कलानुभवाचं संक्षिप्तीकरण/विखंडीकरण
लेखक - राजेश घासकडवी
मार्च १९३९. इंग्लंड आणि साउथ आफ्रिकेतल्या टेस्ट क्रिकेट मालिकेतली पाचवी आणि शेवटची टेस्ट सुरू होणार होती. इंग्लंड १-० ने पुढे होते. शेवटची टेस्ट 'टाइमलेस टेस्ट' करायची ठरवली. तसंही इंग्लंडच्या खेळाडूंची बोट बारा दिवसांनी निघणार होती. मग चालू देत हवा तितका वेळ. निकाल लागला तर पब्लिकला बरं वाटेल असा विचार असावा. साउथ आफ्रिकेची पहिली बॅटिंग होती. वेळाचं बंधन जवळपास नसल्याने बॅट्समननी पिचवर नांगर टाकला. ओव्हरला जेमतेम २ रन करत संथ बॅटिंग सुरू झाली. साउथ आफ्रिकेने ५३० धावा केल्या. इंग्लंडला केवळ ३१६ धावा काढता आल्या. साउथ आफ्रिकेने पुन्हा संथ गतीने ४८१ धावांचा डोंगर रचला. ९ मार्चला सहाव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडला जिंकण्यासाठी तब्बल ६९६ धावा करायच्या होत्या.
पुढच्या पाच दिवसातले दोन दिवस वाया गेले - एक दिवस टेस्टच्या परंपरेनुसार विश्रांतीचा दिवस, आणि एक दिवस हवामानामुळे खेळ झाला नाही. पण दर दिवशी सुमारे दोनशे सव्वादोनशे या दराने १४ मार्चच्या संध्याकाळपर्यंत इंग्लंडच्या ५ बाद ६५४ धावा झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी बोट सुटायची असल्याने दोन्ही कप्तानांनी परस्परसंमतीने टेस्ट मॅच अनिर्णित जाहीर केली. एक सामना बारा दिवस चालला (खेळ 'फक्त' ९ दिवस), आणि तरीही अनिर्णित राहिला. लोक हळहळले असतील का? अर्थातच. इंग्लंडच्या फॅन्सना नक्कीच हळहळ वाटली असणार. शेवटच्या डावात सर्वाधिक धावा करून सामना जिंकण्याची संधी गेली. साउथ आफ्रिकनांनाही कदाचित शेवटच्या पाच विकेट चटकन पडण्याची आशा वाटली असावी. पण काही असलं तरी इतका प्रचंड वेळ घालवून काहीसा कंटाळवाणा खेळ आठ दिवस पाहून हाती काही लागलं नाही.
आजच्या जमान्यात हे ऐकून खरंदेखील वाटत नाही. आजही टेस्ट मॅचेस पाच दिवस चालतात - पण 'विश्रांतीचा दिवस' वगैरे राजेशाही कल्पनांना केव्हाच डच्चू मिळाला आहे. सत्तरीच्या दशकात एक दिवसीय सामने सुरू झाले आणि खेळाला वेग आला. पुढच्या पिढीला एक आख्खा दिवस खेळावर घालवणंही अति वाटायला लागलं, आणि तीन-साडेतीन तासांत संपणारे ट्वेंटी ट्वेंटी खेळ सुरू झाले.
खेळाच्या स्वरूपात बदल होताना टेस्ट मॅचेस पूर्णपणे मेल्या नाहीत. वनडेही थांबलेल्या नाहीत. क्रिकेट खेळणं आणि पाहणं प्रचंड प्रमाणावर वाढलेलं आहे. त्याचबरोबर प्रेक्षकवर्गामध्ये एखाद्या स्फोटाप्रमाणे वाढ झालेली आहे. शतकापूर्वी खेळ बघायचा तर तुम्हाला मैदानावर हजर असायला लागायचं. नंतर रेडियो समालोचनामुळे जास्त लोकांपर्यंत क्रिकेट पोचायला लागलं. तंत्र प्रगत होऊन ट्रान्झिस्टर्स आले, टीव्ही आले, इंटरनेट आलं, तसतशी खेळांची आणि प्रेक्षकांची संख्याही वाढली. इथे 'प्रेक्षक' हा शब्द थोडा चुकीचा आहे. कारण सगळेच काही क्रिकेट 'बघत' नाहीत. काही अर्थातच मैदानावर उपस्थित असतात, काही टीव्हीवर बघतात, काहीजण रेडियोवर ऐकतात, काही नुसतेच पेपरात वाचतात. कदाचित प्रेक्षकपेक्षा उपभोक्ते, आस्वादक, ग्राहक हे शब्द जास्त लागू व्हावेत.
