ननैतिक प्रश्न आणि माझे फ्रॉयडियन सोहळे

#ललित #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

ननैतिक प्रश्न आणि माझे फ्रॉयडियन सोहळे

- प्रियांका तुपे

२२ मार्च २०२०
अभिषेक,

आपण यांना पाहिलेत का? टाईपच्या तुझ्या फोटोवरून मी तुला जज केलं नाही, असं म्हणणं धादांत खोटं आहे. माणसं माणसांना जोखतच असतात, किंवा कधी कधी ते इतकं आपोआप होतं की नेणिवेलाही कळत नाही. जोखणं एवढं वाईटही नाही, पण आपल्याला दिसलेला तुकडाच तेवढा सत्य हा भास वाईट! आपण बांधलेल्या अंदाजापेक्षाही एखादी व्यक्ती निराळी असू शकते, अशी किंचितशी पुन्हा वाकून बघता येईल, एवढी तरी फट- दार खाडकन बंद करण्याऐवजी ठेवावी.

तर या फटीतूनही मला मी डोकावेन इतकंच सत्य दिसणारे हे गृहीत आहेच्चए. पण तू का नाही आणखी आत डोकावून पाहिलंस? माझ्याआत. जाऊ दे हे सगळं सोड. आपणहून डोकावण्याची उर्मी तुला नसेलही पण मी तुला म्हणलं की तुला वेण्या घालता येतात का? तर तू फिस्सकन हसलास. इतका की टेबलावरचा ग्लास पडून फुटला आणि सगळे आपल्याकडे बघायला लागले. मग मी तुला विचारलं की तू रविवारी मला पाठ घासून आंघोळ घालू शकशील का? तर परत तुझं तेच. फिस्सकन हसणं नि मग. "ह्या! त्यात काय रोज दोघे एकत्रच अंघोळ करू की" असं म्हणणं. रोज एकत्र आंघोळ इ. उलटी यावी इतकी वाईट कल्पना आहे ही. असं मी म्हणाले पण मनातल्या मनात.

आंघोळ ही आपली किती पर्सनल गोष्टय. मला तुझा त्यातला सहभाग फक्त पाठ घासून देण्यापुरताच हवाय, हे तुला कधी कळणार?

त्यावर तुझं पुन्हा 'क्या तेरा क्या मेरा' सुरू झालंच. तसं होईलही रे कधी तरी कदाचित. मला आवडणार आहे तुझं माझं सगळं एक झालेलं पण तुझी मात्र आत डोकवायची तयारी नाही. काठावर मजेत पाय हलवत बसून तू मोक्याच्या क्षणीच फक्त आत उडी मारणार काय? नाय, नो, नेव्हर!

माझ्या केसांत खूप गुंता होतो, नाही रे मला एकटीला त्याची निगा राखता येत. म्हणून आठवड्यातून एकदाच तर तू छान तेल घालून, कंगव्याने हळूवार केस विंचरत, गुंता सोडवून त्याच्या वेण्या घालाव्यास, पाठ घासून आंघोळ घालावी आणि छान तिखटजाळ चकुल्या (अहं वरणफळ नव्हे चकुल्याच!) कराव्यास. एवढ्या तीन साध्या अपेक्षा आहेत माझ्या. पण तुला हे हास्यास्पद वाटतं. हस, हस! आणखी चेष्टा कर. मला घंटा फरक पडत नाही.

फोटो बघून आडाखे बांधले तरी तुला भेटायचं ठरवलंच. कारण प्रेम मिळण्याचा हक्क, गरज प्रत्येकाला असते, त्या शक्यतेचा दरवाजा आधीच बंद होणं हा कुणावरही झालेला अन्याय असू शकतो. एवरीवन डिझर्वस अ गुड लवलाईफ. असं काहीसं कुणी कुणी डोक्यात भरवून ठेवलेलं असतं आयुष्यात, त्यामुळे भेटायला काही हरकत नव्हतीच. तर भेटल्यावर आपण खूप बोललो, भटकलो. तसा तू कमीच बोललास. म्हणून मला जास्त उत्सुकता वाटली. बोलघेवड्या लोकांना इन्ट्रोव्हर्ट लोकांचं जाम आकर्षण असावं कदाचित. म्हणूनही मला तुझ्यात डोकवायची उत्सुकता वाटली, खरं तर तुझ्या घरी खिडकीत बसून आपण पाऊस पडल्या संध्याकाळी बाहेर उडणारे चतुर बघत होतो; नि मध्येच मी तुझ्या खांद्यावर डोकं टेकवलं तर किती बरं वाटलं मला. मग तुझ्या मांडीवर डोकं ठेवून पडले तर तू केसातून हात फिरवता फिरवता चेकॉव्हच्या गोष्टी सांगायला लागलास. तेव्हा मला वाटलं तूच तो! पण असे क्षणच अल्पायुषी. लवकरच हा भ्रम तुटला. त्यामागे एक मोठं कारण. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी फिरायला जायचं म्हणून तू माझ्या ऑफिसबाहेरच्या बसस्टॉपवर मला घ्यायला येणार होतास. तू आलासही पण सोबत तुझा एक मित्र. आणि बसस्टॉपवर उभी राहून मी आपली लॉलीपॉप खात उभी होते. तुझ्या मित्राला तू माझी ओळख करून देताना म्हणालास, ही माझी. मैत्रीण.
तोंडातून बाहेर दिसणाऱ्या लॉलीपॉपच्या पांढऱ्या दांडीकडे बघत तू एक पॉझ घेत क्षणात बदललेला अंदाज माझ्या नजरेतून सुटला नाही. तू मला मैत्रीण म्हणालास त्याचं वाईट वाटण्यापेक्षा क्षणभर थांबून तुझा चतुर भांबावलेपणा बघून हसायलाच आलं मला. तर तुला तेही बालिश वाटलं.
आणि तुझा मित्र निघून गेल्यावर मी रोखलेलं हसू बाहेर पडलं. तर "कमॉन, प्लिज स्टॉप धिस लाफिंग. विल यु एव्हर ग्रो अप?" म्हणत तू तडतडलास. तुझा नाकाचा शेंडा लाल झालेला बघून मला परत हसू आलं पण ते दाबत मी खिशातून लॉलीपॉप काढत तुझ्यापुढे धरला; तर तू तो घेऊन फेकून देत परत ओरडलास, "हे असलं लहान मुलांचं काही मी खात नाही, मला नाही आवडत." मग मला वाटलं त्या लॉलीपॉपइतकं निर्दयीपणे नाही पण कमीतकमी दुखावत तुला आयुष्यातून बाजूला फेकता येऊच शकतं.

