चडफडकरांची चडफड
(मूळ प्रकाशन: "माहेर" दिवाळी अंक २०२०)
सायंकाळची वेळ होती. तिरपे सोनेरी सूर्यकिरण सारे माळरान उजळून टाकत होते. पक्ष्यांची सुस्वर किलबिल चालू होती.
गुहेबाहेरचा खडक सरकवून लांबनाक आत गेला. छोटूच्या ग्राफिटीकडे क्षणभर बघून तो स्वतःशीच हसला, आणि मग कोपऱ्यातील विस्तवाजवळ जाऊन काहीतरी शोधू लागला. तिथे सापडले ते पाहून (खरंतर सापडले नाही ते न पाहिल्यामुळे) त्याचा पारा चढला, आणि तो रागाने म्हणाला,
"बटरटरखभदरघरचरठब?"
लांबनाकच्या भाषेत क्रियापदं, शब्दयोगी अव्ययं, विभक्तीप्रत्यय, अगदी "अ"शिवाय इतर स्वर यांचा अद्याप शोध लागला नव्हता. पण त्याच्या बोलण्याचा मतितार्थ असा होता:
"माझ्या वल्कलांवर हरणाचं रक्त सांडलं होतं,
आणि मी वल्कलं धुवायला ओढ्यावर गेलो होतो,
मॅमथच्या बरगडीवर सोललेले तितर ठेवून
तू माझ्याकडे आला होतास,
तेव्हा विस्तवापाशी कोण होतं?
कोण होतं?
मी होतो? तू होतास?
मी होतो? तू होतास? कोण होतं?"
भयचकित छोटू म्हणाला,
"धशफठ."
(क्रियापदं, शब्दयोगी अव्ययं, विभक्तीप्रत्यय, अगदी "अ"शिवाय इतर स्वर हे काही नसलं तरी धशफठ हेच धशफठचं नाव होतं.)
लांबनाक किंचाळू लागला,
"चदथझङछर!"
मतितार्थ:
"तो धशफठ होता!
मॅमथच्या बरगडीवरून सोललेले तितर काढून ठेवले.
आणि नुसतीच बरगडी विस्तवावर ठेवून दिली.
ठेवून दिली!
ठेवून दिली!
ठेवून दिली!"
पण लांबनाक शीघ्रकोपी असला तरी विवेकी होता. आपला आरोप खरा असता तर कच्चे तितर तरी दिसले असते, हे त्याच्या लक्षात आलं. आणि तेही न दिसल्याने आता त्याच्या डोक्यात संशयपिशाच्च थैमान घालू लागलं.
धशफठचा हात धरून त्याला खेचतच लांबनाक ओढ्यापाशी घेऊन गेला. धशफठला परिस्थितीचं आकलन झालं होतं. त्यानं झाडाचा पोखरलेला बुंधा ओढ्यावर लोटला आणि बुंध्यावर चढून तो शांतपणे गाऊ लागला,
"म ततर खल तर बड बड बध"
मतितार्थ: "मी तितर खाल्ला तर बुड बुड बुंधा!"
ओढ्याचं पाणी फारतर फूटभर खोल होतं त्यामुळे तशी रिस्क नव्हतीच. पण भाषातज्ञ धशफठने तितर खरंच खाल्ले नव्हते, त्यामुळे बुंधा तरंगत राहिला. धशफठने ओढ्याच्या काठावर उडी मारली, आणि बुंधा खेचून बाहेर काढला.
लांबनाकने धशफठची माफी मागितली. धशफठने बुंधा काळजीपूर्वक उचलला आणि जवळच्या डोंगराच्या माचीवर नेऊन ठेवला. माचीवरला बुंधा अनिमिष नेत्रांनी पाहत तो परतला.