क्रिकेटच्या क्षेत्रात हा बदल झाला आहे हे हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. पण त्याचा कलानुभवाशी काय संबंध? कलानुभव हा व्यापक मनोरंजनानुभवाचा एक भाग आहे. त्यामुळे क्रिकेटच्या खेळात होणार बदल हे सर्वच मनोरंजनाच्या क्षेत्रात दिसून येत आहेत. त्यामुळे वरचं उदाहरण हे या बदलांचं प्रातिनिधिक आहे. नाटका-सिनेमांचंच उदाहरण घेऊ. शंभरेक वर्षांपूर्वी जेव्हा सिनेमा जवळपास नव्हता, तेव्हा संगीत नाटक पाहणं ही उच्चवर्गीयांची व उच्चमध्यमवर्गीयांची कलात्मक मनोरंजनाची पद्धत होती. ही नाटकं पाचपाच सातसात अंकी असत. आजची नाटकं बघितली तर जास्तीत जास्त तीन अंकी दिसतात. पण मोठंसं नाटक म्हणजे दोन अंकी. एकांकिका, लघुनाट्यं, पथनाट्यं ही संक्षिप्तीकरणाची उदाहरणं गेल्या काही दशकांतली. पथनाट्य हे पाच तास चालणं शक्यच नाही. त्याचा जीव अर्ध्या तासाचा. रस्त्यातून येणारा जाणाराला कुतूहलाने खेचून घ्यायचं आणि खिळवून ठेवायचं. आणि करमणुकीच्या जोरावर घटकाभरच रोखून धरायचं. शनिवार, रविवार, सुटीच्या दिवसांत नाटकांच्या थेटरांमध्ये गर्दी होते खरी. पण मंगळवारी संध्याकाळीदेखील नाटकाला जाणं आता शक्य झालेलं आहे. त्यासाठी अर्थातच खेळ दोन अडीच तासांत संपणार असला तर सोयीचं जातं.
सिनेमांच्या बाबतीतही हेच दिसतं. चार-साडेचार तास चालणारे सिनेमे, त्यात वीसवीस गाणी हे प्रकार कमी झालेले आहेत - जवळपास नाहीसेच झाले आहेत. याउलट दोन, अडीच तासांचे सिनेमे बव्हंशी दिसतात. एके काळी सिनेमा म्हणजे तीन तासांचा हे सोपं गणित असायचं. सर्वच थेटरांमध्ये तीन ते सहा, सहा ते नऊ, नऊ ते बारा असे शो असायचे. एक मोठ्ठं थिएटर, त्यात साताठशेंची बसण्याची सोय, आणि ठरलेल्या आकारातले शोज हे चित्र आता पालटतं आहे. या लेखात योगेश्वर नवऱ्यांनी सिनेमाप्रेक्षक आणि थिएटर्स यांनी खेळ दाखवण्याची पद्धत कशी बदलली आहे याचं वर्णन केलेलं आहे:
'मुख्य फरक झाला तो थिएटरच्या आकारांत. पूर्वी ७०० ते ८०० लोकं मावू शकणारी मोठ्ठी थिएटर्स असत, व एके ठिकाणी दोन ते तीन थिएटर्स असत. आता त्याजागी २० ते २५ स्क्रीन्स असलेली मल्टिप्लेक्सेस जिथे तिथे दिसतात. त्यातल्या प्रत्येक मिनी थिएटरमध्ये २०० च्या आसपास लोक बसू शकतात. त्याचा एक मुख्य फायदा असा की गरजेप्रमाणे एका सिनेमासाठी आवश्यक असलेल्या थिएटर्सची संख्या कमीअधिक करता येते. म्हणजे उदाहरणार्थ एखादा सिनेमा तरुणांना जास्त अपील होणारा असेल तर त्या भागात तरुणांची गर्दी जेव्हा होते तेव्हा तो अधिक स्क्रीन्सवर दाखवता येतो. म्हणजे असलेली प्रदर्शन क्षमता जास्तीत जास्त परिणामकारकपणे वापरता येते.'
यावरून असं दिसून येतं की एक सिनेमा एका वेळी ७०० लोकं बघणार हे बदलून तीन सिनेमे २०० ते ३०० लोकं एका वेळी बघण्याकडे कल गेलेला आहे. सिनेमांची संख्या अधिक, सिनेमांच्या विषयांमध्ये वाढलेलं वैविध्य, प्रेक्षकांची संख्या अधिक, प्रेक्षकांच्या निवडीत आलेलं वैविध्य, हे सामावून घेताना सिनेमा दाखवण्यासाठी येणाऱ्या खर्चाची लोकं द्यायला तयार असलेल्या वेळ-पैशांशी सांगड घालायची तर सिनेगृहांची संख्या अधिक, प्रत्येक सिनेगृहाचे आकार लहान, आणि सिनेमांचे आकार लहान या दिशेने बदल होणं स्वाभाविक आहे.
