जगाचा अंत

आवाज झाला. लोखंडी अवजड सामान जमिनीवर पडल्याचा ठण्ण् असा आवाज झाला. मधूची झोपमोड झाली. अवेळी झोपमोड होण्याची पहिलीच वेळ असावी. मधू साधारणपणे रात्री अकरा –साडे अकरा वाजता झोपतो. झोपता झोपता पुस्तक वाचण्याची वाईट सवय त्याला लागली होती. तुम्ही असेही म्हणू शकता. पुस्तक वाचता वाचता झोपण्याची सवय.....एकदा झोपला की तो सकाळी सातलाच उठत असे. ही अशी मधेच झोपमोड कधीच झाली नव्हती.
साधारणपणे रात्रीचे दोन वाजले असावेत. स्वप्न पडल्यामुळे जाग आली का तहान लागल्यामुळे? कळायला मार्ग नव्हता. ही परिस्थिती कशी हाताळायची? त्याचे ज्ञान त्याला नव्हते. काही लोकांना निद्रानाशाचा विकार असतो. ते लोक अनेक उपाय करतात.काहीजण मेंढ्या मोजतात तर काहीजण देवाची स्तोत्रं म्हणतात. माझा एक मित्र आहे. त्याला हा प्रॉब्लेम होता. मग तो काय करायचा? त्याने भारतीय रेल्वेची टाईमटेबल्स आणून ठेवली आहेत. केरळातले एक स्टेशन पकडायचे. मग आसाम मधले दुसरे स्टेशन बघायचे. दोनही स्टेशन आडमार्गावर! तिथे चोवीस तासात एखादी ढकल गाडी येणार! आता ह्या स्टेशनहून त्या स्टेशनला कसे जायचे. कुठल्या स्टेशनवर गाडी बदलायची. सगळ्यात कमी खर्चाचा मार्ग कोणता? सगळ्यात कमी वेळ खाणारा मार्ग कुठला? तुम्ही भुसावळला येईपर्यंत गाढ झोपलेले असणार. एकूण तुम्हाला खेळाची कल्पना आली असेलच. असले खेळ खेळायला लागलात तर झोप येणार नाहीतर काय येणार?
मधूला ह्या असल्या उपायांची कधी गरज पडली नाही.( त्यामुळे त्याला ते माहीत नव्हते.)
आपल्याला भास झाला असणार अशी मनाची समजूत घालून मधू पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागला. झोप यायच्या ऐवजी मधूला बेडरूममध्ये कोणीतरी वावरत आहे असा संशय आला. कोणीतरी त्याच्या अगदी जवळ आहे असा भास झाला. आता कोणीतरी हलक्या आवाजात खाकरले. खचितच हा काही भास नव्हता.
“कोण आहे? कोण आहे माझ्या बेडरूम मध्ये ?’’ मधूने जोरात विचारले.
“दिवा लावता का जरा? मला आपल्याशी बोलायचे आहे.” आवाजात आर्जव होते. मार्दव सुद्धा! मधूची भीति थोडी कमी झाली असावी. तो उठला आणि त्याने दिवा लावला. दिव्याच्या प्रकाशात त्याने जे दृश्य पहिले ते खरोखर अचंबित आणि थक्क करणारे होते.
त्याच्या समोर एक बुटका उभा होता. लहानपणी त्याचे बाबा बुटक्या लोकांच्या गोष्टी त्याला सांगत असत. त्यांच्यापैकी एक जण इथे अवतीर्ण झाला होता.
“”हिमगौरी आणि सात बुटके” नावाची परीकथा माझे बाबा मला सांगत असत. आपण त्यापैकी आहात काय?” मधूला भीती ऐवजी गंमत वाटत होती. बुटक्याने खाली वाकून मधूला नमस्कार केला.
