चैतन्य ताम्हाणे यांच्या "द डिसायपल" या मराठी सिनेमाला व्हेनिस चित्रपटमहोत्सवात महत्त्वाचा पुरस्कार मिळाल्यानंतर तो सिनेमा पाहाण्याची उत्सुकता वाढली होती. त्या आधी हा सिनेमा हिंदुस्तानी गायकी, गुरुशिष्य परंपरा यांच्याशी संबंधित आहे हे कळलेलं असल्याने या जिव्हाळ्याच्या विषयांवर असणारा हा सिनेमा पहायचा हे ठरलेलं होतंच.
काल एका ऑनलाईन पोर्टलवर, अधिकृतरीत्या प्रदर्शित झालेला हा सिनेमा पाहायला मिळाला. तो विशेष आवडला.
स्पॉईलर अलर्ट> या पुढील परिच्छेदांमधे कथानक, व्यक्तीरेखा, आणि अन्य पैलूंबद्दल बोलताना त्यातला काही भाग कळतनकळत उल्लेखला जाणार आहे. सिनेमा पहायची इच्छा असलेल्यांनी हा भाग नाही वाचला तरी चालेल.
शास्त्रीय संगीताची लहानपणापासून आवड जोपासलेल्या, पुढे आपल्या उमेदीची सगळी वर्षं शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेल्या शरद नेरूळकरचा प्रवास इथे चितारलेला आहे. त्याच्या गुरुजींशी, आई वडलांशी, आजीशी , त्याच्या समकालीनांशी आणि मग पुढे त्याच्याकडून संगीत शिकणार्यांशी असलेले त्याचे संबंध त्यात येतात.
सिनेमा मेनस्ट्रीममधला नाही. कथानायक आपल्या नेत्रदीपक कर्तृत्वाने सरकारदरबार जिंकतो, जग जिंकतो, प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर पोचतो आणि या प्रवासात परीकथेप्रमाणे घटना घडतात ते इथे नाही. त्याच्या गुरुजींवर आणि गुरुंच्या गुरुंवर त्याची श्रद्धा आहे पण इथे श्रद्धेचे उमाळे नाहीत. हयात असलेल्या आणि दिवंगत व्यक्तींचं दैवतीकरण नाही. आपला हिरो हळुहळू तारुण्यातून प्रौढत्वाकडे जातो. कोवळेपणाचे थर गळतात. तो शरीराने काहीसा निबर बनतो. थोडा मनाने सुद्धा.
पैसा, प्रसिद्धी, कलात्मक यश याच्यात आपला हिरो कुठे शिखरावर पोचत नाही. निम्न आर्थिक स्थितीतून आलेला असतानाही, शास्त्रीय संगीताचा शिक्षक हा व्यवसाय म्हणून निवडतो आणि ते बनायच्या आधीची वर्षंसुद्धा शास्त्रीय संगीताच्या सीडीज विक, मैफलींमधे गा, आयोजक लोकांशी संबंध निर्माण करून काही काम मिळवता येतं का ते पहा असेच प्रयत्न करतो. त्याची मिळकत मोजकी आहे आणि ती तशीच राहाते. थोडं उशीरा का होईना, पण लग्न, संसार सुरू होतात पण तो असतो नि राहातो संगीताचा शिक्षक.
ज्यांच्यावर मूकपणे प्रेम केलं, ज्यांच्यावर श्रद्धा ठेवली ते गुरुजी आणि कधी न भेटलेल्या गुरुजींच्या गुरु "माई" - ज्यांची फक्त भाषणं त्याने ऐकली आहेत - तेही वयोपरत्वे दुरावतात, त्यांच्याबद्दलची मिथकं कुठेतरी असत्य आहेत की काय असा भास होतो.
आणि या सर्वाची निवड करून झाल्यावर , हे सर्व पाहत, अनुभवत असताना त्याचा जीवनप्रवास चालू राहातो.
