चंगळवाद : त्यात दडलेले सौंदर्य आणि राजकारण
चंगळवाद : त्यात दडलेले सौंदर्य आणि राजकारण
- मूळ लेखक - आशिष नंदी
- भाषांतर - उज्ज्वला
मूळ लेख २००५ साली प्रसिद्ध झालेल्या The Future of Knowledge and Culture; A Twenty-First Century Dictionary या विनय लाल व आशिष नंदी यांनी संपादित केलेल्या पुस्तकात आहे. येथे लेखकाने त्यात किंचित भर घातली आहे.
[Consumerism या शब्दाला मराठीत एकच एक शब्द वापरून चालणार नाही. गरज असो नसो, खायला, प्यायला, ल्यायला विकत घ्या ही वृत्ती अधोरेखित करण्यासाठी चंगळवाद हा शब्द रूढ आहे. मात्र चंगळ ही उपभोगाची वरची पायरी असते. जिथे असा अतिरेक अभिप्रेत नाही, अशा ठिकाणी उपभोग, उपभोगवाद हे शब्द घातले आहेत. ग्राहक हा खरेदीदार या अर्थाने येतो, तसा येथे अभिप्रेत नसल्याने consumerसाठी उपभोगवादी, चंगळवादी हे शब्द वापरले आहेत.]
चंगळवाद हा काही माणसाची पहिली निवड नसते. ती प्राथमिक गरजदेखील नाही. चंगळवाद हा मनुष्यस्वभाव आहे, अमर्याद चंगळवादी वृत्तीअभावी आपण तग धरू शकणार नाही असा कणभरही पुरावा समकालीन मानसशास्त्र, मानव्यशास्त्र किंवा नीतीशास्त्र या कशातही आढळत नाही. मुक्त बाजारपेठ संकल्पनेची तळी उचलून धरणाऱ्यांनीदेखील विकासाच्या नावाखाली चालणाऱ्या श्रीमंती चोचल्यांशी मानवी आनंदाची सांगड घालण्याचे धाडस केलेले नाही. जगभर अतिचंगळवादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहुतेक साऱ्या पाश्चिमात्य देशांतही सढळ उपभोगाची परंपरा विसाव्या शतकाच्या पूर्वी नव्हती, किंबहुना १९४०च्या दशकापर्यंतदेखील नव्हती.
उपभोग हे मूल्य व चंगळवादी जीवनशैली केवळ पाच दशकांपूर्वी पसरू लागली. तत्पूर्वी तिची संभावना केवळ उधळपट्टी करणारे राजेरजवाडे व काही धनिकवनिक बाळे यांचा दुर्गुण अशी होई; आता ती सामाजिक दर्जाप्राप्तीची खूण म्हणून त्यायोगे दैनंदिन जीवनाचे मर्म बनली. लोकांच्या मनात पौर्वात्य राजेरजवाड्यांच्या अमर्याद चंगळीचा कल्पनाविलास जसा रंगे तशा आता समकालीन श्रीमंतांच्या ऐषोआरामाच्या सुरस कहाण्या वृत्तपत्रे, मासिके व दूरचित्रवाणीच्या माधयमातून कौतुकाने चघळल्या जाऊ लागल्या. पूर्वी अमीर उमराव उधळपट्टी करत तेव्हा त्याची वाच्यता करत नसत, कारण ते त्यांच्या इभ्रतीला शोभणारे नसे. केवळ नवश्रीमंत आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करीत. आता मात्र सढळ उपभोग हे सामाजिक प्रतिष्ठेचे, यशाचे आणि सामाजिक कमतरता व वैयक्तिक न्यूनगंडावरील अक्सीर इलाजाचे गमक बनले.
इतर कोणत्याही देशापेक्षा अमेरिका हा देश चंगळवादाशी घट्ट जोडला गेला आहे; खरे तर चंगळवादाचे कट्टर विरोधकही त्याच देशात आहेत. या द्वैताचे कारण कदाचित अमेरिकेत सर्वाधिक प्रमाणात चंगळवादाला पद्धतशीरपणे गरज ठरवून त्याला संस्थात्मक स्वरूप दिलेले आढळते. हाँगकाँग व सिंगापूरसारखी काही शहर-राज्ये तसेच काही छोटी दुबईसारखी शहर-राज्ये म्हणवणारी संस्थाने यांनीही चंगळवादी समाजांच्या माळेत स्वतःला प्रस्थापित केले आहे. या समाजांमध्ये चंगळवाद हेच साध्य आहे एवढेच नाही, तर बाहेरून पाहणाऱ्याला सर्व देशच एक अवाढव्य सुपर मार्केट वाटते. आणि त्या देशातील राजकीय अर्थव्यवस्था, कदाचित सारे आयुष्यच, चंगळवादाभोवती उभारलेले असते. मात्र, अशा शहर-राज्यांचा जगावरील सार्वत्रिक सांस्कृतिक प्रभाव अमेरिकन प्रभावापुढे अगदीच किरकोळ आहे.