“ती परीकथा नाही तर ती सत्यकथा आहे. हो, ते आमच्यापैकीच. पण ती गोष्ट खूप जुन्या काळची. मी डॉक्टर बुटबैंगण. मी शास्त्रज्ञ आहे. माझ्या बुटविज्ञानातील संशोधनामुळे मला बुटनोबल हे सर्वोच्च बक्षीस प्रदान करण्यात आले आहे. पण हे मी तुम्हाला का ऐकवत आहे?”
“डॉक्टर बुटबैंगण, आपल्याला भेटून माझा बहुमान झाला आहे असे मी समजतो. ह्या वेळी (अवेळी?) माझ्या बेडरूम मध्ये कसे येणे केले?”
“अवेळी? ही माझी कामाची वेळ आहे. आपली परवानगी घेण्यासाठी मी आपल्याला डिस्टर्ब केले. त्याबद्दल दिलगीर आहे.”
ह्या बुटक्याला कंसात बोललेले ऐकू येत असावे. त्याच्या तोंडुन ‘डिस्टर्ब’ हा शब्द ऐकल्यावर ह्याला मराठी चांगले येते ह्याबद्दल मधूची खात्री पटली.
“मला माझ्या संशोधनाशी संबंधित काही काम म्हणजे प्रयोग करायचे आहे. त्यासाठी मला आपल्या ह्या खोलीचा वापर करायचा आहे. आपली परवानगी असेल तर हं.” मग घाई घाईने त्याने आपले बोलणे पुरे केलं, “मी आपल्याला सहा महिन्याचे भाडे अगाऊ देईन.” त्याने आपल्या लाल भडक कोटाच्या खिशातून पैशाचे पाकीट काढले देखील. “हे घ्या एक हजार बुटरुपये”
‘बुटरुपये’ ही बहुदा त्यांची करन्सी असावी.
"ते बुटरुपये घेऊन मी काय करू?"
“कळली मला तुमची समस्या. मी खरं तर सोनं द्यायला पाहिजे. माझ्या नातेवाईकांच्या सोन्याच्या खाणी आहेत. पण तो प्रांत खूप दूर आहे. तिथे जाऊन सोने आणण्याइतका वेळ नाहीये. हा, मी एक करू शकतो. मी भाड्याच्या ऐवजी तुम्हाला उपयोगी पडेल अशी टीप--रोज एक--- देईन. पहा तुमचा खूप फायदा होईल. माझ्या टीपा घेऊन लोक कोट्याधीश झाले आहेत. तुम्ही पण व्हाल. का नाही होणार ?”
कौन बनेगा करोडपती? मधूला हसू आले. मधूला करोडपती बनण्यात काही स्वारस्य नव्हते. आपली झोपमोड होईल ह्याची धास्ती त्याला वाटत होती.
“मला सांगा, आपण माझ्या बेडरूममध्ये एक्झॅट्ली काय उद्योग करणार आहात?” मधूने त्यांना विचारले.
“हे पहा मला स्वतःलाच त्याची कल्पना नाही. मी एकदा काम करायला सुरवात केली की मला समजेल मी काय करतो आहे.”
मधूला हसावे की रडावे ते समजेना. हा एक फूट उंच बुटका, लालभडक कोट, शंकूच्या आकाराची लालभडक टोपी, दीड इंच जाडीचा पट्टा, पांढरी शुभ्र दाढी, गोबरे गुबगुबीत गाल, ढेरपोट्या डॉक्टर बुटबैंगण! ह्याला स्वतःला काय करायचे आहे ते माहीत नाही. आमच्या ऑफिसमध्ये असे कोणी बोलला असता तर?
“तुम्ही म्हणता तो तुमचा उदात्त हेतू मला समजला. पण मला माझ्या झोपेची काळजी आहे. आपल्या ठाक-ठोकीने माझ्या झोपेचं खोबरे होणार त्याचे काय?”
“मधुकरजी, आपली झोपमोड होणार नाही ही जबाबदारी माझी. माझ्या हत्यारांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार नाही असे मंत्र मला येतात. आपण खुशाल निवांत निश्चित होऊन झोपा.”
