Skip to main content

नतद्रष्टांची किरकिर

नतद्रष्टांची किरकिर
==========

-राजीव उपाध्ये

टीप - ए०आय० निर्मित आशयाबद्दल सतत किरकिर करणार्‍यांना हा लेख मी समर्पित करत आहे. विचारमंथनात (ब्रेनस्टॉर्मिंग) मध्ये ए०आय० अचाट मदत करतो, हे ज्यांना समजू शकत नाही त्यांना हे तंत्रज्ञान माफ करो.

कालच माझ्या फेसबुकच्या कालरेषेवर एक बातमी येऊन थडकली. टुरींग पारितोषिक विजेत्या प्रा० डोनाल्ड नुथ यांनी त्यांची एक अचंबित करणारी "यशकथा" प्रकाशित केली आहे. त्यानिमित्ताने ए०आय० बद्दल पसरविले जाणारे गैरसमज आणि ए० आय० चा नवे शोध लावण्यात लागणारा हातभार हे पुरेसे उजेडात आणणे एक ए०आय० समर्थक म्हणून माझी नैतिक जबाबदारी ठरते.

ए०आय० तंत्रज्ञानाने पृथ्वीतलावर अवतार घेतल्यापासून तज्ञांमध्ये बृहत्भाषा प्रतिकृतींबद्द्ल बरेच नकारात्मक चित्र रंगवले गेले. त्यात तो थापा कसा मारतो हे पण उगाळले गेले. ए०आय०मुळे मानवी मेंदूच्या कार्यक्षमतेवर होणारा नकारात्मक परिणाम सर्वत्र चर्चिला गेला. पण हे सर्व होत असताना ए०आय० आपली क्षमता वाढवून संशोधनातील आपली मदतनीसाची भूमिका अधिक प्रभावी बनवत होता.

प्रा० नुथ यांना अल्गोरिथ्मचे देवपिता (गॉडफादर) मानले जाते. त्यांनी आपल्या संशोधनात ॲन्थ्रोपिक च्या क्लॉड ४.६ या ए०आय० मॉडेलला आपले सहकारी बनवले आणि अनेक दिवस न सुटलेल्या समस्येचे उत्तर शोधले.

शुद्ध गणितातील अत्यंत किचकट आणि मानवी बुद्धिमत्तेसाठी अत्यंत जटील मानल्या गेलेल्या अनेक समस्या एका कोशाच्या रुपात आता ग्रथित केल्या गेल्या आहेत. त्यांना एर्डश कोश असे संबोधल जाते. हा एर्डश कोश न सुटलेल्या सुमारे एक हजार गणिती समस्यांची जंत्री आहे.

जानेवारी २०२६ मध्ये आता ए०आय०च्या मदतीने अनेक दशके न सुटलेल्या एर्डश कोशातील ३ महत्त्वाच्या समस्या ए०आय० च्या मदतीने सुटल्याचे जाहिर करण्यात आले. नील सोमाणी या संशोधकाने एर्डश समस्या क्र० ३९७ जीपीटी ५.२ हे मॉडेल वापरून काही मिनीटात सोडविली. केव्हीन बॅरेटोने आपल्या एका सहकार्‍याबरोबर एर्डश समस्या क्र० ७२८ आणि ७२९ या समस्या सोडविल्या. गणितातील नोबेल मानले गेलेले फिल्ड पारितोषिक विजेते टेरेन्स टाओ यांच्यामते स्वयंचलित ए० आय० च्या मदतीने मिळवलेले हे यश लक्षणीय आहे.

याच बरोबर गुगल डीपमाईंडने एर्डश समस्या क्र० ६५२, ६५४, ९३५, and १०४० सोडविल्याचे जाहिर केले आहे.

ए०आय०ने नव्या संशोधनाला अनेक क्षेत्रात गती दिली आहे आणि त्याचा आढावा घेणे सध्याच्या नकारात्मक वातावरणात योग्य ठरणार नाही. ए०आय० ची मदत घेऊन केलेले लिखाण, तयार केलेली एखादी कलाकृती लोक जेव्हा नाकारतात तेव्हा ते स्वत:चे हसे करून घेतात. ज्ञानाच्या इतिहासात साधने बदलत गेली, पण शोधांची किंमत कधी कमी झाली नाही. वरील शोधांचे महत्त्व ए०आय० च्या मदतीने लावल्याने त्यांचे महत्त्व कमी होते का? या प्रश्नाचे उत्तरे ठाऊक असून दिले नाहीत तर तुमच्याच डोक्याची ...

सई केसकर Sat, 07/03/2026 - 15:42

१. तुम्ही हा लेख एआयबद्दल किरकिर करणाऱ्या मानवांसाठी लिहिला आहे.
२. जर बहुतांश लेखन एआयने होऊ लागले तर मग तुम्ही कुणासाठी लेख लिहिणार?

तर्कतीर्थ Sat, 07/03/2026 - 19:11

@सई केसकर

तुमचा प्रतिसाद फारच संदिग्ध असल्याने तुमची गृहितके काय याचा अजिबात अंदाज बांधता येत नाही.

एखादा लेखक आपले पुस्तक एखाद्या लाडक्या व्यक्तीला अर्पण करतो म्हणजे ते इतरांनी वाचू नये असे सूचित होत नाही. तसेच इथे हा लेख इतरांनी वाचू नये असे अजिबात सुचवायचे नाही.