अमेरिका हा देश प्रामुख्याने स्थलांतरितांचा असल्याने, विस्थापित आणि संस्कृतीबाहेर फेकले गेलेल्यांच्या मानसिक गरजेतून तेथे चंगळवादाला संस्थात्मक अधिष्ठान मिळाले असावे. गेली दोनशे वर्षे घडत असलेल्या सांस्कृतिक अभिसरणाची चंगळवादाचे संस्थात्मक अधिष्ठान ही केवळ आनुषंगिक दुय्यम परिणती होय. उपभोगवादाला चिंतातुरतेची किनार असते, विशेषतः विस्थापित, एकट्या आणि कळपसंस्कृतीचा भाग असलेल्या लोकांच्या बाबतीत हे विशेषत्वाने खरे असते.
या विस्थापितांच्या संस्कृतीतून अमेरिकेला सगळ्यांचाच दुसरा देश असा दर्जा प्राप्त झाला आहे. महायुद्धपूर्व काळी युरोपिअनांचे दुसरे शहर असा पॅरिसचा लौकिक होता असे म्हणतात. ब्रिटिश आणि फ्रेंच वसाहतीतील अनेकांसाठी पॅरिस, आणि अधिक मोठ्या प्रमाणात लंडन या शहरांना असा दर्जा होता. आज मात्र फक्त अमेरिका या देशालाच असा मान आहे. अमेरिकी बाजारपेठ अवाढव्य आहे – त्यात नवीन श्रद्धा, विचारसरणी, पंथ यांना मानणारी वा त्यांपासून फारकत घेणाऱ्यांचीही एक बाजारपेठ आहे. अमेरिका म्हणजे उपभोक्त्यांसाठी नंदनवनच आहे. अगदी विरोधी मतालाही इतर कुठेही नसेल इतकी मागणी तिथे असते. त्याचेही अधाशासारखे आणि सर्वदूर सेवन होते. ह्या उपभोगवृत्तीवरील टीकेचादेखील आस्वाद घेतला जाऊ शकतो.
***
१९४०च्या दशकात एरिक फ्रॉम यांनी वस्तूंपेक्षा व्यक्तिगत कौशल्ये विकणाऱ्यांचे वर्णन करण्यासाठी विपणन कल (मार्केटिंग ओरिएंटेशन) असा शब्द प्रयोग केला. त्यांनी कल्पनाही केली नव्हती की एक दिवस अशाही व्यक्ती असतील, ज्यांना उपभोगासाठी उपभोग घेणे हे साहजिक वाटेल. उपभोग कल हे आता उच्च जीवनशैलीचे प्रतीक बनले आहे. हल्ली जगात केवळ आपल्या चंगळवादी वर्तनामुळे प्रसिद्ध माणसे व गट आढळतात. आजच्या अतिरेकी चंगळवाद्यांपुढे दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळातील सर्वांत अधाशी श्रीमंतही खजील होतील.
सहसा उपभोगवादाचे समर्थन करताना विक्री-पंडित सांगतात की त्यामुळे गरीब लोक त्यांना जगण्यासाठी आवश्यक वस्तू अधिक प्रमाणात घेतील. किंवा मग त्यांचा दुसरा मुद्दा तंत्रज्ञानाची झेप नाहीतर उपभोगाचे प्रमाण वाढल्याने होणारे अर्थव्यवस्थेचे उन्नयन, विकासाचे इंजिनच जणू. मात्र आता हे पुरते स्पष्ट झाले आहे की ज्या प्रकारचा उपभोग त्यांना अपेक्षित असतो – किंवा ज्यात त्यांना सुरक्षित वाटते – त्याचा व कसल्याही दिव्य सामाजिक दृष्टीचा काही संबंध नसतो. एकदा रुळली की चंगळवादी संस्कृती ही फोफावत जाते. अतिचंगळवादी श्रीमंतांच्या बाबतीत घडले आहे त्याप्रमाणे तेच साध्य बनते. विकास विषयातल्या तज्ज्ञांना हे नवीन नाही. उपभोगातून उपभोगवादी विकास व तंत्र विकसित होणार याची त्यांना अपेक्षा असते. त्यांचा आर्थिक तर्क चुकीचा आहे असे मला म्हणायचे नाही. माझा मुद्दा हा आहे की त्यांचे उपभोगवादाचे समर्थन संपूर्ण उपभोग-चंगळवादाच्या केवळ एका छोट्या भागाचेच असते.