लांबनाक आणि धशफठ गुहेपाशी गेले. किती तितर हरवले होते याबद्दल छोटूने पृच्छा केली तेव्हा धशफठ गाऊ लागला,
"ततर क द अग ततर,
ततर क द पछ ततर,
बल कतन ततर"
धशफठ केवळ भाषातज्ञ नव्हे, तर शीघ्रकवीही होता.
रात्र झाली होती. थोडी कंदमुळे आणि कवक (हा शब्द स्वरांचा शोध लागण्यापूर्वीचा आहे) खाऊन सर्वजण निद्राधीन झाले. हरवलेल्या तितरांचे रहस्य उलगडणे दुसऱ्या दिवशीसाठी ठेवून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
दुसऱ्या दिवशी लांबनाकला अंमळ उशीराच जाग आली.
पहाटेची वेळ होती. तिरपे सोनेरी सूर्यकिरण सारे माळरान उजळून टाकत होते. पक्षांची सुस्वर किलबिल चालू होती. गवतफुलांमध्ये फुलपाखरे आणि झुरळे बागडत होती. दूरवर पर्जन्यछायेच्या प्रदेशात निरखून पाहिल्यास निगूढ गीते गाणाऱ्या तीस अंधुक आकृती दिसत होत्या. ते का निअँडरथल होते?
लांबनाक आणि धशफठ यांनी पश्चिम दिशेला कूच करायला सुरूवात केली. शीघ्रकोपी आणि शीघ्रकवी यांची ती आगळी दुक्कल झपाट्याने अंतर कापत होती. मध्यान्हीचा सूर्य डोक्यावर येऊन सावली पायाखाली पडून दिशा समजणे थांबेल त्याआधी आपल्या ईप्सित स्थळी पोहोचण्याचा त्यांचा निर्धार होता. आणि स्थानिक प्रमाणवेळेनुसार पावणेबारा वाजता ते बकर घळ येथे पोचलेदेखील.
त्यांची समस्या ऐकताच प्रख्यात डिटेक्टिव्ह तळवलकर आणि त्यांचे सन्मित्र चडफडकर हे दोघे लांबनाक आणि धशफठ यांसोबत घटनास्थळी येण्यास निघाले. तळवलकर चडफडत होते, "गुन्हा घडताक्षणीच तुम्ही मला बोलवायला हवं होतं. मधल्या काळात लोकरी गेंड्यांचा कळप तिथून गेला असेल तर सगळे धागेदोरे नष्ट होतील की!" (हे मतितार्थात भाषांतर आहे. नुसत्या स्वादिष्ट व्यंजनांचा आता कंटाळा आला.)
घटनास्थळी पोहोचताच तळवलकरांनी तपास सुरू केला. त्यांना कामात व्यत्यय आलेला चालत नसे, म्हणून सर्वांना त्यांनी गुहेबाहेर पिटाळले.
सर्वप्रथम त्यांनी गुहेतील पायांचे व हातांचे ठसे पाहायला सुरुवात केली. "प्रागैतिहासिक प्राणिविश्व" हा त्यांचा आवडता संदर्भग्रंथ त्यांनी सोबत आणला होताच. सर्वप्रथम त्यांना लांबनाक, छोटू आणि धशफठ यांचेच ठसे आढळले. त्यानंतर तैगातील हरणे, लोकरी मॅमथ, तरस इत्यादींच्या पायांचे ठसे दिसून आले. क्वचित निअँडरथल, होमो हॅबिलिस आणि ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिस यांच्या हातांचे ठसेही दिसत होते. तळवलकर खणत गेले तसतसे त्यांना बृहत्कायोसॉरस आणि स्टेगोसॉरस यांच्याही पाऊलखुणा दिसू लागल्या तेव्हा त्यांनी उत्खनन थांबवले. अचानक त्यांच्या तल्लख मेंदूत एक विचार आला आणि ते विस्तवाच्या जवळच्या राखेत काहीतरी शोधू लागले.
