एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १०

समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न

सुधीर भिडे

Hinduism dies if untouchability lives and untouchability has to die if Hinduism is to live.
– Gandhiji

आपला विषय आहे की १८१८ ते १९२० या शतकात काय घडले की ज्याचे समाजावर दूरगामी परिणाम झाले. गेल्या भागात दलित म्हणजे कोण आणि त्या काळात दलितांची काय स्थिती होती हे पाहिले. या भागात दलितांच्या स्थितीत सुधारणेचे जे प्रयत्न झाले ते पाहू. त्या शतकात महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांनी मोठे कार्य केले. गांधीजी, सावरकर आणि आंबेडकर या महान व्यक्तींचे दलित प्रश्नावरील कार्य १९२०नंतर राहिले. विषयाच्या पूर्ततेसाठी त्यांचे कार्य विचारात घेणे आवश्यक आहे. तत्कालीन मुंबई इलाख्यातील दोन समाजसुधारक राजे – शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड – यांनीही दलितांच्या सुधारणेसाठी प्रयत्न केले. याची माहिती नंतरच्या भागात येईल.

महात्मा फुले

माहिती मराठी विश्वकोश आणि भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा फुले (पद्मगंधा प्रकाशन, २०००) या प्रा. ना. ग. पवार आणि अविनाश वरोकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातून घेतली आहे.

दलितांच्या उद्धाराच्या प्रयत्नांची सुरुवात जोतिबा फुले यांनी केली. जोतिबा फुल्यांचा जन्म १८२७ साली माळी जातीत झाला. त्यांचे शिक्षण मिशनरी शाळेत झाले. दलितांचा उद्धार आणि जातीनिर्मूलन ही दोन्ही कार्ये त्यांनी संलग्नपणेच हाताळली. यासाठी लेखन, शिक्षण आणि धर्मसुधारणा या तीनही क्षेत्रात त्यांनी काम केले.

जोतिबांनी गुलामगिरी हे पुस्तक १८७३ साली लिहिले. पुस्तकात १६ निबंध आहेत आणि ते संवादाच्या स्वरूपात लिहिले आहेत. हे पुस्तक १८८५ साली प्रकाशित झाले. जातीव्यवस्था हा या पुस्तकाचा विषय आहे. आर्य भारतात आल्यापासून प्रथम चातुर्वर्ण व्यवस्था, मागून जाती यांची उत्पत्ती आणि आर्यांनी एतद्देशीयांना कसे गुलाम केले हा विषय पुस्तकात हाताळला आहे.

फुल्यांनी बळी राजाची गोष्ट केंद्रस्थानी ठेऊन आर्यांनी शूद्रांना कसे दास्यत्वात ठेवले याचे वर्णन केले आहे. बळीराजा असुरांचा महापराक्रमी राजा होता. त्याने पूर्ण जग जिंकले होते. बळीराजा उत्तम प्रकारे राज्य करीत होता. आर्यांचा राजा इंद्र याला राज्य परत मिळावे म्हणून बळीराजाला कपटाने पाताळात पाठविण्यात आले. शूद्रांचा, शूर आणि गुणी बळीराजा याला आर्यांनी कसे कपटाने मारले ही गोष्ट फुल्यांनी सांगितली. असुर आणि इंद्र यांच्यातील संघर्ष ब्राह्मण काळापासून उल्लेखिलेला दिसतो. (येथे ब्राह्मण हा शब्द जातीवाचक नसून वेदातील एका भागाला ब्राह्मणे असे म्हणतात.) फुले असे दर्शवितात की येथील प्रगल्भ संस्कृतीला कपटाने हरवून बाहेरून आलेल्या आर्यांनी चुकीची व्यवस्था समाजावर लादली.

दास्यत्वातून बाहेर पडण्यासाठी इंग्रजांचे राज्य ही एक संधीच आहे असे फुले म्हणतात. इंग्रजांचे राज्य आले नसते तर तत्कालीन व्यवस्थेतून दलितांची दास्यत्वातून सुटका शक्य नव्हती असे फुल्यांचे म्हणणे आहे.

स्वत:चे शिक्षण झाल्यानंतर फुल्यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने पुण्यात दलित मुलींसाठी आणि मुलांसाठी शाळा चालू केल्या.