आजच दुपारी कार्नेगी विद्यापीठातील एका गणिताच्या प्राध्यापकाची मुलाखत बघितली [१] त्यांच्या दाव्या प्रमाणे ए० आय० मानवी कल्पकतेला लवकरच मागे टाकेल (माझ्यामते अगोदरच मागे टाकले आहे). हे स्वीकारले तर मुद्दा उरतो तो सध्याच्या गोंधळाचा अर्थ कसा लावायचा.

ए०आय० ची नवनिर्मिती लोकांना समजायला जड जात आहे. अजून २-३ वर्षातच मानव अजून वेगाने उत्क्रांत होऊ लागेल (भारताचं माहित नाही, पण एकंदर कठीण वाटतंय) आणि काही प्रमाणात ए०आय० शी जुळवून घेईल.

[१] https://www.youtube.com/watch?v=ivVPJhYM8Ng&t=461s

गोगोल Sun, 08/03/2026 - 15:39

(स्फूर्तीस्थान)
पालो अल्टोतील पालो अल्टो इंजिनीयरींग कॉलेज आणि अल्गोरिथम्स सोडवण्याच्या जागेवर रुजू झालेले धुरंधर भाटवडेकर हे माझ्या सख्ख्या चुलत काकांच्या साडूंच्या मावशीच्या नणंदेचे दीर. त्यामुळे ही हकिकत घरातच समजलेली आहे.

एकदा सर्व अल्गोरिथम्स सोडवणारे त्यांच्याकडे जमलेले होते. त्यात डोनाल्ड नुथ पण होते. बोलता बोलता "पी vs एन पी" चा विषय निघाला आणि गप्पा अशा काही अफाट रंगल्या की सकाळची संध्याकाळ झाली तरी मंडळीना भान नव्हत. धुरंधर भाटवडेकरांच्या पत्नी काशीबाईंनी सगळ्यांकडे "भूक किती आहे" याची चवकशी केली. सर्वांनी थोडी फार भूक असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे काशीबाईंनी लुसलुशीत पाव, घरीच बनवलेले ताज ताज लोणी आणि किंचित वाफवलेले चिकन यांची साधी सोपी सुटसुटीत सँडविचेस बनवायला घेतली.

त्या काळी गुगल येऊन एक ३-४ वर्षे झालेली होती. पण धुरंधर भाटवडेकरांना त्याचा नुकताच शोध लागलेला. मोठ्या माणसांच्या बाबतीत होतं असं कधी कधी. त्यातून त्यांना गुगल ची काही फीचर्स जसे की "site:" किंवा "inurl:" किंवा "-" अशी नुकतीच कळाली होती. त्यामुळे ते असे सगळे ऑपशन्स वापरून सर्च करायचे. मग त्यातून जे सर्च रिझल्ट्स मिळत त्याचे स्क्रीन शॉट्स घेऊन आमच्या घरच्या मंडळींचा एक ई-मेल ग्रुप होता त्यावर पाठवत. अर्थात आम्ही सर्व लोक गुगल ३-४ वर्षे आधी पासूनच वापरत असल्याने आम्हाला त्याबद्दल काहीही नावीन्य नव्हतं. त्यामुळे आम्ही त्यांना थोडं फार आडून आडून सुचवून पाहिलं की अशा लो एफर्ट इ-मेल्स पाठवू नका, ते सर्च रिझल्ट्स जरूर वापरा पण ते स्वतः वाचून, काहीतरी सकस अशी इ-मेल पाठवा. पण का कोण जाणे, त्यांना असं वाटलं की आम्ही गुगल वापरायलाच मनाई करतो आहे. ते प्रचंड खट्टू होऊन आम्हालाच डबल जोमाने गुगल वापरणे कसे फ्यूचरिस्टिक आहे, जे नाही वापरणार ते कसे मागे पडतील वगैरे वगैरे अशा इ-मेल्स पाठवू लागले. आम्ही बापडे "आपलाच माणूस आहे, घ्या सांभाळून" म्हणून इग्नोर करायचो.

तर झाले असे की त्या दिवशी त्यांनी डोनाल्ड नुथ यांच्या समोर पी हा एन पी शी इक्वल आहे असा स्टॅन्ड घेतला आणि त्यांच्या समोर गुगल करून दाखवलं "how p == np". भरपूर सर्च रिझल्ट्स मिळाले, जे त्यांनी अभिमानाने डोनाल्ड नुथ यांना दाखवले. त्यावेळी डोनाल्ड नुथ यांनी त्यांना समजावून सांगितले की फक्त सर्च रिझल्ट्स मिळवून भागत नसते तर त्या लिंका वाचून व्हेरिफाय करायला लागतात. धुरंधर साहेबांना अस्सा राग आला म्हणता. त्यांनी काशीबाईंना पाहुण्यांना सँडविचेस द्यायला मनाई केली. काशीबाई म्हणाल्या "आत्ता ग बया, एव्हढी ६० सँडविचेस केलीत त्याचे काय करायचे??". त्यावर धुरंधर साहेबांनी पाहुण्यांना समोर बसवून सगळीच्या सगळी ६० सँडविचेस स्वतः च खाऊन टाकली.

असे हे सँडविचेस चे माहात्म्य आमच्या घरात बरेच चघळले जाई... त्या दिवशी पासून धुरंधर साहेबांच्या लो एफर्ट इ-मेल्स कायमच्या बंद झाल्या.