त्यानंतर डॉक्टर बुटबैंगण काहीतरी अगम्य बडबडले आणि मधूला प्रचंड जांभई आली. आपण स्वप्न बघतो आहेत अशी त्याची पक्की खात्री झाली होती. पुढे काय झाले ते मधूला समजले नाही. सकाळी नेहमीच्या वेळी तो जागा झाला तेव्हा डॉक्टर बुटबैंगण त्याच्या समोर गरम गरम चहाचा प्याला घेऊन उभे होते.
“शुभ प्रभात! कशी झाली आपली झोप? माझ्या ठोका ठोकीने आपल्याला त्रास तर नाही झाला? चहा घ्या आणि ऑफिसला जायची तयारी करा. तोपर्यंत मी नाश्ता तयार ठेवतो.”
“डॉक्टर तुम्ही कशाला कष्ट घेत आहात?” मधूला स्वतःची लाज वाटली, “मी केला असता चहा.”
“अहो मी पक्का चहाबाज आहे. पण तुमचा तो लाल डब्यातला चहा. छ्या. तो काय चहा आहे? मी रात्री गंमत म्हणून थोडी चव घेतली. अरारारा. हा चहा प्या, मग मला सांगा.”
खरच त्यांनी बनवलेल्या चहाची चव अप्रतिम होती. असा चहा मी आयुष्यांत प्रथम पीत होतो.
“डॉक्टर, कुठुन आणला हा चहा? कोणता ब्रॅंड आहे हा.”
“मधुकररावजी, तुम्ही प्या. तुम्हाला चहा पिण्याशी मतलब. नसते प्रश्न विचारू नका.”
नाश्ता ही असाच फाईव स्टार बनवला होता!
मधू ऑफिसला जायला निघाला तर डॉक्टर पुढे आले.
“तुमची आजची टीप, “आज बसचा संप आहे. बाहेर पडल्यावर पहिली जी रिक्षा दिसेल ती घ्या आणि ऑफिसला जा. ही रिक्षा सोडाल तर पुन्हा दुसरी मिळणार नाही.””
त्याची ही टीप साधी होती पण महत्वाची ठरली. नेमक्या त्याच दिवशी क्लाएन्ट येणार होता. मधू ऑफिसमध्ये वेळेवर हजर असल्यामुळे क्लाएन्टसमोर कंपनीची शोभा झाली नाही. सर माझ्यावर खूष!
आज बसचा संप आहे हे डॉक्टर बुटबैंगण यांना घर बसल्या कसं समजलं, हा विचार मधूने मनातून काढून टाकला.
त्याने दिलेल्या टिप्स.!! काही चांगल्या, काही कामाच्या तर काही अगदी बकवास. आता ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी ही काय टीप आहे? म्हणजे ज्याला आयुष्यात कधी अप्रामाणिक व्हायची संधी मिळायची शक्यता नाही त्याच्या समोर प्रामाणिकपणाचे गुणगान करण्यात काय अर्थ? बुटके सुध्दा असे विनोद करू शकतात एवढेच त्यातून सिध्द होत असावे.
काही टिप्स मात्र अत्यंत अर्थपूर्ण असत. त्यातला अर्थ शोधण्यात अख्खा दिवस निघून जात असे. उदाहरण द्यायचे झाले तर.... ही टीप पहा. “पलीकडच्या किनाऱ्यावर नाव घेऊन नावाडी उभा आहे.” म्हणजे मी काय करणे अपेक्षित आहे? तो त्या तिथे, पलीकडे, तिकडे उभा आहे. मी त्याला बोलावू शकत नाही. त्याच्या मनात जेव्हा येईल तेव्हा तो ऐलतीरी येईल. तो पर्यंत मी इथे उभा राहून त्याची वाट पाहू? का? मला तिकडे जायचे नसेल तर?
