इतर मार्ग हे प्राधान्यक्रमाचे उपाय आहेत, यात कोणतीच शंका नाही. कारण आपल्याला अजून माहीत नाहीये की व्हॅक्सिन कितपत परिणामकारक ठरेल. तो नंबर दोनचा उपाय आहे.

व्हॅक्सिन काही विशिष्ट दिवस, महिने, सर्व वयोगटासाठी, सर्व प्रकारच्या वातावरणात आणि संपूर्ण जगभर परिणामकारक राहील, न्यूट्रलायझिंग कपॅसिटी पुरेशी राहील हे जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे ज्ञात होत नाही, तोपर्यंत इतर मार्ग चोखाळत राहावेच लागतील. त्याला पर्याय नाही.

मला इथे थोडं खोलात जावं लागेल. गेल्या पंचवीस वर्षांचा अनुभव आपल्याला हे सांगतो की मानवजात ही शुद्ध आणि अचूक राहू इच्छिते. व्हॅक्सिन हे अत्यंत नेमक्या अँटीबॉडीज तयार करायला शरीराला चालना देतं. पण व्हायरस आपलं रूप बदलतो आणि सगळं मुसळ केरात जातं. आपण ज्या प्राण्यांपासून उत्क्रांत झालो, त्यांच्यामध्ये इन्फेक्शनसाठीचा शरीराचा मुख्य प्रतिसाद हा फर्स्ट लाईन – किंवा Th1 आणि इंटरफेरॉन – हा असतो. कोणत्याही रोगजंतूंच्या हल्ल्याचा मुकाबला हा फर्स्ट लाईन – बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणूया त्याला – सक्षम असेल तर समर्थपणे करता येतो.

व्हायरस आपलं रूप बदलून बुरखा घेऊन यायची शक्यता असतेच. पण जर तुमच्याकडे असं काही असेल (उदा. व्हॅक्सिन) जे जोरकस साईट-स्पेसिफिक Th1 रिस्पॉन्स निर्माण करेल, तर कोरोनाच काय, कोणत्याही व्हायरसचा मुकाबला आपण यशस्वीपणे करू शकतो; त्यासंबंधीची प्रतिकारशक्ती अंगी बाणवू शकतो.

मला इथे एका आफ्रिकन स्टडीचा उल्लेख करावासा वाटतो. सुमारे दहा हजार लहान मुलांना गोवराची (मीजल्स) लस टोचण्यात आली होती. त्यांचा (आणि इतर मुलांचा) पाच वर्षं अभ्यास केला गेला. या अभ्यासात असं आढळलं की ज्या लहान मुलांना गोवराची लस टोचण्यात आली होती त्यांच्या शरीरात श्वसनसंस्थेच्या इतर इन्फेक्शन्सविरुद्धसुध्दा लक्षणीय प्रतिकारशक्ती निर्माण झाली होती. अगदी भारतातही ज्या लहान मुलांना गोवराची लस (एम आर व्हॅक्सिन) दिली गेली, त्यांच्यातला इन्फेक्शनचा दर हा मोठ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. माझं हे वैज्ञानिक ज्ञानाधारित भाकीत आहे की अलीकडे चालवल्या गेलेल्या एम आर व्हॅक्सिन मोहिमेचा परिपाक म्हणून ही मुलं कोरोनाचादेखील अत्यंत समर्थपणे सामना करतील. त्यांच्यात Th1-इंटरफेरॉन हा फूट सोल्जर रिस्पॉन्स आधीच कार्यान्वित झाला आहे.

भविष्यात कोणतीही महासाथ आली तरी व्हॅक्सिनद्वारे सज्ज केलेला Th1 हे त्यावरचं उत्तर असेल. इंटरफेरॉन हे बऱ्याच व्हायरसशी मुकाबला करणारं, कोणा एकापुरतं मर्यादित नसलेलं प्रभावी अस्त्र आहे.

आम्हीही एक कंट्रोल स्टडी करतो आहोत. असा सिद्धांत मांडला जातोय की एम एम आर, बी सी जी हेही Th1 कार्यरत करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

प्रश्न : कोरोना व्हॅक्सिन हे व्हायरॉलॉजी आणि एपिडेमिऑलॉजी या दृष्टीने ‘गेम चेंजर’ सिद्ध होईल का? त्यामुळे एपिडेमिऑलॉजीवर प्रभाव पडेल आणि तदनुषंगाने सध्याची उपचार मानकं बदलतील का?

डॉक्टर ढेरे : इतक्यात सांगता येणार नाही. गेम चेंजर या संज्ञेला पात्र होण्यासाठी जगभरच्या नव्वद टक्के लोकसंख्येमध्ये, आणि नऊ महिने ते ऐंशी वर्षं एवढ्या मोठ्या वयोगटात त्या व्हॅक्सिनमुळे इम्युनिटी येणं आवश्यक आहे. महासाथीच्या तीव्रतेमुळे आणि सत्वर उपाययोजना आत्यंतिक गरजेची असल्यामुळे विविध टेक्नॉलॉजी वापरून व्हॅक्सिन शोधायचं काम चालू आहे, हे गेम चेंजर आहेच. शिवाय, एका वेगळ्या अर्थानेसुध्दा कोरोना महासाथ गेम चेंजर ठरलीये – आपल्या यासारख्या संकटासंबंधीच्या संकल्पनेतच ह्या महासाथीमुळे कल्पनातीत बदल होऊ घातलाय!