ही कंमेंट ए आय वापरून लो एफर्ट पोस्टांच्या जलेबी पाडणार्यांना मी समर्पित करत आहे.

तर्कतीर्थ Sun, 08/03/2026 - 16:37

In reply to by गोगोल

’लो एफर्ट/हाय एफर्ट” ही डायकोटोमी वाचून अंमळ मौज वाटली. अशा द्वैताने किती समस्या उभ्या राहतील हे तर कोणताही ए०आय० न वापरताच अत्यंत ’लो एफर्टने”च कळले.

एर्डश कोशातील ए०आय० वापरून सुटलेल्या समस्या या ’लो एफर्ट’ समस्या मानाव्यात का हा संभ्रम पण निर्माण झाला.

तरी पण प्रतिसाद देण्यासाठी ए०आय०चा कल्पक वापर मनापासून आवडला. त्यासाठी दहा पैकी नऊ गुण!

तर्कतीर्थ Mon, 09/03/2026 - 08:20

श्री० गोगोल आणि इतर,

एक सांगायचे राहून गेले. तुम्ही आणि इतर कुणीही माझ्या लिखाणाचा कितीही उपहास केला तरी माझ्यात काहीही फरक पडणार नाही. तुम्ही मूळ लेखावर, त्यातील मुद्द्यांवर भाष्य करू शकत नाही हा तुमचा पराभव आहे, हे तुम्ही जितक्या लवकर स्वीकाराल तेव्हढे चांगले.

ए० आय० मला आवडतो कारण तो चुकू शकतो पण माणसासारखा दूष्ट नाही. मानवी तज्ज्ञाकडे पैसे टाकूनही प्रामाणिक सल्ला मिळेलच असे नाही. याचे ठळक उदा० म्हणजे वकील आणि डॉक्टर! ए०आय० सल्ला देतो तेव्हा मानवी स्वायत्तता अबाधित राहते. पण सध्याच्या काळात मानवी तज्ज्ञ त्यांचा वैयक्तीक स्वार्थ जपूनच सल्ले देतात आणि ते मानले नाही तर डूख धरतात. मानवी स्वायत्तता हे शब्द त्यांच्या शब्द कोषात असतात का, या बद्दल मी साशंक आहे. पक्षकार किंवा रूग्णाकडून पैसे उकळायचे आणि गैरप्रचार करून नुकसान पण करायचे, हा दुर्व्यवहार ए०आय० करत नाही.

कॅल्क्युलेटर्स आले तेव्हा पाढे आणि कोष्टके यांचे माहात्म्य असेच उगाळले जाई.

तेव्हा माझ्या लिखाणावर कितीही उपहास कुचेष्टा करणार्‍या ’पोष्टी’ आल्या तरी माझ्याकडून दुर्लक्षच होईल, अति झाले तर रिटालिएट होईल. जास्तीत जास्त मला ब्लॉक केले जाईल. म्हातारीने कोंबडं कितीही झाकले तरी उजाडायचे थांबत नाही...

ए०आय० चिरायु होवो!

गोगोल Mon, 09/03/2026 - 09:33

In reply to by तर्कतीर्थ

वगैरे मनापासून आवडला होता आणि मार्क्स वाटत फिरत होतात. रात्रीतून काय झालं की अचानक उपहासाची उपरती झाली?

>> तेव्हा माझ्या लिखाणावर कितीही उपहास कुचेष्टा करणार्‍या ’पोष्टी’ आल्या तरी माझ्याकडून दुर्लक्षच होईल, अति झाले तर रिटालिएट होईल.

अरे भाई केहना क्या चाहते हो? दुर्लक्ष कि रिटालिएट?
"अति" होण्याची डेफिनिशन काय? की ते गोलपोस्ट पण एका रात्रीतून मन बदललं तसं बदलत राहणार?

जर का आक्षेप मी कुठेतरी तो बिनडोक पणा चा डायलॉग म्हणला त्याला असेल तर तो सामना चित्रपटात श्रीराम लागूंच्या तोंडी आहे आणि मला तो मजेशीर वाटला इतकेच. हे मान्य की सगळ्यांना तो रेफेरेंस कळला नसेल.

>> "ए० आय० मला आवडतो कारण तो चुकू शकतो पण माणसासारखा दूष्ट नाही."

बाकी या नाईव्ह ऑप्टिमिझमचं कौतुक करावं की हेवा की कपाळावर हात मारून घ्यावा कळत नाही. ऑलरेडी दोन तरुणांनी ए आई ने सांगितले म्हणून आत्महत्या केल्या आहेत.

>> मानवी तज्ज्ञाकडे पैसे टाकूनही प्रामाणिक सल्ला मिळेलच असे नाही. याचे ठळक उदा० म्हणजे वकील आणि डॉक्टर! ए०आय० सल्ला देतो तेव्हा मानवी स्वायत्तता अबाधित राहते.

बॉर्र .. ए आई ऍड्स वगैरे गोष्टी तुमच्या पर्यंत पोहोचलेल्या दिसत नाहीत.

बाकी मी सिलिकॉन वेली मधील ए आय कंपनी मध्ये काही काळ काम करून झालंय (आज काळ कुठेही अशा कंपन्या कुत्र्याच्या छत्री सारख्या उगवतात), त्यामुळे यु आर बार्किंग अंडर द रॉंग ट्री.

