गरज ही शोधाची जननी : आधुनिक वैद्यक संशोधनाचा संक्षिप्त आढावा
गरज ही शोधाची जननी : आधुनिक वैद्यक संशोधनाचा संक्षिप्त आढावा
डॉ. पद्माकर पंडित यांची मुलाखत
डॉ. पद्माकर पंडित हे बीजे मेडिकल कॉलेज, पुणे येथे ३५ वर्षांहून अधिक काळ फार्माकॉलॉजी हा विषय शिकवत होते. सध्याच्या काळात त्यांची सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे सीओइपी येथील जंबो कोव्हिड केंद्रात ते कार्यरत होते. सध्या ते पिंपरी-येथील जंबो कोव्हिड केंद्रात आहेत. वैद्यकशास्त्रात झालेले महत्त्वाचे बदल, मन्वंतरं, या संदर्भात त्यांची मुलाखत आम्ही घेतली. 'ऐसी अक्षरे'साठी सदर मुलाखत अवधूत बापट, भूषण पानसे यांनी घेतली. भूषण पानसे यांनी मुलाखतीचं आयोजन केलं. आणि झूमवर डॉ. पंडित यांचे काही मित्रमैत्रिणी, परिचित आणि रुग्णांपैकी काही हजर होते.
डॉ. पंडित यांची करोना, कोव्हिड संदर्भात घेतलेली मुलाखत इथे सापडेल.
ऐसी अक्षरे - आधुनिक वैद्यकशास्त्रात कुठकुठले बदल, आणि नवीन संशोधनं झाली ज्यामुळे मानवी आयुष्यावर, समाजावर, वैद्यकीय व्यवस्थेत (चांगला किंवा सकारात्मक) मूलभूत बदल झाला?
डॉ. पंडित - गूगल किंवा तत्सम माहितीच्या स्रोताकडे माहिती मागितली, की वैद्यक विज्ञानाच्या इतिहासातले महत्त्वाचे शोध कुठले, किंवा मानवाला लाभदायक ठरलेले दहा शोध कोणते, तर त्यात पेनिसिलीन दिसेल. तो क्रांतिकारी शोध आहे. लशीच्या बाबतीत थोडी गंमत आहे. म्हणजे संसर्गाच्या प्रतिबंधाचा शोध आधी लागला आणि संसर्गावरच्या उपचाराचा नंतर लागला. लशींचा शोध प्रतिजैविकांच्या साधारण १०० वर्षं आधी लागला.
एडवर्ड जेन्नरचं नाव बहुतेकांना माहीत असतं. त्याच्या लक्षात आलं की एखादा विशिष्ट संसर्ग ज्या व्यक्तीला झाला आहे, त्या व्यक्तीच्या शरीरात काही पदार्थ निर्माण होतात, जे त्या आजाराला विरोध करतात. आता आपण त्याला प्रतिपिंडं (antibodies) म्हणतो. लसींच्या शोधांमधे लुई पाश्चरचं फार मोठं योगदान आहे. म्हणून या पाश्चर आणि जेन्नरच्या लसी आहेत. त्या झाल्या अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात.
हे होऊनही बराच काळ आपल्याकडे संसर्गावर उपचार नव्हते. संसर्ग बळवला तर आज जसे काही आजारांचे रुग्ण हे वैद्यकतज्ज्ञांच्या समोर हॉस्पिटलात मरण पावतात; त्यावर काहीही करता येत नाही. त्या काळी अशी परिस्थिती साध्यासाध्या संसर्गजन्य आजारांच्या बाबतीत होती. म्हणजे साधा एक घसा धरल्यावर ज्या जिवाणूमुळे इन्फेक्शन झालेलं असतं तो, म्हणजे स्ट्रेप्टोकोकस, तो त्या काळी हृदयापर्यंत किंवा मेंदूपर्यंत पोहोचायचा. त्यातून मेंदूच्या आवरणाचा दाह होतो. याच जिवाणूचं संक्रमण फुफ्फुस किंवा हृदयात झालं तर त्यातून होणाऱ्या आजारांमधून सहजपणे बाहेर पडता येत नव्हतं. कारण प्रतिजैविकं (antibiotics) नव्हती. आज हेच स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन एका साध्या प्रतिजैविकानं सहज बरं करता येतं. त्यामुळे आजार बळावणं; मेंदू, फुफ्फुसं, हृदय यांच्यात संक्रमण होऊन, पुढची गुंतागुंत होऊन मृत्यू या गोष्टी जवळजवळ संपल्या किंवा क्वचित होणाऱ्यांपैकी झाल्या आहेत.
या अशा संसर्गजन्य आजारांवर औषध निर्माण करण्याकरता संशोधकांच्या प्रयत्नांत एक वैचारिक अडथळा (conceptual barrier) होता. काही संशोधकांचं असं म्हणणं होतं, की संसर्ग ज्या सूक्ष्म जंतूंमुळे होतो, ते सूक्ष्मजीव ही एक पेशी आहेत; आपलं शरीरही पेशींनीच तयार झालेलं आहे. आपल्या शरीरात संसर्ग निर्माण करणाऱ्या या सूक्ष्मजंतूंच्या पेशींचा नायनाट करण्यासाठी एखादं औषध द्यावं, तर ते औषध मानवी शरीरातल्या पेशींनाही त्रासदायक ठरेल; मानवी पेशींसुद्धा मारेल. त्यामुळे बराच काळ लोकांचं असं म्हणणं होतं की प्रतिजैविकं तयारच होऊ शकत नाहीत.
किमोथेरपीचा जनक पॉल एहलरिशनं 'मॅजिक बुलेट' हा शब्द तयार केला. मोठा शास्त्रज्ञ हा!
त्याचं म्हणणं असं की समजा एखादा पदार्थ असेल, जो दिला असताना तो फक्त त्या रोगजंतूंमध्येच शिरकाव करेल पण मानवी पेशींमध्ये जाणार नाही, तर तो पदार्थ फक्त रोगजंतूंना मारेल, मानवी पेशी मारणार नाही. ही वैद्यकीय तत्त्वज्ञान-विज्ञानाची बैठक त्यानं तयार करून दिली. त्यानं एका सिफिलिस (हिंदीत गरमी किंवा परमा) नावाच्या जंतूजन्य गुप्तरोगावर आरसेनिक युक्त औषध शोधलं, ते याच विचारांवर आधारित आहे. (हल्ली त्याहून चांगली औषधं उपलब्ध आहेत, त्यामुळे ते कुणी वापरत नाही.)
आपल्याला माहीत असेलच, पेनिसिलीनचा शोध अत्यंत अपघाताने लागला.
म्हणजे त्याबद्दल माहिती सर्वांना असेलच की, फ्लेमिंग दुसरं काही काम करत होता. त्याला पेट्रिप्लेटमध्ये कुठलेतरी जीवाणू वाढवायचे होते. तिथे एक बुरशी उगवली आणि जीवाणू उगवले नाहीत. एखाद्या माणसानं त्या प्लेट्स फेकून दिल्या असत्या. पण फ्लेमिंग म्हणाला की ज्या अर्थी ही बुरशी उगवल्यावर तिथे इतर जीवाणू वाढले नाहीत, त्या अर्थी ही बुरशी काहीतरी विशिष्ट पदार्थ निर्माण करते, जो या जीवाणूंना ठार मारतो. हा शोध अत्यंत क्रांतिकारी होता.
पेनिसिलीन आलं तेव्हा फार दुर्मीळ होतं. ज्या रुग्णांना पेनिसिलीन दिलं असेल त्यांच्या लघवीतून पेनिसिलीन काढून, ते शुद्ध करून पुन्हा वापरत असत. त्याकाळी ते प्रचंड महागही होतं. या पेनिसिलीनमुळे जो पहिला पेशन्ट वाचला तो स्ट्रेप्टोकोकसच्या वर्गातील होता.
आता प्रतिजैविकांमुळे इतका बदल घडला आहे की संसर्गजन्य रोगांवर आपण ९०-९५% विजय मिळविला आहे. अर्थात त्याचा एक तोटा असा की, प्रतिजैविकांचा भरमसाठ, नको तेवढा, नको तिथे वापर. यामुळे काहीकाही जीवाणू काही विशिष्ट प्रतिजैविकांना आणि काही जीवाणू सर्वच प्रतिजैविकांना विरोध करू शकतात.
असा विरोध निर्माण झालेले जीवाणू हे औषधशास्त्रापुढचं आव्हान आहेत. ज्या प्रमाणात जीवाणू विरोध (resistance) निर्माण करत आहेत त्या प्रमाणात नवीन प्रतिजैविकं मिळत नाहीयेत.
हे जरी आजचं वास्तव असलं तरीही प्रतिजैविकं हा एक क्रांतिकारक शोध आहे यात शंका नाही.
ऐसी अक्षरे - प्रतिजैविकांच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या औषधांबद्दल काही सांगाल का?
डॉ. पंडित - औषधांच्या शोधांमधला एक अत्यंत महत्त्वाचा, क्रांतिकारी शोध म्हणजे बधिरीकरण, भूलशास्त्र किंवा संवेदना, हालचाल प्रतिबंधित करण्यासाठी शोधल्या गेलेल्या औषधांची निर्मिती.
पूर्वीच्या काळी जेव्हा शस्त्रक्रिया केली जात असे तेव्हा वेदनाशमन करणारी उच्च दर्जाची औषधं फारशी नव्हती. रुग्णाला चार लोकांनी धरून ठेवायचं, किंवा त्यांच्या डोक्यावर फटका मारून त्यांना बेशुद्ध करायचं असे काही प्रकार वापरले जात होते. अशा काही विचित्र गोष्टी करून रुग्णाच्या संवेदना तात्पुरत्या नष्ट केल्या जात असत. दंतशास्त्रातील एक विद्यार्थी होते. त्यांनी असा एक शोध लावला की नायट्रस ऑक्साईड नावाचा वायू आपण नाकावाटे घेतला, तर वेदनाशमन होतं. माणसाला हसू येतं, तो आनंदी होतो. पण हा वायू बधिरीकरण होण्याइतपत वापरायचा असेल तर श्वासातून येणाऱ्या हवेतील प्रमाण जवळजवळ ७०% असावं लागतं. त्यामुळे ही पद्धत लोकप्रिय होऊ शकली नाही. आजही ते औषध इतर बधिरीकरण करणाऱ्या औषधांच्या बरोबर सहाय्यक म्हणून वापरलं जातं.