Vaccines

प्रश्न : आपल्याला संयुक्त / एकत्रित व्हॅक्सिन्स उपलब्ध होण्याची शक्यता कितपत आहे – जसं की, इन्फ्लुएंझा, कोव्हिड-१९ आणि आरएसव्ही?

डॉक्टर ढेरे : आरएसव्हीचा इतिहास गुंतागुंतीचा आहे. इनॅक्टिव्हेटेड आरएसव्ही व्हॅक्सिनमुळे बरेच मृत्यू झाले. शास्त्रज्ञांना पुन्हा संशोधनाकडे जावं लागलं.

जगभरचे शास्त्रज्ञ इन्फ्लुएंझा व्हॅक्सिन्स एकत्र करण्याचा प्रयत्न करताहेत. हे संशोधन पुढची किमान वीसेक वर्षं तरी चालेल असं दिसतंय. कोरोनामुळे मात्र हे युनिव्हर्सल इन्फ्लुएंझा व्हॅक्सिन पुढच्या चार-पाच वर्षांत येण्याची शक्यता वाढली आहे. कोरोनासाठी मीजल्स वाहक म्हणून वापरून कोरोना, रुबेला, मीजल्स आणि मम्प्स असं एकत्रित व्हॅक्सिन तयार करण्याचे प्रयत्नही चालू आहेत.

प्रश्न : गेल्या दशकातल्या इन्फ्लुएंझा व्हॅक्सिनबाबतच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर कोरोना व्हॅक्सिन देण्यासंबंधी तांत्रिक प्रगती किती झालीय? इन्फ्लएन्झाचा शिफ्ट, ड्रिफ्ट आणि सतत बदलती अँटिजेनिसिटी यांचीच पुनरावृत्ती तर होणार नाही कोरोनाबाबतही?

डॉक्टर ढेरे : तसं वाटत नाही. आजच्या घडीला कोरोनाला मैदान मोकळं आहे, त्याला अडवणारं कोणीही नाही. Environmental Pressure – जे म्युटेशनसाठी आवश्यक असतं – ते सध्या नाही. मात्र, सततच्या आणि महाकाय लशीकरण मोहिमांमुळे आजपासून चार-पाच वर्षांनी तो दबाव निर्माण होऊ शकतो, आणि उत्क्रांतीच्या सिध्दांतामधल्या जनुकांच्या टिकून राहण्याच्या नियमानुसार ड्रिफ्ट आणि सर्फेस प्रोटीन चेंज हा बदल होऊ शकेल. शिफ्ट कोरोना फॅमिलीत दिसून येत नाही, तो ‘इन्फ्लुएंझा ए’मध्ये असतो.

प्रश्न : सुरक्षितता, इम्युनिटी, संरक्षकता या दृष्टींनी कितपत प्रगती आहे? व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांना मास्क वापरणं आणि शारीरिक अंतर पाळणं थांबवता येईल का? ते कितपत सुरक्षित असेल? किमान लॉकडाऊन तरी संपतील का?

डॉक्टर ढेरे : नाही, ते होणार नाही. व्हॅक्सिन किती उपयोगी ठरेल हे आत्ताच्या क्षणी आपण खात्रीने सांगू शकत नाही. वादासाठी जरी हे गृहीत धरलं की ते आपल्याला माहीत झालं, तरीही व्हॅक्सिनेटेड व्यक्ती व्हायरल कणांची वाहक असेल आणि इन्फेक्शन पसरविण्याची क्षमता राखून असेल. अँटीबॉडीजमुळे त्या व्यक्तीला रोग होणार नाही, लक्षणं असणार नाहीत, पण श्वसनसंस्थेच्या पेशींमध्ये व्हायरस ठाण मांडून असू शकतो, तिथे वाढू शकतो, ड्रॉपलेटद्वारा इन्फेक्शन पसरवू शकतो. शारीरिक अंतर पाळणं, मास्क हा आता आपल्या जीवनशैलीचा अपरिहार्य भाग झाल्यात जमा आहे (न्यू नॉर्मल).

प्रश्न : या आधीच्या प्रश्नाला जोडून एक उपप्रश्न विचारायचाय. काही लोकांनी एक थिअरी मांडलीय : व्हायरसचा जो स्ट्रेन जास्त virulent (म्हणजे रोग निर्माण करण्याची क्षमता असलेला; विनाशकारी) आहे त्याने इन्फेक्ट झालेल्या लोकांच्या मृत्यूमुळे तो स्ट्रेन कमी होतोय, आणि त्यामुळे जो कमी virulent स्ट्रेन आहे तो जास्त फोफावतोय. अर्थातच, या थिअरीला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. तर या थिअरीबद्दल तुमचं काय मत आहे?

