Thought Experiment No. 3

मला ते दिवस अजून आठवतात. मी नुकताच बीईची परिक्षा पास झालो होतो. कॉलेजमधेच माझी नोकरी पक्की झाली होती. निकाल लागल्यावर मी तडक पुण्याचा रस्ता पकडला. ऑफिसमधले दोन संटे पकडून आम्ही तिघांनी पुण्याच्या सुप्रसिद्ध “पुणेकर कॉलनी”त एक जागा भाड्याने घेतली.
पुणेकर कॉलनी”त दोन प्रकारचे लोक रहातात, एक तर म्हातारे, हळूहळू चालणारे, दर दहा पावलांनंतर एक पाउल विश्रांतीचे, थकलेले, वाट पहाणारे, मुलं अमेरिकेत. दुकानात एकमेकांशी बोलताना न्यूयॉर्क, फिला, बफेलो, केम्ब्रिज, टोरांटो. मुलीचे बाळंतपण, इमिग्रेशन, विसा, फराळाचे, पुरणपोळी किती दिवस टिकेल हो, चितळे ह्यांच्याच गोष्टी.
दुसरे म्हणजे आमच्या सारखे. बूड स्थिर नसलेले, वखवखलेले मुख्यतः पैशासाठी, परदेशगमनाच्या संधीची वाट बघणारे.
ह्या असल्या सडैल पार्श्वभूमीवर ही कथा घडते. आश्चर्य आहे ना?
तर सुरवात अशी झाली. आम्ही तिघे म्हणजे मी, पक्या आणि मन्या आपले “सुंदर” हॉटेलमध्ये संध्याकाळचे चा पाणी करत होतो. मी जाऊन कौंटरवर ऑर्डर देऊन आलो. त्याच वेळी तीन तरुणींनी हॉटेलात एन्ट्री घेतली. आमच्या शेजारच्या टेबलावर येऊन त्या तिघीजणी बसल्या. इतरही टेबलं मोकळी होती. पण नाही त्यांना त्याच टेबलावर बसायचं होतं.
कॉलनीत नवीन असाव्यात.
आम्ही गुपचूप बसून एकदा त्यांना बधून घेतले. काही खास नाही. ओके डोके होत्या.
“अखेर मालशेला यूएसचा चान्स मिळाला.” मी म्हणालो.
“बर मग? तिला तिच्या नशिबाने मिळाला. तू का उगा जळतोस? उद्या तुला पण मिळेल.” मन्या मला मायेने थोपटत बोलला, “हर एक कुत्ते के दिन आते है.”
शेजारच्या टेबलावरून चिमुकल्या रुमालाआड कोणीतरी हसलं.
“मला? मला कसा मिळेल? मी काय “गोरी सुबक ठेंगणी डॉल” थोडीच आहे?”
“ए बाबा, तुझी ती नेहमीची रडकी रेकॉर्ड नको लाऊ रे. तू अस कर स्टुडंट नाही तर टुरिस्ट वीसा घेऊन एक वार तात्याला भेटून ये.” मन्या.
पक्या शांत बसला होता. तो नेहमी कमी बोलत असे.
मला अमेरिका बघायची नव्हती. मला ऑनसाईट जाऊन पैसे कमवायचे होते.
आम्ही इडली सांबरची ऑर्डर दिली होती. ह्या हॉटेलात सेल्फसर्विस होती. “डिश तयार”ची घंटी वाजली.
“पक्या उठ. आज तुझी पाळी आहे.” मी पक्याला आठवण करून दिली.
त्या पोरी कदाचित आमचे संवाद ऐकत असाव्यात. मन्याचे त्यांच्याकडे लक्ष असावे. कारण मुलींच्या उपस्थितीत तो थोडा बावचळतो जसा आत्ता बावचळला होता. मला मुलींत काय पण इंटरेस्ट नाय. माझी फिलॉसफी स्वच्छ आहे. आधी पैसे. पैसे खिशात तर लडकी पचास! पक्या सिरिअस झाला होता. त्याचा मूड बदलला होता.