संगीताच्या बाबतीतही अशाच स्वरूपाची क्रांती किंवा उत्क्रांती झालेली दिसून येते. ज्या काळी संगीतानुभवासाठी जिवंत गायक-वादकाची गरज असायची तेव्हा ते प्रचंड महाग होतं. ज्यांना एकट्याने किंवा सार्वजनिकरीत्या गायक-वादकांना पैसे देणं परवडायचं अशांनाच संगीत ऐकायला मिळायचं. संगीत नाटकांमध्ये हेच अर्थशास्त्र लागू होतं. नाटक बघणं आणि गाणी ऐकणं या दोन्ही आनंदांची सरमिसळ केली गेली की एका प्रयोगात दोन्हीच्या मजा मिळायच्या व खर्च वाटला जायचा. रेकॉर्डिंगची सोय झाली आणि संगीत गायकापासून विभक्त झालं. दोन घटका गाणी ऐकून मन रिझवण्याचा खर्च अतोनात कमी झाला. रेडियोच्या आगमनाने तर दर गाण्यामागचा खर्च जवळपास शून्य झाला आणि अनेक सामान्यांना उत्तमोत्तम संगीत ऐकण्याची संधी उपलब्ध झाली. ट्रांझिस्टर रेडियो बैलाच्या शिंगावर अडकवून सामान्य शेतकरीही रणरणत्या उन्हात काम करता करता थोडा विरंगुळा मिळवू लागला.
या रेकॉर्ड्स तुकड्यांपोटी प्रथम गाणी तीन मिनिटं दहा सेकंदांची झाली. हे पहिलं विखंडीकरण. माध्यमं लवचिक झाल्यानंतर ते बंधन कमी झालं. मात्र आत्ता आत्तापर्यंत गाणी ही माध्यमालाच बांधलेली असल्यामुळे एका वेळी दहा गाण्यांची सीडी घेणं भाग होतं. 'एक गाणं एक डॉलर' या ऍपलच्या धोरणामुळे संगीताचं पुढच्या पातळीवरचं विखंडीकरण झालं. तुम्हाला संगीत विकत घेण्यासाठी हजार डॉलरचं बजेट असेल तर आवडणारी दोनतीनशेच गाणी घेता येत असत. कारण ती इतर गाण्यांबरोबर माध्यमाने बांधलेली असत. मात्र प्रत्येक गाणं वेगळं विकत घेण्याची सोय झाल्यावर तुम्हाला जास्त गाणी विकत घेता येतात.
वृत्तपत्रांमधे काय परिस्थिती आहे? तिथेही कमीअधिक प्रमाणात हाच प्रवाह दिसतो. इथे अपर्णा वेलणकरांनी वर्तमानपत्रांतील बदलांचं वर्णन करताना म्हटलेलं आहे:
'वृत्तपत्रांमधे 'इन्फोबॉक्स' आलेले आहेत. वाक्यावरून नजर फिरवली तर ताबडतोब ती बातमी कळली पाहिजे. मर्यादित शब्दांत संपूर्ण बातमीचं सार लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण त्यात फक्त बातमीच असते, तिचं विश्लेषण छापलं जात नाही. न्यूजचॅनेलमध्येही बदल होताना दिसला आहे. प्रेक्षकांच्या फीडबॅकमधून 'चर्चांचा कंटाळा आला, पटकन बातमी सांगा आणि मोकळे व्हा' असं अनेक प्रेक्षकांनी सांगितलं. यातून अर्ध्या तासात शंभर बातम्या वगैरे झालेलं दिसतं. वर्तमानपत्रांतही सातशे शब्दात बातमी येताना दिसतं आहे. यातून वाचकांच्या बुद्धिमत्तेला कमी लेखण्याचा थोडा प्रकार होतो आहे. आम्ही कारणं सांगतो की लोकांना हेच हवं असतं.'
दहा महत्त्वाच्या बातम्या वाचण्या/ऐकण्याऐवजी शंभर बातम्या उडत उडत ऐकण्याची ग्राहकांची अपेक्षा आहे. केवळ वेगवेगळ्या माध्यमांमध्ये, कलाप्रकारांमध्येच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर हे बदल घडून येताना दिसलेले आहेत. आधुनिक सिनेमाचं चित्रीकरण बघितलं तरी हे चटकन दिसून येतं. चित्रपटांची सुरूवात ही नाटकांमधून झाली असल्याने नाटकांचा पगडा असणं साहजिकच होतं. स्टेजवर घडणारं नाटकच जणू चित्रित करत आहोत अशा थाटात कॅमेरा चालू ठेवायचा, शक्य तितकं चित्रीकरण करून घ्यायचं अशी पद्धत होती. त्यामुळे प्रत्येक शॉट अनेक मिनिटं चालू शकायचा. आता हे कट्स काही सेकंदांचे असतात. गाण्यांच्या चित्रीकरणात तर हे प्रकर्षाने दिसून येतं. उदाहरणार्थ, ओ हसीना झुल्फोवाली या गाण्यातले शॉट्स किती प्रदीर्घ आहेत ते पाहा. लहानात लहान शॉट अंदाजे तीन ते चार सेकंदांचा आहे. किमान दोन तरी शॉट्स तीसचाळीच सेकंदांचे आहेत. याउलट, चिकनी चमेली गाण्यात प्रत्येक शॉट सुमारे एक सेकंदांचा आहे. आणि सगळ्यात दीर्घ शॉट तीन ते चार सेकंदांचा आहे. या दुव्यावर गेल्या ऐशी वर्षांमधल्या चित्रपटांच्या ट्रेलर्सचा अगदी खोलवर जाऊन अभ्यास केलेला आहे. एके काळी मिनिटाला दहा कट्स असायचे. आता ते मिनिटाला चाळीसच्या आसपास गेलेले आहेत. माझा अंदाज असा आहे की मूळ शूटिंगच्या आडात असलेली अधिक कट्सची संख्या ट्रेलरच्या पोहऱ्यात दिसते आहे.