डॉक्टर ढेरे : दोन स्ट्रेन आहेत हे खरं आहे, त्यातला एक थोडा जास्त virulent आहे हेही खरं. पण कोणता स्ट्रेन मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन कुठे करतोय हे सांगणं अशक्य आहे. शिवाय, त्याचा इतिहास जेमतेम सहा महिन्यांचा असताना केवळ कयास बांधण्यापलीकडे कोणतीही वैज्ञानिक भाकितं करता येणार नाहीत.

प्रश्न : सीरम इन्स्टिटयूटचं व्हॅक्सिन हे व्यक्ती आणि समाज या संदर्भात ‘डिसीज मॉडीफाईंग’ आहे का? रोगाची सामूहिकता, इम्युनिटी आणि नैसर्गिक प्रवास हा आधी घेतलेल्या लशीमुळे प्रभावित होईल का? जर एखाद्याने व्हॅक्सिन घेतल्यानंतर दोन महिन्यांनी त्याला / तिला कोव्हिड झाला तर त्याची तीव्रता कमी असेल का? गंभीर आजारपण आणि मृत्युदर हा कमी राहील का?

डॉक्टर ढेरे : तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर ‘होय’ असं आहे. आजाराची कमी तीव्रता, जरी रक्तातल्या न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीजच्या पातळीत फरक असला तरी ‘जवळजवळ नाही’च्या पातळीचा मृत्युदर – हा लशीचा परिणाम असेल.

पाचशे माणसं आणि काही माकडं यांच्यावरच्या ट्रायलमध्ये ट्रॅकिओस्टॉमी करून व्हायरसचा अत्यंत मोठा डोस दिला गेला. त्या ‘ट्रॅकिओस्टॉमी चॅलेंज स्टडी’चे निष्कर्ष अत्यंत सकारात्मक आणि आश्वासक आहेत. एकही जण मृत पावला नाही. सर्व जण पूर्ण बरे झाले. काही जणांत तापासारखी जुजबी लक्षणं आढळली.

प्रश्न : व्हॅक्सिन हे इन्फेक्शन झाल्यावर उपचार म्हणून वापरता येईल का?

डॉक्टर ढेरे : नाही. अजिबात नाही.

प्रश्न : बीसीजी व्हॅक्सिनसंदर्भात बराच डेटा गोळा होत आहे. काही अभ्यासकांचा असा युक्तिवाद आहे की भारतात बीसीजी मोठ्या प्रमाणात दिलं जात असल्याने कोरोनाचा प्रसार आणि जीवितहानी कमी आहे. तसंच, बीसीजीमध्ये काही बदल करून ते कोरोनाविरुद्ध वापरता येईल. तर बीसीजी आणि कोरोना हे कोरिलेशन कसं पाहता येईल?

डॉक्टर ढेरे : लक्षात घ्या, बीसीजी व्हॅक्सिनमुळे निर्माण होणारी जी इम्युनिटी आहे ती Th1 रिस्पॉन्सच्या प्रकारची असते. बीसीजी व्हॅक्सिनमुळे इन्फ्लमेशन निर्माण होईल आणि त्यातून (त्याला रिस्पॉन्स म्हणून) Th1ला चालना मिळेल. त्यामुळे ही थिअरी आली. या व्यतिरिक्तची भविष्यकालीन मॉडिफिकेशन्स अजून तरी विज्ञानाला अज्ञात आहेत. अजूनही काही थिअरीज इतरही काही लसींबाबत आहेत. पण अजून त्यावर नक्की म्हणावं असं काही संशोधन झालेलं नाही.

---***---

(समाप्त)

मुलाखतीत सहभागी प्रश्नकर्ते : अबापट, डॉ. विनायक जोशी (पॅथॉलॉजिस्ट, सोलापूर), चिंतातुर जंतू, भूषण पानसे. तांत्रिक साहाय्य : भूषण पानसे, अनुपम बर्वे

भाग पहिला

field_vote: 
0
No votes yet

मुलाखतीचा हा भाग पहिल्या भागापेक्षाही अधिक सखोल माहिती देणारा आहे. दोन्ही भाग वाचणाऱ्या व्यक्तिच्या मनातल्या बहुसंख्य शंका दूर होतील.
एक सूचना आहे. ही मुलाखत फक्त मराठीत असल्यास त्याचे ईंग्रजी भाषांतर करुन , जास्तीतजास्त लोकांपर्यंत ती पोचेल अशी व्यवस्था करता येईल का ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपयुक्त आणि माहितीपूर्ण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण आणि उपयुक्त मुलाखत. मी करोनाबद्दलचे सगळे लेख वाचले नसले तरी ऐसीचे चालकमंडळ ज्या सातत्याने ह्या विषयावर वेगवेगळ्या कोनांतून प्रकाश टाकणारे लेख मराठीत प्रसिद्ध करत आहे त्याबद्दल कौतुक वाटते. आभार!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी व्यवस्थापन उत्तम काम करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0