हा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आपल्याला हे कबूल करावं लागेल की उपभोगवाद हे मूल्य ठरण्यासाठी माणसांना वेगळ्या प्रकारे घडवावे लागते. त्याची पहिली पायरी म्हणजे व्यक्तींना त्यांच्या समाज, परंपरा, कुटुंब यापासून वेगळे काढणे. त्याऐवजी एखादी मोठी, अनामिक, राष्ट्र नावाची समष्टी द्यायची, परंपरा नावाची अधिक नियमनयोग्य अशी सांस्कृतिक कलाकृती (नाट्यगृह, कलादालन, वर्ग किंवा प्रवाशांचे विश्रामगृह अशा ठिकाणी घेता येणारा सांस्कृतिक उपभोग) पुढे करायची, आणि छोटे, जोडपेकेंद्रित कुटुंब द्यायचे – ज्यात लुडबुड करणारे ज्येष्ठ आणि जबाबदारीचे ओझे अशी बालके यांना कधीकधी पत्करावे लागते, मात्र त्यांचा दर्जा दुय्यम आणि जोडप्याचा एकोपा शरीरसुखाच्या उपभोग्यतेशी जोडलेला.
उपभोगवादाला विचारसरणीचा पाया बहाल करणे ओघानेच आले. मालकीहक्काबाबत सजग असलेल्या व्यक्ती या अनेक युरोपीय अभ्यासकांच्या मते आधुनिक उदार भांडवलशाहीचा पाया आहेत. त्यांना आता उपभोगवादी व्यक्ती असा मुलामा चढला.
मग मालकीचा अधिकार हा उपभोगाचा अधिकार होतो. आणि अशा या उपभोगवादी व्यक्तीचे स्वातंत्र्य जाहीर करावे लागते. अशा तऱ्हेने व्यक्तीने केलेल्या उपभोगाच्या कृती या राष्ट्राच्या पातळीवर मान्यता पावलेल्या व्यक्तीस्वातंत्र्य, व्यक्तीचा हक्क अशा मूल्यव्यवस्थेचा भाग होते. काही सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांच्या मते उत्पादनांच्या प्रमाणीभूत व्यवस्था आता उपभोगाच्याही प्रमाणीभूत चौकटी आखत आहे कारण तरच त्यातून व्यवहार्य उलाढाल साध्य होते.
बहुतेक साऱ्या देशांतील लोकशाहीच्या रूढ कल्पना अधिक बारकाईने पाहिल्यास हा (उपभोगवादी) ढाचा व त्याला पोषक असा व्यक्तिवाद जपण्याच्या प्रयत्न करत असतात. काहींनी मांडलेल्या डॉलर केंद्री गरिबी या संकल्पनेच्या जोडीला आता डॉलर केंद्री संपत्ती आणि डॉलर केंद्री व्यक्ती याही संकल्पनांचा विचार करता येईल.
एकाकी, स्व-प्रेमी आणि सामाजिक बंधनातून मुक्त अशा व्यक्तीच्या लेखी उपभोग हे अंतिम मूल्य ठरते, ज्यायोगे समाजात स्थान आणि महत्त्व मिळण्याची हमी मिळते. सामाजिक जीवनातील पोकळी भरून काढण्यासाठी अशा व्यक्ती चंगळवादी बनतात. उपभोग घेणे हेच त्यांच्या स्व अस्तित्वाचे गमक बनते.
जागतिक विपणनाच्या सर्व प्रकल्पांचा मूलभूत घटक एकाकी व्यक्ती होय. विपणन हे गरजा निर्माण करण्याचे काम करते. प्राथमिक गरजांसाठी कसल्या जाहिरातींची गरज नसते. लोक त्यासाठी आपसूकच धडपड करतात व आणि त्यासाठी मेहनत करायला किंवा पैसे मोजायला तयार असतात. कृत्रिम गरजा निर्माण करण्यासाठी जाहिरातींची गरज असते. विपणन ही अशा गरजा निर्माण करून त्या प्राथमिक गरजांशी जोडण्याची कला व तंत्र होय. मात्र हे जोडकाम बहुतेकदा लोकांच्या लक्षात येत नाही.
अनेकांच्या लेखी चंगळवाद हा सामान्य, भाबड्या नागरिकांना चटपटीत, उच्चरवातील जाहिरातींद्वारे फसवण्याच्या कटाचा प्रकार आहे. मात्र सामान्य नागरिक इतक्या सहजासहजी फसत नाही. त्यांच्यावर जाहिरातींचा प्रभाव पडू शकतो, मात्र त्यासाठी प्रथम त्यांच्या आयुष्यात पोकळी निर्माण करावी लागते. मगच जाहिरातीची जादू आणि त्याची सवय त्यांच्यावर परिणाम करू लागतात.
अशी पोकळी निर्माण करणे हा कळीचा भाग असतो. जेव्हा कुटुंब, परंपरा, विस्तारित समुदायाला जोडले गेल्याची भावना नष्ट होते, तेव्हाच अशी एकाकी व्यक्ती विविध आभासी एकोप्यांमध्ये अर्थ शोधू पाहते. आजच्या काळात आभासी एकोप्याचा महत्त्वाचा भाग उपभोगवादी ग्राहकांचा समुदाय हाही आहे. विकसित देशांचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान यांची निवडणुकांतील हार-जीत आता प्रचंड प्रमाणातील उपभोगाला त्यांच्यामुळे निर्माण होणारा धोका किंवा त्यासाठी त्यांनी दिलेली आश्वासने यावर ठरू लागली आहे.
