मागे श्याम मनोहर म्हणालेत 'खूप लोक आहेत'. तसाच खूप कचराही आहे. पण ट्रॅशबद्दल 'ऐसी अक्षरे'मध्ये लिखाण मागवताना काल्पनिक नावामागे लपणाऱ्या संपादकीय फळीने फार दूर बघायलाच नको होते. त्यांच्या 'संघा'तच अनेक ट्रॅश बोलणारे आहेत. कुणीही इतर काय लिहिणार? ना उजवे, ना डावे, ना करडे, ना मऊ! छे हो कसलं काय, गरीब गाय आणि पोटात काय, तू काहून करते मग हाय हाय. मग हाय काय अन नाय काय, सब कूच येकुन येकच हाय, नाय काय आन होय काय ? ते 'मुळशी पॅटर्न'मधला राहुल म्हणाला तसे थेट 'प्लास्टिक आहेत'. तेव्हा ते कुठल्याही फिसलपट्टीवरून उडी मारतात, कुठेही विक्षिप्तपणा दाखवतात. मनाला येईल तिथे ट्रोलिंग करतात. तर बाबांनो, तुम्हाला इतर कुणी इथे का लिहावे असे वाटते? दहा-बारा जण संपादकीय भूमिकेत आहेत. तुम्हीच लिहा, तुम्हीच चालवा, तुम्हीच एकमेकांच्या लेखावर टिप्पणी करा. कहता भी दिवाना, सुन्ता भी दिवाना ! ह्यात काही बरे, काही ओळखीचे, काही मित्र म्हणून 'जाऊ दे रे' अशी भूमिका घेतात. पण हा सगळा प्रकार ब्राह्मणी आहे, चावट आहे, हे आतापर्यंत इथे लिहिणाऱ्या अनेक ज्ञानपिपासू जंतूंना माहीत असणार. कुणी कधी एक्दम 'छोटी बच्ची हो क्या' रूप घेते, कधी कोणी 'फार महत्त्वाचं, फारच महत्त्वाचं लिहिलंय' अशी पितृत्वाची पावती देते.
चित्रे म्हणालेत - 'तुक्या रांडेच्या!' तशा नाही मी तुम्हाला प्रेमाने शिव्या देणार. समाजातला सगळा खरा गाळ हा इथे नव्हे, अनेक अशा संस्थळावर आहे. तो फिल्टरबबलिंग करतो, म्हणजे समाजात व्यक्त होण्याच्या प्रक्रियेत काही विचारांचे केंद्रीकरण केले, इतर वैचारिक ट्रॅफिकला वाट मिळत नाही. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा होतो, तसे हे फिल्टरबबलिंग काम करते. मुळात ह्यालाच ब्राह्मणीपणा म्हणतात. जे व्यक्त होत आहे ते आमच्या चष्म्यातून व्हावे नाहीतर आम्ही त्याला लगेच क्लिष्ट, बोजड, अवघड म्हणू. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. दुसरा एक प्रकार - 'काय लिहिलंय यार - क्या बात है? परत जरा शांतपणे वाचतो, आणि कळवतो' आणि मग कधीच काहीच ना कळवणे. संपादक 'संघा'ने काही संस्कार केले नाहीत, असे संपादकांचे मित्र- मैत्रीण म्हणणार.
पहा ब्वा! कसले लिबरल आणि फ्रँक आहेत खरे हे लोक. एकमेकांनासुद्धा सोडत नाहीत. क्या बात है ! इतके तीव्र सूर, इतके कडक स्वभाव, मान्या मैं तुम लोगोकु! सर आणि मॅडम छद्मी आहेत.