पहिली मुलींची शाळा १८४८ साली भिडेवाड्यात सुरू केली. पहिल्या सहा विद्यार्थिनींपैकी चार ब्राह्मण, एक मराठा आणि एक धनगर जातीची अशा मुली होत्या. ही शाळा काढल्यानंतर त्यांच्या वर ग्रामण्य होऊन त्यांना पत्नीसह घराबाहेर पडावे लागले. ते एका मुसलमान मित्राच्या घरी राहू लागले. त्यानंतर फुल्यांनी चार नवीन शाळा सुरू केल्या.

  • १८५१ चिपळूणकर वाडा – मुलींची शाळा.
  • १८५१ गोवंडे वाडा महार मुलींसाठी शाळा.
  • १८५१ रास्ता पेठ मुलींची शाळा.
  • १८५२ वेताळ पेठ मुलींची शाळा.
  • १८५३ साली फुल्यांच्या शाळातून २३५ मुली शिकत होत्या.
  • १८५२ साली त्यांच्या शिक्षण कार्याबद्द्ल इंग्रज सरकारने फुले दांपत्याचा सत्कार केला.

ब्राह्मणी धर्माचे पालन करून शूद्रांची स्थिती सुधारणार नाही असे वाटून फुल्यांनी सत्यशोधक समाज १८७३ साली स्थापना केली. समाजाच्या सुरुवातीच्या बैठका त्यांनी आपल्या वाड्यातच भरविल्या. प्रार्थना समाजाची स्थापना अशाच विचारांनी झाली होती. पण प्रार्थना समाजात उच्चवर्णियांचा भरणा असे. बहुजनांसाठी फुल्यांनी सत्यशोधक समाज सुरू केला. सत्यशोधक समाजाची माहिती आधीच्या भागात आली आहेच.


सत्यशोधक समाज बैठक इमारत
सत्यशोधक समाजाच्या बैठकांना फुले जिथे संबोधत असत ती इमारत

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

(माहिती मराठी विश्वकोशातून आणि महर्षी शिंदे – एक दर्शन या रा. ना. चव्हाण यांच्या पुस्तकातून.)

अस्पृश्यांच्या प्रश्नांवर फुल्यांनंतर मोठे काम विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले. फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए. पास झाल्यावर त्यांनी प्रार्थना समाजाच्या कामास वाहून घेतले. १९०१मध्ये ऑक्सफर्डला त्यांनी Comparative Religious Studies हा अभ्यास केला.


विठ्ठल रामजी शिंदे
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

महर्षी शिंद्यांनी समाजाला हे दाखवून दिले की १९०१ सालाच्या जनगणनेप्रमाणे भारताची लोकसंख्या ३१ कोटी होती. त्यांपैकी २१ कोटी हिंदू होते आणि हिंदूंमध्ये ५.५ कोटी दलित होते. महर्षी शिंद्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन १९०६ साली चालू केले. या मिशनचे अध्यक्ष नारायण चंदावरकर होते आणि कार्यवाह विठ्ठल रामजी शिंदे हे होते. त्यांच्या हे लक्षात आले की दलितांना शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांच्या परिस्थितीत सुधारणा करणे अशक्य आहे. यासाठी मिशनने दलितांसाठी शाळा आणि निवासगृहे चालू केली. मिशनच्या मुंबई, पुणे, नागपूर आणि हुबळी येथे शाळा चालू झाल्या. १९१२पर्यंत मिशनने २३ शाळा आणि ५ निवासगृहे चालू केली होती. शिक्षणामध्ये औद्योगिक नोकर्‍यांसाठी आवश्यक ती शिक्षणाची व्यवस्था केली होती ज्यायोगे रोजगार मिळू शकतील.

तुकोजीराव होळकरांच्या आर्थिक साहाय्याने महर्षींनी पुण्यात अहिल्याश्रम चालू केला. या आश्रमात निराश्रित दलितांच्या निवासाची व्यवस्था केली होती. या आश्रमात ते स्वत: आपल्या कुटुंबाबरोबर रहात असत. त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने इंडियन नॅशनल काँग्रेसने १९०६ साली अस्पृश्यता विरोधी विधेयक पास केले.