उपभोग, किंवा त्याची आशा, याने कित्येकांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो ही बाब जगातील बहुसंख्यांच्या पचनी पडत नाही. खरे तर यातून एका नव्या आंतरराष्ट्रीय समूहाची निर्मिती झाली आहे. विरोधाभास असा, की हे सर्व उपभोगवादी लोक इतर देश वा समाज यांना समजून घेण्याच्या जबाबदारीपासून फटकून असतात. त्याची गरजच नाही, कारण त्यांच्या लेखी सर्वांच्याच अस्तित्वाचे गमक व वर्णन उपभोग घेणारे एवढेच तर असते. उपभोगाच्या सवयींचे नमुने किती सारखे वा वेगळे हाच काय तो फरक.
***
तरीही उपभोगवाद हा संस्कृतीविरोधी नाही. जगभर पसरलेला असल्याने त्यात संस्कृतीलाही स्थान आहे. संस्कृतीला आपल्याला ज्ञात असलेल्या अर्थाने – जिवंत, अनियंत्रित, अस्पष्ट आणि आधुनिकता व विकास या नावाखाली कधी विध्वंस करणारी - तेथे वाव नाही. संस्कृती ही केवळ उपभोगाची संस्कृती. एकदा अशी संस्कृती वरचढ ठरली की कित्येक ज्ञात गोष्टींना नवा अर्थ प्राप्त होतो. उदाहरणार्थ चीन व भारत या पुरातन सभ्यतांमध्ये प्रचंड व जलद उलथापालथ होत आहे. परिणामी भारताचे भारतीयत्व एकाच वेळी दायित्व आणि भांडवलदेखील बनण्याची चिन्हे आहेत. येणाऱ्या काही वर्षांमध्ये भारतीयत्व वसूल करण्याचे बरेच प्रयत्न होतील – वस्तुविशेषांतील अभिजातता, पारंपरिकतेतील वैशिष्ट्ये शनिवार-रविवारी लोक मिरवतीलही आणि पर्यटकांना विकलीही जातील.
संस्कृती उपभोगवादाचा प्रतिकार करतील का? मला ठाऊक नाही. पण त्यांच्या अस्तित्वावर जर खरा किंवा काल्पनिक घाला पडला तर त्या नक्की प्रतिहल्ला करतील अशी माझी धारणा आहे.
विशेषांक प्रकार
माणूस हा "सीमीत-गरजा-वाद" / "चंगळवाद" या दोन अति-टोकांवर नसतो
कोणताही माणूस हा "सीमीत-गरजा-वाद" आणि "चंगळवाद" या दोन अति-टोकांवर नसतो, तो मधे कुठेतरी असतो. आणि त्याचे हे स्थानही सतत बदलत असते: वयोमानपरत्वे वगैरे.
- पन्नास वर्षांपूर्वीच्या भारतातील "सीमीत-गरजा-वादातून निर्माण होणारे जीवन किती दरिद्री होते हे अनेकांनी पाहिले आहेच.
-सदर्हू लेख ही केवळ जागतिकीकरणाविरुद्धची एक छद्म-टीका वाटते.
- पर्यावरण-रक्षणाचे आणि मानवी-शोषण टाळण्याचे भान ठेवून केलेल्या "चंगळवादात" नक्की काय चूक आहे ते समजू शकले नाही.
स्केल
पर्यावरण-रक्षणाचे आणि मानवी-शोषण टाळण्याचे भान ठेवून केलेल्या "चंगळवादात" नक्की काय चूक आहे ते समजू शकले नाही.
मोठ्या प्रमाणात (स्केलवर) असा 'सस्टेनेबल' चंगळवाद व्यवहार्य आहे का, याचा कसलाही पुरावा आहे का? असा चंगळवाद आज मानवी समाजाला ज्ञात आहे का? कारण इकॉनॉमी ऑफ स्केल असल्याशिवाय चंगळवाद व्यवहार्य होत नसावा.
हाँगकाँग व सिंगापूरसारखी काही
हाँगकाँग व सिंगापूरसारखी काही शहर-राज्ये तसेच काही छोटी दुबईसारखी शहर-राज्ये म्हणवणारी संस्थाने यांनीही चंगळवादी समाजांच्या माळेत स्वतःला प्रस्थापित केले आहे. या समाजांमध्ये चंगळवाद हेच साध्य आहे
हे कशाच्या आधारावर लिहिले आहे?
उपभोगवादाला चिंतातुरतेची किनार असते, विशेषतः विस्थापित, एकट्या आणि कळपसंस्कृतीचा भाग असलेल्या लोकांच्या बाबतीत हे विशेषत्वाने खरे असते.
कळले नाही...
