कलानुभवाचं संक्षिप्तीकरण/विखंडीकरण
कलानुभवाचं संक्षिप्तीकरण/विखंडीकरण
लेखक - राजेश घासकडवी
मार्च १९३९. इंग्लंड आणि साउथ आफ्रिकेतल्या टेस्ट क्रिकेट मालिकेतली पाचवी आणि शेवटची टेस्ट सुरू होणार होती. इंग्लंड १-० ने पुढे होते. शेवटची टेस्ट 'टाइमलेस टेस्ट' करायची ठरवली. तसंही इंग्लंडच्या खेळाडूंची बोट बारा दिवसांनी निघणार होती. मग चालू देत हवा तितका वेळ. निकाल लागला तर पब्लिकला बरं वाटेल असा विचार असावा. साउथ आफ्रिकेची पहिली बॅटिंग होती. वेळाचं बंधन जवळपास नसल्याने बॅट्समननी पिचवर नांगर टाकला. ओव्हरला जेमतेम २ रन करत संथ बॅटिंग सुरू झाली. साउथ आफ्रिकेने ५३० धावा केल्या. इंग्लंडला केवळ ३१६ धावा काढता आल्या. साउथ आफ्रिकेने पुन्हा संथ गतीने ४८१ धावांचा डोंगर रचला. ९ मार्चला सहाव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडला जिंकण्यासाठी तब्बल ६९६ धावा करायच्या होत्या.
पुढच्या पाच दिवसातले दोन दिवस वाया गेले - एक दिवस टेस्टच्या परंपरेनुसार विश्रांतीचा दिवस, आणि एक दिवस हवामानामुळे खेळ झाला नाही. पण दर दिवशी सुमारे दोनशे सव्वादोनशे या दराने १४ मार्चच्या संध्याकाळपर्यंत इंग्लंडच्या ५ बाद ६५४ धावा झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी बोट सुटायची असल्याने दोन्ही कप्तानांनी परस्परसंमतीने टेस्ट मॅच अनिर्णित जाहीर केली. एक सामना बारा दिवस चालला (खेळ 'फक्त' ९ दिवस), आणि तरीही अनिर्णित राहिला. लोक हळहळले असतील का? अर्थातच. इंग्लंडच्या फॅन्सना नक्कीच हळहळ वाटली असणार. शेवटच्या डावात सर्वाधिक धावा करून सामना जिंकण्याची संधी गेली. साउथ आफ्रिकनांनाही कदाचित शेवटच्या पाच विकेट चटकन पडण्याची आशा वाटली असावी. पण काही असलं तरी इतका प्रचंड वेळ घालवून काहीसा कंटाळवाणा खेळ आठ दिवस पाहून हाती काही लागलं नाही.
आजच्या जमान्यात हे ऐकून खरंदेखील वाटत नाही. आजही टेस्ट मॅचेस पाच दिवस चालतात - पण 'विश्रांतीचा दिवस' वगैरे राजेशाही कल्पनांना केव्हाच डच्चू मिळाला आहे. सत्तरीच्या दशकात एक दिवसीय सामने सुरू झाले आणि खेळाला वेग आला. पुढच्या पिढीला एक आख्खा दिवस खेळावर घालवणंही अति वाटायला लागलं, आणि तीन-साडेतीन तासांत संपणारे ट्वेंटी ट्वेंटी खेळ सुरू झाले.
खेळाच्या स्वरूपात बदल होताना टेस्ट मॅचेस पूर्णपणे मेल्या नाहीत. वनडेही थांबलेल्या नाहीत. क्रिकेट खेळणं आणि पाहणं प्रचंड प्रमाणावर वाढलेलं आहे. त्याचबरोबर प्रेक्षकवर्गामध्ये एखाद्या स्फोटाप्रमाणे वाढ झालेली आहे. शतकापूर्वी खेळ बघायचा तर तुम्हाला मैदानावर हजर असायला लागायचं. नंतर रेडियो समालोचनामुळे जास्त लोकांपर्यंत क्रिकेट पोचायला लागलं. तंत्र प्रगत होऊन ट्रान्झिस्टर्स आले, टीव्ही आले, इंटरनेट आलं, तसतशी खेळांची आणि प्रेक्षकांची संख्याही वाढली. इथे 'प्रेक्षक' हा शब्द थोडा चुकीचा आहे. कारण सगळेच काही क्रिकेट 'बघत' नाहीत. काही अर्थातच मैदानावर उपस्थित असतात, काही टीव्हीवर बघतात, काहीजण रेडियोवर ऐकतात, काही नुसतेच पेपरात वाचतात. कदाचित प्रेक्षकपेक्षा उपभोक्ते, आस्वादक, ग्राहक हे शब्द जास्त लागू व्हावेत.
क्रिकेटच्या क्षेत्रात हा बदल झाला आहे हे हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. पण त्याचा कलानुभवाशी काय संबंध? कलानुभव हा व्यापक मनोरंजनानुभवाचा एक भाग आहे. त्यामुळे क्रिकेटच्या खेळात होणार बदल हे सर्वच मनोरंजनाच्या क्षेत्रात दिसून येत आहेत. त्यामुळे वरचं उदाहरण हे या बदलांचं प्रातिनिधिक आहे. नाटका-सिनेमांचंच उदाहरण घेऊ. शंभरेक वर्षांपूर्वी जेव्हा सिनेमा जवळपास नव्हता, तेव्हा संगीत नाटक पाहणं ही उच्चवर्गीयांची व उच्चमध्यमवर्गीयांची कलात्मक मनोरंजनाची पद्धत होती. ही नाटकं पाचपाच सातसात अंकी असत. आजची नाटकं बघितली तर जास्तीत जास्त तीन अंकी दिसतात. पण मोठंसं नाटक म्हणजे दोन अंकी. एकांकिका, लघुनाट्यं, पथनाट्यं ही संक्षिप्तीकरणाची उदाहरणं गेल्या काही दशकांतली. पथनाट्य हे पाच तास चालणं शक्यच नाही. त्याचा जीव अर्ध्या तासाचा. रस्त्यातून येणारा जाणाराला कुतूहलाने खेचून घ्यायचं आणि खिळवून ठेवायचं. आणि करमणुकीच्या जोरावर घटकाभरच रोखून धरायचं. शनिवार, रविवार, सुटीच्या दिवसांत नाटकांच्या थेटरांमध्ये गर्दी होते खरी. पण मंगळवारी संध्याकाळीदेखील नाटकाला जाणं आता शक्य झालेलं आहे. त्यासाठी अर्थातच खेळ दोन अडीच तासांत संपणार असला तर सोयीचं जातं.
सिनेमांच्या बाबतीतही हेच दिसतं. चार-साडेचार तास चालणारे सिनेमे, त्यात वीसवीस गाणी हे प्रकार कमी झालेले आहेत - जवळपास नाहीसेच झाले आहेत. याउलट दोन, अडीच तासांचे सिनेमे बव्हंशी दिसतात. एके काळी सिनेमा म्हणजे तीन तासांचा हे सोपं गणित असायचं. सर्वच थेटरांमध्ये तीन ते सहा, सहा ते नऊ, नऊ ते बारा असे शो असायचे. एक मोठ्ठं थिएटर, त्यात साताठशेंची बसण्याची सोय, आणि ठरलेल्या आकारातले शोज हे चित्र आता पालटतं आहे. या लेखात योगेश्वर नवऱ्यांनी सिनेमाप्रेक्षक आणि थिएटर्स यांनी खेळ दाखवण्याची पद्धत कशी बदलली आहे याचं वर्णन केलेलं आहे:
'मुख्य फरक झाला तो थिएटरच्या आकारांत. पूर्वी ७०० ते ८०० लोकं मावू शकणारी मोठ्ठी थिएटर्स असत, व एके ठिकाणी दोन ते तीन थिएटर्स असत. आता त्याजागी २० ते २५ स्क्रीन्स असलेली मल्टिप्लेक्सेस जिथे तिथे दिसतात. त्यातल्या प्रत्येक मिनी थिएटरमध्ये २०० च्या आसपास लोक बसू शकतात. त्याचा एक मुख्य फायदा असा की गरजेप्रमाणे एका सिनेमासाठी आवश्यक असलेल्या थिएटर्सची संख्या कमीअधिक करता येते. म्हणजे उदाहरणार्थ एखादा सिनेमा तरुणांना जास्त अपील होणारा असेल तर त्या भागात तरुणांची गर्दी जेव्हा होते तेव्हा तो अधिक स्क्रीन्सवर दाखवता येतो. म्हणजे असलेली प्रदर्शन क्षमता जास्तीत जास्त परिणामकारकपणे वापरता येते.'
यावरून असं दिसून येतं की एक सिनेमा एका वेळी ७०० लोकं बघणार हे बदलून तीन सिनेमे २०० ते ३०० लोकं एका वेळी बघण्याकडे कल गेलेला आहे. सिनेमांची संख्या अधिक, सिनेमांच्या विषयांमध्ये वाढलेलं वैविध्य, प्रेक्षकांची संख्या अधिक, प्रेक्षकांच्या निवडीत आलेलं वैविध्य, हे सामावून घेताना सिनेमा दाखवण्यासाठी येणाऱ्या खर्चाची लोकं द्यायला तयार असलेल्या वेळ-पैशांशी सांगड घालायची तर सिनेगृहांची संख्या अधिक, प्रत्येक सिनेगृहाचे आकार लहान, आणि सिनेमांचे आकार लहान या दिशेने बदल होणं स्वाभाविक आहे.