मी गुपचूप घरी गेले आणि फार विचार न करता भरपूर खाल्लं, निवांत झोप काढली. दुसऱ्या दिवशी थोडं ठसठसलं, मग त्याच्या दुसऱ्या दिवशी अजून थोडं. मग नंतर सगळं पुसट होत गेलं. मी पुन्हा माझं रुटीन जगायला लागले. क्षमायाचना करत तुझ्या दाराशी आले नाही, हे बघून काय बिथरलास तू. आणि माझ्या घरचेपण. आयुष्याचा सत्यानाश म्हणे! तुझ्यासारख्या माणसाशी लग्न होण्यापासून मीच खरं तर अल्लद बचावले. यु सेव्ह्ड मी. थँक्स!

आणि खरं सांगू का, तरीही माझी एवढी खबरबात घेत राहिलास, की ज्याचं नाव ते! काही असो, एवढी माती खाऊन झाल्यावरही तुला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं (माझ्या आयुष्याबद्दल नव्हे) होतं, त्याकरता तू केलेल्या उठाठेवी मला कळल्यावरही, मी तुला हाणणार नाही, या आत्मविश्वासाकरता तुला एक पुरस्कार द्यायलाच हवा. असो, नमनाला घडाभर तेल पुरे. तर तुला जाणूनच घ्यायचं होतं की असं काय नाही तुझ्यात ते तुझ्या लेखी काका वाटणाऱ्या शिरीषमध्ये आहे, म्हणून हे किलोमीटरभर लांबीचं पत्र.

माणसानं मोठं व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? नेमकं किती मोठं व्हायचं? कुणासाठी? मोठं होणं म्हणजे नेमकं काय? लॉलीपॉप खाणारी, सापशिडी खेळणारी मोठी माणसं बालिश असतात का? या प्रश्नांना आता तसा काहीच अर्थ नाही. असो, शिरीषबद्दल तुला वाटणारी असूया मी समजू शकते. पण मी तुला न निवडता त्याला निवडलं यामागचं कारण तुझं उगीच खूप मोठं होण्याची आस बाळगून छोट्याला कमी लेखणं हेही नाही. भरपूर वेगळं काही आहे. तसं तर मोठं होणं म्हणजे इतरांना छोटं समजणं नव्हेच. अर्थात हेही तुला बालिशच वाटणार असेल तर आता मी तुला म्हणेन, "ग्रो अप"

आणि आता तू इतकी असूया वाटून घेतलीच आहेस तर अजून थोडी वाटेलच तुला, तरी वाच. तुझ्या भाषेत शिरीष काकाटाईप आहे. तर आहेच; आय एम प्राऊड ऑफ हिम! तो दिसायला काही राजबिंडा, सिक्स-पॅक वगैरे असलेला नाही. त्याला थोडं टक्कल पडलंय. थोडं पोट सुटलंय. आणि वयाने माझ्यापेक्षा बा वी स वर्षांनी मोठा (बावीस हा इतका परफेक्ट आकडा काढण्यासाठी, माहिती गोळा करायला तू किती मेहनत घेतलीस, याची कल्पना आहे मला, तेव्हा कौतुक तुझं) इ. इ. But that doesn't really matter! कारण मनाने तो एकदम उत्फुल्ल आहे. Sounds cliche, I know; पण खरंच तो इतका मोठा झालेला आहे की प्रत्येकाच्या ग्रो होण्याच्या प्रेरणा, इच्छा, पद्धत, त्याचं आविष्करण वेगवेगळं असतं, हे तो समजून घेतो. लॉलीपॉप खाण्यावरून तो कुणाच्या मॅचुअरिटीचा अंदाज लावत नाही. आणि कितीतरी उत्साही, आयुष्याचा आनंद भरभरून घेणारा आणि दुःखांनाही तेवढ्याच तडफेनं सामोरा जाणारा आहे. 'मॅचुअर-माचो-मॅन' बनण्याच्या कुठल्याच शर्यतीत तो नाही आणि कसलंच 'परफॉर्मन्स प्रेशर'सुद्धा तो घेत नाही, हे किती बरंय! आम्ही पहिल्यांदा समुद्रावर गेलो तर मला बुढ्ढी के बाल खायचं होतं, म्हणून मी त्या दुकानात गेले तर तो म्हणाला, "हावरट, एकटीच खाणारेस का? माझ्यासाठी पण आण, किती तरी वर्ष झाली कॉटन कँडी खाऊन!"

