स्टायपेंड देणारी पहिली नोकरी

स्टायपेंड देणारी पहिली नोकरी
(लेख, महाराष्ट्र टाइम्स : 17 मार्च २०२० ला छापून आला. )
एप्रिल १९७९ ला कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग,पुणे मधून बी इ मेक झालो आणि खडकीच्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्समधे ट्रेनी इंजिनिअर म्हणून रुजू झालो, सहाशे रु. स्टायपेंडवर. तीच माझी पहिली नोकरी ! तिथल्या ८ वर्षाच्या नोकरीनंतर ,बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या केल्या , पण या पहिल्या नोकरीच्या आठवणी काही औरच आहेत, मनावर कायमच्या ठसलेल्या आहेत !
जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर बोपोडीला उजवीकडे वळलं की ,लगेच KOEL. १९४६ साली शंतनुराव किर्लोस्करांनी KOELची मुहूर्तमेढ रोवली . KOELचे मुख्य प्रवेशद्वार ओलांडून पुढे गेलं की , मालगाडीचं रेल्वे क्रॉसिंग लागतं ,त्यापुढे लगेच उजवीकडे डिझाईन ऑफिस म्हणजे ' टेकसेंटर '. तीच माझी कामाची जागा. आत शिरताच डावीकडे सगळ्या साहेबलोकांच्या केबिन्स आणि समोर 'आमच्या ' बसायच्या जागा . 'आमच्या ' म्हणजे आमचा समवयस्क १८ मित्रांचा जणू एक ग्रुपच तिथं बनला होता. आम्ही एकमेकांच्या घरी दर महिन्याला गेट-टुगेदर करत असू इतके घनिष्ठ संबंध ,एकमेकांच्या सुखदुःखात सतत सहभागी !
मी इंजिन ऍप्लिकेशन विभागामधे होतो. आमच्यावेळेला कॅड डिझाइनिंग /ड्राफटिंग वगैरे काही नव्हते . ड्रॉईंगबोर्डावरती उभे राहून कामं करायला लागायची.त्यासाठी ड्राफ्टसमन होते. त्यांच्यात आणि आमच्यातही खेळीमेळीचं वातावरण होते.
डिझाईन ऑफिसच्या मागच्या बाजूला अद्ययावत टूलरूम आणि इंजिन्स टेस्टिंगचे सेल. तिथली दृष्ये जिवंत चित्रांसारखी अजूनही डोळ्यासमोर येतात. तिथल्या आठवणी मनात रुंजी घालतात.
पहिली आठवण म्हणजे शंतनुराव किर्लोस्करांची. टेकसेंटरवर त्यांचं फार प्रेम होतं ,त्यामुळे अधुनमधून चक्कर असायचीच. पंच्याहत्तरी ओलांडलेले ते , एकदा झपाझप पावले टाकत टूलरूम मधून जात होते. एका ऑपरेटरने लेथवर एका जॉबला अगदी बारिक कट लावला होता , हे त्यांच्या नजरेनं टिपलं . म्हणाले '' अरे, एवढासा कट लावलास तर अजून तीन दिवसतरी तुझा हा जॉब चालेल ! आणि सेफ्टी गॉगल कुठाय ?'' ते स्वतः लेथवर उभे राहिले, सेफ्टी गॉगल लावला आणि त्याला जॉब करून दाखवला . मी आश्चर्यमुग्ध शेजारी उभा !
दुसरी आठवण म्हणजे तिथे असताना तीन वर्षांनी माझा झालेला विवाह आणि त्याला अनुषंगून तिथल्या असलेल्या स्मृती ! लग्नाच्या रिसेप्शनमध्ये कंपनीच्या सर्वांसमवेत काढलेला ग्रुप फोटो अजूनही मी अधूनमधून बघतो. तिसरी म्हणजे माझ्या बहिणीचं ठरलेलं लग्न ! बहिणीसाठी स्थळं बघताना लक्षांत आलं की एक स्थळ आमच्याच कंपनीतील आहे. होणारे जावई प्रॉडक्शनमध्येच मॅनेजर होते. मग काय ! त्यांच्याशी सूतोवाच करण्याची जबाबदारी आईनं माझ्यावरतीच टाकली होती आणि ती मी व्यवस्थित निभावली . . . अशा कित्येक आठवणी !
कंपनीच्या मागच्या बाजूला मुळा नदीचं पात्र आहे, त्यापात्रात आमचे आरईटीफोर इंजिन स्पीडबोटवर बसवून घेतलेल्या ट्रायल्स आणि पाटण्यात गंगानदीमध्ये त्याच स्पीडबोटच्या ट्रायल्स घेताना काळजांत भरलेली धडकी ! पंजाबात चंदीगडजवळ थंडीत कुडकुडत असताना एचए 694 इंजिनचे कम्बाईन्ड हार्वेस्टरवर केलेलं कमिशनिंग ! इंटर किर्लोस्कर बॅडमिंग्टन डबल्स फायनलमध्ये अतुल किर्लोस्करांबरोबर पार्टनर होण्याची मिळालेली संधि !
अजूनही जुन्या पुणे-मुंबई हाय -वे वरून जाताना बोपोडीपाशी, माझ्या पहिल्या-वहिल्या कंपनीपाशी पावलं थबकतात आणि आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या तिथल्या आठवणी साद घालू लागतात.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुरेख!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेले ते दिवस !!! आता फक्त आठवणी..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0