एक मोठी अस्पृश्यतानिवारक परिषद भरवावी असे शिंदे यांना बरेच दिवसांपासून वाटत होते. १९१८ सालच्या मार्चमध्ये मुंबईस राष्ट्रीय पातळीवर अस्पृश्यतानिवारक परिषद आयोजित केली. अध्यक्ष श्रीमंत सयाजीराव महाराज यांच्या व्यतिरिक्त स्वागत मंडळाचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर, नामदार सी. व्ही. मेहता, बाबू बिपिनचंद्र पाल, एस्. आर. बम्मनजी, जमनादास द्वारकादास, पी. के. तेलंग, बॅ. मुकुंदराव जयकर, बॅ. भुलाभाई देसाई, इत्यादी बडी मंडळी परिषदेला आली होती. सभेस सुमारे पाच हजारांवर एवढा स्त्री-पुरुष मिश्र प्रेक्षकवर्ग जमला होता. सर चंदावरकर म्हणाले की, "जोपर्यंत तुम्ही दलितांना अवनत स्थितीतच ठेवाल तोपर्यंत देवही तुम्हाला (वरच्या वर्गाला) अवनत अवस्थेतच राखील."

परिषदेत दोन ठराव पारित करण्यात आले.

१. निकृष्ट वर्गावर लादलेली अस्पृश्यता यापुढे ताबडतोब काढून टाकण्यात यावी आणि या कार्यासाठी प्रत्येक प्रांतातील वजनदार व विचारी कार्यकर्त्या पुढाऱ्यांनी एक अस्पृश्यतानिवारक जाहीरनामा काढून निकृष्ट वर्गास शाळा, दवाखाने, न्याय कचेऱ्या, सार्वजनिक खर्चाने चालविलेल्या सार्वजनिक संस्था तसेच विहिरी, तळी, सार्वजनिक पाणवठे, व्यवहाराची व करमणुकीची ठिकाणे, व देवालयासारखी सार्वजनिक ठिकाणे इत्यादी ठिकाणी कोणत्याही प्रकारे प्रतिबंध न राहता पूर्ण मोकळीक करून द्यावी असे ह्या परिषदेचे मत आहे.

२. निकृष्टवर्गावर लादलेले धार्मिक निर्बंध ज्या वेळी नाहीसे होतील, त्याचवेळी त्याच्या उन्नतीचे कार्य अत्यंत झपाट्याने व यशस्वी रीतीने पार पाडले जाईल असे या सभेचे मत आहे व याकरिता ही सभा हिंदू धर्म संस्थांच्या अधिपतीस आग्रहाने विनंती करीत आहे. –

अ. अस्पृश्यता नाहीशी करण्याकरिता धार्मिक आज्ञापत्रे काढणे.
आ. हिंदू धर्मावरील त्यांची श्रद्धा दृढ करण्याकरिता धर्मशिक्षक नेमून त्यांच्यात हिंदू धर्माच्या तत्त्वांचा फैलाव करणे.
इ. हिंदू लोकांकडून पाळल्या जाणाऱ्या सर्वसाधारण धार्मिक समारंभात भाग घेण्याची त्यांना परवानगी देणे.

(आजच्या तारखेपर्यंत हिंदू धर्माच्या कोणत्याही श्रेष्ठीने आशा प्रकारचे विधान केलेले माझ्या ऐकिवात नाही – कोणास माहीत असल्यास कळवावे.)

नंतर शिंदे यांनी निरनिराळ्या शहरातून अस्पृश्यता निवारक परिषदा आयोजित केल्या. १९३३ साली वाई येथे झालेल्या परिषदेचे ते स्वत: अध्यक्ष होते. त्यानंतर पुढील दहा वर्षे शिंदे वाई येथे सतत जात राहिले. त्यांचे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्याबरोबर घनिष्ठ संबंध होते.

महर्षी शिंदे यांचे पुणे येथे १९४४ साली निधन झाले.

महर्षी कर्वे आणि महर्षी शिंदे यांच्या कार्यात साम्य आहे. कर्व्यांनी अनाथ महिलांसाठी आश्रम चालविला तर शिंद्यांनी अनाथ दलितांसाठी आश्रम चालविला. दोघेही स्वत: चालविलेल्या आश्रमात रहात. कर्व्यांनी आपले काम समाजकारणापर्यंत सीमित ठेवले. शिंद्यांनी समाजकारणाबरोबर धर्मकारण आणि राजकारण या क्षेत्रातही काम केले. महर्षी शिंद्यांचे कार्य आंबेडकर आणि गांधींनी पुढे नेले.