दिवसभर विचार करून करून मधूचे डोके दुखायला लागले. अखेर मधूने ठरवले, “ तो तिकडे ठीक आहे, मी इकडे ठीक आहे. ऑल इज वेल वुईच रिमेन्स वेल!
मधूच्या डोक्यात ताडकन प्रकाश पडला. ह्या ‘टीप’ चा अर्थ होता, वाट पाहण्यात वेळ घालवू नकोस. तो जेव्हा यायचा असेल त्याच वेळी येईल. तुम्ही आपले काम चालू ठेवा.
ते काहीही असो एकूण बुटका घरी आल्यापासून मधूचे दिवस मजेत चालले होते. सकाळी उठल्या उठल्या दिव्य चहा, मग चवदार नाष्टा, रात्रीचे साधे पण अनोखे जेवण. माणसाला आयुष्यात अजून काय पाहिजे?
मध्यंतरीच्या काळात डॉक्टर जे काही बनवत होते त्याला आकार येत होता. मधूने नासाच्या आणि इस्रोच्या रॉकेटचे फोटो पाहिले होते. हे त्याच्यासारखेच दिसत होते. अगदी खेळण्यातले नाही, जरा मोठे पण त्याच्या सारखेच.
न राहवून त्याने डॉक्टरांना विचारले. “डॉक्टर मला हे रॉकेट सारखे दिसत आहे. हे आहे काय?”
आपली भरगच्च दाढी खाजवत डॉक्टर उद्बारले, “हम्म, मलाही तसेच वाटत आहे.”
“डॉक्टर तुम्ही ह्या रॉकेटमध्ये बसून अंतरिक्षात फिरायला जाणार आहात काय?”
मधूच्या बोलण्यातला उपरोध त्याला समजला असावा पण त्याकडे दुर्लक्ष करून त्याने उलट प्रश्न केला, “तुम्ही मानव, तुम्ही कशासाठी अंतरिक्ष यान बनवून मंगळावर चढाई करण्याचा प्रयत्न करत आहात?”
हा अर्थात मानवाचा गुणधर्म आहे. तिकडे काय आहे? ते समजून घेतल्याशिवाय त्याला स्वस्थ झोप लागणार नाही. पण हे सगळे डॉक्टरांना समजाऊन सांगण्यात मधूला काही रस नव्हता.
अजून काही दिवस गेले. डॉक्टरांचे रॉकेट उड्डाण करण्यायोग्य झाले असावे. मधूला मनात उदास वाटायाला लागले. डॉक्टरांची जायची वेळ जवळ आली ह्याची कल्पना आली.
त्या दिवशी डॉक्टर गंभीर झाले होते. कमी बोलत होते. बहुदा त्यांनाही वाईट वाटत असावे. पडक्या आवाजात ते बोलू लागले, “मधुकररावजी, आज मला समजले की मी हे रॉकेट का बनवत होतो. उद्या रात्री ठीक बारा वाजता ह्या जगाचा अंत होणार आहे. ह्या विनाशातून वाचण्यासाठी माझी अंतःप्रेरणा, ऊर्मी मला हे रॉकेट बनवायला प्रवृत्त करत होती. पक्षी जसे वेळ आली की घरटे बनवतात ना अगदी तसेच. ह्या यानात बसून मी निघून जाईन दूर कोठेतरी. नवीन आयुष्य जगायला. नवी सुरुवात करायला.”
भावनातिरेकाने त्यांचा कंठ रुद्ध झाला असावा. थोडे थांबून त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली, “मला वाटत, तुम्हा मानवांना सुध्दा ह्याची जाणीव झाली असावी. म्हणूनच त्यांनी अंतरिक्ष यान बनवण्याचे तंत्र प्रगत केले.”