एवढं पुरेसं आहे तुला.
खूप खूप मोठ्ठा हो. शुभेच्छा!

- शाल्मली

***

झरझर वाचून संपवलेलं पत्र संपदानं खाली ठेवलं. तिला आता शाल्मलीचा राग आला होता. म्हणजे या कारणामुळे तिचं अभिषेकसोबत जमलं नाही तर. पण हिने मला काहीच कसं सांगितलं नाही. आणि शिरीषबद्दल तर शंका होतीच, पण आता तर हे स्पष्टच झालं. संपदा स्वत:शीच बोलत होती. शाल्मलीचं अभिषेकसोबत जुळलं नाही याचं वाईट वाटून घ्यावं की तिचं आणि शिरीषचं काही तरी सुरू आहे, अशी शंका आपल्याला होती आणि ती खरी ठरली म्हणून विजयी वाटावं, की एकाच घरात राहूनही शाल्मली आपल्यापासून बरंच काही लपवते, म्हणून तिच्यावर चिडावं हेच संपदाला कळेना. तिचा नुसता त्रागा होत होता. लावावा का आत्ताच्या आता शालीला फोन, विचारावं का तिला याबद्दल, की तनुजाशी बोलावं... ती विचार करत होती.

जाऊ दे, तनुजाला नको लगेच सांगायला. आणि नाहीतरी हे तिचं पर्सनल मॅटर आहे, आपण पत्रही नकोच होतं वाचायला म्हणत, थोड्या अपराधभावनेनंच तिनं पत्राची होती तशी घडी केली आणि पुन्हा पत्र होतं तिथे ठेवण्यासाठी ड्रॉवर पुढे ओढला. त्याबरोबर आणखी एक कागद तिथं नीट घडी करून ठेवलेला तिला दिसला. वाचावं की नाही, करता करता शेवटी तिनं तो काढलाच.

शनिवारी सकाळीच शाल्मलीची आई सांगलीहून येणार म्हणून संपदा आणि तनुजाने लगबगीने घर आवरायला घेतलं होतं. शाल्मलीने सकाळ सकाळीच आई येतेय, असा बॉम्ब टाकून त्यांची पुरती पंचाईत केली होती आणि स्वत: इकडची काडी तिकडेही न करता बाहेर पडल्यामुळे या दोघी तिच्यावर चांगल्याच उखडल्या होत्या. इतस्ततः पडलेल्या बियरच्या रिकाम्या बाटल्या, सिगरेट्सची पाकिटं, सतराशे साठ लायटर्स, ॲश ट्रे, धुवायचे कपडे, व्हायब्रेटर्स सगळ्याची नीट विल्हेवाट लावायची होती. शाल्मली आणि तिच्या या दोन मैत्रिणी असा तिघींचा बाणेरमधल्या पारिजात सोसायटीच्या पाचशे दोनमधला संसार म्हणजे कुणाही बॅचलर्सना हेवा वाटावा असा होता. प्रशस्त थ्री बीएचके फ्लॅटमध्ये त्यांनी आपली दुनिया वसवली होती. मुळात हा फ्लॅट भाड्याने मिळणं हीच त्यांच्यासाठी एक लॉटरी होती. नाहीतर शेफारलेल्या बॅचलर्स मुलींना पुण्यात घर (हवं तसं) भाड्याने मिळणं हे युपीएससी पास होऊन हवी ती पोस्ट मिळवण्यापेक्षाही अवघड आहे. या घर शोधमोहिमेत अनेक कठीण प्रश्नांची उत्तरं त्यांनी सराईतपणे दिली होती. तिघींसाठी एवढा मोठा फ्लॅट कशाला; इतकं भाडं परवडेल का; इथपासून ते तुमच्याकडे मग पार्ट्याच होतील; पुरुष घरी येतील; पार जातीपासून कांदा-लसणीच्या पातीपर्यंत सगळ्या प्रश्नांची सराईत उत्तरं देऊनही घर मिळत नव्हतं, तेव्हा शहजाद शेखची त्यांच्यावर कृपा झाली. दुबईत मोठा कारोबार असणारे शेख आता कायमचे तिकडेच राहायला गेले आणि जाण्यापूर्वी तीन वर्षांच्या लीझवर या मुलींना घर देऊन गेले.

शाल्मली एका मीडिया सर्व्हिसेस कंपनीत कन्टेंट मॅनेजर होती. संपदा आयटीत नोकरी करणारी; आणि बीजे मेडिकल कॉलेजातून जस्ट पास आऊट झालेली तनुजा घराजवळच्याच सार्थक हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होती. आयटीत पाच वर्ष काम करूनही संपदाला तिथल्या कल्चरचं वारं अजून लागलं नव्हतं. तिला त्यांचे फ्रायडे नाईट्स, आऊटिंग्ज, हुकअप्स वगैरे गोष्टी झेपत नव्हत्या, खरं तर पटत नव्हत्या. त्यापेक्षा वीकेंडला घर आवरावं; हातात वाईनचा ग्लास घेऊन कुमार गंधर्व लावून निवांत बाल्कनीत बसावं - हा तिचा फंडा.

पण आजची शनिवारची सकाळ तिची अशी इतकी कामं करण्यात जाणार आहे, याची तिला कल्पना नव्हती. आज सुट्टी असूनही शाल्मली कसल्या तरी असाईनमेंटला गेल्याने तिचीही रुम संपदालाच आवरावी लागत होती. भिंतीवरच्या घड्याळाकडे एकवार बघून संपदाने ते दुसरं पत्र वाचायला घेतलं.