इथे गुहेबाहेर आल्यावर चडफडकर गुहेतील रहिवाशांशी बोलू लागले. सर्वप्रथम टाऊनहॉल घेऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली,
"मितरांनो आणि इतरांनो, आज आपण येथे जमलो आहोत ते तितरांच्या चोरीचा छडा लावण्यासाठी. यासाठी तुमचे संपूर्ण आणि सक्रिय सहकार्य आवश्यक आहे.
या संदर्भात तुम्ही जी काही माहिती द्याल ती पूर्णपणे गोपनीय राहील याची खात्री बाळगा. मला काहीही सांगणे तुम्हाला बंधनकारक नाही, पण तुम्ही काही सांगितले तर त्याचा तुमच्याविरुद्ध वापर होऊ शकतो.
आता एकेक करून मी तुमच्याशी संवाद साधू इच्छितो."
छोटू म्हणाला, "मला लांबनाकचाच संशय येतो. आम्हां तिघांसाठी तीन तितर होते. पण लांबनाकचा संपत्तीच्या समान वाटपावर विश्वास नसला तर? त्यानेच तिन्ही तितर खाल्ले असतील तर?"
चडफडकर म्हणाले, "सोपं आहे. त्याला मारून त्याचं पोस्टमार्टेम करूया. त्याच्या जठरात तितराचा अंश आढळला तर तुमचा संशय खरा ठरेल."
नंतर ते लांबनाकशी बोलायला गेले.
"मला छोटूचाच संशय येतो. भित्तीचित्रं काढण्याच्या नादात त्यानेच तितर खाऊन टाकले नसतील ना?"
चडफडकर म्हणाले, "सोपं आहे. त्याला मारून त्याचं पोस्टमार्टेम करूया. त्याच्या जठरात तितराचा अंश आढळला तर तुमचा संशय खरा ठरेल."
नंतर ते धशफठशी बोलायला गेले.
"मला स्वतःचाच संशय येतो. माझं दुभंगलेलं व्यक्तिमत्व असेल आणि सुप्त व्यक्तिमत्वाने तितर खाल्ला असतील तर? आणि बुंधा बुडायची टेस्ट ही शेवटी मानसशास्त्रीय आहे. गिल्टी काॅन्शन्स असला तर माणसाचं संतुलन बिघडणार आणि मग बुंधा बुडणार. मुख्य व्यक्तिमत्वाला घटनेची कुणकुणही नसल्याने बुंधा बुडाला नाही, असंही असू शकेल."
चडफडकर म्हणाले, "सोपं आहे. तुम्हाला मारून तुमचं पोस्टमार्टेम करूया. तुमच्या जठरात तितराचा अंश आढळला तर तुमचा संशय खरा ठरेल."
चडफडकर आपला अशुलियन परशू परजू लागले तेवढ्यात तळवलकर गुहेबाहेर आले आणि विजयी मुद्रेने म्हणाले, "चोराचा सुगावा लागला!"
सर्वजण एकदमच म्हणाले, "तो कसा काय बुवा?"
"हा केस मला विस्तवापाशी आढळला. म्हणजे चोर घरचा नाही, बाहेरचा आहे."
चडफडकर म्हणाले, "असं कसं, या तिघांपैकी कुणाचा केस असू शकतो."
तळवलकर हसून म्हणाले, "पहिली गोष्ट म्हणजे हे तिघे ब्लॉन्ड, ब्रुनेट, आणि रेडहेड आहेत - पण केस करडा आहे. आणि दुसरं म्हणजे हा शेपटीचा केस आहे."
छोटू उत्साहाने म्हणाला, "काल सकाळी मी बघितलं होतं - शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा! त्यातलाच कोणीतरी चोर असणार."
"चला तर! सभेचं सूप अद्याप वाजलं नसणार. जाऊन तपास करूया." तळवलकर म्हणाले, आणि सर्वांनी त्यांना अनुमोदन दिले.