>> अति झाले तर रिटालिएट होईल. जास्तीत जास्त मला ब्लॉक केले जाईल

जे काय रिटालिएट करायचे ते शाब्दिक आणि आईडियाज मधून करा. बाकी कुणीच कुणाला ब्लॉक करू नये अशा मताचा मी आहे जोवर सर्व काही मुद्द्यांवर चालू आहे.

>> तुम्ही मूळ लेखावर, त्यातील मुद्द्यांवर भाष्य करू शकत नाही हा तुमचा पराभव आहे, हे तुम्ही जितक्या लवकर स्वीकाराल तेव्हढे चांगले.

मुळात तुम्हाला नक्की कशावर आक्षेप आहे आणि तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे तोच कळेनासं झालाय.
तरी तुमच्या समाधानासाठी माझा पराभव झाला, तुम्ही जिंकलात ... माझं घर आपण उन्हात बांधू हा!

माझं घर आपण उन्हात बांधू हा!

तुम्ही चिऊ आहात, की काऊ (किंवा चिवेतर), यावर अवलंबून आहे.

चिऊ असलात, तर मेणाचे घर उन्हात वितळून जाऊ शकते, ही बाब जमेस धरली आहेत काय? (चिवेतर असल्यास वांदा नाही.)


बाकी, काऊचिऊची गोष्ट ही मुळात कोणीतरी पर्यावरणवादाची खिल्ली म्हणून काढली असावी काय? म्हणजे, तुम्ही मारे ईको-फ्रेंडली म्हणून शेणामेणासारख्या बायो-मटीरियल्सची घरे बांधलीत खरी, परंतु, ती जर एवढ्याश्या पावसाने वाहून जाणार असतील किंवा एवढ्याश्या उन्हाने वितळून जाणार असतील, तर उपयोग काय? तिथे आमची काँक्रीटची जंगलेच कामी येतात! (निदान त्यांमध्ये एसी तरी बसवता येतो.) अशा अर्थाने.

(त्यात पुन्हा, त्या ओरिजिनल ष्टोरीच्या आम्ही ऐकलेल्या (आमच्या आजीने सांगितलेल्या) आवृत्तीप्रमाणे, निर्वासित होऊन चिऊकडे आलेल्या काऊला चिऊ (बरेच आढेवेढे घेतल्यानंतर) सरतेशेवटी आश्रय जेव्हा देते, तेव्हा तो काऊ चिऊच्या घरातल्या पिंपात भरलेले सगळे हरभरे खाऊन टाकतो, आणि (त्या ठिकाणी) पिंपभर हगून ठेवतो. थोडक्यात, Anti-refugee sentiment! Xenophonia! चालायचेच. (It always sells.))

गोगोल Mon, 09/03/2026 - 21:43

In reply to by 'न'वी बाजू

इथे मी विश्वनाथन आनंद सारखी डाव्याहाताने चेस खेळायची ट्रीक केली.
कारण इथेतरी लाकडाची घरे बांधतात (जी त्यातल्या त्यात इको फ्रेंडली आहेत) आणि तसाही मी घराच्या बाहेर पडतच नाही. त्यामुळे बाहेर ऊन काय नी पाऊस काय ...

हॅ हॅ कश फशीवलं

'न'वी बाजू Mon, 09/03/2026 - 18:37

In reply to by तर्कतीर्थ

तेव्हा माझ्या लिखाणावर कितीही उपहास कुचेष्टा करणार्‍या ’पोष्टी’ आल्या तरी माझ्याकडून दुर्लक्षच होईल, अति झाले तर रिटालिएट होईल. जास्तीत जास्त मला ब्लॉक केले जाईल.

(‘ऐसीअक्षरे’च्या आतावरच्या अनुभवावरून तरी) ‘ऐसीअक्षरे’वर तुम्हाला इतक्या सहजासहजी ब्लॉक केले जाईल, असे वाटत नाही.

फार कशाला, ‘येथील तमाम सदस्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत’ असे मत जरी (समजा) तुम्ही तुमच्या लेखांतून अथवा प्रतिसादांतून (आणि, एकदा नव्हे, हजारदा) व्यक्त केलेत, तरीसुद्धा, तुमच्या (येथील) आयडीच्या शष्पाससुद्धा त्यामुळे धक्का लागण्याची शक्यता शून्यवत् आहे. (त्यावर जास्तीत जास्त ‘कारवाई’ म्हणजे, भविष्यात एखादे दिवशी कधीतरी तुम्ही स्वतःच कंटाळून हे संस्थळ सोडून जाल, याची वाट संपादनमंडळाकडून पाहिली जाईल. याहून अधिक काही होणे नाही.)

हं, आता, समजा, येथील एखाद्या स्त्री-आयडीच्या (आणि, त्यातही, शक्य तोवर संपादनमंडळातील एखाद्या स्त्रीआयडीच्या) जालनामासदृश नाव धारण करणाऱ्या एखाद्या काल्पनिक स्त्रीपात्रासोबत विविधनामधारी संकीर्ण इस्लामधर्मी काल्पनिक पात्रे कशी प्रतिदिनी, वारंवार, आणि (शक्यतो) बलात्काराने रत होत आहेत, असा काहीबाही कल्पनाविलास तुम्ही आपल्या प्रतिसादांतून जर रंगवू लागलात, तर मात्र कदाचित (शक्य तोवर तुमचा असा एखादा प्रतिसाद प्रसिद्ध झाल्यापासून तीनचार दिवसांनंतर; त्याअगोदर नव्हे!) तुमचा संबंधित प्रतिसाद उडविला जाणे तथा तुम्हाला ब्लॉक केले जाणे शक्य आहे. (पूर्वी एकदा एका सदस्यांच्या बाबतीत तसे घडलेले आहे.)

