संपादकीय

#अंकाविषयी #संकल्पनाविषयक #समाजमाध्यम #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

संपादकीय
- सई केसकर

१९६७ साली मार्शल मॅकलुहान नावाच्या कॅनडातल्या एका इंग्रजीच्या प्राध्यापकानं माध्यमांबद्दल एक पुस्तक लिहिलं. त्यात मॅकलुहाननं एक विलक्षण सिद्धांत मांडला – तुम्ही काय सांगत आहात यापेक्षा तुम्ही जे माध्यम वापरून ते सांगत आहात ते अधिक प्रभावी असतं. उदाहरणार्थ, छापखाने अस्तित्वात येण्याआधी माहितीचा प्रसार मौखिक माध्यमातून आणि हस्तलिखितांतून होत असे. माहितीच्या देवघेवीसाठी समूहात राहणं, प्रभावी बोलणं, ऐकून लक्षात ठेवणं यांना महत्त्व होतं. शिवाय हस्तलिखितं वाचायला साक्षर असणं गरजेचं होतं, जे वर्ग, जात आणि लिंगभेदावर अवलंबून होतं. त्यामुळे पोथ्यांच्या समूहवाचनातूनच त्या निरक्षर लोकांपर्यंत पोहोचत असत. त्या जगाची रीतच माध्यमामुळे वेगळी होती. मग माहिती छापली जाऊ लागली,अधिकाधिक लोक लिहायला आणि वाचायला शिकू लागले, तसं ऐकण्यापेक्षा वाचण्याला महत्त्व आलं. लोक आपापल्या खोल्यांत बसून एकेकटे वाचू लागले; पर्यायाने एकमेकांपासून दुरावले. त्यानंतर, म्हणजे मॅकलुहानच्या काळातच, टेलिव्हिजन आणि टेलिफोन ही माध्यमं आली, ज्या माध्यमांनी पुन्हा एकदा लोकांना जवळ आणायला सुरुवात केली. मॅकलुहान याला 'ग्लोबल व्हिलेज' म्हणतो. माध्यमाबाबत अनेक सुरस निरीक्षणं नि भाकितं नोंदवणार्‍या या पुस्तकाचं शीर्षक 'मीडियम इज द मेसेज' असं असणार होतं. पण गंमत म्हणजे, पुस्तकाची प्रुफं तपासायला आली तेव्हा 'मेसेज' या शब्दाऐवजी तिथे 'मसाज' असं छापून आलं होतं! मॅकलुहानला ती चूक फारच आवडली कारण 'मसाज' या शब्दात 'मास' (mass) आणि 'एज' (age) हे दोन शब्द दडलेले आहेत. माध्यमं आपल्या संवेदनांना जणू मालिशच करत असतात असं त्याला वाटलं. माध्यमं आपल्या संवेदनांचा ताबा घेतात, भान हरपायला लावतात. ताण विसरायला आपण माध्यमांकडेच वळतो. त्यामुळे मॅकलुहाननं 'मसाज' हा शब्द तसाच राहू दिला. मात्र पुस्तकात आणि वरच्या चित्रफितीत अधूनमधून एक चिंतेचा सूर जाणवतो. एकूणच, नवनव्या विजेवर चालणाऱ्या उपकरणांमुळे आपलं खासगीपण धोक्यात येणार अशी भीती व्यक्त केली जाते. उदाहरणार्थ, फोन तुमचं संभाषण चोरून ऐकू शकेल. पण शेवटी हे सांगायला मॅकलुहानही टीव्हीवरच येतो!