एकाकी, स्व-प्रेमी आणि सामाजिक बंधनातून मुक्त अशा व्यक्तीच्या लेखी उपभोग हे अंतिम मूल्य ठरते, ज्यायोगे समाजात स्थान आणि महत्त्व मिळण्याची हमी मिळते. सामाजिक जीवनातील पोकळी भरून काढण्यासाठी अशा व्यक्ती चंगळवादी बनतात. उपभोग घेणे हेच त्यांच्या स्व अस्तित्वाचे गमक बनते.
हे सरसकट खरे नाही.
गरज, उपभोगवाद आणि चंगळवाद या संकल्पनांच्या सीमारेखा अधिक स्पष्ट झाल्या असत्या तर समजण्यास सोपे झाले असते.
गरजेपेक्षा अधिक काही विकत घेणे अथवा गरज नसलेल्या काही कृती करणे या सर्वांनाच चंगळवाद अथवा उपभोगवाद हा एकमेव मथळा देणे योग्यं वाटत नाही.
पण हे बरोबर आहे की की अतिरेक हा नेहमी वाईटच असतो.
पुराव्याने शाबित करा.
लेखात अनेक तोफगोळे ठासून भरले आहेत आणि त्याने नयनरम्य आतिषबाजी केली आहे. पण त्याला पुरावा म्हणून काही मालमसाला पुरवला नाही.
त्यामुळे हे फटाके क्षणिक बौद्धिक चमक दाखवून लुप्त होतात.
म्हणजे
एकाकी, स्व-प्रेमी आणि सामाजिक बंधनातून मुक्त अशा व्यक्तीच्या लेखी उपभोग हे अंतिम मूल्य ठरते, ज्यायोगे समाजात स्थान आणि महत्त्व मिळण्याची हमी मिळते. सामाजिक जीवनातील पोकळी भरून काढण्यासाठी अशा व्यक्ती चंगळवादी बनतात. उपभोग घेणे हेच त्यांच्या स्व अस्तित्वाचे गमक बनते.
ह्यात व्यक्ती अगतिकतेने मार्केटच्या जाळ्यात सापडतात, ही शक्यता विचारात घेतली आहे का? उदा. ५ जणांसाठी जेवण बनवताना ताजे टोमॅटो घेण्यापेक्षा टिनमधले टोमॅटो स्वस्त पडतात - शिवाय ते बर्गर वगैरे फ्रोझन गोष्टींपेक्षा तरी पौष्टिक असतात - असा विचार करून टिनमधले टॉमेटो विकत घेणारी अफ्रिकन अमेरिकन गृहीणी ही चंगळवादी अजिब्यात नाहीये - पण मार्केटने तिला अगतिक केलं आहे.
असे अनेक दाखले देऊन काही वाक्यं पंक्चर करता येतील.
चंगळवाद आणि अमेरिकी लोकांच्या प्राथमिक गरजा.
अन्न - "... the United States discards more food than any other country in the world: nearly 40 million tons — 80 billion pounds — every year." हे वाक्य इथून उचललं आहे.
Americans waste nearly a pound of food each per day, study finds
वस्त्र - "The whole fast fashion model is built around… building cheap clothing, and the U.S. is the biggest culprit, exporting more second-hand clothing than any other country on earth," Samuel Oteng, a fashion designer and project manager at the Or Foundation, told CBS News.
संदर्भ - Fast fashion in the U.S. is fueling an environmental disaster in Ghana
निवारा - अमेरिकी घरांचा सरासरी आकार - २०००+ स्क्वेअर फूट (संदर्भ); जगात दुसरा नंबर, ऑस्ट्रेलिया सगळ्यात वर.
ह्या प्राथमिक गरजा. घरांचा आकार मोठा म्हणून घरं जास्त लांब-लांब; म्हणून प्रवासाचा वेळ जास्त, म्हणून (आणि इतरही कारणांमुळे) गाड्या; त्या गाड्या दर तीन/सहा वर्षांनी बदलत राहणं; त्या चालवण्यासाठी मोठाले रस्ते; मोठ्या घरांमधलं हवामान नियंत्रित ठेवण्यासाठी लागणारी वीज; मोठ्या घरांमधलं फर्निचर; माणसामागे असणारी इलेक्ट्रॉनिक गॅजेटं; वगैरे, वगैरे, वगैरे.
उदाहरण म्हणून काळ्या स्त्रीबद्दल सहानुभूती मिळवणं सोपं आहे; पण ती अमेरिकेच्या १४% लोकसंख्येपैकी आहे; बहुसंख्यांतली नाही. जेवण म्हणून बर्गर हाच पर्याय उपलब्ध असणं, हाच मुळात चंगळवाद ठरवता येईल - आठवा, गुराढोरांमुळे मिथेन तयार होतो, तो मिथेन पर्यावरणासाठी कार्बन डायॉक्साईडपेक्षा २५% अधिक घातक असतो. जेवणासाठी टोमॅटो निवडणं हा उपभोग नाही. कदाचित फळं म्हणून न्यू झीलंडमधून आलेले किवी किंवा एकाच छापातली, जंगलं तोडून उगवलेली दक्षिण अमेरिकेतून आलेली केळी खाणं हा चंगळवाद असू शकेल.
