Skip to main content

शेजारच्या मावशी-काकांचा संवाद

संध्याकाळची वेळ. घरीच, गुबगुबीत खुर्चीत बसून, दिवसभर झूम कॉल्सवर बोलून आणि कीबोर्ड बडवून मावशी दमलेल्या आहेत. काका त्याच घरात राहत असले तरी वेगळ्या टाईमझोनमध्ये असतात; त्यामुळे त्यांची उशिरा (दमायला) सुरुवात होते.

ताटातल्या वाफवलेल्या ब्रोकलीवर वितळलेलं चीज ओतत मावशींनी काकांकडे बघितलं. "तुला चीज हवंय?" उत्तर आलं नाही. मावशींनी चीज बाजूला ठेवून काटा ब्रोकलीत खुपसला.

मावशी : तुला मिहीर आठवतो का?
काका : आठवत नाही.
मा : अरे, तो नाही का? आपल्याकडे आला होता?
का : आठवत नाही.
मा: तो उंचापुरा, दणकट मुलगा ...
का : आठवत नाही.
मा : तो बघ ना, आपण त्याच्याबरोबर त्या गुहा बघायला गेलो होतो?
का : कुठल्या गुहा?
मा : आठवत नाही.
का : ...
मा : गुहा कुठल्या ते महत्त्वाच्या नाहीत. पण आपण गेलो होतो.
का : आठवत नाही.
मा : तो बघ ना, कॉन्फरन्ससाठी आला होता?
का : आठवत नाही.
मा : ती कॉन्फरन्स 'डोमेन'मध्ये होती?
का : (ब्रोकलीत काटा खुपसला.)
ब्रोकलीवर चीज नव्हतंच. वितळलेलं चीज पुन्हा घट्ट व्हायला लागल्याचं मावशीनं बघितलं. मावशींना आवराआवर करायची नसते. मावशींनी स्वतःच्या ताटाकडे लक्ष केंद्रित केलं.

मा : आपण त्या इटालियन ठिकाणी जेवायला गेलो होतो?
का : कुठलं इटालियन?
काकांना इटालियन फार आवडत नाही. त्यावर वितळलेलं चीज असतं. पण ब्रोकलीबरोबर खायला केसो नसेल तर... या विचारानं खरेदी करताना काकांचा जीव अर्धाअर्धा होतो.
मा : आठवत नाही.
का : (शांतपणे खात होते.)

मा : ... तो एक रात्र घरी राहिला होता... त्याला तिर्रूपासून लांब राहायचं होतं?
का : मग ती गेली होती का त्याच्याजवळ?
मा : तुला आठवला तो?
का : आठवत नाही.
मा : रात्री आपला पंखा त्याच्यावर ओरडायला लागला?
का : हो, बरं झालं पंखा बदलला ते!
मा : ... आणि तो एवढा गरीब आहे की त्यानं तक्रारसुद्धा केली नाही.
का : आठवत नाही.

मा : आपण 'एमीज'मध्ये गेलो होतो, आईस्क्रीम खायला?
का : आठवत नाही... नाही, मला जेन आणि डेव्हिडबरोबर गेलो होतो ते आठवतंय.
मा : ते आपण दोनेक महिन्यांपूर्वीच गेलो होतो. ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची.
का : आठवत नाही.

मा : तू नेहमी सगळ्याला 'आठवत नाही' असंच उत्तर देतोस का?
का : आठवत नाही.
मा : 'नॉटिंग हिल' गेला नेटफ्लिक्सवरून!
का : आपण डीव्हिडी नाही का घेतलेली?
मा : मी तुला एवढे प्रश्न का विचारत्ये, असा प्रश्न नाही का पडला तुला?
का : मी अजूनपर्यंत टीव्हीवर काही लावलेलं नाही म्हणून तू नवी पद्धत शोधून काढल्येस.

मा : नाही रे, मिहीर पोस्टडॉक करायला जाणारे, हे समजलं आज. ते सांगायचं होतं.
का : मग असं सांग ना, तो पीएचडी करत होता तो!
मा : आठवला तुला?
का : नाही. पण पीएचडीशिवाय पोस्टडॉक कसं करणार?
मा : बरोबर आहे तुझं.

मा : तिर्रूपासून लांब राहू पाहणारा, हेही तुला आठवलं नाही? तुझ्या मुलीबद्दल असं म्हणाला तो!
का : मी इटालियनमुळे डिस्ट्रॅक्ट झालो. डिस्ट्रॅक्टला मराठीत काय म्हणतात?
मा : इटालियनमुळे माझं लक्ष दुसरीकडे गेलं; लक्ष विचलीत झालं.
का : बरं, मग मी 'ट्वायलाईन झोन' लावू का?
मा : तुला खरंच आठवत नाहीये का तो?

का : काय फरक पडतो? तुला पुरेसा मसाला मिळाला ना लिहायला?
मा : (डोकं हलवलं.)

का : लावू का 'ट्वायलाईट झोन'?
मा : लाव काहीही! मी कुठे बघणारे, लाव काहीही white noise! मला लिहायचं आहे.

मिहिर Fri, 19/11/2021 - 01:08

शेजारचं घरही घेतल्याबद्दल मावशी काकांचं अभिनंदन!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 19/11/2021 - 03:03

In reply to by मिहिर

काकांना मिहिर आठवतो का, याबद्दल काकांचं खरं मत मिहिरलाही समजणार नाही. काकांना आंजावर भाव खायला आवडतो. पण मिहिरनं प्रयत्न करून बघावेत.

