चौकट

चौकट

लेखक - चीजपफ

(सदर कथा ऑडिओ रूपातही धाग्यातच उपलब्ध करून दिलेली आहे.)

कासीमच्या प्रेताचे चार तुकडे मर्जिनासमोर पडले होते. अलीबाबाचे डोळे सारखे ओलावत होते, पण तरी तो मर्जिनाला घडलेली हकीकत हळूहळू सांगत होता. 'तिळा उघड' विसरल्यामुळे कासीम गुहेतच अडकला. चाळीस चोर आले आणि नेमक्या त्याच वेळी कासीमचं गाढव ओरडू लागलं. नको तेव्हा ओरडतं म्हणून ते गाढव होतं; का ते गाढव होतं म्हणून नको तेव्हा ओरडतं असा प्रश्न चोरांच्या सरदाराला पडला. त्याने त्या रुबाबदार गाढवाला सोडून दिलं. पण कासीम सापडला आणि चोरांनी त्याला अक्षरशः उभा चिरला. पुन्हा कुणी गुहेत शिरण्याचं धाडस करू नये, म्हणून त्याच्या प्रेताचे तुकडे धमकीच्या स्वरूपात गुहेच्या दरवाज्यावर टांगले.

दोन दिवस कासीम घरी परतला नाही; तेव्हा तराजूला लावलेलं मेण, कासीमने केलेला अलीबाबाचा पाठलाग ह्या गोष्टी कासीमच्या बायकोने अलीबाबाला सांगितल्या आणि “कासीमला शोध” अशी विनवणी केली. अलीबाबाचा अंदाज बरोबर निघाला आणि कासीमचं प्रेत गुहेत सापडलं. कासीमच्या प्रेताचे तुकडे घेऊन अलीबाबा जड मनाने घरी आला होता.

खरंतर आता गोष्टीच्या चौकटीनुसार मर्जिनाने जाऊन मुस्तफा शिंप्याला डोळे बांधून आणायला हवं. नंतर मग पाठलाग करून चोर अलीबाबाच्या घरावर फुलीची खूण करेल, तेव्हा मर्जिनाने सगळ्या घरांवर फुल्या मारायला हव्यात. मग चाळीस चोरांना गरम तेलात बुडवायला हवं आणि शेवटी खंजिरी घेऊन चोरांच्या सरदारापुढे नाचायला हवं.

पण मर्जिनाने एक चौकट नुकतीच मोडली होती. मर्जिना नुकतीच एम. बी. ए. करून आली होती. आता तिला फुल्या मारणं, चाळीस लोक तेलात बुडवणं, हे सगळं कसं बी-ग्रेड साऊथ इंडियन सिनेमासारखं बटबटीत वाटायला लागलं होतं. नाही म्हणायला खंजिरी घेऊन नाचायची तिची तयारी होती, कारण वाचक-प्रेक्षक लक्षात घेता ते रेव्हन्यू जनरेट करणार हे नक्की होतं. मर्जिनाला ग्लास सिलिंगचीपण जाणीव झाली होती. चाळीस चोर, एक मुस्तफा शिंपी, एक अलीबाबा आणि शेवटी ज्याच्याशी लग्न होतं, तो अलीबाबाचा मुलगा, अशा त्रेचाळीस पुरुषांमध्ये ती एकटीच स्त्री होती. गोष्टीच्या नावातही तिला जागा नव्हती. पण तिचा आपल्या शिक्षणावर आणि पर्यायाने हे सगळं बदलेल ह्यावर दृढ विश्वास होता.

कासीमच्या प्रेतापुढे उदास होऊन बसलेल्या अलीबाबाला तिने हलकेच विचारलं, “बाबा, एकटेच आलात की ते गाढवपण आणलंत परत?” आपली अर्धी पांढरी दाढी कुरवाळत अलीबाबा करुण स्वरात म्हणाला, “गुहेत सोनं-चांदी आहे. पण चारा नाही. सोडून कसा येईन गाढवाला? बाहेर बांधलंय.”