अर्थात नायट्रस ऑक्साईडच्या मदतीने दात काढणं शक्य व्हायचं, कारण त्यातून वेदनाशमन नक्की होतं, बधिरीकरण झालं नाही तरीही.
यात पुढे सुधारणा होऊन इथर नावाच्या औषधाचा शोध लागला. ते खूप सुरक्षित होतं. फार जास्त न शिकलेला माणूसही रुग्णाला इथर देऊ शकायचा. ते देण्याची पद्धत अगदी सोपी होती. तोंडावर एक फडकं, गॉज टाकायचा त्यावर इथर थेंब-थेंब टाकायचं. श्वासातून ते फुफ्फुसांत जातं, फुफ्फुसांतून रक्तात, आणि रक्तातून मेंदूकडे. मग सिडेशन, मग थोडी झोप, मग अगदी गडद झोप आणि त्यानंतर बधिरीकरण. रुग्णाच्या सर्व हालचाली, सर्व संवेदना नष्ट व्हायच्या.
हे औषध अनेक वर्षं वापरलं गेलं. त्याचेही काही तोटे असल्यामुळे ते पुढे बंद करण्यात आलं. आता अशा प्रकारची अनेक व्होलाटाइल लिक्विड्स आहेत, ती वापरली जातात. हे अगदी नेमक्या प्रमाणात करता येतं. याची यंत्रंही आता उपलब्ध आहेत. यात अगदी रुग्णाच्या वायुकोशातल्या या पदार्थाचं प्रमाण मोजता येतं. हे प्रमाण किती असावं हेही ठरलं आहे आता. याचं प्रमाणीकरण झालं आहे. आज बधिरीकरण हे अतिशय प्रगत शास्त्र आहे.
या शास्त्रात एवढी प्रगती झाली नसती तर कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणं अत्यंत अवघड झालं असतं. बऱ्याच शस्त्रक्रिया करताच आल्या नसत्या. आज आठ-बारा तास, मोठमोठ्या, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करता येतात ते या बधिरीकरण शास्त्रातल्या प्रगतीमुळे. आज यात अनेक, उत्तम औषधं उपलब्ध आहेत. औषधशास्त्रातला हा एक अत्यंत महत्त्वाचा शोध आहे.
ऐसी अक्षरे - मगाशी आपण जेन्नर आणि पाश्चर या दोघांचा उल्लेख केलात.
डॉ. पंडित - गेल्या वर्षी, म्हणजे १० जानेवारी २०२० ला सार्स कोव्ह-२ विषाणूचा जीनोम प्रकाशित झाला. त्याची पूर्ण ओळख जगाला झाली आणि आज म्हणजे गेल्या केवळ पावणे दोन वर्षांत या विषाणूविरोधी किमान पाच मान्यताप्राप्त लशी आणि त्यांचे मिळून ५८८ कोटी कोटी डोसेस जगभरात लोकांच्या शरीरात गेले आहेत. हे अवाढव्य आणि थक्क करणारं काम आहे. जेन्नर आणि पाश्चरनं लसींच्या बाबतीत सुरू केलेलं काम आज इथे इतक्या वेगात पोचलं आहे.
याचं एक मुख्य कारण म्हणजे संशोधनाची पद्धती (research methodology) सुलभ पण सक्षम झाली. प्रतिजैविक कसं शोधायचं, लस कशी शोधायची याचे काही आडाखे, ठोकताळे आहेत.
आपण नेत्रतज्ज्ञाकडे गेलो की त्यांच्याकडे आपल्याला सात-आठ प्रकारच्या यंत्रांसमोर बसायला लागतं. या यंत्रांद्वारे आपल्या डोळ्यांची संपूर्ण फिजिकल आणि फंक्शनल तपासणी होते. मोतीबिंदू शस्त्रक्रिया करताना जे नवीन भिंग टाकतो त्याचं आकारमान आपण आधीच मोजू शकतो.
शस्त्रक्रियेच्या प्रत्येक विभागात मोठी प्रगती झाली आहे.
अवयवारोपणानद्दल बोलायचं झालं तर त्यात दोन प्रकार येतात. एक म्हणजे कुणाच्या तरी शरीरातला एक जिवंत अवयव दुसऱ्या एका माणसाच्या शरीरात (ज्यांच्या शरीरातला तो अवयव अक्षम झाला आहे) आधी चाचण्या करून मग बसवणं.
दुसरा प्रकार पहिल्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात केला जातो; तो म्हणजे कुठलीतरी कृत्रिम वस्तू माणसाच्या शरीरात बसवणं. अगदी ढोबळ म्हणजे श्रवणयंत्र बसवणं, काचेचा किंवा कृत्रिम डोळा बसवणं; हाडं जोडण्याकरता शरीरात स्टीलच्या पट्ट्या बसवणं. याला प्रोस्थेटिक सर्जरीज म्हणतात. सहज कल्पना येणार नाही इतक्या या प्रकारच्या प्रोस्थेटिक सर्जरीज होतात.
ऐसी अक्षरे - आपण आधी औषधांच्या बाबतीत बोलताना एक निर्णायक घटना, डिफायनिंग मोमेन्ट म्हणून जेन्नर आणि पाश्चर यांच्या लशी आणि पेनिसिलीनच्या शोधांबद्दल बोललो. तसं शस्त्रक्रियांच्या संबंधी काही डिफायनिंग मोमेन्ट म्हणावा असे काही शोध होते का ज्यामुळे पुढे शस्त्रक्रिया शास्त्रात मोठा बदल झाला?
डॉ. पंडित - मिनिमम इन्व्हेजीव्ह शस्त्रक्रिया, म्हणजे रुग्णाला कमीतकमी इजा होईल अशा पद्धतीनं करताना दुर्बीणीचा शोध फार महत्त्वाचा आहे. कमीतकमी इजा म्हणजे कमीतकमी टाके. प्रत्येक अवयवाच्या आतपर्यंत पोहोचण्यासाठी आता दुर्बीण उपलब्ध आहे.
यापाठोपाठ आता रोबॉटिक शस्त्रक्रिया आली आहे. अमुक अवयव कुठे आहे, त्याच्यापर्यंत कसं जायचं, त्वचा कुठे, कशी, किती कापायची, त्वचेच्या आतल्या स्नायूंचे आणि इतर भाग आहेत ते कशा प्रकारे कापायचे, हे आपण सगळं प्रोग्रॅम करता येतं.
रोबॉटिक शस्त्रक्रिया करण्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे ती मिनिमम इन्व्हेजीव्ह तर आहेच पण त्याबरोबरच अत्यंत अचूक आहे. जेव्हा हातानं शस्त्रक्रिया केली जाते तेव्हा किती मिलीमीटर कापायचं याचा अंदाज सर्जनच्या मेंदू आणि हातांनी घेतला जातो. हेच जेव्हा रोबॉट वापरून केले जाते, तेव्हा तो अंदाज अत्यंत अचूकपणे पाळला जातो.
पूर्वी वैद्यक क्षेत्रात दोन प्रकारच्या अतिविशेषोपचारतज्ज्ञ (सुपर स्पेशालिटी) होत्या. उदाहरणार्थ काळजी घेणारे जनरल सर्जन आणि जनरल फिजिशियन वेगळे, आणि त्यापुढे जाऊन मूत्रपिंडविषयक उपचार घेण्याचं तज्ज्ञ-शिक्षण घेतलं जातं, ते एकत्र औषधांचा वापर करून उपचार करण्याचं देतात, त्याला आम्ही DM Nephrology म्हणतो, म्हणजे मूत्ररोग औषधतज्ज्ञ आणि दुसरा प्रकार म्हणजे शस्त्रक्रिया करून मूत्रमार्गाच्या आजारावर किंवा विकारावर उपचार करणारे युरॉलॉजिस्ट म्हणजे मूत्रमार्गशल्यक्रियातज्ञ.
यात एक गमतीशीर स्पर्धा असते. उदाहरण घ्यायचं तर जठरातलं आम्ल वाढून अल्सर होऊ शकतो. आम्ल वाढण्याची कारणं निरनिराळी असतात - वाढते ताणतणाव, किंवा अति मसालेदार अन्न खाणं, किंवा मद्यपान-धूम्रपान. पूर्वीच्या काळी हा अल्सर सर्जरी करून काढून टाकायला लागत असे. त्यानंतर अशा औषधांचा शोध लागला, ज्यांमुळे जठरातल्या आम्लाचा स्रावच कमी होतो; अगदी पाच किंवा एक टक्क्यापर्यंत हा स्राव कमी करता येतो. त्यामुळे व्रण (अल्सर) औषधं घेऊनच भरून येऊ शकतो. शस्त्रिक्रियेची गरज खूप कमी होते. म्हणजे काही वेळा औषधं शस्त्रक्रियेवर आक्रमण करून तिची गरज नाहीशी करतात. काही वेळा याच्या उलटही होतं. जिथे औषधांपेक्षा शस्त्रक्रिया किंवा इतर उपचार जास्त प्रभावी ठरतात.
एक उपचार औषधांचा, एक शस्त्रक्रियेचा. ज्यात दोन्हींची गरज पडत नाहीत असेही इलाज असतात, त्यातही क्रांती झाली. जीवनशैली, आहार यांत बदल करणं; मोडलेल्या हाडाच्या बाहेरच्या बाजूला लावायचं प्लास्टर झालं; तशाच भौतिकोपचार (physiotherapy), मानसोपचार, समुपदेशन या अतिशय महत्त्वाच्या बाजू आहेत. शस्त्रक्रियातज्ज्ञ आणि औषधतज्ज्ञ दोन्ही आपापल्या परीनं या तिसऱ्या पद्धतीचा वापर करत असतात. त्यांतही खूप सुधारणा झाली आहे.
एखाद्या अवयवाचं काम पूर्णपणे थांबलं तर औषधं बऱ्यापैकी निरुपयोगी ठरतात, तेव्हा अवयव बदलणं हेच उपयोगाचं ठरतं. तिथे शल्यतज्ज्ञ आणि वैद्यकतज्ज्ञ दोघांना एकत्र यावं लागतं. समजा मूत्रपिंड बदलायचं असेल तर ती जबाबदारी मूत्रपिंड-औषधवैद्यकावर आहे. प्रत्यक्ष शस्त्रक्रिया शल्यतज्ज्ञ करतात. अवयवाचं काम थांबलं, किंवा हाड मोडलं, तर तिथे शस्त्रक्रियाच हवी. त्या-त्या क्षेत्राचं असं वैशिष्ट्य असतं.