संगीताच्या बाबतीतही अशाच स्वरूपाची क्रांती किंवा उत्क्रांती झालेली दिसून येते. ज्या काळी संगीतानुभवासाठी जिवंत गायक-वादकाची गरज असायची तेव्हा ते प्रचंड महाग होतं. ज्यांना एकट्याने किंवा सार्वजनिकरीत्या गायक-वादकांना पैसे देणं परवडायचं अशांनाच संगीत ऐकायला मिळायचं. संगीत नाटकांमध्ये हेच अर्थशास्त्र लागू होतं. नाटक बघणं आणि गाणी ऐकणं या दोन्ही आनंदांची सरमिसळ केली गेली की एका प्रयोगात दोन्हीच्या मजा मिळायच्या व खर्च वाटला जायचा. रेकॉर्डिंगची सोय झाली आणि संगीत गायकापासून विभक्त झालं. दोन घटका गाणी ऐकून मन रिझवण्याचा खर्च अतोनात कमी झाला. रेडियोच्या आगमनाने तर दर गाण्यामागचा खर्च जवळपास शून्य झाला आणि अनेक सामान्यांना उत्तमोत्तम संगीत ऐकण्याची संधी उपलब्ध झाली. ट्रांझिस्टर रेडियो बैलाच्या शिंगावर अडकवून सामान्य शेतकरीही रणरणत्या उन्हात काम करता करता थोडा विरंगुळा मिळवू लागला.
या रेकॉर्ड्स तुकड्यांपोटी प्रथम गाणी तीन मिनिटं दहा सेकंदांची झाली. हे पहिलं विखंडीकरण. माध्यमं लवचिक झाल्यानंतर ते बंधन कमी झालं. मात्र आत्ता आत्तापर्यंत गाणी ही माध्यमालाच बांधलेली असल्यामुळे एका वेळी दहा गाण्यांची सीडी घेणं भाग होतं. 'एक गाणं एक डॉलर' या ऍपलच्या धोरणामुळे संगीताचं पुढच्या पातळीवरचं विखंडीकरण झालं. तुम्हाला संगीत विकत घेण्यासाठी हजार डॉलरचं बजेट असेल तर आवडणारी दोनतीनशेच गाणी घेता येत असत. कारण ती इतर गाण्यांबरोबर माध्यमाने बांधलेली असत. मात्र प्रत्येक गाणं वेगळं विकत घेण्याची सोय झाल्यावर तुम्हाला जास्त गाणी विकत घेता येतात.
वृत्तपत्रांमधे काय परिस्थिती आहे? तिथेही कमीअधिक प्रमाणात हाच प्रवाह दिसतो. इथे अपर्णा वेलणकरांनी वर्तमानपत्रांतील बदलांचं वर्णन करताना म्हटलेलं आहे:
'वृत्तपत्रांमधे 'इन्फोबॉक्स' आलेले आहेत. वाक्यावरून नजर फिरवली तर ताबडतोब ती बातमी कळली पाहिजे. मर्यादित शब्दांत संपूर्ण बातमीचं सार लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण त्यात फक्त बातमीच असते, तिचं विश्लेषण छापलं जात नाही. न्यूजचॅनेलमध्येही बदल होताना दिसला आहे. प्रेक्षकांच्या फीडबॅकमधून 'चर्चांचा कंटाळा आला, पटकन बातमी सांगा आणि मोकळे व्हा' असं अनेक प्रेक्षकांनी सांगितलं. यातून अर्ध्या तासात शंभर बातम्या वगैरे झालेलं दिसतं. वर्तमानपत्रांतही सातशे शब्दात बातमी येताना दिसतं आहे. यातून वाचकांच्या बुद्धिमत्तेला कमी लेखण्याचा थोडा प्रकार होतो आहे. आम्ही कारणं सांगतो की लोकांना हेच हवं असतं.'
दहा महत्त्वाच्या बातम्या वाचण्या/ऐकण्याऐवजी शंभर बातम्या उडत उडत ऐकण्याची ग्राहकांची अपेक्षा आहे. केवळ वेगवेगळ्या माध्यमांमध्ये, कलाप्रकारांमध्येच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर हे बदल घडून येताना दिसलेले आहेत. आधुनिक सिनेमाचं चित्रीकरण बघितलं तरी हे चटकन दिसून येतं. चित्रपटांची सुरूवात ही नाटकांमधून झाली असल्याने नाटकांचा पगडा असणं साहजिकच होतं. स्टेजवर घडणारं नाटकच जणू चित्रित करत आहोत अशा थाटात कॅमेरा चालू ठेवायचा, शक्य तितकं चित्रीकरण करून घ्यायचं अशी पद्धत होती. त्यामुळे प्रत्येक शॉट अनेक मिनिटं चालू शकायचा. आता हे कट्स काही सेकंदांचे असतात. गाण्यांच्या चित्रीकरणात तर हे प्रकर्षाने दिसून येतं. उदाहरणार्थ, ओ हसीना झुल्फोवाली या गाण्यातले शॉट्स किती प्रदीर्घ आहेत ते पाहा. लहानात लहान शॉट अंदाजे तीन ते चार सेकंदांचा आहे. किमान दोन तरी शॉट्स तीसचाळीच सेकंदांचे आहेत. याउलट, चिकनी चमेली गाण्यात प्रत्येक शॉट सुमारे एक सेकंदांचा आहे. आणि सगळ्यात दीर्घ शॉट तीन ते चार सेकंदांचा आहे. या दुव्यावर गेल्या ऐशी वर्षांमधल्या चित्रपटांच्या ट्रेलर्सचा अगदी खोलवर जाऊन अभ्यास केलेला आहे. एके काळी मिनिटाला दहा कट्स असायचे. आता ते मिनिटाला चाळीसच्या आसपास गेलेले आहेत. माझा अंदाज असा आहे की मूळ शूटिंगच्या आडात असलेली अधिक कट्सची संख्या ट्रेलरच्या पोहऱ्यात दिसते आहे.
हे संक्षिप्तीकरणाचे, विखंडीकरणाचे बदल होत आहेत हे आत्तापर्यंतच्या उदाहरणांवरून स्पष्ट व्हावं. प्रश्न असा येतो की हे बदल नक्की का होतात? या बदलांचं स्वरूप कलेपुरतंच मर्यादित आहे का? की कलेत जीवनाचं प्रतिबिंब उमटतं या नात्याने जीवनच बदललेलं आहे? माझं उत्तर असं आहे की हे बदल काही कलानुभवात किंवा करमणुकीच्या ग्रहणातच दिसतात असं नाही. किंबहुना हे बदल व्यापक सांस्कृतिक व आर्थिक बदलांतून आलेले आहेत. यांचंच प्रतिबिंब आपल्या सांस्कृतिक वागणुकीतही दिसून येतं. रात्र रात्र चालणाऱ्या मंगळागौरी आता शहरांमध्ये केव्हाच बंद पडलेल्या आहेत. बुधवार सकाळचं ऑफिस गाठायचं तर पहाटे चार चार वाजेपर्यंत फुगड्या घालणं शक्य नाही. मग दोन तासांमध्ये तो कार्यक्रम उरकून टाकणं आलंच. आधुनिक सुशिक्षित स्त्रीला मंगळागौर खेळायची की नोकरी करायची असा पर्याय असेल तर उत्तर 'जमल्यास दोन्ही करायचं आहे, पण नोकरी अधिक महत्त्वाची असल्यामुळे आपण मंगळागौरीचा कार्यक्रम छोटा करू' ही तडजोड केव्हाही सोयीस्कर पडते. लग्नाचे कार्यक्रम पूर्वी चार चार दिवस चालायचे. आता त्यांनाही फाटा मिळून सकाळी लग्न, जेवण, संध्याकाळी रिसेप्शन असं स्वरूप आलेलं आहे. सकाळचे पाहुणे आणि संध्याकाळचे पाहुणे बऱ्याच प्रमाणात वेगळे. व्रतं-वैकल्यंही अशीच थोडक्यात आटपली जातात. या सगळ्यातून 'अरेरे, कसे एकेकाळचे लोक सर्व गोष्टी मन लावून, वेळ देऊन करायचे. आणि आता कसं टाकणं टाकतात.' असे कढ काढायचे नाहीयेत. अनेक गोष्टी करायच्या असल्यावर त्यातल्या काहींचं संक्षिप्तीकरण होणं अपरिहार्य आहे हेच इथे दाखवून द्यायचं आहे.
संक्षिप्तीकरण आणि विखंडीकरणाची ही प्रक्रिया चालू रहाण्यामागे मुख्य कारण म्हणजे मध्यमवर्गाचा उदय. इथे मध्यमवर्गीय म्हटलं असलं तरी श्रीमंत, गरीब आणि मध्यम असे तीन ढोबळ विभाग करायचे नाहीयेत. मध्यमवर्गाचा उदय याचा अर्थ संधींची उपलब्धता, त्यांचा उपभोग घेण्याची क्रयशक्ती यांमध्ये मधल्या काही पायऱ्या निर्माण झाल्या आहेत या अर्थाने घ्यायचा आहे. एक उदाहरण बघू. एके काळी क्रिकेट पाहू शकणारे फारच थोडे होते. त्यामुळे क्रिकेटच्या आस्वादकांमध्ये आहेरे आणि नाहीरे अशी स्पष्ट विभागणी होती. काळ्या आणि पांढऱ्याप्रमाणे. आणि हे विभाजन सरळसरळ आर्थिक स्तरावर अवलंबून होतं. पाच दिवस क्रिकेटची मॅच पाहण्याव्यतिरिक्त काहीही न करण्याची ऐश खूप लोकांना परवडणारी नव्हती. त्याकाळी मूठभर लोक सोडले तर सगळेच गरीब होते. त्यामुळे मनोरंजनाची साधनं श्रीमंतांसाठीच होती. एक भरभक्कम बैठक मांडून पाच दिवस निवांतपणे मॅच बघायची हा खास राजेशाही थाट होता. ज्यांना क्रिकेटची आवड आहे, कधीकाळी खेळले आहेत, काऊंटी क्रिकेट वगैरे बघितलेलं आहे अशांना मैदानावर काय घडलं हे जाणून घेण्यासाठी निव्वळ वर्तमानपत्रांतील वर्णनांवर भागवून न्यावं लागे.
