Skip to main content

एका क्राईम रिपोर्टरची सुरस आणि चमत्कारिक मुलूखगिरी : भाग १

4 minutes

(हरीश नांबियार यांच्या परवानगीने केलेला अनुवाद)

 

माझी पत्रकारितेची शाळा नवी दिल्लीत होती. ते प्रशिक्षण संपवून १९९१मध्ये मी मुंबईतील ‘द इकॉनॉमिक टाईम्स’च्या डेस्कवर शिकाऊ (इन्टर्न) म्हणून रुजू झालो. इराकने कुवेतवर आक्रमण केलं होतं आणि पत्रकारितेचं जालीम रसायन माझ्या रक्तात भिनत होतं. त्या वयात मी स्वतःला क्रांती विकणारा फेरीवाला समजत होतो. ते वयच तसं असतं म्हणा ना.

 

मला लौकरच लक्षात आलं, की त्या भांडवलशाहीच्या मंदिरात मला करमत नाही. ‘द इकॉनॉमिक टाईम्स' या वलयांकित  पत्राच्या बीनाकृती डेस्कवर टी. एन. निनन हे माननीय संपादक मुक्तहस्ताने वाटत असलेल्या 'कॉमासूत्रा’चे नाजूक वळसे भोगण्यासाठी पुरेसा परिपक्व नाही. मी ताबडतोब फुटाची गोळी चावली. एमए पदवीसाठी विद्यापीठात प्रवेश आणि चर्चगेटच्या वसतिगृहात राहायला एक खोली मिळवली.

 

वार्ताहर म्हणून मला पहिली नोकरी ‘द डेली’मध्ये लागली. रुसी करंजिया यांनी बुलडॉग चिन्ह घेऊन सुरू केलेलं  हे प्रसिद्ध टॅब्लॉइड. त्याचं ब्रीदवाक्य होतं : ‘मुक्त, स्पष्ट, निर्भय’ (फ्री, फ्रँक अँड फियरलेस). नवीन मालक कमल मोरारका होते आणि नवीन संपादक रजत शर्मा होते. शर्मांनी मला गुन्हेगारी जगतावर लिहिणारा पत्रकार (क्राईम रिपोर्टर) म्हणून नोकरी दिली होती. त्या वर्तमानपत्रात बलजीत परमार नावाचा एक सेलिब्रिटी पत्रकार अगोदरच गुन्हेगारी कव्हर करत होता. मला शिकाऊ म्हणून घेतलं होतं, पण मुख्य हेतू बलजीतला प्रतिस्पर्धी तयार करण्याचा असावा.

 

संपादकांनी आदेश दिला रिपोर्टींग सुरू करण्याआधी मी पहिला आठवडा डेस्कवर घालवावा. मला द डेलीच्या बीन डेस्कवर वैद्यनाथनच्या शेजारी बसवण्यात आले. वैद्यनाथन एक प्रतिभावान संपादक होते. “हेडलेस बॉडी इन टॉपलेस बार” या मानकाला लाजवतील असे महान मथळे देणं त्यांची खासियत होती. ते लंडनमध्ये असते तर ते द सन किंवा द मिररचे फ्रंट-पेज एडिटर झाले असते.

 

सनसनाटी बातमी

१९९२ मध्ये द डेलीचं डेस्क पूर्णपणे पुरुषांच्या तावडीत होतं. नवख्या पोराला शिकवण्याच्या हेतूने वैद्यनाथनने मला त्यांच्या अगदी शेजारची खुर्ची दिली. एका थपडेच्या अंतरावरची. टेलिप्रिंटरमधून आलेले पीटीआय आणि यूएनआयच्या बातम्यांचे प्रिंटआउट  संपादित करण्यासाठी ते माझ्या दिशेने भिरकावून देत असत. मी पुराणकाळातली, आता विस्मृतीत गेलेली, संपादन चिन्हं वापरत, त्यातून (माझ्या मते) छापण्यायोग्य माल काढून देत असे. माझं काम त्यांना परत दिलं की त्यावर एक नजर टाकून (प्रसंगी नजर न टाकताही) चुरगळून कचराकुंडीत फेकत असत. कचराकुंडीची जागादेखील माझ्या शेजारीच होती.