***

प्रिय बाबा,

मी तुला खूप मिस करते. तुला जाऊन दहा वर्षं झाली पण तुझी आठवण आली नाही, असा एकही दिवस गेला नाही. आय नो धिस इज क्लिशे, पण आहे असं. अशी अनेक पत्रं मी तुला लिहिली. कसल्या गमतीजमती होत्या त्यात. सगळ्या पत्रांमध्ये मी एकेक गुलाबाची पाकळीही खोचून ठेवलीय. तुला गुडबाय करताना सगळ्यांनी तुझ्या शरीरावर कसलेकसले हार, फुलं उधळली होती. तुला कसं आठवणार म्हणा. मृत्यू होतो म्हणजे आठवणी आणि जाणीवच संपते ना? तरीही मला तुला हे सांगायलाच हवं तुझ्यापर्यंत पोचणार असलं-नसलं तरी. त्या तेवढ्या सगळ्या गदारोळातही मी तुझा चेहरा गुलाबाच्या पाकळ्यांनी झाकला. एकेक पाकळी मिटलेल्या डोळ्यांवर, चेहऱ्यावर ठेव, पुन्हा काढ; पुन्हा ठेव; असं माझं चाललं होतं. डोळे मात्र कोरडेठाक! माणसं म्हणत होती, हिला वेड लागलंय. हिला रडवा! नंतर मला एक सुस्त बधीरपण येत गेलं आणि पुढचं काही ऐकू येणंच बंद झालं. नुसतीच चित्रं आणि हालचाली दिसत होत्या. काहीच ऐकू येत नव्हतं. एकदम म्यूट सगळं! आता तुला लोक उचलून जाळायला घेऊन जाणार होते. मला काय वाटलं कुणास ठाऊक. मी लगबगीने सगळ्या पाकळ्या हातात काढून घेतल्या. आता मोकळ्या झालेल्या तुझ्या चेहऱ्यावर कपाळावर, ओठ टेकवून धावत आतल्या खोलीत गेले. पाकळ्या माझ्या खणातल्या लाकडी डबीत ठेऊन दिल्या. खणातला सगळा पसारा बाहेर काढला. तिथल्या तू दिलेल्या वस्तू, गिफ्ट्स, खेळणी, पुस्तकं आणि काय काय बघून नुसतं गलबलून येत होतं. यथावकाश सगळं झालं. सगळी कर्मकांडं पार पडली. नि मला दर रविवारी आंघोळ करताना रडू यायला लागलं. एवढा मोठा केसांचा पसारा. हातात मावत नव्हता. आणि आता केस धुवून द्यायला तू पण नाहीस! या जाणीवेनंच बाथरूममध्येच स्वतःला दिवसभर कोंडून घ्यावं वाटायचं.
तुझी किती आठवण येते, कसं सांगू. तू म्हणशील, अरे सोंड्या, मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. आहेच खूप खूप. पण आज मला तुला काही वेगळं सांगायचंय.

मला तू फार फारच आवडतोस. अध्येमध्ये माझ्या स्वप्नातही येतोस. माझ्या या बर्थडेला तर स्वप्न पडलं की आपण डेटवर गेलोय. इतकं सुंदर स्वप्न होतं ते. तळ्यात पाय सोडून बसलो होतो आपण. मध्येच एखादी बदकांची जोडी दिसायची. कसली इरॉटीक वाटायची ती बदकं! ती बदकं आणि पाण्याकडे शांतपणे बघत बसलेला तू. हे चित्र बघून मला काही तरी झालं. मी पटकन तुला पुढे ओढून किस करणारच होते की. तेवढ्यात संपीनी भसाड्या आवाजात हाका मारल्या आणि स्वप्न तुटलं. पण तुझ्याकडे पाहतानाचा तो एक क्षण मनात रुतून बसलाय. काही तरी भारी होतं त्या क्षणात. अगम्य पण भारी. तो क्षण स्वप्नातला की सत्यातला हे मला अजूनही ठरवता येत नाही. पण पुढे अनेक दिवस मी त्या स्वप्नाचा आणि नंतरही पडलेल्या स्वप्नांचा अर्थ लावत बसले आणि एक दिवशी 'होय, बाबाबद्दल तुला आकर्षण वाटू लागलं होतं, असं माझं मन मला सांगू लागलं.

तरी हे पचवणं, स्वतशीच मान्य करणं कठीण होतं. शेअर तरी कुणाशी करायचं, भूकंपच झाला असता. एक दिवशी तर आणखी एक फनी स्वप्न पडलं. Ohh god! That was our honeymoon. You had brought so many roses. It was so beautiful as if you brought every color to my life.

मग आपण डोसा खायला गेलो. येताना रस्त्यावर सप्तपर्णीच्या फुलांचा वास भरून राहिला होता. आपण तिथेच बसलो. आणि मी तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून सूर्यास्त पाहिला. संधीप्रकाशात तसेच तिथे बसून होतो. आणि तेवढ्यात मला आईचा फोन आला नि पुन्हा एक छान स्वप्न तुटलं. दर वेळी अशी ही चांगली स्वप्नं मध्येच तुटणं, कुणाच्या तरी आवाजाने जाग येणं, हे आता मला प्रतीकच वाटू लागलंय माझ्या आयुष्याचं. असं खरोखरीच आयुष्यातही होतं, होणार आहे की चांगल्या स्वप्नाच्या पाठीमागे मी धावते, अल्लद एखादं फुलपाखरू हातावर येतंयसं वाटतं. फुलपाखरू हातावर येऊन क्षणभर बसतंही नि मग भुर्कन उडून जातं. इट्स लाईक हॅप्पी हेल. ब्रोकन ड्रीम्स.