सांगण्याचा मतलब, तुम्हाला या संकेतस्थळावरून स्वतःस अतिशय डेस्परेटली ब्लॉक करून घ्यायचेच जर असेल, तर किमान तितका एफर्ट तुम्हाला घ्यावा लागेल, किमान तितका थ्रेशोल्ड ओलांडावा लागेल, किमान तितकी तपश्चर्या करावी लागेल. (आणि, तरीसुद्धा, यशाची शाश्वती ही नाहीच.)

कठोर परिश्रमांस पर्याय नाही.

गोगोल Mon, 09/03/2026 - 18:59

In reply to by 'न'वी बाजू

>> एखाद्या काल्पनिक स्त्रीपात्रासोबत ... प्रतिसादांतून जर रंगवू लागलात
यक्क

>> पूर्वी एकदा एका सदस्यांच्या बाबतीत तसे घडलेले आहे.
डबल यक्क

उपाध्ये साहेब बार इज सेट हाय .. आता ए आय वापरून हो जाओ शुरु

'न'वी बाजू Mon, 09/03/2026 - 21:31

In reply to by तर्कतीर्थ

याबद्दल एक anecdote असे ऐकलेले आहे, की कॅल्क्युलेटर जेव्हा हळूहळू प्रचलित होऊ लागले, तेव्हा नव्या तथा जुन्या दोन्हीं पिढ्यांनी त्यांचा अंगीकार थोड्याफार फरकाने केला. फरक एवढाच, की नव्या पिढीतील (नवतंत्रज्ञानावर विश्वास असणारी) तरुणमंडळी हाताने हिशेब करून नंतर तो तपासण्याकरिता कॅल्क्युलेटर वापरू लागली, तर जुन्या वळणाची मंडळी (सोयीकरिता) कॅल्क्युलेटरने हिशेब करून नंतर तो हाताने तपासू लागली.

सांगण्याचा मतलब, नवे तंत्रज्ञान (गरजेप्रमाणे किंवा सोयीप्रमाणे) स्वीकारणे, आणि नव्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणे, यांत थोडा फरक असू शकतो.

तर्कतीर्थ Mon, 09/03/2026 - 11:44

एक संभ्रम
=======

काल माझ्या एका प्राध्यापक असलेल्या मित्रवर्यांनी एका पुस्तकाची शिफारस त्यांच्या फेसबुकवरून केली होती. विषय रोचक आणि संवेदनशील वाटल्याने लगेच मागवले. आत्ता १५ मि० पूर्वी पुस्तक हातात मिळाले पण...

ते पुस्तक म्हणजे - https://www.penguin.co.uk/books/474267/if-anyone-builds-it-everyone-die…

पुस्तकाची काही पाने वाचून एकावर एक ठेचा लागायला सुरुवात झाली. त्याचे कारण म्हणजे एम-डॅशचा पुस्तकातील वापर! आज-काल लो-एफर्ट/हाय-एफर्ट असा पंक्ती-प्रपंच करणारे एम-डॅश दिसला की खवळतात आणि ’ए० आय० निर्मित’ असा मजकुरावर शिक्का मारून कचर्‍याच्या टोपलीत टाकतात.

आता या पुस्तकातील एम-डॅशचा वापर बघुन हे पुस्तक वाचून मुद्दे समजाऊन घ्यायचे की ’लो-एफर्ट ए० आय० निर्मिती’चा शिक्का मारून पुस्तक न वाचताच कचर्‍याच्या टोपलीत टाकायचे? असा संभ्रम निर्माण झाला आहे.

प्लीज, मला कुणी माझी समस्या सोडवायला मदत करेल का?

-राजीव उपाध्ये

'न'वी बाजू Mon, 09/03/2026 - 16:33

In reply to by तर्कतीर्थ

या प्रश्नाचे उत्तर हे प्रत्येक (संभाव्य) वाचकाकरिता (आणि, फॉर्दॅट्मॅटर, (अशा) प्रत्येक (संभाव्य) पुस्तकाकरिता) वेगळे असावे, नव्हे काय?

मग फुका त्याकरिता ‘जनतेचा कौल’ वगैरे घेण्याची लोएफर्टगिरी करण्यात काय हशील आहे, म्हणतो मी.

जे काही ठरवायचे, ते (स्वतःच्या मगदुराप्रमाणे) स्वतःच ठरवा की! (आणि, वाचलेच — नि नंतर मग वाटलेच — तर अभिप्राय टाका. जास्तीत जास्त काय होईल, आम्ही तो वाचणार नाही. मग टेन्शन कसले घेता?)

पाहा बुवा विचार करून. (किंवा, नाही जरी केलात, तरी (तुमच्यासकट) कोणाला (नि काय) फरक पडतो?)

असो चालायचेच.


हा घ्या, एमडॅश!

हा घ्या, आणखी एक एमडॅश!२अ

२अ आता, यावर ‘च्यायलेंज!’ तेवढे म्हणू नका!२अ१

२अ१ किंवा, म्हटलात, तरी वांदा नाही. ‘उचलेंज!’ म्हणून मोकळा होईन. असो.