तपशील.
हाच तपशील लेखात हवा होता!
एका वाक्यामागे जर इतकी गृहितकं माहिती असावी लागली तर लेखाचा अर्थ माझ्यापर्यंत तरी पोचणारच नाही.
एकाकी, स्व-प्रेमी आणि सामाजिक बंधनातून मुक्त अशा व्यक्तीच्या लेखी उपभोग हे अंतिम मूल्य ठरते, ज्यायोगे समाजात स्थान आणि महत्त्व मिळण्याची हमी मिळते. सामाजिक जीवनातील पोकळी भरून काढण्यासाठी अशा व्यक्ती चंगळवादी बनतात. उपभोग घेणे हेच त्यांच्या स्व अस्तित्वाचे गमक बनते.
ह्या वाक्यात तरी मला चंगळवादी सिस्टिमवर टीका केलेली नसून अशा व्यवस्थेत जगणाऱ्या व्यक्तीवर टीका केली आहे असं वाटतं -
दुसरं उदाहरण कर्जाचं घेऊ. कितीसे लोक स्वखुशीने क्रेडिट कार्डं, विद्यार्थी कर्जें घेतात? पण व्यवस्थाच अशी आहे की लोकांना ही भरमसाठ
महागडी कर्जं घेतल्याशिवाय जगताच येत नाही. आणि हे समाजातले बहुसंख्य आहेत - अल्पसंख्यांक अजिबातच नाहीत.
अशा "पेचेक-टू-पेचेक" जगणाऱ्या, शिक्षणासारख्या मूलभूत गरजेपोटी नाईलाजाने घेतलेल्या कर्जासाठी पैसे कमावणाऱ्या लोकांवर "उपभोग घेणं हेच अंतिम मूल्य" असल्याचा आरोप करणं अगदीच सरसकट विधान होत नाही का?
कदाचित लेखकाला अशा चंगळवादी सिस्टिमबद्दल सांगायचं असेल - तर मुद्दा मान्य आहे.
आशिष नंदींचं लेखन मी खूप
आशिष नंदींचं लेखन मी खूप वाचलं आहे असा अजिबात दावा नाही. पण जितपत वाचलं आहे - नंदी एकेकट्या व्यक्तीवर, किंवा बारक्या समाजावर टीका करत नाहीत. उलट ते माणसांबद्दल सहृदय दृष्टिकोन राखून व्यवस्थेतल्या उणिवा दाखवत राहतात.
याही लेखात, चंगळवादामुळे लोकांचं नुकसान होतंय, वगैरे काही ते म्हणत नाहीत. ज्या चंगळवादावर ते एका बाजूनं टीका करत आहेत, त्याच चंगळवादातलं सौंदर्यही ते मांडतात. मी जितपत वाचलं आहे, त्यावरून नंदी तक्रारखोर म्हातारा पुरुष नाही वाटत, गोड-पिकलेला-रसाळ आजोबा वाटतो.
नंदींनी हे पुरावे लेखात का मांडले नाहीत, याचं उत्तर नंदीच जाणोत. मला माझ्यापुरतं समजलं ते असं - नंदींचं लेखन समजायचं तर माझं भौतिकशास्त्र आणि विदाविज्ञानाचं शिक्षण पुरेसं नाही. मला समाजशास्त्रही शिकावं लागेल; आजूबाजूला काय सुरू आहे, ते माझी मतंमतांतरं बाजूला टाकून वाचावं, बघावं लागेल. तर नंदी टीका न करता, इतरांना न जोखता काही आकलन मांडत आहेत हे समजेल.
त्यांचा हेतू टीका करणं, कुणाला हिणवणं हा नाही तर त्यांना काय समजतं, आकळतं हे मांडणं आहे हे समजण्यासाठी मला इतरांना जोखणं आधी बंद करावं लागेल. ते होत नाही तोवर नंदी काय म्हणतात, हे मला समजणार नाही. म्हणूनच खालच्या प्रतिसादात मी लिहिलं आहे की आता आशिष नंदींची पुस्तकं वाचायला माझी पूर्वतयारी झालेली आहे, असं मला वाटतं.
लेख आवडला.
नंदींचा मूळ लेख आवडला; शिवाय आता नंदींचं लेखन वाचलं तर समजेल अशी शंकासुद्धा यायला लागली आहे. हातात असलेलं पुस्तक वाचून झालं की त्यांचंच एखादं पुस्तक वाचायला घेण्याची इच्छा झाली.
शिवाय भाषांतरही आवडलं. त्यात कुठेही कृत्रिमपणा नाही. सगळी वाक्यं जशीच्या तशी आलीच पाहिजेत हा अट्टहास नाही. विशेषतः धनिकवनिक बाळे हा शब्दप्रयोग फारच आवडलाय.