डॉक्टरांचं गूढ भाषण ऐकून मला हसू फुटणार होते पण डॉक्टर खूप गांभीर्याने बोलत होते. मी हसलो असतो तर त्यांना काय वाटले असते हा विचार आल्यामुळे मधूने स्वतःला सावरले.
“डॉक्टर तुम्ही माझी गंमत करत आहात. होय ना?”
डॉक्टर गंभीरपणे बोलले, “तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाहीये ना? विश्वास ठेवा किंवा ठेऊ नका. जे होणार आहे ते कोणीही टाळू शकणार नाही.”
“उद्या जर खरोखरच ह्या पृथ्वीचा विनाश होणार असेल तर तशी पूर्वसूचना शास्त्रज्ञांनी दिली असती.”
“हे पहा, तुम्ही लोक शास्त्राच्या ज्ञानात खूप मागासलेले आहात. तुमच्या शास्त्रज्ञांना अजून भूकंपाचे भाकीत करता येत नाही. उद्या असा प्रचंड भूकंप होईल आणि ह्या पृथ्वीचे तुकडे आसमंतात विखुरले जातील असं मी तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही, अणू रेणूंच्या अस्तित्वावर अजून तुमचा ठाम विश्वास आहे. अणू हा केवळ कल्पनाशक्तीचा खेळ आहे ह्याची जाणीव तुम्हाला कधी होणार? हे विश्व त्या काल्पनिक अणूंपासून बनलेले आहे त्यामुळे हे विश्वदेखील आपल्या मनाचे खेळ-------”
प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर पार्टी करायची अशी मधुच्या ऑफिसमध्ये पद्धत आहे. त्याला वाटले, डॉक्टरांची ‘प्रोजेक्ट’ पूर्ण झाल्यावार त्यांनी पण बाहेर जाऊन ‘पार्टी’ केली असावी. त्याचा परिणाम होऊन असे असंबद्ध बडबडत असावेत.
“डॉक्टर माझ्याकडे पैसे नाहीत, नाहीतर मी पुढचे चोवीस तास खच्चून एन्जॉय केले असते. हे जगाच्या विनाशाचे प्रकरण सगळ्यांना माहीत असेल?”
“नाही, ही बातमी फक्त मला माहीत होती. तुम्ही माझे मित्र म्हणून केवळ ती मी तुम्हाला सागितली.”
“अरेरे, डॉक्टर आपण मला सांगायला उशीर केलात. पाच सहा दिवस आधी सांगितले असते तर मी ‘झटपट कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून कर्ज घेऊन जीवनाचा यथेच्च उपभोग घेतला असता. आता काय उपयोग?”
डॉक्टरांनी आपल्या लाल कोटाच्या खिशातून सोन्याच्या सात आठ मोहरा काढून माझ्या हातात ठेवल्या, “जा, खुशाल मजा करा.”
मधूला खूप हसू येत होते, “आमच्या जगात सोन्याच्या मोहरांनी खरेदीविक्री होत नसते. मी ह्या विकायला गेलो तर--- ह्या मोहोरांवर कुणाचे चित्र आहे? सर्कशीतला विदूषक दिसतोय जणू.”
“माफ करा. ते चित्र आमच्या राजाचे-गोबोचे-चित्र आहे. तुम्हाला नोटा पाहिजे असतील. तर मग तुम्ही असे करा, तुमच्याकडे एखादी नोट असेल तर मला सॅंपल म्हणून द्या. मी उद्या सकाळी तुम्हाला हजारो नोटा आणून देईन. असल्या कामात माझा मामे भाऊ खूप हुशार आहे. आमच्या राजासाठी नोटा छापण्याचे काम तोच करतो.” डॉक्टरांनी आता नोटांची ऑफर दिली.
“डॉक्टर, इकडचे लोक खूप हुशार आहेत. ते खऱ्या नोटांनाही खोट्या म्हणून शाबूत करतील. त्यांच्यासमोर खरोखरीच्या खोट्या नोटांचा काय पाड?”