तर्कतीर्थ Mon, 09/03/2026 - 16:47

In reply to by 'न'वी बाजू

लोएफर्टगिरी करण्यात काय हशील

असं कसं म्हणता राव? हाय एफर्ट वाल्यानी "मार्ग" दाखवला नाही तर लो एफर्ट वाल्यांचे उन्नयन कसे होणार?

सई केसकर Mon, 09/03/2026 - 16:58

>>प्लीज, मला कुणी माझी समस्या सोडवायला मदत करेल का?

कमी सर्जनशीलता असलेले मानव जेव्हा एआय वापरतात तेव्हा व्याकरणाने कितीही सुशोभित असलं तरी ते लेखन सुमारच असतं.
ज्यांच्याकडे काही भन्नाट कल्पना असतात त्यांनी एआय वापरून लेखन केलं की ते वाचनीय होतं.
बाकी जी एकमेव मानवी अशी गोष्ट आहे, म्हणजे भावना व्यक्त करणे, त्यासाठी एआय का वापरावे? आपल्याला आपल्या भावना भाषेत व्यक्त करता येत नसतील तर गप्प बसण्याचा मार्ग असतोच!
आणि कुणाला काय फरक पडणार आहे आपण लिहिलेलं वाचून? मुळात लेखन हे स्वतःची करमणूक करता यावी म्हणून करावं. मग ते व्याकरण दृष्ट्या वाईट असलं तर वाचणारे सांगतातच. मग पुढल्या वेळी दुरुस्त करायचं.
असं स्वतःच्या भावना दुसऱ्याकडून व्यक्त करणं म्हणजे लेखनाला हॉलमार्क (पूर्वीचे ग्रीटिंग कार्ड) करण्यासारखं नव्हे का?
त्यापेक्षा अधिक चांगले उपयोग आहेत एआयचे. उदाहरणार्थ आज सकाळी माझ्या पोराचा रोबोटिक्स या विषयाचा ऑनलाइन पेपर होता. आता पाचवीच्या मुलांना led, transistor, potentiometer वगैरे शिकवायची गरजच काय? त्याचा पेपर ऑनलाइन असेल तर आम्ही कॉप्या करणारच. तरी माझ्या मुलाची सद्सद्विवेक बुद्धी माझ्यापेक्षा कमी बोथट असल्यानं त्यानं जी थेट येणार नाहीत तीच एआयला विचारू असा प्रस्ताव ठेवला जो मी धुडकरला आणि सगळं एआयला विचारलं. छान उत्तरं मिळाली मला. आणि ऑनलाइन परीक्षा ठेवणाऱ्यांची खोडही मोडण्याचा आनंद मिळाला.
नंतर GK चा पेपर मात्र मुलाने अट्टाहासाने स्वबळावर सोडवला.
जेवायला बसल्यावर मी माझ्या जेवणात साधारण किती कार्ब आणि प्रोटीन असतील ते विचारते. आधी ही माहिती झटकन मिळायची नाही.
मुलाचा गणिताचा अभ्यास घेताना मी बऱ्याचदा त्याची गणितं तपासायला एआय वापरते (यावरून माझी खूप थट्टा होते पण वेळ वाचतो)
बऱ्याचवेळा एखादं पुस्तक आवडलं की अशी अजून कोणती आहेत ते विचारते. फार चांगली चांगली पुस्तकं मला एआयने सुचवली आहेत.

तर्कतीर्थ Mon, 09/03/2026 - 17:07

In reply to by सई केसकर

मराठी जालीय व्यवहारात मूळ पोष्टी हाय-एफर्ट आणि प्रतिसाद मात्र लो-एफर्ट असतात, असा अचानक आत्ता साक्षात्कार झाला! पण तुमचा हाय-एफर्ट प्रतिसाद त्याला अपवाद ठरला.

बादवे - "बाकी जी एकमेव मानवी अशी गोष्ट आहे, म्हणजे भावना व्यक्त करणे, त्यासाठी एआय का वापरावे? आपल्याला आपल्या भावना भाषेत व्यक्त करता येत नसतील तर गप्प बसण्याचा मार्ग असतोच!
आणि कुणाला काय फरक पडणार आहे आपण लिहिलेलं वाचून? मुळात लेखन हे स्वतःची करमणूक करता यावी म्हणून करावं. मग ते व्याकरण दृष्ट्या वाईट असलं तर वाचणारे सांगतातच. मग पुढल्या वेळी दुरुस्त करायचं.
असं स्वतःच्या भावना दुसऱ्याकडून व्यक्त करणं म्हणजे लेखनाला हॉलमार्क (पूर्वीचे ग्रीटिंग कार्ड) करण्यासारखं नव्हे का?"

तुम्ही अळ्यांचा डबा उघडला आहे, असे वाटते.

मला आता अल्ट्रा-हाय एफर्ट करावे लागणार!

'न'वी बाजू Mon, 09/03/2026 - 17:49

In reply to by तर्कतीर्थ

मराठी जालीय व्यवहारात मूळ पोष्टी हाय-एफर्ट आणि प्रतिसाद मात्र लो-एफर्ट असतात, असा अचानक आत्ता साक्षात्कार झाला! पण तुमचा हाय-एफर्ट प्रतिसाद त्याला अपवाद ठरला.