'न'वी बाजू Fri, 19/11/2021 - 04:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काकांना मिहिर आठवतो का, याबद्दल काकांचं खरं मत मिहिरलाही समजणार नाही.

ते खुद्द काकांना तरी ठाऊक आहे काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 19/11/2021 - 06:45

In reply to by 'न'वी बाजू

काका उगाच का 'ट्वायलाईट झोन' बघतात!

'न'वी बाजू Fri, 19/11/2021 - 18:38

In reply to by anant_yaatree

मा.का. नाका गो?

—————

परंतु, या खेपेस मा.कां.ची कथा (तुलनेने) थोडी रिलेटेबल वाटली. कदाचित पात्रे परिचित वाटल्यामुळे असू शकेल. (‘प्रस्तुत कथेतील कोठल्याही पात्राचा वास्तवातील कोठल्याही व्यक्तीशी काहीही संबंध न आढळल्यास तो एक निव्वळ योगायोग मानावा.’ असे एक (अलिखित) डिस्क्लेमर वाचले ब्वॉ कथेखाली.)

अर्थात, कथेतील पात्रांच्या खाजगी आयुष्यांचे तपशील चिवडण्यात फारसा रस नसल्याकारणाने, अशा कथांचे भावी पीक हेसुद्धा ‘नाका गो’ कॅटेगरीतच मोडावे, याच्याशी सहमत आहे.

—————

बादवे,

मा.का. x@#

पटले नाही. यात तपशिलाची किंचित चूक असावी, असे राहूनराहून वाटते.

बोले तो, मा. x@# हे (तत्त्वतः) समजू शकतो, परंतु, का.सुद्धा x@#च??? (अर्थात, वर म्हटल्याप्रमाणे, लोकांच्या खाजगी तपशिलांत यत्किंचितही रस नसल्याकारणाने, (याच्या उत्तरासकट) इतःपर आपला पास! (‘असेल ब्वॉ!’ म्हणून सोडून देऊ.))

असो चालायचेच!

माचीवरला बुधा Sat, 20/11/2021 - 04:58

In reply to by 'न'वी बाजू

नबा, x@# हे एक अवयववाचक हिंदी नाम असावे असा माझा अंदाज आहे. ते पुरुषसूचक बिल्कुल नसूनही (quite the contrary, in fact) पुल्लिंगी का आहे ते मात्र माहित नाही.

'न'वी बाजू Sat, 20/11/2021 - 09:36

In reply to by माचीवरला बुधा

…हे एक अवयववाचक हिंदी नाम असावे असा माझा अंदाज आहे.

हो हो… मीही त्याच अंदाजाने लिहिले होते.

ते पुरुषसूचक बिल्कुल नसूनही (quite the contrary, in fact)…

म्हणूनच म्हटले, ते मावशींना लागू केल्यास समजू शकतो. परंतु, काकांनासुद्धा??????

(काय की. असेल ब्वॉ.)

…पुल्लिंगी का आहे ते मात्र माहित नाही.

हम्म्म्म्म्… रोचक मुद्दा आहे खरा!

माचीवरला बुधा Sat, 20/11/2021 - 04:45

In reply to by anant_yaatree

शेजारच्या नातेवाईकांच्या कहाण्या माझ्याही डोक्यात जातात, पण त्यासाठी ऐसीची माता का उद्धरावी?

'न'वी बाजू Sat, 20/11/2021 - 09:42

In reply to by माचीवरला बुधा

त्यासाठी ऐसीची माता का उद्धरावी?

‘जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा’ वगैरे आठवले असेल…

anant_yaatree Sat, 20/11/2021 - 13:39

In reply to by 'न'वी बाजू

= न म स्ते

टंकताना त्या टायमाला कायतरी लोच्या होत होता म्हणून हे टायपलं तं तुमी झंटल्मन लोक कायपण टपोरी बोलू र्‍हायले.

ऐसीवर सौस्क्रूती बिव्स्क्रूती काय उरली नाय

राजेश घासकडवी Fri, 19/11/2021 - 08:32

काका मावशींना टाळायचा प्रयत्न करताहेत असं वाटलं. त्यांना फक्त ट्वायलाइट बघण्यात रस आहे.

बाकी संवाद खूपच साइनफेल्डी वाटले.

चिमणराव Fri, 19/11/2021 - 17:08

In reply to by राजेश घासकडवी

बाकी लेखिकेचं असले लेखन इंटरेस्टिंग आणि करमणुक देणारं होत आहे. तिकडचे पुलं( प्लेस होल्डर, हवे ते नाव टाकून घ्या. वुडहाऊस वगैरे)

चिंतातुर जंतू Fri, 19/11/2021 - 08:59

काकांना माइल्ड ॲस्पर्जर्स असावा.

When you meet someone who has Asperger's syndrome, you might notice two things right off. They're just as smart as other folks, but they have more trouble with social skills. They also tend to have an obsessive focus on one topic or perform the same behaviors again and again.

- इथून साभार

चिमणराव Fri, 19/11/2021 - 13:35

गणित गल्ली होणार ऐसी.
मी जातो.
मला दुसऱ्या एका काकांचे वाचायचे आहे. कॉफीबिफी चालेल.

चिमणराव Fri, 19/11/2021 - 17:13

निर्माण करायला हवे.

"तिर्रूपासून लांब राहू पाहणारा," इथे मांजरी तिररी वाटली. पण तिरळी मुलगी असावी,किंवा तिरुमला नावाची मुलगी.