या सगळ्यांचा एकत्र समन्वय हेच रुग्णासाठी सगळ्यांत चांगलं. थोडं विषयांतर होईल…
प्रतिमा जालावरून साभार
आमच्याकडे काही रुग्ण येतात, सहा तज्ज्ञांकडून औषधं घेत असतात, त्याचं कुठेही संपादन किंवा संतुलन झालेलं नसतं. कालच एक तरुणी आली होती माझ्याकडे. तिच्या मांडीला सूज आली होती. अनेक वर्षं ती अनेक तज्ज्ञांकडे गेली, त्यात होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक तज्ज्ञही होते. निदान झालं नाही, आणि उपचारही झाले नव्हते. खूप प्रयत्नांनंतर तिचा MRI आणि सोनोग्राफी केल्यावर आम्हांला समजलं की जन्मजात तिच्या मांडीत शुद्ध आणि अशुद्ध रक्ताचं एक विचित्र, abnormal जाळं आहे, arteriovenous-congenital malformation. ते काढल्यावर ती बरी होण्याची शक्यता आहे. प्रत्येक तज्ज्ञ आपापल्या विषयापुरतं पाहतात. ते एकत्र आणणारी कुणी व्यक्ती असणं गरजेचं असतं.
ऐसी अक्षरे - वैद्यकाच्या वेगवेगळ्या विशेषज्ञ शाखांची माहिती दिलीत हे उत्तम. यात तुमची विशेष शाखा, औषधशास्त्र (pharmacology) फार कमी वाचकांच्या माहितीची आहे. त्याबद्दल काही सांगाल का?
डॉ. पंडित - आधुनिक वैद्यकाच्या शिक्षणपद्धतीमध्ये पदवी अभ्यास साडेचार वर्षांचा आहे. त्यात पहिल्या वर्षात पूर्वचिकित्सा शिकवतात. यात शरीररचनाशास्त्र (anatomy), शरीरक्रियाशास्त्र (physiology) आणि जीवरसायनशास्त्र (biochemistry) शिकवतात. त्याच्या जोडीला सामाजिक आणि रोगप्रतिबंधकशास्त्राचा (community medicine) काही भाग येतो. हा झाला पाया. मानवी शरीर कसं आहे, ते कसं काम करतं आणि वेगवेगळ्या रासायनिक किंवा जैविक घटना कशा घडतात, याचा तपशिलवार अभ्यास असतो. दुसरं वर्षं असतं पराचिकित्साशास्त्रासाठी, paraclinical. ही शास्त्रं चिकित्सापूर्व आणि चिकित्साशास्त्रांचा समन्वय साधतात, दोन्हींत दुवा म्हणून काम करतात. त्यात विकृतीशास्त्र (pathology), सूक्ष्मजीवशास्त्र (microbiology), औषधशास्त्र (pharmacology) आणि न्यायवैद्यकशास्त्र (forensic medicine) यांचा समावेश होतो. याच्या जोडीला पुन्हा रोगप्रतिबंधकशास्त्र येतं. औषधशास्त्राचं वैशिष्ट्य म्हणजे मानवी शरीरावर होणाऱ्या औषधांच्या परिणामांचा या शास्त्रात अभ्यास होतो. औषधांचा शोध लावणं हे रसायनशास्त्र आणि जैवतंत्रज्ञानशास्त्र यांचं काम आहे. एखादं नवीन औषध आल्यावर त्याचा अभ्यास, त्याच्या संबंधित संशोधन, ते बाजारात आणण्याकरता जे चिकित्साभ्यास (trials) करावे लागतात त्यात औषधशास्त्राची भूमिका मोठी असते.
याचा आणखी एक भाग आहे, clinical pharmacology. प्रत्यक्ष रुग्णांवर औषधं वापरताना काय चांगलं, काय वाईट, किती सुरक्षित, प्रभावी यांचा अभ्यास होतो. औषधशास्त्र दोन सिद्धांतांवर आधारित आहे -
कुठलंही औषध मानवी पेशी किंवा ऊती (tissue) किंवा अवयव, किंवा यंत्रणा यांच्यावर परिणाम, काम करतं, ते त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असलं पाहिजे. यात कुठलेही दूरोपचार नाहीत - माळ घातली आणि कावीळ उतरली असं काही नाही. औषध प्रत्यक्ष जिथे आजार आहे तिथे गेलं पाहिजे. डोळ्यात टाकलेला थेंब तिथे आत गेला पाहिजे, आणि त्यामुळे जीवाणू ठार मेले पाहिजेत. त्यासाठी औषधाचं एक विशिष्ट प्रमाण असावं लागतं. म्हणून डोस किती घ्यायचा याचं महत्त्व. डोकं दुखत असेल तर ५०० किंवा ६५० मि.ग्रॅ. पॅरासिटामोल घेतो; एवढीच का, तर शास्त्रशुद्ध भाषेत, रुग्णाच्या वजनाच्या १० किलोमागे १०० मि.ग्रॅ. पॅरासिटामोल लागेल. पॅरासिटामोल घेतलं की ते शरीरभर पसरतं, त्याचं मेंदूतलं प्रमाण डोकेदुखी किंवा ताप उतरवण्याकरता आवश्यक असतं, तेवढं किंवा त्याहून जास्त असतं. पण दुष्परिणाम होतील एवढं जास्तही नसतं. म्हणून प्रत्येक औषधाची मात्र ठरलेली असते, किमान आणि कमाल, दोन्ही. याचा एक फायदा-तोटा गुणांक (benefit risk ratio) आहे. एखाद्या औषधामुळे होणारा फायदा किती होणार याकडे बघून तोटा, दुष्परिणाम सहन करायचा का, हे ठरवलं जातं.
It's the price that you are paying to get that benefit. ही औषधशास्त्राची मूळ कल्पना आहे. फार प्रगत शास्त्र आहे. जवळजवळ ९०-९५% मानवी आजारांवर उत्तम प्रकारची आणि सुरक्षित, प्रभावी औषधं शोधलेली आहेत. ५० वर्षांपूर्वी कर्करोग भीतीदायक वाटायचा. आज अनेक प्रकारचे कर्करोग औषधं, किरणोपचार, शस्त्रक्रिया, आणि इतर उपचार वापरून बरे करता येतात; रुग्णांना आयुष्य देऊ शकतो. It's a fantastic science, जादू वाटावं असं शास्त्र.
एखादा माणूस तक्रार घेऊन येतो, "डॉक्टर मला रात्री चार-सहा वेळा लघवीसाठी उठावं लागतं."
"मग आम्ही विचारतो, काय वय आहे तुमचं?"
"बहात्तर."
"अहो, तुमची ती पुरस्थ ग्रंथी, prostrate, वाढलेली असणार. त्यामुळे मूत्रनलिका आणि मूत्राशयावर दाब येतो, म्हणून वारंवार जावं लागतं. तर ही एक गोळी घ्या, mirmax नावाची." त्यात दोन औषधं आहेत. या औषधांचं प्रमाण काय, ०.४ मि.ग्रॅ. १०० किलो वजनाच्या माणसासाठी ०.४ मि.ग्रॅ. एक मिलीग्रॅम रक्तामध्ये एक पिकोग्रॅम औषध असेल. ही जादू आहे!
ताप आला, गोळी घ्या; ताप उतरतो. हे अगदी नेमकं विज्ञान, exact science आहे, evidence based science. याच्या मर्यादा आहेत. त्या मर्यादांवर टीका जास्त होते. त्या टीकेला फार अर्थ नाही, हे नोंदवून पुढच्या प्रश्नाकडे जाऊ.
ऐसी अक्षरे - एकीकडे लस-औषधं या गोष्टी माफक किंमतीत अगदी गरीब देशांत, गरीब लोकांसाठीसुद्धा उपलब्ध होतात. बाजाराचा रेटा असा असतो. एखादं औषध अमेरिकेत खूप महाग असेल तर ते काही मार्गानं आफ्रिकेतल्या देशांतही गरीबांना उपलब्ध होतं. या उलट शस्त्रक्रियेसंदर्भात झालेल्या महत्त्वाच्या शोधांबद्दल तुम्ही बोललात, ते मात्र गरीब देशांना फार उपलब्ध नसल्यामुळे गरीब-श्रीमंत अशी दरी तयार झाली आहे का?
डॉ. पंडित - या प्रश्नाचे तीन भाग करू. पहिला भाग असा की वैद्यकीय उपचारांत व्यक्तीच्या आर्थिक-सामाजिक स्थितीमुळे फरक पडतो का? तर हो, प्रत्येकच बाबतीत तो फरक पडतो तसा वैद्यकीय उपचारांच्या बाबतीतही पडतो. स्वयंपाकासाठी चुलीत लाकडं वापरता, का गोवऱ्या वापरता का गॅस? चहाचं उदाहरण पाहा. पाच रुपयांचा मिळतो, आणि पाचशे रुपयांचाही मिळतो.
शासकीय सेवांत वैद्यकीय सेवा मोफत असल्यामुळे नाही-रे वर्ग तिकडे वळतो. मात्र दर्जात फरक पडतो असं मला वाटत नाही. कुणी गरीब माणूस नदीवर आंघोळ करत असेल, दगडानं समजा कोपर घासत असेल. दुसरा कुणी महागडा, नवीन साबण वापरत असेल. जर गरीब माणूस तेवढीच स्वच्छता राखत असेल तर त्याचं आरोग्य तेवढंच चांगलं असू शकतं. काही औषधं मात्र महाग असतात आणि मिळत नाहीत हे आहेच. तुम्ही ऐकलं असेल, हल्लीच कुठल्याशा जन्मजात आजाराकरता सहा कोटी रुपयांचं औषध उपलब्ध करून देण्याकरता पंतप्रधानांना साद घालण्यात आली. यात कुणी म्हणाले, किंमत-फायदा गुणक (कॉस्ट-बेनिफिट रेशो बघितला तर सहा कोटी रुपये एका बाळावर खर्च करण्याकरता दुसरं बाळ होणं कधीही सोयीचं आहे. हे निराळं विधान आहे. हा गुंतागुंतीचा विषय आहे. यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, नैतिक, असे पैलू येतात.
