जी-८ रहस्यकथा (मीर बहादुर अली) : एक धावती ओळख
- धनंजय
मीर बहादुर अली यांची "जी-८ रहस्यकथा" दुहेरी विधा (genre) लेखनाचे उदाहरण आहे. एक विधा आहे पत्रव्यवहार (epistolary) कथा, दुसरी विधा आहे रहस्यकथा (mystery). आजच्या काळात वैयक्तिक कागदोपत्री पत्रव्यवहार नाहीसा झालेला आहे. त्यामुळे कादंबरीचे प्रकरण व्हावे असे मोठाले विवरणात्मक पत्र आजकाल कोणी लिहीत-वाचत नाही. परंतु आजही बराचसा वैयक्तिक संवाद लेखीच असतो. जवळच्या मित्रांमध्येसुद्धा आमोरासमोर भेटीगाठी-फोनसंवाद कमी, मेसेजिंग-चॅट अधिक होतात. त्यामुळे खऱ्याखुऱ्या आयुष्यात बित्तंबातमीची देवघेव लेखी संवादातून झाली असेल, यावर आपण सहज विश्वास ठेवू शकतो. मेसेजिंग त्रोटक असते, तशा तुटपुंज्या आलेखातून वाचकापर्यंत कथानकाचे सूत्र पोचवणे कठिण आहे. अधूनमधून एखाद्या लांब कार्यालयीन रिपोर्टवजा ईमेलने स्थल-काल-परिस्थितीचे वर्णन करण्याची लेखकाची युक्ती डोकेबाज आहे.
रहस्याचा गौप्यस्फोट न करता कथावस्तू अशी आहे : २०२० सालाच्या सुरुवातीला पुण्यातील भाषाशास्त्राचा एक प्राध्यापक एका परिषदेकरिता अमेरिकेला जातो. सोय म्हणून बॉल्टिमोर येथील आपली डॉक्टर बहीण आणि पशुवैद्य मेहुण्याच्या घरी त्याचा मुक्काम असतो. कोव्हिड-१९ साथीच्या सुरुवातीला विमानसेवा तडकाफडकी बंद झाल्यामुळे तो तिथेच काही काळासाठी अडकतो. त्याने आपल्या भारतातील मित्राला लिहिलेल्या मेसेजेसमधून वाचकाला कथा समजते. मेहुण्याच्या अश्ववैद्यकाच्या प्रॅक्टिसच्या संदर्भात एक अनाकलनीय घटना -- एक अजब अफरातफर घडते. रेसच्या घोड्यांचे प्रजनन नरमादीच्या प्रत्यक्ष शरीरसंबंधानेच घडले पाहिजे, या नियमाला अमेरिकन जॉकी क्लबने कोव्हिड-१९ इमर्जन्सीकरिता अपवादात्मक सूट दिलेली असते. ___च्या अमीराच्या घोड्याच्या पागा मेरीलँड राज्यात असतात, तिथला नर (GeeAteExpectaction, "G-8") अनेक कर्मचाऱ्यांसह दूर केंटकीला नेण्याऐवजी कृत्रिम वीर्यसेचनाची (artificial inseminationची) अनुमती दिलेली असते. मात्र काही महिन्यांनी त्या वीर्यातून फलन झालेले शिंगरू जन्मल्यावर हा धक्कादायक शोध लागतो की ते अमीराच्या मेरीलँडमधल्या घोड्याचे जनुकीय अपत्य नसतेच! तोतया वीर्यदाता घोडा, वीर्याच्या ट्यूबची अदलाबदल, मादी व शिंगराच्या मालकाकडून खोटेपणा, वगैरे, अशा अनेक सबळ शक्यतांचा पाठपुरावा उत्कंठावर्धक, तरी निष्फळ ठरतो. तरी भाऊ-बहीण-मेहुणा परस्परपूरक ज्ञान एकत्र आणून शेवटी कोडे सोडवतात. (शेवटी कोडे सुटते, असे इतके मोघम सांगणे हे स्पॉयलर नाही.)