“तुम्हा मानवांना खऱ्या खोट्याची जाण असती तर! ते जाऊ दे द्या मला एक नोट.”
मी पण डॉक्टरांची गंमत करायच्या मूडमध्ये होतो. दिली काढून दहाची एक नोट!

दोन तीन दिवसांनी शेजारच्या बंद खोलीतून घाण वास येतो आहे अशी तक्रार कारण्यात आली म्हणून पोलिसांनी त्या खोलीचा दरवाजा फोडून प्रवेश केला. आत पलंगावर एक मृत देह पडला होता. शेजार पाजाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. का नाही बसणार? ती खोली गेले कित्येक महिने बंद पडली होती. तेथे कोणाचाही वावर नव्हता, अश्या बंद खोलीत एका अनोळखी माणसाचे प्रेत? पोलिसांनादेखील त्या माणसाची ओळख पटवणे अवघड झाले होते. पोलिसांच्या डॉक्टरच्या मते त्या व्यक्तीचा हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाला होता. मात्र काही विचित्र गोष्टींची पोलिसांनी नोंद केली. मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर गूढ हास्य होते. तसेच टेबलावर दहा रुपयांच्या नोटांच्या बंडलांची थप्पी लागली होती. खोलीत लाल रंगाचा कोट, टोपी, बूट, पंढरी तुमान आणि एक इंच रुंदीचा कातडी पट्टा सापडला, एक वर्षाच्या मुलाला ते कपडे फिट्ट झाले असते. फरशीवर कातड्याच्या पिशवीत सुतारकामाची हत्यारे पडली होती. कशाचा कशाला मेळ नाही. सगळे काही विचित्र!
न जगलेल्या, विस्कटलेल्या जीवनाचा राडारोडा होता तो! कुणाला ना खंत ना खेद!
When I go, the whole damn thing goes!
सगळ्या जगाचा नाही, फक्त मधूच्या जगाचा अंत झाला होता.
डोळे उघडे आहेत तो पर्यंत आजूबाजूचा परिसर. डोळे मिटले की सगळा अंधार!
.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भारी आहे. दोन स्टेशनांना जोडणाऱ्या गाड्या शोधणे काय भन्नाट आइडिया आहे. घाणेरड्या मेंढ्या मोजण्यापेक्षा भुसावळ यार्डात झोप लागणे आणि त्या चावऱ्या डासांच्या सोबतीने कमाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या असल्या गोष्टी दिवाळी अंकात लिहायच्या असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते रिकाम्या खोलीत मधूचं (त्याचंच ना ?) प्रेत कसं आलं काही समजलं नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नील, ही एक फॅंटसी आहे. त्या दृष्टीने त्याकडे पहा. ह्यावर बरेच काही लिहिता येईल. पण थोडक्यात म्हणजे Fantasy fiction is a genre of writing in which the plot could not happen in real life (as we know it, at least). Often, the plot involves magic or witchcraft and takes place on another planet or in another — undiscovered — dimension of this world. Many times, the plot also involves mythical creatures or talking animals (that might wear clothes and live in houses), and witches or sorcerers. It need not follow the rules of realities.
ह्या कथेत थोडे विज्ञान सुद्धा आहे. पण ते सोडून द्या.
गेली अडीच हजार वर्षे कल्पनारम्य साहित्य लिहिले गेले आहे. लोक ते आवडीने वाचत आले आहेत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नैतरकाय.
पण असल्याच गोष्टी लहानपणी गुंग होऊन वाचायचो झाडावर ( झाडात) बसून दुपारी.
अलिस नाही का सशाच्या बिळात जाते पुस्तकातल्या.
आणि हल्ली हरिपुत्तराच्या गोष्टींंत पावणेचार नंबरचा पलाटफारम असतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुटका फारच हुषार आहे ..
एका 'टीप' च्या मोबदल्यात घर वापरायला मिळवले ..
भारीच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||