आपल्या सलवारीचा घोळ सावरत मर्जिना बाहेर गाढवाकडे गेली आणि “आता डरकाळी फोडलीस, तर बोनस कापीन.” अशी धमकी देऊन गाढवाला घेऊन निघाली. ही आपल्याला सिंह समजते ह्या आनंदात आणि बोनस जाईल ह्या भीतीने मर्जिनाचं सगळं गुपचूप ऐकून गाढव तिच्यामागे चालू लागलं. कब्रस्तानात ज्या अभागी प्रेतांना जागा मिळत नसे, त्या बेवारस प्रेतांना गावकरी नदीकाठी सोडून जात. सुसाट गार वार्‍यावर भुरभुरणारे आपले काळेभोर केस सावरत कंदील घेऊन मर्जिना नदीकाठी त्या प्रेतांपाशी गेली, आणि कासीमसारखं भासणारं एक प्रेत गाढवावर घालून घरी घेऊन आली. हलकेच अलीबाबाला म्हणाली “बाबा, काही वेळा ‘कट युअर लॉसेस’ ही स्ट्रॅटेजी वापरावी लागते. परमेश्वराची इच्छा म्हणून कासीमचं असं झालं. पण तुमचंही असं व्हावं हे परमेश्वराला मंजूर नाही. प्रेत कुणीतरी नेल्याचं चोरांना कळलं, तर ते तुम्हांला शोधत येतील. म्हणून बाबा, मी प्रेत आणलंय. नुसतं उघड्यावर सडत पडण्यापेक्षा ह्या बेवारस प्रेतालाही छत मिळेल. ते न्या आणि गुहेत टांगून या. आणि हो, त्या गाढवालापण तिथेच सोडून या.”

आपल्यामागे चाळीस चोर येतील ह्या कल्पनेने साधासुधा लाकूडतोड्या अलीबाबा घाबरला. मुकाट्याने दुसरं प्रेत तिथे टांगून आला. गाढवालापण तिथेच सोडून आला.

मर्जिना मुस्तफा शिंप्याला राजरोसपणे, डोळे न बांधता घेऊन आली. फ्री-लान्स लोकांना कसं वागवायचं हे ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी शिकलेल्या मर्जिनाला चांगलंच ठाऊक होत. मर्जिना म्हणाली, “मुस्तफाभाई, तुम्ही मयताला शेवटच्या प्रवासाला तयार करता. पण बघा, आमच्या कासीमभाईला साधा इस्तंबूलचा प्रवास धड करता आला नाही. फ्रेश पिटा ब्रेडचं गाठोडं उघडं ठेवून कासीमभाई जंगलात झोपले. वासाने वाघ-तरस जमा झाले आणि कासीमभाईला फाडलं हो! कसा जमायचा त्यांना हा शेवटचा प्रवास? त्यांना शेवटच्या प्रवासासाठी तयार करा. हजार दिनार क्रियेटिव्हटी फी देऊ. शिवाय शिवलेलं प्रेत तुमच्या बुटीकच्या फेसबुक पेजवर टाकलंत, तरी आमची काही हरकत नाही.” उत्तम मानधन आणि गुप्तेतेचं किंवा इतर कुठलंही जाचक कलम नसलेलं कंत्राट, हे दोन्ही बघून मुस्तफा खूशच झाला. कासीमचं प्रेत दफनसंस्कारासाठी तयार झालं.

शोकाचे चारपाच दिवस संपले नाहीत, तोच अलीबाबाला चिंता पडली-
“मर्जिना, कासीमचा जीव होता गाढवावर. त्याची काळजी घ्यायला हवी. गुहेत चारा नाही, गाढव उपाशी असेल.”

“गाढव क्रिटिकल अ‍ॅसेट नाहीये. राहू दे की उपाशी.”

“अगं, असं बोलवतं तरी कसं तुला? गेली पाच वर्षं वफादार आहे ते गाढव!”