खरंतर मॅकलुहान त्या काळी जे सांगू पाहत होता ते जवळपास ५५ वर्षांनंतर आजच्या माध्यमांना अधिक चपखलपणे लागू आहे. तो असं म्हणतो की 'प्रिंट' माध्यमानं 'पब्लिक' तयार केलं. आणि तो ज्याला 'इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी'असं म्हणतो त्या तंत्रज्ञानानं 'मास' तयार केला. समाजमाध्यमांनी माणसाला एकाच वेळी पुस्तक वाचण्यातलं खासगीपण आणि सोबतीसाठी म्हणून समूह दिला. हे चांगलं की वाईट याबद्दल ऊहापोह करायला आपणही समाजमाध्यमांवरच येतो. या पुस्तकात नोंदवलेल्या अजून एका निरीक्षणाबद्दल आवर्जून लिहावंसं वाटतं. माध्यमं नेहमी माणसांच्या पुढे असतात. त्यामुळे आपल्या हातात नवीन माध्यम आलं, तरी आपण निदान सुरुवातीच्या काळात, जुन्या माध्यमांचे खेळच नवीन माध्यमांवर मांडतो. छापखाने आले तेव्हा तातडीनं आणि मुबलक प्रमाणात काय छापलं गेलं – पोथ्या. सिनेमे आले तेव्हा त्यांचं पहिलं रूप रंगमंचावरच्या नाटकांसारखं होतं. तसं समाजमाध्यमं आली तेव्हा सुरुवातीला 'ब्लॉग'वरचं दीर्घ लेखनच लोकप्रिय होतं.

आता हा दिवाळी अंकच घेऊ. खरंतर, या माध्यमावर दिवाळीचं असं काही बंधन नाही. भांडवलशाहीच्या रेट्यानं जाहिराती करायच्या म्हणून दिवाळी अंक काढायची ‘ऐसी’वाल्यांना काहीच सक्ती नाही. आणि घरात जागा नाही म्हणून कालांतरानं रद्दीत जाण्याचीही भीती नाही (अर्थात, अंक 'रद्दी' झाला आहे, अशी प्रतिक्रिया विनम्रतेनं सहन करावी लागते ते वेगळं). पण तरीही ‘ऐसी अक्षरे’ छापील अंकांच्या हातात हात घालून गेली तेरा वर्षं, वार्षिक दिवाळी अंक प्रकाशित करत आहे. यावर, ऐसी संपादकांच्या लहानपणच्या दिवाळीचे मोती साबण आणि दिवाळी अंक हे दोन हळवे कोपरे होते यापलीकडे काहीच स्पष्टीकरण देता येणार नाही. पण होते तर होते! त्यांनाही स्मरणरंजनाचा हक्क आहेच!

तर प्रत्येक नवीन माध्यमाचा जुन्याबरोबर नांदण्याचा काही ठरावीक काळ असतो. यथावकाश, जुनी माध्यमं सरून पुढच्या आवर्तनाला वाट करून देतात. जुन्या-नव्याच्या या सहवासात नव्या प्रयोगांना दिशाही मिळत असतात. टीव्हीवरील मुलाखतीचं पॉडकास्ट झालं. किंवा जाहिराती दाखवण्याची रीत बदलली. पूर्वी टीव्हीचा आवाज बंद करून जाहिराती न बघितल्याचं सुख मिळवता यायचं. आजकाल आपण जाहिरात बघतो आहोत हे जाहिरातीच्या शेवटीच लक्षात येतं. जाहिराती दाखवण्यासाठी आपण माध्यमांना स्वतःबद्दल पुरवलेली माहिती माध्यमांतर्फे वापरली जाते याचा अनेकांना सात्त्विक संताप यायचा. पण आता कधीकधी मीच फेसबुकनं दाखवलेल्या एखाद्या जाहिरातीतली बॅग 'कार्ट'मध्ये टाकते आणि ती विकत न घेताच निघून जाते. मग अशा 'अप्राप्य' गिऱ्हाईकाला धरण्यासाठी फेसबुक अजिजीनं तशाच पंधरावीस बॅगा दाखवू लागतं; आणि मग माध्यमालाच थोडं खेळवल्याचा आनंद मला मिळतो.

माध्यम आणि वापरकर्ते यांचा असा साद-प्रतिसाद घडणं हे समाजमाध्यमांचं वैशिष्ट्य आहे. त्यातून एकीकडे विधायक चर्चा घडतात, तर दुसरीकडे 'ट्रोलधाडींचा' धोका संभवतो. मग ते दोन वर्षांपूर्वीच्या 'नो बिंदी नो बिझनेस' म्हणत दागिन्यांच्या जाहिरातींवरचं आक्रमण असो वा अलीकडेच पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत ईदनिमित्त 'ईदगाह' ही कथा वाचून दाखवण्याच्या निमित्तानं त्यांची झालेली बदनामी असो; एकुणात समाजमाध्यमांवर झुंडीनं घडवून आणण्यात येणारी प्रसिद्धी वा कुप्रसिद्धी किती प्रभावी आहे याचा प्रत्यय येतो. शिवाय समाजमाध्यमांवरून होणारी आर्थिक फसवणूक, चुकीच्या 'रामबाण वैद्यकीय' सल्ल्यांनी होणारी आरोग्याची हेळसांड, निवडणुकांच्या सुमाराचा फेक न्यूजचा रतीब हे सारं आता सवयीचं झालं आहे. काय खरं आहे काय खोटं आहे याची शहानिशा करत बसण्यापेक्षा, "माहितीच नको" असं वाटायला लागतं.