कथानकातले काही तपशील अपरिहार्यपणे कोव्हिड-१९ साथीशी गुंतलेले आहेत. तरी ही कोव्हिड-कथा आहे, असे म्हणणे वावगे ठरेल. रेसच्या घोड्यांच्या प्रजननाचे बाजारशास्त्र आणि जनुकशास्त्र या दोहोंची तत्त्वे कथेतल्या गुन्ह्याच्या आणि तपासाच्या मुळाशी आहेत -- आणि सध्याच्या ज्ञानानुसार घोड्यांना कोव्हिड-१९ रोगाची लागण होत नाही! त्यामुळे कोव्हिड-१९चे आज जळजळीत वाटणारे संदर्भ उद्या जेव्हा शिळे होतील, तेव्हाही रहस्यकथा म्हणून ही स्वतंत्रपणे टिकू शकेल.
दुहेरी विधा या कथेचे बलस्थान आहे, की लेखकाने बळेच अंगावर घेतलेले ओझे आहे? याबाबत मी अजून हो-की-नाही यांच्यात झुलतो आहे. भारतातला मित्र गुन्ह्यात किंवा उकलीत भाग घेत नाही – पत्रव्यवहारतला भागीदार म्हणून भाव खाणारे पात्र रहस्याच्या कथानकाचे कितपत पोषण करते? असा प्रश्न मला आधी पडला. तरी या मित्राशी स्वतंत्र संवाद केल्यामुळे निवेदकाचे पात्र खुलते; मित्राच्या पात्राचे हे मोठे मूल्य मान्य केलेच पाहिजे.
पत्रव्यवहारात केवळ उल्लेखाने अवतरणारी, रहस्यकथेकरिता प्रमुख असणारी बहीण-मेहुण्याची पात्रे द्विमिती (flat 2-dimensional) उतरतात का? असा प्रश्न एखाद्या वाचकाला पडेल. पण असा प्रश्न अस्थानी आहे. रहस्यकथेच्या विधेमध्ये डिटेक्टिव्हला थोडीच पण ठळक स्वभाववैशिष्ट्ये असतात, हा पायंडा शेरलॉक होम्सच्या आधीही, एडगर ॲलन पो याच्या कथांपासून आजतागायत अबाधित आहे.
तरीसुद्धा या कथेने रहस्यकथा विधेचा साचा काही प्रमाणात मोडला आहेच. आर्थर कोनन-डॉयलचे शेरलॉक-वॉटसन म्हणा, आगाथा क्रिस्तीचे प्वारो-हेस्टिंग्ज म्हणा –- एकाची चतुराई उजळण्यासाठी दुसरा मठ्ठ असतो. पण या कथेत भाऊ-बहीण-मेहुणा तिघेही हुशार आहेत. वेगवेगळ्या विषयांत तज्ज्ञ असल्यामुळे एकमेकांना पूरक आहेत.
या त्रिकुटाच्या आणखी रहस्यकथा वाचायची माझी इच्छा आहे. पण कोव्हिड-१९ लॉकडाऊनचे निमित्त नसल्यास तिघांना एकत्र आणण्यासाठी लेखक काय सबब वापरेल, त्याबाबत कुतूहल वाटते.
***
ता. क. : या कृतीत काही प्रतिसादांचे धागे सुद्धा समाविष्ट आहेत. या धाग्यातील पूर्वनियोजित संदेश आता रंगीत पार्श्वभूमी वापरून वेगळे दाखवलेले आहेत. पूर्वनियोजित संभाषणे करणारी पात्रे या कृतीचा भाग आहेत. संपादन आणि तांत्रिक साहाय्याकरिता ऐसीअक्षरे व्यवस्थापनाचे आणि सदस्य नंदन यांचे आभार.