रामोशी समाज आणि सावित्रीबाई रोडे

रामोशी ही दक्षिण महाराष्ट्रातील मागासलेली एक विमुक्त जमात. रामोशी स्वतःला रामवंशी म्हणवितात. या मूळ नावाचा अपभ्रंश होऊन रामोशी हे ज्ञातिमान बनले असावे. त्याविषयीच्या काही दंतकथा प्रचलित आहेत. मराठा अंमलात गावगाड्याच्या ग्रामव्यवस्थेत त्यांना बलुतेदार म्हणून मान्यता दिलेली होती. बारा बलुतेदारांप्रमाणे त्यांना पारंपरिक खास व्यवसाय नसला, तरी त्या काळी गावच्या रक्षणाची जबाबदारी रामोशांवर असे, हाच पुढे त्यांचा व्यवसाय मानला गेला. त्याचा मोबदला गावचे शेतकरी, पाटील व ग्रामस्थ त्यांना देत असत. इंग्रजांच्या काळात ही जमात गुन्हेगार जमात म्हणून ओळखली जात असे.

खालील माहिती ब्राह्मणेतर चळवळ आणि स्त्रिया या मिळून सार्‍याजणीच्या एप्रिल २०२२च्या अंकातील देवकुमार अहिरे यांच्या लेखातून आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, डॉ. छाया पवार यांच्या लेखातून घेतली आहे.

जोतिबा फुले यांची हत्या करण्यासाठी सनातनी ब्राह्मणांनी धोंडीबा रोडे या रामोशी जातीच्या माणसास पाठविले. फुल्यांनी त्यांच्याशी संवाद साधून धोंडीबाचे मन वळविले. पुढे धोंडीबा फुल्यांचे साहाय्यक झाले. रोडे आणि फुले कुटुंबे भवानी पेठेत जवळच रहात असत. सावित्रीबाई रोडे ह्या धोंडीबांची सून.

१९१६ साली रामोशी संघाची स्थापना झाली. सावित्रीबाई संस्थेच्या प्रथम सचिव होत्या. रामोशी समाजाच्या शिक्षणाकरिता संस्थेने काम केले. विद्या हे मानवविकासाचे धन आहे, विद्येच्या मार्गानेच रामोशी समाजाचे प्रश्न सुटू शकतील असे त्यांचे मत होते. क्षत्रीय रामवंशीय हे मासिक त्यांनी १९२३ साली चालू केले. धार्मिक विधी कसे करावेत हे त्या अस्पृश्य मुलांना शिकवीत.

सत्यशोधक समाजाच्या पुणे शाखेच्या सचिव म्हणून त्यांनी काम केले. सत्यशोधक समाजाची पाचवी परिषद अहमेदनगर येथे झाली. त्या परिषदेत सावित्रीबाईं रोडेंनी विद्या शिकल्याचे फायदे हा निबंध वाचला.

गांधीजी

गांधीजींच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याचा आढावा द. न. गोखले यांनी त्यांच्या गांधीजी – मानव आणि महामानव या पुस्तकात घेतला आहे (मौज प्रकाशन, १९९६)

दक्षिण आफ्रिकेतच अस्पृश्यतेच्या विरोधात गांधीजींचे काम चालू झाले. ते अस्पृश्याचे मलमूत्राचे भांडे स्वतः धूत. १९१५ साली हिंदुस्थानात परत आल्यावर त्यांनी अहमदाबादला आश्रम चालू केला. आश्रमात त्यांनी एका अस्पृश्य कुटुंबाला प्रवेश दिला. त्यामुळे अहमदाबाद येथील जनतेने आश्रमवासीयास वाळीत टाकले. आश्रमास मिळणारी मदत बंद झाली. त्यावेळी अंबालाल साराभाई पुढे आले आणि आपली ओळख न देता आश्रमाला १३००० रुपयांची मदत दिली. (आजच्या हिशोबांनी २ कोटी रुपये).