काही कोस चालल्यावर त्यांना सभेत स्थानापन्न झालेले प्राणी दिसले. त्यांच्या रंगांचे दुरूनच विश्लेषण करून तळवलकर म्हणाले, "तो करडा तरसच चोर आहे."
लांबनाकने तात्काळ दोर फेकून तरसाला पकडले.
धशफठ गाऊ लागला,
"साधाभोळा दिसतो हा तर साला,
कसे पकडले चोर तरसाला"
छोटू म्हणाला,
"इसने पापी पेट के लिये किया रहेगा! तरस खाओ!"
मग सगळ्यांनी तरस खाल्ला.
तरसाच्या जठरात तितराचा अंश आढळला नाही. पण काय फरक पडतो? चडफडकरांची चडफड झाली, पण त्यांनी ती दिसू दिली नाही.
प्रतिक्रिया
.
हा मनुष्य यज्ञात झोपणारा आहे.
(कथा आवडली.)
==========
(बादवे: 'मतितार्थ' नव्हे. 'मथितार्थ'. आणि, 'तज्ञ' नव्हे. 'तज्ज्ञ'. परंतु ते असो.)
छे हो
संपूर्ण Yज्ञसंस्था Zटपट
नष्ट करू पाहतोय
मलाही कथा आवडली.
झटपट पद्धतशीर कथा उकलण्याचा / उरकण्याचा हातखंडा आहे. कुणाची चडफड झाली तरी त्यांना देणेघेणे नसते.
ते तर खरेच, परंतु…
ते तर आहेच, परंतु तुलनेने तो तितकासा महत्त्वाचा मुद्दा नाही. कथेत (खरे तर narrationमध्ये) appreciate करण्यासारख्या इतक्या जागा आहेत, की प्रत्येकीस जर दाद देत बसलो, तर कथेपेक्षा प्रतिसाद लांब होईल. त्यामुळे, तूर्तास केवळ ‘आदाब!’ एवढेच म्हणून गप्प बसतो.
अवांतर पृच्छा
हा भाग ‘माहेर’ दिवाळी अंक-२०२०मधील वरिजनल, की ‘ऐसी’वर पुन्हा छापण्याअगोदर ex tempore, ad lib केलेला?
जुन्या एखाद्या गोष्टीवर नवीन पेरणे
यामध्ये गोष्टीची निवड आवडली. शेपटीवाल्या प्राण्यांची सभा हे गाणेही आले.
खरं तर कोकणातल्या दशावतार नाटकात पौराणिक यम, रावण, किंवा इतर पात्रे आणि प्रसंग घेऊन नवीन घटना पेरतात. ते एक पारंपरिक लोकनाट्य म्हणेन चालू ठेवायला हवेच परंतू तोच तोचपणा आला आहे.
लेखकाने ते टाळलं आहे. कल्पनाशक्ती लढवली आहे.
कथा
कथा खूपच आवडली. तितर वरच्या गाण्यातून थेट समगरवल आठवली, त्यामुळे एकदम मरनमजकर चा तो सीन आठवला.
असो. - तरशगरवमणसघण.
तरस जाते जिवानिशी आणि खाणारे
तरस जाते जिवानिशी आणि खाणारे रडतात तित्तर गावले नाही.
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?
(बादवे…)
‘धशफठ’ नाव आवडले.
तेव्हा विस्तवापाशी कोण होतं?
हे मस्त.
- ओंकार.
(अवांतर)
'अ'शिवाय इतर स्वरांचा शोध लागलेला नसतानाच्या काळात बंगाली आदिमानवांचे कसे होत असेल, असा विचार मनात आला, नि (बंगाली आदिमानवांबद्दल) काळजी वाटली.
एक निरीक्षण... (अवांतर)
१. कथा 'माहेर'मध्ये पूर्वप्रकाशित आहे.
२. कथा पूर्णपणे स्त्रीपात्रविरहित आहे.
Chutzpah वाखाणण्याजोगा आहे.