वातावरण टेन्स झालं होतं. पण तितक्याच वेगाने ते निवळलं. आम्ही आमची भंकस पुन्हा चालू केली.
“तू चॅटजीपीटी ट्राय केले कारे?” मन्या बहुतेक शेजारच्या टेबलावरच्या लाल टॉपवर इंंप जमवण्याच्या उद्देशाने बोलला.
लाल टॉप सलवार खमीसला काहीतरी बोलली. तिने कौंटरवर कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली होती. सलवार खमीस ट्रेमध्ये तीन कॉफीचे ग्लास घेऊन आली.
आम्ही चहा पीत बसलो होतो.
“आयला थंडीत कोल्ड कॉफी हा!” मन्या कुजबुजला. गरकन वळून सलवार खमीसने मन्याला नजरेने चूप केले. व्हाट अ बॅकहॅंड रिटर्न!
ध्यानीमनी नसताना सलवार खमीस खुर्ची ओढून आमच्या टेबलापाशी येऊन बसली.
आम्ही टरकलो. आता ही काय बोलणार अशी धास्ती.
“मी वासंती घाडगे. मागच्या सोमवारी मी अमुक अमुक कंपनीत जॉईन झाले आहे. ही लीना. आणि ही, ए तू लाजतेस कशाला, चारू. आम्ही कॉलनीत पाचव्या गल्लीत एक टू रूम किचन रेंट केलं आहे.”
“किती भाडं आहे?” पक्याने पहिल्यांदा तोंड उघडले.
“दहा. ठीक आहे का?” वासंतीने पक्याकडे बघून विचारले.
"ठीक आहे का?" ती जणू त्याची खुशाली विचारत होती.
पक्याने नजर उचलून वासंतीच्या डोळ्यात पाहिलं. डायरेक्ट डोळ्यात. क्षणात माहौल बदलला. माझा काही संबंध नसताना अंगावर गुलाबी काटा आला. घड्याळाची टिकटिक बंद झाली. क्षणार्धात पुन्हा सारं जैसे थे झालं. थांबलेले घड्याळ सुरु झाले.
“आम्ही पण तेव्हढेच देतो,” पक्या विचार करून बोलला, “अजून काय आहे?”
पक्या काय विचारत होता? मला काही समजलं नाही. पण वासंतीला समजलं.
“एक कपाट आहे, गीझर, फॅन, दोन तीन खुर्च्या टेबल, आणि तीन बेड्स. हो, गॅस पण आहे.”
आता मन्या घुसला. “ग्लॅड टू मीट यू गर्ल्स. माझं नाव मनोहर, हा केशव(म्हणजे मी) आणि हा झंपू!”
“झंपू!” वासंतीने हळुवारपणे नावाला कुरवाळले (असं आपलं मला वाटलं.), “सो व्हेरी क्युट!” तिचे डोळे अर्धवट उघडे होते. तुम्ही ज्याला अर्धोंन्मिलीत म्हणता तसे.
काय चाललय काय इथे.
“तुमच्या कंपनीच्या युएसमध्ये काही प्रोजेक्ट आहेत का?” मी मुद्दामहून "स्पेल ब्रेक" करण्यासाठी विचारले.
ती जागी झाली, “हो हो. आहेत ना...”
नंतर सावकाश बोलावे, आत्ता लगेच नको. असा विचार केला.
“तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर अनमान न करता विचारा.” मन्याने लाल टॉपकडे बघत वासंतीला सांगितले.
“तेच तर मला बोलायचं होतं. झंपू, तुमच्याकडे वाशिंग मशीन आहे का?” वासंतीने मन्याकडे दुर्लक्ष करून पक्याला विचारले.
असा गेम चालला होता.
नाही. आमच्याकडे वाशिंग मशीन नाही. आमच्या कंपनीत लॉंड्रोमॅट आहे. इत्यादी मी बोलणार होतो इतक्यात पक्या मजेत बोलला, “हो आहे ना. तुमचे कपडे धुवायचे असतील तर केव्हाही घेऊन या. मोस्ट वेलकम.”