दुसरा विषय आहे किंमतीबद्दलचा. कुठलंही औषध बाजारात येतं तेव्हा महाग असतं. त्या संशोधनाकरता झालेला खर्च कंपनीला परत मिळवायचा असतो. हळूहळू औषधाचा खप वाढत गेला की किंमत कमी होते. क्लोरोमायसेटिन हे औषध घ्या. १९५० साली ते बाजारात आलं तेव्हा त्याची किंमत ५० रुपये होती. आज ते ५० पैशांना मिळतं तरी आपण घेत नाही. कारण आणखी जास्त प्रभावी आणि सुरक्षित औषधं आता उपलब्ध आहेत.
तिसरा भाग आहे, लशींच्या किंमतीचा. औषधांच्या किंमतींच्या बाबतीत शासनाचं धोरण असतं की त्या-त्या देशाला लागणारी अत्यंत आवश्यक औषधांची किंमत कायद्यानं नियंत्रित राखली जाते. लशींचा त्यांत समावेश होतो. लशी बहुतेक सगळ्यांना दिल्या जातात. अपवाद आहेत, कुत्रा चावल्यावर द्यायच्या लशी कुत्रा चावल्यावरच घ्यायच्या असतात. एरवी बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या वर्षात द्यायच्या लशी असतात, एमएमआर, पोलिओ, वगैरे, या लशी सगळ्यांना देतात. त्या औषधाचा, रसायनाचा वापर करणारे लोक जेवढे वाढतात तेवढी किंमत कमी होते.
याचा आंतरराष्ट्रीय भाग असा आहे की जगातल्या सगळ्या लोकांना लशी मिळाव्यात यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थासुद्धा कार्यरत असतात.
अमेरिकेतल्या औषधांची किंमती फार आहेतच. पण तेवढंच नाही. वैद्यकतज्ज्ञ मिळणं, विमा नसेल तर फिया न परवडणं, यापेक्षा भारतातून औषधं घेऊन जाणं आणि आमच्या सल्ल्यानं तिकडे औषधं घेणं परडवतं. यात कायदेकानूनसुद्धा येतात. हा फरक आहे आणि तो राहणारच. त्याला इलाज नाही.
ऐसी अक्षरे - औषधं कुठल्यातरी पद्धतीनं मिळत राहतात. पण शस्त्रक्रियांचं काय? आफ्रिकेचं उदाहरण घेऊ. तिथले बहुतांश देश खूप गरीब आहेत. तिथे औषधं, लशी पोहोचतात. पण शस्त्रक्रियांमधली क्रांती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे, का त्या बाबतीत मोठी तफावत आहे?
डॉ. पंडित - तिथेच काय, आपल्याकडेही खेड्यापाड्यांत, दुर्गम भागांत जुन्या पद्धतींनी शस्त्रक्रिया होतात. त्या जुन्या पद्धतीही तेवढ्याच प्रभावी आहेत, आणि तेवढ्याच चांगल्या आहेत. त्यात आरोग्यसेवेतला फरक कमी असतो, असं मला वाटतं.
एक रुग्ण मला हल्लीच विचारत होते, "मी रोबॉटिक सर्जरी करू का साधी?"
मी त्यांना विचारलं, "तुम्हाला नक्की काय हवं आहे त्यातून?"
त्यांचं म्हणणं होतं, "विमा जेवढे पैसे देईल तेवढाच खर्च करायचा आहे, त्या पेक्षा जास्त खर्च करायचा नाहीये."
मग मी म्हणालो, "मग रोबॉटिक सर्जरी नका करू. त्यात वापरून टाकून देण्याच्या, डिस्पोजेबल गोष्टी वापरतात. त्याचीच किंमत ७०-८० हजारापर्यंत जाईल."
शस्त्रक्रिया कुठली करायची, यात किती खर्च परवडणार हाही प्रश्न असतोच. चश्म्याचं उदाहरण घ्या. मी स्वतः ३०० रुपयांचा, साधा चश्मा वापरतो; कारण तो सतत हरवतो.
ऐसी अक्षरे - चाचणीशोध हा विषय, त्यात झालेले बदल, आणि त्यामुळे पडलेला फरक याबद्दल काही सांगाल का? शरीरक्रियाशास्त्र, विकृतीशास्त्रीय, एक्स-रे किंवा बायोकेमिकल विज्ञान या उपविषयांत झालेले चाचणीशोध.
डॉ. पंडित - याला औषधाचा इतिहास, history of medicine म्हणतात. आमच्याकडे हा विषय नाही. पण जेव्हा आम्ही महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठ उभं केलं तेव्हा तिथल्या कुलगुरुंच्या सल्ल्यानं आम्ही एक ग्रंथालय आणि एक वस्तूसंग्रहालय उभं केलं. विदेशी लोकांनी यात संशोधन करायला सुरुवात केली तेव्हा पार दफनभूमीत जाऊन, पुरलेलं प्रेत बाहेर काढून, गुपचूप रात्री मेणबत्तीच्या उजेडात काम करावं लागलं. विल्यम हार्वेनं रक्ताभिसरण कसं होतं याचा शोध लावला - हृदयात चार कप्पे असतात; अशुद्ध रक्तवाहिनीतून ते रक्त हृदयाच्या एका कप्प्यात जातं, तिथून ते उजव्या बाजूच्या खालच्या कप्प्यात जातं जवनिकेत, तिथून ते फुफ्फुसात जाऊन शुद्ध होतं, मग डाव्या बाजूच्या छोट्या कप्प्यात येतं. तिथून झडपेतून खालच्या कप्प्यातून, जवनिकेमार्गे संपूर्ण शरीरभर फिरतं.
तसेच थर्मामीटर, स्टेथोस्कोप हे शोध खूप महत्त्वाचे आहेत. पूर्वीच्या काळी रुग्णाच्या छातीला कान लावून ऐकत असत. अगडबंब रुग्ण असेल तर काहीच ऐकू येत नसे. मग एखाद्या नळीतून तो आवाज मोठा करून ऐकता येईल का, अशा विचारांतून स्टेथोस्कोप आला.
प्रतिमाशास्त्रातले शोध प्रचंड क्रांतिकारक आहेत. त्यावर खूप टीका झाली होती. राँटजेन जेव्हा एक्स-रेवर काम करत होता, तेव्हा त्याला लक्षात आलं की काही किरण मृदू ऊतींमधून आरपार जातात, पण हाडातून जात नाहीत. त्यामुळे एक्स-रेमध्ये हाड दिसतं. तेव्हा लोकांनी त्याची टिंगल केली. नंतर त्याच एक्स-रेमुळे आपली निदानपद्धती खूप सुधारली. फुफ्फुसांचे आजार, सांधे-हाडांचे आजार, हाड किती मोडलं आहे, ते कसं दुरुस्त करता येईल, यात त्याचा खूप उपयोग होतो. आता संगणकानं त्या हाडाची मोडलेली बाजू बघून, कुठल्या प्रकारची पट्टी तिथे लावायची वगैरे हे तयार करता येतं.
त्यानंतर त्रिमित (3D) चित्र बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मग उभे, आडवे आणि मध्यभागी अशा तिन्ही मितींमध्ये एखाद्या अवयवाचे शंभर, हजार एक्स-रे काढले त्यातून CAT scanचा जन्म झाला, Computerised Axial Tomography. कोव्हिडमध्ये फुफ्फुसाची H-RCT करतात, त्यात दर १-२ सेंमी अंतरानं, फुफ्फुसाच्या खोली, उंची वगैरे मितींमध्ये प्रतिमा मिळवतात. मग तिथे जे काही अनपेक्षित, नकोसं, गाठ, पू किंवा इतर काही आजार असतील ते दिसायला लागतं.
याच्या जोडीला MRI (Magnetic Resonance Imagery) आणि ultra-sonography यांनीही कमाल केलेली आहे. हे प्रतिमाशास्त्र आहे. दुर्बीणी त्यानंतर निघाल्या, ज्या प्रत्यक्ष अवयव बघू शकतात.
परवाच माझं एका रुग्णाशी बोलणं झालं, त्यांचा PSA - Prostate Specific Antigen वाढलेला आहे. तो प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगामुळे वाढतो. मग अल्ट्रासोनोग्राफी करायचं ठरवलं. त्यामुळे प्रोस्टेत किती वाढलेली आहे, आकार कसा आहे, मऊ आहे का कठीण, कुठली गाठ आहे का, असेल तर तिचा आकार-वजन किती हे शोधता येतं. पूर्वी फक्त शौचाच्या जागेतून बोट घालून बघायचे आणि चाचपडायचे. आता हे प्रत्यक्षात दिसतं. या प्रतिमांमधून प्रोस्टेटच्या स्वास्थ्य आणि विकृती दोन्हींचं रूप समोर येतं. हे प्रत्येक क्षेत्रात आहे.
हिस्टोपॅथॉलॉजीचं उदाहरण बघू. कर्करोगाच्या निदानासाठी एखादा तुकडा काढून तपासला जातो. कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे, त्यात कुठल्या प्रकारचे प्रतिजेन (antigen) आहेत, त्यानुसार त्या व्यक्तीला कुठल्या प्रकारचे औषधोपचार द्यावेत, हे ठरवता येतं.
वैद्यकानं इतर शास्त्रांकडून खूप घेतलं आहे, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि पुढे चिकित्सापूर्व आणि पराचिकित्साशास्त्रांनी चिकित्साशास्त्र आणि उपचारशास्त्रात मोठी भर घातली आहे.
ऐसी अक्षरे - हिमॅटॉलॉजी आणि हिस्टोपॅथॉलॉजी यांच्यातलं सुपरस्पेशलायझेशन सोडलं तर सुपरस्पेशलायझेशन म्हणून फार काही घडलेलं नाही. औषधशास्त्रात सुपरस्पेशलायझेशन म्हणून काय झालेलं आहे?
डॉ. पंडित - त्यात सुपरस्पेशलायझेशन नाही. अपवाद आहे तो MD clinical pharmacology असा अभ्यासक्रम आहे भारतात काही ठिकाणी. पूर्वी MBBS लोकच औषधकंपन्यांत काम करायचे. आता MD Pharmacology केलेले लोक बघतात. प्रमुख संशोधक त्या-त्या विषयांतले तज्ज्ञ असतात. एक औषधतज्ज्ञ त्या जोडीला असतातच. एथिक्स समित्यांवर औषधतज्ज्ञ काम करतात.