“हो, पण पर्याय आहे का आता काही त्याला?”

“ते काही नाही. मी त्याला चारा घालायला जातो.”

मर्जिनाला मनोमन आनंद झाला. कारण चोरांचं चोरी करण्यामधलं ऑपरेशन मॅनेजमेंट चांगलं आहे याची तिला खात्री होती. तिथून उत्पन्नाचा ओघ सुरू झाला, तर जिंदगी सुलभ होणार होती. अलीबाबाला ती हलकेच म्हणाली, “खरंतर तुम्ही तिथे जाऊन रिस्क इंडेक्स वाढवताय. पण आता जातच असाल, तर परत येताना एखाददोन पोती जडजवाहीर-सोनंचांदी वगैरे घेऊन या. घर बांधू, आपल्या खेड्यात व्यापार सुरू करू. गावातल्या लोकांना पण रोजगार होईल.”

अलीबाबाला अधूनमधून आपण रॉबिनहूड नसल्याची खंत वाटायची. आता 'गावातल्या गरिबांना थेट पैसे नाही तर नाही, निदान रोजगार तरी देऊ शकेन' ह्या कल्पनेने त्याचा ऊर छप्पन इंच भरून आला. दर दोनतीन दिवसांनी अलीबाबा गुहेत जायचा आणि जडजवाहीर-सोनंचांदी घेऊन यायचा.

गावात लाकूडतोड्या अलीबाबाची सॉ-मिल सुरू झाली. मर्जिना आता साधी दासी न राहता मिलची मॅनेजर झाली. तिचे भुरभुरणारे केस आता गळायला लागले. घोळदार सलवारीऐवजी हल्ली सुटसुटीत ट्रावझर बरी वाटायची.

तिकडे चोरांच्या कंपनीचे मात्र हाल होत होते. वेळी-अवेळी ओरडून गाढवाने त्यांची झोप उडवली होती.

त्या दिवशी मर्जिना मुस्तफा शिंप्याच्या दुकानात आली आणि तिला चार भेसूर चेहऱ्याची माणसं दिसली. फार मार बसला होता त्यांना. त्यांचे काळे-निळे चेहरे पाहून तिनें विचारलं,
“फारच लागलं हो, अ‍ॅक्सिडेंट झाला की काय? इन्शुरन्स होता का?”

“अ‍ॅक्सिडेंट नाही हो मॅडम. आमचं एक गाढव आहे. रुबाबदार आहे, पण फार वैताग आणलाय त्याने.”

“टॅक्स पेयर जनतेइतकी नाही, पण तशी गरीब असतात हो गाढवं. इतकं काय केलं त्याने?”

“आमची सोन्याची पोती...”

“आं?! सोन्याची पोती आहेत तुमच्याकडे?” मर्जिनाची मनोमन खात्री पटली, की हे चोर आहेत आणि त्यांच्याकडचं गाढव म्हणजे कासीमचंच गाढव.

“आमची म्हणजे आमच्या कारखान्याची हो. ते गाढव बहुतेक सोने खातं. हल्ली सोन्याची पोती कमी कमी होत चाललीयेत. म्हणून आम्ही त्याचं शेण तपासायला गेलो, तर बघा कशा लाथा मारल्यात! त्याला चांगली शिक्षा करायला हवी. मारूनच टाकावं लागणार बहुतेक...”

मर्जिना मॅनेजर झाली होती खरी. पण तशी ती नवी अननुभवी मॅनेजर होती. त्यामुळे तिला गाढवाची काळजी वाटली. कसंही असलं, तरी गाढव पडलं जुनं टीममेट! मर्जिना म्हणाली, “आमच्या मिलमध्ये एक गाढव हवं आहे. मारकुटंपण चालेल. किती दिनार पडतील त्या गाढवाचे?”

वैतागलेले चोर म्हणाले, “फुकट देतो! वर त्याला माणसाळवायला ट्रेनरचेपण पैसे देतो. लगेच न्या!” त्यांनी लगेच मर्जिनाला गाढव, आणि वर काही सोन्याची नाणीही, दिली.