छद्मीपणावर खास ब्राह्मणी मक्तेदारी आहे. कारण एखाद्याच्या भाषेवरून उडून लोकांची मजा घेतात संघातले लोक. तुम्हाला ह्यॅ-ह्यॅ करून हसायचं आहे तर बसा तुमच्या त्याच त्याच आय-आय-टीच्या त्याच त्याच मंडळींसोबत... जसे सो-कुल एन-आय.डीवाले बसतात तोच बाबाजी-की-बुटी वाला टी-शर्ट हजार वेळा बनवूनसुद्धा त्याच त्याच प्रॉडक्ट डिझाईनच्या चर्चा करीत. पण नाही, आपण गटातल्या बाहेरच्या लोकांना बोलवून त्यांची मजा घेऊ यात, अशी खाष्ट भूमिका आहे. मी ज्यांच्यामुळे लिहिले त्यांची नसेल. पण जो अतिरेक चालू आहे तो ते इतके वर्ष पाहत आलेत तर आजही तुम्हाला भूमिका नाही घ्यायची म्हणजे काय?
मला वाटायचे ट्रोलिंग हा जरा उजवा प्रांत आहे. पण नाही हे छद्मी वागणे काकूबाई लेवलचे गॉसिप नेटवर्क आहे. कसले फालतू नावांमागे लपता, लिहा कोण आहेत ते. का नाव आपला बामनीपणा दाखवेल... अशी भीती वाटते का ? तुम्हाला सवय नसेल आणि माहीतही नसेल आपण ब्राह्मणी आहोत हे मान्य करायची. आपल्या आजूबाजूला रक्तात पेटलेले अगणित सूर्य असतील तरी आपल्याला फालतू चक्कलस करायची आहे. आपला आपण करावा विचार, ठेवू नये भार देवावरी ! बालगंधर्व कुणालाही मूर्खासारखे 'देवा!' म्हणायचे ना, तसले हे संघातल्या देवांनो. छापणार आहे आपल्या ब्राह्मणीपणाची हकिगत ?
ब्राह्मणीपणाचे अजून एक लक्षण - आपल्याला आपल्यापलीकडे काही दिसत नाही. आपले आपल्या जातीवर, आणि देहावर भयंकर प्रेम असते. त्यामुळे आपण स्वतःला इतके उच्च मानतो की आपल्याला कुणी स्पर्शच करू शकत नाही. काही शिवला तर लगेच आपली ओंगळ अंघोळ... हातात दिवा आणि ओंजळ ! म्हणजे संघातले सगळे नसतील करत हे सगळं, पण मुद्दा हालचाली, रूढींचा नाही. संरक्षणवादाचा आहे.
तुम्ही म्हणाल आता म्हणालास एक्दम तीव्र भूमिका घेतात आणि आपल्या गटातल्या मॅन आणि वूमनला पण सोडत नाहीत (bourgeois, पांढरपेशी व्याकरणाच्या जाळ्यात अडकवून ठेवतात.) आणि आता म्हणतोस .. संरक्षणवादी आहेत. महाराज बम्मन मे वो मोबिलिटी है वो कभी भी कूच भी हो सकता है! उदारमतवादी असणे ह्यासाठी एका हेकेखोरपणाची गरज असते ती गुणवत्ता आय. आय. टी छाप 'ग्लोबल ब्राह्मणां'मध्ये सहज उपस्थित असणार. उपस्थित कारण प्रस्थापित! ते तुम्हाला आग्रह करून आपल्या आग्रहारात बोलवून... जे तुम्ही लिहिलंय त्याची मस्करी करतात... कारण ते मस्करी करू शकतात. आणि हा खेळ चालू राहणार कारण ह्या ब्राह्मणीपणाचे सगळे अस्तित्व त्या मस्करीवर अवलंबून आहे. दुसरा कूच मूव्ह नही है उसके पास! समे-इच चीझ करते रहेंगे ये लोग ! और हरबार, बारबार, लगातार - नया बकरा चाहिये, हलाल करनेकु. क्यूकी ब्राह्मण खुदको दुसरे को अलग रखके डिफाइन करता है. कातडीबचावपणा बोलते उसको ! तरी बरं संस्थळाचे नाव 'ऐसी अक्षरे' आहे.. फुल्ल २ सेक्युलर! सबको ऍक्सेस. फिर कचरा भी आयेगाईच ना!
जाऊ द्या खूप कचरा आहे.