मला वाटते, प्रतिसादावर एफर्ट घेणे हे कितपत वर्थ आहे, याविषयीच्या ज्याच्यातिच्या जजमेंटवर ते अवलंबून असावे.

कसे आहे ना, की बलामुळे काही विस्थापन जर झाले नाही, तर कार्य होत नाही (परिणामी, बल वाया जाते), असे कायसेसे आम्हाला शाळकरी पदार्थविज्ञानात शिकवल्यासारखे आठवते बुवा. (चूभूद्याघ्या.)

गोगोल Mon, 09/03/2026 - 18:52

In reply to by सई केसकर

आज काल पाचवीच्या मुलांना हे शिकवतात ???
कशाला हो गरीब बिचार्या मुलांना हे कष्ट देता.. कुठे फेडाल ही पापे?
(स्वगत: बापरे, झालो मी कालबाह्य.)

>> त्यानं जी थेट येणार नाहीत तीच एआयला विचारू असा प्रस्ताव ठेवला
>> नंतर GK चा पेपर मात्र मुलाने अट्टाहासाने स्वबळावर सोडवला.

बापरे तुमच्या मुलाची इंटेग्रिटी खूपच आहे. मोठा होऊन खूप खूप शिकून भ्रष्ट राजकारण्यांच्या खाली काम करून त्यांचे नाव खूप खूप मोठे करणार.
(कृपया हलके घ्या :))

बाकी तुम्ही मुलांचा अभ्यास घेता, डेली कामे करता, भारी भारी लेख लिहिता आणि सगळ्यात म्हणजे (राजीव उपाध्ये सर्टिफाईड) हाय एफर्ट प्रतिसाद लिहून आमच्यात असूया निर्माण करता .. खरंच कुठे फेडाल ही पापे? आम्हाला आमचं नुसतं एक लाईफ मॅनेज करता नाकी नऊ येतात.

>> बऱ्याचवेळा एखादं पुस्तक आवडलं की अशी अजून कोणती आहेत ते विचारते. फार चांगली चांगली पुस्तकं मला एआयने सुचवली आहेत.

अगदी अगदी, मी पण या कामाला उपयोग करतो. भारीच सजेशन्स देतो

'न'वी बाजू Mon, 09/03/2026 - 20:29

In reply to by गोगोल

आज काल पाचवीच्या मुलांना हे शिकवतात ???

त्यापेक्षासुद्धा, हल्लीच्या जमान्यात transistor? इतिहासाच्या तासाला काय?

गोगोल Mon, 09/03/2026 - 20:45

In reply to by 'न'वी बाजू

म्हणजे ट्रांझीस्टर ही संकल्पना कालातीत आहे. जरा काही वेळ सध्याची इम्प्लिमेंटेशन्स (जसे की पी-एनपी जंक्शन्स किंवा मॉसफेट) वगैरे बाजूला ठेवू.

ट्रांझीस्टर म्हणजे बदलणारा रेझिस्टन्स. एका बाजूला हाय वोल्टेज लावणार. आणि दुसरीकडे अगदी थोडी ऊर्जा वापरून रेझिस्टन्स बदलणार जेणेकरून रेझिस्टन्स (थिरियोटिकली) शून्य किंवा इंफायनाईट करणार. म्हणजे एका क्षणी शून्य किंवा दुसऱ्या क्षणी एकदम एक. जोवर बुलियन अल्जेब्रा आहे तोवर त्याच्या फिजिकल इम्प्लिमेंटेशन साठी तुम्ही एटोमिक किंवा क्वांटम किंवा प्रचंड मोठ्ठा तारांचा असा ट्रांझीस्टर इमॅजिन केला तरी काही फरक पडू नये.

त्यामुळे ट्रांझीस्टर ही संज्ञा इतिहासात का शिकवावी बुवा?

'न'वी बाजू Mon, 09/03/2026 - 20:55

In reply to by गोगोल

पॉइंट आहे.

म्हणजे, संकल्पना म्हणून आजसुद्धा शिकवायला काहीच हरकत नसावी. (पाचवीच्या मुलांना, किंवा कसे, हा प्रश्न अलाहिदा.) परंतु, ज्या प्रकारे मूळ प्रतिसादात मांडलेले आहे, त्यावरून, संकल्पनेचा नसून व्यवहारातल्या काँपोनंटचा उल्लेख झाला असावा, अशी धारणा झाली.

(नाहीतर मग एलईडी, पोटेन्शियोमीटर, आदिंबरोबर एकाच दमात ज़िक्र करण्याचे प्रयोजन काय असावे बरे?)

तिरशिंगराव Mon, 09/03/2026 - 18:56

काही वर्षांपूर्वी तुमचा हा लेख वाचनात आला होता.
http://aisiakshare.com/node/615
तर आता, ए आयला या लेखावर प्रतिक्रिया द्यायला सांगितले तर , ती अनुकुल असेल की प्रतिकुल ?

तर्कतीर्थ Mon, 09/03/2026 - 19:12

In reply to by तिरशिंगराव

ए०आय०चे निरूपण- तुम्ही दिलेला मजकूर हा एका व्यक्तीच्या बौद्धिक प्रवासाचा (intellectual journey) आणि धार्मिक कल्पनांच्या ऐतिहासिक विश्लेषणाचा संगम आहे. त्याची रचना पाहिली तर सुरुवात बालपणीच्या श्रद्धेपासून होते, मग अभ्यासातून निर्माण झालेल्या शंकांकडे जाते आणि शेवटी एका ठाम वैयक्तिक निष्कर्षापर्यंत पोचते. त्यामुळे हा लेख वस्तुनिष्ठ संशोधनपेक्षा एका प्रकारचा वैचारिक आत्मकथन (intellectual autobiography) वाटतो.