हे संक्षिप्तीकरणाचे, विखंडीकरणाचे बदल होत आहेत हे आत्तापर्यंतच्या उदाहरणांवरून स्पष्ट व्हावं. प्रश्न असा येतो की हे बदल नक्की का होतात? या बदलांचं स्वरूप कलेपुरतंच मर्यादित आहे का? की कलेत जीवनाचं प्रतिबिंब उमटतं या नात्याने जीवनच बदललेलं आहे? माझं उत्तर असं आहे की हे बदल काही कलानुभवात किंवा करमणुकीच्या ग्रहणातच दिसतात असं नाही. किंबहुना हे बदल व्यापक सांस्कृतिक व आर्थिक बदलांतून आलेले आहेत. यांचंच प्रतिबिंब आपल्या सांस्कृतिक वागणुकीतही दिसून येतं. रात्र रात्र चालणाऱ्या मंगळागौरी आता शहरांमध्ये केव्हाच बंद पडलेल्या आहेत. बुधवार सकाळचं ऑफिस गाठायचं तर पहाटे चार चार वाजेपर्यंत फुगड्या घालणं शक्य नाही. मग दोन तासांमध्ये तो कार्यक्रम उरकून टाकणं आलंच. आधुनिक सुशिक्षित स्त्रीला मंगळागौर खेळायची की नोकरी करायची असा पर्याय असेल तर उत्तर 'जमल्यास दोन्ही करायचं आहे, पण नोकरी अधिक महत्त्वाची असल्यामुळे आपण मंगळागौरीचा कार्यक्रम छोटा करू' ही तडजोड केव्हाही सोयीस्कर पडते. लग्नाचे कार्यक्रम पूर्वी चार चार दिवस चालायचे. आता त्यांनाही फाटा मिळून सकाळी लग्न, जेवण, संध्याकाळी रिसेप्शन असं स्वरूप आलेलं आहे. सकाळचे पाहुणे आणि संध्याकाळचे पाहुणे बऱ्याच प्रमाणात वेगळे. व्रतं-वैकल्यंही अशीच थोडक्यात आटपली जातात. या सगळ्यातून 'अरेरे, कसे एकेकाळचे लोक सर्व गोष्टी मन लावून, वेळ देऊन करायचे. आणि आता कसं टाकणं टाकतात.' असे कढ काढायचे नाहीयेत. अनेक गोष्टी करायच्या असल्यावर त्यातल्या काहींचं संक्षिप्तीकरण होणं अपरिहार्य आहे हेच इथे दाखवून द्यायचं आहे.
संक्षिप्तीकरण आणि विखंडीकरणाची ही प्रक्रिया चालू रहाण्यामागे मुख्य कारण म्हणजे मध्यमवर्गाचा उदय. इथे मध्यमवर्गीय म्हटलं असलं तरी श्रीमंत, गरीब आणि मध्यम असे तीन ढोबळ विभाग करायचे नाहीयेत. मध्यमवर्गाचा उदय याचा अर्थ संधींची उपलब्धता, त्यांचा उपभोग घेण्याची क्रयशक्ती यांमध्ये मधल्या काही पायऱ्या निर्माण झाल्या आहेत या अर्थाने घ्यायचा आहे. एक उदाहरण बघू. एके काळी क्रिकेट पाहू शकणारे फारच थोडे होते. त्यामुळे क्रिकेटच्या आस्वादकांमध्ये आहेरे आणि नाहीरे अशी स्पष्ट विभागणी होती. काळ्या आणि पांढऱ्याप्रमाणे. आणि हे विभाजन सरळसरळ आर्थिक स्तरावर अवलंबून होतं. पाच दिवस क्रिकेटची मॅच पाहण्याव्यतिरिक्त काहीही न करण्याची ऐश खूप लोकांना परवडणारी नव्हती. त्याकाळी मूठभर लोक सोडले तर सगळेच गरीब होते. त्यामुळे मनोरंजनाची साधनं श्रीमंतांसाठीच होती. एक भरभक्कम बैठक मांडून पाच दिवस निवांतपणे मॅच बघायची हा खास राजेशाही थाट होता. ज्यांना क्रिकेटची आवड आहे, कधीकाळी खेळले आहेत, काऊंटी क्रिकेट वगैरे बघितलेलं आहे अशांना मैदानावर काय घडलं हे जाणून घेण्यासाठी निव्वळ वर्तमानपत्रांतील वर्णनांवर भागवून न्यावं लागे.