गाढव परत आलं, तरी साधासुधा अलीबाबा मात्र आता गुहेत जायला चटावला होता. अलीबाबा गुहेतून सोनं घेऊन येतच राहिला. सोनं खाणारं गाढव गेलं, तरी लुटीची पोती गायब होतातच आहेत, हे बघून आता चोर एकमेकांवर शंका घेऊ लागले होते. त्यांच्यात बाचाबाची होऊन त्यांचं ऑपरेशन मॅनेजमेंट पार मोडकळीस आलं. लुटीच्या मोहिमा कमी झाल्या. लूट कमी होऊ लागली. सोनंचांदी कमीकमी येऊ लागली. अलीबाबाने हे सगळं एक दिवस मर्जिनाला सांगितलं. ती म्हणाली “आपण आजच जाऊन सगळी सोनंचांदी घेऊन येऊ.”

तसं करून बरीच गुहा मोकळी झाल्यावर मर्जिना तातडीने खलिफाकडे गेली आणि म्हणाली, “एक चांगली रियल इस्टेट ऑपर्च्युनिटी आहे. प्राईम लोकेशन नाहीये, पण पासवर्ड प्रोटेक्टेड एन्ट्री आहे. तिथे एलिट लोकांसाठी एक चांगला मॉल उभा राहू शकतो. लोकल लोक थोडं रेझिस्ट करतील, पण ते फार नाहीत. उगाच तीसचाळीस जण असतील.” खलिफाला ते पटलं.

चोरसुद्धा आता चोरीला कंटाळले होते. थोड्याच दिवसांत खलिफा आणि चोर यांच्यात एक चांगलं डील झालं. मिल आणि मॉल या दोन्हीच्या व्यवस्थापनात मर्जिना पार गुंतून गेली. आता गोष्टीचं नाव 'अलीबाबा आणि (जिवंत) चाळीस चोर' असं राहिलं, तरी मर्जिनाला विचार करायला वेळ कुठे होता? तिने तिची चौकट आखली होती.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (6 votes)

प्रतिक्रिया

मार्मिक निरीक्षणं आहेत. कथा आवडली.

चीजपफ यांनी इतर बऱ्याच 'डॅमसेल इन डिस्ट्रेस'ना नवं रूप द्यावं ... मज्जा येईल वाचायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चीजपफ यांनी इतर बऱ्याच 'डॅमसेल इन डिस्ट्रेस'ना नवं रूप द्यावं ... मज्जा येईल वाचायला.

+१. झालंच तर राजा विक्रमादित्य आणि त्याचा वेताळ. इसाप आणि त्याचा मालक. रापुन्झेल.... ही आणि असली इतर मंडळी चीजपफ यांच्या तावडीत सापडली, तर असलंच काहीतरी अचाट वाचायला मिळेल. राजपुत्र धृमण आणि ही मर्जिना यांची भेट घडली, तर काय होईल असाही विचार मनात तरळून डॉळे अंमळ पाणावले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Smile चांगली कल्पना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा व्हेरी स्मार्ट! आवडले.
ऑडीओदेखील मस्त! आवाज छान आहे आणि चढउतार पर्फेक्ट जमलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा हा हा! मस्तं!
नीट आणि स्मार्ट कथा.

मधेच रुपक कथा आहे का असा होणारा भास, मधेच खुसखुशीत खवचटपणा, आवश्यक तेवढे संवाद - सगळंच जमुन आलंय Smile

उत्तम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सॉलिड आहे कथा. खवचट अन मार्मिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चीझकेकच आहे हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकच नंबर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मस्त लिहीले आहे. सगळी कथा एकत्रितरीत्या आणखी कसले रूपक आहे का ते अजून कळाले नाही, पण प्रत्येक प्रसंगातील "मॅनेजमेण्ट" व तत्सम क्लृप्त्या धमाल आहेत. एकदम स्मार्ट लेखन. आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0