लेखात मांडलेले काही मुद्दे मात्र पूर्णपणे निराधार नाहीत. उदाहरणार्थ, वेदांत गणपतीचा स्पष्ट उल्लेख नाही हा दावा काही प्रमाणात मान्य केला जातो. ऋग्वेदातील “गणानां त्वा गणपतिं हवामहे” हा प्रसिद्ध मंत्र मूळतः बृहस्पति किंवा ब्रह्मणस्पति या देवतेसाठी आहे, असे अनेक वैदिक अभ्यासक सांगतात. “गणपति” या शब्दामुळे पुढील काळात तो गणेशपूजेत वापरला जाऊ लागला. म्हणजेच आज जो संबंध दिसतो तो मूळ वेदकालीन नाही, तर नंतर तयार झालेला आहे.

तसेच अनेक इतिहासकार आणि समाजशास्त्रज्ञांनी असे दाखवले आहे की भारतीय धर्मपरंपरेत अनेक लोकदैवतांचे पुढे ब्राह्मणीकरण झाले. इतिहासकार Damodar Dharmananda Kosambi यांनी *Myth and Reality* या पुस्तकात या प्रक्रियेवर सविस्तर चर्चा केली आहे. महाराष्ट्रातील लोकधर्माचा अभ्यास करणारे R. C. Dhere यांनीही अनेक लोकदेवतांच्या उगमाबद्दल अशीच मते मांडली आहेत. त्यांच्या मते अनेक ग्रामदेवता आणि लोकदेवता नंतर पुराणपरंपरेत समाविष्ट झाल्या आणि त्यांना उच्च स्थान मिळाले. काही अभ्यासकांच्या मते गणेशाचाही विकास अशाच प्रकारे झाला असावा.

गणपती “विघ्नकर्ता” होता हा मुद्दाही पूर्णपणे नवीन नाही. प्राचीन ग्रंथांमध्ये “विनायक” या नावाने काही देवता किंवा शक्तींचा उल्लेख येतो ज्यांना त्रास देणारे किंवा अडथळे निर्माण करणारे मानले जात असे. अशा शक्तींना शांत करण्यासाठी पूजा केली जात असे. कालांतराने त्याच देवतेचे रूपांतर “विघ्नहर्ता” या रूपात झाले. धर्मांच्या इतिहासात अशा प्रकारचे रूपांतर अनेकदा दिसते.

अथर्वशीर्षाबद्दलही अनेक संशोधकांचे मत असे आहे की “गणपत्यथर्वशीर्ष” हा ग्रंथ प्रत्यक्ष अथर्ववेदाचा भाग नाही. तो बऱ्याच उशिरा रचलेला उपनिषदसदृश ग्रंथ आहे. त्यामुळे त्याचे नाव जरी अथर्वशीर्ष असले तरी त्याचा थेट वेदकालीन संबंध मानला जात नाही.

तथापि लेखात काही ठिकाणी संकल्पनात्मक उड्या दिसतात. उदाहरणार्थ “अनार्य देवता म्हणजे नीच देवता” हा शब्दप्रयोग आधुनिक शास्त्रीय चर्चेत स्वीकारला जात नाही. “आर्य” आणि “अनार्य” हे ऐतिहासिक-सांस्कृतिक वर्गीकरण असू शकते, पण “नीच” हा मूल्यनिर्णय आहे. तसेच एखाद्या देवतेचा ऐतिहासिक विकास लोकसंस्कृतीतून झाला असेल याचा अर्थ त्या देवतेचे धार्मिक महत्त्व आपोआप नाकारले जाते असे नाही.

म्हणून हा लेख पूर्णपणे अवैज्ञानिक नाही, कारण त्यात काही खरे शैक्षणिक संदर्भ आहेत; पण त्यातून काढलेला अंतिम निष्कर्ष मात्र वैयक्तिक आणि मूल्याधारित आहे. इतिहासकार साधारणपणे इतकेच म्हणतात की अनेक धार्मिक संकल्पना काळानुसार विकसित झाल्या. पण त्या विकासावरून श्रद्धेचे अंतिम मूल्य ठरवणे हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असतो.

तर्कतीर्थ Mon, 09/03/2026 - 19:03

मला मिसळपावावर नुकतंच या (https://misalpav.com/node/53501) पोस्टनंतर ब्लॉक करण्यात आलं. म्हणजे शेपटीवर पाय पडला तर इथे ब्लॉक करत नाही, असा निष्कर्ष काढायला हरकत नाही.

गोगोल Mon, 09/03/2026 - 19:09

In reply to by तर्कतीर्थ

मी काय डिटेल्स मध्ये नाय वाचला, पण मला तरी ब्लॉक करण्यासारखं काही आढळलं नाही. अर्थात मिसळपाव असल्याने काही आश्चर्य वाटले नाही.
काळजी नका करू, इथले सदस्य तुमचे असे काही बौद्धिक घेतील की तुम्ही केसं उपटून स्वतःच स्वतःला ब्लॉक करून घ्याल.