इंग्रज अस्पृश्यांसाठी निराळ्या मतदारसंघाच्या मागणीला चिथावणी देत होते त्याला गांधीजींनी विरोध केला. त्यावेळी ते पुण्यात येरवडा जेल मध्ये तुरुगात होते. त्यांनी निराळ्या मतदार संघाच्या मागणी विरुद्ध तुरुंगात उपोषण चालू केले. त्यांनी लिहिले – My fast is intended to sting Hindu conscience into right religious action. Withdrawal of separate electorate will satisfy letter of my vow but not spirit behind it. I want to eradicate untouchability from Hindu religion. या उपवासाने हिंदू समाज अस्पृश्यतेच्या प्रश्नावर जागा झाला यात काही शंका नाही. आंबेडकरांना हा राजकीय स्टंट वाटत होता.

Gandhiji wrote – Hinduism dies if untouchability lives and untouchability has to die if Hinduism is to live.

हरिजन साप्ताहिकाचा पहिला अंक १९३३मध्ये पुण्याहून प्रकाशित झाला. त्यांनी तुरुंगातच परत अस्पृश्यते विरुद्ध एकवीस दिवसांचे उपोषण चालू केले. तुरुंगातून सुटल्यावर प्रकृती क्षीण झाल्याने त्यांनी वर्ध्याच्या आश्रमात सहा महिने विश्रांती घेतली. त्यानंतर त्यांनी देशभर हरिजन यात्रा चालू केली.. त्याच वेळी बिहार मध्ये भूकंप आला. हिंदू लोक अस्पृश्यता पाळतात म्हणून देवाने ही शिक्षा केली असे एक वादग्रस्त विधान त्यांनी केले. नऊ महिन्यात त्यांनी २०,००० किलोमीटर अंतर चालले. या वेळी ते ७५ वर्षाचे होते. सर्व देशभर त्यांनी अस्पृश्यता पाळू नका हा संदेश दिला.

(ठळक ठसा लेखकाचा.)

सावरकर

सावरकरांचे अस्पृश्योद्धाराचे कार्य १९२० नंतरचे आहे पण महत्त्वाचे आहे. रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना त्यांनी पुढाकार घेऊन भागोजी कीर यांच्या मदतीने १९२९ साली पतित पावन मंदिर बांधले.


पतित पावन मंदिर
पतित पावन मंदिर

या मंदिरात हिंदू धर्मातील सर्व जातींना प्रवेश देण्यास त्यांनी सुरुवात केली.

सावरकरांच्या विचारात विरोधाभास दिसतो. अस्पृश्यांसाठी त्यांनी केले काम सर्वश्रुतच आहे. आता ते मनुस्मृतीविषयी काय लिहितात ते पाहू -

खालील माहिती सावरकर, भ्रम आणि वास्तव (शमसुल इस्लाम, सुगावा प्रकाशन २००५) या पुस्तकातून घेतली आहे.

आपल्या हिंदू राष्ट्रासाठी वेदानंतर सर्वात पुजनीय ग्रंथ मनुस्मृती आहे जो प्राचीन काळापासून आपल्या संस्कृती प्रथा, विचार आणि आचारांचा आधार राहिलेला आहे. या ग्रंथाने शतानुशतके आपल्या राष्ट्राचा आध्यात्मिक आणि दैवी प्रवास नोंदविलेला आहे. आजदेखील अनेक कोटी हिंदू त्यांच्या जीवनात आणि आचारात ज्या नियमांचे पालन करतात ते मनुस्मृतीवर आधारित आहेत. आज मनुस्मृती म्हणजे हिंदू कायदा जो मूलभूत आहे.

(समग्र सावरकर वाङ्‌मय, खंड ४, पृष्ठ ४१६)

मनू हा हिंदूंचे कायदे निर्माण करणारा आहे. आपण मनुने शिकविलेले धडे पुन्हा आत्मसात केले पाहिजेत. तरच हिंदू राष्ट्र पुन्हा अजिंक्य बनू शकते.
(समग्र सावरकर वाङ्‌मय, खंड ६, पृष्ठ ४२६)