गेल्या शंभरेक वर्षात हे चित्र हळूहळू बदलतं आहे. पोटापाण्याची ददात नाही, मनोरंजनावर खर्च करण्यासाठी राजेरजवाड्यांइतका नाही, पण थोडाफार पैसा आहे आणि वेळ आहे, अशांची संख्या वाढली. याला कारण म्हणजे झालेली आर्थिक प्रगती. शंभरेक वर्षांपूर्वी जमीनदार, कारखानदार, अमीरउमराव वगैरे सोडले तर बहुतेक सगळी जनता कारखान्यांत, शेतात काम करत असे. अत्यंत तुटपुंजा पगार, आणि आठवड्याला सत्तरेक तास काम हे सर्रास होतं. गेल्या शतकात बैठी पांढरपेशा कामं करणारा एक मोठा वर्ग तयार झाला. त्यांचे कामांचे तास कमी झाले. म्हणजे सकाळी नऊ ते पाच नोकरी केली की संध्याकाळी दोनतीन तास मनोरंजनासाठी देणं या वर्गाला तसं परवडणारं होतं/आहे. या वर्गाचं आयुष्य तसं कमी त्रासाचं झालं. मोकळा वेळ, आणि खिशात खुळखुळणारा थोडाफार पैसा यामुळे मनोरंजनावर त्याने भर दिला नाही तरच नवल होतं.
जिथे मागणी तिथे पुरवठा या नियमानुसार या वर्गासाठी त्यांच्या खिशाला परवडणारे, त्यांच्या वेळात बसणारे पर्याय निर्माण झाले. याचा परिणाम एकंदरीत मनोरंजनक्षेत्र विस्तारण्यात झाला. म्हणजे टेस्ट मॅचेस जवळपास तेवढ्याच प्रमाणात चालू राहिल्या, पण वनडे, ट्वेंटी-ट्वेंटी मॅचेसही सुरू झाल्या. तसंच बदलत्या ग्राहकविश्वाला सामावून घेण्यासाठीही बदल झाले. हे बदल दोन प्रकारचे होते. एक म्हणजे वैयक्तिक ग्राहकात झालेला बदल. शंभर वर्षांपूर्वीच्या तुलनेने सरासरी माणूस घेतला तर अधिक गोष्टींविषयी ऐकायला त्याला आवडतं. तो अधिक सुशिक्षित आहे. त्याने पंचक्रोशीपलिकडे अधिक प्रवास केलेला आहे, अधिक लोक पाहिलेले आहेत. त्याचं अनुभवविश्व वाढलेलं आहे, त्यामुळे ज्यात रस आहे, जुजबी माहिती आहे अशी क्षेत्रं वाढलेली आहेत. खोली कमी होऊन रुंदी वाढल्याचं हे चित्र आहे. हे अर्थात वैयक्तिक ग्राहकाविषयी. दुसऱ्या बाजूने पाहायचं झालं तर माध्यमांना दिसणारा ग्राहक विस्तारला आहे. म्हणजे एके काळी वर्तमानपत्रं समजा चार टक्के लोक वाचत असतील, तर त्यांना रस वाटतील अशा मर्यादित दहा विषयांच्या बातम्या देणं आवश्यक होतं, पुरेसंही होतं. आता वाचकवर्ग जर लोकसंख्येचा चाळीस टक्के असेल, तर नव्या छत्तीस टक्क्यांच्या आवडीनिवडी, जिव्हाळ्याचे विषय यांमध्येही वाढ होणं स्वाभाविक आहे. अशा अनेकांसाठी जर बातम्या द्यायच्या तर ते मर्यादित दहा विषय पुरत नाहीत. त्यासाठी शंभर विषयांबद्दल बोलावं लागतं. आणि ते शंभर विषय कव्हर करायचे तर प्रत्येक विषयाला दिलेलं फूटेज घटतं. यातून संक्षिप्तीकरण वाढतं.
मी एक ग्राहक म्हणून माझ्यात झालेला फरक आणि माध्यमांना दिसणाऱ्या वाचकवर्गात झालेला फरक यामधला भेदभाव जरा समजून घ्यायला हवा. समजा एक अ प्रकारचं कपाट आहे. त्याला पाच कप्पे आहेत. आणि ब प्रकारचं कपाट आहे त्यालाही वेगवेगळ्या आकाराचे पाच कप्पे आहेत. आणि सध्याच्या जगात फक्त अ आणि ब प्रकारची कपाटंच आहेत. तर त्या कपाटांच्या कप्प्यांमध्ये बरोबर बसणाऱ्या दहा वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू तयार व्हायला हव्या. आता समजा भविष्यकाळात ही दोन्ही प्रकारची कपाटं बदलली, त्यांचा थोडा विस्तार झाला आणि प्रत्येकाला दहा कप्पे तयार झाले. आता अर्थातच प्रत्येक कप्प्यात बसणाऱ्या तयार करायच्या तर वीस वस्तू तयार कराव्या लागतील. हा बदल सर्वसाधारण ग्राहक वैयक्तिकरीत्या बदलल्याने झाला. यापलिकडे जाऊन समजा काही नवीन कपाटं तयार झाली, क, ड आणि ई. या प्रत्येक कपाटाला दहा कप्पे आहेत. तर सर्वांनाच भरण्यासाठी पन्नास वस्तू तयार कराव्या लागतील. कप्पे पाचपट झाले याचा अर्थ एकंदरीत क्षमता पाचपट झालीच असा होत नाही. शेवटी मनोरंजनासाठी किती वेळ देता येतो यावर मर्यादा येतात. त्यामुळे वैयक्तिक कपाटाचे कप्पे दुप्पट झाले आणि कपाट थोडंसं मोठं झालं तरी प्रत्येक कप्प्याचा आकार घटू शकतो. तसंच ही कपाटं भरणारी व्यवस्था दहापट वेगवेगळा माल तयार करण्याची क्षमता बाळगून असेलच असं नाही. त्यामुळे अर्थातच अधिक वस्तू पण लहान आकाराच्या तयार होतात.