माझं व्यक्तिगत मत असं, ज्या सेवांमध्ये औषधशास्त्र महत्त्वाचं, प्रॉमिनंट आहे, अशा सुपरस्पेशालिटीमध्ये औषधशास्त्राचे विद्यार्थी काम करू शकतील. उदाहरणार्थ, मेडिकल ऑन्कॉलॉजी. पॅथॉलॉजीमध्येही ट्रान्समिशन मेडिसीन वेगळं केलेलं आहे.
प्रत्यक्ष व्यवसायात लोक स्वतःचं स्पेशलायझेशन ठरवतात. मी विद्यार्थी होतो तेव्हा युरॉलॉजी नव्हतं. आपले आदरणीय शिक्षक, डॉ. शिवदेव बापट, हल्लीच गेले ते, ते युरॉलॉजीची प्रॅक्टिस करायला लागले. वाडिया सरांनी युरॉलॉजी केलं नाही, पण ते त्या काळात त्याची प्रॅक्टिस करायचे. काही सुपरस्पेशालिस्ट त्या क्षेत्रात काम करतात, आणि मग ती शाखा म्हणून विकसित होते. त्याला तेवढा व्यवसाय आणि महत्त्व दोन्ही हवेत.
ऐसी अक्षरे - आता तीन वेगवेगळे आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. मानसोपचारतल्या वेगवेगळ्या पद्धती, सुरक्षित आणि प्रभावी औषधं हा एक विषय आहे. दुसरा आहे, घातक आणि जीवघेण्या आजारांवरचे उपचार. हे आजार म्हणजे कर्करोग, मधुमेह, एड्स, दमा. तिसरा विषय म्हणजे वैद्यकीय तंत्रज्ञानाशी थेट संबंधित नाही. पण फोन, मोबाईल, इतर दृकश्राव्य माध्यमांमुळे व्यवसायावर काय फरक पडला आहे?
डॉ. पंडित - मनोविकृतीशास्त्र किंवा सायकियाट्रीपासून सुरुवात करू. आधुनिक औषधशास्त्रानं ज्या काही बाबतींत विलक्षण प्रगती केली आहे, त्यात मानसोपचार हे एक आहे. एक काळ असा होता, कुणाला गंभीर स्वरूपाचा मनोविकार झाला तर त्यावर काहीही करता येत नसे. वेगवेगळ्या शासनांनी, आपापल्या कुवतीनुसार, योग्य त्या ठिकाणी मोठमोठी मनोरुग्णालयं बांधली. एकदा रुग्णाला आत ढकललं की त्यांचा जगाशी संपर्क येत नसे. बरं होऊन बाहेर येणं विरळाच. रुग्णाचं निधन झाल्यावर ते शव ताब्यात घ्यायलाही कधी नातेवाईक येत नसत. यात क्रांतिकारक बदल झाला.
काही प्रकारची मन शांत करणारी औषधं, tranquilizers आली. मानसशास्त्र आणि मनोविकारांचा अभ्यास करताना लक्षात आलं की आपण जे वागतो-बोलतो-जगतो, ते एक प्रकारची प्रतिक्षिप्त क्रिया आहे. म्हणजे काय - आपण माझ्याशी बोलताय हे झालं इनपुट. मी ते ऐकतो, अनुभवतो आणि त्यावर काही निर्णय घेतो. हे माझ्या मेंदूतल्या केंद्रानं मला दिलेलं ज्ञान किंवा आदेश. मी त्यानुसार कार्यवाही करतो, हे आऊटपुट, परिणाम किंवा उत्तर. मनोविकार झाले की या प्रक्रियेत काही गडबड होते. त्याचं कारण, मेंदूतल्या रसायनांचा स्राव बदलतो. डोपामिन, अड्रिनालिन, सेराटोनिन ही रसायनं. यांचं प्रमाण बिघडलं की आजार होतात.
आजार कशामुळे होतात, याचा शोध नंतर लागला, आणि औषधं आधी सापडली, असं औषधशास्त्रात खूपदा झालंय. औषध आधी आलं आणि नंतर त्याचं काम कसं चालतं, हे उलगडलं.
लोकांच्या लक्षात आलं की फिनोथायझीन नावाची औषधं तेव्हा शोधली, आणि तेव्हाची औषधं आता वापरात नाहीत कारण त्यापेक्षा आणखी सुरक्षित औषधं आता आहेत, ते दिल्यावर प्राणी पाळल्यासारखा परिणाम त्या माणसावर होतो. सर्कशीत तुम्ही वाघ किंवा हत्ती स्टुलावर बसलेले बघितले असतील, हा काही त्यांचा मूळ स्वभाव नाही. या औषधांसारख्या पदार्थांमुळे होतं. स्किझोफ्रनिया, विमनस्कता, विभंगता अशा आजारांत या औषधांमुळे emotional quietening होतं. त्यांच्या भावना जरा बोथट होतात, ते शांत होतात. ते अग्रेसिव्ह राहत नाहीत. Psycho-motor slowing happens with them.
या औषधांचा शोध खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारची औषधं घेऊन असंख्य रुग्ण चांगलं आयुष्य जगत आहेत. औदासीन्य, चिंता, काळजीनं पीडीत लोक, सायकॉटिक आजार असलेले लोक, संशयग्रस्त वगैरे या सगळ्यांवर उत्तम प्रकारे नियंत्रण मिळवता येतो. अनेक रुग्णांना हा आजार पुन्हा होत नाही. झालाच पुन्हा, तर तेच औषध पुन्हा वापरता येतं. ९०% आणि अधिक रुग्ण आयुष्यभर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतात. अभ्यास करतात, पदव्या मिळवतात, लग्न करतात, आयुष्यभर चांगल्या प्रकारे जगू शकतात.
औषधांशिवाय रुग्णांशी बोलावं लागतं; कधी विजेचे झटके द्यायला लागतात; कुणी व्यसनाधीन झाले असतील तर त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात जावं लागतं; फक्त औषधांमुळेच रुग्ण बरे होतात असं नाही, पण ती लागतात. जोडीला इतर उपायही लागतात. आपण मोठ्या प्रमाणावर मानसिक विकारांवर विजय मिळवला आहे. आजच्या गुंतागुंतीच्या आयुष्यात या औषधांशिवाय मानवी जीवन खूप हलाखीचं झालं असतं.
दुसरा विषय होता, घातक आणि जीवघेण्या आजारांचा. या आजारांचं तीन प्रकारे वर्गीकरण करू. पहिला म्हणजे कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक जीव घेणारा आजार. उदाहरणार्थ हृदयविकाराचा झटका. छातीत दुखायला लागलं तर सॉर्बिट्रेटची गोळी तोंडात ठेवता येते. हृदय बंद पडलं असेल तर रुग्णालयात डीसी शॉक देऊन हृदय परत सुरू करता येऊ शकतं, डिफिब्रिलेट करता येऊ शकतं. हे महत्त्वाचे शोध आहेत. Defibrillator is one of the most important inventions in cardiology. कोट्यवधी रुग्णांचे प्राण या डिफीब्रिलेटरनं वाचवले आहेत.
कुणी माणूस अचानक बेशुद्ध झाला. आपल्याला माहीत नसेल की हा मधुमेह आहे, त्यानं त्याची गोळी घेतली तेव्हा साखर कमी झाली; किंवा गोळी न घेतल्यामुळे साखर वाढून तो बेशुद्ध पडलाय. त्यावर आता नगण्य वेळात ग्लूकोमीटरनं रक्तातली साखर मोजता येते आणि तातडीनं साखर द्यायची का मधुमेहाचं औषध द्यायचं हे ठरवता येतं.
समजा लहान मुलाला झटके आले, फिट्स आल्या, एपिलेप्सीचा आजार असेल तर त्यावर शिरेतून द्यायची औषधं आहेत. त्यातून लगेच बरं वाटतं. मात्र तो झटका येतो त्यावेळी त्यातलं कळणारी व्यक्ती जवळ पाहिजे, आणि तिनं उपचार केले पाहिजेत.
घातक प्रकारांचा दुसरा प्रकार आहे तो ज्यांत बहुतेक वेळा उपचारांचा उपयोग न होता रुग्ण मरतात ते. कायमचं अपंगत्व किंवा मृत्यू येण्याची शक्यता जास्त असते. कर्करोग यांतला महत्त्वाचा. एड्स हा आता घातक आजार राहिलेला नाही. प्रतिकारशक्तीचा ऱ्हास करणारा विषाणू आणि त्यांचा लक्षणसमूह - एड्स, आता पूर्णपणे नियंत्रणात आलेला आहे. त्यावर अनेक प्रकारची औषधं आहेत. तो रोग बरा करता येत नाही, आणि ती औषधं कायम घ्यावी लागतात.
तिसऱ्या प्रकारचे आजार माणसाला लगेच मारत नाहीत; पण ते पूर्णपणे बरे होऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांसाठी आयुष्यभर उपचार घ्यावे लागतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, वगैरे. काही आजार कायमस्वरूपी असतात. काही जातात आणि येतात, उदाहरणार्थ, संधिवात. त्या आजारांवरच्या उपचारांतही खूप सुधारणा झालेली आहे. दम्याचं उदाहरण घ्या, पूर्वी तोंडावाटे गोळ्या दिल्या जायच्या. तोंडावाटे किंवा इंजेक्शनमधून दिलेलं औषध शरीरभर जायचं. त्याचे दुष्परिणाम व्हायचे.
दमा हा फक्त फुफ्फुसांचा आजार आहे, आणि हवा फक्त फुफ्फुसांत जाते. तर श्वसनामार्फत औषधं दिली तर? तेव्हा इनहेलर आणि नेब्युलायझर यांचे शोध लागले. औषधं त्या झुरक्यातून देता येतात, कमी प्रमाणात देऊन पुरतात, आणि फुफ्फुसांतल्या श्वसननलिका रुंदावल्या आणि दम्याच्या झटक्यावरचा उपचार कमीतकमी वेळात आणि कमीतकमी औषधांत व्हायला लागला.
तेच उच्च रक्तदाबाचं. त्या आजारांमुळे होणारी गुंतागुंत थोपवलेली आहे. त्यातून होणारे अकाली मृत्यू कमी झालेले आहेत.