मनुस्मृतीत अस्पृश्यांविषयी काय लिखाण आले आहे ते आपण पाचव्या भागात पाहिले. त्या विचारांना कोण कसे ‘पूजनीय‘ म्हणू शकतो ते कळत नाही. एक तर सावरकरांनी मनुस्मृती वाचली नसावी असे म्हणावे लागेल किंवा मनुस्मृतीत अस्पृश्यांविषयी काय लिहिले आहे ते माहीत असूनही काही निराळ्या उद्देशाने त्यांनी अस्पृश्योद्धाराची चळवळ चालू केली. ते लिहितात - “हिंदू महासभा कधीही मंदिरात अस्पृश्यांच्या प्रवेशासाठी कायदा आणण्याचा प्रयत्न करणार नाही.” त्यांनी स्वत: अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून रत्नागिरीत मंदिर स्थापिले, मग सावरकर असे विधान का करतात?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माहिती मराठी विश्वकोश आणि महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या पुस्तकातून घेतली आहे (डॉ. ज्ञानराज गायकवाड, रिया पब्लिकेशन्स, २०१९)

महात्मा फुले १८९० साली निवर्तले आणि आंबेडकरांचा जन्म १८९१ साली झाला. फुल्यांच्या कार्याचे आंबेडकर खर्‍या अर्थाने उत्तराधिकारी हहोते. आंबेडकर महार जातीत जन्माला आले. आंबेडकरांचे वडील इंग्रजांच्या सैन्यात सुभेदार मेजर होते. लहान वयापासून अस्पृश्य असल्याचे दुःख त्यांनी भोगले. शाळेत आंबेडकर इतर मुलांबरोबर बसू शकत नव्हते. त्यांना कोपर्‍यात दूर बसावे लागे. सर्वांसाठी असलेल्या माठातून ते पाणी पिऊ शकत नव्हते. कोणीतरी सवर्ण वरुन पाणी ओते आणि ते ओंजळीने पाणी पीत. त्यांचे संस्कृतचे शिक्षक त्यांना वर्गात बसू देत नसत.

मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी त्यांची अमेरिकेत कोलंबिया युनिवर्सिटीत शिक्षणाची सोय केली. इंग्लंडमध्ये त्यांनी कायद्याची पदवी १९२१ साली घेतली. आंबेडकर उच्चविद्याविभूषित होते. त्यांच्या पदव्या पहा - M.A., Ph.D., D. Sc., L.L.D. Barrister at Gray’s Inn.

शिक्षण संपल्यावर आंबेडकरांनी मुंबईत Government Law Collegeमध्ये प्रोफेसर म्हणून काम चालू केले. मुंबई प्रॉव्हिन्शियल गवर्न्मेंटने मागासवर्गीयांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी एक कमिटी स्थापन केली. आंबेडकर त्या समितीचे सदस्य राहिले. १९३८मध्ये मुंबई लेजिस्लेटीव कौन्सिलवर ते निवडून आले आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९४२ मध्ये आंबेडकरांची केंद्रीय कौन्सिलवर नेमणूक झाली आणि ते कायदामंत्री झाले. स्वातंत्र्यानंतर भारताचे संविधान बनविण्यात आंबेडकरांचा मोठा हात होता.

समाजातील दलित आणि शोषितांचे प्रश्न मांडण्यासाठी आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी बनविण्याची कल्पना पुढे आणली. दुर्दैवाने पार्टीची स्थापना होण्याआधीच त्यांचे निधन झाले.

समतानंद गद्रे

अनंत हरी गद्रे यांनी त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात पत्रकारिता आणि नाट्यलेखन आणि नाट्यसंस्था चालवणे अशी निरनिराळी कार्ये केली. १९३४ साली निर्भीड नावाचे साप्ताहिक त्यांनी चालू केले. अस्पृश्यता, विधवांची अवस्था यावर त्यात लेखन केले. त्यानंतर त्यांनी झुणका-भाकर चळवळ चालू केली. त्यात सर्व जातीचे लोक एकत्र बसून झुणका आणि भाकरी खात. त्यांनी एक विशेष सत्यनारायण हा कार्यक्रम चालू केला; यात अस्पृश्य जोडप्याला सत्यनारायणासाठी बसविले जाई. गद्रे पूजा सांगत आणि त्यानंतर जोडप्याच्या पायाचे तीर्थ प्राशन करीत. पूर्वीच्या काळात ब्राह्मणांनी अस्पृश्यांना आपल्या पायाचे तीर्थ घेण्यास भाग पाडले होते त्याचे प्रायश्चित्त म्हणून गद्रे हा समारंभ करीत.