गेल्या शंभरेक वर्षात हे चित्र हळूहळू बदलतं आहे. पोटापाण्याची ददात नाही, मनोरंजनावर खर्च करण्यासाठी राजेरजवाड्यांइतका नाही, पण थोडाफार पैसा आहे आणि वेळ आहे, अशांची संख्या वाढली. याला कारण म्हणजे झालेली आर्थिक प्रगती. शंभरेक वर्षांपूर्वी जमीनदार, कारखानदार, अमीरउमराव वगैरे सोडले तर बहुतेक सगळी जनता कारखान्यांत, शेतात काम करत असे. अत्यंत तुटपुंजा पगार, आणि आठवड्याला सत्तरेक तास काम हे सर्रास होतं. गेल्या शतकात बैठी पांढरपेशा कामं करणारा एक मोठा वर्ग तयार झाला. त्यांचे कामांचे तास कमी झाले. म्हणजे सकाळी नऊ ते पाच नोकरी केली की संध्याकाळी दोनतीन तास मनोरंजनासाठी देणं या वर्गाला तसं परवडणारं होतं/आहे. या वर्गाचं आयुष्य तसं कमी त्रासाचं झालं. मोकळा वेळ, आणि खिशात खुळखुळणारा थोडाफार पैसा यामुळे मनोरंजनावर त्याने भर दिला नाही तरच नवल होतं.
जिथे मागणी तिथे पुरवठा या नियमानुसार या वर्गासाठी त्यांच्या खिशाला परवडणारे, त्यांच्या वेळात बसणारे पर्याय निर्माण झाले. याचा परिणाम एकंदरीत मनोरंजनक्षेत्र विस्तारण्यात झाला. म्हणजे टेस्ट मॅचेस जवळपास तेवढ्याच प्रमाणात चालू राहिल्या, पण वनडे, ट्वेंटी-ट्वेंटी मॅचेसही सुरू झाल्या. तसंच बदलत्या ग्राहकविश्वाला सामावून घेण्यासाठीही बदल झाले. हे बदल दोन प्रकारचे होते. एक म्हणजे वैयक्तिक ग्राहकात झालेला बदल. शंभर वर्षांपूर्वीच्या तुलनेने सरासरी माणूस घेतला तर अधिक गोष्टींविषयी ऐकायला त्याला आवडतं. तो अधिक सुशिक्षित आहे. त्याने पंचक्रोशीपलिकडे अधिक प्रवास केलेला आहे, अधिक लोक पाहिलेले आहेत. त्याचं अनुभवविश्व वाढलेलं आहे, त्यामुळे ज्यात रस आहे, जुजबी माहिती आहे अशी क्षेत्रं वाढलेली आहेत. खोली कमी होऊन रुंदी वाढल्याचं हे चित्र आहे. हे अर्थात वैयक्तिक ग्राहकाविषयी. दुसऱ्या बाजूने पाहायचं झालं तर माध्यमांना दिसणारा ग्राहक विस्तारला आहे. म्हणजे एके काळी वर्तमानपत्रं समजा चार टक्के लोक वाचत असतील, तर त्यांना रस वाटतील अशा मर्यादित दहा विषयांच्या बातम्या देणं आवश्यक होतं, पुरेसंही होतं. आता वाचकवर्ग जर लोकसंख्येचा चाळीस टक्के असेल, तर नव्या छत्तीस टक्क्यांच्या आवडीनिवडी, जिव्हाळ्याचे विषय यांमध्येही वाढ होणं स्वाभाविक आहे. अशा अनेकांसाठी जर बातम्या द्यायच्या तर ते मर्यादित दहा विषय पुरत नाहीत. त्यासाठी शंभर विषयांबद्दल बोलावं लागतं. आणि ते शंभर विषय कव्हर करायचे तर प्रत्येक विषयाला दिलेलं फूटेज घटतं. यातून संक्षिप्तीकरण वाढतं.
मी एक ग्राहक म्हणून माझ्यात झालेला फरक आणि माध्यमांना दिसणाऱ्या वाचकवर्गात झालेला फरक यामधला भेदभाव जरा समजून घ्यायला हवा. समजा एक अ प्रकारचं कपाट आहे. त्याला पाच कप्पे आहेत. आणि ब प्रकारचं कपाट आहे त्यालाही वेगवेगळ्या आकाराचे पाच कप्पे आहेत. आणि सध्याच्या जगात फक्त अ आणि ब प्रकारची कपाटंच आहेत. तर त्या कपाटांच्या कप्प्यांमध्ये बरोबर बसणाऱ्या दहा वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू तयार व्हायला हव्या. आता समजा भविष्यकाळात ही दोन्ही प्रकारची कपाटं बदलली, त्यांचा थोडा विस्तार झाला आणि प्रत्येकाला दहा कप्पे तयार झाले. आता अर्थातच प्रत्येक कप्प्यात बसणाऱ्या तयार करायच्या तर वीस वस्तू तयार कराव्या लागतील. हा बदल सर्वसाधारण ग्राहक वैयक्तिकरीत्या बदलल्याने झाला. यापलिकडे जाऊन समजा काही नवीन कपाटं तयार झाली, क, ड आणि ई. या प्रत्येक कपाटाला दहा कप्पे आहेत. तर सर्वांनाच भरण्यासाठी पन्नास वस्तू तयार कराव्या लागतील. कप्पे पाचपट झाले याचा अर्थ एकंदरीत क्षमता पाचपट झालीच असा होत नाही. शेवटी मनोरंजनासाठी किती वेळ देता येतो यावर मर्यादा येतात. त्यामुळे वैयक्तिक कपाटाचे कप्पे दुप्पट झाले आणि कपाट थोडंसं मोठं झालं तरी प्रत्येक कप्प्याचा आकार घटू शकतो. तसंच ही कपाटं भरणारी व्यवस्था दहापट वेगवेगळा माल तयार करण्याची क्षमता बाळगून असेलच असं नाही. त्यामुळे अर्थातच अधिक वस्तू पण लहान आकाराच्या तयार होतात.
संक्षिप्तीकरण होतं आहे, त्याला काही पटण्याजोगी कारणं आहेत इथपर्यंत तर आपण पोचलो. पुढचे उघड प्रश्न असे आहेत की याचे परिणाम नक्की काय? ते चांगले आहेत की वाईट? लयाला जाणाऱ्या व्यवस्थेतून जी नवीन व्यवस्था निर्माण होते आहे ती इष्ट आहे की अनिष्ट? एक प्रमुख क्वालिटेटिव्ह बदल झालेला दिसतो तो म्हणजे वैविध्याची वाढ. जेव्हा नाटक किंवा सिनेमा बघायला चारपास तास देऊन प्रेक्षक येणार म्हटल्यावर त्याला हवं ते देणं हे निर्मात्याचं कर्त्तव्य असायचं. बरं हा प्रेक्षक काही रोज नाटकं पहाणारा किंवा केबलवर सिनेमांचा रतीब घेणारा नव्हे. सठीसामाशी, हौसेने बघायला येणारा. त्यामुळे काही विशिष्ट गोष्टी असणं आवश्यक असायचं. कारण हे मनोरंजन 'वन साइझ फिट्स ऑल' स्वरूपाचं असायला हवं. भारत सरकारच्या बजेटप्रमाणे सर्वांनाच खूष करणारं. एकाच सिनेमात गाणी, मारामाऱ्या, कौटुंबिक कलह हे सगळं आलं पाहिजे. शिवाय एखादा मर्यादित शृंगारिक नाच आला पाहिजे, देवभक्तांना सुखवण्यासाठी चमत्कार हवेत, निदान एखादं भजन हवं. आईचं प्रेम, बहीणभावांचं अतूट नातं दिसलं पाहिजे आणि शेवटी सत्याचा विजय झालाच पाहिजे. अशा पद्धतीच्या निर्मितींना काही मर्यादा आपोआप येतात. जर मी काढलेला सिनेमा सर्वांना आवडणारा असायला हवा असेल तर सरासरी मतांना महत्त्व येतं. काय सांगायचं, काय संदेश द्यायचा, कसलं चित्रण करायचं याला मर्यादा येतात. सत्यजित राय एका लेखात म्हणतात:
‘आपल्या प्रेक्षकांना काय हवंय, ते बंगाली चित्रपटांना फार पूर्वीपासून उमगले होते. ते तेव्हापासून आपल्या बिनधोक मार्गाला घट्ट चिकटून होते. खरे म्हणजे बेचव, ठोकळेबाज, सर्व प्रकारची भेसळ असलेल्या बंगाली चित्रपटांमुळेच तर मला मुख्यत्वे काहीतरी करायची प्रेरणा मिळाली’.