काहीही. आम्ही उडालोच. फेकायला पण लिमिट असते. वासंतीने जर विचारले असते, “मला तारे तोडून आणून द्याल का?” तर हा म्हणाला असता, “व्हाय नॉट! आज रात्रीच तोडून ठेवतो.” बापाचा माल जणू. चिंचा, आवळे, कैऱ्या तसे चंद्र, सूर्य, तारे.
“आम्ही धुणी, भांडी, पोछा करायला कामवाली बघतो आहेत. तो पर्यंत...”
“नो प्रॉब्लेम. मिस.”
आम्ही दोघे चूप. ही गेली कि झाडू साल्याला. ह्यांच्यासमोर इज्जतका फालुदा नको. फारच पाघळलाय.
दुसऱ्या दिवशी सकाळी पारोशे कपडे घेऊन येण्याचा वायदा करून वासंती आणि कंपनी फुटासची गोळी घेऊन गेली.
“कुठाय तुझे वाशिंग मशीन रे. उद्या सकाळी ती आली म्हणजे बस बोंबलत.” मन्याला काळजी लाल टॉपची. तिला काय वाटेल ह्याची?
“मन्या, तू कशाला डोक्याला कल्हइ करून घेतोस? त्याचं खातं आहे. त्याचं तो जाणे. तो पिक्चर माहित आहे ना. निळू फुले कपडे धुतो तो? पक्या धुवेल तिचे कपडे.” मी अजून लावून दिली.
आम्ही अस्वस्थ होतो पण पक्या मात्र निर्धास्त. झोपताना मन्याने विषय खरवडला.
“मन्या, तू अजिबात टेंशन घेऊ नकोस. उद्याचे उद्या बघू. तू झोप.”
मग आम्ही मजेत झोपलो.
सकाळ झाली. दहा वाजले होते.
मन्या भिंतीला पाय लावून मोबाईल बघत होता. मी युएसवाला जॉब कुठे आहे का ते बघत होतो. पक्या बाबुराव अर्नाळकर वाचत होता.
दरवाज्याची बेल वाजली.
“आली.” म्हणून पक्या दरवाजा उघडण्यासाठी धावला.
दरवाज्यात कचरा उचलणारा पोऱ्या उभा होता.
हिरमुसला होऊन पक्या परतला. मला हसू आलंं.
पंधरा मिनिटांनी ती आली. सलवार खमीस, टॉप्स, ट्राउझर्स जीन्स... थॅंक गॉड एव्हढंच होतं, भरलेली प्लास्टिकची पिशवी घेऊन आली.
“दे माझ्याकडे. मी मशीन मध्ये टाकून येतो. पुढे काय होणार हे बघण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. आमच्या फ्लॅट मध्ये किचन आणि हॉल मध्ये साडे तीन फुटाची, सिंगल विटांची पार्टिशन भिंत आहे. पक्या तिथे उभा राहून म्हणतो कसा, “वासंती, आमचे मशीन खाली तळघरात आहे. मी जातो आणि मशीन सुरु करून येतो.”
आणि तो जिना उतरायला लागला आणि बघता बघता नाहीसा झाला. ही ट्रिक मी आमच्या कॉलेजच्या अन्युअल मध्ये बघितली होती. त्यामुळे मला काही वाटले नाही. पण मन्याला काही समजलं नाही. तो किचनमध्ये धावला.
“केशू, पक्या गायब झाला आहे.”
कुठून तरी दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मग बटणं दाबल्याचा, नंतर मशीनचं म्युझिक!
वासंती पेपर वाचत होती. तिचं लक्ष आमच्याकडे गेले, “तुम्ही असं भूत बघितल्यासारखे का करताय? इकडे या असे नि शांत बसा. झम्पू काय म्हणालाय मशीन लाऊन येतो म्हणालाय ना. म येईल.”
थोड्या वेळाने दूरवरून कुठून तरी पक्याचा आवाज आला, “वासंती, रेग्युलर का क़्विक? काय सिलेक्ट करू?”
“रेग्युलर. रेग्युलर.” वासंतीने उत्तर दिले.