कर्करोगांवर संशोधनं सुरू आहेत. निदानांमध्येही संशोधन सुरू आहे - ज्याला tumour markers म्हणतात, बायॉप्सीत काय प्रकारचे तुकडे घ्यायचे वगैरे. कर्करोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. सामान्य माणूस, किंवा परावैद्यकांनांही कर्करोग हा एकच रोग वाटतो, पण तो एक मोठा विषय आहे. त्यात अतिविशेष उपचार आहेत. फक्त कर्करोगाची शस्त्रक्रिया; त्यातही काही लोक फक्त स्तनांच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया करणारे असतात. वैद्यकीय कर्करोगशास्त्र (medical oncology) हा एकच विषय आहे. रक्ताचा अभ्यास हा एकच विषय आहे, पण रक्ताच्या कर्करोगावर इलाज करणारे आता वेगळे झालेले आहेत.
कर्करोगातला सगळ्यात महत्त्वाचा शोध आहे किरणोपचारांचा. त्यातही सर्वसाधारण रेडिओथेरपी किंवा किरणोपचार होत असत. आता नेमक्या प्रकारे, नेमक्या ठिकाणी किरण जातील अशा सुविधा आल्या आहेत. त्यांचा वापरही वाढत आहे. नांदेडला माझ्या एका विद्यार्थ्याकडे मी हल्लीच बघितलं, त्यांनी तिथे किरणोपचाराची सोय केलेली आहे.
कर्करोगात शल्यतज्ज्ञ, कर्करोगतज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, औषधतज्ज्ञ, किरणोपचारतज्ज्ञ या सगळ्यांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे. ते एका माणसाचं काम नाही. त्यातून जास्त चांगले उपचार करता येतात.
औषधशास्त्रात अशी अनेक औषधं आहेत ज्यांचे खूप दुष्परिणाम आहेत. तरीही ती वापरावी लागतात. जेवढा आजार घातक, तेवढं औषध जास्त सदोष. आपण रुग्णाला काय देतोय, यावर किती सहन करायचं हे ठरवता येतं. कर्करोगावर उपचार करताना डोक्यावरचे केस जातात. हा दुष्परिणाम आहे, पण फक्त वरवरचा आहे. असे दुष्परिणाम होणार हे मान्य करूनच ते उपचार घेतले पाहिजेत.
तिसरा मुद्दा, संपर्क, दळणवळणात झालेले बदल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. या करोनाकाळात मी साधारण १००० रुग्णांवर उपचार केले असतील, तर त्यांतले दहा रुग्णसुद्धा मी प्रत्यक्षात बघितले नाहीत. शंभरेक रुग्णांना कुणी तरी प्रत्यक्ष बघण्याची गरज पडली असेल. मी बघितले नाहीत कारण वय, सहव्याधी, वगैरे. हे शक्य झालं कारण संपर्कसाधनांमध्ये झालेला लक्षणीय बदल.
काल एक बाई भेटल्या, त्यांना मी कुठल्या चाचण्या करायच्या ते सांगितलं. आणि पुन्हा यायची गरज नव्हती. त्यांचे सगळे चाचणी अहवाल मला व्हॉट्सॅप किंवा इमेलवर पाठवायला सांगितले. लक्षणं काय, रोग कुठला, उपचार काय, हे सगळं मला व्यवस्थित समजतं आणि समजावता येतं. गरज असेल तर रुग्णाच्या जवळच्या लोकांशीही चाचणी निकाल, उपचार वगैरेंबद्दल बोलता येतं. बायकोला कोव्हिड असेल तर नवरा कळवतो, "ऑक्सिजन ९८ आहे". तर ते बघून मी कळवतो, "काही काळजीचं कारण नाही, आणखी चार तासांनी पुन्हा कळवा." रुग्णाला काय सांगायचं असतं, तर पालथं झोपा. एवढंच, पालथं झोपण्यातून अनेक रुग्णांचं ऑक्सिजनचं प्रमाण, ४-६ तासांत ९१-९२पासून ९६-९७पर्यंत गेलं.
समंजस नातेवाईक घरात असतील, आणि हे शिक्षणाबद्दल म्हणत नाहीये मी, तर अनेक रुग्णांवर घरच्याघरी उपचार करणं शक्य झालं. हे फक्त कोव्हिडबद्दलच नाही. त्यामुळे रुग्णांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचवता येतो. आम्ही कधी जोखीमही घेतली आहे, सहव्याधी असतील तर ८०-८५ वर्षांच्या रुग्णाचे उपचार डॉक्टर नातेवाईकांच्या संमतीनं घरीच केलेत, ते बरेही झालेत. त्यात प्रिएंबल एकच, जर ९५च्या खाली प्राणवायूची पातळी गेली तर ९४ला सजग व्हा, ९३ला पिशवी भरा, ९२ला रिक्षा बोलवा आणि ९१ला रिक्षात बसून हॉस्पिटलात या. ९०च्या खाली प्राणवायू जाण्यापूर्वी हॉस्पिटलात पोहोचलं पाहिजे. कुठल्याही क्षणी जावं लागेल याची तयारी ठेवा.
घरची माणसं खूप चांगली काळजी घेतात. रुग्णालयात काळजी घेत नाहीत असं नाही. पण शेवटी ते पगारी नोकर असतात. घरच्या लोकांनी काळजी घेतली तर घरच्या घरीच उपचार घेता येतात. याचे व्यावहारिक फायदे आहेत. आधी ते श्रीमंतांनाच शक्य होतं, आता ते मध्यमवर्गीय आणि गरीबांनाही शक्य आहे. त्याचा जास्त वापर सगळ्यांनी करावा असं मी सुचवेन. वेळ वाचतो, प्रवास करावा लागत नाही, वाट बघावी लागत नाही. Telemedicine is one of the boons that Covid has given.
ऐसी अक्षरे - संशोधनं अनेक क्षेत्रांत सुरू असतात, काही आश्वासक असतात, काही नसतात. कुठल्या दिशेनं, कुठल्या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक बदल होण्याची शक्यता तुम्हाला दिसते?
डॉ. पंडित - वैद्यकाच्या प्रत्येक क्षेत्रात!
माझ्या एक अवैद्यकीय मित्रानं हल्लीच मला एक फोटो पाठवला. त्यांनी एक कृत्रिम डोळा तयार केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की यापुढे आंधळी माणसंच नसतील. तो डोळा भिंग, रेटिना, ऑप्टिक नर्व्ह आणि मेंदूतल्या दृष्टीकेंद्राचंही काम करेल. याची कल्पना करता येणं कठीण आहे.
वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करायला अशाकरता वाव आहे, त्यात बुद्धीमान लोक जातात. विशेषतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत!
दुसरं, आमच्या व्यवसायाला प्रॅक्टिस म्हणतात, कारण प्रत्येक वेळी, प्रत्येक रुग्णावर केलेले उपचार ही प्रॅक्टिस, सरावच असतो. त्यात कुठल्याही वेळी नवा अनुभव येऊ शकतो. या वैद्यकसंशोधनात ज्या कुणी भर घातली, त्यांतले काही विद्यार्थी होते, काही परावैद्यक होते, काही फिजिशियन होते. कधी शेजारी उभी असलेली परिचारिका किंवा चतुर्थ श्रेेणी कर्मचारी सांगतात, "सर, तिथे मला काही तरी लाल दिसतंय, ते पाहा!" आणि मग मीही म्हणतो, "हो, इथे रक्तस्राव झालाय खरा."
आपल्याकडे उपचारांची उपलब्धता आहे. उपलब्ध आहे ते अधिकाधिक सुरक्षित आणि कमी खर्चिक कसं होईल, याकडे आपण वाटचाल करत आहोत.
ऐसी अक्षरे - डोळ्याचं उदाहरण तुम्ही दिलंत, ते आम्हांला अगदी अनपेक्षित होतं. तशी आणखी काही उदाहरणं आहेत का?
डॉ. पंडित - स्टीफन हॉकिंगची खुर्ची आठवते का? आमच्या नात्यातल्या एका मुलाचा जबरी अपघात झाला. तो वाचेल असं वाटलं नव्हतं. सुदैवानं, तो संरक्षण खात्यात पायलट असल्यामुळे त्याला उत्तम उपचार मिळाले, तो वाचला. आता त्याचं शौच आणि लघवीवर नियंत्रण नाही. तो स्वतः स्वतंत्रपणे उठून चालू शकत नाही. बाहेरून, विद्युत नियंत्रणातून कृत्रिम हालचाली करायला लावणं, हे प्रोस्थेसिस प्रत्यक्षात येत आहे.
हल्ली सौम्य फ्रॅक्चर झालं तर पायाला प्लास्टर घालत नाहीत. त्यांनी एक बूट तयार केलाय. हालचालीसाठी फक्त हाडाला आधाराची गरज आहे, म्हणून ते बुटासारखं बनवलं. वजन कमी झालं. मग लोक म्हणतील की एका पायातला हा बूट दुसऱ्या पायाला जुळत नाही, मग तसं काही येईल. असं सतत काही सुरू राहतं.
ज्यांना समजतं, माझ्या कामात इथे कुठे अडथळा आहे, ते नवीन काही शोधत राहतात.
ऐसी अक्षरे - जेव्हा असं लक्षात येतं की यापुढे काही उपचार शक्य नाहीत, तेव्हा पॅलिएटीव्ह केअर कळीची ठरते. त्यात काय प्रगती होत आहे?
डॉ. पंडित - रुग्णाला जे काही भोगावं लागणार, त्यात काही नीतीमत्तेचे भाग आहेत. काही कायद्याचे आहेत - ते बाजूला ठेवू.
फार पूर्वी मला एक गृहस्थ भेटले होते. ते म्हणाले, "डॉक्टर मला लिंफोमा आहे. मला बरं होणारी औषधं घ्यायची नाहीत. उलटी झाली तर उलटीचं औषध द्या, वेदनाशमन करा, आणि मला मरायचं आहे." कायद्याची याला आजही परवानगी नाही. पण रुग्ण आणि डॉक्टरमधला करार हे असं होतं. आमच्या एक जवळच्या नातेवाईकांचं आजारपण झालं. मुंबईत काही न्यास यावर काम करतात.