या भेसळीबरोबर, खिचडीबरोबरच त्यात मेनस्ट्रीम नसलेल्या काही विचारांचं गोमांस असल्याची शंकाही येऊ नये अशी काळजी घ्यावी लागते. त्यामुळे एक प्रकारचा ठसेबाजपणा येणं अपरिहार्य असतं. आताच्या काळात सिनेमा तयार करताना हे निर्बंध कमी असतात. या संक्षिप्तीकरण-विखंडीकरण प्रक्रियेमुळे सर्व जनतेसाठी चित्रपट निर्माण करण्याऐवजी आपल्या टार्गेट ऑडियन्सपुरता छोट्या बजेटचा, कमी अपेक्षांचा लहानसा सिनेमा तयार करणं शक्य होतं. मनोरंजनाच्या अभावाचे दिवस संपल्यामुळे प्रेक्षकही अशा वेगळेपणाला प्रतिसाद देऊ शकतात. नावीन्याला महत्त्व येणं हा बदल मला चांगला वाटतो. संगीतातही नावीन्याला, वेगळेपणाला आधार मिळू शकतो. आपल्या हजार डॉलरच्या गाण्याच्या बजेटचंच उदाहरण घेऊ. जर अत्यंत लोकप्रिय आणि खरोखरच चांगली अशी शंभर गाणी घ्यायची असतील तर ती मिळवण्यासाठी मला त्याच सीड्यांमध्ये बांधलेली चारशे इतर गाणी घ्यावी लागतात. (गृहीतक असं आहे की सर्वसाधारण सीडीतल्या दहापैकी दोनच गाणी खरंतर मला प्रचंड आवडलेली असतात. बाकीची नाइलाजाने त्या दोन गाण्यांसकट येतात.) मग माझी वैयक्तिक आवड असलेली गाणी घ्यायची झाली तर त्यासाठी पाचशे डॉलरच शिल्लक रहातात. त्यातूनही मला माझी वेगळी निवड करण्यासाठी शंभरच गाणी मिळतात. त्यामुळे संगीताची निर्मिती करणाऱ्या कंपन्याही दणकून चालतील अशी खात्री असणारांनाच पैसे देऊन त्यांची गाणी विकतात. त्यामुळे फारसा माहित नसलेला एखादा ग्रुप जो पन्नासेक हजार लोकांनाच आवडू शकेल अशांची गाणी निर्माण होत नाहीत, आणि ती त्या पन्नास हजारांपर्यंत पोचत नाहीत. याउलट जर मला चांगली लोकप्रिय गाणी घेऊन माझं नव्वद टक्के बजेट शिल्लक राहिलं, तर इतर अनेक लहान लहान बॅंड्सची गाणी, मला आवडली म्हणून घेऊ शकतो. तीही आख्खी सीडी म्हणून नाही तर एकेक गाण्याच्या तुकड्यांमध्ये. अर्थातच 'हमखास लोकप्रिय' गायकांना पैसे मिळायचे तितकेच मिळतात (कदाचित किंचित कमी). पण लहानसहान, अजून प्रस्थापित न झालेल्या गायकांनाही थोडंफार उत्पन्न मिळू शकतं. संगीतासाठी असलेलं बजेट अधिक दूरपर्यंत पसरू शकतं आणि जास्त क्षेत्राच्या मातीला पाणी मिळाल्यामुळे हिरवळ वाढते.
संगीताच्या बाबतीतले बदल भारतातही होताना दिसलेले आहेत. सिनेमाशी गाणी एके काळी बांधलेली होती. याचं कारण 'वन साइझ फिट ऑल' प्रकारचं सिनेमाचं स्वरूप. सत्तर ऐशीच्या दशकांत 'गाणं म्हणजे सिनेमातलं' हे समीकरण असल्यामुळे ठराविकच गायकांची मक्तेदारी होती. कारण एवढा मोठा खर्चाचा सिनेमा काढायचा, त्यात गाणी असलीच पाहिजेत, मग ती 'नेहमीच्या यशस्वी' कलाकारांकडूनच म्हणवून घेणं सुरक्षित होतं. लता, आशा, किशोर, रफी या चार नावांत सत्तर-ऐशी टक्के गाणी विभागली जात असावीत. उरलेली दहापंधरा टक्के मन्नाडे, मुकेश, हेमंत कुमार, महेंद्र कपूर वगैरेंना गेली की नवख्या गायकासाठी फारच थोडी उरत. आता हे चित्र फारच बदललेलं दिसतं. गाणी स्वतंत्रपणे ऐकता येतात, इतकंच नव्हे तर हजारोच्या संख्येने खिशात घालून घेऊन जाता येतं म्हटल्यावर सिनेमात गाणी असलीच पाहिजेत हा नियम सैल झाला. हे झालं विखंडीकरण. त्यामुळे आजकाल गाणी नसलेले किंवा ती बॅकग्राउंड म्हणून केवळ येणारे सिनेमेही दिसतात. इंडिपॉप नव्वदीपासून सुरू झाला. त्याची सुरूवात अगदी तुरळक प्रमाणात ऐशीच्या दशकाच्या मध्यावर झाली होती. 'हवा हवा खुशबू लुटा दे' नंतर इला अरुण, बाबा सैगल वगैरे नावं त्याकाळी खूप गाजलेली होती.
बदलांच्या चांगल्या वाईटपणाबद्दल विचार करताना एक सर्वसाधारण आक्षेप घेतला जातो त्याचा निश्चितच विचार करायला हवा. 'उपभोगाच्या वस्तू संख्येने वाढल्या हे मान्यच आहे. पण त्यातून मिळणारा आनंद कमी झाला आहे का? तसं असेल तर आपण केवळ क्वांटिटीमागे धावून क्वालिटी विसरतो आहोत' हे कितपत खरं आहे?'
ज्या काळी मनोरंजनाची साधनं आणि संधी कमी होत्या त्या काळी त्याचा सोहळा करणं अपेक्षित होतं. संगीत नाटकांचंच उदाहरण घेऊ, कारण मराठी सांस्कृतिक इतिहासात त्यात गाण्यांची लयलूट असे. आणि चांगल्या गायकांना, गाण्यांना अर्थातच बऱ्याच वेळा वन्समोर मिळत असे. रात्री सुरू झालेलं नाटक पहाटेपर्यंत चालायचं. नाटकाला जोडप्याने जायचं ही मध्यमवर्गासाठी भयंकर रोमॅंटिक गोष्ट असल्याचा उल्लेख 'चिमणरावाच्या चऱ्हाटा'त येतो. कानाला अत्तराचा फाया लावून जाणं, बायकोसाठी गजरा विकत घेणं, गाण्यांच्या पद्यावली घेणं, वेगवेगळ्या मध्यंतरांत कोणाची गाणी छान होताहेत किंवा अमुक कंपनीने हा प्रयोग केला होता त्यातला धुरंधरात कसा दम नव्हता वगैरे गप्पा मारणं, सकाळी डुलत डुलत कानात गाणी रुळवत परत येणं, आणि पुढचे काही दिवस ती गुणगुणणं हे त्या अनुभवाचे अविभाज्य भाग होते. हे लिहिताना मला एक टोकाचं, आणि काहीसं करुण उदाहरण आठवतं. ‘गोल्ड रश’ या सिनेमामध्ये चार्ली चॅप्लिन आणि त्याचा मित्र हिमवादळात सापडलेले असतात. अनेक दिवस त्यांना खायला मिळालेलं नसतं. त्यावेळी काहीतरी पोटात घालायला हवं म्हणून ते चार्लीचा एक बूट शिजवतात. बूट खाताना चार्ली चॅप्लिन आपण जणू काही एखाद्या उच्चभ्रू रेस्टोरॉंमध्ये जाऊन मेजवानी झोडतो आहोत, अशा स्टाइलमध्ये तो वागतो. त्याच्या वाट्याला आलेल्या तळव्यातले खिळे तो एखाद्या माशातले काटे काढावेत अशा पद्धतीने काढतो. हे उदाहरण सांगताना मला त्या नाटकांची तुलना बुटांशी अर्थातच करायची नाहीये. मला हे सांगायचं आहे की एखाद्या गोष्टीचा स्वर्गीय आनंद होतो याचं कारण भुकेशी निगडित आहे. चार्ली आणि त्याच्या मित्राला दहा दिवस उपाशी राहिल्यानंतर बुटाऐवजी एक दिवस खरोखरच चांगलंचुंगलं खायला मिळणार असतं तर त्यांनी नक्कीच जेवणाची आतुरतेने वाट पाहिली असती. तुडुंब पोट भरेपर्यंत ते जेवले असते. आणि पुढचे दहा दिवस उपाशी असताना तो खाण्याचा दिवस मिटक्या मारत डोळ्यासमोर आणला असता. मनोरंजनाबाबत समाजाची जेव्हा उपासमार होत होती तेव्हा चित्र काहीसं असंच होतं. आता बदललेल्या चित्राचा विचार करताना ही उपासमार विसरून चालणार नाही. आजचा समाज शंभर वर्षांपूर्वीच्या समाजाने अधिक नियमितपणे 'जेवणारा' आहे. त्यामुळे पोट भरलेल्या माणसाप्रमाणेच तो चवीबद्दल अधिक चोखंदळ आहे. सामान्य चित्रपटांची निर्मितीमूल्यं बघितली तर हे उघड व्हावं.