२०१०च्या आसपास, भारतीय राजकारणात शशी थरूर नावाचे तंत्रज्ञान-साक्षरच नव्हेत, तर तंत्रज्ञानप्रेमी असे खासदार आले. त्या काळात त्यांच्याकडे, आज आपण ज्याला अर्धस्मार्ट म्हणू असा, 'ब्लॅकबेरी' फोन होता, ज्यावरून ते सतत त्यांचे विचार 'ट्विटर'वर व्यक्त करायचे. थरूर जग बघून भारतात परतल्यानं 'ट्विटर'चं महत्त्व ओळखून होते. परंतु त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांचं हे सतत फोनवरून व्यक्त होणं बालिश वाटायला लागलं. इतकं, की त्यावर झालेल्या टीकेची दखल 'द न्यू यॉर्क टाइम्स'नंही घेतली. २०११नंतर भारतात स्मार्टफोन हळूहळू रुळायला लागले. सुरुवातीला फोन आणि वापरासाठीचा डेटाही महाग होता. पण चीनमधून स्मार्टफोन स्वस्तात येऊ लागले, २०१४च्या आसपास 'जिओ' कंपनीनं डेटा फुकट उपलब्ध करून दिला, आणि स्मार्टफोन झपाट्यानं पसरले. त्यानंतर माहितीचा, मुख्यत: बातम्यांचा चेहराच बदलून गेला. त्यापूर्वी बातम्यांचा प्रवास टेलिव्हिजन आणि वृत्तपत्रांकडून समाजमाध्यमांकडे व्हायचा. आज एखाद्या मंत्र्यानं ट्विट केलं, की त्याची वर्तमानपत्रांत किंवा टीव्हीवर बातमी होते. आपले माननीय पंतप्रधानही खर्‍याखुर्‍या पत्रकारांऐवजी माध्यमांनाच पत्रकार समजून तिथेच एकतर्फी व्यक्त होतात. थोडक्यात, 'आज की ताज़ा ख़बर'चा स्रोत आणि प्रसारही आता समाजमाध्यमांतूनच अव्याहत होतो.

समाजमाध्यमं आयुष्यात आली तेव्हा तुम्ही किती वर्षांचे होतात यामुळे तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता यात लक्षणीय फरक पडतो. कारण या माध्यमांवर जगाच्या कानाकोपऱ्यांतून अव्याहतपणे साहित्य येऊन आपल्या हातातल्या यंत्रांवर आदळत असतं. कुणाला काय आवडेल, कोण काय बघून हरखून जाईल याचा अंदाज बांधणं दिवसेंदिवस अशक्य होत चाललं आहे. पिढीचं मोजमापही आता जुनं होत चाललं आहे. आज, आत्ता मी 'हातातल्या यंत्रावर' असं म्हणते आहे पण माझ्या पिढीच्या हातात समाजमाध्यमं एका विचित्र आवाजात कुरकुरणाऱ्या 'मॉडेम' नावाच्या यंत्रातून आली. संगणक आंतरजालाला घरातल्या 'एका जागी बसलेल्या' फोनमधून जोडला जाई. त्यामुळे जितका वेळ तुम्ही माध्यमांवर विहार करत असाल तितका वेळ इतरांना तुमचा फोन लागायचा नाही, आणि ही त्या काळी एक खूप महत्त्वाची अडचण होती! आज त्या लँडलाईनची कलेवरं लोकांच्या माळ्यावर धूळ खात पडली असतील.

