व्युत्पत्ती

"नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा" ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. धनसुख आणि माया शर्मा या दांपत्याला मात्र ही म्हण गैरलागू होती. त्यांच्या मालकीच्या शेकडो कुरणांमध्ये हजारो एकरांमध्ये गवताची अब्जावधी पाती डोलत असत. हिरवंगार गवत विकत घेण्यासाठी मोठमोठ्या डेअरी फार्म्सची अहमहमिका असे. शर्मा दांपत्याला कसली ददात नव्हतीच. त्यांनी हौसेने बांधलेल्या टुमदार टोलेजंग बंगल्याबाहेरील संगमरवरी पाटी त्यांची फ्राॅईडियन स्लिप दिमाखात मिरवत असे - "शर्मा सधन"!

पण हजारो एकरांतल्या शेकडो कुरणांच्या संपत्तीला वारस मात्र नव्हता. त्यामुळे शर्मा दांपत्य कष्टी असे. नवस वगैरे करूनही काही उपयोग होत नव्हता. अखेरीस एका विलक्षण साधूने त्यांना सल्ला दिला, "तुम्हाला संपत्ती देणाऱ्या व्यवसायाचा उल्लेख मुलाच्या नावात करायची शपथ घेतलीत तरच काहीतरी होईल." शर्मा दांपत्याने तशी शपथ घेतली, आणि अहो आश्चर्यम्! त्यांना वर्षभरातच पुत्ररत्न प्राप्त झालं.

आता मुलाचं नाव "गवत" असं कसं ठेवता येईल? धनसुख साब धर्मसंकटात पडले होते. पण माया मेमसाब चतुर होत्या. त्यांनी क्ऌप्ती लढवली, आणि मुलाचे नाव "सुग्रास" असे ठेवण्यात आले. सुग्रासच्या आईवडलांनी लॅन्डरोव्हरवरून साखर वाटली.

तान्ह्या सुग्रासच्या बाळलीला पाहताना शर्मा दांपत्याचे कुरणांकडे मात्र दुर्लक्ष झाले. गवत वेळेवर न कापल्याने वाळून पिवळट पडले, आणि त्याला बाजारभाव मिळणे अशक्य झाले. धनसुख म्हणाले, "देवाजीने अवकृपा केली, शेते पिकुनी पिवळी झाली". शर्मा दांपत्याला विरक्ती आली. सुग्रासला (द्वितिया विभक्ती) आपल्या जीवश्च कंठश्च मित्राला (चतुर्थी विभक्ती) दत्तक देऊन आणि संपत्ती सुग्राससाठी ट्रस्टमध्ये ठेवून दोघेही तपश्चर्या आणि/ किंवा तीर्थयात्रा यांसाठी हिमालयात निघून गेले.

आता फ्लॅशबॅक.

धनसुख आणि मिहीर यांची ओळख होण्यापूर्वी मिहीरचा जीवश्च कंठश्च मित्र होता त्याचा चुलतभाऊ तरूण. दोघे एकत्र फिरायचे, पार्ट्यांना जायचे, उत्तमोत्तम खाद्यपेयांचा आस्वाद घ्यायचे. कधीही बिल निम्मेनिम्मे वाटून न घेणे हा त्यांचा अलिखित नियम होता. कधी मिहीर बिल भरायचा, तर कधी तरूण.

पण एकदा काही विवक्षित कारणाने दोघांमध्ये वितुष्ट आले, आणि त्यांनी एकमेकांचे तोंड बघणेही बंद केले. तदनंतर काही मासांनी मिहीर एका कॅफेत बसला होता. अचानक तरूण तिथे आला आणि म्हणाला, "मी इथे बसू का? एकेक काॅफी पिऊया. फाॅर ओल्ड टाईम्स सेक!"

मिहीर म्हणाला, "बस. पण बिल TTMM तत्त्वावर भरायचं. तू तेरा, मैं मेरा!"

तरूण म्हणाला, "असं नको रे म्हणूस. कितीही वितुष्ट आलं तरी आपण दोघे तेजवानी परिवाराचा भाग आहोत. TTMT - तू तेजवानी, मैं तेजवानी."

मिहीर रागाच्या भरात म्हणाला, "नाॅट एनीमोअर. आजपासून TTMM. तू तेजवानी, मैं मेजवानी!"

आणि मिहीरने आपलं नाव कायदेशीररीत्या बदलून मिहीर मेजवानी असं करून घेतलं. तरूण तेजवानीचं तोंड ताडणंही त्याने त्यागलं.

फ्लॅश फाॅरवर्ड.

धनसुखने दिलेली जबाबदारी नीट पार पाडायची असा निश्चय मिहीरने केला. तान्हुल्याकडे ममतेने पाहत त्याने दत्तक घेण्याच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. आनंदाने आणि गांभीर्याने तो बाळाला म्हणाला,

"वेलकम टू युवर न्यू लाईफ, सुग्रास मेजवानी!"

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Trivial, yet funny.

मात्र, टायमिंग चुकल्यामुळे लेखाकडे दुर्लक्ष झाले असावे, नि प्रतिसाद मिळाला नसावा. एकच आठवडा अगोदर किंवा नंतर टाकली असतीत, तर...

(गोष्ट तेव्हाच वाचली होती. मात्र, त्या वेळेस प्रतिसाद देण्याचा मूड नव्हता. Not your fault.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0