“ओके, डन.”
मिनिटभरात पक्या जसा गेला तसा परत आला.
“एक तास लागेल, तो पर्यंत आपण नास्ता करून येऊ.” आम्ही “सुंदर” हॉटेल मध्ये जाऊन इडली सांबारची ऑर्डर दिली.
वासंती मधून मधून प्रश्न विचारत होती.
कुठल्या कंपनीचे आहे?
फ्रंट लोडिंग आहे कि टॉप लोडिंग?
केव्हढ्याला पडलं?
घेऊन किती वर्ष झाली?
ब्रेकफास्ट करून रूमवर परत आलो.
वासंती नि पक्याच्या गप्पा थाबायचं काम नव्हते. ते एकमेकात एव्हढे रंगून गेले होते कि आम्ही आहोत हे विसरूनच गेले होते.
“तुमच्या तळघरात अजून काय काय आहे?”
“अजून म्हणशील तर माझी पुस्तकांची लायब्ररी आहे.”
“कुठल्या टाईपची?”
“सगळ्या टाईपची. ज्ञानेश्वरी पासून रजनीश पर्यंत. काहीही.”
“मला तुमच्या तळघरात घेऊन जाल? झंपू, आमच्या घरात पण एक तळघर होतं. मी पाच सहा वर्षांची असेन. आम्हाला तिथं जायची परवानगी नव्हती. पण मी आई बाबांची नजर चुकवून जायची. थ्रिलिंग रोमहर्षक अनुभव. अलीस इन वंडर लँँड. परीकथेत गेल्यासारखे. मग एकदा आईने पकडलं. सॉलिड मार पडला. पण काय झालं कुणास ठाऊक. तेव्हापासून मी बिंदास वागायला लागली. मुलांच्या बरोबर क्रिकेट खेळायची. झाडावर चढून कैऱ्या तोडायची. असं बेछुट बेफाम. आई म्हणायची, “आता हिचं कसं होणार.” एकदा मी कविता केली होती ती आईला वाचून दाखवली. तिला काय संशय आला कुणास ठाऊक. तिनं विचारलं, “वासंती, तो दरवाजा तर उघडला नाहीस ना?” कुठला? “तोच तो तळघरातून बाहेर पडायचा.” नाही बा. “तिकडं जायचं नाही, दरवाजा उघडायचा नाही. काय समजलीस?””
वासंती दिलखुलास हसली. तिचे ते शुभ्र कुंद कळ्यांसारखे दात! पक्या लेका. काय एकेकाचे नशीब असतं!
“तुमच्या त्या तळघरात पलीकडे बाहेर पडायचा दरवाजा आहे कारे?” वासंतीने पक्याला विचारलं.
इतक्यात मशीन झाल्याचं म्युझिक वाजू लागलं. प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी
पक्या बेसमेंटमध्ये “गेला”. तो काय करतो ते बघायची आमची हिंमत नव्हती.
थोड्या वेळाने धुतलेले कपडे पिशवीत भरून तो पुन्हा “वर” आला.
“थॅंक्यू झंपू.” म्हणून वासंती कपड्यांची पिशवी घेऊन निघून गेली.
ती गेल्यावर आम्ही पक्याकडे वळलो. “पक्या, ते वाशिंग मशीन, ते बेसमेंट. तो जिना. काय प्रकार काय आहे?”
पक्या हसायला लागला तो थांबेच ना. मग काय म्हणतो. खूप भोळी आहे रे ती. आणि तुम्ही पण. बेसमेंट काय? वाशिंग मशीन काय? अस कधी असतं काय? रिअल लाईफ मध्ये. मी गंमत केली तिची. तुम्ही पण फसलात ना! चूतीयोंकी कोई कमी नाही. एक धुंडो तो हजार...सकर्स आर बॉर्न एवरी मिनिट.
पण ते धुतलेले कपडे?
ती ट्रिक तुम्हाला नाही समजली? नाही समजणार. तुम्ही अजून चड्डीत आहात. ग्रो अप मॅन!