आपल्या विशीच्या आसपासच्या वयात जे काही उपलब्ध होतं त्यांबद्दलच्या स्मरणरंजनात आपण उतारवयात रमतो. पण माध्यमांच्या बाबतीतले बदल इतके झपाट्यानं झाले आहेत, की त्यांचं एकरेषीय स्मरणरंजनही शक्य नाही. प्रत्येक पिढीनं, त्यांच्या तरुणपणी झपाट्यानं बदलणारी समाजमाध्यमं बघितली आहेत. ऑर्कुट-फेसबुक-ट्विटर-युट्यूब इन्स्टाग्राम-स्नॅपचॅट-लिंक्डइन-टिकटॉक-टिंडर-ग्राइंडर अशी अनेक माध्यमं लोकांनी एकाच काळात वापरली आहेत. या माध्यमांवरचा आपला वावर आठवून बघायचा प्रयत्न केला तर एखाद्या सायफाय सिनेमासारखं, एकाच वेळी अनेक प्रतलांवर तुकड्यातुकड्यांत असलेले आपण दिसतो. प्रेमाचंच उदाहरण घेऊ. लोक जालावरून प्रेमात नेमके कधी पडू लागले हे सांगता येणार नाही. पण पुन्हा मॅकलुहानचंच म्हणणं खरं ठरेल असं, पूर्वी जशी पत्रमैत्री असायची तसे सुरुवातीला लोक जालमैत्री करू लागले. अनोळखी व्यक्तीशी संवाद साधण्याची; त्याच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची; त्याला आपल्या मनातलं काही सांगण्याची उर्मी तीच होती. फक्त त्यातून पोस्टखातं गायब झालं. त्या काळी सगळ्यांकडे डीजीकॅमेरे नव्हते आणि जालावर आपला फोटो टाकायची एक सार्वत्रिक भीतीही होती. त्यामुळे 'अनदेखा, अंजाना कोई' अशी एक हुरहूर, धडधड वगैरे वगैरे असायची; विशेषतः मैत्री आणि आकर्षणातली सीमा धूसर असेल तर. एखाद्याचं बाह्यरूप माहिती नसताना त्याच्याशी केलेल्या मैत्रीत आध्यात्मिक पातळीवर असावी तशी तरलता असायची. २००७ साली जेव्हा चांगला कॅमेरा असलेला आयफोन बाजारात आला, आणि माध्यमंही अधिक सुरक्षित झाली, त्यानंतर जालावरून जोडीदार शोधण्यासाठी म्हणूनच ‘डेटिंग ॲप’ वापरली जाऊ लागली. 'डेटिंग ॲप' बहुसंख्यांसाठी, विशेषत: अल्पसंख्य LGBTQIA+ समूहासाठी प्रचंड क्रांतिकारी ठरल्या. परंतु ह्या प्रवासात प्रेमाचं स्वरूप बदललं आहे की माध्यमांनी ते बदलायला हातभार लावलाय हाही कळीचा मुद्दा ठरेल. 'इन प्रेझ ऑफ लव्ह' या पुस्तकात तत्त्वज्ञ आलँ बादियु एक मार्मिक भाष्य करतात – 'जोडीदार शोधण्यासाठी तयार केलेली समाजमाध्यमं ही प्रेमात पाडण्यातली जोखीम आणि अनपेक्षितता घालवून टाकतात.' मोकळ्या जगात, लोक जेव्हा एकमेकांना एखाद्या वायूच्या रेणूंसारखे धडकू लागतात, तेव्हा त्यातली एखादी टक्कर अनपेक्षित प्रेमात रूपांतरित होते. पण आता निरुद्देश प्रेमासाठीदेखील लोक अल्गोरिदम वापरू लागल्यानं त्यांना जे आवडतं असं त्यांनी ठरवलेलं असतं तेच त्यांना मिळत जातं. त्यामुळे गेल्या काही वर्षांत कुणी, कुणाशी, कधी आणि कितीदा 'प्रेम' करावं याबद्दल जरी समाज अधिकाधिक सहिष्णू होत असला, तरी प्रेमाला मात्र आपण अल्गोरिदमच्या पिंजऱ्यात अडकवत चाललो आहोत.