 

शिफ्ट भरदुपारी सुरू व्हायची, पण खऱ्या बातम्यांचा सिलसिला संध्याकाळी सुरू व्हायचा. रानोमाळ पांगलेले पत्रकार आपल्या घरट्यांत परतून त्यांच्या बातम्या पहिल्या पानावर लावाव्या म्हणून वैद्यनाथनशी वाटाघाटी करायचे. त्या दोन तासांत वैद्यनाथन माझ्या उरल्यासुरल्या नवजात बातम्यांचा निर्दयपणे कोथळा काढत असत. एके दिवशी त्यांनी मला ‘शिकवायचा’ वेगळा मार्ग निवडला. सर्व सहा-सात संपादक कार्यालयात परतले होते आणि बीन डेस्कभोवती सभा भरली होती. नाटकाचं नेपथ्य आणि पात्रं तयार होती. वैद्यनाथननी आपल्या शिडात हवा भरून घेतली.

 

"नांबियार, तू सिनेमे पाहतोस का?"

“नाही.”

“दारू पितोस का?”

“नाही.”

“जुगार?”

“नाही.”

"मग जिंदगीत काय करतोस काय?"

“मी इश्कबाजी करतो.”

 

डेस्कवरच्या लांडग्यांचा अशा रीतीने पाडाव करून मी रिपोर्टिंगकडे वळलो.

 

***

 

सुरुवातीच्या रिपोर्टिंग-दिवसांतला दिनक्रम म्हणजे आयुक्त कार्यालयातील पोलिस प्रेस रूममध्ये जाणे, मराठीत नोंदवलेले दररोजचे गुन्हे वाचणे, आणि पोलिस नियंत्रण कक्षाशी सतत संपर्कात राहणे.

 

बलजीतच्या नेतृत्वाखाली माझं पहिलं काम होतं नवीन पोलिस आयुक्त श्रीकांत बापट यांच्या नियुक्तीची बातमी करणे. मला बातमी लिहायची होती. मी रीतसर ते सगळं टाईप केलं आणि वैद्यनाथननी सांगितल्याप्रमाणे कार्बन कॉपी बलजीतला दिली.

 

“अरे व्वा, तू कागदावर नोंदी न घेता सर्व तपशील टिपलेस. छान काम केलंस,” बलजीतने प्रोत्साहन दिलं.

 

पुढे कधीतरी मी उपायुक्त हसन गफूर यांची मुलाखत घेतली. ती चांगली बातमी होती, आणि मी लिहिलीही मन लावून. मी प्रत डेस्कवर नेली तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिसरं पान चुकून टाइपरायटरमध्येच राहिलं आहे. जेव्हा मी ते आणायला गेलो तेव्हा बलजीतला गफूरसोबत फोनवर बोलताना ऐकलं.

 

“अरे गफूर साब, बच्चों से कितनी गहरी बात करते हैं आप?”

 

संपादकाचं ध्येय कदाचित साध्य झालं असेल. मुंबईच्या क्रमांक एकच्या क्राइम रिपोर्टरला प्रतिस्पर्धी तयार होत होता.

 

***

 

तो काळ मुंबईमधल्या टोळीयुद्धांचा होता. 

 

“१९९२मध्ये मुंबईतील सर्वात मोठे सार्वजनिक रुग्णालय असलेल्या जेजे हॉस्पिटलमध्ये झालेला गोळीबार हा शहरातील  टोळीयुद्धातील सर्वात धाडसी हल्ल्यांपैकी एक आहे. १२ सप्टेंबर १९९२ रोजी पहाटे ३:२० वाजताच्या सुमारास हल्लेखोरांनी १५०० बेडच्या या रुग्णालयात एके-४७ रायफल, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, हातबाँब आणि डायनामाइट अशी अत्याधुनिक शस्त्रे घेऊन प्रवेश केला. त्यांनी (तिथे रुग्ण म्हणून दाखल झालेला) कैदी शैलेश हळदणकरवर रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये गोळीबार केला.”

(या प्रकरणातील एक आराेपी, जो ३२ वर्षे फरार राहिल्यानंतर पकडला गेला होता, त्याच्याबद्दल ६ नोव्हेंबर २०२५चा इंडियन एक्सप्रेसचा अहवाल. त्याला या प्रकरणात जामीन नाकारण्यात आला.)

 

‘डी’ कंपनीच्या लोकांनी अरुण गवळी टोळीचा शार्प शूटर हळदणकरची हत्या केली तेव्हा तो बेडवर साखळ्यांनी  बांधलेल्या अवस्थेत होता. शहरातील टॉप क्राइम रिपोर्टर – बलजीत आणि  इंडियन एक्सप्रेसचे प्रभात शरण — यांनी अथकपणे या घटनेचा पाठपुरावा केला आणि मी त्याचा साक्षीदार होतो.

