संध्याकाळची वेळ. घरीच, गुबगुबीत खुर्चीत बसून, दिवसभर झूम कॉल्सवर बोलून आणि कीबोर्ड बडवून मावशी दमलेल्या आहेत. काका त्याच घरात राहत असले तरी वेगळ्या टाईमझोनमध्ये असतात; त्यामुळे त्यांची उशिरा (दमायला) सुरुवात होते.
ताटातल्या वाफवलेल्या ब्रोकलीवर वितळलेलं चीज ओतत मावशींनी काकांकडे बघितलं. "तुला चीज हवंय?" उत्तर आलं नाही. मावशींनी चीज बाजूला ठेवून काटा ब्रोकलीत खुपसला.
मावशी : तुला मिहीर आठवतो का?
काका : आठवत नाही.
मा : अरे, तो नाही का? आपल्याकडे आला होता?
का : आठवत नाही.
मा: तो उंचापुरा, दणकट मुलगा ...
का : आठवत नाही.
मा : तो बघ ना, आपण त्याच्याबरोबर त्या गुहा बघायला गेलो होतो?
का : कुठल्या गुहा?
मा : आठवत नाही.
का : ...
मा : गुहा कुठल्या ते महत्त्वाच्या नाहीत. पण आपण गेलो होतो.
का : आठवत नाही.
मा : तो बघ ना, कॉन्फरन्ससाठी आला होता?
का : आठवत नाही.
मा : ती कॉन्फरन्स 'डोमेन'मध्ये होती?
का : (ब्रोकलीत काटा खुपसला.)
ब्रोकलीवर चीज नव्हतंच. वितळलेलं चीज पुन्हा घट्ट व्हायला लागल्याचं मावशीनं बघितलं. मावशींना आवराआवर करायची नसते. मावशींनी स्वतःच्या ताटाकडे लक्ष केंद्रित केलं.
मा : आपण त्या इटालियन ठिकाणी जेवायला गेलो होतो?
का : कुठलं इटालियन?
काकांना इटालियन फार आवडत नाही. त्यावर वितळलेलं चीज असतं. पण ब्रोकलीबरोबर खायला केसो नसेल तर... या विचारानं खरेदी करताना काकांचा जीव अर्धाअर्धा होतो.
मा : आठवत नाही.
का : (शांतपणे खात होते.)
मा : ... तो एक रात्र घरी राहिला होता... त्याला तिर्रूपासून लांब राहायचं होतं?
का : मग ती गेली होती का त्याच्याजवळ?
मा : तुला आठवला तो?
का : आठवत नाही.
मा : रात्री आपला पंखा त्याच्यावर ओरडायला लागला?
का : हो, बरं झालं पंखा बदलला ते!
मा : ... आणि तो एवढा गरीब आहे की त्यानं तक्रारसुद्धा केली नाही.
का : आठवत नाही.
मा : आपण 'एमीज'मध्ये गेलो होतो, आईस्क्रीम खायला?
का : आठवत नाही... नाही, मला जेन आणि डेव्हिडबरोबर गेलो होतो ते आठवतंय.
मा : ते आपण दोनेक महिन्यांपूर्वीच गेलो होतो. ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची.
का : आठवत नाही.
मा : तू नेहमी सगळ्याला 'आठवत नाही' असंच उत्तर देतोस का?
का : आठवत नाही.
मा : 'नॉटिंग हिल' गेला नेटफ्लिक्सवरून!
का : आपण डीव्हिडी नाही का घेतलेली?
मा : मी तुला एवढे प्रश्न का विचारत्ये, असा प्रश्न नाही का पडला तुला?
का : मी अजूनपर्यंत टीव्हीवर काही लावलेलं नाही म्हणून तू नवी पद्धत शोधून काढल्येस.
मा : नाही रे, मिहीर पोस्टडॉक करायला जाणारे, हे समजलं आज. ते सांगायचं होतं.
का : मग असं सांग ना, तो पीएचडी करत होता तो!
मा : आठवला तुला?
का : नाही. पण पीएचडीशिवाय पोस्टडॉक कसं करणार?
मा : बरोबर आहे तुझं.
मा : तिर्रूपासून लांब राहू पाहणारा, हेही तुला आठवलं नाही? तुझ्या मुलीबद्दल असं म्हणाला तो!
का : मी इटालियनमुळे डिस्ट्रॅक्ट झालो. डिस्ट्रॅक्टला मराठीत काय म्हणतात?
मा : इटालियनमुळे माझं लक्ष दुसरीकडे गेलं; लक्ष विचलीत झालं.
का : बरं, मग मी 'ट्वायलाईन झोन' लावू का?
मा : तुला खरंच आठवत नाहीये का तो?
का : काय फरक पडतो? तुला पुरेसा मसाला मिळाला ना लिहायला?
मा : (डोकं हलवलं.)
का : लावू का 'ट्वायलाईट झोन'?
मा : लाव काहीही! मी कुठे बघणारे, लाव काहीही white noise! मला लिहायचं आहे.