प्रेमाप्रमाणेच आपल्या इतर भावना आणि तंत्रज्ञान या दोन्हींचं एक संयुग तयार झालं आहे. आपल्या समोर नसलेल्या, आपण ज्याला क्वचित प्रत्यक्ष भेटलो आहोत अशा व्यक्तीनं जगाच्या एका कोपर्‍यातून एक बटण दाबून आपल्याला त्यांची पसंती कळवली म्हणून आपल्याला हर्ष होतो. किंवा त्यांनी तसं केलं नाही म्हणून दुःख होतं. यातले आनंद आणि दुःख 'मानवीच' आहेत. पण ते मिळवण्याचा मार्ग मात्र तंत्रज्ञानातून आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे होणाऱ्या अनेक समज-गैरसमजातून जातो. त्याचा आपल्या मनावर होणारा परिणाम पटकन झटकून टाकता येत नाही. आपल्याला उत्फुल्लित करणारी संप्रेरकं आपल्या मेंदूत व्यायाम केल्यानंही स्रवतात आणि समाजमाध्यमांवर लाईक्स मिळवल्यानंदेखील. पण कमीत कमी कष्टांत असं आतून उत्फुल्लित वाटून घेण्याचं पटकन व्यसन लागतं, हे आता विज्ञानानं सिद्ध केलं आहे. समाजमाध्यमांचं, आणि आजच्या किशोरवयीन मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 'मल्टीप्लेयर' व्हिडीओ गेम आणि इन्स्टाग्राम या दोन समाजमाध्यमांचं तरुण मुलामुलींना व्यसन लागतं आहे. हा प्रश्न किशोरवयीन मुलांच्या बाबतीत चिंतेचा आहेच पण ज्येष्ठ नागरिकही यातून सुटलेले नाहीत. दारू-सिगरेट वापरासाठी जशी वयाची मर्यादा असते, तशी समाजमाध्यमांसाठीही असावी यासाठी अमेरिकेत गेली काही वर्षं प्रयत्न चालू आहेत.

ह्या समाजमाध्यमांची व्याप्ती कुठवर आहे नि त्याचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिणाम – एखाद्या कुटुंबापुरते असोत वा जागतिक स्तरावरचे – किती खोल ह्याचा अंदाज येणं कठीण. लोकशाही प्रक्रियेतली ढवळाढवळ म्हणता येईल अशा पद्धतीनं अमेरिकी निवडणुकांमध्ये रशियानं केलेला हस्तक्षेप, आणि दुसऱ्या बाजूनं आपल्याच नागरिकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणारी अनेक देशांमधली सरकारं समाजमाध्यमांचा कुशलतेनं वापर करताना दिसतात. दुसऱ्या बाजूला, अगदी माध्यमांशी संबंधित व्यवसायात काम करणाऱ्या काहींनी 'आजच्या तरुण पिढीची भाषाच आम्हांला कळत नाही' अशी प्रांजळ कबुली दिली आहे. त्यामुळे समाजमाध्यमांचं माणसाला हे इतक्या बाजूंनी व्यापून टाकणं आणि त्याच्या परिणामांची व्याप्ती किंचित का होईना जोखणं हे या अंकाचं सूत्र म्हणून ठरवणं आम्हांला योग्य वाटलं. 'अ‍ॅप'चं तंत्रज्ञान, त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रांत होणारा वापर, मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम, समाजमाध्यमं असतानाचं आणि नसतानाचं स्मरणरंजन, नजीकच्या भविष्यात समाजमाध्यमांच्या संदर्भात कायद्यांमध्ये काय बदल व्हावेत असं समाजाला आणि त्या-त्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांना वाटतं, हे आणि इतर अनेक मुद्दे घेऊन आम्ही हा अंक घेऊन आलो आहोत. मुलाखती घेण्याआधी आणि आलेले लेख वाचण्याआधी समाजमाध्यमांबद्दल सर्वसाधारणपणे नकारात्मकच सूर असणार असा अंदाज होता पण जवळपास सगळ्यांनीच या माध्यमांमुळे किती सकारात्मक बदल झाले आहेत हे सांगूनच सुरुवात केली!