 

बलजीतने एकदा मला येरवडा तुरुंगात एम. एन. सिंग यांना भेटण्यासाठी सोबत यायला सांगितलं. सिंग पुढे मुंबईचे पोलिस उपायुक्त झाले. ते दिलखुलास होते आणि मी बलजीतचा शागीर्द असल्यामुळे माझी त्यांची चांगलीच दोस्ती झाली. आम्ही मुंबई-पुणे महामार्गावरच्या एका पंजाबी ढाब्यावर उत्तम जेवण केलं. बलजीतच्या मल्याळी ड्रायव्हरला त्याच्या बॉसला कुठे जेवायला आवडेल हे बरोबर माहीत होतं.

 

आणि मग ती घटना घडली. बाबरी मशीद पाडण्यात आली आणि मुंबई पेटली.

 

***

(भाग २ इथे.)

 

तळटिपा:

 

१. वृत्तपत्राची संपादकीय डेस्क राजम्याच्या दाण्याच्या (‘बीन’) आकाराची असायची प्रथा आहे. ‘बीन’च्या आतल्या बाजूला वृत्तसंपादक बसत आणि बाहेरच्या बाजूने इतर उपसंपादक मंडळी.

२. व्हिन्सेंट ‘विनी’ मुसेटो या पत्रकाराने १५ एप्रिल १९८३च्या ‘न्यू यॉर्क पोस्ट’च्या अंकात हा सनसनाटी मथळा दिला. टॅब्लॉइड पत्रकारितेच्या जगात याला ध्रुवताऱ्याचं स्थान आहे. हा मथळा नुसताच चतुर शब्दच्छल नव्हता, तर न्यू यॉर्क शहरातल्या ढासळत्या कायदा सुव्यवस्थेवर केलेलं नेमकं भाष्य होतं.

३. पत्रकारितेच्या जगात अंतिम प्रत कार्यक्षम पद्धतीने दुरुस्त करण्यासाठी संपादन चिन्हं वापरली जातात. उदा० शब्द समाविष्ट करणे (कॅरेट ^), शब्द हटवणे (मजकुराला छेदून जाणारी आडवी रेघ), लोअरकेस करण्यासाठी साठी =, अपरकेस करण्यासाठी ///, नवीन परिच्छेदासाठी ¶, ठळक छापासाठी bf, वगैरे. ही संपादन चिन्हं प्रमाणीकृत असल्याने गोंधळाला वाव राहात नाही. 

 

हरीश नांबियार २०१६पासून इकाॅनाॅमिक टाइम्समध्ये पुनर्लेखन विभागात कार्यरत आहेत. त्यांचे २००२मधल्या गुजरात दंगलीच्या आगेमागे ‘बुलेट’वरून केलेल्या भारतभ्रमणातील अनुभवांवर आधारित Defragmenting India: Riding a bullet through the gathering storm हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. पुस्तकाचा ॲमेझॉनवरील दुवा.

Node read time
4 minutes

म्रिन Fri, 12/12/2025 - 18:52

हरीशबरोबर द डेलीमध्ये काम केलंय काही काळ. त्यामुळे हे वाचताना फारच मजा येतेय. पुढचे भाग लवकर येऊ देत. त्याचं पुस्तक तर भन्नाट आहे. जबरदस्त अनुभव आहेत त्यात लिहिलेले. त्याची शैलीही फार आवडते.

'न'वी बाजू Fri, 12/12/2025 - 22:53

In reply to by म्रिन

ओळखीतला आहे वाटते हरीश. ‘आतल्या गोटा’तला?

खूप बरे वाटले हे समजल्यामुळे. किंबहुना, या माहितीची आत्यंतिक गरज होती.

ड्रुपलच्या अपग्रेडनंतर ‘ऐसी’ची श्रेणीव्यवस्था गेली, म्हणून. अन्यथा, ‘माहितीपूर्ण’ अवश्य दिली असती.

असो चालायचेच.

'न'वी बाजू Sat, 13/12/2025 - 00:19

In reply to by म्रिन

(आणि, खरे सांगू? आपण ‘आतल्या गोटा’तले नाही, म्हटल्यावर, प्रचंड हेवा, असूया, मत्सर वगैरेसुद्धा वाटला.)

असो. नेव्हर माइंड अस पामर्स.

म्रिन Sun, 14/12/2025 - 19:31

In reply to by 'न'वी बाजू

अर्र, हे सगळं वाटावं म्हणून कमेंट केली होती आणि माझी अपेक्षा चक्क पूर्ण झाली. अरेरे.