थोडक्यात सारांश सांगायचा तर गेली शंभरेक वर्षं ही संक्षिप्तीकरणाची, विखंडीकरणाची प्रक्रिया चालू आहे. त्यातून कलाविष्कार आणि कलानुभव या दोन्हीमध्ये क्रांती झालेली आहे. एकसुरीपणा आणि साचेबद्धता जाऊन वैविध्यावर भर आलेला आहे. ही प्रक्रिया अशीच चालू राहील का? टोकाला नेली तर एक मिनिटांचे, दहा सेकंदांचे सिनेमे तयार होतील का? अर्थातच नाही. 'लोकसंख्या जर याच दराने वाढत गेली तर दोनशे वर्षांनी माणसांना एकमेकांच्या डोक्यावर उभं रहावं लागेल' या स्वरूपाचं हे अतिरेकी विधान वाटतं. कारण जसं डोक्यावर उभं राहून जगता येत नाही, तसंच कला-मनोरंजन अनुभवदेखील विशिष्ट काळापेक्षा लहान करता येत नाही. माझ्या डोळ्यासमोर जे भविष्याचं चित्र आहे ते समजावून घेण्यासाठी पुन्हा आपल्या कपाटांचं उदाहरण घेऊ. प्रत्येक कपाटाचे कप्पे लहान-लहान होतील का? तर काही प्रमाणात 'हो होतील' असं वाटतं. आत्ताच आपण एकमेकांना अनेक व्हिडियो क्लिप्स पाठवतो. त्या एखादं मिनिट ते दहाएक मिनिटं या कालखंडाच्या असतात. अनुभव त्याहून लहान होतील असं वाटत नाही. कपाटांची संख्या वाढू शकेल. आत्तापर्यंत सुशिक्षित उच्चमध्यमवर्गीय शहरी लोकांना ज्या प्रवाहांची कल्पनाही नाही असे डोकं वर काढतील. उदाहरणार्थ - कुस्ती. सचिन तेंडुलकरला बघायला हजारो स्टेडियमवर जमतात. पण कुंडल गावात कुस्ती पहायला तीन तीन लाख लोक जमतात. हे आपल्याला माहीतही नसतं. पण जसजशी या वर्गाकडे क्रयशक्ती येईल तसतशी त्यांची आवड, त्यांची मागणीही पुरवली जाईल. कपाटं वाढतील, आधीच्याच कपाटांत काही नवीन कप्पेही तयार होतील.
एकंदरीत कलानुभवाच्या भविष्याविषयी मी आशावादी आहे.
प्रतिक्रिया
कलानुभवांच्या
कलानुभवांच्या संक्षिप्तीकरणाविषयी लेखातील मुद्दे अंशतः पटले, पण त्यांच्या पुष्ट्यर्थ दिलेली काही उदाहरणे व रूपके गैरलागू आहेत असे वाटते. क्रिकेटमध्ये काही फलांदाजांची शैली आकर्षक असू शकेल (उदाहरणार्थ लारा, लक्ष्मण, बॅरी रिचर्ड्स,मार्क वॉ, महेला जयवर्धन), काही फिरकी गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीचा जवळ जवळ कलाप्रकार केला असेल (शेन वॉर्न, बेदी); पण तरी क्रिकेटचा सामना (किंवा कोणत्याही खेळाचा) सामना हा कलाप्रकार होत नाही, तो पाहणे कलानुभव म्हणता येत नाही. हेच वर्तमानपत्रांविषयीही म्हणता येईल. एखादा लेख कलात्मक, साहित्यिक वगैरे असला तरी साकल्याने विचार करता वर्तमानपत्राच्या वाचनास कलानुभव म्हणणे धार्ष्ट्याचे आहे.
करमणुकीची साधने विपुल, स्वस्त (लोकांच्या पूर्वीच्या क्रयशक्तीच्या तुलनेत), सहज उपलब्ध, आणि खिशात घेऊन फिरता येण्याएवढी लहान झाल्यामुळे त्यांचे अप्रुप राहिले नाही हे खरे. कोणत्याही गोष्टीची चलनवाढ झाली की तिचे मोल घटणारच.
गाण्यांच्याविषयी म्हणायचे तर त्यांचे संक्षिप्तीकरण अव्याहत होत आलेले आहे असे नाही. ध्वनीमुद्रणाआधीच्या काळात गाण्यांवर (शास्त्रीय, नाट्यगीते, लोकगीते इत्यादी) वेळेचे बंधन नव्हते. खयालगायक राग तासच्या तास आळवत असत. लेखात म्हटल्याप्रमाणे नाट्यगीतेही तानबाजीत रंगून बरीच आळवली जात. श्रोत्यांचा ह्याविषयी काही आक्षेपही नव्हता. पण तबकड्या आल्या व तांत्रिक कारणांमुळे ध्वनीमुद्रणावर व त्यामुळे गाण्याच्या लांबीवर अंदाजे तीन मिनिटांची मर्यादा आली. नाईलाजाने गायकांना गाणी ध्वनीमुद्रित करायची असल्यास तीन मिनिटात बसवावी लागत होती. कालांतराने इपी व मग एलपी तबकड्या आल्या व ही कालमर्यादा सैलावली. ध्वनीफितींचे आगमन झाल्यावर गाण्यांची लांबी आणखी वाढली. त्यानंतर आलेल्या सिडी,डिविडी, पेन ड्राइव इत्यादींमुळे आता ह्या लांबीवर कोणतीच बंधने राहिली नाहीत (श्रोत्याची सहनशक्ती सोडून). तेव्हा, गाण्यांचे निव्वळ व अटळ संक्षिप्तीकरण झाले आहे हे तितकेसे बरोबर नाही. संक्षिप्तीकरण झाले आहे ते एकाच गोष्टीवर बराच वेळ लक्ष केंद्रित करण्याच्या सर्वसाधारण क्षमतेचे (रेड्यूस्ड अॅटेन्शन स्पॅन). इथेही 'सर्वसाधारण, प्रेक्षकांचा/श्रोत्यांचा ल. सा. वि. वगैरे क्वॉलिफायर्स (मराठी प्रतिशब्द?) महत्त्वाचे. कोणत्याही काळात कलाकृतीवर ( विशेषतः परफॉर्मिंग आर्टसबाबत) आपले सारे लक्ष तासन् तास केंद्रित करणारे विरळा. आता त्यांची टक्केवारी आणखी घटली आहे. पूर्वी एकमेकांच्या कानात कुजबुजत गुजगोष्टी करणे, चोरटे स्पर्श, वेफर्स इत्यादी खाणे किंवा चक्क घोरणे हे आकर्षक पर्याय होते.आता समोरच्या कलाकारापेक्षा (व शेजारच्या व्यक्तिपेक्षा ) हातातल्या मोबाईलकडे लक्ष अधिक.
सत्तर-ऐंशीच्या दशकांतील चित्रपट व त्यांतील गाण्यांचे जे उदाहरण दिले आहे ते पुन्हा चित्रपट हा विशुद्ध कलाप्रकार असावा की धंदा ह्या सनातन व अनंत वादाचा भाग आहे.
हे सारे पाहता लेखास "कलानुभवांचे संक्षिप्तीकरण/विखंडीकरण" म्हणण्यापेक्षा 'माध्यमानुभवांचे व रंजनानुभवांचे संक्षिप्तीकरण/विखंडीकरण' म्हणणे सयुक्तिक ठरेल असे वाटते.
दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले
"कलानुभवांचे
हे प्रथमच मान्य करून टाकतो. कलानुभव, रंजनानुभव यांमधले माझ्या व्याख्यांमधले फरक स्पष्ट न करता काहीशा ढिसाळपणे ते लेखात आलेले आहेत हे खरं आहे. अर्थातच त्याने मूळ मांडणीला बाधा येेत नाही.
इथेही रंजन वेगळं आणि कला वेगळी अशी काहीतरी रेखीव विभागणी तुमच्या मनात आहेसं दिसतंय. माझ्या मते रंजन, कौशल्य आणि कला या एकाच स्पेक्ट्रमचे भाग आहेत. त्यामुळे कलानुभव-रंजनानुभव-ज्ञानग्रहण-आस्वाद हे एकाच अनुभवविश्वाचे परस्परसंबंधी पैलू आहेत. तुमचाच परिच्छेद क्रिकेट ऐवजी नृत्य किंवा स्वयंपाक हा शब्द वापरून आणि उदाहरणं बदलून जसाच्या तसा लिहिता येईल. मुद्दा असा की कलात्मकता कुठेही दिसू शकते, आणि प्राधान्याने रंजनात्मक/कौशल्यात्मक कृतींमध्ये ती शोधली जाते.
या पलिकडे जाऊन माझा मुद्दा असा आहे की जीवनशैलीतल्या बदलामुळे हे सगळेच अनुभव घेण्याची पद्धत बदललेली आहे. त्यामुळे क्रिकेट, वर्तमानपत्रं ही कलाप्रकार-रंजनानुभव-ज्ञानग्रहण-आस्वाद या पैलूंशी निगडित माध्यमं बदललेली आहेत. हे
हे थोडं फसवं विधान आहे. टक्केवारी संपूर्ण लोकसंख्येची की केवळ रंजनानुभव घेणारांची? सगळ्याच संख्या वाढतात तेव्हा नक्की काय कुठच्या प्रमाणात घटताना दिसतं याबाबत स्पष्ट असलेलं बरं. क्रिकेटचं उदाहरण देऊन हेच विधान 'पाच दिवस टेस्ट मॅच बघू शकणारांची टक्केवारी घटलेली आहे' असं म्हणताना ते जगाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात, की क्रिकेटप्रेमींच्या प्रमाणात? क्रिकेटप्रेमींच्या प्रमाणात अर्थातच प्रचंड घटलेली आहे, कारण इतर अनेक क्रिकेटचे प्रकार त्यांना उपलब्ध आहेत. पण ही घट हे इतरांच्या वाढीचं लक्षण आहे. जगाच्या लोकसंख्येच्या बाबतीत फारसा फरक पडलेला नसावा.