या विषयावर काम करत असताना मागची चोवीस-पंचवीस वर्षं झर्र्कन डोळ्यासमोरून गेली. 'ऐसी अक्षरे'च काय, पण फेसबुकही आता नवनवीन समाजमाध्यमांशी संपर्क नसलेल्या, जुन्या माध्यमांबद्दल स्मरणरंजन करणाऱ्या पस्तिशी-चाळीशीच्या वा त्यापुढल्या वयातल्या वापरकर्त्यांचं ठिकाण झालं आहे. माध्यमांवरच्या नव्या-जुन्या वापरकर्त्यांना जोडणारा सांधा आत्ताच निखळलेला आहे. आपल्यासाठी म्हणून वेचून आणलेलं साहित्य मिळवून देणारे संपादक समाजमाध्यमांवरून नाहीसे झालेले आहेत. किंबहुना ते तिथे नसणं हेच या माध्यमांचं बलस्थान आहे. ही लोकशाही एकाच वेळी मुक्त करणारी आहे आणि गोंधळवून टाकणारीही आहे. रोज जालावर चढवल्या जाणाऱ्या अगणित गोष्टींमधून आपल्याला काय बघायला आवडेल हे शोधून काढायचा उत्साह उत्तरोत्तर कमी होत जातो. आणि मग आपल्या सवयीचंच काही पुन्हा बघायचं / वाचायचं असाच निर्णय घेतला जातो. पूर्वीच्या वानप्रस्थाश्रमासारखा 'समाजमाध्यम संन्यास'ही कधीकधी घ्यावासा वाटतो, कारण तिथे जे जे चाललं आहे ते हळूहळू आपल्या आवाक्याबाहेर जातं आहे याची जाणीव होत राहते.आपण इतक्या वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचे आणि त्या तंत्रज्ञानाच्या इतक्या बहुआयामी वापराचे सक्रिय वापरकर्ते आणि साक्षीदार होतो नि कदाचित पुढेही थोडा काळ असू याचा साक्षात्कार झाला!

रीतीप्रमाणे अंकाच्या मुख्य सूत्राच्या बाहेरचं साहित्यही अंकात आहेच. आणि जाहिराती दिसतील. त्या दाखवण्यासाठी आम्हांला मोती साबण किंवा बाकरवड्या मिळालेल्या नाहीत हे आम्ही सर्व संपादक आधीच नमूद करतो.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

>>>>>> आपले माननीय पंतप्रधानही खर्‍याखुर्‍या पत्रकारांऐवजी माध्यमांनाच पत्रकार समजून तिथेच एकतर्फी व्यक्त होतात.
हा हा हा, त्यांचे सर्व काही वेगळेच असते. हम करे सो कायदा आहे त्यांचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आपले माननीय पंतप्रधानही खर्‍याखुर्‍या पत्रकारांऐवजी माध्यमांनाच पत्रकार समजून तिथेच एकतर्फी व्यक्त होतात.

तुम्ही हे ‘मंकी बात’बद्दल म्हणत आहात काय? तसे असल्यास, ही ‘तुमच्या’ माननीय पंतप्रधानांची विशिष्ट खोड खाशी नव्हे. (द्वितीय महा)युद्धकाळातले ‘आमचे’ एक राष्ट्राध्यक्षसुद्धा असलाच प्रकार करायचे. (‘शेकोटीशेजारच्या गप्पां’बद्दल तुम्ही ऐकले वा वाचले असेलच.) हं, कालानुरूप माध्यम वेगळे असेलही, परंतु तत्त्व तेच.

सांगण्याचा मतलब, ‘तुमच्या’ विद्यमान माननीय पंतप्रधानांबद्दल मला अजिबात प्रेम नाही. मात्र, या विशिष्ट बाबीसंबंधीची त्यांच्यावरील टीका ही पूर्णपणे अस्थानी आहे, एवढेच नम्रपणे सुचवू इच्छितो. झालेच तर, त्यांची ही विशिष्ट गोष्ट ही (इतर कोणीतरी सुचविल्याप्रमाणे) जगावेगळी नाही, किंबहुना, हे त्यांचे वैशिष्ट्यही नाही, तर त्याला पूर्वप्रघात आहे, एवढेच लक्षात आणून देऊ इच्छितो.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंकी बात रेडिओवर असतं. ते जुनं माध्यम आहे. इथे ट्विटर अपेक्षित आहे. शशी थरूर ट्विटर वापरतात म्हणून त्यांना बालिश म्हणणारे लोक त्यानंतर फक्तं ४ वर्षांत त्या माध्यमाला इतके सरावले की आता जेव्हा मणिपूरमध्ये जाळपोळ सुरू असेल तेव्हा त्याबद्दल काहीही न बोलता पंप्र कुणाला तरी ट्विटरवरून लग्नाच्या शुभेच्छा देत बसतात तेव्हा कुणीच त्यांना काही म्हणत नाही. उदाहरणार्थ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0