जाऊ दे. फारच सिरीयस झालं हे. तू असतास तर हे ऐकून मिश्किल हसला असतास. आणि एक गंमत. तर या स्वप्नानंतर मला काय वाटलं माहित्ये? हे जर का आईला कळलं तर काय आपली धडगत नाही. तिला वाटलं असतं घर का भेदीच लंका ढाए. लाडाची लेकच वैरीण झाली असती. इ!!! लेकच आईची सवत बिवत ऐकून मलाच कसंसंच वाटतंय. साऊंड्स रिडीक्युलसली फनी राईट? आणि गंमत म्हणजे असली गोष्ट आजच्या क्लिकबेट जमान्यात मीडियाच्या हाती लागली तर काय काय केलं असतं लोकांनी. 'देवासमान वडिलांसोबत मुलीनं केलं 'हे' असं काय काय लिहिलंही असतं. न जाणो 'मातृदेवो भव', 'पितृदेवो भव'वाल्या लोकांनी किती ट्रोल केलं असतं. तरी बरं तू लवकर गेलास हे एका परीने चांगलंच झालं. नाही तर किती तरी नैतिक-अनैतिक पेच उभे राहिले असते. तू असतास तर मी तुला हे सांगितलं असतं का? की तुझ्या जाण्यामुळेच हे सांगणं मला सोपं झालं आहे? आणि सांगितलं असतं तर तू काय केलं असतंस? आईला कळतं तर तिला काय वाटलं असतं...ती काय म्हणाली असती? तिने माझा दुस्वास केला असता का? की मला मारलं असतं, घराबाहेर काढलं असतं, की वेड लागलंय म्हणून हॉस्पिटलात भरती केलं असतं? की हे सगळं अनैतिक आहे, असं समाजाला आणि पर्यायाने कुटुंबाला वाटतं म्हणून एक सत्य मीच माझ्या मनाच्या तळाशी खोलवर गाडून टाकलं असतं कायमचं? की मुलगी म्हणून मी तुम्हा सगळ्यांच्या मनातून उतरले असते. की मला आपल्या कुटुंबानं बेणारे बाईसारखं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून प्रॉसिक्यूट केलं असतं? न संपणारे प्रश्न. पण तू लवकर जाऊन हे सगळेच प्रश्न सोडवून टाकलेस. हे तसं बरंच झालं.

एक मात्र वाटतं की मी हे तुला सांगितलं असतं तर तू किमान शांतपणे ऐकून तरी घेतलं असतंस. म्हणूनच आता तरी हे सांगावं वाटलं.

आता झोपते. दमलेय खूप. कुठल्याही ननैतिक सत्याचा सामना स्वत:च्या पातळीवर करणंही तसं खूपच दमछाक करणारं असतं. एनीवे बाय. गुडनाईट. लव्ह!

तुझा,
सोंड्या.

***

पत्र संपलं तरी संपदाचा आ वासलेलाच होता.

"काय गं काय झालंय", तनुजाने आत येत विचारलं, तेव्हा ती भानावर आली.
"अं. काही नाही. काही तरी आठवलं. सम बॅड मेमरीज", ती म्हणाली. आणि तिनं पटकन दोन्ही पत्रं होती तशी घडी घालून आत टाकली, ड्रॉवर नीट लावला.
"माझं पण झालंय सगळं आवरून. मी खाली जाऊन जरा गाडी धुवून येते. मग आपण खाऊ. तू जरा गरम करून ठेव सगळं", म्हणत तनुजा खाली गेलीसुद्धा.
सगळं आवरल्यावर तनुजानं तिच्या बेडरूममध्ये अंग टाकलं आणि बघता बघता तिला गाढ झोप लागली.

संपदा शाल्मलीच्या बेडरुममधल्या तिच्या वस्तूंवर, पेंटिंग्जवर नजर टाकत विचार करायला लागली. शिरीषने शाल्मलीला गिफ्ट दिलेलं खजुराहोचं एक शिल्प ती कितीतरी वेळ हातात घेऊन पाहत होती. त्याचे वेगवेगळे अर्थ लावत होती. शाल्मली तिची प्रिय मैत्रीण होती, तरी ती 'अशी' असेल, याचा तिनं स्वप्नातही विचार केला नव्हता. शाल्मलीनं दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या 'माझे फ्रॉयडियन सोहळे' या कथेचा अर्थ तिला आता उलगडत होता.

"काय गं काय विचार करतेयस?" शाल्मलीच्या आवाजाने तिची तंद्रीच भंगली.
तशी ती भानावर आली.