संक्षिप्तीकरण होतं आहे, त्याला काही पटण्याजोगी कारणं आहेत इथपर्यंत तर आपण पोचलो. पुढचे उघड प्रश्न असे आहेत की याचे परिणाम नक्की काय? ते चांगले आहेत की वाईट? लयाला जाणाऱ्या व्यवस्थेतून जी नवीन व्यवस्था निर्माण होते आहे ती इष्ट आहे की अनिष्ट? एक प्रमुख क्वालिटेटिव्ह बदल झालेला दिसतो तो म्हणजे वैविध्याची वाढ. जेव्हा नाटक किंवा सिनेमा बघायला चारपास तास देऊन प्रेक्षक येणार म्हटल्यावर त्याला हवं ते देणं हे निर्मात्याचं कर्त्तव्य असायचं. बरं हा प्रेक्षक काही रोज नाटकं पहाणारा किंवा केबलवर सिनेमांचा रतीब घेणारा नव्हे. सठीसामाशी, हौसेने बघायला येणारा. त्यामुळे काही विशिष्ट गोष्टी असणं आवश्यक असायचं. कारण हे मनोरंजन 'वन साइझ फिट्स ऑल' स्वरूपाचं असायला हवं. भारत सरकारच्या बजेटप्रमाणे सर्वांनाच खूष करणारं. एकाच सिनेमात गाणी, मारामाऱ्या, कौटुंबिक कलह हे सगळं आलं पाहिजे. शिवाय एखादा मर्यादित शृंगारिक नाच आला पाहिजे, देवभक्तांना सुखवण्यासाठी चमत्कार हवेत, निदान एखादं भजन हवं. आईचं प्रेम, बहीणभावांचं अतूट नातं दिसलं पाहिजे आणि शेवटी सत्याचा विजय झालाच पाहिजे. अशा पद्धतीच्या निर्मितींना काही मर्यादा आपोआप येतात. जर मी काढलेला सिनेमा सर्वांना आवडणारा असायला हवा असेल तर सरासरी मतांना महत्त्व येतं. काय सांगायचं, काय संदेश द्यायचा, कसलं चित्रण करायचं याला मर्यादा येतात. सत्यजित राय एका लेखात म्हणतात:
‘आपल्या प्रेक्षकांना काय हवंय, ते बंगाली चित्रपटांना फार पूर्वीपासून उमगले होते. ते तेव्हापासून आपल्या बिनधोक मार्गाला घट्ट चिकटून होते. खरे म्हणजे बेचव, ठोकळेबाज, सर्व प्रकारची भेसळ असलेल्या बंगाली चित्रपटांमुळेच तर मला मुख्यत्वे काहीतरी करायची प्रेरणा मिळाली’.
या भेसळीबरोबर, खिचडीबरोबरच त्यात मेनस्ट्रीम नसलेल्या काही विचारांचं गोमांस असल्याची शंकाही येऊ नये अशी काळजी घ्यावी लागते. त्यामुळे एक प्रकारचा ठसेबाजपणा येणं अपरिहार्य असतं. आताच्या काळात सिनेमा तयार करताना हे निर्बंध कमी असतात. या संक्षिप्तीकरण-विखंडीकरण प्रक्रियेमुळे सर्व जनतेसाठी चित्रपट निर्माण करण्याऐवजी आपल्या टार्गेट ऑडियन्सपुरता छोट्या बजेटचा, कमी अपेक्षांचा लहानसा सिनेमा तयार करणं शक्य होतं. मनोरंजनाच्या अभावाचे दिवस संपल्यामुळे प्रेक्षकही अशा वेगळेपणाला प्रतिसाद देऊ शकतात. नावीन्याला महत्त्व येणं हा बदल मला चांगला वाटतो. संगीतातही नावीन्याला, वेगळेपणाला आधार मिळू शकतो. आपल्या हजार डॉलरच्या गाण्याच्या बजेटचंच उदाहरण घेऊ. जर अत्यंत लोकप्रिय आणि खरोखरच चांगली अशी शंभर गाणी घ्यायची असतील तर ती मिळवण्यासाठी मला त्याच सीड्यांमध्ये बांधलेली चारशे इतर गाणी घ्यावी लागतात. (गृहीतक असं आहे की सर्वसाधारण सीडीतल्या