रुग्णाच्या नातेवाईकांनी हे स्वीकारणं गरजेचं असतं की आता उपचार शक्य नाहीत. कर्करोग शेवटच्या टप्प्यात गेला की असह्य वेदना होतात. आता मॉर्फिन ही औषधं आहेत, त्यांचे स्किन पॅच आलेत. ते व्यक्तीच्या पाठीवर, छातीवर, खांद्यावर लावले की पुढचे २४-७२ तास मरणांत वेदनाही शून्यवत होतात. याकरता सामाजिक गट तयार होण्याची गरज आहे. व्यवसाय म्हणून हे करणं, नीतीमत्ता म्हणून चूक वाटतं. मरणाच्या एवढ्या जवळ आलेल्या लोकांकडून पैसे घेणं चूक वाटतं. मुंबईत या गोष्टी माफक किंमतीत करतात.
याकरता बऱ्याचशा वस्तू तात्पुरत्या मिळतात. यासाठी माणसं मिळतात, परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी लागतात. तोही मोठा खर्च आहे. पण हे दिवसेंदिवस वाढत जाईल.
हा विचार सनातन आहे. लोकांना ते पटतंच असं नाही. पण मृत्यू अटळ आहे, आपण ते मान्य करतो. आपल्याकडे प्रायोपवेशन, संथारा अशा रूढी आहेत. समंजस लोकांत ही वृत्ती आहे की आता काही होणार नाही, आम्हांला कमीतकमी त्रास होईल आणि शांतपणे जाता येईल यासाठी काही करा. माझ्या मर्यादेत राहून काही रुग्णांची अशी सेवा मी करतो; पण हे चमूचं काम आहे.
(आणि प्रश्न विचारणारे भूषण पानसे आमच्या मुलाचे मित्र असल्यामुळे हा चांगला प्रश्न होता, असं म्हणलं पाहिजे.)
ऐसी अक्षरे - (बलभीमराव खोमणे, FDAमध्ये औषधनिर्माते आणि वरिष्ठ अधिकारी होते; आता निवृत्त झालेत.)
करोनाकाळात विविध औषधांच्या वापरांवरून खूप मतंमतांतरं झाली. आधी औषधं वापरली, मग ती निरुपयोगी ठरली. रेमडेसिव्हीर हे एक उदाहरण झालं. डॉ. विश्वरूप राय यांनी निसर्गोपचार पद्धती वापरून, करोनाच्या ५५,००० गंभीर रुग्णांना बरं केलं. त्यांनी मुलाखत वगैरे दिली आहे. हे उपचार साधे आहेत, उपचार नाहीतच खरं तर. फळांचा रस, फळं, मोड आलेली कडधान्यं देऊन त्यांनी करोना बरं केला आहे.
प्रश्न असा की करोनासंबंधातली शासनयंत्रणा याकडे लक्ष का देत नाही?
तसेच राजपूरचे डॉ. गोळवलकर, त्यांनी मिथिलीन ब्लूबद्दल सांगितलं आहे. शासन त्याबद्दल काही बोलत नाही, त्यामुळे लोकांची दिशाभूल होते. याबद्दल तुम्ही काही म्हणाल का?
ऐसी अक्षरे - (पत्रकार राजेंद्र साठे यांचा प्रश्न)
आयुर्वेदात हजारो वर्षांपासून काही वस्तूंचे औषधी गुणधर्म आहेत हे मानलं जातं, पण त्यात त्यांनी संशोधन केलेलं नाही असं म्हणतात. भांडवल यात का उतरत नाही?
डॉ. पंडित - खोमणे कठीण प्रश्न विचारणार, अशी शंका होतीच मला!
एक तर माझा निसर्गोपचाराशी प्रत्यक्ष संबंध नाही. दुसरं, हा विषय वेगळ्या खात्याकडे आहे. आधुनिक वैद्यकाची सूत्र Family Welfare and health खात्याकडे आहेत. वैद्यक शिक्षणाचं खातं निराळं, आयुष मंत्रालय निराळं.
आधुनिक वैद्यक हे मृत शास्त्र नाही, हे उत्क्रांत होत जातंय. त्यामुळे पुरावे मिळतात तशा चुका सुधारल्या जातात. माझी पदवी आधुनिक वैद्यकातली असली त्याकरता केलेलं संशोधन, प्रबंध एका आयुर्वेदिक औषधावर होतं. … त्याचा दम्यातला उपयोग. त्यावर प्रचंड काम झालंय. आयुर्वेदातल्या पान, फूल, फळ, आसवं, सगळ्यांवर प्रचंड काम झालंय. त्यात फार काही न सापडल्यामुळे आयुर्वेदाची चिकित्सा 'आम्ही' करण्याऐवजी 'त्यांनी' करावी. आयुर्वेदाची कुंडली निराळीच आहे, रुग्ण आणि आयुर्वेदाची कुंडली जुळली तर ते उपचार घ्यावेत. नाही तर आधुनिक वैद्यक शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली आहे.
आयुर्वेदिक संशोधनावर सरकारनं खूप पैसा ओतला आहे. माझ्या गुरुवर्यांनी डॉ. श्रोत्री, डॉ. जोगळेकर या लोकांनी आयुर्वेदाच्या औषधशास्त्रावर काम करायचं म्हणून बाकीच्या उपशाखांमधल्या संधी सोडून औषधशास्त्र घेतलं. गूगलूनही अशा सगळ्या संशोधनाची माहिती सापडेल. आयुर्वेदिक कंपन्यांकडे फार भांडवल नाही, अशीही परिस्थिती नाही.
सामंजस्याची भूमिका अशी घेता येते, जे जे उपयुक्त आहे, त्याची उपयुक्तता सिद्ध करून आपण ते वापरलं पाहिजे. पण अशा गोष्टींचे दावे खूप होतात. आधुनिक वैद्यकात निदान असं म्हणलं जातं की हे उपयोगाचं नाही. उत्तर म्हणून मीच प्रश्न विचारतो, "आधुनिक वैद्यक सोडून इतर कुठल्या उपचारपद्धती आहेत, ज्यांनी आमच्या या औषधाचा करोनामध्ये उपयोग होत नाही? असं जाहीरपणे सांगितलं? आधुनिक वैद्यकातील काही औषधांच्या बाबतीत हे सांगितलं गेलं."
वादविवादामधला हा माझा शेवटचा मुद्दा!
मुलाखतीसाठी डॉ. पंडित यांचे आभार.
प्रतिक्रिया
मुलाखत चांगली झाली आहे.
डॉ. पंडित किंवा जे कोणी त्या वैद्यकीय उपचार शाखेचे अभ्यासक असतात त्यांना इतर प्रश्न विचारण्यात अर्थ नसतो. बाकी सरकार, त्यांची डिपार्टमे़ट्स आणि भत्ते हेसुद्धा वेगळे विषय आहेत.
बाकी आयुर्वेदातील औषधे कशी शोधली त्या काळी हा मोठा गहन विषय आहे. फक्त त्यांचे प्रचारक कमी आहेत.
आयुर्वेदाचे प्रचारक कमी आहेत
आयुर्वेदाचे प्रचारक कमी आहेत असं तुम्हाला खरंच वाटतं ?
रामदेव ते परीक्षित शेवडे व्हाया बालाजी तांबे हे काय नक्की असावेत ?
सध्या व्हाट्स app विद्यापीठात सर्वात जास्त बोलबाला त्यांचाच आहे असं नाही वाटत तुम्हाला ?
आता तेही आयुर्वेदिक औषधांचा प्रचार करत नसतील तर अजून कोण करणार ?
प्रथम नवीन आधुनिक उपचार घ्या आणि मग आयुर्वेदिक घ्या -
असा सल्ला दिला जातो. तोच चुकीचा प्रचार. तो खोडणे अवघड आहे.
प्रथमच आयुर्वेद घ्या आणि तोच घ्या असा कुणी विश्वासाने सल्ला देत नाही. आणि हल्ली ठामपणाने कुणी काही करत नाही.
ही एक जालीम पुडी सोडली आहे. पंडित थोडे अधिकच प्रचार करत आहेत. कोणते काम झाले आहे, चालू आहे याची लिंक देतो.
बाकी इथेच थांबतो कारण हे व्यासपीठ नाही.
एका साध्या आणि सरळ वाक्यात
एका साध्या आणि सरळ वाक्यात तुम्हाला जालीम पुडी काय सापडली कळेना.
आयुर्वेदातील कामाची चिकित्सा आयुर्वेद शिकलेल्या जाणत्या माणसांनी करावी असे म्हणणे यात पुडी काय कळले नाही.
आता डॉ पंडित नक्की कसला 'प्रचार' करत आहेत असं तुम्हाला वाटलं आणि का ?
तुमचा आधुनिक वैद्यकावर विश्वास नसेल तर ठिके (त्यावर औषध नाही)परंतु म्हणून त्या विषयातील जाणकार व्यक्तीने दिलेली माहिती व कारणमीमांसा याला प्रचार म्हणणे गंभीर वाटते.
मला पटाईत काकांची आठवण झाली.
असो.
“प्रथमच आयुर्वेद घ्या आणि तोच
“प्रथमच आयुर्वेद घ्या आणि तोच घ्या असा कुणी विश्वासाने सल्ला देत नाही. आणि हल्ली ठामपणाने कुणी काही करत नाही.”
कारण तसे केल्यास मोठ्या प्रमाणात लोक मरतील!
डॅा पंडितांनी फारच संयत शब्दांत टीका केली आहे.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
आणखी एक पुडी
कारण तसे केल्यास मोठ्या प्रमाणात लोक मरतील!
?
उद्या “सूर्य पूर्वेला उगवतो” यालाही तुह्मी “पुडी” ह्मणाल, पण ह्मणून ते असत्य ठरणार नाही. करोनावर जगातील सर्वांनी प्रथमपासूनच आणि केवळ आयुर्वेदिक उपचार घेतले असते, तर “कफ, वात, पित्त” असा आपापल्या भाषेत आक्रोश करत कोट्यवधी लोक टाचा घासत मेले असते. बहुतकरून तुह्मीआह्मीही. बालाजी तांबेनाही करोना झाला आणि शेवटी दीनानाथ मंगेशकर हॅास्पिटलात आधुनिक वैद्यकीय उपचार घेण्यास दाखल झाले.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
बाकी सर्व ठीक, परंतु...
“सूर्य पूर्वेला उगवतो” हे विधान (निदान अंशतः तरी) “पुडी” कॅटेगरीत मोडू शकेल. कारण, ते वैश्विक सत्य नाही.
