डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) मिरजच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधे असोसिएट प्रोफेसर आहेत. समाजात कोरोनाविषयी पसरलेले गैरसमज दूर करण्याच्या हेतूने, शास्त्रीय माहिती देणारे लेखन त्या सातत्याने करत आहेत. त्यांचे हे प्रबोधनाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे आहे. त्यांच्या पूर्वपरवानगीने त्यांचे काही लेख आम्ही ऐसीच्या वाचकांसाठी शेअर करणार आहोत. त्यातील पहिला लेख :
पुढचे नाही, मागचे १४ दिवस महत्वाचे होते साहेब
"देवा यांना माफ कर" या नावाची पोस्ट मी १२ मे २०२१ला लिहिली होती. त्यामध्ये डॉ रवी गोडसे देत असलेली काही माहिती जीवघेणी ठरू शकते असा उल्लेख मी केला होता. आज त्याची प्रचिती पण आली.
ओमायक्रोनबाबत निवांत राहण्याचा सल्ला चुकीचा होता हे आता तुमच्या लक्षात येऊन काय फायदा? लोकांचा या आजाराप्रती आणि नियमांप्रती attitude कधीच बदललाय.
धनुष्यापासून बाण आणि तोंडातून शब्द एकदा सुटले की परत येत नसतात. हे शाळेमध्ये शिकवले होते. मग "मी मागे काय म्हणालो ते विसरा" असे कसे म्हणू शकता?
साथ आणि भूमितीय वाढ कशी असते याची थोडी जरी कल्पना असती तुम्हाला तर "पुढील १४ दिवस महत्त्वाचे" असे म्हणाला नसता.
अहो, पुढील प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे आणि आपल्यापैकी प्रत्येक जण घेईल तो प्रत्येक निर्णयदेखील महत्त्वाचा आहे.
उदा. वाढदिवसाच्या पार्टीला मी जाईन किंवा नाही, तिथे मास्क काढेन किंवा नाही अश्या छोट्याछोट्या कृतीदेखील साथीतील भविष्यातील रुग्ण वाढवू किंवा कमी करू शकतात.
मास्क फक्त १४ दिवस नाही तर ही महासाथ संपेपर्यत वापरायला हवेत, तेही सर्वांनी. तरच आपली या लाटांमधून आणि नवनव्या व्हेरीयंटपासून सुटका होईल.
आणि खरे सांगू का?
अहो, पुढचे नाही तर या आधीचे १४ दिवस अत्यंत महत्त्वाचे होते. कारण त्यावेळी अजून रुग्णसंख्यावाढ सुरू झाली नव्हती आणि तीच वेळ होती सर्वांनी एकत्रितपणे नियम पाळून ओमायक्रोनला रोखायची.
भूमितीय वाढीचा पहिला टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो. रुग्णसंख्या स्थिर असणारा काळ. तो संपला आता. रुग्णसंख्यावाढ आता "दिन दुगनी और रात चौगुनी" या गतीने वाढणार आहे आणि तुम्ही आता प्रतिबंध शिकवताय? आता नियंत्रणाची वेळ आलीये.
मी दि. ३ डिसेंबरला जेव्हा कर्नाटकमध्ये एक डॉक्टर प्रवासाशिवायच ओमायक्रोनने positive आला तेव्हा "आज, आत्ता, या क्षणी" ही पोस्ट लिहिली होती. कारण कोणताही नवा व्हेरीयंट जेव्हा देशामध्ये प्रवासाशिवाय दिसतो तेव्हा तो पसरायला सुरुवात झालेली असते. आणि त्या क्षणापासून सर्वांनी अलर्ट होणे आवश्यक असते.
ही साधीसुधी साथ नाहीये, ही वैश्विक साथ आहे.
अश्या वेळी प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाने अतिशय जबाबदारीने सल्ले द्यायला हवेत. आपल्या सल्ल्याने कोणाचे नुकसान होणार नाही याची खात्री करायला हवी.
ज्यांचा शब्द लाखो लोक मानतात त्यांनी साथ थांबेल असे सल्ले द्यायचे की साथ पसरेल असे? यापुढील काळामध्ये अधिक जबाबदारीने बोलाल ही अपेक्षा.
आणि या अनुभवावरून काही लोकांना तरी तुमच्या सल्ल्यांमधील फोलपणा व अशास्त्रीयपणा समजेल ही आशा!
मास्क फक्त पुढील १४ दिवस नाही तर साथ संपेपर्यंत वापरायचा आहे.
नियम पाळा आणि गर्दी टाळा.
आपली साथ आपल्यालाच थांबवायची आहे.
उंटावरून शेळी हाकणाऱ्याचे हे काम नोहे!
--
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोगतज्ज्ञ , मिरज.
(०८/०१/२०२२)
#Fighting_myths_DrPriya
#drgodse_misinformation
पूर्वप्रकाशित : इथे आणि इथे
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) यांचे सर्व लेखन Info Portal by UHC, GMC, Miraj या पानावर उपलब्ध आहे. #covid_insights_drpriya
त्यांचे 'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित सर्व लेखन इथे उपलब्ध आहे.