निष्कर्ष

दलितांच्या स्थितीत सुधारणेच्या प्रयत्नांना या शतकात जोतिबा फुले, महर्षी शिंदे आणि सावित्रीबाई रोडे यांनी सुरुवात केली. गांधीजींना अस्पृश्यतेचा प्रश्न फार महत्त्वाचा वाटत होता. त्यांनी समाजात या विषयावर जागरूकता आणली. सावरकरांनी १९२९ साली रत्नागिरीत अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न पुढे आणला. पतित पवन मंदिरात सर्व जातींना प्रवेश मिळू लागला. १८१८ ते १९२० या काळात दलितांच्या प्रश्नावर समाजात जागरूकता आली आणि सुधारणेची चिन्हे दिसू लागली.

२०२२ मध्ये एका आदिवासी स्त्रीची राष्ट्रपती पदावर निवड व्हावी हे समाजात होणार्‍या बदलांचे द्योतक आहे.

पुढच्या भागात – भाग ११ – मध्ये आपण एकोणिसाव्या शतकातील स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करू.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet

जागर किंवा शिवरात्र मध्ये कुरुंदकरांनी एके ठिकाणी खूप छान म्हटले आहे, की कुणाही व्यक्तीचे / नेत्याचे मूल्यमापन हे ती व्यक्ती काय म्हणते यापेक्षा ती व्यक्ती प्रत्यक्ष काय कृती करते यावरून अधिक ठरते. तरीही मला वाटते, त्या काळात समाजातल्या चूकीच्या चालीरितींबाबत (खास करून, अस्पृष्यतेबाबत - कारण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात तो एक महत्त्वाचा प्रश्न होता) प्रांजळ (आणि खरोखर मनापासून) परखड विचार मांडणे पण कौतुकास प्राप्त आहे. कारण कल्पना करा की त्या व्यक्तीला शेवटी समाजात (आपल्या ज्ञातीत) रहायचे आहे. समाजातून वाळीत टाकण्याची भीती असेलच. 

अस्पृषता निवरणासाठी तत्कालिन इतर नेत्यांनी आंबेडकरांची साथ / पाठींबा दिला पाहिजे होता असे आज काळाच्या पुढे आल्यावर वाटते. खासकरून चवदार तळ्याच्या वा काळराम मंदिराच्या आंदोलनात. कारण, बांधलेल्या नवीन देवळात सवर्ण येण्याची शक्यता कमी आणि आश्रमाबाहेर दलितांना समानतेचे हक्क मिळण्याची शक्यता कमी.

अशा आंदलोनात जे सवर्ण / ब्राह्मण, - सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर सहस्त्रबुद्धे, अनंत चित्रे इ. जे बाबासाहेबांबरोबर उभे राहिले वा आपल्या वाड्यात ज्योतिबांना शाळा सुरू करू देणारे भिडे (कदाचित लेखकाचे कुणी नातेवाईक असतीलही)- अशा लोकांबाबबत मला अपार आदर आहे. कारण शेवटी त्यांनी समाजाच्या / ज्ञातीच्या विरोधात जाण्याच्या परिणामांची पर्वा न करता उघड भूमिका घेतली आणि त्याप्रमाणे कृती केली. सहसा अशा लोकांची नावे सामांन्यांच्या  ऐकीवात  नसतात. अशा अज्ञात समाजसुधारकांचा एक आढावा घेता येईल.

अलिकडच्या काळातल्या नेत्यांकडे बघून असेही वाटते की, दरेवेळेला विचार/भूमिका मनापासून मांडलेला/ली असण्याची शक्यता असेलच असे नाही. कारण प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष कृती/खतपाणी ही उक्तीपेक्षा निराळीच असू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मधल्या काळातले प्रतिसाद नष्ट झाले आहेत. पण वाचतोय. लेखमालिका आवडतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शतक कोणतेही ही असू जाती व्यवस्था ही अमर आहे.

फक्त त्याचे स्वरूप बदलत असते.नाव बदलत असतात व्याख्या बदलत अस्तात.
भेद भाव मुक्त समाज निर्माण करणे हे खूप लोकांचे स्वप्न होते ..खूप लोकांनी प्रयत्न केले.
पण यश आले नाही.
मी श्रेष्ठ ही वृत्ती च माणसाच्या dna मध्येच आहे तो स्वतःचे श्रेष्ठ पना ठसविण्याचा प्रयत्न करणार आणि दुसऱ्या कमजोर वर्गावर अत्याचार करणार.
हा माणसाचा स्वभाव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0