स्पॉईलर अलर्ट समाप्त>
सिनेमा पाहाण्यापूर्वी शास्त्रीय संगीताचा पाया असलेले, "कट्यार काळजात घुसली", "बालगंधर्व"यांसारखे गेल्या काही वर्षांमधे येऊन गेलेले सिनेमे आठवले. "डिसायपल" सुरू झाला आणि जाणवलं की हा सिनेमा त्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. (याचा अर्थ "कट्यार काळजात घुसली", "बालगंधर्व" हे वाईट आणि "डिसायपल" थोर असं मला म्हणायचं नाही. इतकं बटबटीत विधान करायचं नाहीये. )
सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला पडलेले प्रश्न, आपल्याला पडलेली कोडी सोडवायचा हा प्रयत्न आहे असं मला वाटलं. हा सिनेमा पैसे कमावणार नाहीये आणि तशी त्याची प्रतिज्ञा नाहीये. मात्र कथानायक जितक्या प्रामाणिकपणे हिंदुस्तानी संगीताकडे आणि पर्यायाने आपल्या आयुष्याकडे पाहातो तितक्याच खरेपणाने सिनेमादेखील बनवला आहे असं मला कुठेतरी वाटलं.
कलेशी असलेलं आपलं नातं नेमकं काय असतं? कलेमधे मिळालेलं यश अपयश म्हणजे काय? लौकिक यशापयशाला जरी बाजूला ठेवलं तरी कलेतून काहीएक अर्थ लावण्याचा हेतू या गोष्टीच्या संकल्प आणि सिद्धीला काही अर्थ आहे कां? कलेशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करत ठेवणं ही गोष्ट In and Of itself श्रेयसात्मक आहे का? मग ते करत असताना - किंवा ते केल्यामुळे - एक अत्यंत सामान्य , काहीसं उपेक्षित, अनामिक आयुष्य बनत गेलं तर ते श्रेयात्मक की निरर्थक? आणि असं जगत असताना आपल्या आजूबाजूच्या झपाट्याने बदलत असणार्या जगाशी आपला सांधा कसा राखून ठेवायचा? शरीरा-मनाच्या भुकांचं आणि मुख्य म्हणजे अतृप्तीचं आणि क्वचित कधीकधी खिंडीत गाठणार्या हपापलेपणाचं काय करायचं?
"द डिसायपल" ने हे प्रश्न मनात जागे केले. ते करत असताना जे समोर उलगडत गेलं त्यामधे कमालीचा संयम मला जाणवला. चैतन्य ताम्हाणे नावाच्या जेमतेम तीशीत असलेल्या माणसाकडे इतका संयम कसा आला असेल?
थोडं हिंदुस्तानी संगीत आयुष्यात ऐकलं आहे. थोडं शिकून पाहिलं आहे. त्यात "ठहराव" या गोष्टीला अपरिमित महत्त्व आहे. स्वरांच्या लगावामधे एक घनगंभीरता हवी असं मानलं जातं. शुद्धतेइतकंच या घनतेला खूप महत्त्व आहे. "द डिसायपल"ची निर्मिती, लिखाण , दिग्दर्शन करणार्यांना हा ठहराव गवसला आहे. अरुण द्रवीड या बुजुर्गाची गायकी आणि त्यांचा अभिनय मला आवडला. आणि मुख्य रोल केलेल्या आदित्य मोडकला आलिंगन द्यावं असं मला चित्रपटाच्या शेवटी वाटलं.
शरद नेरूळकरच्या या प्रवासामधे दिवंगत माईंनी दिलेल्या भाषणांची त्याला सोबत आहे. माईंची ही भाषणं मला अर्थसंपृक्त वाटली. त्याचा एक हिप्नॉटिक इफेक्ट - किमान मला - जाणवला. सार्या चित्रपटाचा जणू बोधस्वर म्हणजे ही उधृतं आहेत. सुमित्रा भावेंनी त्याकरता आपला आवाज दिलेला आहे. मला हा भाग परतपरत पाहावा वाटला.
सिनेमाबद्दल जे वाटतं ते याहून अधिक आहे पण सांगता येत नाही. माझे शब्द संपले. शरद नेरूळकर या कथानायक कसा विचार करत असेल ते सांगणारी शंकर रामाणींची एक मला अतिशय आवडणारी कविता देतो आणि समारोप करतो.
एकल्याने गावें
एकट्याचे गाणें;
परक्याचे नाणें
खरें-खोटें.
खरी आहे फक्त
नागवली काया
हंबरते माया
एकट्याची.
एकट्याच्या तेथे
उधळल्या वाटा
चढणीच्या घाटा
अंत नाही.