एकदा उत्तर (किंवा फॉर्दॅट्मॅटर दक्षिण) ध्रुवावर पाऊल ठेवून पाहा, नि मग तेथून सांगा मला, की सूर्य पूर्वेला उगवतो, म्हणून.
बालाजी तांबे वैद्य होते?
बालाजी तांबे पंचकर्म करायचे ना? संस्कृत भाषेचा अभ्यास, जर्मन भाषा, जर्मनीत सतत जाणे आणि तिकडे योग किंवा प्रवचन किंवा इतर कार्यक्रम सतत चालवायचे ते. (लोणावळा - मळवली इथे कायमचे केंद्र, श्रीवर्धन इथे हल्लीच एक सुरू करणार होते. )
थोडे अवांतर होतंय.
छिद्रान्वेष
आपण सगळेच मरणार आहोत.
आधुनिक वैद्यकाशिवाय भारताचं सरासरी आयुर्मान फार कमी राहिलं नसतं. गूगलून आकडे दिसले, दर दहा वर्षांत भारतीयांचं सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढत आहे. म्हणजे २०१० सालात जे लोक मरण पावले त्यांचं सरासरी वय होतं ६६.६९, २०१९मध्ये होतं ६९.६६.
इथे काही आलेख सापडतील. मी फक्त गूगललं - India life expectancy. त्या आलेखातून आकडे सहज दिसतात.
आणि मोठ्ठी सहमती - डॉ. पंडितांनी संयत शब्दांत टीका केली आहे; मला म्हणूनच डॉक्टरांची मुलाखत ऐकून काही नवीन समजलं, शिकण्याचा आनंद मिळाला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आधुनिक वैद्यक शास्त्र नी माणसाचे आयुष्य वाढले आहे
ते आकडे फसवे आहेत.ह्यांचा जन्म 1940 ते 70 पर्यंत झाला आहे त्यांची आकडेवारी देणे म्हणजे फसवणूक आहे.
कारण ही पिढी मुळातच निरोगी जीवन जगली आहे.आहार,विहार,ह्या पिढी चा उत्तम होता.
आता 2000 साला नंतर ह्यांचा जन्म झाला आहे त्यांचे आयुष्य 50 च्या आत च असेल.आधुनिक वैद्यक शास्त्र त्यांचे आयुष्य वाढवू शकणार नाही.
Heart attack, कर्क रोग,मधुमेह हे पन्नाशी नंतर होणारे आजार आता वयाच्या 20 व्या वर्षी च होत आहेत..
21 वर्षाच्या मानवाचे 32 दात पण तोंडात नाहीत अशी अवस्था आहे
जे पूर्वी मरे पर्यंत तोंडात सर्व दात असायचे.
21 वर्षाच्या मानवाचे 32 दात पण
2021 सालात 21 वर्ष वय असणार्या मानवांचे सरासरी किती दात शाबूत आहेत याबाबतचा विदा आपल्याकडील विदामहासागराचे मंथन करून कृपया सादर करावा म्हणजे तो आधुनिक वैद्यकशास्त्राची भलावण करणार्या नतद्रष्टांच्या तोंडावर मारून त्यांचे उरलेसुरले दात त्यांच्याच घशात घालता येतील.
कॅामिक रिलीफपुरतेच
त्यांचा हा प्रतिसाद काय आणि कुठलाही, कॅामिक रिलीफ पुरवण्यासाठीच असतो. आता त्या प्रतिसादांचे हसू आपल्याला येत नाही, ही त्यांची चूक नव्हे. किंवा एकूणच हा ट्रोल करण्याचा एक नावीन्यपूर्ण प्रकार असू शकेल. खरे काय ते तेच जाणोत!
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
:)
ईथे कशाला वाद चालला आहे
आयुर्वेद चे उपचार ज्यांना पसंत आहेत ते ते उपचार घेतील.
शरीर कसे निरोगी राहील ह्याची चर्चा आयुर्वेदात आहे.आणि उपचार पण आहेत खूप लोक आधुनिक उपचार घेत नाहीत कारण त्याचे साईड इफेक्ट असतात .
राहिला परिणाम च.
आधुनिक औषध घेवून,उपचार घेवून पण लोक आजारातून बरी होत नाहीत.corona काळात लोक उपचार मुळेच मेली.उपचार नसते केले तर जगली असती.
मॉडर्न वैद्यकीय उपचार चांगले असे कोणी ठाम पने बोलू नये.
गच्छंति
गमन
मुलाखत
मुलाखत माहितीपर आहे. पूर्वीप्रमाणेच त्या त्या प्रश्नांबद्दलची थोडक्यात शास्त्रीय माहिती, नेमक्या अन (आमच्यासारख्या त्या क्षेत्राबाबत अडाण्यांना) समजेल अशा पद्धतीनं मिळाली. मराठीत असं काही गवसलं की बरं वाटतं.
प्रतिसादांपैकी हा भाग थोर मास्टरपीस आहेय --
गरज ही शोधाची जननी : आधुनिक वैद्यक संशोधनाचा संक्षिप्त आढावा
आयुर्वेदिक औषधे कशी शोधली ---इत्यादी
यातील 'कशी' याची चर्चा झाली नाही. उत्तर
आणि त्याचे प्रचारक किंवा संदर्भ दिल्यास
आभारी.
गरज ही शोधाची जननी?
माणसाची जीज्ञासा वृत्ती ,माणसाच्या मेंदू ची कल्पना करायची विलक्षण ताकत, ह्या दोन गोष्टी च शोधाच्या जननी आहेत.
काहीच गरज नसताना ,ध्यानी मनी पण नसताना अपघाताने च अनेक महत्वाचे शोध लागले आहेत.
आता व्यापारी वृत्ती वाढल्या मुळे गरज असेल त्याच क्षेत्रात संशोधन होते आणि शोध पण लावले जातात.
आर्थिक फायदा देणारी गरज कोणती हाच प्रश्न महत्वाचा?
'गरज ही शोधाची जननी' वगैरे
'गरज ही शोधाची जननी' वगैरे जरा वि स खांडेकरी वाक्य आहे. ते प्रुव्ह करता येणार नाही. तुम्ही म्हणताय तसे आहे. - माणसाची जीज्ञासा वृत्ती ,माणसाच्या मेंदू ची कल्पना करायची विलक्षण ताकत, ह्या दोन गोष्टी च शोधाच्या जननी आहेत.
बरोबर!
"आयुर्वेदिक संशोधनावर सरकारनं खूप पैसा ओतला आहे."
कुठलीही आयुर्वेदिक कंपनी वर्षाचे दीडशे दोनशे कोटी संशोधनावर खर्च करू शकत नाही. ही परिस्थिति आहे आयुष मंत्रालयाची स्थापनाच 2014 मध्ये झाली. अजूनही सरकारचे 98 टक्के बजेट फक्त अलोपथीसाठी आहे. तुलनात्मक दृष्ट्या सरकारी संस्थांनी आयुर्वेदावर जवळ जवळ न च्या बरोबर संशोधन केले आहे.
तरीही आज पतंजलि जवळ देशातील सर्वात उन्नत प्रयोगशाळा आहे. 500 scintist तिथे कार्यरत आहे. कारण ते आपल्या लाभांशच्या 70 टक्के रिसर्च वर खर्च करू शकतात. (non-Profit company). चार वर्षांच्या कालावधीत तिथे आयुर्वेदावर भरपूर संशोधन झाले आहे आणि त्यांचे अंतराष्ट्रीय मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित ही झाले आहे. नवीन आयुर्वेदिक औषधांची निर्मिती ही झाली आहे. संशोधनाच्या आधारावरच कोरोनिल हे औषध निर्मित झाले आहे. आधुनिक वैद्यक शास्त्र म्हणजे प्रमाण आधारित शास्त्र अर्थात प्रमाण आधारित औषधी मग कुठल्याही पैथीची का असेना. नुकतेच Journal of Separation च्या मुखपृष्ठा वर या औषधला स्थान दिले.
https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fanalyticalsciencejournals.o...
डॉक्टर पंडित प्रमाण असूनही आयएमए अधिकान्श डॉक्टरांनी या औषधीचा विरोध का केला. हेच औषध जर आलोपैथि फार्मेसी ने बनविले असते तर केंव्हाच प्रोटोकॉल मध्ये स्थान मिळाले असते.
आयएमए सारख्या मेडिकल माफियाने औषधी बाबत गरळ ओकून लोकांना भ्रमित केले. हजारो डॉक्टर आणि रोगी मरण पावले. दोषी कोण?
विज्ञान आधारित मत द्या।
बाकी चालू द्याच...
पटाईत काका, आपले मतभेद कायमच राहतील हे गृहीत धरूनच काही प्रश्न विचारते.
१.
ही आयुर्वेदिक औषधं परिणामकारक असतात, असं सध्या गृहीत धरू. या औषधांनी रोग बरे होतात, आणि त्यांचा दुष्परिणाम नगण्य असतो किंवा नसतोच. म्हणजे ही औषधं बाजारात आली तर औषध कंपनीचा फायदाच फायदा. डॉक्टरांनी ही औषधं रुग्णांना दिली तर त्यांचाही, कारण मग डॉक्टरांच्या हातगुणाला श्रेय मिळणार.
तरीही या औषधांकडे कुणी औषध कंपन्या ढुंकून का बघत नसतील? ते लोक तर बोलूनचालून नफेखोर. तरीही ते या औषधांच्या मागे का जात नाहीत?
२.
डॉक्टर लोक मेले असं तुम्ही म्हणताय? आयुर्वेदिक औषधं खाऊन डॉक्टर लोकांना अमरपट्टा मिळतो का? डॉक्टर लोक मरतच नाहीत का? पतंजलीचा रामदेवबाबा कधीच मरणार नाहीये का? माणसं कधी तरी मरतात, त्यामागे नैसर्गिक कारण नसतंच का? तसं असेल तर दोषी कुणाला आणि का धरायचं? ते आयुर्वेदिक ग्रंथ वगैरे लिहिणारे लोक कसे काय मेले? त्यात दोष कुणाचा?
बाकी चालू द्यात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वृद्धाश्रमांत लागण.
त्यांनी लस घेतली नसेल का? पण त्या वयाला कवचकुंडलंसुद्धा पेलत नाहीत.