दहापैकी दोनच गाणी खरंतर मला प्रचंड आवडलेली असतात. बाकीची नाइलाजाने त्या दोन गाण्यांसकट येतात.) मग माझी वैयक्तिक आवड असलेली गाणी घ्यायची झाली तर त्यासाठी पाचशे डॉलरच शिल्लक रहातात. त्यातूनही मला माझी वेगळी निवड करण्यासाठी शंभरच गाणी मिळतात. त्यामुळे संगीताची निर्मिती करणाऱ्या कंपन्याही दणकून चालतील अशी खात्री असणारांनाच पैसे देऊन त्यांची गाणी विकतात. त्यामुळे फारसा माहित नसलेला एखादा ग्रुप जो पन्नासेक हजार लोकांनाच आवडू शकेल अशांची गाणी निर्माण होत नाहीत, आणि ती त्या पन्नास हजारांपर्यंत पोचत नाहीत. याउलट जर मला चांगली लोकप्रिय गाणी घेऊन माझं नव्वद टक्के बजेट शिल्लक राहिलं, तर इतर अनेक लहान लहान बॅंड्सची गाणी, मला आवडली म्हणून घेऊ शकतो. तीही आख्खी सीडी म्हणून नाही तर एकेक गाण्याच्या तुकड्यांमध्ये. अर्थातच 'हमखास लोकप्रिय' गायकांना पैसे मिळायचे तितकेच मिळतात (कदाचित किंचित कमी). पण लहानसहान, अजून प्रस्थापित न झालेल्या गायकांनाही थोडंफार उत्पन्न मिळू शकतं. संगीतासाठी असलेलं बजेट अधिक दूरपर्यंत पसरू शकतं आणि जास्त क्षेत्राच्या मातीला पाणी मिळाल्यामुळे हिरवळ वाढते.
संगीताच्या बाबतीतले बदल भारतातही होताना दिसलेले आहेत. सिनेमाशी गाणी एके काळी बांधलेली होती. याचं कारण 'वन साइझ फिट ऑल' प्रकारचं सिनेमाचं स्वरूप. सत्तर ऐशीच्या दशकांत 'गाणं म्हणजे सिनेमातलं' हे समीकरण असल्यामुळे ठराविकच गायकांची मक्तेदारी होती. कारण एवढा मोठा खर्चाचा सिनेमा काढायचा, त्यात गाणी असलीच पाहिजेत, मग ती 'नेहमीच्या यशस्वी' कलाकारांकडूनच म्हणवून घेणं सुरक्षित होतं. लता, आशा, किशोर, रफी या चार नावांत सत्तर-ऐशी टक्के गाणी विभागली जात असावीत. उरलेली दहापंधरा टक्के मन्नाडे, मुकेश, हेमंत कुमार, महेंद्र कपूर वगैरेंना गेली की नवख्या गायकासाठी फारच थोडी उरत. आता हे चित्र फारच बदललेलं दिसतं. गाणी स्वतंत्रपणे ऐकता येतात, इतकंच नव्हे तर हजारोच्या संख्येने खिशात घालून घेऊन जाता येतं म्हटल्यावर सिनेमात गाणी असलीच पाहिजेत हा नियम सैल झाला. हे झालं विखंडीकरण. त्यामुळे आजकाल गाणी नसलेले किंवा ती बॅकग्राउंड म्हणून केवळ येणारे सिनेमेही दिसतात. इंडिपॉप नव्वदीपासून सुरू झाला. त्याची सुरूवात अगदी तुरळक प्रमाणात ऐशीच्या दशकाच्या मध्यावर झाली होती. 'हवा हवा खुशबू लुटा दे' नंतर इला अरुण, बाबा सैगल वगैरे नावं त्याकाळी खूप गाजलेली होती.
बदलांच्या चांगल्या वाईटपणाबद्दल विचार करताना एक सर्वसाधारण आक्षेप घेतला जातो त्याचा निश्चितच विचार करायला हवा. 'उपभोगाच्या वस्तू संख्येने वाढल्या हे मान्यच आहे. पण त्यातून मिळणारा आनंद कमी झाला आहे का? तसं असेल तर आपण केवळ क्वांटिटीमागे धावून क्वालिटी विसरतो आहोत' हे कितपत खरं आहे?'