"तू कधी आलीस?"
"ही काय आत्ताच. म्हणजे मी लॅच उघडून घरात आले. पाणी प्यायले. तरी तुला कळलंच नाही?" जाकीट काढता काढता शाल्मली म्हणाली.
तसे तिच्या मानेवरचे लव्हबाईट्स बघून संपदाने तिला विचारलं, "कसली असाईनमेंट होती आज शनिवारी?"
"होती एक." शाल्मली तिची नजर चुकवत टॉवेल घेत बाथरुममध्ये जात होती, तसं संपदाने तिला अडवलं.
"शाले, बस जरा. बोलायचंय तुझ्याशी."
"एवढं काय बोलायचंय, थांब मी शॉवर घेऊन येते, मग बोलू."
"नाही, आताच बोलायचंय, बस इथे."
"काय झालं संपे?"
"तू शिरीषला भेटायला गेली होतीस ना?"
"नाही, माझं काम होतं." पुन्हा नजर चुकवत शाल्मली हातातल्या टॉवेलशी चुळबूळ करत होती.
"दिसतंय ते मानेवर."
'शिट् यार!' शाल्मली मनातल्या मनात स्वत:वर वैतागली.
"हो, गेले होते भेटायला. मग काय झालं?"
"मग इतकं खोटं का बोललीस? म्हणजे मला डाऊट होताच. पण तू नेहमीच उडवाउडवी केलीस."
"मला नव्हतं वाटत सांगावंसं."
"आपण एका घरात राहतो शाले, तू सख्ख्या मैत्रिणी म्हणतेस आम्हाला. तरी.. "
"एक मिनीट! ह्याचा आपल्या मैत्रीशी काय संबंध आहे? आणि एका घरात राहतो म्हणजे काय? आपण काय नवरा-बायको आहोत का? माझी पर्सनल स्पेस मला नको का?"
"शाले, शांत हो. तुझ्या पर्सनल स्पेसमध्ये मला ढवळाढवळ करायची नाही. पण तुझी काळजी वाटते म्हणून बोलतेय. मागे तुझ्या ऑफिसमधले लोक घरी आले होते जेवायला, तेव्हा तुझ्याबद्दल काय काय बोलत होते, माहितीये? तु शुद्धीत कुठे होतीस म्हणा!"
"काय बोलले ते?"
"हेच की शिरीष इज हर शुगर डॅडी. त्यांनी तुझ्या प्रमोशनबद्दल मस्करीपण केली. नाही, मी ते सगळं लाईटलीच घेतलं पण त्यांना काय म्हणायचंय हे मला आता लक्षात येतंय."
"आता लक्षात येतंय म्हणजे? ओ गॉड! आता प्लीज माझी आई बनू नकोस. मॉरल लेक्चर नकोय मला. आणि लोक काहीही बोलतात, मला प्रमोशन का मिळालंय, हे तुला चांगलंच माहितीये. एनीवे मला स्पष्टीकरणं द्यायचा कंटाळा आलाय."
"असं म्हणून तू नेहमीच हा मुद्दा टाळतेस. किती काळ तू अशी पळणारेस यापासून?"
"म्हणजे काय?" शाल्मली आता सावरून वादाच्या पवित्र्यातच बसली.
"म्हणजे, तू अभिषेकसारखा लाखात एक मुलगा घालवलास हातनं आणि हे काय पळत्याच्या पाठीमागे. बरं बघून बघायचा तर आपल्या वयाचा एखादा सिंगल बॉयफ्रेंड बघायचास ना? शिरीषबरोबरच्या तुझ्या नात्याला काय फ्युचर आहे? त्याचं लग्न झालंय, त्याची मुलगी ऑलमोस्ट आपल्या वयाची आहे."
"इज इट? थँक्स फॉर अपडेट्स हं!"
"असं कुजकटपणे बोलून प्रश्न सुटणार नाही."
"ओ गॉड! कसला प्रश्न? मला कसलाही प्रश्न पडलेला नाही, मी कसलीही उत्तरं शोधत नाहीये."
"शाले, कधी गं तू स्वतच्या आयुष्याचा सिरीयसली विचार करणार."
"अहं. सगळी गंमतच तर आहे. आयुष्यभर चालणारे."
"पुन्हा तू वाकड्यात शिरत्येस. अगं, पुरुषांचं काय, त्यांना असलं सगळं गोडच वाटतं. शिरीषची पाचही बोटं तुपात आहेत. त्याचं कुटुंबही छान सुरळीत आणि तूही आहेसच. पण आपल्या बापाच्या वयाचा आहे तो, याचा तरी विचार कर,अगं."

"तू काय घेतलीएस का थोडी?" शाल्मली वैतागत म्हणाली.
"आय नो, तू आता हे सगळं पुन्हा बरळणार. आमचं प्रेम आहे वगैरे म्हणणार. पण हे असं किती दिवस चालणार. तुला आयुष्यात सेटल बिटल व्हायचं नाहीये का? या नात्याला काय अर्थ आहे?"
"संपे, हे सगळं जरा ओवरसिम्पलिफाईड, आणि अतिच जजमेंटल होतंय, असं नाही वाटत तुला?"
"नाही... कारण मला तुझी काळजी वाटते. तुझ्या आयुष्यात स्थैर्य असावं, असं वाटतं."
"म्हणजे काय करायचं. सगळे समाजमान्य बॉक्सेस टीक होतील, अशा पुरुषाशी लग्न करायचं. एका खुंट्याला बांधून घ्यायचं. असंच ना?"
"नाही तर काय, तू बापाच्या वयाच्या माणसांशीच अफेअर्स करत बसणारेस का?"

शाल्मली तिरमिरीत उठली आणि समोरची रमची बाटली तशीच तोंडाला लावत म्हणाली, "इनफ इज इनफ. मला शिरीष आवडतो. आमचं, आम्हांला कसलाही गिल्ट वाटत नाही, असं नातं छान सुरू आहे. विषय संपला."