तो टोलवाटोलवी करत राहिला. आम्ही पण लावून धरले.
"तुम्हाला इंंप म्हणजे काय आहे माहित आहे?" पक्या आम्हाला सांगायला लागला.
"इंंप म्हणजे इम्प्रेशन." मी हसत हसत बोललो.
"ते इंंप नाहीरे. इंंप म्हणजे लिटल डेविल! शंभर इंंप एका पाण्याच्या टबमध्ये घ्यायचे. त्यात पाणी, पावडर आणि कपडे टाकायचे. आणि एक फुल चॉकलेट. त्यांना चॉकलेट दिले कि ते खुश. अर्ध्या तासात कपडे धुवून तयार." पक्या गंभीर होऊन सांगत होता, "तुम्हाला टेरी प्रॅॅट्शेट माहित आहे?"
"हा कुठला शेठ?"
पक्या पुन्हा खो खो करून हसायला लागला. थांबेचना.
मग आम्हीपण नाद सोडला.

त्यांना बहुतेक कामवाली बाई मिळाली असणार. कारण वासंती धुवायचे कपडे घेऊन आली नाही. पण ती तशीच यायची. पक्या बरोबर गप्पा मारत बसायची. आमच्या सगळ्यांसाठी चहा करायची. कधी कधी बरोबर खायला फरसाण घेऊन यायची. झंपू झंपू करत सगळीकडे फिरायची. आमची रूम आवरायची. छी, किती सिगारेट फुंकता तुम्ही.( त्या दिवसापासून पक्याची सिगारेट बंद झाली.) बेसमेंट बद्दल गप्पा मारायची. बिचारीच्या डोक्यातून बेसमेंट जात नव्हते.
“झंपू, तू तो बेसमेंटच्या दुसऱ्या बाजूचा बाहेर जायचा दरवाजा उघडला आहेस कधी?”
“नाही, एकट्याने उघडायचं भ्या वाटतं.”
“अरे चल. मला तुझ्या बेसमेंटमध्ये घेऊन चल. आपण दोघे मिळून तो दरवाजा उघडू.”
पक्या तिच्याकडे एक टक बघत राहिला.
“खरच?” पक्या एव्हढेच बोलू शकला.
“अगदी.” वासंतीने होकार भरला.
आमच्या समोर हातात हात गुंफून ती दोघं किचनमध्ये गेली. जिना उतरून बेसमेंटमध्ये गेली.
मन्या एव्हढंच बोलला की ह्या दोघांचे काही खरं नाही.
मग “खालून” आवाज येत राहिले. पक्या वासंतीला लायब्ररी दाखवत असावा.
आम्ही कान देऊन ऐकायचा प्रयत्न करत होतो. स्पष्ट असं काही ऐकू येत नव्हते.
आता वासंती बोलत होती. चल तो दरवाजा उघडू या. पक्या काय बोलला ते कळले नाही.
दरवाजा उघडण्याचा कर्रsss आवाज आला. हिंदी पिक्चर मध्ये असतो तसा. नंतर सगळं शांत झालं.
आम्ही थोडा वेळ वाट पाहिली. नंतर डोक्यात प्रकाश पडला.
ते परत येण्यासाठी गेले नव्हते.
मन्या भावनाविवश झाला.
केशु, गड्या, ही आपली कामं नाहीत.
मी म्हणालो खरं आहे.

(Inspired by

Mildred Clingerman, Stair Trick. पण निराळी , माझी स्वतःची)

हवाओं में बहेगें
घटाओं में रहेगें
तू बरखा मेरी
मैं तेरा बादल पिया

जो तेरे ना हुवे तो
किसी के ना रहेगें
दीवानी तू मेरी
मैं तेरा पागल पिया

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बापरे.. लाईटमोड मधून एकदम धक्का... छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या एका वाचकाने ओरिजिनल कथेची ऑडीओ फाईलची लिंक मला दिली.
https://youtu.be/coqPsrB06w0?t=858 मी ऐकली नाही अजून. ती ऐकून माझा एक वडापाव बनतो का? ते सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0