ज्या काळी मनोरंजनाची साधनं आणि संधी कमी होत्या त्या काळी त्याचा सोहळा करणं अपेक्षित होतं. संगीत नाटकांचंच उदाहरण घेऊ, कारण मराठी सांस्कृतिक इतिहासात त्यात गाण्यांची लयलूट असे. आणि चांगल्या गायकांना, गाण्यांना अर्थातच बऱ्याच वेळा वन्समोर मिळत असे. रात्री सुरू झालेलं नाटक पहाटेपर्यंत चालायचं. नाटकाला जोडप्याने जायचं ही मध्यमवर्गासाठी भयंकर रोमॅंटिक गोष्ट असल्याचा उल्लेख 'चिमणरावाच्या चऱ्हाटा'त येतो. कानाला अत्तराचा फाया लावून जाणं, बायकोसाठी गजरा विकत घेणं, गाण्यांच्या पद्यावली घेणं, वेगवेगळ्या मध्यंतरांत कोणाची गाणी छान होताहेत किंवा अमुक कंपनीने हा प्रयोग केला होता त्यातला धुरंधरात कसा दम नव्हता वगैरे गप्पा मारणं, सकाळी डुलत डुलत कानात गाणी रुळवत परत येणं, आणि पुढचे काही दिवस ती गुणगुणणं हे त्या अनुभवाचे अविभाज्य भाग होते. हे लिहिताना मला एक टोकाचं, आणि काहीसं करुण उदाहरण आठवतं. ‘गोल्ड रश’ या सिनेमामध्ये चार्ली चॅप्लिन आणि त्याचा मित्र हिमवादळात सापडलेले असतात. अनेक दिवस त्यांना खायला मिळालेलं नसतं. त्यावेळी काहीतरी पोटात घालायला हवं म्हणून ते चार्लीचा एक बूट शिजवतात. बूट खाताना चार्ली चॅप्लिन आपण जणू काही एखाद्या उच्चभ्रू रेस्टोरॉंमध्ये जाऊन मेजवानी झोडतो आहोत, अशा स्टाइलमध्ये तो वागतो. त्याच्या वाट्याला आलेल्या तळव्यातले खिळे तो एखाद्या माशातले काटे काढावेत अशा पद्धतीने काढतो. हे उदाहरण सांगताना मला त्या नाटकांची तुलना बुटांशी अर्थातच करायची नाहीये. मला हे सांगायचं आहे की एखाद्या गोष्टीचा स्वर्गीय आनंद होतो याचं कारण भुकेशी निगडित आहे. चार्ली आणि त्याच्या मित्राला दहा दिवस उपाशी राहिल्यानंतर बुटाऐवजी एक दिवस खरोखरच चांगलंचुंगलं खायला मिळणार असतं तर त्यांनी नक्कीच जेवणाची आतुरतेने वाट पाहिली असती. तुडुंब पोट भरेपर्यंत ते जेवले असते. आणि पुढचे दहा दिवस उपाशी असताना तो खाण्याचा दिवस मिटक्या मारत डोळ्यासमोर आणला असता. मनोरंजनाबाबत समाजाची जेव्हा उपासमार होत होती तेव्हा चित्र काहीसं असंच होतं. आता बदललेल्या चित्राचा विचार करताना ही उपासमार विसरून चालणार नाही. आजचा समाज शंभर वर्षांपूर्वीच्या समाजाने अधिक नियमितपणे 'जेवणारा' आहे. त्यामुळे पोट भरलेल्या माणसाप्रमाणेच तो चवीबद्दल अधिक चोखंदळ आहे. सामान्य चित्रपटांची निर्मितीमूल्यं बघितली तर हे उघड व्हावं.
थोडक्यात सारांश सांगायचा तर गेली शंभरेक वर्षं ही संक्षिप्तीकरणाची, विखंडीकरणाची प्रक्रिया चालू आहे. त्यातून कलाविष्कार आणि कलानुभव या दोन्हीमध्ये क्रांती झालेली आहे. एकसुरीपणा आणि साचेबद्धता जाऊन वैविध्यावर भर आलेला आहे. ही प्रक्रिया अशीच चालू राहील का? टोकाला नेली तर एक मिनिटांचे, दहा सेकंदांचे सिनेमे तयार होतील का? अर्थातच नाही. 'लोकसंख्या जर याच दराने वाढत गेली तर दोनशे वर्षांनी माणसांना एकमेकांच्या डोक्यावर उभं रहावं लागेल' या स्वरूपाचं हे अतिरेकी विधान वाटतं. कारण जसं डोक्यावर उभं राहून जगता येत नाही, तसंच कला-मनोरंजन अनुभवदेखील विशिष्ट काळापेक्षा लहान करता येत नाही. माझ्या डोळ्यासमोर जे भविष्याचं चित्र आहे ते समजावून घेण्यासाठी पुन्हा आपल्या कपाटांचं उदाहरण घेऊ. प्रत्येक कपाटाचे कप्पे लहान-लहान होतील का? तर काही प्रमाणात 'हो होतील' असं वाटतं. आत्ताच आपण एकमेकांना अनेक व्हिडियो क्लिप्स पाठवतो. त्या एखादं मिनिट ते दहाएक मिनिटं या कालखंडाच्या असतात. अनुभव त्याहून लहान होतील असं वाटत नाही. कपाटांची संख्या वाढू शकेल. आत्तापर्यंत सुशिक्षित उच्चमध्यमवर्गीय शहरी लोकांना ज्या प्रवाहांची कल्पनाही नाही असे डोकं वर काढतील. उदाहरणार्थ - कुस्ती. सचिन तेंडुलकरला बघायला हजारो स्टेडियमवर जमतात. पण कुंडल गावात कुस्ती पहायला तीन तीन लाख लोक जमतात. हे आपल्याला माहीतही नसतं. पण जसजशी या वर्गाकडे क्रयशक्ती येईल तसतशी त्यांची आवड, त्यांची मागणीही पुरवली जाईल. कपाटं वाढतील, आधीच्याच कपाटांत काही नवीन कप्पेही तयार होतील.
एकंदरीत कलानुभवाच्या भविष्याविषयी मी आशावादी आहे.