शाल्मलीचा चढलेला आवाज ऐकून आता तनुजाही डोळे चोळत तिच्या रुममध्ये आली. "अरे यार, काय लावलंय तुम्ही? काय बोलताय? झोपेचा सगळा भोसडा केलात माझ्या."
"सॉरी. तू झोप जा, शाल्मली म्हणाली."

तसं संपदाने तनुजालाही थांबवलं.
"आता काय इथे मॉरल कोर्ट भरवायचंय का तुला संपे? जाऊ दे ना तिला."
शाल्मलीने बाल्कनीचा दरवाजा पूर्ण उघडला आणि सिगरेट पेटवली.
"तने तूच सांग आता हिला बाई. मी सांगून दमले. हिचं शिरीष प्रकरण काय थांबतच नाहीये. एक तर तो मॅरिड आहे. त्यात त्याला आपल्या वयाची एक मुलगी आहे, याचा तरी विचार करावा की नाही हिने. उद्या त्याच्या बायकोला हे कळलं तर केवढ्याला पडेल. आणि तू त्याच्या बायकोची फसवणूक करतेयस, असं तुला जराही वाटत नाही?"

"मी कसली फसवणूक केली? बायकोशी कमिटमेंट शिरीषची आहे. ती शिरीषची बायको आहे, माझी नाही. मी तिला कशालाही बांधील नाही. त्या दोघांनी त्यांच्या नात्याचं काय करावं, हा त्यांचा प्रश्नय. तू मला विनाकारण गिल्ट ट्रिपवर पाठवू नकोस."

"अरे ए. थांबा दोघी. शांत व्हा. शाल्मली, आय नो धिस इज युअर वेरी पर्सनल मॅटर, नन ऑफ आर बिझनेस. पण संपी काय म्हणतेय त्याचा एकदा तरी शांतपणे विचार कर. फक्त ती सांगतीये म्हणून तू तुझ्या आयुष्यातले निर्णय बदलावेस, अशी आमची अपेक्षा नाही. जस्ट गिव इट अ थॉट एट लिस्ट. मला तिचं म्हणणं थोडंसं पटतं." तनुजाने समजुतीचा सूर आळवत मामला थंड करायचा प्रयत्न केला.

"हे बघ शाले, तुझा काही इश्यू आहे का? तू बिंधास्त बोल. आपण चांगल्या सायकॉलिजस्टकडे, सेक्सॉलॉजिस्टकडे जाऊ. पण यातून काही तरी मार्ग काढू."

"मला वेडही लागलेलं नाही आणि गुप्तरोगही झालेला नाही आणि कोणतीही लैंगिक समस्या नाही. माय सेक्शुअल लाईफ इज सुपर फाईन."

"अगं तसं नाही गं. पण हे असं वडलांबद्दल. मोठ्या वयाच्या माणसांबद्दल...", संपदा चाचरत म्हणाली.
"व्हॉट. बाबाबद्दल तुला कसं कळलं?" शाल्मली ओरडलीच.
"घर आवरताना तुझ्या खणात पत्र सापडलं. आय एम सॉरी. नको होतं वाचायला. पण इमॅजिन असं काही काकूंच्या हाती लागलं असतं तर केवढ्याला पडलं असतं. म्हणून मी फक्त सगळं व्यवस्थित पाहून नीट ठेवत होते."
"हद्द झाली यार संपे. काही तरी माझं माझं नुसतं माझ्यापाशी राहू दे ना. का सगळ्यांना उत्तरं द्यायची मी. आणि लेक्चर ऐकून घ्यायचं." शाल्मलीचा सूर आता रडवेला झाला होता.

"अगं आम्हाला तुला दुखवायचं नाहीये, तुझं नुकसान होऊ नये अशीच इच्छा आहे आमची. पण तू ही अशी तर्हेवाईक वागतेस. जरा शांतपणे विचार करूया ना याचा. मला वाटतं तू टीनेजमध्ये पाहिलेला सगळ्यात भारी, तुझ्यासाठी आयडियल असलेला पुरुष तुझे बाबा असतील आणि नेमकं ज्या वयात तुला त्यांची जास्त गरज होती, त्या वयात ते सोडून गेल्याने सगळ्या पुरुषांमध्ये तू बाबांना शोधत असशील, नकळतपणे. म्हणून तुला वयाने मोठं असलेल्या पुरुषांबरोबर आश्वस्त वाटत असेल."

"अरे यार कुठून कुठे चाललाय तुम्ही. एवढा कीस पाडावा या विषयाचा, असं खरंच काही नाहीये. मला जगू द्या. कशावरून हे निष्कर्ष काढताय तुम्ही. मी खूष आहे माझ्या आयुष्यात, माझ्या निर्णयांमुळे. मी तक्रार घेऊन आलेय का तुमच्याकडे. मग तुम्ही का एवढं सुओ मोटो कॉग्निजन्स घेऊन मॉरल कोर्ट भरवलंय. तुम्हाला तुमचं लाईफ नाहीये का?"

"सी शाल्मली, आय नो आम्ही जे बोलतोय ते तुला पटत नाहीये, तुझं त्यावर वेगळं म्हणणं आहे. बट धिस इज जस्ट नॉट अ पर्सनल इश्यू. आपला समाज कसा आहे, हे काय तुला वेगळं सांगायला नको. अँड धिस इनवॉल्व्ज लॉट ऑफ आदर पीपल टू. बोलू आपण सावकाश यावर. तू इथे जरा शांत बस. तुला बरं वाटेल." तनुजाने पाण्याचा ग्लास तिच्यापुढे धरला."