अपुरा लेख
धन्यवाद अदिती. पण मला स्वतःला भाषांतर करताना कित्येक गोष्टी पुरेशा स्पष्टीकरणाअभावी तर्कट वाटत होत्या. एकूण चंगळवादातील सौंदर्य आणि राजकारण काहीच पुरेसं स्पष्ट झालेलं नाही असंच वाटत राहिलं. पण भाषांतर करायला फार कष्ट पडले नाहीत. लेख २००५ सालचा आहे त्यामुळे तो जरा कालबाह्य वाटतो. सोशल मिडिया नावाच्या साधनांचा अतिरेक, - आठवा, लॉकडाऊनमधले घरीच नवनवे कपडे घालून ते सोमिवर मिरवण्याचा उच्छाद, एकूणच आपल्याभोवती आरत्या ओवाळून घेणे - याकडे ते कसं पाहतील हे जाणून घ्यायला आवडलं असतं.
फेसबुकवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये तर्काची उंच उडी अशी एक प्रतिक्रिया होती.
दुसरी प्रतिक्रिया -- चंगळवाद हा सापेक्ष असतो, कालसापेक्षही आणि स्थलसापेक्षही. शहरी लोकांना जी गरज वाटते ती गावाकडच्या लोकांना चंगळ वाटते.
या लेखात सामाजिक दरीचा व चंगळवादाचा काहीच ऊहापोह नाही याचे आश्चर्य वाटते.
चंगळवाद म्हणजे
१) शरीराचे थंडी,उन,पावूस ह्या पासून रक्षण करणारे वस्त्र.
त्याच्या व्यतिरिक्त वस्त्रांचे जे प्रकार आहेत तो चंगळवाद.
२) मानवाला चौरस आहार देणारे अन्न ही गरज आणि फक्त विविधता आणि चव ह्या साठी तयार होणारे अन्न हा चंगळवाद.
३) एका ठिकाण वरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी असलेली वाहन ही गरज.
पण ऐश आराम,वेग,सुंदरता, अशी वाहन ही चंगळवाद .
४) संदेश ची देवाण घेवाण ही गरज पण.
फक्त मौज मजेसाठी असणारी विविध dating app,fb,you tube, etc हा चंगळवाद .
खूप उदाहरणे आहेत.
चंगळवाद मुळे बिलकुल गरज नसणारी उत्पादने निर्माण होत आहेत.
कोणतेही उत्पादन हे नैसर्गिक साधन संपत्ती वापरल्या शिवाय तयार होत नाही.
पृथ्वी वर असणारी नैसर्गिक संसाधन मौज मजेसाठी
वापरायची की गरज भागवण्यासाठी ह्याचा विचार माणसाला करायचा आहे.
संशोधक किती फेकत असले तरी पृथ्वी च माणसाची
जन्मदाती,संगोपन करणारी आहे.
बाकी ह्या विशाल विश्वात माणसाला कुठेच जागा नाही.
आणि पृथ्वी व्यतिरिक्त माणसाचे लाड कोणीच करणार नाही
चंगळवाद सोडा.
पृथ्वी वाचवायची गरज नाही ती खूप strong आहे.
मानवाने फक्त स्वतःला वाचवावे.
सौंदर्य
माझ्या मते चंगळवादाचं सौंदर्य यात आहे.
अमेरिकी बाजारपेठ अवाढव्य आहे – त्यात नवीन श्रद्धा, विचारसरणी, पंथ यांना मानणारी वा त्यांपासून फारकत घेणाऱ्यांचीही एक बाजारपेठ आहे. अमेरिका म्हणजे उपभोक्त्यांसाठी नंदनवनच आहे. अगदी विरोधी मतालाही इतर कुठेही नसेल इतकी मागणी तिथे असते. त्याचेही अधाशासारखे आणि सर्वदूर सेवन होते. ह्या उपभोगवृत्तीवरील टीकेचादेखील आस्वाद घेतला जाऊ शकतो.
आणि लेखाचा शेवट या वाक्यांशी जोडला तर त्यातलं सौंदर्यही मला दिसतं.
बाकी ठीक, परंतु...
गव्हेरा नव्हे. गेवारा.
('गेवारां'ना 'गव्हेरा' म्हणणे हे साधारणत: (कोठल्यातरी रँडम अँग्लोचे ऐकून) गांधींना 'गँढी' म्हणण्यासारखे आहे. (किंवा आर. के. धवनना 'ढवण'. किंवा पूनम धिल्लोंला 'ढिल्लन'.) बाकी चालू द्या.)
- (मढॅव गाडकॅरिंचा पंखा) 'न'वी बाजू.
(टीप: Rajesh188 यांनी मर्सिडीजला marchidis म्हणणे वेगळे. ते चालू शकते. कारण, त्यांच्याकडून याहून बरी अपेक्षा नाही. फरक समजला असावा, अशी अपेक्षा.)
धन कुबेर लोकांचा पैसा बाजारात आणण्यासाठी
चंगळवाद संस्कृती निर्माण केली जाते.five Star हॉटेल्स त्या साठीच असतात.