मोल घटणं हा शब्द तुम्ही 'द्यावी लागणारी किंमत' या अर्थाने नव्हे तर 'त्यातून मिळणारं आनंदमूल्य' या अर्थाने वापरलेला आहे असं गृहित धरतो. त्याबद्दल मान्यता आहेच. किंबहुना चार्लीच्या उदाहरणातून मी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. डीक्रिझिंग मार्जिनल युटिलिटीची संकल्पनाही हेच सांगते. पण आकार लहान होणं हे आयपॉडचा आकार लहान होण्याबद्दल नाही. (जरी ते एक अप्रत्यक्ष कारण असलं तरी). आकार लहान होणं हे 'एका वेळी घेतला जाणारा संगीतानुभव' या स्वरूपात आहे. दिवसातून शंभर वेळा आपण तुकड्या-तुकड्यांनी गाणी येता जाता ऐकतो. 'विपुलतेमुळे आकाराने लहान होणं' हे खरं तर सध्याच्या भांडवलशाही ग्लोबलायझेशनमध्ये जे दिसतं आहे त्याच्या विपरित आहे. इथे मॉम ऍंड पॉप दुकानं बंद पडून मोठ्ठी प्रचंड दुकानं येत आहेत. यालाही ग्राहकांच्या वागणुकीतला बदल कारणीभूत आहे. दररोज जाऊन भाजी आणणे, खालच्या दुकानात जाऊन लागेल तसतसा माल फुटकळ आणणे याऐवजी कारने एकदाच जाऊन मोठ्ठं ग्रोसरी शॉपिंग करून आठवड्या-दोन आठवड्यांची बेगमी करणं बळावतं आहे. मग ते करणं सोयीचं व्हावं यासाठीची डीफ्रॅगमेंटेड दुकानं उदयाला येत आहेत. मुद्दा असा की संक्षिप्तीकरण आणि विखंडीकरण हे किंमत कमी होण्याचे नेसेसरी आउटकम नाहीत.
लेख आवडला पण...
लेख आवडला, काही मुद्दे व्यवस्थितरीत्या यायला हवे होते असे मात्र प्रकर्षाने जाणवले. मुळात लेखामधे "माध्यम" आणि "कलानुभव" यामधे गल्लत झाली आहे असे मला वाटत राहिले. कारण, लेख बराचसा "माध्यमातील बदलांबद्दल" बोलत आहे. या बदलांमुळे झालेल्या कलानुभवाचा "इम्पॅक्ट" अर्थात सर्वत्र जाणवत आहेच. पण जेव्हा आपण मास मीडीयाबद्दल बोलत असतो तेव्हा तंत्रज्ञानामधील आश्चर्यकारक बदलाचा देखील विचार करायला हवा. मानवी इतिहासामधे माध्यमे ही पूर्वीपासून "वन टू मेनी" आणि वन टू वन राहिली आहेत. मास मीडीया आणि सोशल मीडीयामधून ही माध्यमे आता "मेनी टू मेनी" अशी पसरत जात आहेत. सोशल मीडीयामुळे भाषा, धर्म, भौगोलिक अंतर या सर्व अडथळ्यांना पार करत एक यशस्वी कम्युनिकेशन प्रस्थापित करता येऊ शकते. याच कम्युनिकेशनमधे विविध कलामाध्यमे आणि त्यांचा प्रसारदेखील करता येऊ शकतो. सोशल मीडीयामुळे बदलत चाललेले कलानुभव हा खरंच एक रंजक विषय आहे. पण लेखामधे याचा अजिबात विचार केलेला नाही.
कधी एके काळी "गायक" म्हणून नाव होण्ञासाठी तुम्ही कुठल्यातरी जलश्यामधे गाणे गायला हवे, तिथल्या प्रेक्षकांनी तुमचे कौतुक करायला हवे आणि त्यानंतर तुम्हाला तशा संधी विविध शहरांमधून मिळत रहाय्ला हव्यात तर तुम्ही गायक म्हणून प्रसिद्धीला येऊ शकता. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकत होता. यामधेच एक "श्रोता" म्हणून तुम्ही क्वालीटी कंट्रोल करू शकत नव्हता. अमुक शास्त्रीबुवांच्या गाण्याचं तिकीट काढले असेल तर ते जसे काही म्हणतील तसे ऐकावेच लागत होते. मला आता अमुक राग नको दुसरा राग म्हणा, असे "सर्वसामान्य श्रोता" म्हणू शकत नव्हता. आजची स्थिती त्याच्या अगदी उलट आहे. तुमचे युट्युबवरील अथवा फेसबूकवरील गाणी कुणीही ऐकू शकतो. त्याला दाद देऊ शकतो. आणि जर ते गाणं त्याला खूप आवडलं तर पैसे देऊन ते विकत घेऊ शकतो. आणि अजिबात आवडलं नाही तर एका बटणाच्या क्लिकने बंद करू शकतो. एकेकाळी ऑडिओ सीडी अथव कॅसेट विकणं हा चित्रपटनिर्मात्याचा एक इन्कम सोर्स होता. आज चित्रपटनिर्माता स्वतः त्याची गाणी विविध साईट्सवर विनामूल्य ठेवत असतो. यामधली "गाणी ही सध्या प्रमोशनसाठीच असतात" वगिअरे गुंतागुंत बाजूला ठेवली तरी निर्माता हे असे करू शकतो आणि त्यामुळे त्याच्या कॅसेट/सीडी विक्रीचा आकडा कमी झाला तरी "जास्तीत जास्त लोकांपर्यंत गाणी पोचू शकतात" हा फंडा यशस्वी होत असताना दिसतोच.
सोशल मीडीयामुळे अनेक संगीतकार, चित्रकार, फोटोग्राफर, लेखक, कवी, गायक गायिका लोकांपर्यंत सरळ पोचत आहेत. एकेकाळी असणारे अधलेमधले "टॅलन्टचे दलाल" आतादेखील आहेत पण आता ते "आवश्यक" राहिलेले नाहीत. प्रेक्षक-श्रोता-वाचक हे आता फक्त "ग्राहक" राहिलेले नाहीत. कलास्वादक म्हणून त्यांच्याकडे कलाकार पाहू शकतात- पाहत आहेत.
लेखात उल्लेखलेला "गाण्यांच्या शॉटमधील कट्सच्या वेळेचा" यामधे कलानुभवापेक्षाही तंत्रज्ञानाचा खेळ जास्त आहे. आय अॅम शुअर, विजय आनंद गुरूदत्तच्या काळामधे ज आजच्यासारखे डिजिटल एडिटींग उपलब्ध असते तर त्यांनी त्याचा यथायोग्य आणि भन्नाट रितीने वापर केलाच असता.
कारण, लेख बराचसा "माध्यमातील
याबद्दल खुलासा मिलिंद यांना दिलेल्या प्रतिसादात केलेला आहे.
हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, काहीसे एकमेकांशी जोडलेले. मुळात देवाकडे जाण्यासाठी भक्ताला जर बडव्यांतर्फे जावं लागत असेल तर बडव्यांचं प्रस्थ माजणारच. आत्तापर्यंत माध्यमं ही बोजड आणि महाग होती. पुस्तकं, रेकॉर्ड्स, फिल्मची रिळं इथून तिथे नेण्याची गरज होती. मुळात पुस्तकं छापणं, रेकॉर्ड्स तयार करणं, फिल्म रिळांवर आणणं हेही प्रचंड खार्चिक होतं. आता तो खर्च शेकडो पटींनी कमी झालेला आहे. हे मधले दलाल नष्ट झाल्यामुळे कलानिर्मितीचं अधिक लोकशाहीकरण झालेलं आहे. 'मोजक्या गायकांची ओलिगोपॉली बंद होऊन वैविध्य वाढलं' इतपतच लेखात उल्लेख आहे.
.
बरोबर. मी सोशल मीडिया, डिजिटीकरण, इंटरनेट, मोबाइल यांनी घडवून आणलेली क्रांती ही सर्वसाधारण 'तंत्रज्ञानाचा विकास' या ढोबळ लेबलखाली टाकलेली आहे.
कलानुभावाचं संक्षिप्तीकरण की
कलानुभावाचं संक्षिप्तीकरण की कलाविष्काराचं संक्षिप्तीकरण?
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
शॉट्सची लांबी
गुरुदत्त प्रभृतींनी आज काय केलं असतं ते सोडून देऊ. मुळात हेलनकडे ज्या दर्जाचं नृत्यकौशल्य होतं, ते कत्रिना कैफकडे नाही. त्यामुळे संकलनाला दिमतीला लावून तिच्या नृत्यात झिंग (किंवा एक प्रकारे तिचा आभास) निर्माण केली जाते. हेलनला त्याची गरज नव्हती. ती लीलया लाँग टेक देऊ शकत असे. किंवा असं म्हणता येईल, की खुद्द हेलनच झिंग देण्यासाठी पुरेशी होती.
शिवाय, अटेंशन स्पॅन कमी होतं आहे ह्याचाही संबंध असू शकेल. एका किमान वेगानं प्रतिमा हलल्या नाहीत, तर आजचा तरुण कंटाळून जाईल आणि त्याचं लक्ष विचलित होईल. तो आपल्या मोबाईलशी (किंवा इतर कशाशीतरी) खेळू लागेल. ते टाळण्यासाठीसुद्धा हे जलद गतीचं संकलन वापरलं जात असू शकतं.