"तरी बरं मागे त्या 'नवोन्मेष' दिवाळी अंकाने हिची कथा छापली नाही, नाही तर काय राडा झाला असता. काय काय लिहिलंयस तू त्यात. वडलांसोबतच्या फँटसीज. टायटल पण काय. 'माझे फ्रॉयडियन सोहळे' शीर्षक बघूनच हे असलं कोणीही छापणार नाही, असं वाटलेलं मला. पण तुला भारी विश्वास त्यांच्या लेखनाबद्दलच्या भूमिकेवर. आणि काकूही आहेत तुझ्या फ्रेंडलिस्टमध्ये. त्या वाचतात ना तुझं सगळं. त्यांना काय वाटलं असतं ते वाचून?"

"अगं ते फिक्शन आहे गं राणी."
"पण तूच नेहमी म्हणतेस ना. जे एरवी म्हणता येत नाही, ते फिक्शनमध्ये म्हणता येतं म्हणून मी कथा लिहिते."
"येस. थँक्स फॉर रिमाईंडिंग."

शाल्मली तरातरा बाहेर गेली. हॉलमध्ये पडलेला लॅपटॉप घेऊन आली. टेबलावरच्या ग्लासातलं पाणी घटाघटा प्यायली. संपदा आणि तनुजा तिच्याकडे नुसत्याच पाहत होत्या. शाल्मलीने तिच्या इमेलमधून 'नवोन्मेष' दिवाळी अंकाला पाठवलेली - 'साभार परत' आलेली कथा काढली. 'माझे फ्रॉयडियन सोहळे' स्वत:ला बेहद्द आवडलेल्या या शीर्षकाकडे पाहून ती प्रसन्न छद्मीपणे हसली. तो मजकूर तिने कॉपी करून स्वतःच्या फेसबुकवर wallवर पेस्ट केला. दोन-तीन वेळा त्याकडे पाहिलं. आणि 'पोस्ट' म्हणणार एवढ्यात ती थांबली. दोन-पाच सेकंद विचार केला आणि शीर्षकाखाली लिहिलेलं 'सिल्व्हिया' हे आपलं टोपणनाव खोडून शाल्मली काळे असं दणक्यात टाईप केलं. 'नाऊ इट इज बँग ऑन', असं म्हणत पोस्ट करणार इतक्यात पुन्हा थांबली. कथेच्या सुरुवातीला तिनं सिल्व्हिया प्लाथच्या काही ओळी वापरल्या होत्या. आता तिला वाटलं, हे तर स्वतःबद्दलचंच डिस्क्लेमर, याची काय गरज? म्हणत तिने त्या ओळी खोडल्या आणि कथा पोस्ट केली. त्या ओळी होत्या -

I am silver and exact. I have no preconceptions.
Whatever I see I swallow immediately
Just as it is, unmisted by love or dislike.
I am not cruel, only truthful

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

डू आय रियली नीड टू नो ऑल ऑफ धिस?

ओमाज आणि विडंबन यांच्या सीमारेषेवरचं लिखाण आहे. उत्तम जमलं आहे. उद्देश तसा होता का ते ठाऊक नाही, पण त्याने (मला) फरक पडत नाही.

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

फारच आवडली.
फक्त सुरुवातीला पात्रांच्या नावांचा थोडा गोंधळ झाला वाचताना. पण नंतर पकड घेतली.

वयानुसार कथा आवडायला हरकत नाही.
पात्रांची ओळख नाटकाच्या सुरवातीला दिलेली असते तशी हवी. कोण कोणाचा कोण आणि वय.

कथा विशेष आवडली.

ज्या पिढीच्या व्यक्तिरेखा यात आलेल्या आहेत त्या पिढीच्या लोकांना कथेमधल्या पात्रांची विचारपद्धती, त्यांच्या जगण्यातल्या निवडी यांत बरंच स्वारस्य वाटू शकेल. मुद्दा प्रमुख व्यक्तिरेखेने नक्की काय निवडी केलेल्या आहेत यापेक्षा मला विशेष वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे, आज ज्या व्यक्ती उमेदीच्या काळातल्या आहेत त्यांचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे, एखादी व्यक्तीच्या संवेदनांचं आतलं जग कसं असेल याचं दर्शन कथेतून होतं आहे. सिंगल पुरुषांच्या जगाचं चित्रण ६० च्या दशकापासून मराठीमधे रुळलेलं आहे. त्यामानाने, सिंगल मुलींच्या विश्वाचं जवळून दर्शन ही क्वचित घडणारी घटना वाटते.

लिखाणाचा बाज, त्यातली समज, मुख्य पात्राची स्वगतं (यालाच संज्ञाप्रवाही शैली म्हणतात काय?) यामधे प्रगल्भता आहे.

अशा अन-अपोलोजेटीक, खऱ्या लिखाणाचं स्वागत आहे.

सिल्व्हिया प्लाथचा कथेतला वापर रोचक आहे. "डॅडी इशूज" चितारणारी प्लाथची एक कविता सुप्रसिद्ध मानली जाते. तिचं शीर्षकच "डॅडी" असं आहे. ती इथे देतो. कवितेचा दुवा : https://www.poetryfoundation.org/poems/48999/daddy-56d22aafa45b2

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कथा आवडली. कथा वाचून एकदम 'कल्चरल शॉक ' बसण्याच्या वयाचा असलो तरीही नाही बसला. यांतच कथेचं यश आहे, असं (आपलं मला) वाटतं.

फार निसरडा विषय अगदी अलवार हाताळलाय.
ब्राव्हो!