एका sandwidhch साठी ४ प्लेट त्या साठीच दिल्या जातात.
जे ब्रँड आहेत मग मोबाईल मधील ऍपल असेल किंवा गाडी मधील marchidis असेल ते फक्त
श्रीमंत लोकांसाठीच निर्माण केलेले ब्रँड आहेत.
कपडे,घड्याळ,. Etc Etc.
हे सर्व श्रीमंत लोकांकडे असलेला अतिरिक्त पैसा circulate बाजारात झाला पाहिजे म्हणून आहे.
सामान्य लोकांनी कर्ज काढून हे ब्रँड खरेदी करावेत हा हेतू बिलकुल नाही.
पण लोकांची mentality विचित्र आहे.
सामान्य मध्यम वर्गीय किंवा अगदी सामान्य आर्थिक स्थिती असणारी लोक पण अँड्रॉइड स्वस्त मोबाईल सोडून ऍपल खरेदी करतात ते पण कर्ज काढून.
तो ब्रँड त्यांच्यासाठी नाही हे त्यांना कोण समजवणार.
ह्या अशा mentyality मुळेच चंगळवाद आणि त्या बरोबर कर्ज बाजारी पना पण वाढत आहे.
गरज म्हणून गाडी खरेदी करणे आणि आपल्या आर्थिक स्थिती ल सोसेल इतक्याच किमतीचे घेणे हे योग्य चंगळवाद नाही.
पण आपल्या आर्थिक क्षमते बाहेर असणारी गाडी खरेदी करणे आणि त्या साठी कर्ज काढणे हा चंगळवाद आहे.ही गरज नाही.
व्यक्ती ते व्यक्ती देश पण तसेच वागतात.
असे वाचले आहे अमेरिका हा सर्वात जास्त कर्ज असणारा देश आहे.
कशा साठी त्यांनी कर्जाचा डोंगर उभा केला असेल?
गरजेसाठी नक्कीच नाही.
प्रतिष्ठा, दिखावू पना हा हेतू च जास्त असेल.
तात्या,
तात्या,
असं नाहीये हो. उदा.झारा ही दुकानसाखळी - सामान्यांसाठी स्टाईल वाले कपडे निर्माण करते (फास्ट फॅशन)
किंवा बहुसंख्य दुकानं ही सामान्यांसाठीच (बल्क=मुबलक) प्रमाणात वस्तू बनवतात.
फक्त अमेरिकी बाजारपेठेत "विकणं" हा महत्त्वाचा भाग आहे -दिखाऊपणा वगैरे सोडून द्या.
काहीतरी विकणं आणि ते कुणीतरी विकत घेणं - मग त्यामुळे भले जग खड्ड्यात का जाईना.
अगदी!
फक्त अमेरिकी बाजारपेठेत "विकणं" हा महत्त्वाचा भाग आहे -दिखाऊपणा वगैरे सोडून द्या.
काहीतरी विकणं आणि ते कुणीतरी विकत घेणं - मग त्यामुळे भले जग खड्ड्यात का जाईना.
नेमके बोललात!
It is – has always been – a fundamental right of Americans to sell junk to each other.
(‘Obelix & Co.’मधील मेन्हिरांचा ‘व्यापार’ आठवला.)
अमेरिका किंवा दोन चार युरोपियन देश
म्हणजे जग नाही.अमेरिकेला नुकसान झाले तर सैन्य दल ,ची राक्षसी ताकत वापरून ती तिचे नुकसान भरून काढते.
जेव्हा जगाचा आपण विचार करतो तेव्हा फक्त अमेरिका आणि काही मोजकेच युरोपियन देश ह्यांची उदाहरण पण नकोत आणि त्यांचा आदर्श तर बिलकुल नको.
अमेरिका आणि युरोपियन देशाकडून एकच घेण्यासारखे आहे ते म्हणजे लोकशाही मूल्यं.
चीन पण कोशात चालला आहे.हुकूम शाही कडे त्याची वाटचाल चालू आहे.
सुरुवात
[Consumerism या शब्दाला मराठीत एकच एक शब्द वापरून चालणार नाही. गरज असो नसो, खायला, प्यायला, ल्यायला विकत घ्या ही वृत्ती अधोरेखित करण्यासाठी चंगळवाद हा शब्द रूढ आहे. मात्र चंगळ ही उपभोगाची वरची पायरी असते. जिथे असा अतिरेक अभिप्रेत नाही, अशा ठिकाणी उपभोग, उपभोगवाद हे शब्द घातले आहेत. ग्राहक हा खरेदीदार या अर्थाने येतो, तसा येथे अभिप्रेत नसल्याने consumerसाठी उपभोगवादी, चंगळवादी हे शब्द वापरले आहेत.]
जागतिक विपणनाच्या सर्व
वाह!! फार फार सुरेख विवेचन आहे.
लेख आवडला. नवीनच दृष्टीकोन मिळाला.