थोडक्यात, ह्यात तंत्रज्ञानाचा खेळ नाही असं नाही; पण त्याचा वापर विशिष्ट अनुभव देण्याच्या हेतूनं केला जातो आहे. निव्वळ तंत्रज्ञानामुळे एखादी गोष्ट आज शक्य आहे म्हणून नव्हे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मुळात हेलनकडे ज्या दर्जाचं
हेलन आणि कत्रिनाची गाणी निव्वळ उदाहरणार्थ दिली होती, मुद्दा स्पष्ट होण्यासाठी. माझ्या मते हा हेलन आणि कत्रिना असा तत्कालीन फरक नाही. हेलनचीच जुनी गाणी आणि नवी गाणी यांमध्ये तुलना केली तरी हेच चित्र दिसतं, फक्त इतका नाट्यमय फरक दिसत नाही. उदाहरणार्थ मुंगडा या गाण्यातले शॉट्स चार ते दहा सेकंदांचे आहेत. काही लहानही आहेत. तीसरी मंझिल १९६६ आणि इन्कार १९७८ यादरम्यानच्या बारा वर्षांतच जाणवण्याइतका फरक दिसतो. सिनेमाच्या ट्रेलर्सच्या चढत्या आलेखातूनही हाच स्पष्ट ट्रेंड दिसतो.
आधुनिक प्रेक्षकाचा अटेंशन स्पॅन कमी झाला की ग्रहणक्षमता वाढली हे माझ्या मते विवाद्य आहे. पण काही का कारण असेना प्रेक्षकांची 'लवकर आटपा, भराभर येऊ द्या, आणि थोडी ऍक्शन ठेवा राव' ही मागणी निर्माण झाली आहे हे निश्चित. कदाचित माध्यमसुशिक्षिततेमुळे हे झालं असेल. कदाचित त्याच्या वेळासाठी इतर माध्यमं, इतर कलाकृती स्पर्धा करत असल्यामुळे त्याचा वेळ अधिक मूल्यवान झाला असेल.
हे अर्थातच पटतं. हा अपघात नाही, किंवा सध्याचं फॅड नाही, तर हळूवार पण सतत होत आलेला बदल आहे.
वेगळाच आहे लेख. काय विशेषण
वेगळाच आहे लेख. काय विशेषण लावावं त्याचा निर्णय न करता येण्याइतपत. मला तो वाचताना राजीव नाईक यांच्या 'नाटक - एक पडदा, तीन घंटा' या पुस्तकाची एकाहून जास्त वेळा आठवण झाली (माझ्या लिहिण्यातून हे पुरेसं स्पष्ट होणार नाही कदाचित, ही दाद आहे). लेख पुन्हा पुन्हा वाचला जाईल, इतकंच तूर्तास.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
विचार करायला लावणारा लेख
सगळंच पटलं असं नाही, पण विचार करायला लावणारा लेख.
एक काहीसं वेगळ्या धर्तीचं विखंडीकरण मला जाणवलेलं आहे. उदाहरण देतो. स्टीवन पिंकर या शास्त्रज्ञाने 'The Better Angels of Our Nature' या नावाचं एक आठेकशे पानी पुस्तक दोन वर्षांपूर्वी लिहिलं होतं. (त्यातला मुख्य मुद्दा असा, की पूर्वेतिहासापासून आजपर्यंतचा विचार केला तर मानवी समाजांतली हिंसा हळूहळू कमी होत चाललेली आहे.) हे पुस्तक मी वाचलेलं नाही. पण या पुस्तकाची परीक्षणं, त्यावर टीकालेख, त्या टीकेचं खंडन करणारे लेख, वगैरे मी इतक्या संख्येने वाचलेले आहेत, की मूळ पुस्तक वाचण्यात काही अर्थही नाही असं वाटतं. यात अर्थात सोयीचा भाग आहेच. आठशे पानं वाचायला बराच वेळ काढावा लागेल; पण त्याउलट रिव्ह्यू वाचायला काही मिनिटंच पुरतात. शिवाय हे काम अनेक व्यवधानं सांभाळून मध्येमध्ये करता येतं.
माझा संशय असा की असाच प्रकार अलिकडे अनेक पुस्तकांबाबत अनेकांचा होतो. म्हणजे एखाद्या पुस्तकाबद्दलची अनेकांचं मतं जाणून घेऊन त्यांची मनात गोधडी शिवणं याने प्रत्यक्ष वाचनानुभवाची जागा घेतलेली आहे. हे पूर्वी होतच नसे असं नाही. लक्षणीय पुस्तकाचं परीक्षण TLS किंवा LRB मध्ये येतच असे. पण त्यावरची शेकडो लोकांची मतं आपल्याला आज इंटरनेटमुळे चुटकीसरशी पाहता येतात तसं पूर्वी नव्हतं.
सारांश काय, तर हे पुस्तकाचं विखंडीकरण आणि त्यानंतर त्या फुटक्या तुकड्यांतून झालेलं परावर्तन + अपवर्तन असं काहीसं आहे.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
माझ्या वैयक्तिक अनुभवाप्रमाणे-
माझ्या वैयक्तिक अनुभवाप्रमाणे मी या निरीक्षणांशी सहमत आहे. इतका सहमत आहे की हा लेखही वाचताना मी तुकड्या तुकड्यात वाचला आणि लेखकाला काय म्हणायचे आहे तेवढे(च) पाच मिनिटात सापडते का ते पाहिले. या दुष्टचक्रात मीही अडकलो आहे.
कदाचित सगळेच सापडले नसेल, काही/बरेच निसटले असेल पण एकंदरीत सूर समजला. मला याबाबतीत जे वाटते ते असे आहे- माध्यमांचे वैविध्य खूपच वाढलेले आहे. समाजातील मनोरंजन करून घेऊ शकणार्यांची संख्याही वाढलेली आहे. सर्वांच्याच जीवनाचा वेगही वाढलेला आहे. सर्वांना सर्वच आवडेल अशी परिस्थिती नाही. ज्यांना जे आवडेल आणि जितके आवडेल तितके ते घेण्याची मुभा निर्माण होत आहे. (उदा. एखाद्या च्यॅनलवर सुरू असलेला कार्यक्रम नाही आवडला/ तिथे जाहिरात सुरू झाली तर नवेच च्यॅनेल लावून त्यावरचा नवाच कार्यक्रम बघता येतो) यांचा एकंदरीत परिणाम म्हणून माध्यमग्राहकांचा 'अटेंन्शन+कॉन्सन्ट्रेशन स्पॅन' (चित्ताकर्षण + केंद्रीकरण कालावधी) कमी कमी होत आहे.पण हा वेग / हे विखंडीकरण खोलवर बुडू इच्छिणार्यांना योग्य नाही. ज्याला जे खरोखरीच मुळातून आवडते त्याकडेच फक्त त्याचा ओढा राहील आणि बाकी सर्व प्रकारांकडे त्याचे दुर्लक्ष होत जाईल अशी ही व्यवस्था होत आहे.हे केवळ मनोरंजनाबद्दल खरे आहे असे नव्हे तर सर्व प्रकारच्या माहितीबद्दलही खरे आहे. हे समजले नाही अशा व्यक्तीला कोणत्याच विषयात 'पारंगत' होता येणार नाही.
खरा प्रश्न असा आहे की या घुसळणीत 'आपल्याला नक्की काय आवडते?' या प्रश्नाचे उत्तर मिळण्याइतका तरी 'अटेंन्शन+कॉन्सन्ट्रेशन स्पॅन' नव्या पिढ्यांकडे असणार आहे का? की प्रवाहपतीताप्रमाणे 'जे काही वाट्याला येईल ते' करत पिढ्या पुढे जात राहतील?
खरा प्रश्न असा आहे की या
अंमळ भीतीदायक प्रश्न आहे खरा. पण नथिंग इज़ फॉरेव्हर या तत्त्वाप्रमाणे आशा करायला जागा आहे असे वाटते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पण नथिंग इज़ फॉरेव्हर या
'नथिंग इज* फॉरेव्हर' आणि 'होप स्प्रिग्ज इटर्नल...' ह्यातील शह-काटशहाचा विचार करत आहे. उणे शून्य तर नाही...?
* : तो नुक्ता कसा द्यायचा हे सांगा बुवा कोणीतरी.
दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले
नुक्ता
ज़=jJ, ज़ी=jJee, इ.इ.
तदुपरि काटशहाबद्दल बोलायचे तर उणे शून्य दरवेळेस येईलच असे नाही असे वाटते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धन्यवाद
धन्यवाद
दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले
नुक्ता
णुक्ता देण्यासाठी मी शिफ्ट अधिक "के" हे बटण वापरतो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
धन्यवाद.
धन्यवाद.
दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले
विसुनानांना उत्तर
ही परिस्थिती पूर्वीही नव्हती. मात्र आता दुर्भिक्ष्य कमी झाल्यामुळे आवडीचे पदार्थही बाजारात निवडण्याची सोय झालेली आहे. पुन्हा मी अन्नाचं उदाहरण देतो. समजा राज्यात दुष्काळ आहे. सरकारने अन्नछत्र चालवलेलं आहे. तिथे दिवसातून दोनदा तुम्हाला खाता येतं. रोज सकाळी आणि रात्री कडकडून भूक लागल्यामुळे तिकडचं खाणं आवडलं नाही तरी खावंच लागतं. याउलट जेव्हा सुबत्ता असते, वेगवेगळी रेस्टॉरंट्स उपलब्ध असतात तेव्हा तुम्ही साहजिकच तुमचे आवडते पदार्थ खाल. दुष्काळात बनणाऱ्या अन्नाला उच्च दर्जाचं बनवण्यासाठी काहीच इन्सेंटिव्ह नसतो. याउलट सुबत्तेच्या काळात चव चांगली बनवण्यासाठी सगळीच रेस्टॉरंट्स झटतील.
अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे की ग्रहणशक्ती वाढलेली आहे याबद्दल तांत्रिक वाद घालता येईल. पण बदल झालेला आहे हे निश्चित. पण त्यातून
हेच होतं याबद्दल खात्री नाही. किंबहुना वैयक्तिक ग्राहकाचा आवाका वाढला, आणि ग्राहकांचं वैविध्य वाढल्यामुळे रंजनोत्पादनांच वैविध्य वाढलं. या वाढीमुळे आत्तापर्यंत हमखास चालतील असे विषय सोडून इतर विषयही हाताळले गेले. उदाहरणच द्यायचं तर ७०-८० च्या दशकातला हिंदी सिनेमा आणि ९०-०० मधला सिनेमा यांची तुलना केली तर ब्लॉकबस्टर, टाइमपास मसाला सिनेमे दोन्ही ठिकाणी दिसतील. पण नवीन काळात अनेक अनवट विषय हाताळले गेलेले दिसतात.
लेखन आवडलेही, पण..
लेख, मुद्दे वगैरे चांगले आहे, पटणेबल आहेत.. लेखन आवडलेही.
पण लेख पसरट वाटला. उदारणांच्या गलबल्यात मूळ मुद्दा पातळ झाल्यासारखे वाटले. मोजकी पण अधिक मार्मिक उदाहरणे आली असती तर म्हणणे अधिक पोचले असते असे वाटते. सद्य लेखनात मुद्यांपेक्षा उदाहरणेच जास्त असे काहीसे वाटले.
अवांतरः
"रात्र रात्र चालणाऱ्या मंगळागौरी आता शहरांमध्ये केव्हाच बंद पडलेल्या आहेत" हे केवळ पुण्यापुरते बरोबर असावे आणि त्याचे कारण उत्साह नसून हॉल रात्रभर मिळत नाही हे आहे. मुंबईत व इतरही अनेक शहरांत रात्र्भर मंगळागैरी चालतात (व दुसरे दिवशी बायका ऑफिसातही जातात (पेंगतात))
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मुळात विषयच एकदम इंटरेस्टिंग
मुळात विषयच एकदम इंटरेस्टिंग आहे आणि त्यावर राघांच्या खास मुद्देसूद शैलीत वाचताना खूप समाधान वाटलं. धन्यवाद..
ज्याला जे आवडतं वगैरे
कधी कधी समकालीन ट्रेंड्जना प्रतिक्रिया म्हणूनही काही रोचक गोष्टी येतात. उदाहरणार्थ, गेल्या काही वर्षांत 'स्लो सिनेमा'चा काही उत्कृष्ट दिग्दर्शकांनी चांगला वापर केला. कार्लोस रेगाडास, एन्रिके रिव्हेरोची 'पार्के व्हिया' वगैरे. माझा एकूण अनुभव असा आहे की जिथे मुळात कल्पनादारिद्र्य नव्हतं अशा देशांच्या सिनेमात आजही उत्कृष्ट निर्मिती होताना दिसते, आणि त्यात प्रेक्षकांच्या बदलत्या रुचीपेक्षा 'मला काय आणि कसं सांगायचं आहे' हे जास्त महत्त्वाचं ठरतं. अशा सिनेमाला आंतरराष्ट्रीय महोत्सवांत प्रतिष्ठेचे सन्मान वगैरे मिळतात. बाकी 'हंड्रेड क्रोअर्स' किंवा तत्सम 'क्लबां'त पोहोचण्यात त्या दिग्दर्शकांना तसाही रस नसतोच.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
?
ह्या वाक्यातून मुळात कल्पनादारिद्र्य आहे असेही देश आहेत असे ध्वनित होते. तुमच्या मते अशा देशांची उदाहरणे कोणती?
कल्पनादारिद्र्य
सिनेमाच्या संदर्भचौकटीत विचार करता भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, आयर्लंड आणि ब्रिटन ही नावं पटकन सुचतात.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
रोचक सरसकटीकरण
या देशांत दिसणारे कल्पनादारिद्र्य इन्ग्रेन्ड आहे, मुळातले आहे असे म्हणण्यात मोठे ब्लँकेट-स्टेटमेंट दिसते आहे. सिनेमा हे माध्यमच मुळात ब्रिटिश काळात आले, असे असूनही उत्तमोत्तम भारतीय शिन्मे होतेच की. ते सत्यजित राय्/अदूर गोपालकृष्णन की अजून कोणकोण मंडळी होती, ते असूनही अशी विधाने करणं रोचक वाटतं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कल्पनादारिद्र्य
फ्रान्स, इटली हे प्रगत देश, किंवा मेक्सिको, इराणसारखे मागासलेले देश ज्या प्रतीचा सिनेमा जगाला देतात, त्याच्याशी तुलना केली तर त्या मानानं वर उल्लेखलेले देश सिनेमाच्या चौकटीत तेवढे समृद्ध नाहीत असं दिसतं. किंवा खुद्द भारताचं संगीत, चित्र-शिल्प-नृत्य, साहित्यादि कलांतलं योगदान, किंवा ब्रिटनचं साहित्यातलं योगदान पाहिलं तर ह्या देशांतला सिनेमा त्या उंचीला पोहोचत नाही हे दिसतं. ह्याचा अर्थ भारतात किंवा ब्रिटनमध्ये उत्तम सिनेमा बनलाच नाही, असं नाही. माझ्या मते स्टॅन्ले क्युब्रिक, केन रसेल किंवा लिंडसे अँडरसन हे चांगले ब्रिटिश दिग्दर्शक आहेत, पण त्या मानानं फ्रेंच/इटालियन सिनेमा खूप समृद्ध आहे. तसंच काही भारतीय दिग्दर्शक उत्तम आहेत, पण त्या मानानं इराणी किंवा मेक्सिकन सिनेमा खूप समृद्ध आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मान्य. पण मग याची संगती कशी
मान्य. पण मग याची संगती कशी लावणार? भारतापुरते बोलायचे झाले तर सहमत आहे, कारण बाकी देशांचा माझा वट्ट अभ्यास नाही. पण मुळातच काही नसेल तर मग सत्यजित राय इ. लोक पैदाच झाले नसते. काहीतरी गडबड आहे खास, पण ती ऑल अलाँग होती असे म्हणणे सयुक्तिक वाटत नाही. काही पीरियड तरी होतेच ना जबराट? मला गडबड वाटतेय ती जे दिसतंय त्याची संगती लावण्यात, बाकी कशात नै. आपला सिनेमा फालतू आहे म्हणजे कायम तसाच होता असे नाही. म्हणून कल्पनादारिद्र्य सिनेमाच्या परिप्रेक्ष्यात पाहिले तरी ते चिरकालिक आहे असे वाटत नाही इतकेच प्रतिपादन होते आणि आहे. बाकी काही बोलण्याइतका माझा आजिबात अभ्यास नाही म्हणून इथेच थांबतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
>> पण मुळातच काही नसेल तर मग
माझा मुद्दा काहीसा असा आहे :
मुळात भारतीय दृश्यकला आणि कथनपरंपरा पुरेशी समृद्ध होती. पण ब्रिटिश शब्दसामर्थ्याला आपण भुलून गेलो आणि आपलं स्वत्व हरवून बसलो. त्यामुळे आपला सिनेमा (ब्रिटिश सिनेमाप्रमाणेच) फार बडबड करतो आणि कमी दाखवतो. सत्यजित रायसारखा सन्माननीय अपवाद हा टागोरांच्या कलाप्रयत्नांतून बंगालात विकसित झालेला असं म्हणता येतं. अदूर, ऋत्विक घटक, गुरुदत्त वगैरे स्वयंप्रतिभेतूनच घडत गेले. पण एकंदरीत हिशेब करता आपण गरीबच दिसतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
चित्रपट
आपल्याकडे आहेत ते "बोलपट" खरे "चित्र"पट अजून धड बनलेच नाहित; असं कवितातैंसारखं म्हणताय का?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
धन्यवाद
'स्वत्व हरवून बसलो' हे वाक्य आणि 'मुळातले कल्पनादारिद्र्य' हे शब्दप्रयोग परस्परविरोधी आहेत आणि तुमच्या विवेचनावरून काय ते स्पष्ट होते आहेच. सबब, मुळातल्या गरीबीऐवजी 'स्वत्व हरवून बसलो' हेच जास्त योग्य.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
केवळ सिनेमा
इतर कलापरंपरा न तपासता आणि वासाहतिक इतिहासाचा फायदा न घेता केवळ सिनेमा ह्या मूलतः आधुनिक कलामाध्यमाच्या चौकटीत भारताचं जागतिक योगदान पाहिलं, तर ते कल्पनादरिद्री म्हणता येतं. तसं पाहावं का, आणि मग तसं म्हणावं का, हा प्रश्न अर्थात रास्त आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सहमत
सहमत, "बदलती रुची" आणि "काय/कसं सांगायचं आहे" ह्यातला पुल बांधणारे सिनेमे म्हणुन देऊळ,शिप ऑफ थिसिअस कडे बघता येईल, त्यापलिकडेही निर्मिती(विहीर)असेलच पण प्रेक्षकांना बरोबर घेऊन जायचं असल्यास(अशा निर्मितीस भविष्यात हातभार लावायचा असल्यास) हे सिनेमे ह्या सगळ्याची सुरुवात म्हणुन बघता येतील.